औद्योगिकरणाच्या विमानाचे कोसळणे टाळा! लेखक - अ‍ॅड. गिरीष राऊत

Submitted by नानबा on 29 May, 2018 - 08:40

औद्योगिकरणाच्या विमानाचे कोसळणे टाळा. औद्योगिकरणाचे विमान मानवजातीला व जीवसृष्टीला विनाशाकडे वेगाने नेत आहे. ते कोसळणार हे तर निश्चित आहे. ते कोसळण्याआधी सुरक्षितपणे उतरवावे. थोडक्यात क्रॅशलॅडिंग टाळावे. ते, त्यातील प्रवासी म्हणजे मानवजात वाचवण्यासाठी आवश्यक आहे.

औद्योगिकरण थांबण्याबाबतची भीती अनाठायी आहे. आजही औद्योगिकरण कुणालाही जगवत नाही. इतर प्राणिमात्रांप्रमाणेच मानवही हवा पाणी व अन्नामुळे जगतो. औद्योगिक उत्पादनांमुळे नाही. औद्योगिकरणामुळे जीवन संपुष्टात येणार हे नक्की झाल्यावरही ते चालू ठेवणे यामागे औद्योगिकरण जगवते असा निर्माण झालेला गैरसमज कारण आहे. आपण करोडो वर्ष पृथ्वीवर आहोत. औद्योगिकरण बुडबुड्यासारख्या अत्यल्प कालावधीत आले.
दारिद्र्य ही संकल्पना नीट समजून घेतली पाहीजे. ज्या पृथ्वीवर करोडो वर्षे हत्ती, गेंडा, व्हेल सारखे महाकाय जीव व्यवस्थित जगले ती पृथ्वी माणुस नावाच्या तुलनेने टीचभर पोट असलेल्या प्राण्याला जगवू शकत नाही काय ? जीवन व जीवनशैली यात गल्लत करू नये. पृथ्वी जीवनासाठी आहे. जीवनशैलीसाठी नाही. बाकी सर्व प्राणिमात्र उदरनिर्वाह करतात. आधुनिक माणुस नाही. तो कार, टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, फ्लॅट, बंगला, वीज इ. निर्वाह करतो. त्यासाठी पैसा लागतो. करोडो वर्षे व कृषियुगात हजारो वर्षे पैसा लागला नाही. तेव्हा माणुस जगत नव्हता काय?

हे माणसाचे भरकटणे झाले औद्योगिकरणामुळे. त्याच्या कृत्रिम जगण्यासाठी लागणारी वस्तुनिर्मिती व वापर पृथ्वीच्या पध्दतीच्या विरोधात आहे. ते केले गेले हीच मुळात चूक झाली.
पैशांचा अभाव म्हणजे दारिद्र्य काय ? मग ती गोष्ट मानवी व्यवस्थेशी संबंधित आहे. मानवी शोषण किंवा चूक त्याला कारण आहे. त्याचा पृथ्वी किंवा निसर्गाशी संबंध नाही.

१५० ते २५० वर्षात औद्योगिकरणाने दारिद्र्य दूर झाले नाही. उलट पृथ्वीची जीवांचे पोषण करण्याची क्षमता औद्योगिकरण शहरीकरण व अर्थव्यवस्थेमुळे नष्ट होत गेली. पृथ्वी बकाल होत गेली.
लढाया व युध्द ही मानवी मनातून घडतात. औद्योगिकरणामुळे कच्चा माल बाजारपेठांवरील ताबा इ. कारणांमुळे महायुद्धे झाली. तणाव वाढले. उदा. बंदुकनिर्मिती उद्योगाच्या हितसंबंधांमुळे अमेरिकेत दर वर्षी शाळा महाविद्यालयांतील हजारो तरूण गोळीबारात मरतात. अमेरिकेचे सुमारे ७५ ते ९० % उत्पन्न शस्त्रास्त्रांच्या निर्यातीतून येते. त्यामुळे जगात तणाव असण्यात त्या देशाचे व पर्यायाने औद्योगिकरणाचे हितसंबंध आहेत. हे फक्त एक उदाहरण आहे. यंत्र व तंत्रज्ञान जगात धुमाकूळ घालत आहे. धरणे, खाणी, वीजनिर्मिती, मोटार - वाहन निर्माण, सीमेंट, स्टील, रासायनिक खते, कीटकनाशके इ. यांच्यामुळे आपण जगतो काय ?
ही उत्पादने बनवणाऱ्या उद्योगांत नोकर्‍या करून चलन म्हणजे पगार मिळवणे व अशा व्यवस्थेसाठी मंत्रालये, महापालिका, काॅर्पोरेटस् चालवणे याचा खऱ्या जीवनाशी संबंध नाही. उलट हे कोट्यावधी वर्षे चाललेल्या जीवनाविरूध्द आहे. औद्योगिकरण सुरू होण्यापूर्वी कुणी बेकार नव्हता.

युनोच्या बाॅन येथे नोव्हेंबरमधे झालेल्या जागतिक वातावरण बदल परिषदेत हे जाहीर झाले की, यापृढे तापमान न थांबता वाढत राहणार आहे. मानवजात या शतकात नष्ट होत आहे. अशावेळी वातावरणातील साठलेला कार्बन पृथ्वीला निर्जीव करणार असल्याने नवे प्रकल्प तर सोडाच पण चालू औद्योगिकरण थांबवणे अनिवार्य बनले आहे. हा कार्बन शोषणारे हरितद्रव्य तात्काळ वाढू लागले पाहिजे. तरच जीवसृष्टी वाचण्याची शक्यता आहे.
अशावेळी नोकरी, उद्योग आपल्याला जगवतात या भ्रमामुळे ही समस्या कार्बनरहित तंत्रज्ञान वापरून सोडवता येईल असे वाटणे हे जीवनशैली व जीवन यात फरक न केल्याने घडत आहे. कोणतेही तंत्रज्ञान वाचवणार नाही.
मानवजातीला आता तातडीने अडीचशे वर्षे मागे जावे लागेल. मनात प्रगती व विकासाचे गंड बाळगले तर पृथ्वीवरून उच्चाटन अटळ आहे.
आजही सर्व औद्योगिक व इतर लोकसंख्या पृथ्वी जगवते. शहरे शेतीमुळे जगतात. पृथ्वी शेत पिकवते.
मात्र औद्योगिक जग क्षणोक्षणी पृथ्वीविरूध्द व तिच्या जीवन देण्याच्या क्षमतेच्या विरूद्ध वागते.
हे थांबवावे. शहरे विसर्जित करावी . प्रत्येकाने आपले अन्न स्वतः पिकवावे. तो पृथ्वीचा नियम आहे. त्याच्या विरोधात जाणारी आधुनिक मानवी व्यवस्था गुंडाळावी. ती भ्रामक व्यवस्था टिकवण्याच्या अट्टाहासाने पूर्ण विनाश ओढवेल.
धन्यवाद,

आपला
अॅड. गिरीश राऊत
निमंत्रक
भारतीय पर्यावरण चळवळ
९८६९०२३१२७ व्हाॅ. अॅप.
कृपया सर्वत्र पाठवा.

---------------------------
सदर लेख लेखकाच्या परवानगीने प्रसिद्ध केला आहे.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नानबा, तुमचं नक्की म्हणणं काय आहे ते कळलं नाही अजून. जरा स्पष्ट लिहिता का? ग्लोबल वाॅर्मिंग वगैरे ठिक आहे. या लेखात अतिशयोक्ती केलेली आहे असं म्हणू. तुम्हाला नक्की काय म्हणायचंय हे जाणून घ्यायला आवडेल

काय ती साठ सत्तर वर्षे दणकून जगा. इतरांनाही जगू द्या. उद्योगधंदे व्यवहार बंद पडले, तर मनुष्यप्रजातीचे मास एक्स्टीन्क्शन होईल. तसेही आजच्या काळात ९० टक्के वस्तू नसल्यातरी जगता येते. पण मग लोकांनी शेती करणे प्राण्यांसारखे जगायला सांगणे मूर्खपणा आहे. हे म्हणजे मधमाशीला, मुंगीला वसाहत सोडून एकट्याच भटका गं असं सांगण्यासारखं आहे.. इकोसिस्टीम नावाचा काही प्रकार असतो की नाही? पर्यावरणवाद्यांनी फार काळजी करु नये. कारण उपाय नाही काहीच. एखाद्या छोट्या देशात, एखाद्या शहरात पर्यावरणस्नेही यंत्रणा व जीवनशैली तयार झाली याचा अर्थ सगळ्या जगात होईल असे समजणे भाबडेपणाचे लक्षण आहे. मनुष्याच्या इको-फ्रेंडली किंवा इको-एनीमी कसल्याही वागण्याचा कोणताच चांगला प्रभाव पृथ्विमातेवर पडणार नाही. कारण लोकसंख्या.

मला सांगा हे महागाई दरवर्षी वाढत जाण्याचे काय कारण असते? दरवर्षी होणारी लोकसंख्या वाढ हे त्यातले सर्वात मोठे व महत्त्वाचे कारण आहे का?

राऊतांच्या लॉजिक मध्ये मोठे फ्लॉज आहेत, औद्योगीकरणाला कलप्रिट म्हणत सगळं खापर मागच्या अडीचशे वर्षातल्या यांत्रिक प्रगतीवर फोडत एका अतिशय कॉम्प्लेक्स प्रश्नाचे सहज सोपे ऊत्तर त्यांनी काढले आणि मग त्याची पाठराखण करण्यासाठी काही वेळा हास्यास्पद कारणीमीमांसाही त्यांच्याकडून होत आहे असे वाटू शकते.

https://www.youtube.com/watch?v=A24kLfRRTcw

पण त्यांचा मुद्दा (ह्या तोकड्या लेखावरून तर आजिबत नाही) अगदीच ऊडवून लावण्यासारखा नाही, त्यांनी जागतिक हवामान खात्याचा अहवालाचा दाखला देत काही फॅक्ट्सही मांडले आहेत( जे खरं तर नील डीग्रास टायसन 'युनिवर्स' मध्ये ही सांगतो ) हे खरे असले तरी त्याची कॉम्प्लेक्सिटी समजावून न सांगता त्यांच्या पुरते घाईघाईत सोपे ऊत्तर त्यांनी 'औद्योगिकरणाला आळा घाला', '१७५० च्या यंत्रपूर्व काळात जा' असे काढले आहे. मला वाटतं नुसते गांभीर्य पटवून देण्यासाठी काही तरी सनसनाटी ते बोलत आहेत पण त्याने काही फायदा न होता क्रेडिबिलिटी कमी होते आहे.

हायझेनबर्ग - मी पर्यावरण म्हणजे काय? आपली डीपेन्डन्सी कशी, आपण इम्पॅक्ट्कसे आणि का होतो, ग्लोबल वॉर्मिन्ग असे लिहून मग हा लेख टाकायला हवा होता असे मला च र्चा वाचून फार वाटले.
ह्या वर लिहा य ची गरज कळाली.
न जिक च्या काळात प्र यात्न क रते

ह्या प्रतिसादात मी फार काही वेगळे लिहिले आहे असे मला वाटत नाही, पण वरदाच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहीत असे जे २-३ जण म्हणाले त्या करता हा पोस्ट प्रपंच
--------------------------------------------
[वरदा]
१. औद्योगिकीकरण म्हणजे नक्की काय? का औद्योगिक क्रांती म्हणायचे आहे (ज्याला दोनेकशे वर्षे झाली आहेत)? औद्योगिकीकरणाची संथ प्रक्रिया त्या आधी कित्येक शतके चालूच होती.
[नानबा] वरदा, जमिनीच्या पोटात लाखो वर्ष आधी साठलेला कार्बन आपण रिलीज करायला सुरुवात झाली त्या आधीचा काळ. कारण ह्या कार्बन मुळेच अनेक अशक्य गोष्टी शक्य झाल्या (ज्या आज आपल्याला गरजेच्या वाटतात). ज्यामुळे विनाशाला सुरुवात झाली.
त्यांनी अडीचशे वर्षे म्हणाले, तू २०० म्हणालीस म्हणजे हा प्रश्न न विचारता मुद्दा लक्षात घेता येऊ शकला असता का?
----------

२. शेतीची सुरुवात तर सोडूनच द्या, पण अगदी भारतातही कमाल साडेपाच आणि किमान अडीच हजार वर्षांपासून शहरे, विविध स्पेशलाईज्ड उद्योगधंदे व त्यांचे उत्पादन उदयाला येऊन अखंडपणे सांस्कृतिक प्रक्रियांचा एक भाग आहे. खाणी वगैरे सुद्धा पाचेक हजार वर्षे अस्तित्वात आहेत. युद्धे अगदी आदिमानवापासून कायमच अस्तित्वात आहेत. नक्की काय सोडता येणार आहे यातलं? आणि कसं? जाणून घ्यायला अतिउत्सुक आहे.
>> [नानबा]वरच्या प्रश्नाच्या उत्तराने तुझ्या ह्या प्रश्नाचे उत्तर मिळाले का? पाचेक हजार वर्षापूर्वीच्या गोष्टींविषयी हे बोलत नाहियेत हे त्यांनी अडीचशे वर्षे म्हटल्याने स्पष्ट झाले आहे का?
-----
[वरदा]
३. अडीचशे वर्षे मागे जायचे म्हणजे नक्की कसे व कुठल्या गोष्टीत? अडीचशेच का? त्यात पहिली बाद जाणार ती वीज. आयुष्य वाचवणारी औषधे, वैद्यकीय तंत्रज्ञान, इत्यादि. ते का बाद करायचं? वीज नाही, सगळं स्वतःचं स्वतः करायचं, म्हणजे कोण करणार? बायका? मिक्सर सोडून रोज जात्यावर दळण दळणे, कपडे धुणे, भांडी घासणे, धान्य निवडणे, आणि अशी रोजची हजारो कामे कोण करणार? एलपीजी, पेट्रोल चालणार नाही. चुलीवर स्वैपाक करा (परत त्यात लाकडं जळून पर्यावरणाची हानी होणारच, कारण आजची लोकसंख्या, तेवढ्या गोवर्‍या मिळणारेत का? त्या धुराने सुद्धा प्रदूषण होतंच), चालत किंवा घोडागाडी बैलगाडीने जावा.
नानबा, तू करणारेस का? यातल्या किती गोष्टींना लागणारी उपकरणे तू वापरतेस? किती वापरत नाहीस? गाडी वापरतेस्/नाही/पब्लिक ट्रान्स्पोर्ट वापरतेस? (हा वैयक्तिक टीकेचा उद्देश नाही, तू हे सगळं इथे लेख टाकला आहे म्हणून विचारते आहे...) कामवालीकडून ही कामे करून घेणे म्हणजे शोषण आहे. सामाजिक विषमता यातून वाढीला लागते.
[नानबा]: कॉर्पोरेट सेक्टर मधे जे काम करतात त्यात आणि ते म्हणजे शोषण नाही असा समज आहे का? एखाद्याकडे आर्थिक सुबत्ता आली तर तो शोषणात नाही , असे नसते. कॉर्पोरेशन्स चा कारभार कसा चालतो, तो कुणाच्या बळावर चालतो, त्यात कसे कसे शोषण होते ह्यावर खूप डॉक्युमेंटेशन सापडेल शोधलेस तर.
बायदवे, स्वतःला सुधारण्यासाठी चाललेला प्रयत्न सगळ्यात मोठी लढाई असते. आणि जर मी संत असते तर हाच काय, कुठलाच लेख इथे टाकायलाही आले नसते. Happy
ब) औषधोपचारांसारख्या गोष्टी बाकीच्या सगळ्या गोष्टींवर काम केल्याशिवाय (अनलेस यू पर्फेक्ट युअर्सेल्फ ऑन अदर थिंग्ज) सोडूही नयेत असे माझे मत आहे.
मी पुन्हापुन्हा अनेक प्रतिसादात लिहिलं आहे की हे एका पिढीत एका टप्प्यात होऊ शकत नाही (प्रॅक्टिकली) - असे माझे मत आहे.(अनलेस समाजव्यवस्था राऊत म्हणताहेत त्या कारणाने कोसळली आणि उरलेल्यांना पर्यायच राहिला नाही.)
पण पॅरिस परिषदेतल्या म्हणण्यानुसार, १.५/२ पेक्षा जास्त टेम्परेचर झालं तर हाहाकार होणार आणि सध्याच्या मुळातल्या आणि "विकासाच्या" रेट ने हे किती दिवसात होईल हे गणित एखाद्या पुढच्या टप्प्यात मांडूया. मग मी म्हणतेय तसा पिढ्यांनपिढ्याचा वेळ असेल का?
------------------------------------------
[राऊत]:
<<यंत्र व तंत्रज्ञान जगात धुमाकूळ घालत आहे. धरणे, खाणी, वीजनिर्मिती, मोटार - वाहन निर्माण, सीमेंट, स्टील, रासायनिक खते, कीटकनाशके इ. यांच्यामुळे आपण जगतो काय ?
ही उत्पादने बनवणाऱ्या उद्योगांत नोकर्‍या करून चलन म्हणजे पगार मिळवणे व अशा व्यवस्थेसाठी मंत्रालये, महापालिका, काॅर्पोरेटस् चालवणे याचा खऱ्या जीवनाशी संबंध नाही. उलट हे कोट्यावधी वर्षे चाललेल्या जीवनाविरूध्द आहे. औद्योगिकरण सुरू होण्यापूर्वी कुणी बेकार नव्हता. >>
[वरदा] हे डोकं ठिकाणावर असल्याचं लक्षण आहे का? माओची सांस्कृतिक क्रांती, ख्मेर रूज वगैरेचे प्रयोग यांविषयी लेखक निरागसपणे अनभिज्ञ दिसतो आहे. त्या सगळ्या प्रयोगांचे अपयश का आणि कसे आले (राजकीय कारणे सोडून) यावर विचार केला तर बरं होईल.
[नानबा] आजच्या समाजव्यवस्थेचा विचार केला तर तू म्हणतेस ते खरे असेलही. पण गरिबी असली तरी प्रत्येकाला जगण्याचे काहीतरी साधन होते. आजचा माणूस जसा रहातो तसे रहाता नक्कीच येत नसले तरी गाडी, बंगल्यावर सुखी, समाधानी आयुष्य अवलंबून नसते (विशेषतः बाकीचा समाजही आपल्या सारखा असताना आणि त्यामुळे आपल्या aspirations च तशा नसताना. ) आजचे आपले चांगलं म्हणजे काय ह्याचे बरेचसे व्ह्युज सध्याची शिक्षण पद्धत , मिडीया आणि प्रगत देश काय करताहेत ह्याने शेप होतात.
टेक्नॉलॉजीने ह्या घडीला आयुष्य सोपे नक्कीच होते, पण ते सुखी होते, समाधानी होते, fulfilling होते असे म्हणायचे आहे काय?
मी तुला उलट प्रश्न विचारते. २०५० पर्यंत पेट्रोल संपले (ग्लोबल वॉर्मिंग नाही असे गृहीत धरून), इतरही काही स्ट्राँग पर्याय मिळाला नाही तर आज आपण सुरू केलेली समाजव्यवस्था, उद्योगधंदे वगैरे कोलमडेल/कोलमडतील, त्यात अनेक माणसांचा बळी जाईल. पण आयुष्य संपेल का? तसे नसल्यास का?
----------
[वरदा]
बरं लेखक स्वतः वकील आहेत. त्यांनी मग त्यांचा पेशा बंद केला आहे का? कारण त्या पेशाचाही 'खर्‍या जीवनाशी' संबंध नाही. जे आयटीत काम करतात त्यांचा ही नाही. जे शिक्षणक्षेत्रात आहेत त्यांचाही नाही. हे सगळं जस्टिफाईड आहे असं तुला म्हणायचं आहे का?
>> [नानबा] लेखकांशी बोलले. लेखक स्वतः कमीतकमी गरजात मुंबईतही रहातात. डहाणू इथे प्रत्यक्षही झाडे इत्यांदींचे काम करतात ( सामाजिक चळवळ, सरकार बरोबर, जनजागृती, प्रत्यक्ष काम ही करतात)
सद्यस्थितीत मेनस्ट्रीम आयटीचा आपल्या परिसराला प्रत्यक्ष काहीच उपयोग नाही हे माझे इथे काम करताना झालेले प्रामाणिक मत आहे.
राऊतांना हा प्रश्न विचारायचा राहिला, पण माझ्या ओळखीचे ह्या क्षेत्रात काम करणारे वकील फक्त निसर्ग वाचवण्यासाठी लागणार्‍या केसेस लढतात. हा पूर्ण वेळापेक्षाही मोठा जॉब होतो. तुमचे तत्त्व आणि पेशा एक असेल (निसर्ग वाचवणे) तर हा प्रश्न उपस्थित होऊ नये असे मला वाटते. हा समाजव्यवस्थेतील तृटींमुळे आलेल्या अपरिहार्यतेने करावा लागणारा संघर्ष/पेशा (त्याच व्यवस्थेविरुद्धतचा) आहे असे म्हणावे.

-----------------------------------------------
[वरदा]
किमान दिलीप कुलकर्णींनी जी जीवनशैली अंगिकारली आहे ती तरी लेखकांनी अंगिकारली आहे का? कुलकर्णी सुद्धा इतकं 'प्रीचिंग' करत नाहीत...... >> [नानबा] कुलकर्णींच मत ह्यापुढेही जाऊन वनाधारित शैली स्वीकारावी हे आहेत. हे सांगणारी त्यांची अनेक पुस्तके (उदा. निसर्गायण) , गतिमान संतुलनासारखे मासिक आहे.

वरदा, आयहोप तुझ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली आहेत.
तू मला साबणाबद्दल माहिती विचारलीस, ती मी विपूत दिली.

उत्तर देणारा एकच माणूस आणि प्रश्न विचारणारे अनेक, त्यामुळे त्या दोन दिवसात भंजाळले होते.
मी मुळातून लिहिण्याचा प्रयत्न करेन पुढच्याच्या पुढच्या लेखात. म्हणजे मला जितक्या ऑर्गॅनिकली कळत गेले तितके स्पष्ट करण्याचा प्रयत्न करेन.
जर स्टोरी ऑफ स्टफ ही डॉक्युमेंटरी बघता आली तर अवश्य बघा. काही गोष्टी कळतील त्याने. (सोपे, साधे, सरळ, थोडक्यात.)

स्कॉलरशिप परीक्षेच्या तयारीसाठी गाईड्स वापरताना आमचे एक शिक्षक नेहमी सांगायचे, “ही जी गाईड्स तुम्ही वापरताय ना, यातली प्रश्नोत्तरं पाठ करत बसू नका. हे गाईड आहे. हे फक्त तुम्हाला दिशा दाखवतं. रस्ता स्वत:ला शोधावा लागतो. म्हणून स्वत: विचार करायला शिका. दिशा तीच धरा, पण रस्ता आपला शोधा.”

नानबाच्या लेखात भले चुका असतील, कोणाला पटतील, कोणाला नाही. पण म्हणून शब्दश: चिरफाड न करता लेखकाला जे सांगायचं आहे, ते तत्व स्वीकारायचं की नाही हा प्रश्न आहे.

आता मी म्हणेन मुळात लेखाचं सार असं आहे की ‘अंदाधुंद प्रगती माणसाच्या मुळावर आली.’ खरं आहे. आवश्यकतेनुसार नैसर्गिक स्त्रोत वापरणं, पण न ओरबाडणं हा प्राण्यांनी अंगिकारलेला नियम. हा माणसांनी तोडला.

आपल्या आयुष्यातला एक एक दिवस जसा जातो, तसं आपण म्हातारे होत जातो. रोज सकाळी उठून आरशात पाहिल्यावर एका दिवसात किती म्हातारे झालो हे समजणार नाही; पण म्हणून आपण म्हातारे होत नाही असं मानणं चुकीचंच आहे. तसंच आपल्या अंगवळणी पडलेल्या सुखलोलुप आयुष्यामुळं पर्यावरणाचं काय नुकसान होतंय, हे लगेच समजत नाही.

‘नुकसान दिसल्यावर पाहू’, हा विचार घातक. ‘मी एकट्यानं करून काय होणार आहे? बाकीच्यांना पण करायला लावा की.’ हा विचार घातक.
या बाबतीत प्रामुख्यानं दोन प्रकारची माणसं दिसतात;
एक - आज आहे ते वापरुन टाका, उद्याचं कोणी पाहिलंय?
दोन - आज आहे ते जपून वापरा, वाढू द्या, भविष्यात आपल्याला पुरेल.

२०१५ च्या Lancet च्या आकडेवारीनुसार भारतातल्या एकूण मृत्यूंपैकी २५ टक्के प्रदूषणामुळं झाले. आता प्रदूषण का होत आहे आणि मी ते कसं कमी करीन हा प्रत्येकाचा प्रयत्न असावा. साध्या साध्या गोष्टी पहा – फटाके न वापरणे, जवळच्या जवळ चालत/सायकलवर जाणे, शक्य असल्यास लिफ्टऐवजी जिना वापरणे. वगैरे, वगैरे.

२०१६ साली वायू प्रदूषणामुळं १५ वर्षाच्या आतल्या ६ लाख मुलांचा मृत्यू झाला – WHO. जीवनपद्धती निवडण्याइतकी मोठी ही मुलं नक्कीच नव्हती. ज्या कोणी मुलं गमावली / गमावत आहेत, त्यांना आपण ओळखतही नसू. पण मग स्वत:ला अनुभव आल्यावरच ही गोष्ट सत्य आहे असं म्हणायचं का?

या अशा गोष्टी नाकारून ‘जे चाललंय ते चालू द्या’ म्हणणारा मोठा गट आहे. लोक साक्षर झाले, पण सुशिक्षित नाही. शासन कौशल्य विकासातून रोजगार वाढवत आहे. जगण्याचं कौशल्य वाढलं पण मूल्य हरपलं.

लोक देव मानतात. श्रद्धा नितांत असते. देवाला नमस्कार करतात. तो पोहचला की नाही? मी एकटाच कशाला करू? अशी शंका कोणाच्या मनात येत नाही. पण पर्यावरणासाठी काही करू म्हटलं की मी करून होणार आहे का? मी एकटाच कशाला करू? तुम्ही काय केलं? असे प्रश्न सुरू होतात.

मनस्ताप होतोच. विकास कशाला म्हणावं हे आजही कळालंच नाही. लाखो हेक्टर वनं विकासाच्या नावानं संपुष्टात आली. दुर्दैवानं रोज आपण खोल रुतत आहोत. यातून आता सुटका नाही हेच खरं.

लेखात इकडं-तिकडं झालंही असेल, पण जो काही प्रयत्न आहे त्यात स्वार्थ शून्य आहे. सर्वांचं भलं व्हावं म्हणून हा एक प्रयत्न आहे. म्हणून बेजबाबदार वागायचं की जास्त जबाबदारीनं वागायचं हे ज्यानं त्यानं ठरवावं. आपला पर्यावरणावरचा नकारात्मक भार शून्य तर नक्कीच होऊ शकत नाही, पण किमान तो कमी कसा होईल यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत.

कोणाला दुखावण्याचा हेतू नाही. तसं काही वाटलं तर क्षमा करावी.

या धाग्यावरच्या माझ्या आधीच्या पोस्ट्स वाचून मलाच गंमत वाटते आहे! आपले मत हे आपल्या ज्ञानाच्या मर्यादेत बांधलेले असते. As I extended my scope of knowledge I have very different understanding and opinions now! नानबा, तुझ्या मतांमागचे विचार आता मला अधिक चांगले कळताहेत आता Happy

आपले मत हे आपल्या ज्ञानाच्या मर्यादेत बांधलेले असते.>>>>

आजच्या दिवसात वाचलेले खूप चांगले वाक्य. ही जाणीव ज्याला आहे केवळ तोच आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्याचे प्रयत्न करू शकतो. बाकीचे एकदा मिळवलेल्या ज्ञानाच्या डबक्यात डुबक्या मारत राहतात.

>>आपले मत हे आपल्या ज्ञानाच्या मर्यादेत बांधलेले असते.<<

Along with knowledge, Conditioning plays a huge role here

अरिष्टनेमि प्रतिसाद आवडला.
वा जिज्ञासा , आवडले.
मला तर आपण ज्याला ज्ञान समजतो ती माहितीच असते असंही वाटतयं. अशातच वाचलयं All our knowledge is second hand , it is only information most of the time and can easily manipulated /changed/corrupted. विचार करतेयं !!! मत बनवता येत नाहीये.
ज्ञान म्हणजे माहितीपेक्षा अधिक असेल ना.... असं परिस्थितीनुरूप बदलणारे ज्ञान कसे असेल आपण ज्याला ज्ञान समजतो ती माहितीच असते फक्त कारण ज्ञान शाश्वत असेल , असायला हवं. Happy नाही तर फरक कसा करायचा. ज्ञान म्हणजे काय हे उरतेच ....
हे माझे चिंतन समजा !!
कुणाला आवडले/पटले नाही तर सोडून द्या प्लीज.

on another note - till date i never found any satisfactory explanation telling difference between Knowledge & Wisdom

>>आपले मत हे आपल्या ज्ञानाच्या मर्यादेत बांधलेले असते.<<
खरंय. ज्ञान म्हणा की माहिती म्हणा. जी गोष्ट माहितीच नाही / ज्या गोष्टीचं ज्ञानच नाही, त्याचा विचार मनात कसा येईल?

@ जिद्दु
गंमत करताय की गांभिर्यानं विचारताय? गांभिर्यानं विचारताय असं समजून या प्रश्नाचं उत्तर देण्याचा एक प्रयत्न करतो.
एक-दोन उदाहरणं पहा.

जनुकीय विश्लेषणासाठी सांभाळून ठेवायचं मांस ६० टक्क्यांपेक्षा जास्त तीव्रतेच्या इथेनॉलमध्ये ठेवतात. ही झाली माहिती.
आता असं मांस प्रत्यक्ष ठेवायची वेळ आली तेंव्हा इथेनॉल मिळालंच नाही. मग ते व्हिस्कीमध्ये ठेवलं आणि लगोलग विश्लेषणासाठी पाठवलं. हे झालं त्या व्यक्तिचं ज्ञान.

कोणाचा खून केला तर भारतीय दंड विधान कलम ३०२ नुसार जबर शिक्षा होते. ही झाली कायद्याची माहिती.
खून करूनही खुन्याला निर्दोष सिद्ध करणं. हे झालं त्या वकीलाचं कायद्याचं ज्ञान.

सूक्षद्रव्यांची कमतरता, पालाश कमतरता, अति उष्णता, क्षमतेपेक्षा जास्त फळ धारणा, पाण्याचा ताण, अशा अनेक कारणांनी कच्ची फळं गळून पडतात. ही झाली माहिती.
अचूक निदान करून फळगळ रोखणे हा ज्ञानाचा भाग.

शहरात अनेक डॉक्टर असतात. वैद्यकशास्त्राची माहिती सगळ्यांनाच असते. पण कधी कधी अगदी गैरसोय सोसूनसुद्धा आपण ठराविक डॉक्टरच का निवडतो? कारण ते ज्ञानी असतात.

पटतंय का?

@अरिष्टनेमि सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद. हो तुमचे knowledge + experience = wisdom विवेचन हा एक भाग झाला पण वरच्या प्रतिसादांतील ज्ञान,इन्फो,नॉलेज हे शब्द ऐकून माझ्या डोक्यात एपिस्टेमॉलॉजिचा भुंगा सुरु झाला होता म्हणून मी तो प्रश्न विचारला जो इथे तसा अस्थानी आहे. मला can a ignorant/less knowledgable person be wise irrespective of his experience ? असा प्रश्न पडला होता तसा.
https://plato.stanford.edu/entries/wisdom/

Pages