मुलींनी लग्नानंतर आपल्या आईवडिलांची जबाबदारी उचलणे योग्य का अयोग्य

Submitted by VB on 4 April, 2018 - 13:23

हल्ली मुली ह्या मुलां ईतक्याच स्वावलंबी आहेत

मुलगा असो वा मुलगी, आईवडील त्यांना घडविण्यासाठी, वाढविण्यासाठी, एक चांगली व्यक्ती बनविण्यासाठी सारखीच मेहनत घेतात. तर फक्त लग्न झाल्यावर मुलींना सासरी जावे लागते म्हणून मुलींच्या त्यांच्या पालकांप्रति असलेल्या सगळ्या जबाबदाऱ्या संपतात का? खासकरुन आर्थिक जबाबदाऱ्या.

माझ्या एका मैत्रिणीचे नुकतेच या कारणावरून ब्रेकअप झाले. तिच्यामते, जसे मी वर लिहीलेय, ईतके वर्ष ज्या आईवडिलांनी सांभाळले, आपल्या सर्व गरजा त्यांच्यापरीने भागविल्या. त्यांना त्यांच्या उतारवयात मदत करणे आपले कर्त्यव्य आहे. तसे तिने आपले हे मत तिच्या मित्राला आधीही सांगितले होते पण त्याने ते तितकेसे गांभीर्याने घेतले नाही. पण आता जेव्हा दोघे लग्नाचा विचार करीत होते तेव्हा त्याने तिला स्पष्ट सांगितले की जर तिला त्यांना आर्थिक सहाय्य करायचे असेल तर त्याच्या काही अटी आहेत, त्याची ह्याबाबत काही वेगळी मते आहेत, जे तिला पटले नाही अन हिचे म्हणणे त्याला पटले नाही. आणि झाले काय, यावर काहीच तोडगा निघाला नाही म्हणून दोघांनी वेगळे व्हायचा निर्णय घेतला अन एक नाते खऱ्या अर्थाने सुरु व्हायच्या आधी संपले.

तसे पाहता मला दोन्ही बाजू नीट माहित नाहीत, म्हणून मला कुणीच चुकीचे किंवा बरोबर वाटत नाही, पण वाईट मात्र वाटले.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बरंच झालं वेळीच वेगळे झाले ते. ह्यातूनच माणसाचा स्वभाव कळतो. दोघांनी मिळून एकत्र निर्णय घ्यायला हरकत नाही पण जर ती स्वतः कमावती आहे तर तिच्या आईवडिलांना गरज असल्यास त्याला मध्ये पडायची काहीच गरज नाही.

सायो,

नाही, तिच्यामते तिच्या आईवडिलांना गरज असो वा नसो, पण तिला त्यांना मदत करायची आहे तर त्यात कुणी आक्षेप का घ्यावा

ज्याचा त्याचा प्रश्न.
आपण आपली जवाबदारी मुलांवर कमीतकमी पडेल अशी काळजी घेण्याचा प्रयत्न करायचा.

सायोचा प्रतिसाद शम्भर टक्के पटला. मी आता divorced आहे, पण माझ्या पुर्वीच्या नवर्याचे मत वेगळे नव्हते ह्या बाबतीत. मी कसलीही जबाबदारी घेऊ नये असेच त्यालाही वाटायचे. ह्यावरुन खूप वाद झाले अन मी वेगळे व्हायचे ठरविले. हे एक्च कारण नव्हते हे ही खरेच. माझी मुलगी या बाबतीत माझ्यापेक्षा शहाणी. आधीच ठरवून सान्गून टाकले की तिच्यावर तिच्या आईची जबाब्दारी आहे, तेव्हा मागाहून या बाबतीत वादावादी नको. लग्न जमले आणि झाले. अमितवचे मत ही पटले. मी अशीच काळजी घेते.

अर्थातच योग्य! ज्या माणसाला यात आक्षेप घ्यावासा वाटला अशा संकुचित वृत्तीच्या माणसाशी नातं जुळल नाही हे उत्तम झाले...

से पाहता मला दोन्ही बाजू नीट माहित नाहीत, म्हणून मला कुणीच चुकीचे किंवा बरोबर वाटत नाही, >> दोन्ही बाजू जरी माहित नसल्या तरी मुलींनी आई वडिलांनी / भावंडांना मदत करण्याबाबत तुमचं स्वत:च काय मत आहे ?

अगदी योग्य आहे. आई वडीलांना गरज असो वा नसो...आई-वडीलांची काळजी घेणे जसे मुलाचे तसेच मुलीचेही कर्तव्य आहे. त्यात पतीला आक्षेप असायचे काहीच कारण नाही.

मुलींनी आई-वडिलांना मदत करावी का? अर्थातच होय. कधी, किती, कशी ह्याचा विचार नवर्‍याशी सामंजस्याने व्हायला हवा. "जबाबदारी"ची व्याख्या प्रत्येकाची वेगळी असते. काहींना आपला अन्नखर्च भागला की सारे इतरांवर खर्च करायचा सेवाभाव असतो. (ह्यात सासर ते सामाजिक संस्था सगळ आलं). तर काहींना आपल्या चौकोनी कुटूंबाबद्द्ल अधिक आर्थिक बांधिलकी वाटते. "तू आपले दोघांचं/मुलाबाळांचे घर चालव, मी माझ्या आई-वडिलांच्या घरचा खर्च करणार" हे पटणारा मुलगा किंवा मुलगी सापडणे कठीण. असे सुजनही आहेत पण तिथे पोहचेपर्यंत एक-दोन ब्रेक-अप झाले तर आश्चर्य नाही. मुलगी मिळवती नसताना तिचे पालक आपलेच समजून सांभाळणारे ही असतात.

>>आपण आपली जवाबदारी मुलांवर कमीतकमी पडेल अशी काळजी घेण्याचा प्रयत्न करायचा.
Submitted by अमितव>> हे ही बरोबर.
तुमचं मत काय आहे ह्याबाबत?

मुलींनी लग्नानंतर आपल्या आईवडिलांची जबाबदारी उचलणे हा पुर्ण पणे तिचा स्वःताचा निर्णय असेल तर त्याला कोणाचा ही आक्षेप नसावा.
१. मुलीने तिने कमावलेल्या पैश्याचा एक भाग आपल्या आईवडिलां करिता खर्च केल्यास त्यास नवरा वा बॉयफ्रेन्ड चा आक्षेप असण्याच कारण नाही.
२. आईवडिलां वर जबाबदारीच्या द्रुष्टीने केला जाणारा खर्च हा वायफळ प्रकारातील नसावा, तो योग्य असा असावा उ.दा. औषध, घरखर्च, कपडे इ.
त्याच एक कारण अस की मुलगी/ बायको जेव्हा कमावती असते तेव्हा सर्वसाधारण एक दिलासा असतो की दर महीना त्यांच कुटुंबा करिताच सेव्हींग जास्त होइल. एक प्रकारे त्या सामाइक सेव्हींग मधील एक भाग जेव्हा दुसरीकडे जाणार अस दिसल्यास थोडस विरोध होण्याची शक्यता असते. पण केला जाणारा खर्च जर योग्य आणि गरजे पुरता आहे अस दिसल्यास तेही सपोर्ट करु शकतात.
३. पुरुष जेव्हा त्याच्या आईवडिलांवर खर्च करतो तेव्हा नवरा बायको मध्ये थोडाफार वाद होतोच अस काही ठीकाणी दिसत.. तसा वाद मुलीने खर्च केल्यास होइल असे आपेक्षित धरुन चालावे, व वाद झाल्यास तो कसा सोडवता येइल ते पाहाव .. व योग्य सुर्वण मध्य साधावा...

पॉईंट २ पटला नाही.काय पटलं नाही हे नीट लिहिता यावं म्हणून जराशाने लिहिते. पण तिथेही मला नवर्‍याची परवानगी असणं गरजेचं आहे असं दिसतंय.

@सयो..
पॉईंट २ मध्ये नवर्‍याची परवानगी असणे गृहित नाही. पण त्याला विश्वासात घेउन मी केलेला खर्च हा योग्य आहे अस दाखवल्यास त्याचा अक्षेप नक्कीच नसेल.

मला अस वाटत.. की जेव्हा नवरा व बायको दोघेही कमावते असतात तेव्हा, महीना सगळा खर्च वजा जाउन जे काही उरत ते त्या कुटूंबाच सेव्हींग असेल, त्यातुन त्याच्या किंवा मुलीच्या कोणाच्याही आई वडीला वर होनारा खर्च हा एकमेकांच्या सहमतीने झालेला उत्तम..

सहमती नसेल तरी खर्च नका करु अस नाही... कारण तो पुर्ण पणे तिचा निर्णय असेल..

ऋन्मेऽऽष - हा हिशोब एवढा सरळसोट नाहीये.

उद्या मुलीने लग्नानंतर आपल्या आईवडीलांची जबाबदारी उचलली. अगदी तितकीच जितकी तिचा भाऊ ऊचलत आहे. पण उद्या आईवडिलांपश्चात त्यांची प्रॉपर्टी वगैरे काही असेल ती भावालाच मिळाली, तिला नाही. तर हा तिच्यावरच नाही तर तिच्या नवर्‍यावरही अन्याय होईल.

स्त्री पुरुष समानतेच्या लॉजिकने जर नवरा आपल्या आईवडिलांची जबाबदारी उचलत असेल तर बायकोलाही त्या प्रमाणात आपल्या आईवडीलांची जबाबदारी उचलायचा हक्क हवाच. तसेच जर काही वडिलोपार्जित संपत्तीचा बटवारा होणार असेल तर तो भाऊ बहिण सर्वांमध्ये त्या हिशोबात झाला पाहिजे. मुलीचे लग्न करून दिले, जबाबदारी संपली, आता तिचा या घरावर हक्क नाही असे नसावे. माझ्या ओळखीत असे बरेच भाऊ आहेत ज्यांची बहिण वडिलोपार्जित संपत्तीत वाटा मागायला येताच जळू लागते.

आता एकूणच याबाबत कायदा काय बोलतो ते एखादा मायबोलीकर वकीलच चांगले सांगू शकतो.

माझ्या केस मध्ये मी कसा वागेल हे मी सांगू शकत नाही. कारण माझ्या केसमध्ये तशी वेळच येणार नाही. भावी सासर्‍यांची गडगंज संपत्ती आहे. तेच अडीअडचणीला मला पोसतील. पण तरीही कधी दिवस फिरलेच तर मला माझ्या बायकोने माहेरी मदत केल्याचे काहीच वाटणार नाही. कारण प्रामाणिकपणे सांगायचे तर आयुष्यात पुढे मागे पैश्याची अचानक गरज पडल्यास, आणि ते आपल्याकडे नसल्यास सासर्‍याकडून मदत होईल ही अपेक्षा मी ठेवतोच. मग त्याउलट वेळ आल्यास अप्पलपोटेपणा कसा दाखवू... Happy

उद्या आईवडिलांपश्चात त्यांची प्रॉपर्टी वगैरे काही असेल ती भावालाच मिळाली, तिला नाही. तर हा तिच्यावरच नाही तर तिच्या नवर्‍यावरही अन्याय होईल. >> मूळात मदत म्हणून केलं तर त्याच्या बदल्यात काही नाही मिळणार हे डोक्यात पक्कं पाहिजे. आधी मदत करतो मग प्रॉपर्टी मागायची/आशा ठेवायची हे काही बरोबर नाही. आई-वडिलांनी, भावाने प्रेमाने प्रॉपर्टीत हिस्सा द्यावा हे ठीक. पण ते देणार नसतील तरी शक्य ती मदत मुलीने करावी. मुलीची आर्थिक परिस्थिती नसेल तर करू नये. पण उगाच प्रॉपर्टीच्या आशेने मदत करू नये.

प्रॉपर्टी असली तर त्या आई वडिलांना आर्थिक मदतीची गरज नाहीच लागणार ना? घर विकून, रिव्हर्स मॉर्गेज काढून राहू शकतील ते. आता मानसिक/ प्रेमाची गरज/ मदत तशी माणसं असली तर करणार ना!. त्यांनी त्यांच्या आयुष्यात जी काही कर्म केली असतील त्या प्रमाणे अशी माणसं असतील किंवा नसतील.
उन्हे अपने हालात पे छोड दो. आपल्याला जज करण्यासारखं काहीही नाही. कर्मा यु नो! विल गेट यु.

मूळात मदत म्हणून केलं तर त्याच्या बदल्यात काही नाही मिळणार >>>> हे मुलीला लागू, पण तिचा नवरा असा का विचार करेन. तो सहज स्वार्थी विचार करू शकतो की मी माझ्या आईवडिलांची जबाबदारी उचलतोय, उद्या त्यांच्या पश्चात त्यांची प्रॉपर्टी माझीच आहे. पण माझी बायको तिच्या आईवडिलांची जबाबदारी उचलतेय, पण त्यांच्या पश्चात तिला काही नाही मिळणार. ईथे समानता गंडत नाही का? याऊपर तरीही नवरा ती परवानगी देत असेल बायकोला तर मग तो त्याचा मोठेपणा झाला नाही का? प्रत्येक नवर्‍याने असा मोठेपणा दाखवावा ही अपेक्षा मला चूक वाटते.

प्रॉपर्टी असली तर त्या आई वडिलांना आर्थिक मदतीची गरज नाहीच लागणार ना? घर विकून, रिव्हर्स मॉर्गेज काढून राहू शकतील ते.
>>>>>
हे एवढे सोपे गणित नाहीये. अजून काय किती जगायचे आहे आणि भविष्यात काय वाढून ठेवले आहे याची कल्पना नसताना कोणी सहजी आपली प्रॊपर्टी डावावर लावू ईच्छिणार नाही. स्वत:ची पेंशन, घर भाड्यावर लावा, मुलाकडून गरज पडल्यास मदत, निवृत्तीनंतर मिळलेल्या रकमेची छोटीमोठी गुंतवणूक यावर बरेच लोकं विसंबून असतात. आणि हो, प्रत्येकाला गुंतवणूकीचे मार्गही माहीत नसतात, भल्याभल्यांना याबाबत अक्कल नसते.

पॉपर्टी असलेल्या माणसाला डाउनसायझिंग करण्यासाठी प्रोफेशनल हेल्प मिळू शकते. असलेले पैसे, महगाईचा दर, वार्षिक खर्च, अकस्मात उदभवू शकणारे खर्च आणि सरासरी मरणाचे वय... याद्वारे पॉपर्टी असलेला माणूस भविष्याची काही तरी तजवीज लावू शकेल असं वाटतं.

आणि स्वतः कमावलेल्या पैशातून बांधलेले घर स्वतःच्या जगण्याच्या खर्चासाठी डावावर न लावता दुसऱ्याकडे (पार्टनर सोडून कोणीही) पैशासाठी कोणी हात पसरत असेल आणि मग त्याला कोणी मदत केली नाही तर हे ती व्यक्ती कोणत्या तोंडाने बोलते?
राजीखुशीत कोण काय करतंय हा ज्याचा त्याचा प्रश्नच आहेच.

आई वडिलांची जबाबदारी उचलणे अयोग्य होउच शकत नाही. जमेल तशी मदत करणच योग्य आहे.
मुलीची आर्थिक मदत आणि भविष्यात कधी तिला प्रॉपर्टीमधे मिळणारा वाटा ह्याचा संबध नसावा नाहीतर प्रॉपर्टी नसलेल्या आईवडिलांना कोणीच मदत केली नसती.
आई-वडिलांनी, भावाने प्रेमाने प्रॉपर्टीत हिस्सा द्यावा हे ठीक << आई वडिलांच्या प्रॉपर्टीत मुलीला हिस्सा द्यायचा की नाही हे मुलगा ठरवत नाही आई वडिल ठरवतात ना ?

जर मुलगा त्याच्या आईवडीलांची जबाबदारी घेवु शकतो हे जसे गृहित आणि सर्वसमाज मान्य आहे तर मुली का नाही? कमावती मुलीला हा हक्क असावाच. त्यात कोणाचाही आक्षेप
नसावा / च. ह्यात वायफळ खर्च वा कसा ते इतरांनी जज करायचे कारण नाही.
नसेल कमवत मुलगी( वा मुलगा( होमहसबंड)) तर आपसात निर्णय घ्यावा किती, कसा वगैरे.
आणि कायद्याने, आई वडीलांची प्रॉपर्टीत मुलीला समान हक्क आहे. भाउ कधीच ठरवु शकत नाही बहिणीला द्यायचा की नाही भाग. आई वडीलांनी तशी नोंद वा इच्छा ( विल) जाहिर केली असेल की मुलीला मिळणार नाहि तर नाही मिळणार.
बाकी, मरण कसे असेल ह्यावर कोणीच सांगु शकत नाही.
आणि आपले म्हातारपण सूद्ध्हा.

व्यव्स्थित व भरपूर पैसा गुंतवलेला असताना, माझ्या साबु ह्यांचे आजारपणात त्यांचाच पैसा कमीच पडला. आम्ही दोघांनी सुद्धा खर्च केला( माझी व नवर्‍याची जमा असलेली मिळकत). अजून त्यातून आम्हीच उभारतोय. ज्यांना भाउच नसतो त्या मुलींनी अश्या जुनाट बुरसट विचारांखाली ,आपल्या आई वडीलांना असे टाकू शकत नाहीच सहसा.

दोघेही कमावते असल्यास त्या दोघांच्या संसाराचा खर्च भागला कि उरलेल्या पैशातून दोघांनाही आपापल्या आई-वडिलांवर त्यांच्या त्यांच्या गरजेनुसार ( गरज असेल तर ) खर्च करायला काहीच हरकत नसावी किव्वा तो करावाच . दोघांच्या पालकांनी आपापल्या मुलांना वाढवलेल असत / शिक्षणावर खर्च केलेला असतो त्यामुळेच मुलीने /बाईने लग्नानंतर हि स्वतःच्या आईवडिलांवर खर्च केल्यास पुरुषाचा काहीच आक्षेप नसावा आणि उलट बाजूने हि तेच लागू पडत . बायकोलाही नवर्याच्या आई-वडिलांवर खर्च झाल्यास आक्षेप नसावा . अगदी त्या बागवान सिनेमासारखं होऊ नये . वडिलांच्या चष्म्याचा खर्च पण मूल करत नाहीत असं .
या घटनेमध्ये मध्ये मुलगी कमावती आहे म्हणून तर आक्षेप असण्याच कारणच नाही पण मुलगी कमावती नसेल तर ? आणखीन काहीतरी वेगळीच केस बनू शकते

पॉपर्टी असलेल्या माणसाला डाउनसायझिंग करण्यासाठी प्रोफेशनल हेल्प मिळू शकते.
>>>
हे बहुतेक काही करोडोंची प्रॉपर्टी असलेल्या माणसाला लागू होईल. बहुतांश समाज जो टिपिकल मध्यमवर्ग आहे अश्यांना प्रोफेशनल हेल्पच्या नादात फसवणूकीचाच सामना जास्त करावा लागेल, वा ती भिती राहील. तसेच आपले कल्चर पाहता मुलांना तुमचे तुम्ही बघा, आमच्या प्रॉपर्टीची आमच्या हिशोबाने विल्हेवाट लावत आमचे आम्ही बघतो असे सहजी होतही नाही.

येनीवेज, मुळात आईवडिल मुलांवर अवलंबून आहेत वा नाहीत, वा त्यांनी तसे राहू नये, त्यांनी भविष्याचा विचार करून तजवीज आधीच करावी वगैरे मुद्दे योग्य असले तरी या चर्चेत वेगळेच झाले. अशी आदर्श स्थिती नाहीये, आता मुलांवर काही बाबतीत, काही अंशी अवलंबणे आहेच तर त्या अनुषंगाने सांभाळणारे मुलगा विरुद्ध मुलगी यावर ही चर्चा आहे.

मुलीची आर्थिक मदत आणि भविष्यात कधी तिला प्रॉपर्टीमधे मिळणारा वाटा ह्याचा संबध नसावा नाहीतर प्रॉपर्टी नसलेल्या आईवडिलांना कोणीच मदत केली नसती.
>>>>>
ईथे एक गल्लत होतेय. प्रॉपर्टीत हिस्सा मिळाला तरच मदत करावी असे म्हणत नाहीये. पण जर मुलीने लग्नानंतरही आईवडिलांना आर्थिक मदत करावी या समाजाच्या अपेक्षा आहेत तर त्याच समाजाने प्रॉपर्टीतही मुलीला हक्क दिलाच पाहिजे. ईथे समाजाचा ओवरऑल विचार करा, घर बाय घर, जिथे हिस्सा तिथेच मदत असा विचार करू नका.

त्यातही मुलीने आईवडिलांच्या प्रॉपर्टीच्या "अपेक्षा" ठेवाव्यात का नाही हा मुद्दाच निकालात गेला पाहिजे. तसा कायदाच हवा की तिचाही मुलाप्रमाणेच प्रॉपर्टीत हक्क हवाच! नक्की काय कायदा आहे याची मला कल्पना नाही.

तसेच आईवडिलांना देखील मुलीला डावलून मुलालाच सर्व प्रॉपर्टी देता आली नाही पाहिजे. कारण आपल्याकडे आणखी एक मेंटेलिटी असते. मुलगा म्हणजे आपले आडनाव लावणारा, आपला वंश वाढवणारा, मग प्रॉपर्टी आपल्याच वंशात राहायला हवी.. गावची जमीन आहे, ती दुसर्‍या घरी गेलेल्या मुलीला कशी द्यायची. ती जमीन आपला वंशवेल वाढवणार्‍या मुलालाच द्यायला हवी...
जो समाज या विचारांचा आहे त्याने मुळातच मुलीने आपल्या म्हातारपणी आपली जबाबदारी उचलावी ही अपेक्षा करू नये.

ऑन अ सिमिलर लाइनः
बहिणीच्या लग्नानंतर केवळ मीच आईवडिलांची जबाबदारी का उचलू, असे मुलाचे म्हणणे योग्य का अयोग्य?

नसल्या तरी मुलींनी आई वडिलांनी / भावंडांना मदत करण्याबाबत तुमचं स्वत:च काय मत आहे ?
>>>>
माझे मत, अर्थात, मलाही वाटते की आपले आईवडील हि आपली जबाबदारी आहे अन ती आपण स्वच्छेने पार पाडावी, मनाविरूद्ध नाही.
माझ्या स्वतःच्या बाबतीत सांगायचे तर माझा भाऊ माझ्या आईवडिलांची पूर्ण जबाबदारी घ्यायला समर्थ आहे आणि ती घेतोय सुद्धा. तरीही मी, त्यांची मोठी मुलगी आहे , म्हणून मी स्वतः त्यांची सर्वदृष्ट्या जबाबदारी घेतलीच आहे. अन तेही कुठलीही अपेक्षा न ठेवता. मला वाटते आपले पालक हे दोघांची जबाबदारी आहे. जसे मुलाने आपल्या आईवडिलांची काळजी घेणे, त्यांच्या गरजा भागविणे योग्य आहे तसेच हेही. जर मुलगा आपल्या आईवडिलांवर त्यांच्या गरजेनुसार खर्च वा मदत करतोय त्याला त्याच्या पत्नीचा आक्षेप नसावा अन जर हीच मदत ती तिच्या आईवडिलांना करतेय तर त्याला प्रॉब्लेम नसावा.

आता, आपल्या म्हातारपणाची आर्थिक तजवीज आधीच करण्या बाबत, तर प्रत्येकाला हे शक्य असतेच असे नाही, अन मुलींचे आईवडील तर बरेचदा हाच प्रयत्न करतात की त्यांची जबाबदारी त्यांच्या मुलीवर येऊ नये, जेणेकरून तिच्या संसारात काही प्रॉब्लेम येऊ नये. म्हणून मुलीने त्यांनी तसे काही सांगायची वाट न पाहता स्वतः ती जबाबदारी घ्यायला हवी

हा धागा काढण्यामागे माझे एकच प्रयोजन होते की मला काही इतर मते जाणून घ्यायची होती.

जे काही घडले त्यामुळे सध्यातरी माझी मैत्रीण खूप दुःखी आहे, कारण शेवटी तिला एक चॉईस करावा लागला अन त्यामुळे तिने त्याला गमावले. अर्थात अजूनही असतील काही कारणे जी आम्हाला माहित नाही. अन कालांतराने ती यातून बाहेरही पडेल.

वाचतेय. बहुतेकजणांनी भाऊ ग्रुहित धरलाय... दोन बहिणी किंवा अनेक बहिणीच असतील तर .... माझ्या मैत्रिणीबद्दल सांगते.
माझी मैत्रिणी व तिच्या दोघी बहिणींनी वडिल गेल्यानंतर एकटं राहणं शक्य नव्हतं तेव्हा जबाबदारी वाटून घेतली आहे. चार चार महिने एकीकडे राहतात सोय पाहून प्रत्येकीच्या सोयीने. आर्थिक काही प्रॉब्लेम नाही. त्या 84 वर्षाच्या आहेत व मुली 55 च्या वर. वाढलेलं आयुर्मान हा एक मुद्दाही आहे. तर त्याकाळी आमच्या आईवडिलांची जबाबदारी आमच्या तिघींची असं काही सांगून किंवा ठरवून लग्न ठरवली जात नव्हती , पध्दत नव्हती. मुलीच्या की मुलाच्या पालकांची जबाबदारी घ्यायची वेळ येईल हे लग्न ठरवताना सांगू शकत नाही..... भविष्याचा फारसा विचार केला जात नव्हता. पण कालांतराने दोन्ही आईवडिलांमध्ये फारसा फरक राहत नाही.... हे सहवासाने जुळून येतं.... हे होत नसेल तर चूक दोन्ही बाजूने असणारे. आपला भार आपल्या मुलांवर शक्यतो पडू अशी काळजी घेतच असतात. अपवाद असतातच. आपण म्हणतोच ना की हे लग्न म्हणजे दोन व्यक्ती नव्हे तर दोन कुटुंबाची सोयरिक असते...... त्या मुलाचं ह्या मुलीवर खरं प्रेम असेल तर हे मान्य करावं हेमावैम ..

जे घडले ते वाईट झाले.
पण ही मतं लग्नाआधी कळून निर्णय घेता आला हे जास्त महत्वाचे.बरेचदा लग्नापूर्वी 'तुमचे आईवडील ते आमचेच्,त्यांच्यासाठी आम्ही हवे ते करु' वगैरे बाता मारुन नंतर मदतीची वेळ आल्यावर आक्षेप घेणे हे होऊ शकते.लग्नाच्या बोलण्यात मुलगा/मुलगी/त्यांचे नातेवाईक हे सगळेच आपले एक गुडीगुडी/पूर्ण प्रामाणिक नसलेले आकर्षक चित्र तयार करत असतात.त्याच्या आड पाहणे/असे चित्र तयार न करता पूर्णपणे ट्रू आणि तरीही समोरच्याला त्याने डिल स्विकारण्यासाठी स्वतःला स्वभावाने आकर्षक वाटवणे हे खूप कमींना जमते.

बाकीचे 'तुम्ही लग्नाच्या वेळी मारे हे बोलला होतात. आणि आता बघा, उज्जेड!' म्हणून ऑकेजनली भांडत बसलेले असतात Happy
तिने बरोबर चॉइस केला.मैत्रिणीला लवकर यातून सावरुन दुसरा समजून घेणारा पार्टनर लवकर भेटण्यासाठी शुभेच्छा!

लांतराने दोन्ही आईवडिलांमध्ये फारसा फरक राहत नाही.... हे सहवासाने जुळून येतं.... हे होत नसेल तर चूक दोन्ही बाजूने असणारे. आपला भार आपल्या मुलांवर शक्यतो पडू अशी काळजी घेतच असतात. अपवाद असतातच. आपण म्हणतोच ना की हे लग्न म्हणजे दोन व्यक्ती नव्हे तर दोन कुटुंबाची सोयरिक असते...... त्या मुलाचं ह्या मुलीवर खरं प्रेम असेल तर हे मान्य करावं हेमावैम ..>>>>>

सहमत.

दोघांचे एकमत नसलेल्या विषयावर सामंजस्याने निर्णय घेता आला नाही, नाते तोडावे लागले यावरून हे नाते आज तुटले नसते तरी पुढे जाऊन भविष्यात त्रासदायक ठरले असते हे निश्चित. दुःखात हेच सुख पाहून मैत्रिणीने पुढे जावे यासाठी शुभेच्छा!!!

Pages