आपणा सर्वांना शब्दरुपी तिळगूळ देउन सादर करीत आहे या लेखमालेतील ८वा लेख...
* * *
पहाटेचे पाच वाजलेत. तुम्ही मस्तपैकी साखरझोपेत आहात. नित्यनेमाने तुमच्या मोबाईलमधील गजर सकाळी साडेसहाला वाजणार आहे. पण आज अचानक फोनच्या रिंगने तुम्ही दचकून जागे होता. गजर झालाय की फोन वाजलाय या संभ्रमात तुम्ही फोन उचलता. पलिकडून एकजण घाईघाईत उत्तेजित स्वरात तुम्हाला सांगतो, “अरे, काकांना आत्ताच अॅडमिट केलंय, आयसीयूत ठेवलंय, तू लगेच निघ”. तुम्हाला त्याच्या परिस्थितीची जाणीव होते आणि तुम्ही तडक तिथे जायला निघता.
मग त्या हॉस्पिटलात घाईत शिरून आयसीयूच्या बाहेरच्या खोलीत पोचता. तिथे ‘काकां’चे काही आप्तेष्ट आधीच पोचलेत. त्यातला एकजण तुम्हाला त्याने आताच खालच्या फार्मसीतून ‘ते’ पाच अंकी रुपयेवाले भारी इंजेक्शन आणून नर्सला दिल्याचे कौतुकाने सांगतो. बाकी एक-दोघे मोबाईलवरून नातेवाइकांना खबर देत आहेत. दरम्यान काकांच्या मुलाने ‘भारत विमा कं’ च्या एजंटला फोन लावलाय आणि तो त्याला “काय ते तुमचे बघा, सर्व काही कॅशलेस व्हायला पाहिजे”, असे खडसावून सांगतोय.
तिकडे आयसीयूच्या आत ते काका बेडवर पहुडले आहेत. त्यांच्या हातात सलाईनच्या नळ्या आणि छातीवर जेलीचा ओलावा या अवस्थेत अनेक वायरींच्या जंजाळात आणि मॉनिटर्सच्या गराड्यात ते झोपलेले दिसताहेत. हॉस्पिटल स्टाफची आत-बाहेर धावपळ चालू आहे.........
मित्रहो, हा वरचा प्रसंग काय तुम्हाला चित्रपटातला वाटतोय का? अंहं ! हा तर तुमच्या-माझ्या घरीदारी, शेजारीपाजारी कधीना कधी हमखास घडणारा प्रसंग आहे. कदाचित आपल्यातील कुणाच्या वाट्याला त्यातल्या रुग्णाची भूमिकासुद्धा वाट्याला आली असू शकेल. या प्रसंगातल्या रुग्णाला हृदयविकाराचा झटका आलेला आहे. या आजाराचे शास्त्रीय नाव आहे Myocardial Infarction (MI). Myocardium = हृदयाचे स्नायू आणि Infarct = मृत पेशींचा समूह. एखाद्या करोनरी रक्तवाहिनीत झालेल्या गुठळीने होणारा हा आजार.
MI चे निदान डॉक्टरला अत्यंत जबाबदारीने करावे लागते. रुग्णाच्या बाजूने त्याला भावनिक आणि आर्थिक पैलू असतात. या घटनेपूर्वीचा आणि नंतरचा ‘तो’ यात बऱ्यापैकी गुणात्मक फरक पडणार असतो. एकूणच त्याच्या कुटुंबातली ही मोठी घडामोड असते. तर एखाद्याच्या बाबतीत अशा पहिल्याच तीव्र झटक्यात त्याचे आयुष्यही संपू शकते.
तर हे महत्वाचे निदान करताना रुग्णतपासणी बरोबर रक्तचाचण्या, इसीजी आणि इतर काही चाचण्या तातडीने केल्या जातात. त्यापैकी ‘ट्रोपोनिन’ या प्रथिनाची रक्तपातळी मोजणे ही अत्यंत महत्त्वाची चाचणी होय. तिच्या रिपोर्टवर तुम्ही रुग्णावर MI चे शिक्कामोर्तब करणे हे बरेचसे अवलंबून असते.
मग काय आहे हे ‘ट्रोपोनिन’ प्रकरण? नादमधुर नाव असलेले हे प्रथिन नक्की कुठे असते व काय करते? पुढचा सर्व लेख त्यासाठीच समर्पित आहे.
या विषयाचे चार भागात विभाजन करतो:
१. ट्रोपोनिन : स्नायूंमधले एक प्रथिन
२. ट्रोपोनिनची रक्तपातळी आणि MI चे निदान
३. ट्रोपोनिनच्या मर्यादा आणि
४. MI च्या रक्तचाचण्या : आढावा
ट्रोपोनिन : स्नायूंमधले एक प्रथिन
आपल्या शरीरात तीन प्रकारचे स्नायू असतात. त्यांच्या अधिकृत नावांना आपण थोडी लाडिक मराठी नावे देऊ:
• skeletal muscle = हाडस्नायू ( म्हणजे biceps वगैरे)
• cardiac muscle = हृदयस्नायू आणि
• smooth muscle = मऊस्नायू ( म्हणजे ‘आतड्याचे’ वगैरे)
यापैकी हाड- व हृदयस्नायूंमध्ये ट्रोपोनिन हे प्रथिन असते आणि ते त्यांच्या आकुंचनात मदत करते. त्या दोन्ही ठिकाणच्या ट्रोपोनिनमध्ये थोडाफार फरक असतो. इथे आपण फक्त हृदयस्नायूंमधील ट्रोपोनिनचाच (cardiac Tn) विचार करणार आहोत.
या ट्रोपोनिनचे तीन प्रकार असतात: T, I व C. त्यापैकी T व I हेच फक्त MI च्या निदानामध्ये उपयुक्त असतात. निरोगी अवस्थेत ट्रोपोनिन हे स्नायूंच्या पेशींमध्ये भरपूर असते तर रक्तात अत्यल्प प्रमाणात. जेव्हा रुग्णास MI होतो तेव्हा ठराविक हृदयपेशी मरतात आणि त्यांच्यातले ट्रोपोनिन रक्तात सोडले जाते. म्हणून अशा वेळी आपल्याला त्याची रक्तपातळी वाढलेली दिसते. ही वाढीव पातळी ठराविक दिवस टिकून मग कमी होत जाते.
ट्रोपोनिनची रक्तपातळी आणि MI चे निदान
करोनरी हृदयविकाराची लक्षणे असणारा रुग्ण जेव्हा दाखल होतो तेव्हा तातडीने त्याचे रक्त घेतले जाते आणि त्यातील हृदय-ट्रोपोनिनची पातळी मोजली जाते. त्यासाठी ट्रोपोनिनच्या T किंवा I या दोन प्रकारांपैकी कुठलेही एक निवडता येते. संबंधित प्रयोगशाळेचा तो निर्णय असतो. याच्या जोडीला रुग्णाचा इसीजी पण काढला जातो. या दोन्ही तपासण्या महत्वाच्या आहेत. तरीही ट्रोपोनिनची चाचणी ही इसीजीला काहीशी वरचढ मानली जाते. किंबहुना एवढे महत्वाचे निदान हे एकाच चाचणीवर करायचे नाही असा दंडक आहे.
MI चे निदान करण्यासाठी त्याची सार्वत्रिक व्याख्या करण्यात आली आहे ती अशी:
MI चे शिक्कामोर्तब करण्यासाठी खालील गोष्टींची पूर्तता व्हायला हवी:
१. रक्तातील पुरेसे वाढलेले ट्रोपोनिन
आणि
२. खालीलपैकी किमान एक घटना :
अ) करोनरी-विकाराची विशिष्ट लक्षणे रुग्णात दिसणे
आ) इसीजीतील विशिष्ट बदल किंवा
इ) हृदयाच्या ‘इमेजिंग’ तंत्राने मिळालेला पुरावा
वरील व्याख्येतून ट्रोपोनिनच्या चाचणीला सर्वोच्च महत्व दिले आहे हे लक्षात येते. या लेखाची व्याप्ती ट्रोपोनिनपुरती मर्यादित आहे.
सध्या प्रयोगशाळेत हृदय-ट्रोपोनिन मोजण्याचे अतिसंवेदनक्षम तंत्रज्ञान उपलब्ध आहे. त्यामुळे रुग्णास त्रास झाल्यापासून तीन तासांच्या आतच ट्रोपोनिनचे वाढलेले प्रमाण दिसून येते. या अद्ययावत तंत्राने MI चे निदान लवकर करणे शक्य झाले आहे.
ट्रोपोनिनची रक्तचाचणी दोन प्रकारे करता येते:
१. रुग्णाचे रक्त काढून ते प्रयोगशाळेत पाठवणे. तिथे रीतसर ट्रोपोनिनचे प्रत्यक्ष प्रमाण मोजले जाते. ते विशिष्ट ‘कट-ऑफ’ च्यावर असले की मग MI चे निदान पक्के होते.
२. थोड्याशा रक्तावर रुग्णाच्या वार्डातच छोट्या स्ट्रिपवर झटपट चाचणी करणे. यात ते वाढलेले आहे किंवा नाही आणि असल्यास त्याच्या प्रमाणाची अंदाजे माहिती मिळते.
वरील दोन्हींमध्ये अर्थातच पहिला प्रकार श्रेष्ठ आहे.
ट्रोपोनिनच्या मर्यादा
एखाद्या रोगनिदानाची निर्णायक चाचणी कोणती असते? तर अशा रक्तघटकाची चाचणी की जो फक्त एकाच रोगात वाढतो आणि अन्य कुठल्याही रोगात नाही. पण बऱ्याच चाचण्या या निकषाला १००% उतरत नाहीत. ट्रोपोनिनही त्याला अपवाद नाही. MI व्यतिरिक्त हृदयस्नायूला अन्य मार्गाने इजा झाल्यासही ते वाढते.
तसेच पूर्णपणे वेगळ्या रोगांतही ते वाढते, उदा.: फुफ्फुस-रक्तप्रवाहाचा आजार, दीर्घकालीन मूत्रपिंड विकार, काही केमोथेरपीचे दुष्परिणाम, इ. म्हणूनच MIचे निदान करताना नुसते ‘वाढलेले ट्रोपोनिन’ एवढा निकष पुरेसा नसतो तर, विशिष्ट ‘कट-ऑफ’ च्यावर ते वाढलेले लागते.
MI च्या रक्तचाचण्या : आढावा
१९६०पासून MIच्या निदानासाठी विविध रक्तचाचण्या प्रचलित आहेत. सुरवातीस रक्तातील काही एन्झाईम्स मोजली जात. प्रथम खूप उपयुक्त वाटलेल्या एखाद्या एन्झाइमच्या मर्यादा नंतर स्पष्ट होत. मग एकेक एन्झाइम मागे पडे व नवे त्याची जागा घेई. आता ती जागा ट्रोपोनिनने पटकावली आहे. गेली सुमारे २५ वर्षे ही चाचणी वापरात आहे. त्यात अनेक सुधारणा होत आज हृदय-ट्रोपोनिन मोजण्याचे अतिसंवेदनक्षम तंत्रज्ञान उपलब्ध झाले आहे. आजच्या घडीला तरी ही सुयोग्य चाचणी आहे. अर्थात विज्ञानात ‘अंतिम’ असे काहीच नसते. त्यामुळे १००% ‘स्पेसिफिक’ चाचणीचा शोध अजूनही चालू आहे. त्यासाठी काही नव्या रक्तघटकांवर संशोधन चालू आहे. भविष्यात त्यातून काही निष्पन्न होईल अशी आशा आहे.
************************************************************************************************************
@srd ( https://www.maayboli
@srd ( https://www.maayboli.com/node/83838 या धाग्यावरुन)
MI नंतर एकदा ह्रदय ढासळलं की ते पूर्वीसारखं सक्षम होत नाही असं समजून आहे. ते खरं आहे का? >>>
MI च्या उपचारानंतर हृदय निरोगी अवस्थेइतके संपूर्ण कार्यक्षम तर होणार नाही हे उघड आहे. त्याची कार्यक्षमता किती राहील हे खालील घटकांवर अवलंबून असेल :
१. अटॅक आल्यानंतर रुग्णालयात पोचून उपचार सुरू होईपर्यंत किती कालावधी जातो हे अत्यंत महत्त्वाचे आहे. एक तासात उपचार सुरू झाल्यास ते सर्वोत्तम ठरते.
2. या घटनेनंतर हृदयाच्या डाव्या जवनिकेचे (ventricle) कार्य किती टिकून राहते. हिचे काम संपूर्ण शरीराला शुद्ध रक्त पंप करणे हे असते.
३. रक्त पातळ करणारी जी औषधे दिलेली असतात ती रुग्णागणिक कमीजास्त प्रमाणात लागू पडतात.
४. वय : याच्याशी कार्यक्षमतेचे नाते अर्थातच व्यस्त राहील.
५. मधुमेह : आहे/ नाही; अल्पकालीन/ दीर्घकालीन हाही महत्त्वाचा घटक.
छातीमध्ये वेदना जाणवण्याची
छातीमध्ये वेदना जाणवण्याची बरीच कारणे आहेत. मग आता हार्ट अटॅकची वेदना नक्की कशी असते हा महत्त्वाचा प्रश्न.
सर्वसाधारणपणे त्या वेदनेचे वर्णन असे करता येईल :
१. तीव्र असते; एकदा दुखू लागल्यावर सुमारे अर्धा ते एक तासपर्यंत ती थांबत नाही.
२. ती छातीच्या मधोमध जाणवते. परंतु त्याचबरोबर मान, खांदा, जबडा किंवा डावा हात या भागांमध्येही ती पसरू शकते.
३. वेदना नक्की कशी असते ? छातीच्या मधोमध कोणीतरी वजन ठेवल्यासारखे वाटणे / किंवा पिळवटले जाणे / नुसतेच दुखणे किंवा जळजळणे.
४. काहींच्या बाबतीत पोटाच्या वरच्या भागात अस्वस्थता आणि वात अडकल्याची भावना देखील जाणवू शकते.
..
दीर्घकालीन मधुमेहीच्या बाबतीत वेदना जाणवतेच असे नाही.
हृदयात क्वचित अचानक काही
हृदयात क्वचित अचानक काही काळासाठी जाणवणार्या धडधडीचं Palpitations काय कारण असेल? त्यावर विशेष लक्ष द्यायची गरज असते का?
छातीतली धडधड क्वचित होत असेल
छातीतली धडधड क्वचित होत असेल तर ते काही आजाराचे लक्षण नाही. मात्र वारंवार होऊ लागल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
सर्वसाधारणपणे धडधड होण्याची कारणे अशी असतात :
* मानसिक ताणतणाव आणि खूप काळजी करण्याचा स्वभाव
* मनोविकार
* ॲनिमिया, थायरॉईड अधिक्य
* हृदयाचे विविध आजार
*मादक पदार्थांचे सेवन (amphetamine, cannabis).
अच्छा. धन्यवाद!
अच्छा. धन्यवाद!
धागा आणि प्रतिसाद पुन्हा एकदा
धागा आणि प्रतिसाद पुन्हा एकदा वाचले. खूपच उपयुक्त माहिती कुमार सर! आणि शशांक पुरंदरे यांच्या धाग्यामुळे हि माहिती इतकी महत्वाची आहे कि त्यामुळे जीव सुद्धा वाचू शकतो हे अधोरेखित झाले.
परवा ऑफीसच्या टीम मध्ये एक दुर्दैवी घटना घडली. माझ्याच टीममधला एक सदस्य मुंबईत क्लाएंट ऑफिसमध्ये जाण्यासाठी नेहमीप्रमाणे बाहेर पडला. लोकलमध्ये खूप गर्दी आणि शिवाय एसी बंद होते. त्यामुळे लोकलमधून उतरून स्टेशनवर बाहेर आला तेंव्हा घामाने थबथबला होता. रिक्षा करून क्लाएंट ऑफिसमध्ये पोहोचला. लिफ्टने दहाव्या मजल्यावर गेला तेंव्हासुद्धा घामाने निथळत होता. त्या ऑफीसमधल्या लोकांनी त्याबाबत विचारले. तर हा म्हणाला कि लोकल मध्ये गर्दी प्रचंड होती शिवाय एसी बंद होते म्हणून घाम आलाय. तरीही त्यांनी त्याला खाली सातव्या की कोणत्या मजल्यावर जाऊन तपासणी करायला सांगितले. तिथे क्लाएंट कंपनीचेच कर्मचाऱ्यांसाठीचे मेडिकल सेंटर होते. तिथे हा एकटाच विनासायास गेला. चेकप केले. ईसीजी काढला. सर्व पॅरामिटर्स तपासून तेथील डॉक्टरनी सर्वकाही ठीक असल्याचे सांगितले. तितक्यात पुढच्याच दोन ते तीन मिनिटात हा चक्कर येऊन पडला. शुद्ध हरपली. ताबडतोब ऍम्ब्युलन्स बोलवून त्याला मोठया हॉस्पिटलमध्ये तातडीने घेऊन गेले. पण तिथे त्याला दाखल करून घेण्यापूर्वीच मृत घोषित केले. नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला होता. हे सगळे इतक्या अनपेक्षित आणि तडकाफडकी घडले की ती बातमी कळताच सगळे हादरले. पूर्ण दिवसभर कुणाचाही त्या बातमीवर विश्वास बसला नाही. वय अवघे तिशीच्या आसपास असेल!
तेंव्हा मला हे दोन धागे प्रकर्षाने आठवले. काही प्रश्न मनात आले:
१. कोणतीही वेदना वगैरे होत नसताना फक्त घामाने थबथबने (sweating profoundly) हे ह्र्दयविकाराचे लक्षण असू शकते का?
२. असेल तर हा प्रकार कोणता? Heart attack की Cardiac arrest? या व्यतिरिक्त सुद्धा अजून कोणता प्रकार असतो का?
३. त्या मेडिकल सेंटर मध्ये ट्रोपोनिनची टेस्ट केली असती तर तो वाचण्याचे काही चान्सेस होते का?
ता.क. हा प्रतिसाद टंकत असतानाच माझ्या फेसबुकवर याच संदर्भातली एक दुर्दैवी बातमी स्क्रोल झाली आहे. नेरुळ येथे डॉक्टरांच्या सेमिनार मध्ये बोलत असताना डॉ. अभय उप्पे (छाती आणि श्वसनरोग विभाग प्रमुख, डॉ. डी वाय पाटील हॉस्पिटल) यांना ह्रदयविकाराचा झटका आला. समोर पंचवीस एक डॉक्टर उपस्थित होते पण डॉक्टरांचे प्राण वाचू शकले नाहीत.
१. कोणतीही वेदना वगैरे होत
१. कोणतीही वेदना वगैरे होत नसताना फक्त घामाने थबथबने (sweating profoundly) हे ह्र्दयविकाराचे लक्षण असू शकते का?
>>
होय. माझ्या सासऱ्यांच्या बाबतीत असे झाले होते. त्यांना डायबेटिस असल्याने छातीत दुखल्याचे फारसे जाणवले पण न्हवते.
अतुल,
अतुल,
प्रश्न चांगले आहेत क्रमाने घेतो.
१. फक्त घामाने थबथबने ( Profuse sweating ) >>
होय, हे एक महत्त्वाचे लक्षण आहेच. या निमित्ताने छातीतील वेदना वगळता जी अन्य लक्षणे उद्भवू शकतात त्यांची यादी लिहितो :
*शरीरात काहीतरी भयंकर घडणार आहे अशी भावना
चक्कर येणे आणि/ किंवा बेशुद्ध पडणे
* खोकला, मळमळ आणि/ किंवा उलटी
दरदरून घाम सुटणे
* दम लागणे, नाडीचे ठोके जलद आणि अनियमित होणे
कोणीतरी आपला गळा घोटते आहे अशी भावना होणे.
पोट फुगणे
अतुल,
अतुल,
२. Heart attack की Cardiac arrest?
>>>
इथे एक मुद्दा अधोरेखित करतो.
हार्ट अटॅक (MI) हा एक आजार आहे. या उलट हृदयक्रिया अचानक बंद पडणे/ थांबणे (अरेस्ट) हे एक कॉम्प्लिकेशन आहे आणि ते अनेक कारणांमुळे होऊ शकते , जसे की :
१. हृदयतालबिघाड : यामध्ये सर्वात कॉमन ventricular fibrillation (VF) हे आहे. यात अत्यंत तातडीने उपचार मिळाल्यास वाचण्याची शक्यता राहते. उपचारांना जसा विलंब होतो तसे प्रति मिनिटागणिक जगण्याची शक्यता झपाट्याने कमी होत जाते.
२. करोनरी हृदयविकार >>> MI >>> VF
३. जन्मजात हृदयविकृती
४. क्षमतेपेक्षा कित्येक पट जास्त प्रमाणात केलेला व्यायाम किंवा ढोर श्रम.
३. त्या मेडिकल सेंटर मध्ये
३. त्या मेडिकल सेंटर मध्ये ट्रोपोनिनची टेस्ट केली असती तर तो वाचण्याचे काही चान्सेस होते का?
>>>
या जर तरला आता तितकासा अर्थ नाही.
त्या सेंटरमध्ये तातडीने करायची Trop चाचणी उपलब्ध होती का नाही हा एक मुद्दा.
तसेच, इथे चाचणीच्या जोडीने ताबडतोब करण्याचे जे उपचार असतात ते उपलब्ध असण्याची शक्यता ??
अशा वेळेस cardiac रुग्णवाहिका मिळाल्यास उत्तम.
त्या व्यक्तीच्या बाबतीत जो हार्ट अटॅक आला असावा त्याला massive MI असे म्हणतात आणि अशा प्रसंगांमध्ये बहुतेक वेळा वेगात मृत्यू येतो.
कोणतीही गोष्ट अचानक घडतं नाही
कोणतीही गोष्ट अचानक घडतं नाही.त्याची प्रोसेस अगोदर च सुरू झालेली असते फक्त ती आपण शोधू शकत नाही.
किंवा आपल्याल ते जाणवत नाही..
Hi Dr नीच सांगितलेली कारण आहेत .
Dr नी सांगितलेली शरीरातील त्रुटी खूप अगोदर पासून शरीरात असतात.अचानक निर्माण झालेल्या नसतात.
Dr ह्या वर पण मत व्यक्त करावे
हृदयतालबिघाड : यामध्ये सर्वात कॉमन ventricular fibrillation (VF) हे आहे. यात अत्यंत तातडीने उपचार मिळाल्यास वाचण्याची शक्यता राहते. उपचारांना जसा विलंब होतो तसे प्रति मिनिटागणिक जगण्याची शक्यता झपाट्याने कमी होत जाते.
२. करोनरी हृदयविकार >>> MI >>> VF
३. जन्मजात हृदयविकृती
४. क्षमतेपेक्षा कित्येक पट जास्त प्रमाणात केलेला व्यायाम किंवा ढोर श्रम.
कुमारसर खूप खूप धन्यवाद
कुमारसर खूप खूप धन्यवाद तपशीलवार प्रतिसादांकरीता.
कमी वयात अचानक हार्ट अॅटॅक
कमी वयात अचानक हार्ट अॅटॅक आणि मृत्यू हे अमेरिकेतही दिसतं आहे. तिथे त्यावर अभ्यासही सुरू झाला आहे. डॉक्टर वै द्यकीय संशोधनाशी संबंधित विश्वासार्ह संकेतस्थळावरचे संदर्भ शोधू शकतील.
इथेही ट्विटरवर बॅडमिंटन खेळणारा तरुण अचानक कोसळून लगेच गतप्राण , लग्नसमारंभात धडधाकट माणूस कोसळून लगेच मृत्यू अशा प्रकारचे किमान पाच व्हिडियोज आले आहेत. आपल्याकडे सरकार याबद्दल काही करते आहे का याची कल्पना नाही.
यावरून आठवलं की ज्यांना रक्त पातळ व्हायची औषधे दिली जातात अशा लोकांना कोव्हिडची लस देण्याबाबत चर्चा वाचली होती.
@ हेमंतशरीरातील त्रुटी खूप
@ हेमंत
शरीरातील त्रुटी खूप अगोदर पासून शरीरात असतात.अचानक निर्माण झालेल्या नसतात.
>>> चांगला मुद्दा आहे.
ज्या लोकांना प्रत्यक्ष एमआय होतो अशांपैकी सुमारे 25 टक्के लोकांना त्यापूर्वी कधीही कुठलीही संबंधित लक्षणे आलेली नसतात. त्याच्यातल्या कित्येकांच्या बाबतीत असा कौटुंबिक इतिहास सुद्धा नसतो. म्हणूनच काहीही होत नसताना देखील वयाच्या योग्य टप्प्यावर काही चाळणी चाचण्या करून घेणे महत्त्वाचे आहे. या चाचण्यांचा मूलभूत आढावा मी पूर्वी या लेखमालेत घेतलेलाच आहे : https://www.maayboli.com/node/65597
तो वाचता येईल. आता त्यामध्ये या चाचण्यांची भर घालतो :
१. मेद :
* Small, dense LDL-C level
* Lipoprotein (a) level ( भारतात तरुण वयात जे हार्ट अटॅक वाढले आहेत त्या दृष्टीने हे मोजणे आवश्यक आहे )
* Direct measurement of HDL-C
२. वरील पारंपरिक चाचण्यांच्या जोडीला आता आधुनिक चाचणी म्हणजे सिटीस्कॅनच्या मदतीने प्रत्यक्ष करोनरी वाहिनीचा अभ्यास केला जातो आणि त्यात कितपत कॅल्शियम साठलय.. वगैरे पाहिले जाते. हा विशेष तज्ञांचा प्रांत आहे; त्यांच्या सल्ल्यानेच हे ठरते.
वरील सगळ्या गोष्टींचा एकत्रित आढावा घेऊन प्रत्येक व्यक्तीचे हृदयविकार होण्यासंबंधी धोक्याचे गुणांकन काढले जाते. त्यामध्ये सौम्य, मध्यम आणि खूप धोका अशी विभागणी करता येते.
भरत
भरत
तो संदर्भ पाहिला. कोविड/ कोविड लस आणि हृदयस्नायूंचा आजार या विषयावर मी जरा सबुरीने घेणार आहे. याचे विदासकट चांगले संदर्भ जेव्हा जर्नलमध्ये येतील त्याचा अभ्यास करून सवडीने कोविड धाग्यावर लिहीन. आत्ता घाईने कुठले मत देत नाही.
तसेही या धाग्यावर कोविडची सरमिसळ न केलेली बरी.
जनुकीय उत्परीवर्तन झाल्या
जनुकीय उत्परीवर्तन झाल्या मुळे हार्ट अटॅक किंवा हार्ट फेल होते .
असा दोघात संबंध आहे.
असे संशोधन पण वाचनात येत आहे.
जाणकार लोक च ह्या वर प्रकाश टाकू शकतात
आणि मला असे पण वाटत आपण विनाकारण ऋदय ला खलनायक बनवत आहे त्या बिचाऱ्या चा बहुतेक वेळा काहीच दोष नसते.
धमन्या न च्या झडपा नीट काम करत नसतील .
नीट पने उघडत किंवा बंद होत नसतील , त्यांच्यात कचरा जमा झाल्या मुळे रक्त वाहून नेण्याची त्यांची क्षमता नष्ट झाली असेल तर त्या बिचाऱ्या ऋदय चा काय दोष.
ते तर शेवट पर्यंत संकटावर मात करण्याचा पूर्ण प्रयत्न करते.
खास फक्त ऋदय चे रोग कोणते आहेत .
हा माझा प्रश्न आहे त्याचे उत्तर जाणून घ्यायचे आहे
१. खास फक्त हृदयाचे रोग कोणते
१. खास फक्त हृदयाचे रोग कोणते आहेत .>>>>
याचे उदाहरण म्हणजे Cardiomyopathy. या अनेक प्रकारच्या असतात.
२. आपण विनाकारण हृदयाला खलनायक बनवत आहे >>
पण असे म्हणू नका. हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्यांच्या शाखा हृदयाच्या बाहेरील पातळ आवरणातच (epicardium) वस्ती करतात. एका अर्थाने या वाहिन्या आणि हृदय यांना वेगळे करता येणार नाही !
( जसे की आपले अंतर्गत शरीर आणि त्वचा आपण वेगळी करू शकतो का ?)
Submitted by भरत. on 11
Submitted by भरत. on 11 August, 2023 - 09:23 (कोविड आणि हृदयविकार)
>>> याचे उत्तर इथे दिलंय :
https://www.maayboli.com/node/80675?page=15#comment-4930921
किती प्रकारे कोविड विषाणूने
किती प्रकारे कोविड विषाणूने आपल्याला त्रस्त केलंय हे आता आता थोडेफार सरफेसवर येत आहे.... अजूनही अशा अनेक गोष्टी असतील.
अभ्यासपूर्ण माहितीसाठी डाॅ. कुमार यांचे मनःपूर्वक आभार.
____/\____
डॉक्टर , ते वाचलं. माझा
डॉक्टर , ते वाचलं. माझा प्रश्न कोविड लशीसंदर्भात होता
कोविड लशीसंदर्भात
कोविड लशीसंदर्भात
फायझर आणि मॉडर्ना यांच्या लसीनंतर झालेला हृदयस्नायूंचा दाह यावर एक मोठा अभ्यास येथे उपलब्ध आहे
https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC9235262/
त्यात प्रामुख्याने युरोपीय आणि मध्यपूर्वेतील देशांचा समावेश आहे.
या अभ्यासात त्यांनी लसीमुळे झालेला हृदयदाह आणि नैसर्गिक कोविड संसर्गामुळे झालेला तोच दाह यांची तुलना केली आहे.
नैसर्गिक आजारानंतर झालेला दाह अधिक तीव्र होता आणि कॉम्प्लिकेशन्स जास्त झाली.
परंतु लसीमुळे झालेल्या तोच त्रास हा तुलनेने सौम्य होता आणि लवकर आटोक्यात आला.
सारांश : लसीने होणाऱ्या या तोट्यापेक्षा तिच्या फायद्याचे पारडे जड आहे.
अन्य देशातील अधिक संशोधनावर आता नजर ठेवावी लागेल
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/83838?page=3 : रेव्यु यांचे प्रश्न :
1)सामान्य स्थितीत, काहीही त्रास नसताना पॉझिटिव्ह रिडिंग..
2)त्रास वाटला पण निगेटिव्ह रिडिंग
3) वार्षिक चेक अप मध्ये ही चाचणी दर वर्षी करावी का/ इतर कोणत्या चाचण्यात हे समाविष्ट असते का?
. 4) वार्षिक चाचणीत निगेटिव्ह आले तर चेकिंगची फ्रिक्वेन्सी काय असावी? (लक्षण असले तर गोष्ट वेगळी)
उत्तरे :
१. अशी परिस्थिती असल्यास वाढलेल्या ट्रॉपोनिनचे कारण एमआय (हार्ट अटॅक) नाही हे उघड आहे. एखाद्या देशातील निरोगी लोकांमध्ये ट्रॉपोनिन वाढलेले असण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. हार्ट अटॅक वगळता खालील स्थितींमध्ये ते वाढलेले असू शकते : हृदयस्नायू दाह, शरीरातील sepsis, मूत्रपिंड विकार, प्रचंड श्रम झाले असता आणि केमोथेरपीचे दुष्परिणाम.
२. जर संभाव्य लक्षणे असतील तर तीन ते सहा तासांनी चाचणी पुन्हा करून पाहणे. काहीच लक्षणे नसतील तर गरज नाही.
पुढे चालू ..
३. ट्रॉपोनिनची वार्षिक
३. ट्रॉपोनिनची वार्षिक तपासणी : माझ्या माहितीनुसार उठसूट प्रत्येकाची ही चाचणी करत नाहीत. पण कोणत्या विशिष्ट आरोग्य परिस्थितीत करतात त्याचे उत्तर विशेष तज्ञच देऊ शकतील.
४. ही कोलेस्टेरॉल वगैरे सारखी रुटीन चाचणी नव्हे; तिचा खरा उपयोग हार्ट अटॅकची संभाव्य लक्षणे आली असतानाच आहे.
वस्तुनिष्ठ मूल्यांकन :
वस्तुनिष्ठ मूल्यांकन :
संभाव्य लक्षणे >>> रुग्णालयात दाखल >> डॉ. नी तपासल्यानंतर The HEART score असा काढतात :
History
ECG मधले बदल
Age (<45 , >65 )
Risk factors ( 0/1-2/3)
Troponin ( पातळीनुसार)
वरीलपैकी प्रत्येक मुद्द्याला ० ते २ गुण देतात. त्यानुसार HEART score १० पैकी किती हे कळते. मग निर्णयप्रक्रिया अशी :
0-3: कमी धोका >>> लवकर घरी पाठवता येते.
4-6: मध्यम धोका >>> रुग्णालयात निरीक्षण चालू.
7-10: सर्वाधिक धोका >>> तातडीने योग्य ते उपचार
https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC6005932/
चांगली माहिती मिळाली.
चांगली माहिती मिळाली.
अचानक मानसिक धक्का बसल्यावर हार्ट अटॅक का येतो?
अचानक मानसिक धक्का बसल्यावर
अचानक मानसिक धक्का बसल्यावर हार्ट अटॅक का येतो? >>
प्रश्न चांगला आहे परंतु याचे उत्तर क्लिष्ट आहे.
महत्त्वाचा मुद्दा असा आहे की, मानसिक धक्क्यामुळे अटॅक येतो असे म्हणण्याऐवजी मानसिक धक्क्यामुळे आधीच susceptible असणाऱ्या व्यक्तीत अटॅक येण्याची शक्यता खूप वाढते.
अजूनही त्यामागचा कार्यकारणभाव पूर्णपणे समजलेला नाही. परंतु सर्वसाधारण घटना अशा होतात :
१. शरीरातील sympathetic चेतासंस्था उत्तेजित होते. त्यामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात.
२. हृदय- ठोक्याची गती आणि रक्तदाबात वाढ होते.
३. हृदयस्नायूंचे काम वाढते आणि त्यांचा ऑक्सिजनचा वापरही वाढतो.
४. रक्तातील प्लेटलेट्स एकमेकांना चिकटण्याची प्रक्रिया वाढते.
५. धक्क्याच्या दरम्यान शरीरात बरीच cytokines सोडली जातात. त्यांच्यामुळे करोनरी रक्तवाहिनीत आधीच जी मेदपुटे चढलेली असतात ती अस्थिर होऊन त्यांच्यापासून रक्तप्रवाहात गुठळी तयार होते >>> block >> MI.
मानसिक धक्का आणि
मानसिक धक्का आणि हृदयविकाराचा प्रत्यक्ष झटका या विषयावर भरपूर खल झालेला असून तो वादग्रस्त आहे.
प्रत्येक धक्क्यामुळे प्रत्येक वेळा झटका चेतवला जाईलच असे नाही.
( चित्रपटात प्रभावीपणे दाखवतात ते सोडून द्यायचे
धन्यवाद डॉ !
धन्यवाद डॉ !
भारतीय लष्कराचे जवान सुनील
भारतीय लष्कराचे जवान सुनील नागपुरे (वय 30 ) यांचे लेह-लडाखमध्ये काम करीत असताना हृदयविकाराच्या झटक्याने नुकतेच निधन झाले आहे. आदरांजली !
(https://india.postsen.com/trends/1032215.html)
त्यांच्या तब्येती संबंधीची इतर माहिती उपलब्ध नाही. तरीही या निमित्ताने प्रचंड थंड हवा आणि हृदयविकाराचा झटका या संबंधाने थोडी माहिती :
या संदर्भात थंड हवामानाच्या प्रदेशांमध्ये बरेच अभ्यास झालेले आहेत. शून्य सेल्सिअस किंवा त्याहून कमी असणारे तापमान, हवेचा कमी दाब, वाऱ्यांचा प्रचंड वेग आणि सूर्यप्रकाश खूप कमी वेळ उपलब्ध असणे या कारणांमुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता बऱ्यापैकी वाढते. अर्थात एखाद्या व्यक्तीचा कौटुंबिक हृदय-आरोग्य इतिहास आणि इतर व्यक्तिगत गोष्टीही लक्षात घ्याव्या लागतात. अतीशीत तापमानामुळे करोनरी रक्तवाहिन्यांचे आकुंचन होते असे संशोधनात आढळलेले आहे.
https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC6583065/
ओह.श्रद्धांजली.अतिश्रम
ओह.श्रद्धांजली.अतिश्रम इत्यादी इतर फॅक्टरही असतील.
Pages