अमानवीय...? - २

Submitted by दक्षिणा on 15 June, 2018 - 06:48

अमानविय -१ धाग्याने सुद्धा दोनहजारी गाठली. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.

या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे

https://www.maayboli.com/node/49229

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दक्षिण मुंबई उर्फ "सोबो" जिथे मध्य मुंबईला भिडते, ते म्हणजे अत्यंत गजबजलेले ऑपेरा हाऊस, गिरगाव, मुंबई सेंट्रल असे नामचीन प्रभाग. कुलाबा, मलबार हिलचा, सूनसान, थंड संगमरवरी ताठा इथं नाही. धनिक गुजराती आणि श्रमिक मराठी यांच्या love hate relation मधून एक सरस संस्कृतीच इथं निर्माण झालीय. पश्चिम बाजूला चिरतरुण मरीन ड्राईव्ह आणि पुर्वेला खतरनाक भेंडी बाजार, भायखळा. याच्या मध्ये सदैव रटरटत रहाणारं कॉस्मोपॉलटन मिश्रण म्हणजे खरी अभिजात मुंबई. खरंतर भाई लोकांमुळे एकापरीने मुंबईतला सगळ्यात सेफ एरिया...रात्री रात्री पर्यंत चालू असणारे अवैध धंदे मग त्याला जोडून येणारी इको सिस्टीम, हॉटेल्स, टॅक्सीवाले, खबरी, वारांगना, पोलीस, प्रवासी...आता या धबडग्यात कुठे काही चांस मिळेल का super naturals ना? पण या उबळत्या मुंबईतही काही जागा आपला लौकिक, भीतीयुक्त दरारा अजूनही टिकवून आहेत.

मरीन लाईन्स. एक देखण स्टेशन. मरीन लाईन्सच्या पश्चिमेला छान समुद्र तट आहे जो पुढे मरीन ड्राईव्हचा राणीचा हार होतो आणि मग चिंचोळा होत नरिमन पॉइंट कडे संपतो. इथून आपल्याला उजवीकडे दिसतं तेच मागच्या काही लेखात भेटलेले मलबार हिल. मरीन लाईन्सच्या पूर्वेला उतरलात आणि थोडं आत चालत गेलात की चिराबजार सुरू होतो. हा एरिया ताडवाडी. आणि...... या मध्येच शांतपणे निजलं आहे .... "बडा कब्रिस्तान." मुंबईच्या मुस्लिम समाजाची मुख्य दफन भूमी. मुस्लिम बोर्डच्या अखत्यारीतील या वास्तूचा त्रास कुणाला नसला तरीही या वास्तू भवती एक भयावह वलय आहे. गंमत म्हणजे याला लागूनच चंदनवाडी हिंदू स्मशानभूमी आहे. अगदी स्टेशनला लागूनच असल्याने वर्दळही असते पण रोजचे प्रवासी, रहिवासी इथन लवकर कसं पार होता येईल हे बघतात. कुठल्याही अमानवी, पैशाचिक घटनांची नोंद नाही तरी ही कर्कश हॉर्न मारत पळणाऱ्या गाड्या, धडधडत जाणाऱ्या लोकल ट्रेनच्या गोंगाटात ही बडा कब्रिस्तान एखाद्या निर्वात पोकळी सारखं आहे. तिथं एक विचित्र दडपण आहे. जे इथून निघा असं सुचवत असतं. निव्वळ दफनभूमी आहे म्हणून नव्हे तर या जागेत एक सुप्त भार असल्याचं काही paranormal experts ना ही आढळून आलं आहे. ताडवाडी परिसरात बडा कब्रिस्तानला भीतीयुक्त मान आहे. डोन्ट डिस्टर्ब देम नाहीतर "ते" आपल्याला डिस्टर्ब करतील हीच भावना प्रत्येक जण बाळगून इथून भरभर पावलं उचलतो. लागूनच असलेलं स. का. पाटील उद्यानही रात्री भयानक भेसूर दिसतं. तूर्तास या वास्तूला दूर से सलाम दुवा.

ताडवाडी वरून सरळ उत्तरेकडे, समुद्र किनारा सोडून गेलात की गिरगाव. गिरगाव ओलांडलात की मुंबई सेंट्रल. मुंबई सेंट्रलला सरदार पावभाजी पासून पार हाजी अली पर्यंत आहे तो म्हणजे ताडदेव एरिया. पारशी, गुजराती, मराठी वस्ती असलेला. इथेच फिल्म सेंटर, फेमस स्टुडिओ अशा चित्रपटसृष्टीतल्या ६० ते ९० च्या काळातील महत्वाच्या वास्तु आहेत. अशा या ताडदेवला लागून आहे महालक्ष्मी इथलं प्रख्यात रेसकोर्स. अनेक हिंदी चित्रपटांतून दिसणारं हे रेसकोर्स म्हणजे मुंबईच्या गर्भश्रीमंत मंडळींचा अड्डा. ताडदेवच्या हिस्स्यात येणारी रेसकोर्सची बाजू म्हणजे हाजी अलीच्या मुख्य रस्त्याच्या मागचा रस्ता जो सरळ महालक्ष्मी स्टेशनला जातो. दहा एक वर्षांपूर्वी पर्यंत हा खूप छान पर्याय होता हाजी अलीचा ट्रॅफिक टाळण्यासाठी. दुतर्फा गर्द झाडांनी आच्छादलेली एका बाजुला रेसकोर्सवरची मागली बाजू तर एका बाजुला गोल्फ कोर्सचे सुखद दर्शन असा हा एक ते दीड किलोमीटर चा टप्पा. जितका विलोभनीय दिवसा दिसतो तितक्याच सुप्त हिंस्त्र पणे रात्री वावरतो. या रस्त्यावर विश्वास बसणार नाही पण चक्क मृतदेह किंवा मृतदेहाचे तुकडे असलेल्या सुटकेसेस अगदी गेल्या दहा बारा वर्षांपूर्वी सापडायच्या. २००८ मध्ये रेसकोर्सच्या कर्मचाऱ्याच्या ३ वर्षांच्या चिमुरड्याचा अत्यंत वाईट अवस्थेत निष्प्राण देह सापडला, आणि कुठल्यातरी अघोरी साधनेसाठी त्याचा बळी देण्यात आल्याची उघड चर्चा सुरू झाली. त्या आधीही तिथे असे प्रकार घडल्याची चर्चा होती. या भागात नक्कीच एक अस्तित्व जाणवायचं. एक नाही तर अनेक दंतकथा ताडदेव भागात प्रचलित होत्या अघोरी साधना, नरबळी इत्यादी आणि त्याची विल्हेवाट लावण्यासाठी हा सूनसान रस्ता. इथे एका विशिष्ट समाजाची वस्ती आहे. अत्यंत मेहनती पण तेवढेच परंपरावादी लोक. त्यामुळे या घटनांवर जास्त प्रकाश पडला नाही. एक कॉमन अनुभव, बऱ्याच जणांना त्याकाळात आलेला - रात्री एखाद्या सूनसान गल्लीत एखादा लहान मुलगा दिसायचा. रडत रडत फिरायचा. आणि जर त्याच्या मागून मागून गेलात तर एका बांधकाम चालू असलेल्या इमारतीवर तुम्ही पोहोचायतात...आणि तुम्हाला जाणवायचं की त्या अंधाऱ्या ठिकाणी तुम्ही एकटे आहात. तो मुलगा अंधारात गायब झालाय ...आणि फक्त त्याच्या भेसूर रडण्याचा आवाज तुमच्या कानात घुमतोय..अगदी त्याला तुमच्या कानाजवळ कुणीतरी उचलून धरल्यासारखं. आता हे प्रकार कमी झालेत असं वाटतं, तरीही...ताडदेव मधल्या काही जागा नक्कीच धोकादायक आहेत.

आता या रस्त्याच्या पुढल्या बाजूला येऊया. जगप्रसिद्ध हाजी अली दर्गा. अनेकांच्या भुवया उंचावतात जेव्हा हाजी अली सारख्या पवित्र जागेच नाव Horror Legends मध्ये येतं. पण प्रखर पवित्र aura सुद्धा सामान्य लोकांना झेपण्यासारखा नसतो म्हणून तो घातक ठरू शकतो. हाजी अली बुखारी या मुस्लिम संताचे मक्केच्या वारीवर निधन झाले पण आश्चर्य म्हणजे त्यांचा देह समुद्रातून वाहून मुंबईच्या किनाऱ्यावर आला आणि तिथेच भर समुद्रात हा दर्गा बांधला गेला. या ठिकाणी सर्व धर्मीय अत्यंत श्रद्धेनं जातात तर इथलं ज्यूस सेंटर खूप प्रसिद्ध आहे आणि रात्री उशिरापर्यंत ते चालू असतं. मात्र अनेकांना या किनाऱ्यावर, रस्त्यावर अतींद्रिय अनुभव आले आहेत. हाजी अली च्या खडकांवर ही खास करून ज्यांनी अध्यात्मिक साधनेचा प्रयत्न केला आहे त्यांना एका शुभ्र वस्त्रातील पुरुषाचं अस्तित्व जाणवलं आहे. बऱ्याच जणांना तो अनुभव झेपला नाही. तिथं समोरच असलेल्या कॉलेज व इमारतींमध्ये ही काही लोक पूर्वी एका शुभ्र कापडात असलेल्या पण धूसर वाटणाऱ्या व्यक्तीला पाहिल्याचे शपथेवर सांगायचे. मुळात ज्यूस सेंटर पासून पूनम चेंबर्स पर्यंत मोकळा समुद्रकाठच्या रस्त्यावर बस स्टॉप सोडून काही नाही. रात्री रमणीय दिसणारा हा रस्ता, दूरवर आश्र्वस्त करणारा दर्गा असला तरीही कुणीतरी आपल्यावर लक्ष ठेवून आहे असं नक्कीच भासतं. आणि हो इथे उल्लेख केलेलं पूनम चेंबर ज्याचा काही भाग कोसळून भीषण अपघात झाला होता. त्या मजल्यावर तर हमखास वाईट अनुभव येतात हे तिकडचे सुरक्षा रक्षक खाजगीत सांगतात.

भुत्याभाउ,

काय वर्णन केलेय राव...! अचंबित करणारी माहिती...! मुंबईत येऊन 7-8 वर्षे झाली, पण तुम्ही म्हणल्यापैकी फक्त 1-2 जागा ऐकून माहीत होत्या...!

भुत्याभाऊ, काय अप्रतिम लिहिलय. वाचताना मी विसरलोच की अमानवीय धाग्यावरचा प्रतिसाद वाचतोय. काय सुरेख उभा केला सर्व परिसर. भारी!

लागूनच असलेलं स. का. पाटील उद्यानही रात्री भयानक भेसूर दिसतं>>>> +१.
पण बरेचजण तिथे अभ्यास करायला येतात.

भुत्याभाऊ जोरदार वर्णन ... परंतु अजूनही तिथे काही अनुभव येतात कि हे सगळं १०-१५ वर्ष आधीचे?

कोणी मुंबईकर सांगू शकेल काय?

मजा आ गया. ये मजा मैं मायबोली के हर मायबोलीकर को देना चाहता हू .

भुत्याभाउ
खुप छान वर्णन केलस. कित्येक वर्षांनी त्या गल्यांमधून फिरून आलो.
गिरगावातली गोरेगावकर लेन भारलेली आहे अस म्हणतात.

भुत्यभाऊ...खूपच छान वर्णन केलेत...मुंबई डोळ्यासमोर उभी राहिली>>>>> +१ २३४५
मी तर मुंबई ५ टक्के पण नीट नाही बघीतलेली. दोन-चार लग्न, व्हिसासाठी २ वेळा येणे या व्यतीरीक्त मुंबई बघीतली गेलीच नाही. फक्त सिनेमात दिसली तेवढीच. त्यामुळे जाम उत्सुकता वाढली. भुत्याभाऊ तुम्ही लिहीत रहा हो. मला आवडतो हा धागा.

मुंबई माझी जान आहे, कित्येकदा केवळ थ्रील म्हणून दिवसच्या दिवस लोकलनं प्रवास करायचो. मुंबई सेंट्रल स्टेशनला अनेक रात्री गर्दी अंगावर घेत जागून काढल्या आहेत. गायबलो की घरचे लगेच मुंबैच्या नातेवाईक लोकांना फोन करायचे. मग मी स्टेशनवर मुक्कामाचा पायंडा पाडला. अनेकदा रात्री पॅसेंजर पकडून पुण्याला व परत असे उद्योग केलेत. दादरला उतरुन पायी हिंदमाता, मंत्रालय, गेट वे ऑफ इंडिया, नेव्हीनगर, फोर्ट, परळ असे अनेक ठिकाणी निरुद्देश भटकायचो, वडापाव खाऊन स्वस्त फळांच्या डिशेस, पाच रुपयांचा ज्यूस यावर दिवस दिवस रहात असे. उगाच जेजेच्या आर्ट गॅलरीत जा, कुठेही बसा कुणी हाकलत नाही. मुंबई खूप प्रेम देते. कुणाला कुणाचे काही पडलेलं नाही. जोतो आपल्याच नादात. मुंबई ची झिंग चढली की उतरतच नाही.
भुतं मात्र भेटली नाहीत.

1918 ची गोष्ट, त्यावेळेस जपान मध्ये Eikichi Suzuki नावाचा एक 17 वर्षाचा मुलगा आपल्या परिवारासह राहत असे. त्याला Okiku नावाची 2वर्षाची लहान बहीण होती. एकेदिवशी 'Eikichi' sapporo या गावामध्ये, एका मेळाव्यामध्ये फिरत असतांना त्याला एक सुंदर शी, जवळपास 16 इंच उंची असलेली पारंपरिक किमोनो (जपानी महिलांचे नेसायचे पारंपरिक वस्त्र)घातलेली बाहुली दिसून आली. ती बाहुली पाहताक्षणी त्याच्या नजरेत भरली. त्याने ती बाहुली आपल्या लहान बहिणीला भेट करण्यासाठी विकत घेतली. Okiku ला सुद्धा ती बाहुली पाहताक्षणी खूप आवडली. ती तासनतास त्या बाहुलीसोबत खेळत बसलेली असे. पण न जाणो नियतीच्या मनात काय दडलेले असेन. त्या वर्षी जपानमध्ये खूप कडाक्याची थंडी पडली. त्या कडाक्याच्या थंडीमुळे Okiku खूप आजारी पडली. त्या आजारपणातही ती त्या बाहुली ला आपल्या जवळच ठेवत असे. पण हळूहळू तिचा आजार वाढत गेला आणि अशातच एके दिवशी तिने आपले प्राण सोडले. Okiku च्या अशाप्रकारे अचानक जाण्याने Suzuki कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. कित्येक दिवस ते तिच्या जाण्याने शोकमग्न होते. Okiku ची आठवण म्हणून Suzuki कुटुंबाने तिची बाहुली आपल्या घरातच जपून ठेवली आणि ते दररोज Okiku च्या आत्म्यास शांती मिळो म्हणून प्रार्थना करीत. पण काही दिवसातच त्यांना त्या बाहुलीचे केसांमध्ये आपोआपच वाढ होत असल्याचे दिसून आले. ज्याप्रकारे Okiku चे त्या बाहुलीवर प्रेम होते. त्यामुळे हो न हो त्या बाहुलीमध्ये Okiku च्या अतुप्त आत्मेचा निवास असल्याचे त्यांना कळून चुकले. परंतु तरीही 1938 सालापर्यंत ती बाहुली त्यांनी स्वतःकडेच जपून ठेवली. पुढे 1938 साली Suzuki परिवाराने Sakhalin गावी आपला मुक्काम कायमचा हलविण्याचे ठरवले. पण तत्पूर्वी त्यांनी ती बाहुली Hokkaido मधील Iwamizawa गावातील Mannenji temple मध्ये दान केली. आणि तेव्हापासून ती बाहुली Mannenji temple मध्ये सांभाळून ठेवण्यात आलेली आहे. Mannenji temple मध्ये कार्यरत असलेल्या विश्वस्त मंडळींच्या मते अजूनही त्या बाहुलीमध्ये Okiku ची आत्मा वास करीत असल्याचे सांगितले जाते. कारण एका विशिष्ट कालावधी नंतर जेव्हाही त्या बाहुलीचे केस कापले जातात तेव्हा अचानक काही कालावधी नंतर त्या बाहुलीच्या केसा मध्ये आपोआप तिच्या गुडघ्याएवढे म्हणजे 10 इंचापर्यंत वाढ झालेली दिसून येते. आज ही ती बाहुली Mannenji temple मध्ये ठेवलेली आहे.

एका आदिवासी तालुका ठिकाणी काम करत होतो. संध्याकाळी जेवणं झाल्यावर मित्र मित्र फिरायला जात असू. एकदा असेच गावाबाहेर मैदानावर गेलो होतो, तर अंधारात दूरवर पांढऱ्या आकृत्या अचानक प्रकट होऊन गायब व्हायच्या. मित्रांना दाखवल्या बरोबर ते खूप भ्याले व परत चला असे म्हणू लागले. इतक्यात एक शेतकरी त्या बाजूला चालला होता त्याला सावध केले तर तो म्हणाला मी कैक वर्षापासुन शेतात जातो इकडून रातच्याला.मला काही भ्याव नाही वाटत. मग मी त्याच्याबरोबर पुढे जाऊन या गोष्टीचा छडा लावायचा ठरवले.
साधारण एक किलोमीटर अंतरावर गेल्यावर खरा प्रकार लक्षात आला. गाव उंचावर वसलेले होते व वर येताना घाट होता. वाहने वळताना दिव्यांचा प्रकाशझोत काही झाडांवर पडत असे.‌लांबून झाडांतील फटीतील काही क्षणांचा प्रकाश उंच पांढऱ्या आकृती सारखा भासत असे.
मी परत रुमवर येईतो सर्व टेन्शन मध्ये होते. दुसऱ्या दिवशी त्यांना बळेच नेऊन खरं काय आहे ते दाखवले. यायला तयार नव्हते. आमचे एक रिटायरमेंट ला आलेले कोळीदादा अगोदर म्हणत होते अरे असे प्रकार असतात, आपण तिकडे पहायचं नाही. हे आजही आठवलं की हसायला येते. माझ्या उचापतखोर स्वभावामुळे काही मित्र तुटक वागू लागले पुढे पुढे.

२००५ सालची गोष्ट. आम्ही नवरा-बायको दोघे जण कुलदैवत दर्शनासाठी गेलो होतो. प्रथम जेजूरीला सकाळी पोहोचलो, स्टॅण्ड जवळच्या एका बऱ्यापैकी हॉटेल वर उतरलो व नंतर गडावर दर्शनाला गेलो. नंतर खाली आल्यावर मुक्काम करण्याऐवजी लगेच तुळजापूरला जायचे ठरवले. जेजुरी बारामती, इंदापूर असा बसने प्रवास सुरू होता. उशीर होईल म्हणून सोलापुरात मुक्काम करायचा ठरवले. सोलापूरला संध्याकाळी पोहोचलो. मित्राने सुचवल्यानुसार जवळच चांगल्या लॉजवर गेलो. जेवण करून रुममध्ये झोपी गेलो.
अचानक रात्री बारा साडेबारा वाजता मांजरीच्या जोरजोरात ओरडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. पाठोपाठ बाईच्या आवाजात आमच्या रुमचा दरवाजा जोरजोराने ठोठावत दार उघडा दार उघडा असा भयानक प्रकार सुरू झाला. बायको इतकी घाबरली की दरवाजा उघडू देईना. दहा पंधरा मिनिटे हा प्रकार चालू होता. दोघेही खूप टेन्शन मध्ये आलो होतो.
सकाळी रुम सोडून लगेच तुळजापूरला रवाना झालो. दर्शन आटोपून सरळ घराकडे जाणारी बस पकडली. आजपर्यंत परत कधीही लॉजवर राहिलो नाही व बायको बाहेरगावी यायला तयार नाही इतकी तिने धास्ती घेतलीय.

हिज हायनस,
सकाळी लाॕज मालकाकडे चौकशी केली का?

नाही निल्सन , बायको इतकी अपसेट होती की कधी बाहेर पडतो असं झालं होतं तिला. लॉजवर थांबण्याचा पहिलाच प्रसंग होता तिचा.

भुत्याभाऊ तुम्हाला दुखवायचे नव्हते पण नेमके त्याच दिवशी वाचली अन् उस्फुर्तपणे प्रतिसाद टंकून टाकला. तिकडे थोपूवर भुतांच्या बऱ्याच समुहावर पडीक असतो मी.

अरे वाह...आज बरेच किस्से वाचायला मिळाले..छान वाटले
>>>भुत्याभाऊ, कुठुनतरी कॉपी करताय ना
नवीन Submitted by सस्मित>>>
@ सस्मित...भुत्याभाऊ च्या वाचनात काही इंटरेस्टिंग आले की ते इथे पोस्ट करतात त्यामुळे आपल्यालाही वाचायला मिळते..हे त्यांनी पूर्वीच सांगितलेले..त्याच बरोबर स्वतः चे ही किस्से असतात त्यांचे.... वाचायला आवडते त्यांचे लिखाण ..
लिहीत रहा भुत्याभाऊ Happy

Pages