सोबतीचं नाट्य

Submitted by मोहना on 14 November, 2017 - 21:27

"आता हातापाया पडून काही होणार नाही. काही बरं वाईट घडलं असतं तर तुझ्या आईला तोंड दाखवायला जागा उरली नसती. आता काही लहान नाहीस तू छाया." सुजाताचा पारा चढला होता. रंगीबेरंगी परकर पोलका घातलेली छाया निर्विकारपणे नखं कुरतडत तिच्यासमोर उभी होती.
"ठोंब्यासारखी काय उभी आहेस? आवर तुझं पटकन."
"सुजाताई, मी परत सांगते तुला; माजं टकुरं फिरलं म्हनून वंगाल वागले. पुना न्हाई व्हनार. देवाची आन." छायाने गळ्याची शपथ घेतली.
"काय व्हायचं राह्यलं आहे छाया? तुझ्यामुळे त्या गलिच्छ झोपडपट्टीत पाऊल टाकावं लागलं. आयुष्यात अशा जागी कधी पाय ठेवेन असं वाटलं नव्हतं." सुजाता चांगलीच वैतागली होती.
"ताई, झोपडपट्टी इतकी खराब नस्ती." रुसक्या आवाजात छाया म्हणाली.
"छायाऽऽऽ" सुजाताच्या आवाजातली जरब छायाला जाणवली. मुकाट्याने खोलीत जाऊन तिने स्वत:चे चार कपडे आणि किडूकमुडूक सामान गोळा करुन पिशवीत कोंबलं. पिशवीचे बंद घट्ट धरुन ती सुजातासमोर उभी राहिली. सुजाताने गडबडीत कापलेल्या केसावरून पुन्हा कंगवा फिरवला. ओठावरून लिपस्टिक फिरवली. अपराधी चेहर्‍याने तिच्याकडे पाहणार्‍या सासुबाईंकडे दुर्लक्ष करत त्यांना काहीही बोलायची संधी न देता ती छायाला घेऊन बाहेर पडली. छाया आणि सासूबाई, दोघींनाही समजावणं म्हणजे दगडावर डोकं फोडून घेण्यासारखं वाटत होतं सुजाताला. तसंही अधिक बोलण्याचं त्राण उरलं नव्हतं आणि इच्छाही. उल्हासच्या ताब्यात छायाला दिलं की ती सुटकेचा श्वास सोडणार होती. पुढे ठरल्याप्रमाणे तो सारं पार पाडेल याची तिला खात्री होती.

उल्हासबरोबर छाया निघाली खरी. पण नक्की काय झालं आणि सुजाताई इतकी वेड्यागत का ओरडत होती तेच छायाला कळत नव्हतं. वरडली तर वरडली वर उल्लासदादाबरुबर सोडून निगून बी गेली. कशापायी आनलं मग हितं? सुजाताईला झोपडपट्टीत जावं लागलं तर येवडं नाटक? नाटकीपना लई हाय तिच्यात. ताई रुबाबदार हाये. राहती बी असी टेचात की जीव दडपतो. पैका हाये तर उडवती कसा बी. हापिसीण हाय म्हनं. टकटक करत चाल्ती उंच टाचच्या चपला घालून आनि घरात फटाकफटाक स्लीपर उडवती. केसं इतक्या येलंला सरल करती, सारका चाला हातानी केसाबरुबर. हात कसं दुकत नाय देवजाने. जितं तितं केस पडत्यात. घानच की. पन त्येचं काय नाय. गरीब मानसं म्हंजी या लोकास्नी घान वाटती. सारकी नाक दाबत व्हती झोपडपट्टीतून येताना. मनातल्या विचारांना थोपवताना गावाकडे पाहिलेली सुजाताई आता फार बदललेली आहे याची छायाला खात्री पटली. वैनीबायची मुलगी तर ती अजिबात शोभत नाही या बद्दल मनात शंकाच उरली नाही छायाच्या. शहरातली माणसं एवढ्या तेवढ्याला घाबरतात का हे कोडंही सोडवता येत नव्हतं तिला. बाजूला बसलेल्या उल्हासकडे तिने पाहिलं. उल्हासदादाच्या बावळटपणाचीही तिला गंमत वाटत होती. सुजाताई आणि उल्हासदादा. डरपोक! त्यांचे त्यावेळचे चेहरे आठवून हसू दाबत राहिली ती कितीतरीवेळ. पण आता तिला वाईट वाटायला लागलं, चिडचीड व्हायला लागली. रडावंसं वाटत होतं. आईच्या आठवणीने छायाच्या डोळ्यांना धार लागली. उल्हासदादासमोर तिला रडायचं नव्हतं आणि ती रडतेय हे कळू पण द्यायचं नव्हतं. ती समोर बघत राहिली. डोळ्यांतून वाहणारं पाणी आपोआप सुकायला लागलं. मन थोडं शांत झाल्यावर सुजाताईची सासू महामाया वाटायला लागली छायाला. तिच्यामुळेच तर घडलं सारं. शहरातली माणसं पराचा कावळा करणं कधी सोडणार तेच तिला समजत नव्हतं. सुजाताईच्या तापट स्वभावाबद्दलही वैनीबायकडे तक्रार करावी लागणार होती. कळू दे वैनीबायला तिची लेक कशी आहे ती. गेल्या वर्षी गावाहून इथे यायचं पक्कं करायलाच नको असं वाटून गेलं छायाला. बेक्कार माणसं शहरातली. गावीच बरं होतं. मधलं एक वर्ष पुसून ती नांदगावला पोचली.

धो धो पावसात अंगावरचं कांबळं छायाने झटकलं आणि बंधार्‍यातल्या चिखलात हात घातला. भरपावसात दोन तास काम करुन ती वैतागली होती.
"ए, अगं द्यान कुटे तुजं? वैनीबाय बोलवती बग." आईच्या आवाजाने वाकलेली छाया ताठ झाली.
"कशापायी? तूच जा. मी नाई येनार आता."
"अगो, जा च्या देनार आसल. जा. तू परत आली की मी जाईन." चहाच्या नावानेच छायाला तरतरी आल्यासारखं वाटलं. पावसाच्या संततधारेमुळे चांगलंच अंधारुन आलं होतं. हवेतला गारवा अंगाला झोंबत होता. पळत पळत ती पडवीत येऊन विसावली. अंगावरचं कांबळं बाजूला ठेवून ओला झालेला चेहरा तिने पुसला. पाण्याच्या थेंबाआडून स्वयंपाकघराच्या पायर्‍या उतरुन येणार्‍या वैनीबाय कडे ती पाहत राहिली. वैनीबायचं टिळ्याएवढं कुंकू तिला फार आवडायचं. आणि नऊवारी साडी नेसावी तर वैनीबायनंच इतकी छान वाटायची तिला वैनीबाय नऊवारीत. वैनीबायच्या प्रसन्न चेहर्‍याकडे पाहिलं शांत वाटायचं. छायाच्या हातात चहा देऊन वैनी बाय बाजूलाच बसली. छायाने फुर्र, फुर्र करत चहा तोंडाला लावला.
"तू बेंगलोर बघितलं आहेस का गं छाया?" बशीतला चेहरा छायाने वर केला.
"हे काय हाय?"
"अगं आपल्या सुजाचं गाव."
"नाई ब्वॉ. मुंबयच्या जवल हाय का?" वहिनींना हसायला आलं.
"छे गं. पण जायचंय का तुला बेंगलोरला? सुजा म्हणत होती छायाला पाठवून दे म्हणून."
"अय्याऽऽ. मी नाई बाई. आनि सुजाताई मला का बोलावती?"
"मदतीसाठी."
"नाई जमायचं वैनीबाय. मी हितंच बरी हाये. आयेला हाय कोन माज्याबिगर." छाया पुटपुटली.
"तुझ्या आईशीच बोलते मी." छायाने नुसतीच मान डोलवली आणि निमूटपणे ती चहा पीत राहिली. वहिनींनी तिथूनच यमुनाला हाक मारली. यमुना येईपर्यंत पुन्हा चुलीवरचा चहा कपात ओतून त्यांनी गरम दूध टाकलं.
"घे. आभाळ भरुन आलंय आज अगदी." यमुना पुढे चहाचा कप धरत त्या म्हणाल्या.
"आये, वैनीबायला कायतरी विचारायचं हाये म्हनली ती." वहिनी हसल्या.
"अगं. चहा तरी होऊ दे पिऊन तिचा." यमुनाने घाईघाईत चहा ओठाला लावला. चहा पिऊन ती लगबगीने विहिरीपाशी गेली. कठड्यावरचा तांब्या तिने उचलला. पाणी होतंच त्यात. तिने पटकन दोघींचे कप धुऊन टाकले. धुतलेले कप उलटे करुन कट्ट्यावर ठेवले. पदराला हात पुसत ती वहिनी बसल्या होत्या तिथल्याच खालच्या पायरीवर टेकली.
"काय म्हनत व्हता वैनीबाय तुमी?" तिने उत्सुकतेने विचारलं.
"छायाला बेंगलोरला पाठव असं म्हणत होते."
"बेंगलोर? म्हंजी?" यमुनाच्या चेहर्‍यावर प्रश्नचिन्ह होतं.
"सुजाताकडे."
" अगोबाई, सुजाताईचं गाव."
"सुजाता मागे लागली आहे छायाला पाठवून दे म्हणून."
"व्हय की काय. पन कसापायी म्हनायचं?"
"मदत हवी आहे तिला घरकामात."
"अवं दोन मान्सं ती. मदद कसली लागते म्हंते मी." यमुनाला खुदकन हसायलाच आलं.
"तिच्या सासूबाई असतात तिच्याघरी. आमचे जावईबापू सतत देशाच्या बाहेर. सुजापण साहेबीण आहे कुठल्याशा कंपनीत. वेळ कुठे असतो तिला. घरात दिवसभर कुणी असेल तर बरं. सोबत होईल सासुबाईंना असं म्हणतेय ती. पत्र आलंय काल."
"तिकडं राजेस खन्नाचा पिक्चर गावल काय बगायला?" छायाने उत्सुकतेने विचारलं.
"सुजाता नेईल तुला पिक्चर दाखवायला." वहिनी हसून उत्तरल्या.
"आनि फॅसनची कापडं?"
"ती पण देईल सुजाता तुला. झालं समाधान?" वहिनींनी पुन्हा हसून विचारलं.
"हा. जाती मग मी. आये, आदी मी बगती कसं हाये सुजाताईचं गाव. मग तुला बी घेऊन जाईन." छायाला आता कधी एकदा बेंगलोर गाठतोय असं झालं. तिने कधी स्वप्नातही कल्पना केली नव्हती आणि अचानक स्वर्गाचं दार दिसायला लागलं होतं. तरी पत्रापत्री होऊन सारं ठरेपर्यंत महिना गेलाच.

शेजारच्या वाडीतल्या जाधवांबरोबर रात्रीच्या गाडीत तिला आईने बसवून दिलं तेव्हा पंधरा वर्षाच्या छायाच्या डोळ्यात उत्सुकता, भिती, आईला सोडून राहण्याच्या कल्पनेनं झालेलं दु:ख सार्‍या भावना एकवटून आल्या. आई एकटीने कसं निभावेल या शंकेने डोळ्यात अश्रू जमा झाले. अण्णा फणस उतरवताना झाडावरुन पडून वारले त्याला कितीतरी वर्ष झाली. तिला ते आठवतही नव्हते. तिच्या विश्वात ती आणि आई. दोघीच. वहिनींच्या घरातल्यांचाच आधार होता आणि ती सर्व खूप काळजी घेत मायलेकींची. वहिनींनी तर छायाने शाळेत जावं म्हणून कितीवेळा सांगून पाहिलं होतं. पण छायाला आवड नव्हती शाळेची. वहिनी मागे लागल्या की ती फक्त मान डोलवायची. चार घरची कामं करुन रोजचा दिवस सुखात जात होता मायलेकींचा. अधूनमधून टूरींग टॉकीजचा पिक्चर पाहिला की महिनाभर छाया त्या दुनियेत वावरायची. आता बेंगलोरला भरपूर पिक्चर पाहायचे सुजाताईबरोबर, काम करायचं, गाव फिरायचं, नवीन नवीन कापडं घालायची अंगावर अशी स्वप्न पाहत ती निघाली होती. सुजाताई गावी आली की किती छान गप्पा मारते, चौकशी करते. तिच्याबरोबर राहायचं म्हणजे मजाच. विचारांच्या या फांदीवरुन त्या फांदीवर उड्या मारणं चालू होतं छायाचं. बेंगलोरला कधी एकदा पोचतोय असं झालं होतं त्याचवेळी किती दिवसांनी परत यायला मिळेल असाही विचार डोकावत होता मनात. सुजाताई वर्षातून एकदा येते हे आठवलं आणि तिच्याबरोबर येता येईल या खात्रीने ती निश्चिंत झाली. सुजाताईला सांगितलं तर ती तिच्या आईलादेखील बेंगलोरला आणेल याचाही तिला भरवसा होता. बेंगलोर आवडलं तर बघू, ठरवू काय करायचं. विचारांचे तुकडे जोडता जोडता हातातलं बोचकं सांभाळत छाया खिडकीला डोकं टेकवून झोपायचा प्रयत्न करत राहिली. बेंगलोरला जायला खूप दिवस लागतात इतकंच ठाऊक होतं. मुंबईला सुजाताई तिला न्यायला येणार होती. सकाळी जाग आली तेव्हा परळ आलेलं होतं. अधीर नजरेने तिने बाहेर डोकावलं. सुजाताई दिसल्यावर बावरलेल्या नजरेने जाधवांचा निरोप घेऊन ती सुजाताईच्या मागून निघाली. एक दिवस मुंबईत राहून रेल्वेने बेंगलोरला पोचायचं होतं. पण सुजाताताईचा आधार होता त्यामुळे मनावर दडपण नव्हतं.

छाया बेंगलोरला पोचल्यावर भांबावलीच. खेडेगावातली छाया उच्चभ्रू वस्तीत येऊन पोचली होती. भाषेचा प्रश्न होता आणि त्यात येता जाता छायाच्या कानावर इंग्रजीच पडायचं. त्यातल्या त्यात संध्याकाळी खाली गेलं की तिच्यासारख्या गावाकडून आलेल्या मुलींबरोबर मोडक्या तोडक्या हिंदीत ती गप्पा मारायची. इमारतीच्या रखवालदाराबरोबर गप्पा मारण्याचं तर तिला वेडच लागलं होतं. तेवढाच विरंगुळा. दिवसभर कामापेक्षाही सुजाताच्या सासूच्या बडबडीची तिला कटकट वाटे. सुजाता येण्याच्या वेळेस तिच्या सासुबाईंच्या बडबडीकडे कानाडोळा करायला ती शिकली लवकरच. काहीतरी खुसपट काढून सुजाताची सासू बडबडायला लागली की तिला खूप राग येई. फुटाणा फुटल्यासारखी तीही तडतडायला लागायची. सात जन्म घेतले तरी म्हातारीचं समाधान करणं कठीण असं तिला ठामपणे वाटत होतं. केर काढायला लागलं की बसल्या बसल्या हाताने इथून केर काढ, तिथून केर काढ, भाजी चिरायला घेतली की अशी काप न तशी काप, कपडे वाळत घालायला गेलं की आडवे घाल नी उभे घाल सारखं तोंड चालू. कटकट! मग छाया पण काहीतरी खोड काढायची. त्रास द्यायची मुद्दाम. रात्री सुजाता यायच्या वेळेस मात्र छायाचं रुप वेगळं असायचं. आपण ताईच्या सासूची किती काळजी घेतो हे ती दाखवून द्यायची. त्यामुळे सासूने छायाबद्दल केलेल्या तक्रारी सुजाता ऐकून घ्यायचीच नाही. सुजाता सासूवर डाफरली की छाया मिष्कील नजरेने पाहत राहायची. पण आज मात्र अती झालं. सकाळपासून पिरपिर आणि चुका दाखवणं त्यात त्या तिच्या कपड्यांवर घसरल्या.
"छाया, जरा कपड्याचं भान बाळग." सुजाताच्या सासूबाईंनी रेडिओचा आवाज कमी केला. त्यांच्यासमोर तांदूळ निवडत बसलेल्या छायाच्या उघड्या पडलेल्या गुडघ्यांकडे नजर टाकत त्या म्हणाल्या.
"काय जालं? तुमी आनि मी. हाय कोन दुसरं हितं?" पटकन कपडे नीट करत छाया गुरकावली.
"तसं नाही. सवय होते. तरुण वय आहे तुझं. जपावं स्वत:ला."
"सुजाताई स्लिवलेस घालून जाती की कामाला. तिला न्हाय काय सांगत तुमी."
"सुजाताईचं तू मला नको सांगू. पायरी सांभाळून राहावं माणसानं." छायाने नाक मुरडलं तशा त्या आणखी चिडल्या. "आणि बघावं तेव्हा बाहेर पळत असतेस. काय खाणाखुणा चालू असतात गं तुझ्या त्या रखवालदाराबरोबर?" छायाने चमकून पाहिलं.
"कोन रखवालदार?" निर्विकार चेहरा करत तिने विचारलं. त्या काहीच बोलत नाहीत हे पाहून पुढे छायाच म्हणाली, "तुमची नजरच वंगाल तर मी काय करु?"
"चार शहाणपणाच्या गोष्टी सांगतेय तुला. ऐकायंचं की नाही तू ठरव. पण अशीच वागत राहिलीस तर सुजाताला सांगून गावी पाठवून देते तुला." सुजाताच्या सासूबाई समजुतीने सांगत होत्या पण छाया भडकली.
"ए, ऐकून घेती म्हनून लई शानपना कराय लागली तू. " छायाने तांदळाचं ताट दाणकन फरशीवर आपटलं आणि ती त्यांच्या अंगावर धावून गेली.
"काय करशील गं तू? अक्कल नाही काडीची आणि मला तोंड वर करुन बोलतेस?" सुजाताच्या सासूबाईंनी तिचा हात घट्ट धरला. मनगट लाल झालं छायाचं. सुजाताने हजारवेळा बजावूनही त्यांना शांत राहता येईना. छायाही त्यांच्या डोळ्याला डोळा देऊन उत्तरं देत राहिली. दोघी कडाकड भांडत राहिल्या. कुणीतरी दार जोरात वाजवलं आणि चपापून दोघी शांत झाल्या.
"दार उघड." सुजाताच्या सासूबाईंनी हुकूम सोडला. पाय आपटत छायाने दार उघडलं आणि दारात कोण आहे हे ही न बघता ती जिन्याच्या दिशेने निघाली. पायर्‍या उतरेपर्यंत तिचा श्वास फुलला होता. इमारतीच्या खाली उतरल्यावर फाटक जोरात उघडून बंद करुन ती रस्त्यावर आली. आता? क्षणभर रस्त्यावरची कुठली दिशा पकडावी या संभ्रमात ती तशीच थांबली. तिडीक आल्यासारखी समोरची रिक्षा तिने थांबवली.
"राजिंदरनगर" दाणदिशी ती रिक्षात बसली. इमारतीत काम करणार्‍या खूप मुली तिथे राहतात एवढंच माहीत होतं छायाला. तिच्या मनातला संताप खदखदत होता.
"साली, रोजची कटकट. मरत पन न्हाय लवकर..." मनातले विचार बाहेर आले असावेत. रिक्षावाला आरशातून मागे बघायला लागला.
"पुडं बग." छाया वसकन ओरडली. रिक्षावाल्याला काही कळलं नाही तरी पटकन त्याने नजर वळवली. छाया रस्त्याच्या दोन्ही बाजूने मागे पडणार्‍या गर्दीकडे बघत राहिली. ’थेरडीचं तोंड बघणार नाही पुन्हा.’ गार वारा अंगावर झेलत तिने मनात पक्कं केलं तसं तिला बरं वाटलं. पण संतापाने का कशाने डोळ्यातून पाणी गळायला लागलं होतं. रिक्षा गचकन थांबली तशी ती भानावर आली.
"काय जालं दादा?" गोंधळून तिने विचारलं.
"राजेंन्द्रनगर आलं. कुठं जायचं आहे? पत्ता काय आहे?" राजेन्द्रनगर म्हटल्यावर ती उतरली. पुढचं ऐकायला ती थांबलीच नाही तसंही तो माणूस कानडीत बोलत होता. ती त्याच्याकडे पाठ करुन चालायला लागली. रिक्षा घाईघाईत बाजूला उभी करुन रामण्णा तिच्यामागे धावले.
"मुली, अगं पैसे दे. इथपर्यंत आणलं तुला." छायाने मागे वळून पाहिलं नाही. रामण्णांनी धावत येऊन तिचा हात पकडला. तिने मान वळवून पाहिलं. तिच्या डोळ्यातलं पाणी पाहून रामण्णा गडबडले.
"काय झालं? हरवली आहेस का बेटी? कुठे जायचं, कुठून आलीस?" छाया नुसतीच त्यांच्याकडे पाहत राहिली. एक अक्षर कळत नव्हतं.
"इथे जवळच पोलिसठाणं आहे. तिथे सोडतो मी तुला. पोलिस मदत करतील." छायाला फक्त पोलिस हा शब्द कळला आणि रामण्णांचा हात झिडकारुन ती पळायला लागली. आजूबाजूला जमलेल्या लोकांना रामण्णा काय झाले ते सांगत होते तोपर्यंत छाया लांबवर पोचली होती. काही सुचत नसल्यासारखी ती भरकटत फिरत राहिली. वाटेत एका दुकानाच्या आडोशाला बसून तिने गुडघ्यात डोकं खुपसलं. रडावंसं वाटत होतं. आई पाहिजे होती. नाहीतर सुजाताई तरी. आता तिला घरी परत जावंसं वाटायला लागलं. पण सुजाताईच्या सासूबद्दल भिती दाटून आली. सुजाताईला एव्हाना काय झालं ते कळलं असेल. ती घरी आली असेल. भिरभिर्‍या नजरेने ती इकडे तिकडे पाहत राहिली. रस्त्यावरची गर्दी, गाड्या, कानडी भाषा कान किटायला लागले छायाचे. किती वेळ गेला कुणास ठाऊक. तास, दोन तास... ती तशीच बसून राहिली. हातापायातलं त्राण गेल्यागत. राजेन्द्रनगरात ती पोचली होती. आता तिला एखाद्या तरी मैत्रिणीला गाठायचं होतं. उठावसं वाटत होतं तरीही ती हलली नाही. येणारी जाणारी माणसं बघत राहिली. त्या तेवढ्या माणसात कुठेतरी तिला रामबहादूर दिसला. आनंदाने उडी मारावी असं वाटत होतं छायाला. उठलीच ती. धावत जाऊन तिने त्याला गाठलं.
"तू इकडे?" त्यालाही आश्चर्य वाटलं.
"तू राजिदंरनगर मदी रातोस?" त्याने मान डोलवली. पण ती या भागात कशी ते त्याला समजत नव्हतं.
"तू मला गावाकडं जानार्‍या गाडीत बसवून देसील?" तिने हळूच विचारलं. रामबहादूरच्या ती घरुन निघून आली आहे हे लक्षात आलं.
"भांडलीस?" त्याने विचारलं. तिने उत्तर दिलं नाही. रडायलाच यायला लागलं तिला. रामबहादूर गडबडला.
"छाया, रस्त्यावर नको रडूस. असं करु, तुला भूक लागली असेल ना? समोरच्या हाटेलात जाऊ चल." त्याच्या आपुलकीच्या स्वराने तिला अजून मोठ्यांदा रडावंसं वाटत होतं. पण डोळे पुसत ती त्याच्या मागून चालत राहिली. इडली, डोसा पोटात गेल्यावर तिला बरं वाटलं.
"चल, जाऊ या?" तिला कधी एकदा नांदगावला परत जाऊ असं झालं होतं.
"तुझी गाडी रात्रीची असेल. आणि मुंबईपर्यंत जाशील इथून. तिथून पुढे कशी जाणार?" रामबहादूरलाही नीट काही ठरवता येत नव्हतं.
"मी गाडी येईस्तो थांबती ना तितंच. मुंबयला पोचले की बगीन माजं मी कसं जायचं गावी ते. पन इतं नाही रानार मी."
"ऐक माझं. मॅडमला मी सांगतो काहीतरी. घरी सोडतो मी तुला. तिथून दुसर्‍या बिल्डिंगकडंकडं जाईन. रात्री तिथं ड्युटी आहे."
"मग आदी मला गाडीत बसव आनि जा."
"तुझ्या मॅडमला कळलं तर माझी नोकरी गेलीच समज." त्याला हे नसतं झेंगट कसं दूर करायचं ते कळत नव्हतं.
" तिला नाय कलनार पन मला गावीच जायाचं हाय." छाया ठाम होती.
"कामावर सांगून यायला लागेल. न सांगता आलो तर नोकरी जाईल."
"मी पन येते." ती त्याच्याबरोबर निघाली. त्याने आपल्या कामाच्या जागी आज रात्री येणार नसल्याचं सांगितलं आणि पुन्हा रस्ता पकडला. मुंबईला जाणार्‍या गाड्या सगळ्या रात्रीच्या. दहानंतर. अजून पाच सहा तास कुठे काढायचे? विचार करुन त्याने तिला खोलीवर न्यायचं ठरवलं. पण लगेच त्याच्या डोळ्यासमोर खोलीतलं दृश्य आलं. नेहमीप्रमाणे दोन - चार जणं पडीक असणार तिथे आजूबाजूच्या खोपटातली. काय करायचं? गाडीची वेळ होईपर्यंत थांबण्यासारखं ठिकाण त्याला आठवेना. खोलीवर पोचलो की बघू असा विचार करत तो छायाबरोबर चालत राहिला. आज पहिल्यांदाच तो असा एखाद्या मुलीबरोबर चालला होता. उगाचच काहीतरी पराक्रम गाजवल्यासारखं वाटत होतं त्याला. छाती ताठ करुन खूशीत गप्पा मारत तो छायाबरोबर चालायला लागला. गल्लीबोळातून चालताना छायाचा नकळत होणारा स्पर्श त्याला आवडायला लागला. एक दोनदा त्याने उगाचच तिच्याशी जवळीकही केली. छाया सुजाताच्या सासूच्या तक्रारीमध्ये इतकी गर्क होती की तिला त्याने जाणूनबुजून केलेला स्पर्श जाणवलाही नाही. रामबहादूर मात्र आता अस्वस्थ व्हायला लागला. छायाला एकदम जवळ घ्यावं असंच वाटायला लागलं त्याला. मनातल्या विचारांना थारा न देण्यासाठी तो झपाझप पावलं टाकत चालायला लागला. छाया मागे राहिलेली लक्षातच आलं नाही त्याच्या. पळतपळत छायाने त्याला गाठलं आणि त्याचा हात पकडला तसा तो थांबला. छायाच्या स्पर्शाने अंगातून वीज गेल्यासारखं वाटलं त्याला.

घरुन फोन आल्याचं तिच्या सेक्रेटरीने सांगितल्यावर सुजाताला आश्चर्यच वाटलं. सासूबाई कधीच फोन करत नसत. काय झालं असेल? गडबडीने तिने फोन घेतला.
"अगं, छाया गेली घरातून निघून."
"बाहेर गेली असेल. येईल. इतक्या का घाबरताय तुम्ही?" सुजाताने त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. पण त्या श्वासही न घेता सांगत राहिल्या.
"रागावून गेली आहे ती सुजाता. मी दोन तास वाट पाहूनच फोन करतेय तुला. तू ये बाई घरी." सुजाताने फोन ठेवला आणि ती निघालीच. तिला सासूचा राग आला. ’नवरोजींनी इथे मला ठेवलंय आईच्या दिमतीला स्वत: गर्क परदेश वार्‍या करण्यात. येता जाता छायाचा उद्धधार चालू असतो. गेली असेल डोकं शांत करायला. येईल. आणि शोधायचं तर कुठे शोधायचं आता तिला आणि कसं?’ मनातल्या मनात तिने सासू, नवरा दोघांना शिव्या घातल्या. पण छाया घरी येणं महत्वाचं होतं. वाट चुकली तर सांगताही नाही येणार तिला परत कसं घरी जायचं ते याची सुजाताला खात्री होती. आणि काही बरंवाईट झालं तर कोणत्या तोंडाने ती यमुनाकाकूंना, छायाच्या आईला तोंड दाखवू शकली असती? काहीतरी करणं भाग होतं. तातडीने. विचार करुन तिने उल्हासला बरोबर घेतलं. उल्हास आणि ती कंपनीत एकत्रच लागले होते आणि तेव्हापासून चांगले मित्रही झाले होते एकमेकांचे. तो चटकन निघाला सुजाता बरोबर.
"आधी घरी जाऊ. कदाचित आली असेल घरी ती. तिला बेंगलोर नवखं आहे अजूनही. जाणार नाही लांब. " उल्हासचं म्हणणं सुजाताला पटलं. तिची गाडी होतीच. तरी पोचायला अर्धा तास लागला. छाया आलेली नव्हती. सासूबाईंकडे रागाचा कटाक्ष टाकत सुजाता शेजारच्या घरांची दारं ठोठवायला लागली. तिथे काम करणार्‍या मुलींकडून छायाबद्दल काही कळेल अशी अपेक्षा होती. कुणीतरी रामबहादूरचा उल्लेख केला. घाईघाईत सुजाता खाली गेली. उल्हास आधीच तिथे चौकशी करत होता. रामबहादूरला आज सुटी होती. तो दुसरीकडेही कुठेतरी काम करतो एवढंच चौकीवरचा माणूस सांगू शकला. त्याच्या घराचा पत्ता चौकीदाराने कागदपत्रातून शोधून दिला. उल्हास आणि सुजाता राजेंन्द्रनगरशी पोचले. वाटेत जाताना प्रत्येक वळणापाशी सुजाता गाडी थांबवायला लावत होती. कुठेतरी रस्त्यातच कदाचित सापडेल. फिरत असेल इकडेतिकडे असं तिला वाटत होतं. सुजाता बेचैन व्हायला लागली. छायाने काय कपडे घातले आहेत तेही तिला आठवेना. छायाच्या अंगयष्टीची, साधारण तिच्यासारखेच कपडे घातलेली प्रत्येक मुलगी तिला छाया वाटत होती. पण गाडी राजेन्द्रनगरपाशी पोचली तरी वाटेत कुठे छाया नजरेला पडली नाही. सुजाताने आजूबाजूचा गलिच्छपणा पाहिला आणि छाया रामबहादूर बरोबर इथे येईल हे तिला पटेनाच. खेडेगावात शुद्ध हवेत वाढलेली मुलगी होती ती. पण आता विचार करण्यात अर्थ नव्हता. गाडी राजेन्द्रनगरच्या बाहेर उभी करुन गल्लीबोळातून कसंबसं त्यांनी रामबहादूरची खोली शोधली. आजूबाजूच्या नजरा दोघांवर रोखलेल्या होत्या. दोघांनाही अवघडल्यासारखं झालं होतं पण विचार करायची वेळ नव्हती. रामबहादूर आणि छाया दिसल्याशिवाय चैन पडणार नव्हतं. दोघं खोलीशी पोचले. दार उघडंच होतं. आता दोघं तिघं जोरजोरात गप्पा मारत होते. समोर रिकाम्या बाटल्या पडलेल्या होत्या. त्यातलाच एखादा रामबहादूर असेल असं वाटलं उल्हासला. पण तिथेही तो नव्हता. खोलीतलं कुणीच धड काही सांगू शकतील अशा अवस्थेत नव्हतं. तो आणखी कुठे काम करतो त्या ठिकाणाचा पत्ता मिळवायला हवा होता. दोघं दिसेल त्याला विचारत राहिले. अखेर कुणीतरी तो मिळवला. उल्हास आणि सुजाता तिथे पोचले तर तो तिथून अचानक निघून गेलेला. का, कुठे याबद्दल काही समजलं नाही तरी आता असली तर छाया त्याच्याचबरोबर असेल याबद्दल दोघांनाही खात्री पटली होती. पण रामबहादूरला कुठे शोधायचं हा पेचच होता. सुजाता आणि उल्हास दोघंही थकले होते. जरा बर्‍या दिसणार्‍या हॉटेलमध्ये जाऊन काहीतरी पोटात ढकलायचं त्यांनी ठरवलं. रस्त्यावर नजर ठेवता येईल असं हॉटेल निवडून ते दोघं अस्वस्थपणे बसून राहिले. बराचवेळ गर्दी निरखित राहिले. छाया दिसेल असं उगाचच वाटत होतं सुजाताला. पण रस्त्यावरच्या गर्दीत छाया ओळखू येणं कठीणच होतं. सासूबद्दलची नाराजी ती उल्हाससमोर व्यक्त करत राहिली. उल्हास निमूटपणे सुजाताला तिच्या भावना व्यक्त करु देत होता. तासाभराने दोघं तिथून बाहेर पडले. परत रामबहादूरच्या गल्लीत पाऊल टाकायची इच्छा नव्हती. पण तो परत आला असण्याची शक्यता होती. त्याच्या खोपटापाशी पोचेतो वाटेत दारु पिऊन बरळणारी, आरडाओरडा करणारी माणसं, गटारातलं सांडपाणी, येता जाता इथेतिथे थुकणारी पोरं नकोच वाटत होतं पण इलाज नव्हता. तोंडावर हात दाबत, घाणीत पाय पडणार नाही याची काळजी घेत दोघं खोलीशी पोचले. आतून जोरजोरात हसण्याचा आवाज येत होता. मगाचीच असतील सगळीजणं की आला असेल रामबहादूर परत? हळूच उल्हासने वाकून पाहिलं आणि त्याच्या अंगावर काटा आला. खोलीतली तरुण मुलगी छायाच असणार हे त्याच्या लक्षात आलं. छायाची नजर आणि तिच्याशी लगट करणारे चार पुरुष! उल्हासच्या शरीरातून भितीची लहर आरपार गेली. मागून डोकावणार्‍या सुजाताने त्याच्या खांद्यावर हात ठेवला तसं तो गरकन वळला. सुजाता छायाला हाक मारेल नाहीतर आत शिरेल ह्या कल्पनेनेच त्याचं धाबं दणाणलं. त्याने सुजाताला हाताने बाजूला खेचलं. भिंतीशी पाठ करुन तो कुजबूजला.
"तिला हाक मारु नकोस. सोडणार नाहीत ते तिला. अंगावर धाऊन येतील आपल्या."
"अरे पण काही तरी करायला हवं ना. मुर्ख मुलगी. काडीची अक्कल नाही." सुजाता पुटपुटली.
"भरपूर प्यायलेली आहे ती."
"बेभान झाल्यासारखी वागतेय." सुजाताच्या मनात छायाच्या वागण्याची चीड साठत चालली होती.
"काय करायचं? तिला तिथून सोडवायचं कसं?" छायाला तिथून तातडीने बाहेर कसं काढायचं याच विचारात होता उल्हास.
"पोलिसांकडे जाऊ या?" इतकी सोपी गोष्ट सुचली कशी नाही याचं आता तिला आश्चर्य वाटलं.
"पोलिसांना घेऊन येईपर्यंत काय होईल कुठे ठाऊक आहे आपल्याला? आत्ताच लांडग्यांसारखे तिच्या अंगाशी झोंबतायत. तिला पाजली आहे भरपूर. शुद्ध हरपल्यासारखी बरळतेय ती." दोघं काही न सुचल्यासारखे आत मध्ये डोकावून पाहत होते. दारासमोरुन येणार्‍या जाणार्‍यांच्या नजरा अंगाला बोचत होत्या ते वेगळंच. आतमध्ये चाललेला गोंधळ तिथे राहणार्‍या लोकांना नवीन नसावा. आजूबाजूच्या झोपड्यातून भांडणांचे, बरळण्याचे आवाज येतंच होते. पण सुजाता आणि उल्हास सारखी माणसं तिथं येणं त्यांच्यासाठी नवीन होतं. सुजाताला तिच्यावर खिळणार्‍या नजरा देहाची चाचपणी करतायत असंच वाटत होतं. अंगावरचा शर्ट सहजासहजी झाकताही येत नव्हता. ओढणी असती तर बरं असं तिला प्रकर्षाने जाणवायला लागलं. दोघांची बेचैनी वाढत होती. नक्की काय करायचं ते उलगडत नव्हतं. अखेर इकडे तिकडे पाहत धाडसी निर्णय घेतला सुजाताने. उल्हासला हाताने बाजूला करुन ती आत धावली. छायाच्या कपड्यांशी चाळा करणार्‍या चौघांना काही कळायच्या आत तिने छायाला खेचलं. जोरात ओरडत ती छायाला बाहेर काढू पाहत होती. छाया काही न कळल्यासारखी तिथेच उभी राहिली. तोपर्यंत उल्हास आत आला. त्या एवढ्याशा खोलीत इतकं माणसं मावतही नव्हती. तारवटलेल्या डोळ्यांनी सगळेजण सुजाताकडे पाहत होते. उल्हासने सुजाताला दाराच्या बाहेर ढकललंच. तिच्या दिशेने येणार्‍या रामबहादूरला पोटात त्याने गुद्दा हाणला. रामबहादूरचा तोल गेला. दोघं स्वत:चा तोल सांभाळत त्याला सावरायला पुढे झाले. तिसरा उल्हासच्या अंगावर धावून आला. उल्हासने स्वत:ला कसंतरी त्यांच्या तावडीतून सोडवलं आणि तो खोलीच्या बाहेर पडला. झोपडीच्या बाहेरच वाहणार्‍या गटारात त्याचा पाय जाताजाता वाचला. छायाला घट्ट धरुन धडधडत्या काळजाने सुजाता बाहेर उभी होती. रामबहादूर बरळत बाहेर आला आणि त्याने छायाचा हात पकडला.
"तिला मी गाडीत बसवून देणार आहे. सोडा तिला." सुजाताचा पारा चढला. पण सुजाताने काही करण्यापूर्वीच उल्हासने रामबहादूरचा शर्ट पकडत सणसणीत ठेवून दिली. रामबहादूर गाल चोळत राहिला तसं तोच हात खेचून सुजाताने पिरगळला.
"बेशरम. तुला कळतंय का काय करतो आहेस तू? नोकरी गेलीच आता तुझी. तुरुंगाची हवा खायला पाठवते थांब तुला." सुजाताचे डोळे आग ओकत होते. झोपडपट्टीतली माणसं जीन्समधली बाई रामबहादूरचा हात पिरगळते आहे हे बघून फिदीफिदी हसत जमा झाली होती. पण हळूहळू उल्हासला त्या घोळक्याची भिती वाटायला लागली. थोबाडीत खाल्लेल्या रामबहादूरचा खाऊ का गिळू आविर्भाव त्याला अस्वस्थ करायला लागला. त्याच्या बाजूला येऊन उभे राहिलेले त्याचे मित्र आणि तो आता शांत राहणार नाहीत असं त्याला राहून राहून वाटत होतं. आपल्यासारखी दोन पांढरपेशी माणसं क्षणात नष्ट करायला या लोकांना वेळ लागणार नाही असं त्याला वाटायला लागला. पन्नास साठ चेहरे नाकेबंदी केल्यासारखे खुणावत होते. काही झालं तर मुंगीसुद्धा सहज बाहेर पडू शकणार नाही इतकी गर्दी तिथे होती आणि ती देखील झोपडपट्टीत राहणार्‍यांचीच. त्यात दोघांचा निभाव लागणं निव्वळ अशक्य होतं. छाया चाललेला गोंधळ विस्फारीत नजरेने नुसताच पाहत होती. घाबरुन, गोंधळून. इंग्रजीचा आधार घेत सुजाताला तिथून निघायला हवं असं तो परोपरीने सांगत होता पण सुजाता ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. रामबहादूरने सुजाताचा हात झटकला आणि तो उल्हास समोर तोल सावरत उभा राहिला.
"साहेब, माझ्या थोबाडीत मारली हे चांगलं नाही केलं तुम्ही. ह्या मॅडमना सांगा, पुरुषाची जात आहे माझी. त्यांनी नाही मला शहाणपणा शिकवायचा. माझी चूक नाही. ही पोरगीच माझ्याकडे आली. गलती हो गयी. माफ कर दो. नौकरी से मत निकालो साब मुझे. आपही बताओ मॅडमको. जेल मे नही जाना है मुझे. मै तो उसे कल ले के आनेवाला था...." उल्हासने मान डोलवली. पण सुजाताला राहवलं नाही.
"कल? पळून आलेल्या मुलीला रात्रभर ठेवणार होतास? तुझ्याबरोबरच्या दारु प्यायलेल्या त्या धटिंगणाबरोबर? आणि काय चाळे चालले होते रे तिच्या अंगाशी?" उरलेले तिघं फिस्सकन हसले.
"मॅडमऽऽ" किंचाळत रामबहादूर सुजाताच्या अंगावर धावला. उल्हास चिडलाच सुजातावर.
"सुजाता, पाऊल उचल पटकन. क्षणभरही थांबून चालणार नाही. ऐकलं नाहीस तो काय म्हणत होता. सगळे अंगावर धाऊन आले तर मेलोच समज आपण. आता आणखी कसली भर पडायला नको." सुजाताला उल्हासचं ऐकायचं नव्हतं पण गोंधळ वाढत चालला होता. आणखी काही घडण्याच्या आत निघणं भाग होतं. रामबहादूरकडे नजर टाकून छायाचा हात धरुन सुजाता निघाली. छायाला उभं आडवं फोडून काढावं छायाला असं वाटत होतं. संतापाने तिच्या अंगाची लाही लाही झाली होती. घरी पोचलं की सासूबाईंवर तोंडसुख घ्यायचं, सोसायटीत रामबहादूरची तक्रार नोंदवायची की पोलिस चौकीत आताच छायाला घेऊन जायचं अशा विचारांचं चक्र सुरु झालं तिच्या मनात. गल्ली, बोळ तुडवता तुडवता पोलिसांकडे न जाण्याचं तिने निश्चित केलं. एकदा पोलिसांकडे गेलं की छायाला ते प्रकरण संपेपर्यंत इथेच राहावं लागेल हे तिला कळत होतं आणि यानंतर एक क्षणही तिला छायाची जबाबदारी नको होती. छायाला नांदगावला ताबडतोब परत पाठवायचं एवढंच तिचं ध्येय होतं. उल्हासला ती पुन्हा गळ घालणार होती. छायाला नांदगावला पोचतं करायचं. कसंही, आजच, लगेचच!

(अनुराधा २०१७ च्या दिवाळी अंकात ही कथा प्रसिद्ध झाली आहे.)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

पटली. सुजातावर आला तसा प्रसंग आपल्यावर येतो की काय या टेन्शनमध्ये काढलेला ४ वर्षांपूर्वीचा अर्धा (च) तास डोळ्यासमोरून तरळून गेला.

प्रतिक्रियाबद्दल धन्यवाद.
<<<सुजातावर आला तसा प्रसंग आपल्यावर येतो की काय या टेन्शनमध्ये काढलेला ४ वर्षांपूर्वीचा अर्धा (च) तास डोळ्यासमोरून तरळून गेला.>>> <<<पटली ही गोष्ट... काही मैत्रिणीकडून असे प्रकार ऐकले आहेत..>>> धनवन्ती, अगदी असे खूप प्रकार ऐकीवात आहेत. वावे, कथेत दाखविलं आहे त्या स्वरुपाच्या प्रसंगातून आमचा एक मित्र गेला आहे.
<<<कथा अपूर्ण वाटते>>> धन्यवाद. नक्कीच विचार करेन काही बदल करता येईल का त्याबद्दल.

छान आहे कथा पण अचानक संपल्यासारखी वाटली. थोडी अपूर्णदेखील वाटली . सुरुवातीला छायाच्या मनातील विचार दाखविले गेलेत पण सुजाताचे विचार मांडायला हवे होते का? तिचे पात्र अजुन छान रंगविता आले असते.

छान कथा! कथा काहीशी अपूर्ण वाटतेय तेच मला आवडले. कारण वास्तवात अशा परीस्थितीत क्लोझर असे नसतेच. अचानक उद्भवलेल्या प्रसंगातून त्यावेळेपुरते सुखरुप बाहेर पडणे एवढेच हातात असते.

स्वाती२ तुमचा प्रतिसाद पाहून बरं वाटलं. म्हणजे काय अपूर्ण वाटत असावं याचा अंदाज येत नव्हता. एकदा वाटलं की सुरुवातीला जो प्रसंग आहे तो शेवट पुन्हा जसाच्या तसा घालून सुजाताच्या मनातले विचार दाखवावेत का पण मला ते कथा अगदी उलगडून सांगितल्यासारखं वाटत होतं आणि तुम्ही जे म्हणताय तसं अशा प्रसंगातून सहीसलामत बाहेर पडणं हेच माणूस पाहत असतो त्यामुळे त्याला निश्चित शेवट नसतो हे मला शब्दात मांडता येत नव्हतं ते तुम्ही केलंत. धन्यवाद!