तुम्ही वाचायला पुस्तक कसे निवडता?

Submitted by टवणे सर on 3 August, 2017 - 17:59

मायबोली विविध विषयांवर, विविध वारंवारितेने वाचणारे लोक आहेत. आजच्या जमान्यात छापील पुस्तकांबरोबरच अनेक जण इ-पुस्तके व ऑडिओ-पुस्तकेदेखील वाचत/ऐकत असतील. आंतरजाल उपलब्ध व्हायच्या आधीच्या जमान्यात पुस्तकाबद्दल माहिती मिळवण्याची साधने व आंतरजालाच्या युगातील साधने यात जमीन-आस्मानाचा फरक पडला आहे. लोकं एखादे पुस्तक का वाचायला सुरू करतात, तेच पुस्तक का, त्याबद्दल माहिती कुठून मिळते की फक्त लायब्रीत्/दुकानात चाळता चाळता पुस्तक उचलतात याबद्दल माझ्या मनात उत्सुकता आहे.

तेव्हा वर्षाकाठी एखादे पुस्तक वाचणार्‍यांपासून आठवड्याला चार पुस्तके संपवणार्‍या सर्वांनी 'एखादे पुस्तक वाचायला घ्यायचे तुम्ही कसे ठरवता?' आजच्या युगात तुमची वाचण्याची यादी कशी बनते, पुस्तके कशी निवडता यावर लिहावे ही विनंती.

माझ्याबद्दल सांगायचे तर:
आजकाल बर्‍याचदा पुस्तक खरेदी ही फक्त विमानतळावर होते. तेव्हा मी पुस्तक विकत घेताना बरेचदा फक्त चाळतो आणि घेतो. पण पुस्तक विकत घेण्याचे प्रमाण बरेच कमी आहे.
पुर्वी पुस्तके विकत घ्यायचो विशेषतः मराठी पुस्तके ती माहिती असलेल्या लेखकांची वा ज्यांचे वाचन माझ्यासारखे (म्हणजे आवडी-निवडीबाबतीत) त्यांनी शिफारस केलेल्या, सुचवलेल्या लेखकांची.
मी ज्या ज्या मराठी ग्रंथालयात सभासद होतो ती तुलनेने छोटी ग्रंथालये होती. फारतर एखादा मजला, १५-२० कपाटे इतपत पसारा. तेव्हा मराठी पुस्तके ग्रंथालयात जाऊन, अनेक पुस्तके चाळत चाळत घेतली जात. अर्थात ती निवड करताना विशिष्ट लेखक, प्रकाशन वा पुस्तकाचा विषय या चाळण्यातून होत असे. उदा. कव्हरवर भडक रंगात साडीचा पदर दहा फूट मागे लोळवत खिडकीतून बाहेर दूरवर जाणार्‍या वाटेकडे डोळे लावून बसलेल्या बाईचे चित्र असलेली 'शिशीर', 'उन्हाची सावली', 'अंतरीची पाउले', 'मौनव्रती' वगैरे नावाची १००पानी पुस्तके ही बाजूल सारली जात. काही बहुप्रसवी लेखक (सुशि, गुरुनाथ नाइक, बाबा कदम वगैरे) बाजूल सारले जात. काही लेखक जसे श्री ना पेंडसे आपोआप उचलले जात असत. नॉन फिक्शन वाचताना बरेचदा एका पुस्तकातून दुसर्‍याचा पत्ता लागे. उदा. व्यंकटेश माडगुळकरांच्या पुस्तकात ऑल क्वायेट ऑन वेस्टर्न फ्रंटचा पत्ता लागला.
इंग्रजी पुस्तकांची नावे/लेखक ओळख पण अश्या मराठी पुस्तकांतून झाली. पुढे कॉलेजात हॉस्टेलवर समविचारी/वाचणार्‍या मुलांकडे कोएट्झी, अरुंधती रॉय, नायपॉल या अश्या अनेक लेखकांची एखादी एखादी पुस्तके वाचली गेली व एकातून दुसरे करत अनेक लेखक हाताशी लागत गेले. हैद्राबादच्या ब्रिटिश कौन्सिलचाही पसारा छोटाच होता. तिथे अशीच चाळत चाळत पुस्तके घेतली जात.

आता मात्र इथे अमेरिकेतल्या तुलनेने प्रचंड मोठ्या पब्लिक लायब्रीत पुस्तके चाळत निवडणे माझ्याबाबतीत संपले आहे. रेडिओ ऐकताना, मासिके-वर्तमानपत्रे वाचताना पुस्तकांची संदर्भ येतात व ते आकर्षक वाटले तर लगेच लायब्रीच्या अकाऊंटमध्ये विश लिस्टमध्ये टाकतो. सहज दिसले व उचलले असे जवळपास आता होत नाही. काही विशिष्ट विषयांसंदर्भातली पुस्तके (उदा. विज्ञान, गणित, धावणे इत्यादी) कधी कधी चाळता चाळता उचलतो . पन ९०% पुस्तके ही आधीच यादीत टाकलेली असतात.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

@पीनी
सायकॉलॉजी, भावना, मेंदू, केमिकल वगैरेबद्दल माहिती >>>> यासाठी "emotional intelligence by Daniel Goleman" हे छान पुस्तक आहे. Audible वर आहे कि नाही ते माहित नाही. याच विषयावरील प्राथमिक माहितीसाठी अच्युत गोडबोले यांचे "मनात" हे मराठीतील छान पुस्तक आहे. त्यांचेच "मनकल्लोळ" हे सुद्धा याच विषयावर आहे पण मी वाचले नाही.

emotional intelligence by Daniel Goleman
जगाच्या इतिहासासाठी - a people's history of the world

हे दोन्ही audible वर मिळाले.

जागतिक इतिहास.
ओडियो बुक्स नसली तर पीडीएफ/ इपब वाचून दाखवणारी apps वापरली तर अधिक मिळतील. ( ओडियो मधला अनुभव वेगळा असतो मान्य.)

१. पेपरमध्ये नवीन पुस्तकांचे जे रिव्ह्यू येतात, त्यातलं एखादं पुस्तक इंटरेस्टिंग वाटलं की त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवतो आणि दुकानात किंवा लायब्ररीत गेलो की ते मिळतंय का बघतो.
२. पुस्तकं घ्यायला अक्षरधारा, क्रॉसवर्ड किंवा इंटरनॅशनल बुक स्टोअरमध्ये जातो.. साधारण पद्धत अशी की सगळ्या सेक्शन्समधून थांबत थांबत हळूहळू नजर फिरवत जातो... मग एखादं पुस्तक नवीन वाटलं की ते हातात घेऊन त्याच्या ब्लर्बमधल्या मजकूरावर नजर फिरवतो.. तो कंटेंट आवडला की मग असंच अधल्यामधल्या एक-दोन पानांवर नजर टाकतो.. ह्या ही चाळणीत आवडलं की मग ते पुस्तक घेऊन टाकतो.
३.लेखक आवडीचा असेल तर त्याची पुस्तकं जिथं कुठं दिसतील त्यावर झडप घालतो... तिथं चाळणी वगैरे लावणं मला जड जातं.. म्हणजे त्या विशिष्ट काळात एखाद्या लेखक/लेखिकेच्या मी प्रभावाखाली असेन तर आपोआपच त्यांची पुस्तकं माझ्या घरी येत राहतात.. Happy
४. माझ्या दृष्टीने जे लेखक आउटडेटेड किंवा रद्दी झालेले आहेत, त्यांच्या पुस्तकांवर चुकून नजर जरी पडली तरी मला पश्चात्ताप होतो आणि मी अर्ध्या सेकंदात स्वतःलाच शिव्या देत तिथून नजर दुसरीकडे वळवतो... पश्चात्ताप होण्याचं कारण हे की पूर्वी मी बालिश असल्यामुळे हे रद्दी लिहिणारे लेखक सुद्धा मला ग्रेट वाटत होते.. ( इथं त्या आउटडेटेड, रद्दी लेखक/लेखिकांची नावं लिहायला माझे हात अक्षरशः शिवशिवत आहेत..! पण आत्ता तो मोह टाळतो..)
५. धार्मिक, मोटिव्हेशनल, आरोग्यविषयक, असाध्य रोगांना कुणी कशी फाईट दिली वगैरे, सामाजिक चळवळखोर पुस्तकं, एखाद्या जातीला-धर्माला टार्गेट करण्यासाठी किंवा त्यांचा उदोउदो करण्यासाठी लिहिलेली पुस्तकं, मला देशभक्त होण्याचे कळकळयुक्त आवाहन करणारी पुस्तकं, शिवाय जगभरच्या अन्यायग्रस्त लोकांच्या कहाण्या, तसेच हंबरड्यांनी भरगच्च अशी दर्दभरी आत्मचरित्रं, आणि मराठीत दरवर्षी टनावारी ओतल्या जाणाऱ्या अनुवादित डिटेक्टीव्ह कादंबऱ्या, आणि आर्थिक गुंतवणुकीचे सल्ले देणारी पुस्तकं...
ह्या प्रकारच्या पुस्तकांमध्ये मला काहीही इंटरेस्ट वाटत नाही... आणि त्यामुळे त्यांच्याकडे सरळ सरळ दुर्लक्ष करायला मला अजिबात वाईट वाटत नाही.. Happy

गेले काही महिने न्यू यॉर्क टाइम्सचा बूक रिव्ह्यू पॉडकास्ट ऐकते आहे. दर शुक्रवारी नवा पॉडकास्ट असतो. बूक रिव्ह्यू मधे असलेल्या लेखकाची मुलाखत, प्रकाशन व्यवसायाशी निगडित ठळक बातम्या, इतर एडिटर्स सध्या काय वाचत आहेत याची चर्चा , शंभर दीडशे वर्षांपूर्वी टाइम्स कडे आलेली शेलकी पत्रे ( पुस्तक परिक्षण / प्रकाशन या संदर्भात ) असं स्वरुप आहे. वाचायची आहेत अशा पुस्तकांची यादी वाढता वाढता वाढे अशी परिस्थिती कायम असते. हा पॉडकास्ट ऐकल्यापासून ती आणखीनच चिघळली आहे आणि किती काय वाचलंच नाहीये आपण असं वाटत राहतं .
शिवाय चालता चालता पॉडकास्ट ऐकत असल्याने हाताशी कागद आणि पेन नसतात. त्यामुळे नाव नोंदवून ठेवणे जरा किचकट आहे.
तरी हा पॉडकास्ट नक्की ऐकण्याजोगा आहे .

चालता चालता पॉडकास्ट ऐकत असल्याने हाताशी कागद आणि पेन नसतात. त्यामुळे नाव नोंदवून ठेवणे जरा किचकट>>> अशावेळी पटकन (voice note) रेकॅार्ड करून ठेवायचे.

Pages