घरगुती मदतनीसांसंबंधी चर्चा

Submitted by भरत. on 13 August, 2018 - 10:25

स्तनपानाचा धागा पेड मॅटर्निटी लीव्हकडे वळला. पेड मॅटर्निटी लीव्हवरील चर्चेचा धागा घरगुती मदतनीसांना देण्यात येणारा मोबदला, त्यांच्या सुट्या यांकडे वळला.
तर हा धागा त्या चर्चेसाठी.
हा धागा अन्य कुठे वळला, तर पुढे पाहू.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भरत,
कायद्यांअभावी मदतनीसांना नुसत्या चांगुलपणावर भत्ते वा सुट्या देण्यावर चर्चा कशी होऊ शकते? कोणाकडे मदतनीस ८-१०-२० वर्षे असतात तर कोणाकडे २ आठवडे वा २ महिने. पुन्हा वेगळ्या कामासाठी वेगळे मदतनीस. आजारपणातली देखभाल करणारे मदतनीस आणखी वेगळे. मोबदला देण्यासाठी लागणारा ज्याचा त्याचा चांगुलपणा सबजेक्टिव आहे.

जेवण वगैरे बनवणार्‍या मदतनीसांसाठी लोकांची मते बायस्ड असतात ही चर्चाही करून झाली आहे. पुन्हा काम देणारा बंगल्यावाला आहे की वन बीएचके वाला... नवरा बायको नोकरी करणारे आहेत की कोणी गृहिणी आहे... स्थळ सातारा आहे की बांद्रा ?
जो तो आपल्या विश्वाशी निगडीत बोलणार...एवढ्या मोठ्या स्पेक्ट्रमवर ' घरगुती मदतनीस मोबदला' कशी चर्चा होणार?

विषय एका ओळीत मांडता येतो म्हणून चर्चा होऊ शकते असे नेहमीच कसे होईल? चर्चा करणार्‍यांना कॉमन ग्राऊंड असल्याशिवाय नुसती खालून वर आणि वरतून खाली गोळीबार होत राहणार. मॅटर्निटी लीव आणि त्याआधीची चर्चा घडून येण्यासाठी ती करणार्‍यांमध्ये कॉमन ग्राऊंड नसल्यानेच त्या दुसरीकडे वहावत गेल्या असे मला वाटते.

चर्चा व्हावी असे वाटते पण त्यासाठी तुम्ही चर्चेचा मसुदा थोडा घट्टं करावा असेही वाटते.... चर्चा घडवून आणण्याच्या तुमच्या चांगल्या हेतूला शुभेच्छा!

पण कायदा असणे आणि इथे चर्चा करणे याचा कशाला संबंध असायला हवा?अनेकदा मूळ विषयात पुढे काही लिहीण्यासारखे नसले, आणि ५-१० लोकांना त्याच्याशी संबंधित दुसर्‍या विषयावर बोलायचे असले की चर्चा वेगळ्याच ट्रॅक वर आपोआप जाते. त्याचा मूळ मसुदा वगैरे असण्याशी संबंध नसेल.

त्या धाग्यावरचे घरगुती मदतनीसांबद्दलचे प्रतिसाद मी स्किप केलेत. स्तनपानाच्या धाग्यावरचे प्रतिसाद वाचलेत . कॉपी पेस्ट करताना पुन्हा वाचलेत.
पण लोकांना या विषयावर चर्चा करायची आहे, असे दिसते, म्हणून हा धागा काढला.
बाळंतपणाच्या रजेसंबंधी स्तनपानाच्या धाग्यावर जे काही लिहिलं गेलं त्याचा विपर्यास झाला, असे वाटल्याने वेगळा धागा काढला.
त्या प्रश्नावर एकच बरोबर मत संभवत नाही. पण निदान प्रश्नाचे कंगोरे तरी समजावेत. दुसर्‍या बाजूही समजाव्यात हा हेतू होता.
माझ्यापुरता तरी साध्य झाला.

फा, मग आधी नुसताच 'चर्चा करा' नावाखाली एक पोकळ धागा काढता येईल.. चर्चा करून पब्लिक थकलं की त्यातल्या त्यात ज्या विषया संबंधित जास्तीत जास्तं पोष्टी आल्या आहेत असे वाटेल त्यावरून चर्चेच्या धाग्याचे नाव आणि मसुदा तयार करता येईल.. अर्थात कुठल्या विषया संबंधित जास्तीत जास्तं पोष्टी आल्या आहेत ह्यावर पुन्हा चर्चा करायची नसल्यास. Proud

पण दुसर्‍या धाग्यावर काहीतरी चर्चा सुरू आहे ना? ती मुद्द्यांशिवायच आहे का?(असू शकते हे मान्य आहे) तीच चर्चा वेगळ्या धाग्यावर पुढे चालावी, म्हणून धागा काढला.

हा धागा मी घरच्याघरी मतदान असाच वाचतो आहे सारखा. आधार कार्ड बेस्ड मतदानविरुद्ध धागा सुरू केला की काय प्रोअ‍ॅक्टिव्हली असे वाटले Happy

स्तनपानाच्या धाग्याचा हेडर आणि बार यांचा काहीच संबंध लागत नाही हे मात्र खरे. रजेच्या धाग्यावर मदतनिसाला रजा असा संबंध नाही म्हणता ? ब्वॉर ! राहीलं ....
दोन घास कमी गेले

माझी स्वयंपाकीणच माझा गेले काही वर्षं मानसिक छळ करते आहे. तिला माझ्याकडे येण्याआधीच ३ मुली झाल्याने माझ्याकडून तिला मॅटर्निटीचा लाभ मिळाला नाही. पण ती एक वर्षं मॅटर्निटीवर गेली असता तिची कामे ज्या ज्या बायकांनी हिसकावून घेतली त्यांना ती माझ्याकडे स्वयंपाक करता करता खूप शाप देत असते. असे असूनही, रु. ३००० प्रमाणे तिच्या कडे कमीत कमी ७ कामे सध्या आहेत. एवढी कामे असल्यामुळे अर्थातच आमच्या फ्रिजमध्ये अर्धा अर्धा किलो कणकेचे गोळे एकावेळी मळून ठेवण्यात येतात. आणि मला दिसू नये म्हणून तो डबा सगळ्यात मागे लपवला जातो. आणि रोज त्यातील थोडी कणिक काढून मळल्याचे ३ मिनटे नाटक केले जाते.
पलीकडच्या फ्लॅटमधील बाई प्रेग्नन्ट आहे हे विचारले नसताना मला येऊन सांगणे.
एखाद्या दिवशी स्वयंपाक नसेल आणि किचनमधले कपाट आवर असे सांगितल्यावर बाणेदारपणे "माझं काम फक्त स्वयंपाकाचं आहे" असं सांगणे.
माझ्या नवऱ्याला काय काय आवडतं याची मला पुन्हा पुन्हा आठवण करून देणे.
माझ्या स्वयंपाकात चुका काढणे (शेवटी एक दिवस मी तिला, "मला स्वयंपाक येत नाही म्हणून मी तुला ठेवले नाहीये. मला तो करायचा नाही म्हणून ठेवले आहे" असे सांगितले)
मी माझ्या मुलाला शिस्त लावत असताना मधेच पचकन त्याच्या बाजूने बोलणे
१२०० रुपयात पलीकडच्या घरात १४ पोळ्या लाटणे आणि माझ्याकडे पोळ्या कमी असल्या तरी "तो मी इथे यायचा रेट आहे" असे सांगणे.
बाकीची ६ कामे असल्यामुळे फ्लॉवर, वांगं वगैरे भाज्या बचकन पाणी ओतून बेचव करणे.
"संपूर्ण स्वयंपाकाचे" ३५०० घेऊनही "मला वेळ नाहीये कुकर गार करायला. वरणाला फोडणी तुम्ही करा" असे म्हणून जाणे (आणि काढून टाकीन अशी धमकी दिली असता, वरणाला अशी काही फोडणी घालणे की न घातलेली बरी म्हणायची वेळ यावी)
पुलाव किंवा खिचडी करा असे सांगितले असता संपूर्ण बिल्डिंग जेऊ शकेल इतका करणे.
शनिवारी अनोफिशियल (आम्ही बाहेर गेलो म्हणून मिळालेली) आणि रविवारी ऑफिशियल (दोन्ही बायकांना पगारी सुट्टी असूनही) इतर दिवशी (काढून टाकीन अशी धमकी न दिल्यास) एकही ज्यादाचे छोटेही काम न करणे.
पालेभाज्या आणि कोथिंबीर निवडणे कामात येत असूनही त्या निवडताना निम्म्या कागदात गुंडाळून कचऱ्यात टाकून देणे. म्हणजे एक आड एक काडी निवडणे. (त्यामुळे हे काम जमेल तसे मी करू लागले).
पाहुणे आले असता ज्यादा पैसे देऊनही पलीकडच्या घरी जाऊन "मला जास्त काम पडलं" अशी कटकट करणे.
तिचा नवरा वेळेवर पगार न देणाऱ्या एका शिक्षण संस्थेत कामाला आहे. त्यामुळे पुन्हा पुन्हा "खरंतर मी कामाची बाईच नाहीये. माझ्यावर अशी वेळ आली आहे. आमची परिस्थिती खूप सधन आहे" असे मला ऐकवणे. तीच मला कामवाली सारखी ट्रीट करत असली तरी!

एकूणच सकाळी २५ आणि संध्याकाळी २५ अशी ५० मिनिट काम करून ३५०० रुपये मिळवून इतका माज करण्याला एक विशेष स्किल लागते.

वरील गोष्टीत अतिशयोक्ती नसली तरी हलकेच घ्या हं! मदतनीस कॅटेगरीसाठी माझ्या मनात अतीव अनुकंपा आहे. फक्त त्यांना सुद्धा माझ्याबद्दल तशी असावी अशी एक अपेक्षा आहे. ती पण आता गेल्यात जमा आहे.

तुम्हाला वरील स्वयंपाकीण काकू management साठी सल्ले हवेत का? काही माझे शहाणपण आणि काही मला मिळालेले which वर्क्स wonders (बहुतेक वेळेस). आपल्याला त्यांच्यापेक्षा असलेलं जास्तीच डोकं वापरायचं Wink

सल्ले चालतील.
आता मी खरंच मदतनीस बदलली. म्हणजे पुढील महिन्यापासून.

एकूणच सकाळी २५ आणि संध्याकाळी २५ अशी ५० मिनिट काम करून ३५०० रुपये मिळवून इतका माज करण्याला एक विशेष स्किल लागते.<<
प्रचंड सहमत.

सई तुमच्या प्रतिसादाला +१
माझ्याकडे लादी, २ वेळ भांडी, सकाळी पोळ्या, संध्याकाळी स्वयंपाक अशा विविध कामांना मिळून ४ बायका आहेत. त्यामुळे सर्व प्रकारचे अनुभव गाठीशी आहेत.
एखाद्या दिवशी फक्त आमचेच काम करायला विसरणे, कणिक नीट न मळणे, पोळ्या कच्च्या , वातड. एक दिवस ऑफिसच्या वेळेत नाही आले तर दोन पोळ्या तुमच्या तुम्हाला लाटून घ्यायला काय होतं ( ते सुद्धा वेळेत येणार नाही हे आधी न सांगता, हिची यायची वेळ ७.४५, माझी बस येते ८ ला, किती मिनटे वाट बघून पोळ्या लाटायला घ्याय्च्या? ),
भांड्यांना खरकटे/साबण तसच असणे, लादी करतांना नुसतेच फडकं फिरवल्यासारखं करणे, ४/५ ते १०/१२ दिवसांच्या सुट्टीला पुर्वकल्पना न देता गावी निघून जाणं, कामावर यायला उशीर झाला की भाजी घाईघाईत पाणी घालून शिजवून, भाकरी करपवून निघून जाणं. मोबाईलवर बोलता बोलता काम करणे. सा. बा एक निरोप द्यायचा विसरल्या तर तुम्हाला काय घरीच बसून असता की अशी दुरूत्तरे करणे इ.इ.
तरी पैशाचा काही प्रश्न नाही. आम्च्या भागात अव्वच्या सव्वा रेट आहेत. परत दिवाळीला पगारा इतका बोनस. अडीअडचणीला जास्तीचे पैसे.

सॉरी धाग्याला अवांतर असेल तर.. पण सई यांच्या प्रतिसादाने दुखर्‍या नसेवर बोट ठेवलं. पैसे देऊन पण अशी सर्विस मिळणार असेल तर का म्हणून मी ४ बायकांना मॅटर्निटी लीव्ह द्यावी? असा विचार मनात डोकवतोच.

वर वर्णन केलेली बाई आगाऊ आहे.

जास्तीची कणिक भिजवू नका सांगून भिजवत असतील तर तो डबा हुडकून कणीक दुसऱ्या कामवाल्या मावशींना donate करायचा. विचारलं तर सांगायचं दुसऱ्यांना दिली म्हणून कारण तुम्हाला माहीतच आहे की रोज आपल्याला ताज्या भिजवलेल्या कणकेच्या पोळ्या आवडतात. दुसऱ्या बाईला मदत होते म्हंटल्यावर कणिक बरोबर मापात भिजवली जाते आणि /किंवा दुसऱ्या मावशी नसतील तर चार दिवस मनावर दगड ठेवून ती कणिक टाकून द्यायची. लक्ष ठेवायला लागेल कणिक नेली तर चालते तर स्वतः नेत नाहीयेत ना Sad एखाद आठवड्यात फरक दिसेल, होपेफुल्ली.

स्वयंपाक नसेल त्या दिवशी चार जुड्या वेगवेगळ्या पालेभाज्या, ( दुसरी काम नसल्याने कमी wastage परफॉर्मन्स मिळू शकतो),कोथिंबीर निवडणे, लसूण सोलणे ( कोरड्या चटणीची), गहू निवडणे, नारळ खवणे, दुसऱ्या दिवशी रविवार असेल तर कांदा, टोमाटो चिरून घेणे, आपल्याला पटकन उठोन ब्रेकफास्ट करता येतो अशी काम द्यायची. दाणे भाजायला नाही सांगायचे करपवून ठेवू शकतात. पालेभाजी चा केर मला न दाखवता टाकायचा नाही. रोज आपल्याला कशी भाजी, आमटी हवी ती त्याची कृती डिटेलवर सांगायची. कुकर आधी लावा सांगायचं, आमटी झाली नसेल तर चालणार नाही.

ह्या बायका नवऱ्याला एकदम वचकून असतात, सहसा. त्यामुळे आपल्या नवऱ्याचा ब्रम्हराक्षस करून उभा करायचा. साहेब माझ्यावर रागावले अशी पाणचट भाजी केली म्हणोन आता तुम्हाला ठेवून मला ऐकून घ्यावे लागले तर... कोणत्याही निर्णयाला साहेबाना विचारून सांगते असं std उत्तर द्यायचं.
घरातल्या गोष्टीत ढवळाढवळ करत असेल तर पहिल्या वाक्यालाच हाणून पाडायच.

@ चैत्रगंधा +१
धाग्याचे नाव "घरगुती मदतनीसांबद्दल चर्चा" असे आहे. त्यामुळे तुमचा प्रतिसाद अवांतर नाही.

राजसी, अजून येउ द्या हो ! फार गरज आहे ह्या टिप्स ची.
खोटं बोलून रजा टाकणे (कुत्रा चावला, अ‍ॅडमिट केलय, नवीन पाहुणे आले, अशा वाट्टेल त्या थापा), मग पगाराचा हिशोब करायला गेले की
सुट्ट्यांचा घोळ करणे, वेळ न पाळून कामचुकार पणा करणे...
एक वेळ मती गुंग होइल पण ह्यावर उपाय काही सापडत नाहीत नवीन शोधण्या-व्यतिरिक्त...

गेल्याच आठवड्यात माझ्या cook ला दोन दिवस सलग खारट भाजी झाली म्हणून fire करणार होते. पण मग deep breathing केले, नवरा कँटीन मध्ये खाईल, मुलाला कुपन आणि मी swiggy वर कृपादृष्टी नेली Happy मग आठवडाभर माझी आणि cook ची रस्सीखेच झाल्यावर finally परत acceptable स्वयंपाक होतोय. जास्त चांगली काम ( नोकरीच्या पहिल्या आठवड्यात होतात तशी) व्हायला लागली की मला टेन्शन येतं की advance पैसे हवेत का आठवडाभर सुट्टी हवीय?

सई आणि चैत्रगंधा, डेंजर बायका दिसतायत तुमच्या 'मदत'नीस म्हणवणार्या.
दोन पोळ्या तुमच्या तुम्हाला लाटून घ्यायला काय होतं >> हे आर्ग्युमेंट पुण्यात माझ्या सासूबाईंकडची पोळ्यांची बाई नेहमी करायची त्यांच्या ऑफिसला जायच्या वेळेवर आली नाही की. पुढे त्या रिटायर झाल्यावर तर काय तिला काही धरबंधच राहिला नाही वेळेचा. सासर्यांना डायलिसिससाठी जाताना जेवून जावं लागतं हे माहीत असूनही पोळ्या करायला वेळेवर यायची नाही. आणि बोलण्यात आगाऊपणा केवढा. तिला काढून दुसरी बाई ठेवली तर तिच्या घरी जाऊन तिला दम भरला. शेवटी एकदाचं तिनेच घर बदललं आणि सोडून गेली तेव्हा आम्ही सुटलो.

Submitted by सई केसकर on 14 August, 2018 - 09:13>>>>>>> तुमची बाई आगाउ आहे.
मला जास्त उचापात्या / आगाउपणा केलेला खपत नाही.
मदतनीस बाई आहे म्हणुन नाही. एकंदरच कुणी जास्त भोचक असेल तर राग येतो.
तुमच्या पोस्टीत <<<<<<<<<माझ्या नवऱ्याला काय काय आवडतं याची मला पुन्हा पुन्हा आठवण करून देणे.
माझ्या स्वयंपाकात चुका काढणे
मी माझ्या मुलाला शिस्त लावत असताना मधेच पचकन त्याच्या बाजूने बोलणे>>>>>>>>>> ह्या माझ्यासाठी ट्रिगर्स आहेत. Happy
मी फक्त कपडे लादीसाठी बाई ठेवायचे. मे २०१८ पासुन तिलाही येउ नकोस म्हणुन सांगितले.
कारणं तीच. कपडे स्वच्छ नसायचे. लादी नुसतं पोतेरं फिरवल्यासारखी पुसायची. पुन्हा अस्वच्छ कामाबद्दल कुणी काही बोलायचं नाही.
बोलल्यास आदळाआपट करत कामं करणार. धुसफुस करुन दाखवणार.
आणि भोचकपणा - वैनी आज काय जेवण करुन नाही गेल्या वाटतं? तुम्हीच सगळ्म करणार का? भाऊ काही बोलत नाहीत काय वैनींना?
माझ्या साबा तिचा भोचकपणा मनावर घेत नसत म्हणून नशीब.
एकदा साबा मुलांचे युनिफॉर्म्स स्वच्छ नसण्याबद्दल काही बोलल्या तर तिने मी ऑफिसातुन आल्यावर मला फोन केला आणि झापलं Happy
मला इतर खुप कामं आहेत. तुमच्या सासबाई मला असं असं बोलल्या. तुम्हाला पटत नसेल तर स्पष्ट सांगा. मी काही तुमच्याच कामावर नाहीये.
दुसरी कामवाली बघायची असेल तर खुशाल बघा वै वै.
मी साबांना विचारलं तर त्यांनी मला मुलांचे मळकट शर्ट दाखवले.
आता मीच करते.
भले माझ्या कामाच्या वेळा सांभाळुन / इतर कामं / मुलांसाठी वेळ वैगेरे देणे करुन कपडे-लादी करायला दिरंगाई होत असेल / वेळेवर होत नसतील (खरंतर वेळेवर म्हणजे काय असतं तर आपणच मनाशी ठरवलेल्या वेळेवर, म्हणजे कपडे सकाळीच धुवावे / लादी सकाळीच पुसावी वै)

धागा मोबदल्याबद्दल आहे नाही का? तर मी तिच्या कुठल्याही रजेचा पगार कापत नव्हते. अगदी ८-१० दिवस गावी गेली तरी.
तरी मधेच न सांगता सुत्या घ्यायच्या हे आणि एक कारण.

आता मीच करते.+१११
आता फक्त भान्डी घासायला बाई नेमली आहे..
बाकीची काम नोकरी साम्भाळून मी आणि नवरा वाटुन घेउन करतो..
कपड्याना मशिन, लादी पुसन्यासठी मॉप आणुन घेतलाय, सोपे जाते.
स्वयपाक मला आवडायला लागलाय आता, सुमारे ४० मिनिटात सगळा होतो.. बाई येण्याच्या आधीच करुन टाकते.
तिच्या आजुबाजुला फिरकत नाही, दुरुन लक्ष ठेवते.
बोलल की ती उपदेश द्यायला सुरु करते.

मदतनीससुद्धा मायबोली वाचत असतील तर राजसी यांच्या सगळ्या टिप्स त्यांनी एव्हाना त्यांच्या युनिअन मध्ये सगळ्यांना सांगितल्या असतील Happy

मला प्रत्येक cook एकदा म्हणून बघतात, परत हिंमत नाही करत. सव्वा सहाची यायची वेळ, सात वाजले तरी पत्ता नाही. सुट्टी होईल असं वाटलं होतं. मी थालिपीठ आणि फोडणीच्या भाताची तयारी सुरू केली. तेवढ्यात cook हजर. ओट्यावर आणि गॅसवर ठणठणाट बघून म्हणे
Cook- तुमची पण आज जाग उघडली नाही का?
मी : तुझा काय संबंध? मी रोजच्या सारखी 6ला उठले आणि हे सामान काढलं होतं,स्वयंपाकाच!
Cook- मला 6.30 झाले तर फोन नाही केला?
मी : तुझं अलार्म क्लॉक आहे का मी? काम कोणाचं? पैसे कोणाला मिळतात मी कशाला फोन करू?
cook -तुम्ही काहीच करणार नव्हता का मग?
मी- थालीपीठ आणि पुलाव
कूक - मी पटापट आलू फ्राय, रोटी आणि उपमा जमवतो, 30 मिनिटात
मी - चालेल
निघताना सांगितलं 15 मिनितापेक्ष जास्त उशीर होणार असेल तर सुट्टी।मारायची. अश्या सुटीचे पैसे कापीन. दोनपेक्षा जास्त अश्या सुट्ट्या झाल्या तर मला फक्त तुझ्या सुट्ट्याचा हिशोब ठेवायचं काम नाही, काम सोडलं तरी चालेल. नंतर कधी late झाला नाही. सुट्टी असेल तर सकाळी 6ला फोन येतो तसा.

मी नवीन help hire करताना सहसा मागतील तेवढे पैसे देते. साधारण मार्केट रेट माहीत असतो त्यांना पण आणि मला पण. पाचशे रुपये इकडे तिकडे मी घासाघीस करत नाही. कटकट न करता मागितले तेवढे पैसे दिले की त्यांना चांगलं काम करायचं moral pressure येतं आणि एकदा महिनाभर चांगलं काम केलं की they cant go back on quality. एक आठवडा probation ठेवते. कामाची पद्धत match होते कां बघायला. दिवाळी बोनस as usual पूर्ण महिन्याचा पगार, दरवर्षी 5 ते 10% वाढ, महिना दोन सुट्ट्या असतील तरी माझी मानसिक तयारी 4 ची आहे. सुट्टीच्या फोनला कधीच कटकट करत नाही, ओके म्हणून ठेवते, कारण पण विचारत नाही. आजारी दिसत असेल तर काम न करता परत पाठवते, उगीच माझ्या घरात आजारपण नको. पगाराची demand मला परवडत नसेल तर पुढचं काहीच न बोलता परत पाठवते. Probation period कोणाला मान्य नसेल तर hire करत नाही. सगळ्या हिंदू सणांना आणि राष्ट्रीय सणांना मागितली तर सुट्टी देते. कोणीही पाहुणे आले 2 पेक्षा जास्त दिवस तर माणशी दराने पैसे देते, 100-200 रु देऊन बोळवण करत नाही.( बहुतेक मराठी कुटुंब असाच करतत् पण मी इतरांबरोबर जास्त राहते त्यामुळे) माझ्या बहुतेक मोलकरणी मी त्या त्या जागा सोडेपर्यंत टिकलेल्या आहेत. Cook चा परफॉर्मन्स मात्र 6 महिन्यात एकदम खालावतो आणि त्यामुळे खूपदा मला परत स्वयंपाक करायची खुमखुमी येते मग बाय करावं लागतं!

माझी कथा अगदीच निराळी आहे.
माझ्याकडे माझी मदतनीस गेली ६ पुर्ण वर्षे काम करतेय. (सध्या ७वं वर्ष सुरू आहे) ती ज्या दिवशी काम मागायला आली होती तेव्हा मी चहा ओतून कपात घेतला होता आणि पिणारच होते, मी लगेच दुसरा कप आणून तिला अर्धा दिला. बोलणी झाल्यावर काम कधी सुरू करणार? असं विचारलं असता... "आत्तापासून" .. ती तारिख होती १५ मे २०१२. आजतागायत ती आणि मी एकमेकिंबरोबर सुखाने नांदतो आहे.
ती स्वत: अतिशय सिन्सियर आहे आणि स्वच्छ्ता टापटिप तिला स्वतःलाच लागते खूप. खरं तर तिचं काम फक्त स्वयंपाक, भांडी, केर, फरशी ही आहेत ठरवून दिलेली. त्या व्यतिरिक्त, पालेभाज्या निवडणे, शेंगदाणे भाजणे, रवा भाजणे, गुळ चिरणे, खोबरं किसून भाजून ठेवणं हे सर्व ती करते. झाडं होती तेव्हा झाडं कापणे, त्यांना नियमित पाणी घालणे, गॅलरी धुणे हे ही.
मी फक्त तिच्यावर विश्वास टाकून तिला घरची बनवली. कोणत्याही अवांतर खर्चाचा हिशोब मांडला नाही. सुट्यांना कटकट केली नाही. (सुदैवाने ती स्वतःच आगाऊ सुचना केल्याशिवाय सुट्टी घेत नाही) आजतागायत ती ३ दिवसा पेक्षा जास्त गैरहजर राहिलेली नाही.
मी तिला दिवाळीत पगारला पगार देत नाही. (हजार किंवा पंधराशे रुपये देते) पण त्या व्यतिरिक्त कधी तिचा मोबाईल रिचार्ज करणे, तिच्या मुलासाठी बेड पॅन (तो बेड रिडन आहे) मुलिसाठी कपडे, सौंदर्य प्रसाधने, खुद्द तिच्यासाठी कोल्हापूरला गेले तर चप्पल. मधुन मधुन तिच्या गरजेच्या छोट्या छोट्या वस्तू तिला घेउन देते. ती ही मग हिशोब ठेवत नाही. अडिअडचणीला घरात दूध नसेल तर ती स्वतःच्या पैशाने आधीच आणून ठेवते. अंडी आणते. घरचे तांदूळ, इ. सुद्धा आणते. आमच्यात अतिशय मैत्रिपुर्ण नातं आहे. सुखंदु़:ख बोलली जातात तिथे भले भले समजून घेऊ शकतील की नाही अशी शंका वाटावी पण ही अशिक्षित बाई मला दिलासा देते.
तिला घर बांधायचं होतं तेव्हा तिने अनेकांकडून मदत मागितली... माझ्याकडे २५ हजार मागितले होते, आणि दुसर्‍या एका शेजारणीकडे २५. शेजारणीने ऐनवेळी जमत नसल्याचं सांगितल्यानं मी तिला एकूण ५० दिले. ते ही ताबडतोब. ते तिने २५ एक रकमी जमवून कधी देऊ विचारलं, मग एक दिवस ऐनवेळी मलाच पैसे लागणार होते तर कॅश ताबडतोब हजर करून दिली. उरलेले सर्व पैसे १०-१५ च्या पटित परत केले.
माझ्या घराची माझ्यापेक्षा ती जास्त काळजी घेते. खोड्या आहेत तिच्या अंगात पण त्या अगदिच क्षम्य आहेत. तिचे मीठ पडते खूप... (कधी कधी) मग खाते शिव्या, डब्यांची झाकणं नीट लावत नाही.. पण आता इतकी सवय झाली आहे की... आम्हाला दोघींनाही त्याचं काही वाटत नाही. उलट माझे बाबा कधी कधी तिची बाजू घेऊन मला बोलतात.
एकदा ओटा घासताना शेगडीच्या बटणाला बहुधा तिचा धक्का लागला आणि ते अर्धवट सुरू झाले. तेव्हा मी घरी नव्ह्ते. मी रात्री घरी आल्यावर घरात शिरताच मला गॅस चा प्रचंड वास आला. सुदैवाने मी दिवे सुरू नव्हते केले. मग मी घर उघडे टाकले. आणि तिला फोन केला... ती फार म्हणजे फार हळहळली. रडली सुद्धा फोन वर. मग आम्ही दुसर्‍या दिवशी पासून सिलेंडर खालून बंद करू लागलो. आता काही इश्यु नाही.
पाहुणे वगैरे आले तर कधी तक्रार नसते तिची.. मग तेव्हा मी ही तिला मदत करते. मला भांडी घासायला खूप आवडतात. मग तिचे तेव्हढे काम हलके होते. जेव्हा मी घरी नसते तेव्हा ती आपण होऊन रॅक आवर, फोडणीचा डबा आणि तेलाची किटली नियमित घासतेच. पण नसेन तेव्हा फ्रिज आतून स्वच्छ करणे, रॅक मधले पेपर्स बदलणे इ कामं करते. तिच्या नवर्‍याला सुर्‍यांना छान धार लावता येते. मग अधून मधून ते ही करून आणते.
मोबदला विचारू नका फक्त २१०० रुपये घेते.

एका मोलकरणीचे आत्मवृत्त

मी एका सोसायटीत काम करते. इथे ७०% घरात नवरा बायको दोघेही कामाला आहेत. शुक्रवारी नवीन सिनेमा आला की दोघांचे सुटी टाकण्याविषयी प्लानिंग होते. दोघेही ऑफीसला खोटे सांगून सिनेमाला जातात पण मी सुटी मागितली की डोळे मोठे करतात. किर किर करतात. दोघांनाही रजेचे पैसे मिळतात. पण मी सुटी घेतली की पैसे कापून देतात.

साहेब ऑफीस मधे कामाला आहेत तर म्याडम पण स्टेनो आहेत. काम नसले तर बसून राहतात पण त्यांना नेमून दिलेल्या कामाशिवाय दुसरे काम करायला नकार देतात. माझ्याकडून एखाद दिवशी जास्तीच्या कामाची अपेक्षा ठेवतात. मला ना पीएफ ना इन्शुरन्स. एकाच तासाचं काम आहे म्हणतात. मी तयार आहे आठ तास बसून रहायला. पगार पूर्ण दिवसाचा घेईन पण काम माझे ठरलेलेच करीन.

त्याला कुणाची तयारी नाही म्हणून मीच पाच घरची कामे करते आणि माझ्या पूर्ण पगाराची व्यवस्था करते. मला काही हौस नाही आली घरोघरी फिरून भांडी घासायची. उद्या जर आमचे रजिस्ट्रेशन झाले तर काम किती वेळ आहे हे महत्वाचे असेल का ? किमान वेतन आता ४०० रू रोज आहे. या हिशेबाने १२०००/- रू द्यावे लागतील.

पण जाऊ द्या, आमचं अज्ञान म्हणा किंवा काही, आम्हीच चार घरचं काम करायचा तोडगा काढला आहे. सगळ्यांची सोय पाहिली आहे. हे बेकायदेशीर आहे माहीत आहे, पण पैशांची गरज आहे. कुणाला जर आम्ही चार घरची कामं करतो याबद्दल तक्रार असेल तर आम्हाला बरंच आहे. त्यांना परवडणार का ?

- गंगूबाई घासरी
Lol

दक्षिणा +1
वरचे अनुभव वाचून जाणवतंय की पगार देणाऱ्याचा चांगुलपणा सगळ्या कामवाल्या बायांना कळत नसावा. आमच्या पुण्याच्या मावशी छान होत्या. भांडी आणि फरशी पुसायला होत्या. अगदी दक्षिणाच्या बाई इतकं नाही तरी त्यांचे काम करता करता हाताला येईल अशी कामे चटकन करायच्या, कधी कमी भांडी असतील तर स्वयंपाकाला मदत, कधी बाथरूम (टॉयलेट नव्हे) धुणे. कपाटा खालून, बेड खालून झाडून घ्या हे फार वेळा सांगावं लागत नसे. बहुतेक शनिवार रविवारी ते करायाच्याच. मी कधी आईकडे काही दिवस राहायला गेले की नवऱ्याला काहीतरी खायला करून देत (शनिवार रविवारी. कारण एरवी इतर कामाची गडबड ) फर्निचर पूस असे जे त्यांच्या डोक्यात येईल ते काम करायच्या. त्यांची नेहमीची वेळ 7.30. पण नवरा तेव्हा उठलेला नसला आणि त्याने दार उघडले नाही तर थोड्या वेळाने पुन्हा डोकवत, नवऱ्यासाठी चहा करुन, कधी विचारून पोहे वगैरे करून कामे उरकायच्या.
मी घरात असले आणि तरी नवरा एकटा किचन मध्ये चहा किंवा इतर काही छोटी छोटी कामे करताना दिसला की त्यांना फार वाईट वाटायचे. मग त्या "साहेब तुम्ही राहू द्या. मी करते, तुम्ही पेपर वाचा" असे म्हणायच्या Uhoh आणि त्यांच्या कामाबरोबर अधिकची कामे करायच्या.

Pages