ट्रोपोनिन : ‘हार्ट अ‍ॅटॅक’ वर शिक्कामोर्तब

Submitted by कुमार१ on 15 January, 2018 - 23:36

आपणा सर्वांना शब्दरुपी तिळगूळ देउन सादर करीत आहे या लेखमालेतील ८वा लेख...
* * *

पहाटेचे पाच वाजलेत. तुम्ही मस्तपैकी साखरझोपेत आहात. नित्यनेमाने तुमच्या मोबाईलमधील गजर सकाळी साडेसहाला वाजणार आहे. पण आज अचानक फोनच्या रिंगने तुम्ही दचकून जागे होता. गजर झालाय की फोन वाजलाय या संभ्रमात तुम्ही फोन उचलता. पलिकडून एकजण घाईघाईत उत्तेजित स्वरात तुम्हाला सांगतो, “अरे, काकांना आत्ताच अ‍ॅडमिट केलंय, आयसीयूत ठेवलंय, तू लगेच निघ”. तुम्हाला त्याच्या परिस्थितीची जाणीव होते आणि तुम्ही तडक तिथे जायला निघता.

मग त्या हॉस्पिटलात घाईत शिरून आयसीयूच्या बाहेरच्या खोलीत पोचता. तिथे ‘काकां’चे काही आप्तेष्ट आधीच पोचलेत. त्यातला एकजण तुम्हाला त्याने आताच खालच्या फार्मसीतून ‘ते’ पाच अंकी रुपयेवाले भारी इंजेक्शन आणून नर्सला दिल्याचे कौतुकाने सांगतो. बाकी एक-दोघे मोबाईलवरून नातेवाइकांना खबर देत आहेत. दरम्यान काकांच्या मुलाने ‘भारत विमा कं’ च्या एजंटला फोन लावलाय आणि तो त्याला “काय ते तुमचे बघा, सर्व काही कॅशलेस व्हायला पाहिजे”, असे खडसावून सांगतोय.

तिकडे आयसीयूच्या आत ते काका बेडवर पहुडले आहेत. त्यांच्या हातात सलाईनच्या नळ्या आणि छातीवर जेलीचा ओलावा या अवस्थेत अनेक वायरींच्या जंजाळात आणि मॉनिटर्सच्या गराड्यात ते झोपलेले दिसताहेत. हॉस्पिटल स्टाफची आत-बाहेर धावपळ चालू आहे.........
heart-jpg.jpg
मित्रहो, हा वरचा प्रसंग काय तुम्हाला चित्रपटातला वाटतोय का? अंहं ! हा तर तुमच्या-माझ्या घरीदारी, शेजारीपाजारी कधीना कधी हमखास घडणारा प्रसंग आहे. कदाचित आपल्यातील कुणाच्या वाट्याला त्यातल्या रुग्णाची भूमिकासुद्धा वाट्याला आली असू शकेल. या प्रसंगातल्या रुग्णाला हृदयविकाराचा झटका आलेला आहे. या आजाराचे शास्त्रीय नाव आहे Myocardial Infarction (MI). Myocardium = हृदयाचे स्नायू आणि Infarct = मृत पेशींचा समूह. एखाद्या करोनरी रक्तवाहिनीत झालेल्या गुठळीने होणारा हा आजार.
MI चे निदान डॉक्टरला अत्यंत जबाबदारीने करावे लागते. रुग्णाच्या बाजूने त्याला भावनिक आणि आर्थिक पैलू असतात. या घटनेपूर्वीचा आणि नंतरचा ‘तो’ यात बऱ्यापैकी गुणात्मक फरक पडणार असतो. एकूणच त्याच्या कुटुंबातली ही मोठी घडामोड असते. तर एखाद्याच्या बाबतीत अशा पहिल्याच तीव्र झटक्यात त्याचे आयुष्यही संपू शकते.

तर हे महत्वाचे निदान करताना रुग्णतपासणी बरोबर रक्तचाचण्या, इसीजी आणि इतर काही चाचण्या तातडीने केल्या जातात. त्यापैकी ‘ट्रोपोनिन’ या प्रथिनाची रक्तपातळी मोजणे ही अत्यंत महत्त्वाची चाचणी होय. तिच्या रिपोर्टवर तुम्ही रुग्णावर MI चे शिक्कामोर्तब करणे हे बरेचसे अवलंबून असते.

मग काय आहे हे ‘ट्रोपोनिन’ प्रकरण? नादमधुर नाव असलेले हे प्रथिन नक्की कुठे असते व काय करते? पुढचा सर्व लेख त्यासाठीच समर्पित आहे.
या विषयाचे चार भागात विभाजन करतो:
१. ट्रोपोनिन : स्नायूंमधले एक प्रथिन
२. ट्रोपोनिनची रक्तपातळी आणि MI चे निदान
३. ट्रोपोनिनच्या मर्यादा आणि
४. MI च्या रक्तचाचण्या : आढावा

ट्रोपोनिन : स्नायूंमधले एक प्रथिन

आपल्या शरीरात तीन प्रकारचे स्नायू असतात. त्यांच्या अधिकृत नावांना आपण थोडी लाडिक मराठी नावे देऊ:
• skeletal muscle = हाडस्नायू ( म्हणजे biceps वगैरे)
• cardiac muscle = हृदयस्नायू आणि
• smooth muscle = मऊस्नायू ( म्हणजे ‘आतड्याचे’ वगैरे)

यापैकी हाड- व हृदयस्नायूंमध्ये ट्रोपोनिन हे प्रथिन असते आणि ते त्यांच्या आकुंचनात मदत करते. त्या दोन्ही ठिकाणच्या ट्रोपोनिनमध्ये थोडाफार फरक असतो. इथे आपण फक्त हृदयस्नायूंमधील ट्रोपोनिनचाच (cardiac Tn) विचार करणार आहोत.
या ट्रोपोनिनचे तीन प्रकार असतात: T, I व C. त्यापैकी T व I हेच फक्त MI च्या निदानामध्ये उपयुक्त असतात. निरोगी अवस्थेत ट्रोपोनिन हे स्नायूंच्या पेशींमध्ये भरपूर असते तर रक्तात अत्यल्प प्रमाणात. जेव्हा रुग्णास MI होतो तेव्हा ठराविक हृदयपेशी मरतात आणि त्यांच्यातले ट्रोपोनिन रक्तात सोडले जाते. म्हणून अशा वेळी आपल्याला त्याची रक्तपातळी वाढलेली दिसते. ही वाढीव पातळी ठराविक दिवस टिकून मग कमी होत जाते.

ट्रोपोनिनची रक्तपातळी आणि MI चे निदान

करोनरी हृदयविकाराची लक्षणे असणारा रुग्ण जेव्हा दाखल होतो तेव्हा तातडीने त्याचे रक्त घेतले जाते आणि त्यातील हृदय-ट्रोपोनिनची पातळी मोजली जाते. त्यासाठी ट्रोपोनिनच्या T किंवा I या दोन प्रकारांपैकी कुठलेही एक निवडता येते. संबंधित प्रयोगशाळेचा तो निर्णय असतो. याच्या जोडीला रुग्णाचा इसीजी पण काढला जातो. या दोन्ही तपासण्या महत्वाच्या आहेत. तरीही ट्रोपोनिनची चाचणी ही इसीजीला काहीशी वरचढ मानली जाते. किंबहुना एवढे महत्वाचे निदान हे एकाच चाचणीवर करायचे नाही असा दंडक आहे.

MI चे निदान करण्यासाठी त्याची सार्वत्रिक व्याख्या करण्यात आली आहे ती अशी:
MI चे शिक्कामोर्तब करण्यासाठी खालील गोष्टींची पूर्तता व्हायला हवी:

१. रक्तातील पुरेसे वाढलेले ट्रोपोनिन
आणि
२. खालीलपैकी किमान एक घटना :

अ) करोनरी-विकाराची विशिष्ट लक्षणे रुग्णात दिसणे
आ) इसीजीतील विशिष्ट बदल किंवा
इ) हृदयाच्या ‘इमेजिंग’ तंत्राने मिळालेला पुरावा

वरील व्याख्येतून ट्रोपोनिनच्या चाचणीला सर्वोच्च महत्व दिले आहे हे लक्षात येते. या लेखाची व्याप्ती ट्रोपोनिनपुरती मर्यादित आहे.
सध्या प्रयोगशाळेत हृदय-ट्रोपोनिन मोजण्याचे अतिसंवेदनक्षम तंत्रज्ञान उपलब्ध आहे. त्यामुळे रुग्णास त्रास झाल्यापासून तीन तासांच्या आतच ट्रोपोनिनचे वाढलेले प्रमाण दिसून येते. या अद्ययावत तंत्राने MI चे निदान लवकर करणे शक्य झाले आहे.

ट्रोपोनिनची रक्तचाचणी दोन प्रकारे करता येते:
१. रुग्णाचे रक्त काढून ते प्रयोगशाळेत पाठवणे. तिथे रीतसर ट्रोपोनिनचे प्रत्यक्ष प्रमाण मोजले जाते. ते विशिष्ट ‘कट-ऑफ’ च्यावर असले की मग MI चे निदान पक्के होते.
२. थोड्याशा रक्तावर रुग्णाच्या वार्डातच छोट्या स्ट्रिपवर झटपट चाचणी करणे. यात ते वाढलेले आहे किंवा नाही आणि असल्यास त्याच्या प्रमाणाची अंदाजे माहिती मिळते.
वरील दोन्हींमध्ये अर्थातच पहिला प्रकार श्रेष्ठ आहे.

ट्रोपोनिनच्या मर्यादा
एखाद्या रोगनिदानाची निर्णायक चाचणी कोणती असते? तर अशा रक्तघटकाची चाचणी की जो फक्त एकाच रोगात वाढतो आणि अन्य कुठल्याही रोगात नाही. पण बऱ्याच चाचण्या या निकषाला १००% उतरत नाहीत. ट्रोपोनिनही त्याला अपवाद नाही. MI व्यतिरिक्त हृदयस्नायूला अन्य मार्गाने इजा झाल्यासही ते वाढते.
तसेच पूर्णपणे वेगळ्या रोगांतही ते वाढते, उदा.: फुफ्फुस-रक्तप्रवाहाचा आजार, दीर्घकालीन मूत्रपिंड विकार, काही केमोथेरपीचे दुष्परिणाम, इ. म्हणूनच MIचे निदान करताना नुसते ‘वाढलेले ट्रोपोनिन’ एवढा निकष पुरेसा नसतो तर, विशिष्ट ‘कट-ऑफ’ च्यावर ते वाढलेले लागते.

MI च्या रक्तचाचण्या : आढावा
१९६०पासून MIच्या निदानासाठी विविध रक्तचाचण्या प्रचलित आहेत. सुरवातीस रक्तातील काही एन्झाईम्स मोजली जात. प्रथम खूप उपयुक्त वाटलेल्या एखाद्या एन्झाइमच्या मर्यादा नंतर स्पष्ट होत. मग एकेक एन्झाइम मागे पडे व नवे त्याची जागा घेई. आता ती जागा ट्रोपोनिनने पटकावली आहे. गेली सुमारे २५ वर्षे ही चाचणी वापरात आहे. त्यात अनेक सुधारणा होत आज हृदय-ट्रोपोनिन मोजण्याचे अतिसंवेदनक्षम तंत्रज्ञान उपलब्ध झाले आहे. आजच्या घडीला तरी ही सुयोग्य चाचणी आहे. अर्थात विज्ञानात ‘अंतिम’ असे काहीच नसते. त्यामुळे १००% ‘स्पेसिफिक’ चाचणीचा शोध अजूनही चालू आहे. त्यासाठी काही नव्या रक्तघटकांवर संशोधन चालू आहे. भविष्यात त्यातून काही निष्पन्न होईल अशी आशा आहे.
************************************************************************************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

परवा नवर्याच्या ऑफिसमधे एकाला ब्रेन स्ट्रोक आला. सुदैवाने मिटींगमधे समोर बसलेल्या दोन माणसांना अनुभव होता. ओठाचा कोपरा खाली वाकला आहे आणि डाव्या बाजूला ठेवलेला फोन वाजतोय तरी माणूस डावा हात हलवत नाही या गोष्टीवरून त्यांनी ब्रेन स्ट्रोकची शक्यता ओळखली व त्यांना ऍडमिट केले. गोल्डन अवर मधे उपचार मिळाल्याने फार दुष्परीणाम झाला नाही.

मी ऐकलेय की ब्रेन स्ट्रोक आहे अशी शंका असेल तर माणसाला हात वर करायला सांगतात. जनरली असा माणूस हात उचलू शकत नाही. हे खरे आहे का डॉक्टर?

मी बघितलं आहे ब्रेन stroke आलेल्या व्यक्ती ल समोरचा काय बोलत आहे ते समजत नाही.
डोळे उघडे असतात पण त्या मध्ये सेन्स असतो असे वाटत नाही .
बोलणं ऐकत असेल पण response देणे सुचत नाही.
असे मी तरी बघितलं आहे

MM,
बरोबर आहे.
त्या रुग्णाची जागृत अवस्था तपासण्याचे काही सोपे मार्ग असतात. त्यासाठी खालील प्रकारच्या गोष्टी करायला सांगतात:

१. डोळे बंद करा, आता पुन्हा उघडा
२.हाताच्या मुठी आवळा व सोडा
३.हात वर उचला व तिथे थांबून ठेवा, इत्यादी.

* * अशी एकाधी क्रिया बंद झाली तर परत ती चालू होण्याचे शक्यता असते का
>>>
यात रुग्णांच्या मेंदूच्या कुठल्या भागाला किती प्रमाणात इजा झाली आहे त्यावर याचे उत्तर ठरेल.
भिन्नता राहीलच

BNP >>>
हे एक प्रथिन असून ते हृदयाच्या स्नायूंमधून स्त्रवते. निरोगी अवस्थेत त्याची एक विशिष्ट पातळी असते.
विविध हृदयरोगांमध्ये काही वेळेस आजार बळावत जातो आणि हृदय अकार्यक्षमतेच्या उंबरठ्यावर येऊन ठेपते (failure).

अशा स्थितीत या प्रथिनाची रक्तपातळी बऱ्यापैकी वाढते. त्या रिपोर्ट वरून डॉक्टरांना रुग्णाच्या भवितव्याचा अंदाज घेता येतो.

पहिली कोणतीच आरोग्य विषयक समस्या नसणाऱ्या व्यक्ती ल अचानक हार्ट अटॅक येतो त्याची काय कारणे असतील.
जसे स्ट्रेस हे एक कारण मला माहीत आहे.
अजून काय कारण असतील.

BNP किंवा troponin हया टेस्ट लक्षण दिसून आल्या नंतर च्या आहेत.
पण अटॅक येण्या अगोदर किंवा येवू शकेल की नाही ह्याच्या काही टेस्ट आहेत का.

*अटॅक येण्या अगोदर किंवा येवू शकेल की नाही ह्याच्या काही टेस्ट आहेत का.>>>
यासाठी ज्या चाळणी चाचण्या करतात त्यासंबंधी सविस्तर माहिती मी तंदुरुस्त की नादुरुस्त या इथल्या लेखमालेत दिलेली आहे
शोध सुविधातून ती आपण पाहू शकता

CPR समाज प्रशिक्षण

काही जागतिक हृदयरोग संघटना आणि भारतीय एम्स यांच्या संयुक्त विद्यमाने समाजातील सुमारे दीड लाख लोकांना फक्त हाताने करायच्या
शास्त्रशुद्ध सीपीआर कृतीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
चांगला उपक्रम !

https://www-news--medical-net.cdn.ampproject.org/v/s/www.news-medical.ne...

स्त्री आणि हृदयविकाराचा झटका : काही निरीक्षणे
पुरुषांशी तुलना करता स्त्रियांच्या झटक्यामध्ये खालील वैशिष्ट्ये आढळतात:

1. वयाच्या 40 च्या आत स्त्री : पुरुष हे प्रमाण १ : १० असे आहे. वय 45 नंतर स्त्रियांचा धोका वाढू लागतो. वयाच्या साठीत तुलना केली तर स्त्री-पुरुष हे गुणोत्तर समान होते. त्या पुढच्या वयोगटात स्त्रियांचे प्रमाण काकणभर अधिकच आहे.

2. लक्षणविरहित झटका येण्याचे प्रमाण स्त्रियांमध्ये अधिक असल्याने बऱ्याचदा लवकर निदान होत नाही.

3. बऱ्याच रुग्णांना झटक्या दरम्यान छातीवर मोठा धोंडा ठेवल्या इतका दाब जाणवतो. परंतु स्त्रियांच्या बाबतीत या दाबाची तीव्रता खूप कमी असते.

4. प्रत्यक्ष झटका येण्याच्या एक-दोन महिने आधी शरीरात ‘काहीतरी बिघडले किंवा बिनसलेय’ अशी एक भावना बऱ्यापैकी येऊन जाते.

5. पहिल्या झटक्यात मृत्यूचे प्रमाण स्त्रियांमध्ये अधिक आहे.

आज एक what's app forword वाचले .
माकडांना heart attack yet नाही.
एकंदरीत च सर्व च् प्राण्यात heart attack येणे ही दुर्मिळ घटना आहे.
मग माणसात च हा प्रकार का प्रचंड वाढला आहे.
Dr गोडसे ची एका मुलाखतीत बघितल्याचे आठवत आहे.
पहिल्या ठोक्या पासून heart विषयी समस्या येण्याची शक्यता सर्व मध्ये 60% असते.
हे percent जरा वेगळ्या पद्धती नी घ्या.
100 मध्ये 60 लोकांना विकार होतो असा त्याचा अर्थ नाही.

भारतात थंडी पडू लागलेली आहे. हिवाळ्यात हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते. जेव्हा चोवीस तासातील तापमान एकदम तीन अंश सेल्सिअसने खाली जाते तेव्हा ही शक्यता अधिक वाढते. तसेच पूर्वी झटका येऊन गेलेला असल्यास पुढचा झटका येण्याची शक्यताही बळावते. एव्हना आपल्या परिचयातील लोकांमध्ये कोणाला ना कोणाला तरी असे झालेले असू शकेल.

स्पष्टीकरण :
1. हिवाळ्यात Sympathetic चेतासंस्था अधिक कार्यरत होते >> रक्तवाहिन्या आकुंचन पावतात>> रक्तदाब वाढतो. वृद्धांमध्ये या गोष्टी अधिक प्रमाणात होतात.
2. रक्तातील प्लेटलेट्स अधिक सक्रिय होतात तसेच रक्ताचा घट्टपणा वाढतो.

नमस्कार कुमार सर,
'Sinus Bradycardia, LAD' म्हणजे काय ते सांगाल का?

माहितीपूर्ण लेख. धन्यवाद एवढ्या विस्तारानं लिहिल्याबद्दल. तुम्ही lipoprotein a बद्दल आधीच लिहिलं नसल्यास लिहिणार का कृपया?

वि मु,

१. Sinus Bradycardia >>>
Bradycardia = हृदयगती (नाडी ) चे ठोके दर मिनिटाला 60 पेक्षा कमी असणे.
काही जणांमध्ये ते 50 पेक्षाही कमी होऊ शकतात आणि मग काही लक्षणे दिसू शकतात.

Sinus = हृदयाचा निरोगी अवस्थेतील तालप्रकार ( rhythm).

Sinus Bradycardia याची कारणे असंख्य आहेत - काही निरोगी अवस्थेतील तर काही आजारांमधील:

काही तरुण निरोगी माणसांमध्ये असणे
व्यायामपटू
झोपेत असताना
हृदयाच्या विशिष्ट भागाचा रक्तपुरवठा कमी होणे
अनेक औषधे व टॉक्सिन्सचे परिणाम
ग्लुकोजची पातळी कमी होणे किंवा थायरॉईडच्या कार्यातील बिघाड

२.
LAD = Left axis deviation
ही रुग्णाच्या इसीजी या आलेखावर दिसून येणारी घटना आहे.

तिची कारणे:
काही निरोगी माणसांमध्ये
हृदयाची डावी जवनिका (व्हेंट्रिकल ) जाड झालेली असणे.
जुन्या हार्ट अटॅकचा अवशेष
जन्मजात हृदयविकार
रक्तातील पोटॅशियम पातळी वाढणे

सिंड्रेला, चांगला प्रश्न.

Lipoprotein (a)
१. हा LDL चा एक उपप्रकार आहे
२. मानवजातीत त्याचे पंचवीस जनुकीय प्रकार आढळून आले आहेत

३. याची पातळी आनुवंशिक कारणाने वाढलेली असल्यास हृदयविकाराचा धोका वाढतो
४. ज्या रुग्णांमध्ये याची पातळी बऱ्यापैकी वाढलेली असेल त्यांच्या बाबतीत योग्य वेळीच प्रतिबंधात्मक उपाय चालू करता येतात

५. हृदयविकाराचा धोका दर्शवणाऱ्या नेहमीच्या चाचण्याव्यतिरिक्त याची मोजणी ही एक महत्त्वाची अतिरिक्त चाचणी आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ती करण्याचा निर्णय घेतला जातो.

रक्तदाब मोजण्याची पारंपरिक पद्धत सर्वांना परिचित आहेच. त्यामध्ये हाताला गुंडाळी बांधली जाते हे मूलभूत तत्व आहे

Blood_pressure_cuff REV.jpg

आता रक्तदाब मोजण्याच्या अत्याधुनिक संशोधनात ते गुंडाळीविना मोजता यावे असा दृष्टिकोन आहे. त्यासाठी
pulse arrival time + optical sensor + machine learning

अशा तिहेरी तंत्रज्ञानाचा संगम करून विविध प्रकारची उपकरणे निर्मिली जात आहेत. त्यामध्ये सुटसुटीत स्मार्टवॉचपासून ते मॉनिटरपर्यंत व्याप्ती आहे. तूर्त हे संशोधन जोरात आहे:

Cuffless latest jpeg Rev.jpg

मोबाईल फोनचा अधिक प्रमाणात वापर आणि त्यामुळे नव्याने उच्चरक्तदाब जडण्याची शक्यता, या विषयावरील एक मोठे संशोधन इथे प्रकाशित झाले आहे
https://academic.oup.com/ehjdh/advance-article/doi/10.1093/ehjdh/ztad024...

त्यामध्ये सुमारे दोन लाखांहून अधिक लोकांवर अभ्यास केलेला दिसतो.
अशा प्रकारे उच्च रक्तदाब जडण्याची शक्यता 12 टक्क्यांनी वाढते असा तिथला निष्कर्ष आहे.
तूर्त या संशोधनाला एक गृहीतक इतपत म्हणता येईल असे मत बरेच तज्ञांनी व्यक्त केले आहे.

नेहमीप्रमाणेच या विषयावर भरपूर उलटसुलट मते व्यक्त झालेली आहेत.

अगदी बरोबर बोललात बघा !
बहुतेक सगळे दीर्घकालीन आजार अनेक घटकांच्या एकत्रित परिणामामुळे होतात.
(Multifactorial)

करोनरी हृदयविकाराच्या झटक्याचे अचूक निदान केवळ एका ट्रॉपोनिन तपासणीवरून करता येईल काय?

या संदर्भात मशीन लर्निंगचा वापर करण्यासंबंधी संशोधन प्रगतीपथावर आहे. संभाव्य लक्षणे असलेला रुग्ण दाखल झाल्यानंतर त्याच्या रक्तावरील ट्रॉपोनिन चाचणी एकदाच केली जाईल आणि रुग्णाची इतर सर्व माहिती मशीन लर्निंग यंत्रणेला पुरवली जाईल.

त्यातून अचूक निदान केले जावे अशी अपेक्षा आहे.

करोनरी हृदयविकाराच्या झटक्याचे अचूक निदान केवळ एका ट्रॉपोनिन तपासणीवरून करता येईल काय?>>>>
कुमार १. आपल्या माहितीत ट्रॉपोनिन च्या तपासणी मुळे एम आय चे निदान झाले अशी केस आहे का? मी हे का विचारतोय की माझ्या बाबत डॉक्टरांना १९९२ साली झालेल्या त्रासाचे निदान एम आय असे सुरवातील झाले नव्हते.नंतर ते झाले. १९९२ या एकाच वर्षात माझे लग्न, अपघात व हार्ट अटॅक या घटना झाल्या.आजही त्या आठवणीने अंगावर काटा येतो.

ऋदय रोग तज्ञ असणारे भारतात नाव असणारे डॉक्टर हार्ट अटॅक नी मेल्याची खूप उदाहरणे आहेत.
ज्ञात असणाऱ्या सर्व टेस्ट ह्या फक्त अंदाज व्यक्त करू शकतात.
खात्री देवू शकतं नाहीत.
अंदाज व्यक्त करणाऱ्या टेस्ट चे महत्व त्या मुळे कमी होत नाही..काही जीव तरी त्या मुळे वाचतात.
परफेक्ट अंदाज व्यक्त करणारी एक पण टेस्ट आज सुद्धा अस्तित्वात नाही.
हे सत्य आहे आणि ते विसरू नका

प्रकाश
मी लेखात असे दिलेलेच आहे:
"रक्तातील पुरेसे वाढलेले ट्रोपोनिन (विशिष्ट ‘कट-ऑफ’ च्यावर) आणि
२. खालीलपैकी किमान एक घटना :"


….हे दोनही असले की मग MI चे निदान पक्के होते.

अशा निदान झालेल्या बऱ्याच केसेस असतात.

पण जर का पहिल्या तपासणीत trp पुरेसे वाढलेले नसेल तर काही तासांनी पुन्हा तपासणी करतात.

सुंदर माहिती....
>>>>तसेच पूर्णपणे वेगळ्या रोगांतही ते वाढते, उदा.: फुफ्फुस-रक्तप्रवाहाचा आजार, दीर्घकालीन मूत्रपिंड विकार, काही केमोथेरपीचे दुष्परिणाम, इ. म्हणूनच MIचे निदान करताना नुसते ‘वाढलेले ट्रोपोनिन’ एवढा निकष पुरेसा नसतो तर, विशिष्ट ‘कट-ऑफ’ च्यावर ते वाढलेले लागते.>>>>

शेवटी डॉक्टारांचे कौशल्य पणाला लागते.

Pages