मराठीचा अट्टाहास कशासाठी?

Submitted by कटप्पा on 21 June, 2018 - 23:32

आजच एक धागा पहिला, एका इंग्रजी शब्दाला मराठी शब्द हवा म्हणून.
किल्ली यांच्या धाग्यावरही काही प्रतिसाद वाचले, महाराष्ट्रात लोकांनी मराठी बोलणे कसे महत्वाचे आहे आणि बाकीच्या अमराठी लोकांना मराठी कसे बोलायला भाग पाडले पाहिजे वगैरे वगैरे.
इतका मराठीचा अट्टाहास कशासाठी? मराठी मिश्रित हिंदी किंवा इंग्रजी मिश्रित मराठी बोलणे हे खूप कॉमन आहे आणि आपण याला सपोर्ट केला पाहिजे. निदान यातून आपण मराठी लोक काही इंग्रजी शब्द शिकू तरी.

आपल्याला काय वाटते???????

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सायलेंस इज दि...
<<
लास्ट रिझोर्ट ऑफ फूल्स राज.
"अरे" वर यावे लागले यात सगळे काही आले. जरा ट्रंप अन अमेरिकन इंग्रजीच्या शुद्धीकरणाचे बघा. हितनं हला.

*

मराठी आणि ईंग्रजी व्याकरणाचे नियम असे शब्दशा भाषांतर करून बनत नाहीत आरारा. नाहीतर गूगल ट्रान्सलेटर नेहमीच जिंदाबाद असते.
<<

माझी मदत करा, हे "मेरी मदद किजिये" चे शब्दशः भाषांतर आहे.
अभ्यास करा.

*

वर्षानुवर्षांत बदलती मराठी, ज्ञानेश्वरांच्या काळातली शुद्ध मराठी समजून घ्यायला भयंकर कष्ट पडतात. शाळेत असलेले म्हाइंभटांचे मराठी धडेही एलियन लँग्वेज वाटवे असे असतात.

मराठी बदलत आहे, बदलत राहील. मी स्वतः असंख्य ठिकाणी, विशेषतः टेक्निकल शब्द इंग्रजी वा मूळ भाषेतले वापरत असतो. आजच्या मराठीतही उर्दू, हिंदी, इंग्रजी, कानडी अशा अनेक भाषांतून आलेल्या शब्दांची मिसळ आहे. भाषा प्रवाही असावी याबद्दल दुमत नाही.

पण, "आज"ची अधिकृत प्रमाण मराठी, ही बोलता, लिहिता यायलाच हवी. तुमची मूळ भाषा, मातृबोली, ही तितकीच महत्वाची आहे. मी वर लिहिलंय की मला उत्तम बोलता येते, मी अहिराणी प्रयत्नपूर्वक शिकलो, अन छान बोलतो. याचा अर्थ असा नव्हे, की "शुद्ध" बोलायचेच नाही.

बोली अहिराणी बोलतानाही "शुद्ध"च बोलायची असते, नाहीतर अहिराणी नेटिव्ह स्पीकर्सही हसतात.

तसेच मराठी शुद्ध बोलायचे, अन मुद्दाम बोलायचे. ते कुठे व कसे, त्याचे भान असलेले बरे.

जाणूनबुजून "हुमायून नेचर, हाल्फ, जोक्स द अपार्ट" असलं लिहिणारा हे मान्य करेल असं वाटतंय का?

मुद्दाम चुकीचं लिहिणं हा लोकांच्या डोक्यात जाण्याचा आणखी एक मार्ग आहे त्यांच्यासाठी.

जे भाषेचे तेच लिपीचे.
मोडी कुठे, अन आमच्या लहानपणची मराठी कुठे.
र्‍हस्व दीर्घाचे नियम सोपे केलेत, बदललेत.
स्वर व्यंजने तर उडतच गेलीत.
आजकाल व्हॉट्सॅप फॉर्वर्डस मधेच नव्हे, तर माबोवरील लेखनातही त्र या जोडाक्षराऐवजी ञ हे व्यंजन वापरताना पाहिले की भातात खडा लागल्याचे फिलींग येते.

हो. फीलींग येते.

मला इतर भाषांतले शब्द वापरायची अ‍ॅलर्जी नाहिये. फक्त, ठरवून माधुकरी पाण्यात बुचकळून खाऊ नका, इतकेच म्हणणे आहे.

भरत व आ.रा.रा. याच्या पोस्ट्सशी सहमत.

जगातील कोणत्याही देशात तेथील प्रमाण भाषा ही त्या देशातील्/राज्यातील सर्व लोक बोलत नाहीत. टिचकीभर असलेल्या इंग्लंड मधे प्रत्यक्षात "बोली" बर्‍याच आहेत. महाराष्ट्रातही तेच आहे. उर्वरित महाराष्ट्र एकच बोली/भाषेचे रूप वापरत नाही. असंख्य वेगवेगळी रूपे आहेत. यातलीच कोणतीतरी एक प्रमाण भाषा होणार. ती सध्या पुण्यामुंबईची आहे इतकेच. अमेरिकेत सुद्धा किमान दहा बारा व्हेरिएशन्स आहेत. पण म्हणून सीएनएन वर बातम्या देताना "The President ain't know nothin about nothin" असे सांगणार नाहीत.

पुलंच्या एका पुस्तकात "एकेकाची भाषा" टाइप मजेदार लेख आहे याबद्दल. सर्वांनी मातृभाषेतच बोलावे/लिहावे असे ठरल्याने होणार्‍या गोंधळाबद्दल.

हे फक्त "प्रमाण" भाषेबद्दल. फॉर्मली बोलण्याच्या. कोणतीही स्थानिक भाषा/बोली रोजच्या वापराकरता अशुद्ध वगैरे नसते. शुद्ध भाषा असे काही मुळातच नाही.

आ.रा.रा. यांच्या मताशी सहमत!
कामकाजासाठी / शासकीय पत्रव्यवहारासाठी तरी 'प्रमाण' मराठी यायलाच हवी.

मी माझ्या गावच्या मामेभावाला पत्र लिहायचे असल्यास (WhatsApp च्या जमान्यात कोणी लिहित नाही म्हणा!),
'कसो आसस? अभ्यास कसो चाललो हा? बावडीवरचो पंप नीट चलता हा ना?' आदी लिहू शकतो पण हेच ग्रामपंचायत कार्यालयात पत्र लिहायचे असल्यास 'माझ्या शेतातील विहिरीवर बसवलेल्या पंपाचा विद्युत पुरवठा खंडित झाला असून.....' असेच लिहावे लागेल. तिकडे 'माझ्या शेतातल्या पम्पाक लाईट गावना नाय' असे चालणार नाही!

@ आ.रा.रा., आपण नेत्रविकारतज्ञ / नेत्रशल्यविशारद आहात का?

आरारानी सुंदर उदाहरणे देऊन समजावलं आहे. निरर्थक वाद घालण्यापेक्षा थोडा स्वतःशीच विचार केला तर ज्ञानात भर पडेल.

आरारानी सुंदर उदाहरणे देऊन समजावलं आहे. निरर्थक वाद घालण्यापेक्षा थोडा स्वतःशीच विचार केला तर ज्ञानात भर पडेल. >> +१

भास्करा वय वाढल्या मुळे /नंतर तरी तुझ्यातील, देवानं बुद्धी दिल्ये म्हणून उगाच वाट्टेल तशी वापरण्याचे प्रमाण आणि उगाच्चा वावदूकपणा कमी झालेला बघायला आवडेल.

आ. रा. रा. चांगले मुद्दे मांडताय पण कोणापुढे?

ऋन्मेष चांगले मुद्दे मांडताय पण कोणापुढे?

>>>>

वरच्या दोन पोस्ट वाचून असे वाटते की शेन वॉर्न आणि सचिनची जुगलबंदी चालू आहे.
शेन वॉर्न चांगली बॉलिंग टाकतोयस. पण कोणापुढे. समोर सचिन आहे.
अर्थात आमच्यात वॉर्न कोण सचिन कोण यात पडूया नको. दोघेही आपापल्या जागी ग्रेट आहेत. मी आरारा सचिन वॉर्न आम्हा चौघांतर्फे धन्यवाद बोलतो.

चर्चेत काही नवीन मुद्दे येत आहेत.
शुद्ध अशुद्ध हे वेगळे आणि प्रमाण भाषा हे वेगळे असा एक सूर दिसतोय.
प्रमाण भाषा पुण्यामुंबईची अशीही एक ओळ वाचली. पुण्याची आणि मुंबईची मराठी एक आहे हे माझ्यासाठी नवीन आहे. असो...

बरं प्रमाण भाषा सरकारी कामकाजासाठी लागते हा एक उपयोग तुर्तास खरा समजूया. तरी तिचा दैनंदिन लिखाणातील वा मायबोलीवर दिलेल्या प्रतिसादातील अट्टहासाचे समर्थन होऊ शकत नाही.

ते करायचे झाल्यास रच्याकने फच्याकने सारेच बंद करावे लागेल.

हुमायुन नेचर, हाल्फ, जोक्स द अपार्ट, येनीवेज ... ईत्यादी ईत्यादी जे मी लिहितो ते मराठी शब्द नाहीयेत. त्यामुळे मराठीच्या धाग्यावर यांचा उल्लेख करायचे कारण समजले नाही.
येनीवेज, तसेही मी ते अशुद्ध ईंग्रजी लिहावे म्हणून लिहीत नाही. तर ती माझी एक स्टाईल आहे.

<<<<< माझी मदत करा, हे "मेरी मदद किजिये" चे शब्दशः भाषांतर आहे.>>>>>
असेना, त्याने काय फरक पडतो. माझी मदत करा असे मी कोणाला बोललो तर त्याला समजणार नाही का की मला त्याच्या मदतीची गरज आहे.

उलट
मला आरती करा
आणि माझी आरती करा..
यात माझी आरती करा हे बरोबर आहे ना?
मला आरती करा याचा वर बघा कोणीतरी वेगळाच अर्थ काढला आहे.
तसेच मला मदत करा याचाही कोणी तसाच अर्थ काढला तर पंचाईत होण्याची शक्यता जास्त नाही का...

<<<<पण, "आज"ची अधिकृत प्रमाण मराठी, >>>>
हे एक चांगले कबूल केलेत. आजची मराठी. म्हणजे प्रमाण मराठी सुद्धा वेळोवेळी बदलतेय. अट्टहास नाहीये. आज तुम्ही ज्या माझी मदत करा वर आक्षेप घेत आहात ते उद्या प्रमाण मराठी असू शकतेच.

<<<<तिकडे 'माझ्या शेतातल्या पम्पाक लाईट गावना नाय' असे चालणार नाही!>>>
अहो तुम्ही म्हणत आहात ती बोलीभाषा. यात शुद्ध अशुद्ध आणि प्रमाणभाषा हे दोन वेगळे मुद्दे आहेत ना..
बाकी खरेच असे सामान्य माणसाने अर्ज करताना र्हस्व दिर्घ वेलांटी शुद्धलेखनाचे नियम पाळणे गरजेचे आहे अन्यथा अर्ज फेटाळला जाईल असा नियम असेल तर अवघड आहे. कारण किती सामान्य लोकांना हे जमेल याची शंका आहे. जिथे मराठीच्या पाठ्यपुस्तकात चुका निघतात तिथे सामान्य माणसांचे काय. बिचारे अट्टहासाचे बळी पडत असतील. भ्रष्टाचार करायला एक कुरण आहे की हे एक..

@ आ.रा.रा. तुमच्या आयडीनावाबद्दल एक शंका आहे. वैयक्तिक घेऊ नका. शुद्धलेखनाची शंका आहे. आ.रा.रा. हे तीन शब्दांचे शॉर्टफॉर्म आहे. यात प्रत्येक टिंबानंतर स्पेस हवी ना? कि असेही चालते? की हेच बरोबर आहे?

विशेष नामाला कसे नियम लागू होतात का होत नाहीत ते शिकायला अजून उशीर झालेला नाही.
आज गम्मत म्हणून माझ्या पहिलीतल्या मुलाला (मराठी माध्यमात शिकत नाही तो) मला मदत आणि माझी मदत यातील काय बरोबर विचारले. योग्य उत्तर दिले त्याने. मलाच बरं वाटलं. Happy

"शुद्ध अशुद्ध - विशिष्ट भाषा शुद्ध आणि विशिष्ट भाषा अशुद्ध हा समज चुकीचा आहे. विशेषतः ग्रामीण भाषा अशुद्ध असं काही लोक समजतात्म ते चूक आहे. प्रत्येक भाषा ही त्या त्या प्रदेशाची शुद्ध भाषाच असते. त्यात श्रेष्ठ व कनिष्ठ असेही नसते. प्रमाणभाषा शुद्ध व बोलीभाषा अशुद्ध असेही नाही.

प्रमाणभाषा आणि बोलीभाषा - प्रत्येक भाषेमध्ये त्या भाषेच्या वापरासंबंधी काही नियम केलेले असतात. या नियमांनुसार जी भाषा कार्य करते ती प्रमाण भाषा. 'एका विशिष्ट भूभागाच्ता मोठ्यात मोठ्या समूहाकडून जी भाषा बोलली जाते, तिला प्रमाण भाषा म्हणतात.
प्रमाणभाषेचा वापर समाजातील निरनिराळ्या व्यवसाय जातनिहाय अशा गटांकडून आपापसात व्यवहार करण्यासाठी होतो. प्रमाणभाषा राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक इत्यादी महत्त्वाच्या क्षेत्रांतील व्यवहारासाठीही वापरली हाते. प्रमाणभाषेमुळे त्या त्या भाषिक समाजाचे एकसंधत्व टिकून राहते. समाजाचा सांस्कृतिक वारसा, ज्ञानव्ञुह, इतिहास, परंपरा जपण्याचे कार्य प्रमाणभाषा करत असते. तिच्या या विशेषामुळे एका समाजापासून दुसर्‍या समाजाचे स्वतंत्र अस्तित्व प्रमाणभाषा व्यक्त करीत असते. बोलीपेक्षा प्रमाणभाषा स्थिर असते.

एका विशिष्ट भूभागाच्या लहानात लहान समूहाकडून जी भाषा बोलली जाते, तिला बोली भाषा म्हणतात. अहिराणी,वर्‍हाडी, डांगी, मालवणी, कोकणी या बोलीभाषा आहेत." बोलीभाषा हे दैनंदिन व्यवहाराचे साधन आहे.

प्रमाणभाषा आणि बोलीभाषेत काही साम्य असते, तसे नसेल तर बोलीभाषा ही एक स्वतंत्र भाषा होईल.

प्रमाणभाषेचे क्षेत्र अथवा वर्तुळ व्यापक, विस्तारित असते. बोलींची क्षेत्रे लहान, सीमित असून अशा बोली प्रमाणभाषेच्या मोठ्या वर्तुळात समाविष्ट असतात."

हा वरचा मजकूर मराठी भाषा विषयाच्या पदवी पातळीच्या पाठ्यपुस्तकातून लिहिला आहे.

यावरून एक कळावं की महाराष्ट्राची आणि मराठी माणसाची इतरांना ओळख प्रमाण मराठी भाषेने होते. इथले अनेक समूह आपापसात प्रमाण मराठीत बोलतात. आपले शिक्षण प्रमाण मराठी भाषेत होते.

भरत, बराचसा सहमत. पण प्रमाण भाषा बहुधा मोठ्यात मोठ्या समूहापेक्षा साहित्य-कला-राजकारणात जे लोक पुढे असतात त्यांची भाषा म्हणून आपोआप रूढ होते. ते संख्येने कमी असले तरी.

महाराष्ट्रात दैनंदिन जीवनात प्रमाण भाषा बोलणारे बहुसंख्य नसावेत. अगदी पुण्याहून ५० किमी मंचर ला गेलो तरी 'इथपोत्तर्/तिथपोत्तर" वगैरे ऐकू येते. पुढे आणखीनच बदलते.

{बरं प्रमाण भाषा सरकारी कामकाजासाठी लागते हा एक उपयोग तुर्तास खरा समजूया. तरी तिचा दैनंदिन लिखाणातील वा मायबोलीवर दिलेल्या प्रतिसादातील अट्टहासाचे समर्थन होऊ शकत नाही.}

याबद्दल वरच्या प्रतिसादात लिहिलं आहे.

{ते करायचे झाल्यास रच्याकने फच्याकने सारेच बंद करावे लागेल.}
एखाद्याने मायबोलीवर लेख लिहिला, तर तो प्रमाण भाषेत असावा अशी अपेक्षा अवास्तव ठरू नये. प्रतिसादांत मायबोलीची बोलीभाषा चालायला हवी.

{हुमायुन नेचर, हाल्फ, जोक्स द अपार्ट, येनीवेज ... ईत्यादी ईत्यादी जे मी लिहितो ते मराठी शब्द नाहीयेत. त्यामुळे मराठीच्या धाग्यावर यांचा उल्लेख करायचे कारण समजले नाही.
येनीवेज, तसेही मी ते अशुद्ध ईंग्रजी लिहावे म्हणून लिहीत नाही. तर ती माझी एक स्टाईल आहे.}

मुद्दाम चुकीचे लिहिण्याला स्टाइल म्हणणे ही तुमची भाषेबद्दलची आस्था दाखवतो.

{{<<<<पण, "आज"ची अधिकृत प्रमाण मराठी, >>>>
हे एक चांगले कबूल केलेत. आजची मराठी. म्हणजे प्रमाण मराठी सुद्धा वेळोवेळी बदलतेय. अट्टहास नाहीये. आज तुम्ही ज्या माझी मदत करा वर आक्षेप घेत आहात ते उद्या प्रमाण मराठी असू शकतेच.}}
आधीच्या प्रतिसादात लिहिलं, तसं प्रमाणभाषा बोलीभाषेपेक्षा अधिक स्थिर असते. आम्ही बोलतो, ती उद्याची प्रमाणभाषा असेल असा तुमचा दावा असेल, तरी ती आज प्रमाणभाषा नाही, हे नक्की.

{{बाकी खरेच असे सामान्य माणसाने अर्ज करताना र्हस्व दिर्घ वेलांटी शुद्धलेखनाचे नियम पाळणे गरजेचे आहे अन्यथा अर्ज फेटाळला जाईल असा नियम असेल तर अवघड आहे. कारण किती सामान्य लोकांना हे जमेल याची शंका आहे. जिथे मराठीच्या पाठ्यपुस्तकात चुका निघतात तिथे सामान्य माणसांचे काय. बिचारे अट्टहासाचे बळी पडत असतील. भ्रष्टाचार करायला एक कुरण आहे की हे एक..}}
र्‍हस्व, दीर्घ.
शाळा शिकलेल्या सगळ्यांना व्याकरण, शुद्धलेखन शिकवलं जातं. व्याकरणाच्या आणि शुद्धलेखनाच्या चुकांसाठी गुण कापले जातात. हे फक्त परीक्षेत पास होण्यापुरतंच आहे आणि पुढे आपल्या जगण्यात त्याचा उपयोग करायचाच नाही, असं ठरवलं असेल, तर त्याची किंमत मोजावी लागेल. माणसाची किंमत त्याने वापरलेल्या भाषेवरूनही (जिथे गरज असेल तिथे) केलीच जाते. याचा अर्थ जो माणूस शाळेत गेलेला नाही, वा शाळा अर्धवट सोडलीय त्यानेही प्रमाणभाषेतच बोलावे अशी सक्ती असल्यासारखा करू नये. पाठ्यपुस्तकांतल्या चुकांवरही आक्षेप घेतलाच जातो. त्या झाल्याच आहेत, तर आता तेच शिकूया असं म्हणावं , अशी तुमची अपेक्षा आहे का? याचं उत्तर तुमच्या आतापर्यंतच्या प्रतिसादांवरून होय असं दिसतं.

फार एण्ड, मोठयात मोठा समूह म्हटलंय. म्हणजे फक्त मालवणी, फक्त वर्‍हाडी बोलणार्‍या लहान लहान समूहांपेक्षा प्रमाण मराठी बोलणार्‍यांची संख्या जास्त. आपल्यातल्या अनेकांची ती मातृभाषाही असू शकते. पण ज्यांची ती नाही, ज्यांची वेगळी बोली आहे, तेही प्रमाण भाषा बोलतात, बोलू शकतात.
(ते वाक्य पाठ्यपुस्तकात दिलेली व्याख्या आहे.)
उदाहरण : माझे गावाकडचे चुलतभाऊ एकमेकांशी मालवणीत बोलतात, पण माझ्याशी प्रमाण मराठीत बोलतात.

{{<<<<< माझी मदत करा, हे "मेरी मदद किजिये" चे शब्दशः भाषांतर आहे.>>>>>
असेना, त्याने काय फरक पडतो. माझी मदत करा असे मी कोणाला बोललो तर त्याला समजणार नाही का की मला त्याच्या मदतीची गरज आहे.

उलट
मला आरती करा
आणि माझी आरती करा..

यात माझी आरती करा हे बरोबर आहे ना?
मला आरती करा याचा वर बघा कोणीतरी वेगळाच अर्थ काढला आहे.
तसेच मला मदत करा याचाही कोणी तसाच अर्थ काढला तर पंचाईत होण्याची शक्यता जास्त नाही का...}

तुमचे म्हणणे असे आहे की मला जे म्हणायचंय, ते दुसर्‍याला कळल्याशी कारण; मग मी नियमभंग केला तरी काय फरक पडतो?

मी एका ठिकाणाहून दुसरीकडे पोचल्याशी कारण, रस्त्याने जाताना मी वाहतुकीचे नियम पाळले नाहीत, तरी काय फरक पडतो?

"वाक्यात शब्दांची जुळणी अशी होत असते, वाक्यातील शब्दांचे परस्परांशी संबंध कसे असतात, वाक्यांचे-शब्दांचे-वर्णांचे- वर्गीकरण आणि विश्लेषण कसे केले जाते, इत्यादिंच्या संबंधाने प्रत्येक भाषेचे नियम असतात. त्या नियमांचा ऊहापोह करण्याचे शास्त्र म्हणजे व्याकरण.

तर माझी मदत करा की मला मदत करा, हे या नियमांत सांगितलं गेलंय.

आता विभक्तीसंबंधाने (पुन्हा एकदा पाठ्यपुस्तकातून)

"वाक्यात नाम, सर्वनामे यांचे क्रियापदाशी जे संबंध असतात त्यांना कारक संबंध म्हणतात.
प्रथमेचा कर्ता, द्वितीयेचा कर्म, तृतीयेचासाधन/करण, चतुर्थीचा संप्रदान, पंचमीचा अपादान, सप्तमीचा अधिकरण- हे कारकार्थ झाले.
मात्र षष्ठी विभक्तीच्या शब्दांचा संबंध थेट क्रियापदाशी येत नसल्याने या विभक्तीला कारकार्थ नाही. नाम, सर्वनाम यांचा परस्परांशी संबंध षष्ठीच्या प्रत्ययांनी येतो, म्हणून षष्ठी या विभक्तीचा अर्थ संबंध हाच मानला जातो."

आता "माझी मदत कर आणि मला मदत कर" याकडे येऊ.
मदत करण्याची कृती कोणाच्या तरी लाभासाठी केली जाते, हे मान्य व्हावे. लाभ = संप्रदान= चतुर्थी - स, ला, ते ; स,ला, ना, ते.
"मला खाऊ दे," सारखंच "मला मदत कर."

आता माझी मदत केव्हा म्हणायचं? तर "तुला माझी मदत नकोय का?" या वाक्यात.

मला आरती करा /माझी आरती का :
माझी आरती करा. मला आरती ओवाळा.
दोन्ही आरती (आरत्या?) वेगवेगळ्या.

पूर्ण धागा वाचला,
आरारा छान पोस्ट,
भरत चांगली माहिती, पण गीता वाचन सुरू करण्यापूर्वी समोर कोण आहे ते एकदा बघत जा Wink

आणि वर भरत यांनी व्याकरणाच्या नियमांबद्दल लिहिले आहे त्यात माझी एक वीट,

संस्कृत भाषा व्याकरणाच्या नियमांनी घट्ट बांधली आहे, इतकी की वाक्यात शब्द पुढे मागे केले तरी वाक्याचा अर्थ बदलत नाही (जाणकारांनी यावर भाष्य करावे प्लिज, चुकीचे असेल तर हे विधान रद्द समजावे) . कॉम्प्युटर ला सर्वात सुटेबल भाषा म्हणून जी डिंग मारली जाते ती या व्याकरणाच्या नियमानुसारच.
तेव्हा फक्त भावना पोहोचतात ना? मग व्याकरणाला फाट्यावर मारा असा कोणाचा दृष्टिकोन असेल तर तो चुकीचा आहे.

ह्या पोस्ट्स भभांना समजवायला पालथ्या घड्यावर पाणी आहेत हे उघड आहे, पण इतरांसाठी ह्यांचा वापर होऊ शकतो. त्याबद्दल भरत व आरारा तुमचे आभार.

Pages