निरोप - स्वानुभव

Submitted by द्वादशांगुला on 23 February, 2018 - 10:36

नमस्कार माबोकरांनो! किती दिवसांपासून मी आजच्या दिवसाची वाट पाहत होते, तो आजचा दिवस उजाडलाच. काहीशी हुरहुर, उत्साह मनात घेऊनच आजच्या दिवसाची तयारी मी केली. सार्या गोड कटू आठवणींचं गाठोडं घेऊन पुढे जायचंय. आयुष्याचं एक पान संपल्यातच जमा झालंय. हे पान म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात नकळत्या वयात येणारं नि नकळतच निघून जाणारं शालेय जीवन. होय, यंदा मी दहावीत आहे. शेवटचं शाळेचं वर्ष. आज आमच्या शाळेचा निरोपसमारंभ पार पडला . आज माझ्या खूशीचं कारण होतं की शाळेला आमच्या वर्गातर्फे मी शाळेवर केलेल्या कवितेची फ्रेम एक आठवण म्हणून देणार होतो. हे आम्हाला सर्प्राईज द्यायचं होतं शाळेला. कुठल्या शिक्षकांना हे माहीत नव्हतं. वर आम्ही काही भाषणही देणार होतो. मी थोड्या जड मनाने, थोड्या उत्साहात ठीक साडेतीनला शाळा गाठली.

आणि पुढे जे घडलं ते अविश्वसनीय, सुखद धक्का देणारं होतं. मी शाळेत प्रवेश केला, अन् पाहते तर काय , माझीच कविता सुवाच्च अक्षरात शाळेच्या मुखदर्शनी लावलेली होती. अन् खाली माझं नाव.....! सुखद धक्का होता तो माझ्यासाठी. जणू तरंगतच पायर्या चढून वर गेले नि आमच्या मुख्याध्यापिका भेटल्या. त्या हसत म्हणाल्या," बघ तुम्ही देणार होतात ना शाळेला सर्प्राईज, आम्हीच दिलं तुम्हाला." आयुष्यातलं मोठ्ठं सर्प्राईज आहे ते माझ्यासाठी. आयुष्यात कायम लक्षात राहिल असं.

मग भाषणाचे सोपस्कार पार पडले. खुद्द शाळेच्या संचालकांनीही माझं कौतुक केलं. करियर गाईडन्सचं लेक्चर झालं, नि हा औपचारिक सोहळा बघता बघता पार पडला. मिठाईने तोंड गोड करून शाळेला कायमचा निरोप दिला. किती पटकन संपतो ना वेळ....

पण मी हे माबोकरांना का सांगतेय, तर नकळत सापडलेल्या मायबोलीशी थोड्याच वेळात अनोखं नातं जोडलं गेलंय. लेखनातल्या चूका थोड्या थोड्या समजायला लागल्यात. चूका दुरूस्त करणारे नि मनापासून प्रतिसाद देणारे सख्ख्या नातलगांसारखे माबोकर मिळालेत. आतापर्यंत शाळेने माझ्यातल्या लेखनाच्या सुप्त गुणांना वाव दिला, नि म्हणून इथे लिहू शकले. अशा या शाळेबद्दल माबोवर लिहिलं नसतं, तर पापच लागलं असतं मला. नि माबोवर हे शेअर करावसं वाटलं, म्हणून रखडलेले हे दोन शब्द.

आता म्हणाल ही दहावीची मुलगी तोंडावर परीक्षा आलीय नि लिहीत काय बसलीय. चार तास रखडून दोन पानं अभ्यास करण्यापेक्षा मला त्यातल्या अर्ध्या तासात काहीतरी लिहून मन प्रसन्न झाल्यावर उरलेल्या साडेतीन तासांत दहा पानं अभ्यास करायला आवडतो. तरी परीक्षा पाच दिवसांवर आलीय. अभ्यास तर हवाच ना. चला , शाळेला कायमचा नि माबोला तूर्तास तरी महीनाभर निरोप. पुन्हा भेटू २२ मार्चनंतर, माझे पेपर आटोपल्यावर. सुट्टीत भरपूर लिहीन. आत्तातरी टाटा........... Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

दहावीच्या परीक्षेमध्ये मिळविलेल्या घवघवीत यशाबद्दल हार्दिक अभिनंदन जुई ! पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ! Happy

अरे, तुम्ही ईतक्या लहान आहात असे वाटले नव्हते. तुमचे लिखाण वाचून तर नक्कीच नाही. छान लिहिता. असेच लिहित रहा हो नेहमी. पुढील सर्व वाटचालीसाठी शुभेच्छा! लिहायचे मात्र सोडू नका.

Pages