तुम्ही वाचायला पुस्तक कसे निवडता?

Submitted by टवणे सर on 3 August, 2017 - 17:59

मायबोली विविध विषयांवर, विविध वारंवारितेने वाचणारे लोक आहेत. आजच्या जमान्यात छापील पुस्तकांबरोबरच अनेक जण इ-पुस्तके व ऑडिओ-पुस्तकेदेखील वाचत/ऐकत असतील. आंतरजाल उपलब्ध व्हायच्या आधीच्या जमान्यात पुस्तकाबद्दल माहिती मिळवण्याची साधने व आंतरजालाच्या युगातील साधने यात जमीन-आस्मानाचा फरक पडला आहे. लोकं एखादे पुस्तक का वाचायला सुरू करतात, तेच पुस्तक का, त्याबद्दल माहिती कुठून मिळते की फक्त लायब्रीत्/दुकानात चाळता चाळता पुस्तक उचलतात याबद्दल माझ्या मनात उत्सुकता आहे.

तेव्हा वर्षाकाठी एखादे पुस्तक वाचणार्‍यांपासून आठवड्याला चार पुस्तके संपवणार्‍या सर्वांनी 'एखादे पुस्तक वाचायला घ्यायचे तुम्ही कसे ठरवता?' आजच्या युगात तुमची वाचण्याची यादी कशी बनते, पुस्तके कशी निवडता यावर लिहावे ही विनंती.

माझ्याबद्दल सांगायचे तर:
आजकाल बर्‍याचदा पुस्तक खरेदी ही फक्त विमानतळावर होते. तेव्हा मी पुस्तक विकत घेताना बरेचदा फक्त चाळतो आणि घेतो. पण पुस्तक विकत घेण्याचे प्रमाण बरेच कमी आहे.
पुर्वी पुस्तके विकत घ्यायचो विशेषतः मराठी पुस्तके ती माहिती असलेल्या लेखकांची वा ज्यांचे वाचन माझ्यासारखे (म्हणजे आवडी-निवडीबाबतीत) त्यांनी शिफारस केलेल्या, सुचवलेल्या लेखकांची.
मी ज्या ज्या मराठी ग्रंथालयात सभासद होतो ती तुलनेने छोटी ग्रंथालये होती. फारतर एखादा मजला, १५-२० कपाटे इतपत पसारा. तेव्हा मराठी पुस्तके ग्रंथालयात जाऊन, अनेक पुस्तके चाळत चाळत घेतली जात. अर्थात ती निवड करताना विशिष्ट लेखक, प्रकाशन वा पुस्तकाचा विषय या चाळण्यातून होत असे. उदा. कव्हरवर भडक रंगात साडीचा पदर दहा फूट मागे लोळवत खिडकीतून बाहेर दूरवर जाणार्‍या वाटेकडे डोळे लावून बसलेल्या बाईचे चित्र असलेली 'शिशीर', 'उन्हाची सावली', 'अंतरीची पाउले', 'मौनव्रती' वगैरे नावाची १००पानी पुस्तके ही बाजूल सारली जात. काही बहुप्रसवी लेखक (सुशि, गुरुनाथ नाइक, बाबा कदम वगैरे) बाजूल सारले जात. काही लेखक जसे श्री ना पेंडसे आपोआप उचलले जात असत. नॉन फिक्शन वाचताना बरेचदा एका पुस्तकातून दुसर्‍याचा पत्ता लागे. उदा. व्यंकटेश माडगुळकरांच्या पुस्तकात ऑल क्वायेट ऑन वेस्टर्न फ्रंटचा पत्ता लागला.
इंग्रजी पुस्तकांची नावे/लेखक ओळख पण अश्या मराठी पुस्तकांतून झाली. पुढे कॉलेजात हॉस्टेलवर समविचारी/वाचणार्‍या मुलांकडे कोएट्झी, अरुंधती रॉय, नायपॉल या अश्या अनेक लेखकांची एखादी एखादी पुस्तके वाचली गेली व एकातून दुसरे करत अनेक लेखक हाताशी लागत गेले. हैद्राबादच्या ब्रिटिश कौन्सिलचाही पसारा छोटाच होता. तिथे अशीच चाळत चाळत पुस्तके घेतली जात.

आता मात्र इथे अमेरिकेतल्या तुलनेने प्रचंड मोठ्या पब्लिक लायब्रीत पुस्तके चाळत निवडणे माझ्याबाबतीत संपले आहे. रेडिओ ऐकताना, मासिके-वर्तमानपत्रे वाचताना पुस्तकांची संदर्भ येतात व ते आकर्षक वाटले तर लगेच लायब्रीच्या अकाऊंटमध्ये विश लिस्टमध्ये टाकतो. सहज दिसले व उचलले असे जवळपास आता होत नाही. काही विशिष्ट विषयांसंदर्भातली पुस्तके (उदा. विज्ञान, गणित, धावणे इत्यादी) कधी कधी चाळता चाळता उचलतो . पन ९०% पुस्तके ही आधीच यादीत टाकलेली असतात.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लहानपणी घरी जी पुस्तके वाचनालयातून यायची तीच वाचली जायची, नंतर लेखकांची नवे कळू लागली आणि मराठी पुस्तके वाचू लागलो स्वतःहून..
नंतर इंग्रजी वाचणाऱ्यांकडून जॉन ग्रीष्म, अगाथा क्रिस्ट अशी नावे कळू लागली आणि वाचू लागलो.. सध्या काहीही वाचत नाही, हापिसातले requirement डॉक्युमेंट आणि दिसायिन डॉक्युमेंट वगैरे सोडून...
वेळ मिळाला की माबो वरच्या कथा वाचतो.

चांगला धागा.
सध्याची स्थिती: मी फक्त लेखसंग्रह वाचतो. आता मला वाचनालय हा प्रकार उत्तम वाटतो. पुस्तक निवडताना मी शक्यतो १५० पाने ही मर्यादा बघतो. मोजकी मासिके व दिवाळी अंक आवडीने वाचतो. आता शक्यतो मराठीच वाचन. आता कितीही गाजावाजा झालेले पुस्तक असले तरी त्याचे आकर्षण वा अप्रूप नाही. त्याचे परिक्षण वाचले की पुरते.

तरुणपणी : मराठी व इंग्लिश वाचन. ‘बिटीश लायब्ररी’ चा आधार. कितीही आकाराचे पुस्तक चाले. कुठलाही साहित्यप्रकार चाले. रहस्यकथांवर अर्थातच प्रेम.

परदेशी वास्तव्यात : दर सहा महिन्यांनी पुण्यात आल्यावर सुमारे दोन डझन मराठी पुस्तके विकत घेउन बरोबर नेणे. एका मासिकाची वर्गणी भरून ते तिकडे मागवत होतो.
तेव्हा विकत घेतल्यापैकी बरीच पुस्तके आता टप्प्याटप्प्याने रद्दीत टाकत आहे. दोनच पुस्तके कायम जवळ ठेवणार आहे – १) पुलंचे ‘एक शून्य मी’ व २) लक्ष्मण लोन्ढेंचे ‘लक्ष्मणझुला’.

कायम जवळ ठेवण्याची माझी पुस्तके :
झोम्बी - आनंद यादव
बनगरवाडी - वेंकटेश माडगूळकर
युगांत - इरावती कर्वे
राऊ - ना स इनामदार

सुदैवाने मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय,दादर सार्वजनिक वाचनालय,ब्रिटिश काउन्सल आवाक्यात होते. विकत न घेता बरीच वाचता आली.
आता फुटपाथवरून अथवा महिन्याच्या बोलीवर रिडिंग चार्ज देऊन मिळतात ती वाचतो. काम सोपं होतं. शब्दकोश वगैरे संदर्भ ग्रंथाव्यतिरिक्त विकत घेणे पैशाचा अपव्यव वाटतो.
निवड: तिथेच चाळल्यावर पुस्तक आवडले पाहिजे आणि पाने पिवळी जुनाट असता कामा नये.

१. गुडरीड्स म्हणून एक साईट आहे. तिथे लोक पुस्तकांचे रिव्ह्यू लिहितात आणि वाचलेल्या पुस्तकांचे शेल्फ तयार करतात. तिथे गेलं की बरीच इंग्रजी पुस्तके सापडतात. तसेच आपली आवड समजून त्या साईटवर आपल्याला आवडतील असे लेखक दाखवले जातात.

२. कधी कधी मी एका लेखकाचे एक पुस्तक आवडले तर त्याची बाकीची काही पुस्तकं ऍमेझॉनवर विशलिस्ट मध्ये टाकते. मग जमेल तसा रिसर्च करून त्यातली जी मला आवडतील असे वाटते ती घेते.

३. बुक गंगा हे मराठी पुस्तकांसाठी उत्तम संकेतस्थळ आहे. पण तिथे गुडरीड्स सारखी भरपूर माहिती मिळत नाही हा त्याचा तोटा. पण मराठीत माझे वाचन कमी आहे त्यामुळे मला अजून क्लासिक्स पुरतात. मराठीत मी फक्त पुलं नेटानी वाचले आहे.

सर्व प्रतिसादांबद्दल धन्यवाद.

प्रतिसादांवरून असे दिसते आहे की पुस्तके विकत घेताना काय चाळणी लावली जाते. त्याच बरोबरीने पुस्तके ग्रंथालयातून वाचायला आणताना काय चाळणी लावता, कसे ठरवता, याबद्दल वाचायलादेखील आवडेल.

पुस्तके ग्रंथालयातून वाचायला आणताना काय चाळणी लावता, >>

१. मध्यम आकार
२. दोन वर्षांपेक्षा जुने नको कारण धूळ असते त्यावर
३. परत करण्याची मुदत जेव्हा ते सांगत नाहीत तेव्हा. आरामात वाच ता यावे.

मी वयाच्या पंचविशीपर्यंत जे काही समोर येईल ते भक्तीभावाने वाचलेले आहे. जे काही पांढर्‍यावरचं काळं असेल ते. अगदी पल्प फिक्शन, बेस्टसेलर्स ते क्लासिक्स, गंभीर तत्वज्ञानाची पुस्तके असं सगळं. सुशि, कदम, नाईक, जोगळेकर, रांगणेकर, क्षेत्रमाडे वगैरे सगळं सगळंही वाचलेलं आहे. बारावीनंतर इंग्लिश वाचायला सुरुवात केली. त्यातून खास आवडनिवड होतीच ते लेखक आवर्जून मिळवून पूर्ण वाच्ण्याकडे कल होता. माझ्या वाचनवेडात घरी असलेली ढिगाने पुस्तके, वाचनवेडे वडील आणि भाऊ, फिनिक्स लायब्ररी आणि तिचे मालकचालक श्री. पोंडा, ब्रिटिश काउन्सिलची लायब्ररी, फर्ग्युसनमधील काही शिक्षक, नंतर जेएनयूमधील शिक्षक आणि वाचनालय अशा सगळ्यांचा भरपूर हातभार होता. मराठी वाचनात कळलेली इंग्लिश पुस्तके आवर्जून जाऊन वाचली जात. पंचविशीनंतर सरसकट वाचन कमी व्हायला लागलं कारण व्यावसायिक वाचनाची व्याप्ती वाढू लागली.आता नव्व्याण्णव टक्के फक्त आणि फक्त व्यावसायिक तांत्रिक वाचन होतं. किंवा त्या अनुषंगाने लागेल ते साहित्यिक वाचन. नव्याने वाचन खूप कमी झालंय. गेल्या वर्षातून ३-४ पुस्तकं वाचली फक्त नव्याने. तीही त्या लेखकांमुळे, विषयामुळे किंवा परीक्षणामुळे घेऊन वाचली. काही भावाने, मित्रमैत्रिणींनी सुचवलेली पुस्तके आहेत त्यातली काही वाचली आहेत. मायबोलीवर अनेक पुस्तकांची नावे कळली आहेत पण नुस्तीच यादी करून ठेवली आहे. वाचायला वेळ झालेला नाही. अजून काही वर्षांनी होईल अशी आशा आहे. बंगालीत थोडंफार वाचन केलं आहे ते काही क्लासिक्स, काही घरातल्यांनी रेकमेंड केली म्हणून अशी आहेत. अजून वाचायची इच्छा आहे आवर्जून अशा बंगाली पुस्तकांचीही स्वतंत्र यादी आहे. ती कधी वाचेन देव जाणे!
सहसा अजूनही अवांतर वाचनासाठीची पुस्तकं शक्यतोवर विकत घेऊन वाचते. पण विकत घेताना हमखास पुनर्वाचन करेन असं वाटेल अशीच घेते. नाहीतर कुणाकडून घेऊन वगैरे वाचून परत देते. कारण सध्या घराची अरब आणि उंट अशी अवस्था आहे. उशापायथ्यापासून प्रत्येक कानाकोपर्‍यापर्यंत पुस्तकंच पुस्तकं. त्यातही माझा मराठी पुस्तकांचा एक कप्पा वेगळा आहे. त्यात मी नेहेमी वाचते अशी काही पुस्तके आहेत.

मी ग्रंथालयितून आणताना आधी एकेक लेखक संपूर्ण वाचायचा विचार होता..श्याम मनोहर पुष्कळसे वाचले.
आता समोर दिसतील त्यातलं चाळून इंटरेस्टिंग वाटेल असं पुस्तक घेतो. यामुळे जी पुस्तकं मी स्वतःहून शोधली नसती अशी पुस्तकं वाचली जातात. नुकतंच पैशाच्या इतिहासावरचं एक आणि मुंबई विद्यापीठाने गेल्या सहस्रकातील विज्ञानाच्या प्रवासाबद्दलचं अनेक लेखकांकडून लिहवून घेतलेलं असं एक .पण ही दोन्ही पुस्तकं पूर्ण वाचता आली नाहीत.
मी घेतो त्या पुस्तकांत लेखसंग्रह ,यात ललितलेख आले, शिवाय नॉन फिक्शन अधिक असतात. कादंबऱ्या, कथा दहांत प्रत्येकी एक असं प्रमाण होईल..
विकतच्या पुस्तकांत आवडलेल्या लेखकांचं होईल तेवढं कलेक्शन करत गेलो..यापुढे तसं करणार नाही.
मुमंग्रंसं नवे कवितासंग्रह विकत घेतच नाही. Sad

इंग्रजी पुस्तकांची लायब्ररी जवळ नाही. पण जॉइन व्हायची इच्छा आहे.
ईबुक्स अद्याप वाचत नाही.

गुडरीड्स म्हणून एक साईट आहे. तिथे लोक पुस्तकांचे रिव्ह्यू लिहितात आणि वाचलेल्या पुस्तकांचे शेल्फ तयार करतात. तिथे गेलं की बरीच इंग्रजी पुस्तके सापडतात. तसेच आपली आवड समजून त्या साईटवर आपल्याला आवडतील असे लेखक दाखवले जातात. >> +१

एखादे पुस्तक आवडले तर मुद्दाम त्या लेखकाची इतर पुस्तके शोधून वाचते.
बूकगंगावर पुस्तकांची काही पाने वाचयला मिळतात त्यावरून पुस्तकाचा दर्जा समजतो.
तसेच पुण्यात आता पुस्तक पेठ, अक्षरधारासारखी दुकाने उपनगरांपर्यंत पसरली आहेत तिथे जाऊन ब्राउझिंग करताना इतर वाचक किंवा दुकानांचे मालक आपल्या आवडीनुसार नवीन आलेली वाचायला हवीच अशी पुस्तके सुचवतात.
पगदंडी, वारी सारखे बूक कॅफे आहेत जिथे जाऊन नवी जुनी पुस्तके चाळता येतात. त्यातही आवडलेली लक्षात ठेवून विकत घेते.
टाईमपास पुस्तके फूटपाथवर बरी दिसली तर घेते.

मी मोस्टली तीच पुस्तकं वाचते जी माझी बहिण सई मला सांगते. कधी कधी विकत घ्यायला गेले तरी तिला तिथून फोन करून विचारते घेऊ का? मी जे पुस्तक घेतलेले असते त्याबद्दल तिला नेहमीच माहित असते Happy
तिने मला बरिच पुस्तकं वाढदिवसाला दिली आहेत.

यंदा साहित्य संमेलन डोंबिवलीत झाले. तिथे बरीच चाळली. विकत अजिबातच घेणार नाही. कथा कादंबय्रांचा लचका आता मराठी मालिकांनी तोडला आहे आणि तेचतेच दळण नको वाटते. वि विषयांना वाहिलेली पुस्तकं / तंत्रज्ञानावरची ही फक्त विषयाला स्पर्श करतात किंवा त्यामध्ये वर्तमानपत्रांच्या रविवार पुरवणीत शोभतील असे लेख असतात. लेखकांची नावे मात्र भारी असतात. बहुतेक प्रकाशकच जोखिम घेत नाहीत. थोडक्यात ही पुस्तके हातातही घेत नाही.
इंग्रजी पुस्तकांत पक्षी,फुलपाखरांची सविस्तर माहिती असली तर त्यातले पाचदहा टक्के मराठीतल्या पुस्तकांत माहिती असते॥( उदा)
इंग्रजी पुस्तकांना लेखकांप्रमाणे चाळणी लावतो

साधारण पणे,
कोणत्याही "वाचु" मित्राने सुचवलेले पुस्तक्/पुस्तके,
आंतरजालावर लिहीलेले रिव्हु वाचुन,
बुकगंगा सारख्या साईटवर ४/५ पानं वाचायची सोय असलेल्या ठिकाणी वाचुन त्याविषयी मत बनवुन,
घाईत असलो तर कधी कधी पुस्तकाचं कॅची नाव वाचुन (यात कधी पोपट व्हायचा चान्स असतो)
मला आवडणार्‍या विषयासंबंधीत असलेले,
अमेझॉन्/फ्लिप्कार्ट सारख्या साईट्वर मराठी पुस्तके विभागात चक्कर मारुन,

शिक्षक असल्याने शाळेची हक्काची, मोठी (आणि फुकट!) लायब्ररी वापरता येते. एखादे पुस्तक हवे असेल आणि लायब्ररीत नसेल तर पुढच्या वर्षीच्या विशलिस्टमध्ये सहज टाकता येते. पुस्तक विकत घेण्याची वेळ मराठी पुस्तकाच्या बाबतीतच जास्त येते.
आता वाचताना पुस्तक कसे निवडतो याची अनेक उत्तरे आहेत. माझे वाचन बिंज रिडींग आणि ठरवून केलेले असे हेलकावे खात असते. कधी लेखक आवडला म्हणून (डॅरिलिम्पल, किंग), कधी मुद्दा (मनोहर), कामाशी संबंधीत (डॉकिन्स, रिडली, गुल्ड इ.इ.इ). मधल्या काही काळात अगदी ठरवून क्लासिक फिक्शन वाचले, तेंव्हा मात्र ऑल टाईम बेस्ट वगैरे लिस्ट पाहून पुस्तक निवडले. गेल्या काही वर्षात उत्तम हिंदी साहित्य वाचण्याची संधी मिळाली ते सहकारी शिक्षकांनी सुचवले होते.

"वाचु" मित्राने सुचवलेले पुस्तक्/पुस्तके, >> वाचु मित्र ही कॉन्सेप्ट आवडली.
मी लायब्ररी लावली होती तेव्हा पुस्तकं चाळून आणत असे. पण साईज वगैरे (पानांची संख्या) मर्यादित हवं असं काही नाही, ठोकळे पण वाचलेत. पण छोटे पुस्तक बरे पडते ही ही खरेच.

. बंगालीत थोडंफार वाचन केलं आहे ते काही क्लासिक्स, काही घरातल्यांनी रेकमेंड केली म्हणून अशी आहेत. अजून वाचायची इच्छा आहे आवर्जून अशा बंगाली पुस्तकांचीही स्वतंत्र यादी आहे. >> : जेलस बाहुली : . पण अभिनंदन. मोठेपणी शिकलेल्या भाषेतून क्लासिक्स वाचणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. गेली १५ वर्षे मी मार्क्वेझ यांचं एकतरी पुस्तक स्पॅनिश मधे वाचायचं असा संकल्प धरून आहे. कधी जमतंय कोण जाणे

टण्या छान धागा काढलास . सवडीने लिहिते

आमच्याइथे मजेस्टिक स्टोर आहे त्यात पुस्तके स्वत: पाहता येतात त्यामुळे काम फारच सोपे होते. रिव्ह्युवर अवलंबून राहावे लागत नाही.

( टवणेसर = वारी लिहिणारे टण्या होय?!)

मेधा, तू मार्केझ स्पॅनिशमधून वाचलास की मी पण प्रचंड जळेन तुझ्यावर Proud
खूप चिकाटी लागते वेगळ्या लिपीतून आणि भाषेतून पुस्तक वाचायला त्यामुळे मी खूप कमी वाचलीत बंगाली पुस्तकं. छोटी छोटी क्लासिक्स किंवा प्रसिद्ध पुस्तकेच जास्त करून वाचली आहेत. लंब्याचवड्या कादंबर्‍यांना हात लावायचा धीर नाही झालाय अजून.
त्यामानाने हिंदी वाचन जास्त झालंय. हॉस्टेलमधे माझी रूमी हिंदी साहित्याचा अभ्यास करणारी होती. तिने माझ्याकडून रस आहे म्हणल्यावर पद्धतशीरपणे क्लासिक्स, कवितासंग्रह, काही नवे लेखक असं कायकाय वाचून घेतलं. हिंदी पुस्तकं खूप स्वस्त असतात त्यामुळे मग मी पण एकेक लेखक धरून वाचली, काही विकत घेतली... आता खूप वर्षात हिंदी वाचलं नाहीये.

मी टेलिग्राफ (कलकत्ता आवृत्ती) आणि हिंदू चे बुक रीव्यूज आवर्जून वाचते. कधीतरी इंटरेस्टिंग पुस्तकं कळतात. पण व्यावसायिक वाचनाचं दडपण वाढल्याने आता गंभीर पुस्तकं विशेषतः गंभीर फिक्शन फार कमी वाचली जातात. नॉन-फिक्शनमधे चालतात. पण रात्री निवांत व्हायला, स्ट्रेसबस्टर म्हणून बहुतांशी हलकंफुलकंच वाचलं जातं. तसंही टवाळा आवडे विनोद या जातीची मी असल्याने स्वभावतःच ओढा तिकडे आहे Wink

आवडीचा विषय Happy

मराठी निवडताना गेल्या काही वर्षांत प्रकाशित झालेली पुस्तके हा पहिला चॉईस. खूप जुनी असतील तर फक्त खूप गाजलेली अजून वाचायची राहिली असतील तरच वाचतो. ती ही कमीच. शक्यतो नवीनच शोधतो.

नवीन इण्टरेस्टिंग कादंबर्‍या फार कमी मिळतात. एकतर बर्‍याच कादंबर्‍यांचा पॅटर्न एखादे ठिकाण, तेथील पूर्वीचे जीवन व त्यात कोणत्यातरी मॉडर्न गोष्टीमुळे होणारा बदल, जो बहुतांश त्या जुन्या गोष्टींचा र्‍हास करणारा असतो. अशा कादंबर्‍यांचा आता कंटाळा येतो. त्यामुळे अ‍ॅट एनी कॉस्ट (मराठीच आहे) सारखी पुस्तके वेगळी वाटतात व उठून दिसतात.

पुलंची सोडली, तर विनोदी म्हणून जी पुस्तके लिहीली जातात मराठीत ती मला का कोणास ठाउक कधीच आवर्जून वाचावीशी वाटलेली नाहीत. रमेश मंत्री वगैरेंची एक दोन पुस्तके वाचली आहेत, पण आवड लागली नाही. झंप्याची परदेशवारी, गंप्याचे तमुक, वाघाचा पुलाव वगैरे असली नावे असलेली पुस्तके बघून ती वाचण्याची उत्सुकता वाटली नाही, त्यामुळे आणली नाहीत (जशी ती "विनोदमूर्ती", "विनोदाची जोडगोळी" वगैरे जाहिरात केलेल्या आणि त्या विनोदी नटांचे विचित्र चेहरे असलेल्या नाटकांच्या जाहिराती असत). वपुंची जुनी पुस्तके सरकारी-निमसरकारी कारकून लाइफ वर आहेत ज्यात नेहमीच्या लाइफ मधे एखाद्याची वेगळी सवय आणून किंवा टीपिकल मध्यमवर्गीय जीवनात घडणार्‍या घटनांवर मार्मिक लिहीलेले आहे - अशी त्यांची पुस्तके आवडतात. तसे चाळताना दिसले, तर अजूनही आणतो. बाकी त्यांनी नंतर लिहीलेली ती जनरल व्हॉट्सॅपी तत्त्वज्ञान वाली पुस्तके अजिबात आवडत नाहीत.

नॉन-फिक्शन ("वैचारिक"?) पुस्तके मात्र मराठीत गेल्या काही वर्षांत खूप नवीन विषयांवर आली आहेत. ती थोडी चाळून इण्टरेस्टिंग वाटली तर घेतो. आवडीचे विषय असतील तर नक्कीचः गेल्या काही वर्षातील सामाजिक बदल, राजकारण, चित्रपट, क्रिकेट ई. वरची. गेल्या काही वर्षांत अशी बरीच चांगली पुस्तके मिळाली - २४ अकबर रोड (अनुवादित), भारत आणि जग (गोविंद तळवलकर), पोशिंद्यांची लोकशाही (शरद जोशी), दुष्काळ आवडे सर्वांना (अनुवादित - पी साईनाथ) अशी बरीच आहेत.

काही लेखकांबाबत असे झाले, की त्यांचे पहिले पुस्तक आवडले. मग इतर आणली तेव्हा तोचतोचपणा जाणवला व कंटाळा आला. मीना प्रभू, गिरीश कुबेर, संजय पवार ई. ती कपाटात पडून आहेत.

तर याउलट श्री ना पेंडसे यांची तुंबाडचे खोत वाचून कुतूहलाने इतर बरीच आणली व ती ही आवडली. अनिल अवचटांचे न वाचलेले दिसले की चाळून विषय इण्टरेस्टिंग वाटतोय का बघून मग घेतो. "रिपोर्टिंग चे दिवस" हे असेच अचानक सापडलेले व खूप आवडलेले पुस्तक.

पुलंची बरीचशी, तुंबाडचे खोत, पडघवली आणि राजा शिवछत्रपती ही ऑटाफे. जीर्ण झाली किंवा हरवली तरी नव्याने पुन्हा विकत घेतली आहेत व पुन्हा पुन्हा वाचली आहेत.

इंग्रजी मधे फिक्शन फार कमी वाचले आहे (ह्यूमर वगळता). जनरल फिक्शन ची फारशी आवड लागली नाही इंग्रजी मधे. "शांताराम" वगैरे एक दोन वाचली आहेत.

ह्यूमर कॅटेगरी मधे मला वेगवेगळ्या पद्धतीचे विनोद असलेले वाचायला/बघायला खूप आवडते. ती मी कायम शोधत असतो. ब्रिटिश ह्यूमर एक खूप फेवरिट. त्यामुळे वुडहाउस ची इतकी वाचून सुद्धा अजूनही अधूनमधून वाचतो आणून. या व्यतिरिक्त यस मिनिस्टर/यस प्राइम मिनिस्टर सारखीही आवडतत. अमेरिकन ह्यूमर मधेही खूप प्रकार आहेत. त्यात कोणाचीही मिळाली तर किमान थोडीफार वाचून पाहतो. ही पुस्तके मी लायब्ररीतून खूप आणलेली आहेत. पण आजकाल विनोद टीव्हीवर व नेटवर जास्त चांगला व सहज बघायला/ऐकायला मिळतो असे दिसते.

नॉन-फिक्शन मात्र आवडत्या विषयांवर असेल तर नक्कीच वाचायला आणतो. लायब्ररीत मिळाले तर तेथे, नाहीतर विकत. ब्रिटिश साम्राज्य, दुसरे महायुद्ध, भारतीय स्वातंत्र्यलढा, भारतीय लेखकांची भारताबद्दल इंग्रजीतील पुस्तके (इण्डिया आफ्टर गांधी, मॅक्सिमम सिटी ई), पाक्/बांगलादेश निर्मितीशी संबंधित, अमेरिकन राजकारण, भारतीय राजकारण ई विषयांवर इण्टरेस्टिंग काही मिळाले तर आणतो.

बिझिनेस्/सेल्फ हेल्प वाली पण चांगली वाटली तर घेतो. किंवा विविध कंपन्या किंवा लोकांवर असलेली. जनरल मोटर्स, जीई सारख्या कंपन्या, नाहीतर सॉफ्टवेअर मधले नवीन ट्रेन्ड्स ई. वरची नॅरेशन असलेली. मधे जेफरी मूर ची बरीच वाचली लायब्ररीतून आणून.

मात्र स्पेसिफिक सॉफ्टवेअर बद्दलची आता जवळजवळ नाहीच. कारण त्यातले नवीन इण्टरनेटवर जास्त सहज, अनेकदा फुकट आणि अनेकदा जास्त लेटेस्ट मिळते. पूर्वी ओरॅकल ८, जावा १.२ वगैरे आणली होती पण जितक्या उत्साहाने आणली तितक्या उत्साहाने वाचली नाहीत Happy

हे सगळे आता सहसा लायब्ररीतून किंवा मग अ‍ॅमेझॉन वरून विकत. भारतातून इंग्रजी सहसा आणत नाही, कारण ती इथे जास्त सहजपणे मिळतात. फक्त काही भारतीय लेखक्/लेखिकांची इथे मिळतील का नाहीत अशी शंका आल्याने. शोभा डे, ट्विंकल खन्ना ई.

मराठी पुस्तके प्रत्यक्ष दुकानात जाऊन, चाळून घ्यायला आवडते. डेक्कनवरचे बुकगंगा आणि मसापच्या तळघरात असलेले दुकान ह्या दोन जागा आवडल्या आहेत. अर्थात बाकी फारशी कुठे गेले नाहीये. मराठीत जुनी, न वाचलेली तसंच नवीन अशी दोन्ही प्रकारची पुस्तके घेतली जातात.
इंग्रजी पुस्तके बऱ्याच वेळा जालावरचे रिव्ह्यू वाचून ऑनलाइन घेतली जातात. इंग्रजी ईबुक्स जास्त विकत घेते. पूर्वी रस्त्यावरून बरीच पायरेटेड इंग्रजी पुस्तके घेतली जात आता तसं होत नाही. इंग्रजी छापील पुस्तके बहुतेक वेळा ग्रथालयाची असतात.
इंग्रजीमध्ये खूप जास्त non fiction वाचतेय असा साक्षात्कार काही काळापूर्वी झाल्याने सध्या इंग्रजी light fiction कडे वळले आहे. Amazon monthly deals वर नजर ठेवून असते.
मात्र कुठेही एखाद्या पुस्तकाविषयी चांगले वाचले तर गुगल कीप मध्ये लगेच नोंदवून ठेवते आणि खरेदीच्या वेळी ती यादी आवर्जून बघते.
माझ्या नात्यात बहुतेक सर्व जण वाचतात. त्यांच्याकडून देखिल काही वेळा पुस्तक घेऊन वाचते. Books are always on my mind and I like it that way!

आईच्या शाएची लायब्ररी, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय यामुळे बरेच काही वाचले जायचे.आत्मचरित्रे ,प्रवासवर्णने बरीच वाचली.शाळेतून बक्षीसांच्या स्वरूपात बॉम्बे बुक डेपोमधून ठराविक रकमेची पुस्तके घ्यावी लागत.
बी.ए.ला असताना विजया राजाध्यक्ष्,वसुधा अंबिये,प्रभा गणोरकर,वसंत डहाके ही दादा मंडळी,शिकवायला होती.त्यामुळे त्यांच्या बोलण्यातून ज्या ज्या पुस्त़कांचे उल्लेख यायचे ती बरीच वाचून काढली.अपवाद कवितासंग्रहाचा.त्यावेळी भरपूर पुस्तके विकत घेतली.नंतर अचानक हे विकत घेणे थांबविले.
.आताही मला आत्मचरित्रे,प्रवासवर्णने,कथा-कादंबर्‍या आवडतात.
लायब्ररीमधे अनुवादित पुस्तके पहिला चॉईस आहे.
आता वाईट इतकेच वाटते की इंग्रजीतून वाचण्याची सवय वेळेवर लावून घेतली नाही.आता तेवढे मराठी वाचन होत नाही,तेव्हा इंग्रजीतून वाचणे दूरच.
(अवांतर..अंबियेमॅडमनी अ‍ॅट्लास श्रग्ड हे आयन रँडचे पुस्तक वाचायला सांगितले होते.ते त्यावेळी वाचले नाही.त्याच्या अनुवादाचे नाव कळले आहे.तो आणायला पाहिजे)

मित्रहो, इथे आपण बरीच वाचनप्रेमी मंडळी जमलो आहोत. 'वाचना'संबंधी अवधूत परळकरांचे एक वाक्य असे आहे, " वाचनाने फार काही साधत नाही, हे देखील कळतं खूप खूप वाचल्यावरच!".

काय वाटते आपल्याला ? पोचलो आहोत का आपण त्या पातळीवर ? Bw

पूर्वी सरसकट जे समोर येईल ते वाचत होतो. आता अगदी सिलेक्टिव्ह असे नाही म्हणता येणार पण विषयावर आधारित पुस्तकांना जास्त पसंती.
१ सगळ्यात आवडता जॉनर म्हणजे आत्मचरित्र - त्यातही खेळाडूंचे असेल तर जास्त. सचिनने फार निराशा केली मात्र.
२ युद्ध, स्ट्रॅटेजी, सैनिकांचे मनोगत. अर्थात मराठीची या क्षेत्रात बरीच पीछेहाट आहे.
३ भटकंती, प्रवासवर्णन.
४ फिक्शन यात मग बरीच मोठी रेन्ज
मायकेल क्राईटन पासून सिडने शेल्डन, डॅन ब्राऊन पासून जॉन ग्रिशम

तात्विक, वैचारिक, राजकीय, अध्यामिक झेपत नाहीत
आणि दवणीय लिखाण वाचवत नाही.

एखादे पुस्तक वाचल्यावर त्या अनुषंगाने इंटरनेट वर अजून काही अवांतर माहिती आहे का हे पहिले जाते त्यात अजून काय काय नवीन विषय, नवीन घटना, लेखक समजतात.

दुसऱ्या महायुद्धवर वाचताना असे झाले आहे.

'वाचना'संबंधी अवधूत परळकरांचे एक वाक्य असे आहे, " वाचनाने फार काही साधत नाही, हे देखील कळतं खूप खूप वाचल्यावरच!". >>> असं काय हे वाक्य? त्यांना काय म्हणायचंय मला काही कळलं नाही. मला तर वाचनाने भरपूर काही दिलं जे मी शब्दांत वर्णन करू शकत नाही.

सर्वांचे आभार. मी जमेल तसे विविध पोस्टींमधील मजकूराचे संकलन करून हेडरमध्ये अपडेट करेन.

इंटरनेट यायच्या आधी व नंतर तुमच्या पुस्तक निवडण्याच्या पद्धतीत फरक पडला का?
इंटरनेटच्या आधी मी पुस्तके जे हाती लागेल ते या पद्धतीने लायब्रीतून आणायचो. त्यात माझे काही उपरोल्लेखीत फिल्टर असायचे. पण लायब्रीत जाताना आज अमूक तमूक पुस्तक घेऊन यायचे हे डोक्यात नसायचे.
आता मात्र लायब्रीत जाताना कुठली पुस्तके घेऊन यायची हे पक्के असते. ही यादी बरेचदा बर्तमानपत्रांतील बूक रिव्युज, रेडिओवरील (एनपीआर) विविध कार्यक्रमांमध्ये उल्लेख होणारी पुस्तके व एका पुस्तकात दुसर्‍याचे मिळणारे संदर्भ.

उदा: फ्रिकॉनॉमिक्समध्ये सुधीर वेंकटेशच्या शिकागोमधील ड्रगगँग्जच्या अभ्यासाचा उल्लेख येतो. त्यावरून गँग लिडर फॉर वन डे हे त्यांचे पुस्तक वाचले. तर मध्यंतरी रेफ्युजी क्रायसेसवर एनपीआरवर खूप चर्चा घडत होत्या तेव्हा एन्रिकेज जर्नी या पुस्तकाची ओळख झाली. कालच्या एका चर्चेत Incarceration Nations: A Journey to Justice in Prisons Around the World Hardcover by Baz Dreisinger या पुस्तकाची ओळख झाली.
या आठवड्याच्या इकॉनॉमिस्टमध्ये सुजाता गिल्डांच्या अँट्स अमन्ग एलेफन्ट्स या पुस्तकाचा व त्यातच कॅथरीन बू च्या बिहाइन्ड द ब्युटिफूल फॉरेवर्स या पुस्तकाचा उल्लेख मिळाला.
मायबोलीवर ललिता-प्रितींच्या रिव्युने श्रीलंकेवरील पुस्तकाबाबत समजले. चिनूक्सने एकदा इथे लिहिलेल्या प्रवासवर्णनांच्या यादीमुळे तर असंख्य रत्ने हाती लागले. विक्रम सेठचे फ्रॉम हेवन्स लेक हे नितांत सुंदर पुस्तक केवळ क्सामुळे वाचायला मिळाले.
आता ही पुस्तके लायब्रीच्या यादीत गेली. पुढल्या भेटीत हीच पुस्तके उचलली जातील. लायब्रीत जाऊन पुस्तके चाळत एखादे उचलले असे आता माझ्याकडून क्वचितच होते.

हे फिक्शन बाबत होते का? मी बर्‍याच वर्षात फिक्शन वाचले नसल्याने मला सांगता येणार नाही. मात्र याबद्दल वाचायला आवडेल.

गूड रिड्स बर्‍याच जणांच्या पोस्टमध्ये आलेले आहे.
दुसरा आवडता पर्याय पुस्तकांच्या दुकानात जाऊन पुस्तके धुंडाळत/चाळत निवडणे दिसतो
एक लेखक आवडला की त्या/तिची इतर पुस्तके हा अजून एक दिसणारा समान धागा

इंटरनेट यायच्या आधी व नंतर तुमच्या पुस्तक निवडण्याच्या पद्धतीत फरक पडला का?>> माझ्या बाबतीत तरी फारसा नाही. आयुष्यातल्या इतर प्रायॉरिटीज, वेळेचं गणित, वयाप्रमाणे बदलणार्‍या आवडीनिवडी व दृष्टीकोन इ घटकांमुळे जास्त फरक पडला आहे.
मुळात कितीही वाचलं तरी कमीच आहे हे लक्षात आलेलं आहे Proud त्यामुळे वाचन हे जास्त सिलेक्टिव झालेलं आहे. अनेक पुस्तके वाचायला आवडतील पण ती वाचायला वेळ कधी मिळेल ही शंकाच आहे. उदा: वरती लिहिलेलं सुधीर वेंकटेशचं पुस्तक कितीतरी महिने वाचायची इच्छा या यादीत आहे. गोविंद तळवलकरांसारख्यांनी परिचय करून दिलेली अनेक पुस्तके मुळातून वाचायची इच्छा आहे. माझ्या स्वत:च्या व्यावसायिक वाचनातही अशी अनेक पुस्तके आहेत की जी थेट संबंधित नसली तरी वाचायची आहेत. जागतिक साहित्य अनुवादातून खूपसं वाचायचं राहून गेलं आहे. वरवर आफ्रिकन, इजिप्शिअन, युरोपीअन, रशियन इत्यादी साहित्यांतली काही पुस्तके वाचली आहेत. कधीतरी फक्त बुकर आणि नोबेल मिळालेल्या सगळ्यांची पुस्तके वाचून बघायची आहेत. भारतातल्या सगळ्या भाषांमधली क्लासिक्स वाचायची आहेत. तत्वज्ञानातील काही तत्वज्ञ, त्यांची विचारप्रक्रिया शांतपणे सलग वाचून काढायची आहे. विज्ञानविचाराच्या इतिहासाविषयी खोलातून वाचन करायचं आहे. शेक्सपीअर सगळा समजून उमजून संदर्भ कळवून घेत वाचायचा आहे. गेल्या वीसेक वर्षांत आलेली नवी डिटेक्टिव थ्रिलर्समधली प्रसिद्ध पुस्तकं वाचायची आहेत. मध्ययुगीन मराठी साहित्य, संस्कृत आणि प्राकृत अप्रसिद्ध साहित्यकृती मुळातून अभ्यासायची इच्छा आहे. आणखीही बरंच काही आहे...

यातलं एक शतांशही माझ्याच्याने कदाचित होणार नाहीये. तेव्हा जेवढं जमेल तेवढं जमेल तिथे जमेल तसं एवढा एकच मंत्र म्हणत राहाते मी... पूर्वीसारखं वाचनासाठी जिवाच्या कराराने धावत सुटत नाही Happy

दुसरा आवडता पर्याय पुस्तकांच्या दुकानात जाऊन पुस्तके धुंडाळत/चाळत निवडणे दिसतो
एक लेखक आवडला की त्या/तिची इतर पुस्तके हा अजून एक दिसणारा समान धागा >>>

हो यातील पहिल्याबद्दल लायब्ररीत सुद्धा.

मायबोली वर इतर साइट्स वरचे रिव्यूज वाचून ती पुस्तके आणली आहेत असेही अनेकदा झालेले आहे. चिनूक्स ने लिहीलेली प्रवासवर्णनांची नावे वाचून मी ही त्यातली एक दोन आणली, आणि ती बरीचशी वाचलीही होती.

तुला फ्रॉम हेवन्स लेक आवडलं ना? (माझं कॉलेजजीवनापासूनचं अतिशय आवडतं पुस्तक आहे) मग अमिताभ घोष चं डान्सिंग इन कंबोडिया अ‍ॅन्ड अ‍ॅट लार्ज इन बर्मा पण वाच (किंवा वाचलं असशीलच)... Happy
मला एरवी अमिताभ घोष किंवा विक्रम सेठ यांची फिक्शन कधीच भावली नाही पण ही दोन्ही पुस्तके अप्रतिम आहेत.

Pages