तुम्ही कोणते कल्चरल शॉक अनुभवले आहेत???

Submitted by कटप्पा on 26 June, 2018 - 16:58

तुम्हाला कधी कल्चरल शॉक बसला आहे का?

मी पहिल्यांदा अमेरिकेत आलो तेंव्हा एक गोष्ट मला फार वेगळी वाटली ते म्हणजे रेस्ट्रोरंट्स मध्ये कोल्ड्रिंक्स साठी असणारे फ्री रिफिल्स. एका ग्लास चे पैसे भरा आणि हवे तितके कोल्ड्रिंक प्या.

बाहेरगावी फिरताना तुम्ही कधी कल्चरल शॉक अनुभव केले आहेत तर सांगा इथे...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोल्हापूर भागात मांसाहार प्रेमी रक्ती नावाचा प्रकार आवडीने खातात. बोकड कापल्यावर त्याचे रक्त गोळा करतात. ते आधी गोठवतात आणि मग शिजवून आवडीने खातात. किती जरी मांसाहार प्रेमी असलो तरी रक्त खाण्याचा झोम्बी प्रकार मला तरी शॉकिंग होता.

रक्ती मी सुद्धा लहानपणी खाल्लेय. आवडले नव्हते. हे कोल्हापूर भागात प्रामुख्याने खातात का? मला वाटायचे हा मुस्लिम प्रकार असेल..

कांदा, मटार, तुरदाणे वगैरे घालून साबुदाणा खिचडी भन्नाट लागते.

नवऱ्याला उपासाच्या खिचडीपेक्षा अशी जास्त आवडते म्हणून मटार तूर शेंगा मस्त मिळतात त्या मोसमात करते एकदा तरी. निदान कांदा, मटार घालून तरी करतेच.

माझ्या PhD गाइडनी बनारसकडे (त्यांचे मूळठिकाण) साबुदाण्याची खिचडी कांदा व लसूण घालून करतात असे सांगितल्यावर मला खूप मोठा धक्का पोहोचला होता. मला तर साबुदाण्याच्या खिचडीत कांदा व लसूण ही कल्पना ही करवत नाही, ऐकूनही अंगावर काटा येतो. पण माझ्या गाईडला आपल्या मराठी पद्धतीने केलेली खिचडी अधिक आवडली, पुढे त्यांनी माझ्याकडून शिकून घेतली. कालपरवा ते जेव्हा भेटले तेव्हा म्हणाले की आता ते ह्याच पद्धतीने करतात. पण मला एकदा कांदा-लसूण घातलेली खिचडी चाखून बघायची आहे असे मी त्यांना सांगितले. पण कुणी पुढ्यात ठेवली तर मी खाऊ शकेल का हाही प्रश्नच आहे.

चेंबुरला सनी (??) नावाच्या केरळच्या खाद्यपदारथांसाठी प्रसिद्ध असलेल्या रेस्टोरंटला साबूदाण्याच्या मूळकंदाची कांदा, मोहरी व लसूण घातलेली डिश खाल्ल्याचे आठवते (मित्रानी मागवली होती), पण कंदाला साबूदाण्याची नेहमीची चव नव्हती आणि मुळीच आवडली नव्हती.

कॉलेजमध्ये असताना मराठी मैत्रिणीकडून कांद्याची ऐकली होती, शॉक नाही बसला पण करून बघितली ती आवडली पण नंतर माझे मीच त्यात प्लस मटार वगैरे घालून करून बघू लागले मग नुसत्या कांद्यापेक्षा ती जास्त आवडली. फ्लॉवर , गाजर पण घालून बघितलं, चांगली लागते पण जास्त कांदा, मटार, तूर आवडते. आलं लसूण पेस्ट असली तर ती घालते किंवा मिरची, आलं, लसूण ठेचा घालते.

हो, मीही बिनउपासाची म्हणते आणि तुपाऐवजी तेलाची फोडणी करते, जी आपण एरवी कांदे पोहे वगैरे करताना करतो तशी.

एका बऱ्याच खप असलेल्या रेसिपी च्या पुस्तकात “आंब्याच्या रसातले मासे” ही पाककृती आहे.. नाव बघून वाचायची हिंमत नाही झाली.

मी करणार आहे

नारळी गूळ भात , वर आमरस , थोडा फ्रीजमध्ये गार करणे

आमरस भात मी खाल्लाय, मस्त लागतो. फक्त भात इन्द्रायणी तान्दळाचा शिजतो तसा मऊ शिजलेला हवा.. कणी ठेऊन शिजवलेला चान्गला लागत नाही. आमरस मस्त मुरायला हवा भातात.

हे शाबुदाणा खिचडी कांदा ,हळद घालून करतात हे मी माबोवर च पहिल्यांदा वाचलं आणि मला ऑ झालं. करून नाही बघणार . एखादा घास खाऊन बघीन कुणी दिली तर.
मला पूर्वी लहानपणी भात अजिबात आवडत नव्हता. (तसा तो आताही आवडत नाही पण खाते) तेव्हा उन्हाळ्याच्या सुट्टीत आजीने मला भातात आंबरस घालून खा सांगितलेलं. मी खाल्ला आणि प्रचंड आवडला. तेव्हा घरातल्या यचचवत मंडळीना धक्का बसलेला. मी बरीच वर्षे तसा भात खात होते आवडीने सिझनला. आताही तिची आठवण काढून थोडा खाते.

सॅलड मध्ये चीझ घालणे
पाणीपुरी मध्ये रगडा घालणे
पाणीपुरीत फक्त पाणी, बटाटा, कांदा, उकडलेली मटकी, शेव न घालणे
सांगली बाहेर भेळ खाणे

आंब्याच्या रसातले मासे” ही पाककृती आहे.. .. हो ते वाचून झालेली चिडचिड सुध्दा!
बाकीच्या पा. कृ.छान निगुतीने लिहून वरची पाकृ स्वतः:ने /घरच्यांनी तरी खाल्ली असेल की नाही याबाबत शंका आहे.

सांगली बाहेर भेळ खाणे >> हा हा हा .
तसं मला पूर्वी वाटायचं कराडच्या व्यंकटेश ची सोडून कुठलीही दुसरी उत्कृष्ट भेळ नसतेच .

कधीकधी रिव्हर्स शॉक्स पण बसतात.
म्हणजे कसं की बरीच वर्षं परदेशात राहिल्यावर काही विदेशी सवयी आपल्यात भिनलेल्या असतात. आणि आपली इतर भारतीयांकडून तशी अपेक्षाही बनलेली असते. पण काही विशिष्ट ठिकाणी, म्हणजे भारताला जाणारे विमान, किंवा देसी रेस्टॉरंट, अशा ठिकाणी देसी मोड ऑन करायचा असतो असा काहीतरी अलिखित नियम आहे. जो मला माहित नव्हता. एखाद्या रेस्टॉरंटात गेल्यावर काउंटरसमोर थोडे अंतर राखून 'मे आय हेल्प यू?' ची वाट बघत उभे रहावे, आणि मागून कोणी बिनदिक्कत पुढे घुसून काउंटरला भिडावे, आणि काउंटरवाल्यानेही काही न बोलता त्याला आपल्या आधी सर्व्हिस द्यावी असं झालं आहे.
एकदा इंडियन ग्रोसरी मध्ये लांबलचक लाईनीत उभा होतो. एक कर्मचारी आला आणि त्याने दुसरा काउंटर उघडला आणि 'आय कॅन हेल्प सम ऑफ यु ओव्हर हियर' अशी हाक दिली. रीतीप्रमाणे अशा वेळी झिपर खुलल्याप्रमाणे लोक डिस्ट्रिब्युट होतात. म्हणजे ज्याचं बिलिंग चालू असतं त्याच्या मागचा दुसर्‍या लाईनला, त्याच्या मागचे अर्धे तिकडे, अर्धे इकडे. मी सर्वात पुढे असल्याने ट्रॉली फिरवून तिकडे जाऊ लागलो. इतक्यात मागचे तीन चार देसी अक्षरशः वाघ मागे लागल्यासारखे सुसाट ट्रॉल्या ढकलत धावत आले आणि मला पूर्ण इग्नॉर मारून पुढे गेले. त्या काउंटरवाल्याचे शब्द हवेत विरायला सुद्धा याहून जास्त वेळ लागला असेल. आधीची लाईन पण पुढे सरकली. आता मी त्रिशंकूसारखा दोन लाईन्सच्या मध्ये ट्रॉली घेऊन उभा आणि सगळे मख्खपणे माझ्याकडे न पाहिल्यासारखे करत उभे.
सुदैवाने माझ्या मागची बाई अमेरिकन होती. तिला माझी अपरिमित दया आली आणि 'यु कॅन गो बिफोर मी इफ यु वाँट' असं ती म्हणाली आणि मी लढाईत मार खाऊन आलेल्या सैनिकासारखा पडेल चेहरा करून जुन्या लाईनीत घुसलो.
तेव्हापासून मी इंग्रो मध्ये जाताना शड्डू ठोकूनच आत घुसतो.

९९ रँच मध्ये त्या चायनीज बाईने, मला डावलुन माझ्या मागच्या चायनीज माणसाला दुसर्‍या रांगेत पहीला क्रम ( प्रेफरन्स) दिला. जाम राग आला मला पण मनात म्हटले अडाणी असेल शी डझन्ट नो बेटर!!

अमेरिकन्स आपलं भारतीय कल्चर कसं फॉलो करतात ते बघूनही शॉक बसतो. आमच्या हपिसात उगाचच होळी (त्यांच्या भाषेत होली) सेलिब्रेशन ठेवलेलं. देशी लोक नाहीयेत तरी गोऱ्यानाच हवं होतं. इमेलमध्ये शक्यतो पांढरे कपडे घाला सांगितलं होतं. आता भारतीय लोक जुने, टाकून द्यायचे कपडे घालतात रंग खेळताना. पण आमचं पब्लिक चांगले पांढरे कपडे घालून हजर. काही बायकांनी तर केशर मडगावकरसारखं पांढरा टॉप, पांढरी ट्राउजर, पांढरे शूज असा जामानिमा केलेला. होळीसाठी organic, non toxic रंग आणले होते. No water. ठरलेल्या वेळी ते रंग हवेत उडवण्याचा कार्यक्रम झाला. आपल्याकडे सकाळी पब्लिक कधीही खाली रस्त्यावर उतरतात आणि चालू करतात. तसं नाही. त्यातही काऊंट डाऊन करून एकाच वेळी रंग हवेत उडवले. कोणीही एकमेकांच्या अंगावर रंग टाकणे , दुसऱ्याच्या चेहऱ्याला रंग फासणे वगैरे प्रकार केले नाहीत. अर्ध्या तासात स्नॅक बॉक्सेस घेऊन पब्लिक घरला गेलं. एक सिनियर म्यानेजमेन्टचा बुवा पकडून आणलेला त्याने माईकवरून होली कसा inclusive , secular festival of colors, to celebrate spring season आहे असं सांगितलं.
तरी बरं त्यांना बोंब मारणे वगैरे प्रकार माहीत नाहीत. अन्यथा त्यातही काहीतरी माईंडफुलनेस, chanting वगैरे केलं असतं.

हाहा.. पांढरे कपडे म्हणजे पांढरेच राहिले का..
पण होळीला पांढरे वा लाईट कपडेच घालावेत. ते रंगलेले छान दिसतात.

सांगली बाहेर भेळ खाणे
>>> हायला- मग माझ्यासारख्याने काय करावे.. आजपर्यंत कधीच सांगली गेलो नाहीय...

तुम्ही कधी खालीच नसल्याने शॉक बसणार नाही. किंवा कदाचित आजपर्यंत काय खायचो आणि हे खातोय त्यात बराच फरक आहे असा शॉक बसेल.

WHITEHAT लय भारी पोस्ट. बॉलीवुड होळी ड्रेसेस केले त्या सर्वांनी पण बॉलीवुड होळी खेळलेच नाहीत.

मला रिव्हर्स कल्चरल शॉक भारतात परत आल्यावर बसतो
पहिला, पादचारी क्रॉसिंगवर कोणतीही गाडी थांब त नाही आणि सिग्नल काहीही असो , आमच्या नाशकात पादचारी कर्ण रेषेत, डायैग्नली म्हण्जे इकडचा सिग्नल त्याच्या डायाग्नोली पलिकडील सिग्नल पर्यंत ट्रॅफिक न जुमानता चालत जातात,
दुसरा, मी कोणी म्हातारे रस्ता क्रॉस करत असताना गाडी थांबवली तर त्यांना हा बुवा का थांबला हे कळत नाही आणि मी त्यांना बाबा पुढे क्रॉस करा असे सांगितले तरीही त्यांना हा बुवा एवढे दाक्षिण्य का दाखवतोय त्यांना कळत नाही अन ते तिथेच थांबतात.

Pages