अमानवीय...? - २

Submitted by दक्षिणा on 15 June, 2018 - 06:48

अमानविय -१ धाग्याने सुद्धा दोनहजारी गाठली. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.

या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे

https://www.maayboli.com/node/49229

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला तर दिसतय.
लॉग ऑफ करून बघितलं असेल तर बहुतेक नाही दिसणार. लॉग इन करून मग बघ.

१९६४ -६५ मध्ये माझे वडील एसटी महामंडळात नाशिक विभागात नाशिक डेपोमध्ये कंडक्टर ची नोकरी करत होते. तेव्हा मुक्कामी बस घेऊन पेठ सुरगाणा तालुक्यात जात असत. दिवसातून एक दोन बस तिकडे जात. रस्ताही खराब मातीचा होता.
असेच एकदा मुक्कामी बस घेऊन पेठला गेले होते. अजूनही एक बस मुक्कामी होती. दोन्ही ड्रायव्हर व दोन्ही कंडक्टर डबे सोडून जेवणासाठी मैदानावर बसले होते. तितक्यात तिथे एक म्हातारी बाई आली व एखादी भाकर खायला द्या म्हणून विनवणी करू लागली. त्या दुसऱ्या कंडक्टर ने शिव्या देत तिला हाकलून दिले. म्हातारी अंधारात निघून गेली. सकाळी गाड्या निघणार तोच तो कंडक्टर मरून पडलेला होता व त्याचे पोट एकदम फुटायला आल्यासारखे फुगलेले होते.
नंतर वडीलांनी मुंबई विभागात कंट्रोलर ची नोकरी केली.

मंडळी माझ्या वाचनात काही इंटरेस्टिंग आले तर ते मी इथे टाकतो हे मी पहिलेच सांगितले आहे. जे माझे स्वतःचे अनुभव आहेत ते माझे आहेत म्हणून आधीच सांगतो. त्यामुळे शंका नसावी.
तसेही सगळे भुतांचे अनुभव मलाच यायला लागले तर मग नक्कीच माझ्यासाठी तो चिंतेचा विषय असेल Sad . तसाही मी काही घोस्टबस्टर्स म्हणून काम करत नाही Proud Proud Proud

मन्या माबोवर पडीक असतो मी. कोण कुणाला काय विपू करतंय सबका ध्यान रखता हू. हीहीहा नाम है मेरा.

एकदा मुळशी धरणाच्या भिंतीजवळ भादस नावाच्या गावात कंपनीच्या कामासाठी रहात होतो. शेजारी गावडेवाडीतील अण्णा गावडे खूप जवळचे मित्र झाले होते. वयाने व मनाने मोठे होते. एकदिवस संध्याकाळी कोंबडी कापून मस्त पार्टी करायची ठरवलं. मी पुण्याला जाऊन येणार होतो. येताना मी मिल्ट्रीचा ओल्ड मंकचा खंबा आणणार असे सांगितले होते. कामं आटोपायला उशीर झाला तिथून पुढे चंदननगर ला जाऊन ओळखीच्या व्यक्ती कडून नव्वद रूपयांचा खंबा घेतला. स्वारगेटवरून पौड गाडी मिळाली. रात्री नऊ वाजता उतरून चालू लागलो. तेव्हा तिकडे पुर्ण जंगल होते, जवळपास बारा तेरा किलोमीटर अंतर पायीच निघालो. जोडीदार नाही, अंधार इतका की रस्ता पुसट दिसत होता. मध्ये एक दोन छोट्या वाडया होत्या. बाकी सगळे जंगल. मी ओल्ड मंकचा खंबा पिशवीत व्यवस्थित धरून चालत होतो. सात आठ किलोमीटर पुढे गेल्यावर अचानक एका बाईचा आवाज आला. ये थांब. ये थांब. आवाजाला जबरदस्त धार होती. मी मागे न पाहता तसाच देवाचं नाव घेत तसाच पुढे गेलो. पुढं देवीचं ठाणं रस्त्याकडेला होतं. आईला नमस्कार केला नंतर आवाज नाही आला.
रात्री साडेदहाला अकराला पोहोचलो तर मंडळी झोपायच्या तयारीत होती. मी इतका रात्री चा आलेला पाहून आश्चर्यचकित होऊन गेले. मी त्यांना वाटेतलं काही सांगितलं नाही. मग कोंबडी कापली. त्या माऊलीने पाट्यावर मसाला वाटून कालवण बनवलं. नंतर बारा वाजता ओल्ड मंकचा आस्वाद घेत घेत भरपेट जेवण केले. परत कधी अंधारात तिकडून आलो गेलो नाही. १९९४ ची गोष्ट आहे ही.

कोल्हापूर ला काही कामानिमित्त म्हणजे गोकुळ शिरगाव एम आय डी सी त कामाला होतो. उचगावच्या पुढे सरनोबतवाडीला रहात होतो. एका डॉक्टरांनी नाव आठवत नाही पण दोन खोल्या भाड्याने दिल्या होत्या. डॉक्टर खूप सज्जन माणूस होते. दिवसा सकाळी साडे आठ ते बारा पर्यंत ओपीडी करून परत कोल्हापूरला दवाखान्यात जात. या खोल्या गावापासून दूर शेतीला लागून होत्या.
एके दिवशी कामावरून आलो, वर गावात जाऊन कोरे मावशी कडून डबा आणला जेवण करून झोपलो. अचानक रात्री बारा वाजता कुणीतरी मला आडवंच धरून आपटत होतं. साधारण एकदीड फुटांवरून दणादणा आपटीत होतं. मी जागा झालो होतो पण इतका घाबरलो होतो व डोळे मिटून राम राम मोठ्यानं म्हणत होतो. नंतर ते सर्व थांबलं. सकाळ पर्यंत तसाच डोळे मिटून राम राम म्हणत राहिलो. सकाळी ऊन पडल्यावर पाहिलं तर दाराला आतून कडी लावलेलीच होती.
शेजारी एक म्हातारी व तिचा लग्न न झालेला भाऊ रहात होता. दोघेही साठीच्या पुढचे होते. गडमुडशिंगी गावचे चांगले श्रीमंत पण इस्टेटीच्या वादाने जीवाला भिऊन इकडे भाड्याच्या खोलीत राहत होते. रात्र झाली की एकदीड वाजता म्हातारी शं..क...र, शं....क.......र असे करून किंचाळात सगळं सळ्ळं व्हायला पाहिजे ब...घ. असं बरंच काही घुमल्यासारखी बोलत बसायची. ते ऐकून माझी पाचावर धारण बसायची. इकडच्या खोलीत मी एकटाच असायचो. अक्षरशः अंगावर शहारे यायचे.
सकाळी शंकर काका मला चहाला बोलवायचे. मी त्या बहीण भावांना हाफशीवरून पाण्याच्या घागरी आणायला मदत करायचो. अक्का झुणका अप्रतिम बनवायच्या व पुरणपोळी तर लाजवाब. पण रात्री काहीतरी संचार व्हायचा. पलिकडे जाऊन बघण्याची हिम्मत मात्र झाली नाही. भावाचं लग्न व्हावं ही त्यांची खूप इच्छा होती पण ती पुरी नाही झाली.
दोन वर्षे तिथं राहिलो पण परत उचलून आपटण्याचा अनुभव नाही आला.

माझ्या मित्राने सांगितलेला किस्सा.
हा मित्र इगतपुरी तालुक्यातील एका आडबाजूला खेड्यात राहतो. एक दिवस त्याच्या दाजींच्या मित्राच्या घरी काहीतरी समारंभ होता. तो खोडाळ्याला रहात होता. मित्र व त्याचे दाजी बाईकवर गेले. वैतरणा मार्गे जायला उशीर झाला. जेवण झाल्यानंतर अंधार पडला तर दाजींचा मित्र निघूच देईना. रस्त्याने धोका आहे मुक्काम करा असे सांगून जाऊ देईना. हे दोघे ऐकेनात . मित्राने एक कोयता संरक्षणासाठी दिला. रात्री अकरा वाजता निघाले. सुनाट रस्ता, दोन्ही बाजूला झाडे सगळे जंगल. फक्त बाईकचा टर टर्र आवाज.
बरेच पुढे आल्यावर एक लंगोट घातलेला म्हातारा गाडीच्या लाईटच्या फोकसमध्ये दूरवर रस्त्याच्या मधातून चाललेला दिसला. मित्र गाडी चालवत होता. तो पुर्ण हॉर्न वाजवत होता. पण म्हातारा मधून बाजूला होत नव्हता. गाडी जवळ आली की तो आणखी दूर दिसायचा. हे दोघे फुल टेन्शन मध्ये आले होते. मित्राने गाडी पुर्ण रेस केली. कधी हायवेला लागतो असं झालं त्याला. अचानक एका ठिकाणी गाडी व गाडीवर बसलेले हे दोघे म्हाताऱ्याच्या शरिरातून आरपार गेले. म्हातारा गायब झाला. काही वेळाने हे दोघे घोटीला वैतरणा फाट्यावर पोहोचले. तिथे गेल्या गेल्या मित्राने गाडी थांबवली व खाली बसून जोरजोरात रडू लागला. वाचलो म्हणून बरं वाटलं पण रागाच्या भरात दाजींना खूप बोलला.
मला या गोष्टीची उत्सुकता वाटली म्हणून मी बऱ्याचदा तिकडे गेलो, सुर्यमाळ खोडाळा जव्हार मोखाडा खूप भटकलो पण खरं सांगायचं तर रात्री प्रवास नाही केला.

जव्हार मोखाडा रात्री भटकून पहा ... भुतं नसली तरी काही जंगलाचा भाग एकदम भयानक वाटतो रात्री. बरेचदा जंगली प्राणी दिसतात, मी स्वतः चांगला ३-४ फूट फणा काढलेला नाग पहिला आहे. साधारणतः १६-१७ वर्ष पूर्वी. तिकडे रात्री रस्त्यावर वाहने लुटण्याचे प्रकारपण खूप व्हायचे.

वाडा ते जव्हार रस्त्यावर असे प्रकार व्हायचे . तिकडे एक घाट आहे कुठेतरी लागतो तिथं नवरा बायको व मुलांना मारुन टाकले होते. तिकडून फिरताना ते आठवायचं पण थ्रीलसाठी असे उद्योग करत असे. हरसूल आता त्र्यंबक तालुक्यात आहे.‌ तिकडून गुजरातला जोडणारा खूप इंटेरिअर भाग आहे. तिकडे दारुच्या एका क्वार्टरबदल्यात सुपारी घेऊन मारणारे लोकं आहेत असे लोक बोलायचे. तसेच रस्ता लुटणारे तीर कामठ्याने बाइकचे टायर फोडतात. अश्या बऱ्याच वदंता होत्या.

जव्हार-मोखाडा-पेठ-सुरगाणा हे सगळी गावं करणी, भुते , अफवा याकरता जाम प्रसिद्ध आहेत. पेठ-सुरगाणा तर जास्तच. हिहा, तुमचे अनूभव भारीच आहेत.

चार पाच वर्षांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील एका मित्राकडे गेलो होतो. विनायक हा खरंतर शेतकरी. पण इतका व्यवहारज्ञानी, जीव लावणारा आदिवासी मित्र की बास. मी माझी नवीन बुलेट गाडी दाखवायला घेऊन गेलो होतो. मे महिना होता. विनायक ला एका भगताकडे पेठ तालुक्यात जायचे होते. पण गावाचं नाव नक्की माहित नव्हतं. दुसरे दोन नातेवाईक परस्पर पुढे भेटून सोबत जाणार होते.
मला भगत प्रकरणाबद्दल उत्सुकता होती म्हणून मी सोबत येतो म्हणालो. विनायक, दिलिप सारखे आदिवासी मित्र सोबत असले तर वेळ इतका आनंदात जायचा की बस. दुसऱ्या दिवशी सकाळी निघालो. दिंडोरी वरून ननाशी गाव गाठले. विनायक च्या नातेवाईकांना फोन केला तर त्यांना उशीर होणार होता , फोनवरून त्यांनी घुबडसाका गावाला सरळ यायला सांगितले पण भगताचं नाव सांगितलंच नाही. विनायक ने दुसऱ्याच गावाचं नाव ऐकलं होतं. आम्ही पेट्रोल भरून पुढे गेलो. पेठ तालुका लागला, विचारत विचारत पुढं चाललो होतो. नातेवाईकांना रेंज नसल्याने फोनही लागत नव्हता. खूप आत गेल्यावर विनायकची समजूत झालेलं गाव लागलं. दुपारचे बारा एक वाजत आले होते. गावात चौकशी केली तर गावाबाहेर एक भगत हाये असे लोकांनी सांगितले. कच्च्या रस्त्याने एवढी जड गाडी चालवत दरीत उतरत उतरत एका ठिकाणी झोपडीजवळ थांबलो. एक म्हातारा माणूस उघड्यावर आंघोळ करीत होता. विनायक ने त्याला विचारले बाबा तुम्ही तांदूळ पाहता का? म्हातारा बोलला हा पाहतो, बसा. आम्ही झोपडीसमोर झाडाच्या सावलीत खाटेवर बसलो. बाबा आंघोळ करून आला व आत बघून शिव्या देऊ लागला. मी पाहिले की एक म्हातारी बाई दाराशी पडलेली होती. जीव चालल्यागत निपचित. फक्त डोळे उघडे होते. आता नीट पाहिलं तर म्हातारा कुष्ठरोगी होता व हाताला बोटं नव्हती पण बरा झालेला वाटत होता. ते सगळं चित्र पाहून थांबावसं वाटेना. विनायकनं मला हळूच चलण्यासाठी खुणावले. विनायक म्हणाला बाबा आमचे जोडीदार गावात आले असतील, त्यांना लगेच घेऊन येतो. म्हातारा म्हणाला हे पैसे न्या व मला बिडीबंडल आणा. पैसे काढलेतर पाचशे पाचशेच्या नोटा. वीस पंचवीस हजार रुपये असतील. आम्ही म्हणालो आमच्या पैशाने आणतो, तर बाबा म्हणला ठिक आहे, माझ्या कडे बोट करून याला राहूदे इथंच . आता काय करायचं? विनायक बोलला मला गाडी चालवता येत नाही, हे बाहेरचे आहेत म्हणून कशी तरी सुटका करून घेतली. घाईने वर आलो तर रेंज मिळाली. मग घुबडसाक्याला खऱ्या भगताकडे पोहोचलो. तिथे नातेवाईक भेटले पण भगत आजारी मुलीला घेऊन पेठला दवाखान्यात गेला होता. त्याची वाट पाहत तीन चार वाजले अन् असा तुफान पाऊस सुरू झाला की बस. भगताच्या घरात पाणीच पाणी. भगत आल्यावर विनायक व नातेवाईकांनी आणलेले तांदूळ दिले. सुपात घेऊन मुठ मुठ तांदूळ बाजूला करत ध्यान लावल्यासारखे शंकानिरसन सुरू झाले. नातेवाईकांचा घरातला तरूण अपघात होऊन नाशिकच्या दवाखान्यात कोमात होता. भगतानं सांगितले पैशावरून भांडण झाल्याने समोरच्याने देवता मागे सोडली आहे. त्या तरुणाच्या उशाला ठेवायला तांदूळ भारुन दिले.
विनायक चे काम झाल्यावर अंधारात परत निघालो.
विनायकने नंतर सांगितले की तो तरुण दोन तीन दिवसांनी खडखडीत बरा झाला.

हिज हायनेस - कधी जायचे ते सांगा .. अजूनही हा प्रदेश तसाच आदिवासी पाड्यांचा आहे कि सुधारणा झाली हे मात्र माहित नाही

हा खरा अमानवीय अनुभव नाही तरीही लिहीतो.
आमची शेती ओढ्याच्या काठावर आहे . ओढा सोळा सतरा किलोमीटर अंतरावर डोंगरातून वाहत आमच्या शेताजवळ बराच रूंद झालेला आहे. दर दहा वर्षांनी एक महापूर जातो. दोन दिवस कुठलाही रस्ता रहात नाही. २०१७ साली गणपतीनंतर रात्री असाच पूर आला . घराला पाणी लागले, जनावरे पाण्यात तरंगत होती. कशीतरी उंच जागी नेली. धाडदिशी आवाज होऊन विटांमध्ये बांधकाम केलेली विहिर ढासळली. घरापासून विहीर केवळ काही फुटांवर.
चार-पाच दिवसांनी पाणी कमी झाले. धोकादायक विहिरीला सिमेंट कडे टाकायचे ठरलं. ठेकेदार पाहुन काम दिले. थोड्याशा विटा बाकी होत्या.त्या काढायचे काम सुरू केले. आम्ही त्यांना दोर दिले व दोर बांधून काम करा असे सांगितले पण ठेकेदार म्हणाला आमचं नेहमीचे काम आहे. विहीर ऐंशी फुट खोल, पाणी दहा फुटांवर आलेले. अचानक काम करणारे दोघे जण पाण्यात पडले. एकजण पोहून वर आला मात्र एकजण पार तळाला गेला. सगळे कामगार रडू लागले. गळ टाकून काढण्याचा प्रयत्न केला. पण गळालाही लागला नाही. पोहोणारे इतक्या खोल बुडी घेऊ शकत नव्हते. शेवटी पाणी उपसण्यासाठी साखर कारखान्याकडून पंचवीस एचपीच्या दोन मोटारी आणल्या. तालुक्यावरून मोठे जनरेटर आणले कारण वीज नव्हती. लांबच्या गावावरून एक माणूस मृतदेह काढायचे काम करी त्याला आणले. त्याने तीन हजार रुपये घेईन सांगितले. शेवटी पाणी उपसल्यावर मृतदेह बाहेर काढला. आठ तास पाण्यात फुगलेले शरीर, डोळे उघडे. पाहून शिरशिरी आली. पीएम करण्यासाठी तालुक्याला न्यायचं म्हणून शववाहिका बोलावली. रस्ता नसल्याने प्रेत आम्हा दोघा भावांनी व अजून दोन जणांनी झोळीत ठेवून अर्धा किलोमीटर अंतरावर शववाहिकेत नेण्यासाठी वाहून नेले. अर्ध्या तासाने प्रेत घेऊन भाऊ ,मृताचे नातेवाईक गेले मी एकटा अंधारात परत आलो तेव्हा काहीही भीती वाटली नाही.
पण नंतर मला रात्रीचे बाहेर पडण्यास इतकी भीती वाटू लागली की कुणाला तरी सोबत घेतल्याशिवाय बाहेर पडू शकत नव्हतो. जिथे प्रेत ठेवून गाडीची वाट पाहिली तिकडून रात्री येऊच शकत नव्हतो. ते प्रेत तिथेच असल्यासारखे भास व्हायचे. हे इतकं अति झालं कि न घाबरणारा मी. डरपोक झालो होतो व भीतीच्या छायेखाली जगत होतो.
शेवटी एक दिवस ठरवलं आताच जर मरण आले तर काय करशील. रोज रोज किती मरणार. त्या दिवशी भीतीवर विजय मिळवला. परत त्रास नाही झाला. पण या घटनेने अनेक उलथापालथी घडल्या त्या नंतर सांगेन.

Pages