मराठीचा अट्टाहास कशासाठी?

Submitted by कटप्पा on 21 June, 2018 - 23:32

आजच एक धागा पहिला, एका इंग्रजी शब्दाला मराठी शब्द हवा म्हणून.
किल्ली यांच्या धाग्यावरही काही प्रतिसाद वाचले, महाराष्ट्रात लोकांनी मराठी बोलणे कसे महत्वाचे आहे आणि बाकीच्या अमराठी लोकांना मराठी कसे बोलायला भाग पाडले पाहिजे वगैरे वगैरे.
इतका मराठीचा अट्टाहास कशासाठी? मराठी मिश्रित हिंदी किंवा इंग्रजी मिश्रित मराठी बोलणे हे खूप कॉमन आहे आणि आपण याला सपोर्ट केला पाहिजे. निदान यातून आपण मराठी लोक काही इंग्रजी शब्द शिकू तरी.

आपल्याला काय वाटते???????

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>एक तर मराठी बोला, किंवा बोलतोय ती मराठी नाही, हे मान्य करून मग बाकी धेडगुजरी बरळा.
मराठीच्या किंवा कोणत्याही बाबतीत अशुद्ध चालेल असे चल्ता है, धक्ता है वाले विचार उपयोगी नाहीत.

ही पूर्ण पोस्ट आवडली..... अतिशय मुद्देसूद लिहले आहे!

आरारानी सुंदर उदाहरणे देऊन समजावलं आहे. निरर्थक वाद घालण्यापेक्षा थोडा स्वतःशीच विचार केला तर ज्ञानात भर पडेल. >> +१

भरत यांच्याही पोस्ट एकदम वाचनीय आणि संग्राह्य, भरत चांगली माहिती, पण गीता वाचन सुरू करण्यापूर्वी समोर कोण आहे ते एकदा बघत जा >> +१. एखादि व्यक्ती वेड पांघरून पेडगावला जाणारच असेल तर काहीही उपयोग नाही.

साबुदाणा खिचडीत काय टाकता ? >> हे चुकीचे आहे का ? आम्ही असेच बोलतो.
पुलाव करताना त्यात काय काय टाकलेय .

बरोबर काय आहे मग ?

माझ्या हौशी उर्फ अमॅच्युअर प्रतिसादांनंतर भरत यांचे प्रोफेशनल उर्फ अधिकारवाणीने समजावणे चर्चेला चार चाँद लावते.

(रच्याकने, चार चाँद लावणे हा मराठी वाक्प्रचार आहे किंवा कसे यावर चर्चा वाचायला आवडेल Wink )

अमितव,
आपल्या पहिलीतल्या मराठी माध्यमात न शिकणारया आणि व्याकरणाच्या नियमांची ओळखही नसणारया मुलाने आपल्यामते बरोबर असलेले उत्तर कसे दिले ठाऊक आहे??

कारण जे तो घरी आणि आसपास ऐकतो तेच तो शिकला आहे.

यावरून एक फार मोठा मुद्दा समोर येतो. आपण भाषा शाळेत शिकायच्या आधी आणि त्यापेक्षा जास्त घरी आणि आजूबाजुला ऐकून शिकतो.

माझा पॉईंट लक्षात आला नसेल तर अजून उकल करू शकतो Happy

..

<<<<<<<
पण प्रमाण भाषा बहुधा मोठ्यात मोठ्या समूहापेक्षा साहित्य-कला-राजकारणात जे लोक पुढे असतात त्यांची भाषा म्हणून आपोआप रूढ होते. ते संख्येने कमी असले तरी.
>>>>>>

प्रमाण भाषा कोणती आणि कशी ठरते यावर अजूनही प्रमाण भाषेच्या बाजूने असलेल्या लोकांचे एकमत दिसत नाहीये. चालू द्या Happy

..

<<<<<<
एखाद्याने मायबोलीवर लेख लिहिला, तर तो प्रमाण भाषेत असावा अशी अपेक्षा अवास्तव ठरू नये. प्रतिसादांत मायबोलीची बोलीभाषा चालायला हवी.
>>>>>>>

लेखात चालणार नाही. पण प्रतिसादात चालेल. हे नियम प्रमाण भाषा ठरवणारयांनी बनवले आहेत की आपण आपल्या मनाने आणि सोयीने बनबले आहेत?

नाही म्हणजे उद्या कोणी प्रतिसादातही प्रमाण भाषाच हवी असा अट्टहास करत आपल्याशी वाद घालायला आला तर आपण या मतावर ठाम राहाल की त्याच्या हो ला हो मिसळाल?

..

>>>>>>>
मुद्दाम चुकीचे लिहिण्याला स्टाइल म्हणणे ही तुमची भाषेबद्दलची आस्था दाखवतो.
>>>>>>>>

शक्य आहे !
पण ते शब्द ईंग्रजी भाषेतील आहेत. मला ईंग्रजी भाषेबद्दल तितकी आस्था खरेच नाहीये.
पण जे लोकं ईथे मराठी भाषेत आपल्या मनाचे शॉर्टफॉर्म निव्वळ स्टाईल म्हणून वापरतात त्यांना मराठीबद्दल आस्था नाही असे ठणकावून सांगू शकाल का? कि ऋन्मेष सॉफ्ट टारगेट आहे?

येनीवेज, ईथे मला जाओ उस आदमी की साईन लेके आव करायचे नाहीये. फक्त सिलेक्टीव्ह टिका निदर्शनास आणून दिली ईतकेच.

..

<<<<<<<
व्याकरणाच्या आणि शुद्धलेखनाच्या चुकांसाठी गुण कापले जातात.
<<<<<<<

ते भाषेच्या पेपरात कापत असतील. विज्ञान गणिताच्या वा गेला बाजार ईतिहास भूगोलाच्या पेपरातही कापत नाहीत.
सूक्ष्म विचार केला तर नकळतपणे या चर्चेच्या अनुषंगाने हा लक्षात घेण्याजोगा मुद्दा समोर आला आहे.

>>>>>>
तुमचे म्हणणे असे आहे की...
मी एका ठिकाणाहून दुसरीकडे पोचल्याशी कारण, रस्त्याने जाताना मी वाहतुकीचे नियम पाळले नाहीत, तरी काय फरक पडतो?
>>>>>>

माझी भुमिका मांडताना हे चुकलेले लॉजिक आहे. मी कर्रेक्ट करतो.
एका ठिकाणाहून दुसरया ठिकाणी जायला बरेच मार्ग उपलब्ध आहेत. तुम्ही एक ठराविक मार्गच घ्यायचा अट्टहास करत आहात आणि पर्यायाने त्या मार्गावरचे वाहतुकीचे नियम पाळायची सक्ती.

..

<<<<<<<<
पण गीता वाचन सुरू करण्यापूर्वी समोर कोण आहे ते एकदा बघत जा
>>>>>>>>

सिंबा, माणसाच्या आपल्या क्षमतेवर विश्वास हवा. मग समोर कोण आहे त्याने फरक पडत नाही.

..

<<<<<<<
संस्कृत भाषा व्याकरणाच्या नियमांनी घट्ट बांधली आहे, इतकी की वाक्यात शब्द पुढे मागे केले तरी वाक्याचा अर्थ बदलत नाही
>>>>>>>

अरे वा. हे खरे असेल तर मग संस्कृतलाच प्रमाण भाषा करायला हवे.

अवांतर - संस्कृतमधे बोलीभाषा आहेत का?
नसल्यास का नाही?

..

>>>>>>
ह्या पोस्ट्स भभांना समजवायला पालथ्या घड्यावर पाणी आहेत हे उघड आहे...

एखादि व्यक्ती वेड पांघरून पेडगावला जाणारच असेल तर काहीही उपयोग नाही.
>>>>>>

जेव्हा मी दारूच्या विरोधात काही लिहितो तेव्हा दारू हे एक वाह्यात पेय आहे हे माहीत असूनही लोकं जेव्हा दारूची बाजू घेत दारू वाईट नाही तर अतिरेक वाईट, मग तो दूधाचाही वाईट वगैरे युक्तीवाद करतात तेव्हा मलाही असेच फिलींग येते.

आपला आपल्या विचारांवर आणि हेतूवर विश्वास असेल तर आपण आपल्या मतावर ठाम राहावे. जे बहुतांश लोकांचे मत असते ते बरोबर असते असे नसते. जे बरोबर असते तेच बरोबर असते.

शुभरात्री शब्बाखैर खुदाहाफिज
कल मिलेंगे ...

अर्थातच. मुलगा बरोबर शिकला याचा अर्थ त्याच्या आजुबाजुचे (म्हणजे मी आणि बायको) बरोबर बोलतोय म्हणूनच तर मला इतका आनंद झालाय. Happy
तो अनेक शब्द बोली भाषेप्रमाणे बोलतो कारण तो मराठी फक्त ऐकतो... लिहिता वाचता अजुन तरी येत नाही.
त्याच बरोबर तो इंग्रजीही फक्त ऐकुनच शिकला आहे. काय चुक ते त्याला बरोबर समजतं, अनेकदा ते का चुक हे ही सांगू शकतो पण त्याला व्याकरणाचे नियम असे कुठल्याच भाषेचे अजुन तरी शिकवले नाहीयेत. अर्थात आता लिहिता वाचता येते.
भाषा ही कानावर पडूनच शिकतात असं माझं तरी मत होतं.
तुम्ही आणि सॉफ्ट टार्गेट! आणि सिलेक्टिव्ह टीका! भावनेला हात घालणार का आता? Biggrin रुलाएगा क्या?

आणि त्या उपर तुम्हाला ते वाटतच असेल तर अती झालंय आता हे लक्षात घ्या! लोकं अशी का वागतायत ह्याचा विचार करा.

अर्थातच. मुलगा बरोबर शिकला याचा अर्थ त्याच्या आजुबाजुचे (म्हणजे मी आणि बायको) बरोबर बोलतोय म्हणूनच तर मला इतका आनंद झालाय. Happy
>>>>>

यू आर नॉट गेटींग मा पॉईंट डूड..
तुम्ही प्रमाण भाषा (स्टिल क्वेश्चनमार्क) बोलता म्हणून मुलगा ती शिकलाय ईतकेच.
तुम्ही कुठली वेगळी बोलीभाषा बोलत असता तर मुलगा ती शिकला असता.
मग त्याला ही प्रमाणभाषा आली नसती.
यात तुम्ही कुठली बोलीभाषा बोलत नसून एक प्रमाणभाषा रोजच्या व्यवहारात बोलता याचा आनंद वाटत असेल तर चांगलेच आहे. हरकत नाहीच.
पण जे बोलीभाषा बोलत असतील त्यांनाही ती बोलण्यात तितकाच आनंद मिळत असेलच ..

तरीही मुद्दा समजण्यात गोंधळ उडत असेल तर सविस्तर उद्या बोलूया.. आता धाग्यावर रुमाल आणि डोक्यावर चादर.. शुभरात्री Happy

, माणसाच्या आपल्या क्षमतेवर विश्वास हवा. मग समोर कोण आहे त्याने फरक पडत नाही.>>>>
माझा भरत यांच्या समजावून सांगण्याचा क्षमतेवर पूर्ण विश्वास आहे, आणि तुझ्या "मी(च) बरोबर(च) आहे(च) " या अटीट्युड वर सुद्धा,
तेव्हा त्यांनी प्रतिवाद करण्यात , एका लिमिट बाहेर त्यांनि वेळ घालवू नये असे मला वाटले.
पण अर्थात बाकी लोकांना त्या प्रतिसादातुन जास्तीची महियी मिळणार असेल तर त्यांनी जरूर लिहावे.

अजुनही वेगळ्या विभक्तीचे प्रत्यय जोडणे हा प्रमाण आणि बोली भाषेतला फरक वाटत असेल तर नको बोलूया.

धाग्याचे नाव प्रमाण मराठीचा अट्टहास का असा असायला हवा होता. पण प्रमाण हा शब्द दिसत नाही. म्हणजे धागाकर्त्याला भलतेच अपेक्षित आहे. चर्चा मात्र प्रमाण मराठी की बोली अशा पद्धतीने चालू आहे. चर्चेत हा जो सूर दिसतोय त्या निमित्ताने प्राकृतोद्भव संस्कृतोद्भव, बोली आणि भाषा यावर प्रकाश टाकण्यात यावा.

>>>बोली म्हटले जाते त्या भाषा आहेत. त्या प्राकृतोद्भव आहेत, तर प्रमाण भाषा संस्कृतोद्भव आहेत >>> मुंबईची मराठी आंग्लोद्भव आहे, आणि नागपुरची हिंदी ही मराठोद्भव आहे. आठवलं. Happy
प्रमाण भाषा भाषेचे नियम ठरवेल. त्यातील शब्दसंपत्ती प्रमाण भाषा मर्यादित करणार नाही.
प्राकृतात मला आरती करा आणि माझी मदत करा म्हणतात का? किंवा कुठल्या बोली भाषेत म्हणतात का? व्यवस्थित नियम दाखवा. उगाच बहुसंख्य लोक म्हणतात, आमच्या बिल्डिंगच्या माझ्या मजल्यावरचे लोक म्हणतात, माझे शाळेचे शिक्षक म्हणायचे अशी विधाने नको.

<<ते भाषेच्या पेपरात कापत असतील. विज्ञान गणिताच्या वा गेला बाजार ईतिहास भूगोलाच्या पेपरातही कापत नाहीत.
सूक्ष्म विचार केला तर नकळतपणे या चर्चेच्या अनुषंगाने हा लक्षात घेण्याजोगा मुद्दा समोर आला आहे.>

शाळेत भाषा* शिकवतात, ती उद्या तुम्हाला व्यवहारात वापरता यावी म्हणून.
आमच्या मुख्याध्यापकांचा विषय संस्कृत होता. पण ते कधी ऑफ पिरियडला आले, तर मराठी शिकवायचे. ते म्हणायचे, मी धडा किंवा कविता नव्हे, तर भाषा शिकवतोय.
मराठीच्या पेपरात अचूक भाषा वापरून इतिहास भूगोलाच्या पेपरात चुकीची भाषा वापरण्याजोगी स्प्लिट पर्सनॅलिटी तुमच्याकडे असू शकते, हे मला मान्य आहे.
मी एक हौशी शिक्षक आहे. इंग्रजी माध्यमाच्या मुलांना गणित आणि मराठी शिकवतो. त्या मुलांचं इंग्रजीही कच्चं असल्याने त्यांना गणितातली शब्दांतली उदाहरणे word based problems समजत नाहीत. याअरून भाषा शिकण्याचं महत्त्व तुम्हाला कळायला हवं.

< ठिकाणाहून दुसरया ठिकाणी जायला बरेच मार्ग उपलब्ध आहेत. तुम्ही एक ठराविक मार्गच घ्यायचा अट्टहास करत आहात आणि पर्यायाने त्या मार्गावरचे वाहतुकीचे नियम पाळायची सक्ती>

तुम्ही कोणत्याही मार्गाने जा. त्या त्या मार्गाने जाण्याचे नियम असतीलच. ते पाळावे लागतील. जेव्हा तुम्ही प्रमाण भाषेत बोलता, तेव्हा प्रमाण भाषेबद्दलचे नियम पाळावे लागतील. आता नियम पाळायचेच नाहीत म्हणून मी पायवाटेनेच जाईन, असा हट्ट तुम्ही करू शकता.

तुम्हाला प्रमाण भाषा मान्य नाही किंवा त्या भाषेतून लिहायचं नाहीए, असा अर्थ निघतो. मग तुम्ही बोलीभाषेत लिहिताय, असं तुमचं म्हणणं आहे का ? असेल तर कोणती बोलीभाषा? एका व्यक्तीची बोलीभाषा, असं फार तर लहान मुलांबद्दल होईल. तेही काही काळ. मूल शिकतंय तोवर.

<पण ते शब्द ईंग्रजी भाषेतील आहेत. मला ईंग्रजी भाषेबद्दल तितकी आस्था खरेच नाहीये.>

१. माझी मदत करा, हे लिहिणं कसं चूक आहे, हे दाखवून दिल्यानंतरही तुम्हाला तसंच लिहायचं असेल, तर तुम्ही काही म्हणा, तुम्हाला मराठीबद्दल आस्था नाही असंच प्रतीत होतं.

२. एक पे रहना जी. आधी म्हणालात, ती माझी स्टाइल आहे. आता म्हणताय, इंग्रजीबद्दल आस्था नाहीए. कोलांट्याउड्या मारण्याबाबत त्या ह्यांच्याशी स्पर्धा केलीत, तर संख्येच्या बाबतीत तरी त्यांना मागे टाकाल.

<पण जे लोकं ईथे मराठी भाषेत आपल्या मनाचे शॉर्टफॉर्म निव्वळ स्टाईल म्हणून वापरतात त्यांना मराठीबद्दल आस्था नाही असे ठणकावून सांगू शकाल का? कि ऋन्मेष सॉफ्ट टारगेट आहे?>

तयार केलेले शॉर्टर्फॉर्म इतरांना आवडले. त्यांनीही ते वापरायला सुरुवात केले. मी म्हटलं तसं मायबोलीची म्हणून एक बोली भाषा होऊ लागली. तुमच्या माहितीसाठी, अशा वेगवेगळ्या शॉर्टफॉर्म्सचं संकलन असलेला एक धागाही मायबोलीवर आहे.
तुमचा हट्ट हा आहे की मी जे (ठरवून) चुकीचं लिहितो, त्याला तुम्ही चूक म्हणू नका. कुठे प्रमाण भाषेत लिहायचं आणि कुठे मायबोलीबोलीत, याचं तारतम्य बहुसंख्यांना आहे, असं दिसतं.

मराठीच्या पेपरात अचूक भाषा वापरून इतिहास भूगोलाच्या पेपरात चुकीची भाषा वापरण्याजोगी स्प्लिट पर्सनॅलिटी तुमच्याकडे असू शकते, हे मला मान्य आहे. >> मस्त Lol

१. माझी मदत करा, हे लिहिणं कसं चूक आहे, हे दाखवून दिल्यानंतरही तुम्हाला तसंच लिहायचं असेल, तर तुम्ही काही म्हणा, तुम्हाला मराठीबद्दल आस्था नाही असंच प्रतीत होतं. >> योग्य.

बाय द वे, इंग्रजी मिडिअम च्या मुलांना भूगोल , इतिहास इत्यादी पेपर मध्ये चुकीचे स्पेलिंग वापरले तर मार्क कापतात,
इतिहासात चुकीचा काळ वापरल्याने उत्तर चुकूचे ठरू शकते,

<अजुनही वेगळ्या विभक्तीचे प्रत्यय जोडणे हा प्रमाण आणि बोली भाषेतला फरक वाटत असेल तर नको बोलूया.>+१.

आजकाल सीरीअल्स व बातम्यांमध्ये त्या ह्यांना त्यांना रोखा. तूच त्यांना रोखू शकतोस वगैरे ऐकू येते. आपल्याकडे थांबवा असे एक क्रियापद आहे. तू त्यांना थांबव, तूच त्यांना थांबवू शकतोस असे म्हणणे शक्य आहे. पण कोण लक्षात घेतो?

मुम्बईतले आली गेली ऐकले बोलतात ऐकले की काटा येतो अंगावर. पदार्थात जिन्नस घालतात. टाकत नाहीत. साडी नेसतात घालत नाहीत.

ल्हान पणी( सॉरी माझ्या प्रत्येक पोस्टीत सत्तर ऐशीच्या दशकातले संदर्भ असतात. ) चौथीत असताना म्हणी वाक्प्रचार ह्यांचा खासा अभ्यास करून घेतला जात असे. तर असेच मी एकदा मैत्रीणीशी खेळत होते ती मला पिड्त होती तर काय गं मी काय तुझे घोडे मारले आहे असे म्हटले. तर ती अधिकच उखडली व मी शिवी दिली अशी कागाळी घेउन माझ्या आईकडे घेउन गेली. ही शिवी नाही साधा वाक्प्रचार आहे असे सांगून आईने तिला परत धाडले.

आईबाप वडूज / विटा कर्‍हाड बेल्ट मधून पुण्यात आल्याने त्यांच्या बोलण्यात तिकडचे भाषिक संदर्भ असत. पण ते घरगुती बोलताना. कॉलेजात शिकवताना एकदम फॉर्मल मराठी. संगीताचे व इतर कार्यक्रम ऑर्गनाइज करताना
बोलायची पुण्यातली खास अशी एक सार्वजनिक मराठी आहे ती ऐकली आहे का. फार छान वाटते ऐकायला .
फॉर्मल व थोडी लेखी पण परफेक्ट उच्चारांची.

शुद्ध भा षा व व्याकरणाबरोबरच डिक्क्षन व अ‍ॅक्सेंट ह्यांचा पण फरक पडतो. इथे माझ्याकडे एक मोलकरीण येते
( हैद्राबाद साइडला मजुरीण म्हणत.) ती प्रॉपर मालवणी मराठी बोलते व खूप बोलते. त्यामुळे मी ती काम काही का
करेना तिचे त्या अ‍ॅक्सेंट मधले बोलणे ऐकायलाच तिला काम देते. खूपच थिक अ‍ॅक्सेंट आहे त्यामुळे अर्ध्या वेळा ती काय म्हणते आहे ते लक्षात येत नाही. बट इट साउंड्स क्यूट.

मुम्बईतले आली गेली ऐकले बोलतात ऐकले की काटा येतो अंगावर. >>>> अगदी बरोबर . इथे मायबोलीवरच वाचलं आहे असं .

आता विषय निघालाच आहे तर एका शंकेच निरसन करा कोणीतरी .
सोशल मीडियावर बरेचदा "मी अस करेल, मी इथूननिघेल अस वाचलं आहे . तर हे बरोबर आहे का ?

<मुम्बईतले आली गेली ऐकले >
हे बिल मुंबईच्या नावावर फाडले जातेय त्यामुळे माझी अस्मिता जागी झालीय.
इथे मायबोलीच्या एक सदस्या मी आली , गेली असं लिहितात. त्यांचा मुंबईशी काही संबंध नाही. आता त्या हे स्टाइल म्हणून लिहितात की बोली म्हणून, याची कल्पना नाही.

मला वाटतं, मायबोलीवर शुद्धलेखन आणि व्याकरण पोलीस असा एक धागा काढावा. मायबोलीवरच्या लेखनातल्या लक्षात आलेल्या चुका तिथे नोंदवाव्यात. पहिला शब्द वगैरे, वैगरे, वैगेरे

(मी लिहिलेला प्रत्येक शब्द अचूक असतो, असा माझा दावा नाही. पण तसा प्रयत्न असतो. )

Pages