ट्रोपोनिन : ‘हार्ट अ‍ॅटॅक’ वर शिक्कामोर्तब

Submitted by कुमार१ on 15 January, 2018 - 23:36

आपणा सर्वांना शब्दरुपी तिळगूळ देउन सादर करीत आहे या लेखमालेतील ८वा लेख...
* * *

पहाटेचे पाच वाजलेत. तुम्ही मस्तपैकी साखरझोपेत आहात. नित्यनेमाने तुमच्या मोबाईलमधील गजर सकाळी साडेसहाला वाजणार आहे. पण आज अचानक फोनच्या रिंगने तुम्ही दचकून जागे होता. गजर झालाय की फोन वाजलाय या संभ्रमात तुम्ही फोन उचलता. पलिकडून एकजण घाईघाईत उत्तेजित स्वरात तुम्हाला सांगतो, “अरे, काकांना आत्ताच अ‍ॅडमिट केलंय, आयसीयूत ठेवलंय, तू लगेच निघ”. तुम्हाला त्याच्या परिस्थितीची जाणीव होते आणि तुम्ही तडक तिथे जायला निघता.

मग त्या हॉस्पिटलात घाईत शिरून आयसीयूच्या बाहेरच्या खोलीत पोचता. तिथे ‘काकां’चे काही आप्तेष्ट आधीच पोचलेत. त्यातला एकजण तुम्हाला त्याने आताच खालच्या फार्मसीतून ‘ते’ पाच अंकी रुपयेवाले भारी इंजेक्शन आणून नर्सला दिल्याचे कौतुकाने सांगतो. बाकी एक-दोघे मोबाईलवरून नातेवाइकांना खबर देत आहेत. दरम्यान काकांच्या मुलाने ‘भारत विमा कं’ च्या एजंटला फोन लावलाय आणि तो त्याला “काय ते तुमचे बघा, सर्व काही कॅशलेस व्हायला पाहिजे”, असे खडसावून सांगतोय.

तिकडे आयसीयूच्या आत ते काका बेडवर पहुडले आहेत. त्यांच्या हातात सलाईनच्या नळ्या आणि छातीवर जेलीचा ओलावा या अवस्थेत अनेक वायरींच्या जंजाळात आणि मॉनिटर्सच्या गराड्यात ते झोपलेले दिसताहेत. हॉस्पिटल स्टाफची आत-बाहेर धावपळ चालू आहे.........
heart-jpg.jpg
मित्रहो, हा वरचा प्रसंग काय तुम्हाला चित्रपटातला वाटतोय का? अंहं ! हा तर तुमच्या-माझ्या घरीदारी, शेजारीपाजारी कधीना कधी हमखास घडणारा प्रसंग आहे. कदाचित आपल्यातील कुणाच्या वाट्याला त्यातल्या रुग्णाची भूमिकासुद्धा वाट्याला आली असू शकेल. या प्रसंगातल्या रुग्णाला हृदयविकाराचा झटका आलेला आहे. या आजाराचे शास्त्रीय नाव आहे Myocardial Infarction (MI). Myocardium = हृदयाचे स्नायू आणि Infarct = मृत पेशींचा समूह. एखाद्या करोनरी रक्तवाहिनीत झालेल्या गुठळीने होणारा हा आजार.
MI चे निदान डॉक्टरला अत्यंत जबाबदारीने करावे लागते. रुग्णाच्या बाजूने त्याला भावनिक आणि आर्थिक पैलू असतात. या घटनेपूर्वीचा आणि नंतरचा ‘तो’ यात बऱ्यापैकी गुणात्मक फरक पडणार असतो. एकूणच त्याच्या कुटुंबातली ही मोठी घडामोड असते. तर एखाद्याच्या बाबतीत अशा पहिल्याच तीव्र झटक्यात त्याचे आयुष्यही संपू शकते.

तर हे महत्वाचे निदान करताना रुग्णतपासणी बरोबर रक्तचाचण्या, इसीजी आणि इतर काही चाचण्या तातडीने केल्या जातात. त्यापैकी ‘ट्रोपोनिन’ या प्रथिनाची रक्तपातळी मोजणे ही अत्यंत महत्त्वाची चाचणी होय. तिच्या रिपोर्टवर तुम्ही रुग्णावर MI चे शिक्कामोर्तब करणे हे बरेचसे अवलंबून असते.

मग काय आहे हे ‘ट्रोपोनिन’ प्रकरण? नादमधुर नाव असलेले हे प्रथिन नक्की कुठे असते व काय करते? पुढचा सर्व लेख त्यासाठीच समर्पित आहे.
या विषयाचे चार भागात विभाजन करतो:
१. ट्रोपोनिन : स्नायूंमधले एक प्रथिन
२. ट्रोपोनिनची रक्तपातळी आणि MI चे निदान
३. ट्रोपोनिनच्या मर्यादा आणि
४. MI च्या रक्तचाचण्या : आढावा

ट्रोपोनिन : स्नायूंमधले एक प्रथिन

आपल्या शरीरात तीन प्रकारचे स्नायू असतात. त्यांच्या अधिकृत नावांना आपण थोडी लाडिक मराठी नावे देऊ:
• skeletal muscle = हाडस्नायू ( म्हणजे biceps वगैरे)
• cardiac muscle = हृदयस्नायू आणि
• smooth muscle = मऊस्नायू ( म्हणजे ‘आतड्याचे’ वगैरे)

यापैकी हाड- व हृदयस्नायूंमध्ये ट्रोपोनिन हे प्रथिन असते आणि ते त्यांच्या आकुंचनात मदत करते. त्या दोन्ही ठिकाणच्या ट्रोपोनिनमध्ये थोडाफार फरक असतो. इथे आपण फक्त हृदयस्नायूंमधील ट्रोपोनिनचाच (cardiac Tn) विचार करणार आहोत.
या ट्रोपोनिनचे तीन प्रकार असतात: T, I व C. त्यापैकी T व I हेच फक्त MI च्या निदानामध्ये उपयुक्त असतात. निरोगी अवस्थेत ट्रोपोनिन हे स्नायूंच्या पेशींमध्ये भरपूर असते तर रक्तात अत्यल्प प्रमाणात. जेव्हा रुग्णास MI होतो तेव्हा ठराविक हृदयपेशी मरतात आणि त्यांच्यातले ट्रोपोनिन रक्तात सोडले जाते. म्हणून अशा वेळी आपल्याला त्याची रक्तपातळी वाढलेली दिसते. ही वाढीव पातळी ठराविक दिवस टिकून मग कमी होत जाते.

ट्रोपोनिनची रक्तपातळी आणि MI चे निदान

करोनरी हृदयविकाराची लक्षणे असणारा रुग्ण जेव्हा दाखल होतो तेव्हा तातडीने त्याचे रक्त घेतले जाते आणि त्यातील हृदय-ट्रोपोनिनची पातळी मोजली जाते. त्यासाठी ट्रोपोनिनच्या T किंवा I या दोन प्रकारांपैकी कुठलेही एक निवडता येते. संबंधित प्रयोगशाळेचा तो निर्णय असतो. याच्या जोडीला रुग्णाचा इसीजी पण काढला जातो. या दोन्ही तपासण्या महत्वाच्या आहेत. तरीही ट्रोपोनिनची चाचणी ही इसीजीला काहीशी वरचढ मानली जाते. किंबहुना एवढे महत्वाचे निदान हे एकाच चाचणीवर करायचे नाही असा दंडक आहे.

MI चे निदान करण्यासाठी त्याची सार्वत्रिक व्याख्या करण्यात आली आहे ती अशी:
MI चे शिक्कामोर्तब करण्यासाठी खालील गोष्टींची पूर्तता व्हायला हवी:

१. रक्तातील पुरेसे वाढलेले ट्रोपोनिन
आणि
२. खालीलपैकी किमान एक घटना :

अ) करोनरी-विकाराची विशिष्ट लक्षणे रुग्णात दिसणे
आ) इसीजीतील विशिष्ट बदल किंवा
इ) हृदयाच्या ‘इमेजिंग’ तंत्राने मिळालेला पुरावा

वरील व्याख्येतून ट्रोपोनिनच्या चाचणीला सर्वोच्च महत्व दिले आहे हे लक्षात येते. या लेखाची व्याप्ती ट्रोपोनिनपुरती मर्यादित आहे.
सध्या प्रयोगशाळेत हृदय-ट्रोपोनिन मोजण्याचे अतिसंवेदनक्षम तंत्रज्ञान उपलब्ध आहे. त्यामुळे रुग्णास त्रास झाल्यापासून तीन तासांच्या आतच ट्रोपोनिनचे वाढलेले प्रमाण दिसून येते. या अद्ययावत तंत्राने MI चे निदान लवकर करणे शक्य झाले आहे.

ट्रोपोनिनची रक्तचाचणी दोन प्रकारे करता येते:
१. रुग्णाचे रक्त काढून ते प्रयोगशाळेत पाठवणे. तिथे रीतसर ट्रोपोनिनचे प्रत्यक्ष प्रमाण मोजले जाते. ते विशिष्ट ‘कट-ऑफ’ च्यावर असले की मग MI चे निदान पक्के होते.
२. थोड्याशा रक्तावर रुग्णाच्या वार्डातच छोट्या स्ट्रिपवर झटपट चाचणी करणे. यात ते वाढलेले आहे किंवा नाही आणि असल्यास त्याच्या प्रमाणाची अंदाजे माहिती मिळते.
वरील दोन्हींमध्ये अर्थातच पहिला प्रकार श्रेष्ठ आहे.

ट्रोपोनिनच्या मर्यादा
एखाद्या रोगनिदानाची निर्णायक चाचणी कोणती असते? तर अशा रक्तघटकाची चाचणी की जो फक्त एकाच रोगात वाढतो आणि अन्य कुठल्याही रोगात नाही. पण बऱ्याच चाचण्या या निकषाला १००% उतरत नाहीत. ट्रोपोनिनही त्याला अपवाद नाही. MI व्यतिरिक्त हृदयस्नायूला अन्य मार्गाने इजा झाल्यासही ते वाढते.
तसेच पूर्णपणे वेगळ्या रोगांतही ते वाढते, उदा.: फुफ्फुस-रक्तप्रवाहाचा आजार, दीर्घकालीन मूत्रपिंड विकार, काही केमोथेरपीचे दुष्परिणाम, इ. म्हणूनच MIचे निदान करताना नुसते ‘वाढलेले ट्रोपोनिन’ एवढा निकष पुरेसा नसतो तर, विशिष्ट ‘कट-ऑफ’ च्यावर ते वाढलेले लागते.

MI च्या रक्तचाचण्या : आढावा
१९६०पासून MIच्या निदानासाठी विविध रक्तचाचण्या प्रचलित आहेत. सुरवातीस रक्तातील काही एन्झाईम्स मोजली जात. प्रथम खूप उपयुक्त वाटलेल्या एखाद्या एन्झाइमच्या मर्यादा नंतर स्पष्ट होत. मग एकेक एन्झाइम मागे पडे व नवे त्याची जागा घेई. आता ती जागा ट्रोपोनिनने पटकावली आहे. गेली सुमारे २५ वर्षे ही चाचणी वापरात आहे. त्यात अनेक सुधारणा होत आज हृदय-ट्रोपोनिन मोजण्याचे अतिसंवेदनक्षम तंत्रज्ञान उपलब्ध झाले आहे. आजच्या घडीला तरी ही सुयोग्य चाचणी आहे. अर्थात विज्ञानात ‘अंतिम’ असे काहीच नसते. त्यामुळे १००% ‘स्पेसिफिक’ चाचणीचा शोध अजूनही चालू आहे. त्यासाठी काही नव्या रक्तघटकांवर संशोधन चालू आहे. भविष्यात त्यातून काही निष्पन्न होईल अशी आशा आहे.
************************************************************************************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

डॉक्टर, एक शंका आहे. हार्ट atttackची पूर्वसूचना देणारी काही लक्षणे पेशंटला येतात का? समजा असली तर प्रत्यक्ष attackचा प्रतिबंध करता येतो का?

@ साद :
दोन शक्यता असतात:
१. बिलकूल ध्यानीमनी नसताना अचानक झटका येतो
२. झटक्यापूर्वी काही दिवस थकवा, अस्वस्थता वा ‘छातीत कसेतरी होणे’ ही लक्षणे दिसणे. हे कसेतरी होणे हा फार फसवा प्रकार आहे.

कुमार१, धन्यवाद.
‘छातीत कसेतरी होणे’ ही लक्षणे दिसणे. हे कसेतरी होणे हा फार फसवा प्रकार आहे. >>> +११

सर्व वाचकांचे आभार.
या लेखमालेदरम्यान अनेक माबोकरांनी वैयक्तिक संपर्कातून त्यांच्या आजारांची माझ्याशी चर्चा केली याचे खूप समाधान वाटते. त्यामुळे माबो हे एक कुटुंब झाले आहे हे नक्की.

लेख आणि सगळे प्रतिसाद वाचले आहेत.

माझे सासरे सध्या छातीत दुखत असल्याने हॉस्पिटलमध्ये ऐडमिट आहेत..डॉक्टरांनी ओपन हार्ट सर्जरी करायला सांगितले आहे..सासर्यांचे वय 70 आहे..डायबेटीस आहे 40 वर्षांपासून.
डॉक्टरांनी सेकन्ड ओपीनीयन घेऊन सर्जरी करावी कि नाही हे फायनल करायला सांगितले आहे..या वयात सर्जरी करणे कितपत सेफ आहे..पुढे काही कॉम्पलीकेशन्स होऊ शकतात का सर्जरी नाही केली तर...
प्लीज जाणकारांनी मार्गदर्शन करावे.

मृणाली,
तुम्ही उपस्थित केलेला विषय बराच महत्त्वाचा असल्याने त्यावर इथून चर्चा करणे योग्य नाही.
तुम्ही दुसऱ्या एखाद्या तज्ञांना प्रत्यक्ष भेटूनच त्यावर चर्चा करणे इष्ट आहे.
शुभेच्छा !

मृणाली,

while this is not medical advice and as suggested above you need to get medical advice from professional heart surgeon .. this is my experience and suggestions based on my experience last year ,

Also , sorry for writing this post in English but having trouble in using the default interface available on Maayboli as well the one that Google offers but in the interest of time for you I thought of writing this in English ...

I came across similar dilemma when my mom had multiple blockages detected by Angiography, Cardiologist gave two choices -- one is to undergo Angioplasty wherein the cardiologist suggested they will "clear" the blockages and fix in stent therein ... the other option was bypass ..

we have atleast 2 relatives & close friend in family whose bypass was done earlier ... a lady aged 84 had her bypass done 13 years ago and another family friend who is about 70 had his bypass 6 years ago and both are fine since their bypass..

we discussed on this with our family doctor and he suggested for bypass .. as per our family doctor's view Angioplasty does not clear blockages completely if blockage % is more than 50 % ( that's family doctor's view) ... based on this we decided for bypass as one of her blockage was around 85% and it was V shaped blockage so difficult to Stent ..

mom underwent surgery which was successful .. post surgery she was in ICCU for 5 days ... ICCU is good place post surgery as there is continuous monitoring and its staffed round the clock ...

once patient is moved out of ICCU to ward/room we need to be very vigilant and in my view there should be support around (taking turns ) patient 24X7 even during night time for next month or so ... I guess this is critical , you might need to get more support from friends and relatives for this because the people that we hire from Nursing bureau usually sleep at night as per my experience ...

Sadly , my mother passed away few days after surgery and as per cardiologist it could be because of condition called "Arrhythmia" which has high chance of occurring post bypass but in the initial period and hence they monitor extensively in ICCU ...

Again what I am narrating is a specific case and not a general experience ... Pl. consult your Cardiologist for the treatment as they are experts...

नामवंत हृदयरोग तज्ञ José Eduardo Sousa यांचे नुकतेच निधन झाले. ब्लॉक झालेल्या करोनरी रक्तवाहिन्यांमध्ये औषधयुक्त stent बसवायचे तंत्र त्यांनी जगात सर्वप्रथम यशस्वी केले होते.

आदरांजली !

17 मे : जागतिक उच्चरक्तदाब नियंत्रण दिन.

वरील समस्या असणाऱ्या सर्वांना उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा !

डॉक्टर माझे बीपी सारखे कमी जास्त होत आहे त्यामुळे डॉक्टरांच्या सांगण्याप्रमाणे ईसीजी आणि ईको टेस्ट केल्या दोन्ही नॉर्मल नसल्यामुळे डॉक्टरांनी एनजीओग्राफी केली , त्यात ब्लोकेजेस नाही आढळले , पण मला बीपी लो होणे आणि नंतर काही वेळाने हाय होणे तसेच पल्स रेट कमी जास्त होणे हा त्रास चालूच आहे आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे छातीत “कसे तरी होणे” ही सतत चालूच आहे. काय कारण असावे कळत नाही सध्या बीपी च्या गोळ्या घेणे सुरू आहे. काही मार्गदर्शन करू शकाल काय ?

सुहासिनी
तुमचा प्रश्न असा जालावरून नाही सोडवता येणार.
गरज भासल्यास अन्य तज्ञांना तब्येत दाखवावी. शुभेच्छा.!

संपूर्ण भारतीय बनावटीचे खिशात मावणारे ईसीजी उपकरण नोएडा येथील नेहा व राहुल रस्तोगी यांनी तयार केले आहे.
https://economictimes.indiatimes.com/small-biz/entrepreneurship/an-ecg-m...

अभिनंदन !

मैदानी खेळाडूंमध्ये (आणि अन्य काही तरुणांत) वयाच्या तिशीच्या आत अचानक हृदयविकाराचा झटका येण्याच्या काही घटना गेल्या काही वर्षांमध्ये घडल्या. त्यापैकी काहींचा मृत्यू झाला तर काहीजण उपचारांनी बचावले. २०२१मध्ये डेन्मार्कचा फुटबॉलपटू Christian Eriksenला या प्रकारचा त्रास मैदानावर झाला होता. त्याला वेळीच उपचार मिळाल्याने तो वाचला.

या अनुषंगाने या प्रकारच्या आजारांचा सखोल अभ्यास झालेला आहे. हा आजार हृदयस्नायुंच्या आनुवंशिक विकारामुळे होतो (Hypertrophic Cardiomyopathy).
यामध्ये हृदयस्नायू प्रमाणाबाहेर वेड्यावाकड्या पद्धतीने thick झालेले असतात. त्यामुळे हृदयाच्या कप्प्यातून महारोहिणीमध्ये रक्त पंप करताना मोठा अडथळा येतो.

खेळाडूंमध्ये या प्रकारचा त्रास लवकर लक्षात येतो. अचानक चक्कर येणे किंवा खेळताना ताकद कमी पडणे अशी लक्षणे दिसू लागतात. या आजारासाठी विविध प्रकारच्या हृदयाच्या चाळणी चाचण्या आणि उपचार उपलब्ध आहेत.

1) काही लोकांचा फक्त dr दिसले तरी bp वाढतो.
काही लोकांना फक्त किरकोळ छातीत कळ आली तरी भीती नी बीपी वाढतो.आणि जास्त विचार करून वाढत च जातो.
२) heart आटॅक येब्याची अनेक कारणे असावीत.
फक्त high BP, blockage इतकी च कारणे नक्कीच नसावीत.
मानवी शरीरातील अवयव एकमेकावर परिणाम करतात.
३) blockages हा प्रकार तर पण आज पण कळतं नाही
शरीरात असंख्य रक्त वाहिन्या आहेत. heart पासून वाहून नेणाऱ्या आणि शरीरातून heart पर्यंत रक्त पुरवणाऱ्या .
ह्या असंख्य रक्त वाहिन्या मध्ये एका जरी रक्त वाहिनित ब्लॉक आला आणि रक्त प्रवाह थांबला तर अटॅक येवू शकतो का?
आपण ब्लोकेज कोणत्या रक्त वाहिन्यांचे चेक करतो.
सर्व रक्त वाहिन्यांचे नक्कीच करत नाही

आज जागतिक हृदय दिन .
हृदयविकार असलेल्या सर्वांना आजार नियंत्रणात राहण्यासाठी शुभेच्छा !

एक self cpr चा व्हिडियो फिरतोय.
हार्ट अटॅक येतोय असं वाटलं आणि जवळ आपलं कोणी नसेल तर आळीपाळीने डिप ब्रिदिंग आणि जोरात खोकण्याने उसंत मिळते म्हणे

जोरात खोकण्याने .....self cpr >>>
अमेरिकी हृदयरोग संघटनेच्या सल्ल्यानुसार अप्रशिक्षित माणसांनी असले काहीही करू नये.
या प्रकारचा उपचार हृदयताल बिघाडामध्ये डॉक्टर अथवा नर्सच्या उपस्थितीत करायचा असतो.

उगाचच घरी छातीत कळ आली म्हणून घरबसल्या हा उद्योग करायचा नाही. . त्यापेक्षा हृदय- रुग्णवाहिका लवकरात लवकर मिळण्यासाठी फोन करणे हितावह

https://www.heart.org/en/health-topics/cardiac-arrest/emergency-treatmen...

Brain stroke आलेल्या व्यक्ती ला मी जवळून बघितल आहे त्याला हॉस्पिटल मध्ये पण घेवून गेलो होतो.
Stroke आलेल्या व्यक्तीला काहीच समजत नाही तो स्वतः काही ही करू शकत नाही.अगदी कॉल पण करू शकत नाही
डोळे उघडे असतात पण त्यांना दिसत असेल असे वाटत नाही किंवा समोरचा काय बोलत आहे ते पण कळत नाही.
अशा वेळेस त्या रुग्णाची history माहीत असणारा व्यक्ती हजर असायला हवा
त्या मुळे dr ना खूप मदत होते निर्णय घेण्यासाठी .
Dr . Brain stroke aani heart problem ह्याचा काही संबंध आहे का?

होय, संबंध असतो तर !
सुमारे वीस प्रकारच्या हृदयरोगांमुळे मेंदूस्ट्रोक होऊ शकतो.
त्याला Cardioembolic Stroke असे नाव आहे.

असा स्ट्रोक एकदा झाल्यानंतर तो पुढील आयुष्यात पुन्हा होण्याचाही धोका बऱ्यापैकी असतो. त्यामुळे डॉक्टर सांगतील ते प्रतिबंधात्मक उपाय करायचे असतात.

दरवर्षी होणाऱ्या एकूण स्ट्रोक पैकी सुमारे 20 टक्के स्ट्रोक हृदय बिघाडामुळे झालेले असतात.

मेंदू आणि हृदय यांचे एकमेकांशी असलेले नाते दिल्ली व मुंबई प्रमाणे आहे:
एकमेकांवर घनिष्ठ अवलंबित्व !

दोन असे ब्रेन stroke आलेले बघितले.
दोघांचे पण बोलणे बंद झाले म्हणजे परत ते काही बोलू शकले नाहीत .
एक तर गेला एक आहे पण बोलत नाही.
ही अशी एकाधी क्रिया बंद झाली तर परत ती चालू होण्याचे शक्यता असते काम

Pages