निरोप - स्वानुभव

Submitted by द्वादशांगुला on 23 February, 2018 - 10:36

नमस्कार माबोकरांनो! किती दिवसांपासून मी आजच्या दिवसाची वाट पाहत होते, तो आजचा दिवस उजाडलाच. काहीशी हुरहुर, उत्साह मनात घेऊनच आजच्या दिवसाची तयारी मी केली. सार्या गोड कटू आठवणींचं गाठोडं घेऊन पुढे जायचंय. आयुष्याचं एक पान संपल्यातच जमा झालंय. हे पान म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात नकळत्या वयात येणारं नि नकळतच निघून जाणारं शालेय जीवन. होय, यंदा मी दहावीत आहे. शेवटचं शाळेचं वर्ष. आज आमच्या शाळेचा निरोपसमारंभ पार पडला . आज माझ्या खूशीचं कारण होतं की शाळेला आमच्या वर्गातर्फे मी शाळेवर केलेल्या कवितेची फ्रेम एक आठवण म्हणून देणार होतो. हे आम्हाला सर्प्राईज द्यायचं होतं शाळेला. कुठल्या शिक्षकांना हे माहीत नव्हतं. वर आम्ही काही भाषणही देणार होतो. मी थोड्या जड मनाने, थोड्या उत्साहात ठीक साडेतीनला शाळा गाठली.

आणि पुढे जे घडलं ते अविश्वसनीय, सुखद धक्का देणारं होतं. मी शाळेत प्रवेश केला, अन् पाहते तर काय , माझीच कविता सुवाच्च अक्षरात शाळेच्या मुखदर्शनी लावलेली होती. अन् खाली माझं नाव.....! सुखद धक्का होता तो माझ्यासाठी. जणू तरंगतच पायर्या चढून वर गेले नि आमच्या मुख्याध्यापिका भेटल्या. त्या हसत म्हणाल्या," बघ तुम्ही देणार होतात ना शाळेला सर्प्राईज, आम्हीच दिलं तुम्हाला." आयुष्यातलं मोठ्ठं सर्प्राईज आहे ते माझ्यासाठी. आयुष्यात कायम लक्षात राहिल असं.

मग भाषणाचे सोपस्कार पार पडले. खुद्द शाळेच्या संचालकांनीही माझं कौतुक केलं. करियर गाईडन्सचं लेक्चर झालं, नि हा औपचारिक सोहळा बघता बघता पार पडला. मिठाईने तोंड गोड करून शाळेला कायमचा निरोप दिला. किती पटकन संपतो ना वेळ....

पण मी हे माबोकरांना का सांगतेय, तर नकळत सापडलेल्या मायबोलीशी थोड्याच वेळात अनोखं नातं जोडलं गेलंय. लेखनातल्या चूका थोड्या थोड्या समजायला लागल्यात. चूका दुरूस्त करणारे नि मनापासून प्रतिसाद देणारे सख्ख्या नातलगांसारखे माबोकर मिळालेत. आतापर्यंत शाळेने माझ्यातल्या लेखनाच्या सुप्त गुणांना वाव दिला, नि म्हणून इथे लिहू शकले. अशा या शाळेबद्दल माबोवर लिहिलं नसतं, तर पापच लागलं असतं मला. नि माबोवर हे शेअर करावसं वाटलं, म्हणून रखडलेले हे दोन शब्द.

आता म्हणाल ही दहावीची मुलगी तोंडावर परीक्षा आलीय नि लिहीत काय बसलीय. चार तास रखडून दोन पानं अभ्यास करण्यापेक्षा मला त्यातल्या अर्ध्या तासात काहीतरी लिहून मन प्रसन्न झाल्यावर उरलेल्या साडेतीन तासांत दहा पानं अभ्यास करायला आवडतो. तरी परीक्षा पाच दिवसांवर आलीय. अभ्यास तर हवाच ना. चला , शाळेला कायमचा नि माबोला तूर्तास तरी महीनाभर निरोप. पुन्हा भेटू २२ मार्चनंतर, माझे पेपर आटोपल्यावर. सुट्टीत भरपूर लिहीन. आत्तातरी टाटा........... Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

रश्मी, मंजूताई.. Happy अशा उदयोन्मुख, उत्साही लेखिकांना प्रोत्साहित करायलाच हवे, नाही का...!!
थँक यू. Happy

जुई (इतकं छान नाव आहे तुझं... उगीच ते द्वादशांगुला लिहितेस ) .... तुझं लिखाण वाचलंय आणि खरंच वयाच्या मानाने तुझे विचार प्रगल्भ वाटतात... गोड धक्का दिलास...

परीक्षेसाठी आणि लिखाणासाठी शुभेच्छा ... सुट्टीत लेखन अन वाचन दोन्ही जप ...

अरे वाह!
जुई तू तर सिक्रेट सुपरस्टार निघाली.
परिक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा

अरे वा! दहावीला असशील असं तुझं लेखन वाचुन अजिबात वाटलं नव्हतं.
लहान मुलं मायबोलीवर लिहिती झालेली बघुन छान वाटतंय. तु आणि अजुन कुणीतरी बारावीत आहे ना?
हल्लीच वाचल्यासारखं वाटतंय कुणीतरी बारावीच्या परेक्षेबद्दल लिहिलेलं.
छानच. अशीच लिहित रहा. आणि परीक्षेसाठी शुभेच्छा.

:O एवढी छोटी मुलगी माबोवर!

वाटलं नव्हतं तुझं लेखन वाचून कि तू एवढी लहान असशील. छान लिहितेस. लिहित रहा.

परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा!

'एक संध्याकाळ ' सारखी थरारक कथा लिहणारी व्यक्ती
दहावीतली मुलगी असेल असं चुकूनही वाटलं नव्हतं.
जुई तुला शुभेच्छा, तुला तुझ्या शब्दांच हवं असलेलं आभाळ लवकर कवेत येवो.

नमस्कार मंडळी. आज झाले माझे सर्व पेपर. तुमच्या सर्वांच्या कृपेने आणि आशीर्वादाने उत्तम गेले सारे. तुम्हा सर्वांनी केलेल्या कौतुकाबद्दल आणि दिलेल्या शुभेच्छांबद्दल अगदी आभाळ भरून धन्यवाद बरं का....

तुम्हा सर्वांनी दाखवलेल्या आपुलकीने आणि मायेने मी अगदी हरखून गेलेय. आणि मी काही एवढं वाखाणण्याजोगं खास लिहीत नाही हो.... अजून बरंच सुधारायचंय लिखाण. पण तुमच्यासारख्या लिखाणात अन् वाचनात मुरलेल्या मातब्बरांना माझं किडूकमिडूक लेखन आवडलं, हेच माझ्यासाठी भलंमोठ्ठं बक्षीस आहे.

सुट्टी तर पडलीय. छानपैकी समुद्रावर भटकून येताना वाचायला दोन पुस्तकंही आणलीयत. लिहायलाही पोतंभर कल्पना सुचतायेत. सुट्टीत बरंच लिहिण्याचा आणि लिखाण अजून सुधारण्याचा प्रयत्न करेन.

आपली,
द्वादशांगुला. Happy

वा मस्तच.लवकर लिही.वाट बघतेय तुझ्या लेखनाची. सस्मितताई बारावीत मी आहे.आता ह्या धाग्यावरचे प्रतिसाद वाचले.

जुई (इतकं छान नाव आहे तुझं... उगीच ते द्वादशांगुला लिहितेस ) ... >>>>>> त्याचंपण मोठ्ठं रामायण आहे माझ्या जन्मापासूनचं. शेक्सपिअर म्हणाला होता की नावात काय आहे; पण मेरे नाम मे बहोत कुछ है! Wink

दोन्ही नावं छानच आहेत ग तुझी .फक्त जुई टाईप करायला कमी वेळ लागतो.तुझे लेख मात्र मस्त असतात.खूप छान आणि सहज लिहीतेस तू.वाचल्यावर खूप छान वाटत.आता सुट्टीत भरपूर लिही.

बारावीत मी आहे.>>>>>> हम्म तुझे पेपर आमच्या आधीच संपले होते ना? छानच गेले असतील तुलापण. सुट्टीत तूही लिहीत जा. तुझी लिखाणाची शैली चांगली आहे. तुझ्या प्रतिसादांवरून लगेच जाणवतं.
साॅरी इथे टाकतेय पण विपुचा काहीतरी प्राॅब्लेम झालाय....

हो.अगं छानच गेले पेपर.मागच्या मंगळवारी संपले. विपुचा खरच प्राॅब्लेम झालाय.रिप्लाय देता येत नाहीये विपुमध्ये आलेल्या प्रतिसादावर.

अगं पानाच्या शेवटी 'जाण्याची नोंद' च्या वरती जे 'माझे सदस्यत्व' आहे तिथे जाऊन बघ.बहुतेक तिथे दिसेल.मलाही तिथेच गेल्यावर दिसलेल.किंवा "नवीन मायबोली सुधरण्यासाठी" नावाचा अॅडमीन यांचा धागा आहे.तिथे तुझ्या प्राॅब्लेमच योग्य सोल्यूशन मिळेल.

तुझ्या द्वादशांगुला नावाचं ओरिजीन बहुतेक संस्कृत असाव.कारण आठवीत असताना एक श्लोकात या शब्दाची संधी वाचलेली. द्वादशः+अंगुली अशी होती बहुतेक.

अग तू 'बेधुंद लहरी' नावाच्या अॅप वर साक्षी कदम नावाने लिहीतेस का???
जर लिहीत नसशील तर तुझी 'बिर्यानी' नावाची कथा तिथे कोणीतरी साक्षी कदम नावाच्या लेखिकेने कानामात्र्यासहीत सेम टू सेम काॅपी केली आहे. अगदी तळटीप सुद्धा सेम आहे.
साक्षी कदम तूच असशील तर ठीक आहे.नाहीतर व्हेरीफाय करायला 'बेधुंद लहरी' अॅप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड कर आणि त्यातल्या कथा- कादंबरी विभागात वाच.मला लिंक देता येत नाही. म्हणून इथे दिली नाही.आणि नेक्स्ट टाईम काळजी घे.
(खाली च्रप्स यांनी दिलेल्या लिंक वर वाच)

अरे बापरे! जुई, जरा नेटाने ( हाहा) सोक्षमोक्ष लाव बरं या लेखनचोरीचा! कमाल आहे!
तुम्हा दोघींची परीक्षा छान झाली हे मस्तच! आता खुप एन्जॉय करा!

मायबोलीवर? >>>>मायबोलीवरील म्हणायचे आहे का?>>>>>>>> हां तेच ते.. जरा पॅनिक झालेय. सुचत नाहीये. एकतर लिखाण टाकलंय इथे नि समाजकंटक चोरी करतायेत लेखनाची.

पण मायबोलीवर अशी काही सुरक्षिततेची सोय उपलब्ध आहे का?

शाब्बास.चांगल केलस.पॅनिक होऊ नकोस. काय रिप्लाय आला ते पण सांग. दुसर्याच लेखन आपल्या नावाने खपवून त्यावर प्रतिसाद घ्यायला लोकांना काहीच कस वाटत नाही.अजिबात घाबरू नकोस.तसच जर पुरावा सिद्ध करायचा झाला तरीही तारखेप्रमाणे तूच आधीलिहील आहेस हे दिसत आहे.त्यामुळे लेखनचोरी आहे हे स्पष्ट दिसतय.दुसर्याची प्रतिभा चोरायला लाज वाटली पाहिजे. इथे लेखन सुरक्षित करायला काही सुविधा असेल तर कोणीतरी सांगा. तू पुढच्या वेळी लेखाच्या खाली नाव टाकत जा.
(जर तिथून नसेल हटवली तर त्या अॅपच्या मालकाला मेल करून बघ.किंवा ते फेसबुकवर आहेत तिथे पोस्ट लिही त्यांना.)

Pages