आणि हिटलर हसला ... (५७५)

Submitted by ऋन्मेऽऽष on 3 December, 2017 - 14:27

फेसबूक पेटून उठले होते. जंगली मराठी ग्रूपवर नवीन टॉपिक आला होता. दारू जुनीच. बाटली नवीन. विषय गोरक्षकावरून सुरू होऊन तालिबान, ईस्लाम, आतंकवाद, ते ईंदिरा गांधीना सोबत घेत, महात्मा गांधी असा येऊन पोहोचला होता. अहिंसो परमो धर्म: .. अशक्य आहे हे. टोटल हिंसा किंवा टोटल अहिंसा. मधलं काहीतरी जमायला हवे. पण कोणंच ऐकायला तयार नव्हते. वर्षानुवर्षे तेच मुद्दे. सोहमच्या डोक्याचा भुगा झाला होता. असह्य होऊन तो उठला आणि किचनमध्ये जाऊन कॉफी उकळवायला ठेवली. कॉफीसोबत त्याच्या आवडत्या कूकीज घ्यायला म्हणून फडताळावरच्या डब्याला हात घातला. पण वीजेचा झटका बसल्यागत हात मागे आला. भिंतीवरून मुंग्यांची एक रांग त्या डब्याला वेटोळे घालून बसली होती. त्या झटकल्याशिवाय डब्बा उघडणे अशक्य होते. एवढ्या मोठ्या संख्येचा नायनाट करणेही अशक्य होते. कूकीजशिवाय कॉफीला काही अर्थ नव्हता. त्याने वैतागून गॅस बंद केला आणि पुन्हा कॉम्प्युटरमध्ये डोके खुपसून बसला. थोडी गाणी ऐकली. थोडे यूट्यूब विडिओ पाहिले. पण फार वेळ राहावले नाही. थोड्यावेळाने पुन्हा जंगली मराठीवर चक्कर टाकली. वीस-पंचवीस नवीन पोस्ट आल्या होत्या. वाद आणखी चिघळला होता. आता तो हिटलरवर पोहोचला होता. त्याने अधाश्यासारख्या सर्व पोस्ट वाचून काढल्या. हिटलरचेही समर्थक आहेत हे पचवणे त्याला जड जात होते. अवघड आहे सारे. पुन्हा एकदा तो या निष्कर्शापर्यंत पोहोचला. पोटातल्या कॉफीच्या तल्लफीने पुन्हा उचल खाल्ली. पण कूकीजशिवाय कॉफीला काही अर्थ नाही. आता तरी त्या मुंग्या आपल्या घरी गेल्या असतील का बघायला म्हणून उठला. पण त्या सुद्धा त्या सोशलसाईटवर पडलेल्या मुंगळ्यासारख्याच चिवट होत्या. हटायलाच तयार नव्हत्या. चरफडत त्याने एकीवर राग काढला. एक वाट सोडून भटकलेल्या मुंगीला बोट दाबून चिरडले. कडाकड तिची हाडे मोडली आणि तिथेच भिंतीला चिकटली. तो हाडं मोडायचा आवाज त्याच्या कानापर्यंत पोहोचला नाही. पण बोटाला जाणीव झाली. त्या संवेदना थेट मेंदूपर्यंत पोहोचल्या आणि अगदीच क्षुल्लक कारणासाठी एखाद्या निष्पाप जीवाची हत्या हातून घडल्याने त्याचे डोके गरगरू लागले. त्याच अवस्थेत तो पुन्हा कॉम्पुटरवर बसला. पण आता जंगली मराठीवर जायची भिती वाटू लागली. हिंसा, अहिंसा, गोहत्या, एका क्षुद्र मुंगीला चिरडणे, अहिंसो परमो धर्म:, ती माणसांनी माणसांची फोडलेली डोकी, रक्ताच्या चिळकांड्या, कडाकडा मोडलेली हाडे, त्यांचा मेंदूला होणारा त्रास.. डोके आणखी गरगरवून घ्यायचे नव्हते. कॉफीशिवाय पर्याय नव्हता. पण कूकीजशिवाय कॉफीला अर्थ नव्हता. ईतक्यात त्याला आठवले, काल रात्रीच्या चार शिल्लक कुकीज पुन्हा डब्यात भरून ठेवायचा कंटाळा म्हणून तश्याच ओवनमध्ये ठेवल्या होता. त्याने चटकन ओवनकडे धाव घेतली. जाता जाता कॉफीचा गॅस पुन्हा चालू केला. पण ओवनकडे पाहतो तर त्याचा दरवाजा तसाच उघडा होता. अरे देवा, नरम तर पडल्या नसतील. त्याने हाताने दाबून चेक करायला कूकीजकडे हात नेला. आणि पुन्हा झटका बसल्यागत हात मागे आला. पुर्ण प्लेट मुंग्यांनी भरली होती. एखाद्या नवीन मुंगीला प्लेटमध्ये पाय ठेवायलाही जागा नव्हती. ओवन ते शेजारची भिंत अशी एक आतबाहेर करणारी मुंग्यांची रांग लागली होती. किती होत्या त्या एकूण. शंभर दोनशे, हजार पाचशे. सहज असतील. आज ना कूकीज नशीबात होत्या ना कॉफी. संतापून ओवनचा दरवाजा त्याने बंद केला आणि एक विचार त्याच्या डोक्यात चमकला. स्विच ऑन केला आणि स्टार्ट बटण दाबले. ओवन तीस सेकंदावर सेट होत चालू झाला. भट्टीने पेट घेतला होता. आपसूक त्याचे हात कानावर गेले, तो आक्रोश त्या किंकाळ्या त्याला ऐकायच्या नव्हत्या. पण कानावर कसलाही आवाज येत नव्हता. मेंदूपर्यंत कोणत्याही संवेदना पोहोचत नव्हत्या. ना मनाला कोणत्या वेदना जाणवत होत्या. कानावरचा हात काढला. पंधरा सेकंद झाले होते. ईतके पुरेसे म्हणत त्याने ओवन बंद केला. दरवाजा उघडला. सर्व मुंग्या निपचित पडल्या होत्या. एक ओला फडका घेऊन त्याने ओवन पुसून घेतला. फडका धुताना मुंग्यांची प्रेतंही वॉशबेसिनमार्गे गंगेला मिळाली. कूकीजना चिकटलेल्या मुंग्यांना खरडवून त्याने साफ केले. त्यांच्याबद्दल आता फक्त सोहमलाच ठाऊक होते. प्लेट धुवून पुसून त्याने कूकीज पुन्हा प्लेटमध्ये ठेवल्या. प्लेट ओवनमध्ये ठेवली. आणि ओवनचा दरवाजा पुन्हा एकदा तसाच किंचित उघडा ठेवून तो कॉप्म्युटरकडे वळला. जंगली मराठीचे पेज रिफ्रेश केले. कोणीतरी आता तिथे हिटलरचा फोटो अपलोड केला होता. मिशीतल्या मिशीत सोहमकडे बघून तो हसत होता...

- ऋन्मेष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्लास जमलीये. एक प्रतीकात्मक प्रवास नकळतपणे / अपरिहार्यतेने घडलेला.
पण शब्दसंख्या (५७५) देणे आवश्यक आहे का?

बाप रे! महान. तू असे काही लिहीशील, लिहू शकशील असं वाटलं नव्हतं.
खूप छान लिहीलीयस तगमग. पोचली. पटली. म्हटलं तर काहीच नाही, कळलं तर बरच काही.
जबरदस्त!

मस्त.

बाप रे! महान. तू असे काही लिहीशील, लिहू शकशील असं वाटलं नव्हतं.
खूप छान लिहीलीयस तगमग. पोचली. पटली. म्हटलं तर काहीच नाही, कळलं तर बरच काही.
जबरदस्त! >>>>>>>+111111

"आणि बुद्ध हसला" इतकेच परिणामकारक लेखन! हिटलर आणि बुद्ध/गांधीजी एकाच मनाच्या दोन टोकाच्या अवस्था असू शकतात. मला तरी लेख असा पोहोचला.

अरे वा बरेच छान प्रतिसाद आले .. आभार सर्वांचे Happy

अजय चव्हाण, च्रप्स..
जास्त खोलात जाऊ अर्थ काढण्यात मजा नाही, तरी हिंसा अहिंसेच्या व्याख्या कालानुसार आणि परीस्थितीनुसार बदलतात असे समजा. बाकी हिटलर, गॅस चेंबर, ओवन याची लिंक लागणे अवघड नाही..

बाप रे! महान. तू असे काही लिहीशील, लिहू शकशील असं वाटलं नव्हतं.
>>>>>>>
सोनू, एकाच माणसाची एकापेक्षा जास्त रुपे असू शकतात. ज्यात तो कम्फर्टेबल असतो त्यात प्रत्यक्ष आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतो, तर जे आवडीचे असते त्यात सोशलसाईटवर बागडतो. याव्यतीरीक्तही काही अधनामधना दोन्हीकडे दिसत असतात. आणि ही सारीच खरीही असू शकतात Happy

अजय चव्हाण, च्रप्स..
जास्त खोलात जाऊ अर्थ काढण्यात मजा नाही, तरी हिंसा अहिंसेच्या व्याख्या कालानुसार आणि परीस्थितीनुसार बदलतात असे समजा. बाकी हिटलर, गॅस चेंबर, ओवन याची लिंक लागणे अवघड नाही....

आता कळली कथा..
हयावर चर्चा करायला आवडेल...

मलापण आत्ता झेपली.. या दोन लाईन्स मी मिस केल्या होत्या..

हिटलरचेही समर्थक आहेत हे पचवणे त्याला जड जात होते. अवघड आहे सारे.

क्लास !!
मस्त जमली आहे ऋन्मेऽऽष.
एकदम आवडेश Happy

Pages