तुम्ही वाचायला पुस्तक कसे निवडता?

Submitted by टवणे सर on 3 August, 2017 - 17:59

मायबोली विविध विषयांवर, विविध वारंवारितेने वाचणारे लोक आहेत. आजच्या जमान्यात छापील पुस्तकांबरोबरच अनेक जण इ-पुस्तके व ऑडिओ-पुस्तकेदेखील वाचत/ऐकत असतील. आंतरजाल उपलब्ध व्हायच्या आधीच्या जमान्यात पुस्तकाबद्दल माहिती मिळवण्याची साधने व आंतरजालाच्या युगातील साधने यात जमीन-आस्मानाचा फरक पडला आहे. लोकं एखादे पुस्तक का वाचायला सुरू करतात, तेच पुस्तक का, त्याबद्दल माहिती कुठून मिळते की फक्त लायब्रीत्/दुकानात चाळता चाळता पुस्तक उचलतात याबद्दल माझ्या मनात उत्सुकता आहे.

तेव्हा वर्षाकाठी एखादे पुस्तक वाचणार्‍यांपासून आठवड्याला चार पुस्तके संपवणार्‍या सर्वांनी 'एखादे पुस्तक वाचायला घ्यायचे तुम्ही कसे ठरवता?' आजच्या युगात तुमची वाचण्याची यादी कशी बनते, पुस्तके कशी निवडता यावर लिहावे ही विनंती.

माझ्याबद्दल सांगायचे तर:
आजकाल बर्‍याचदा पुस्तक खरेदी ही फक्त विमानतळावर होते. तेव्हा मी पुस्तक विकत घेताना बरेचदा फक्त चाळतो आणि घेतो. पण पुस्तक विकत घेण्याचे प्रमाण बरेच कमी आहे.
पुर्वी पुस्तके विकत घ्यायचो विशेषतः मराठी पुस्तके ती माहिती असलेल्या लेखकांची वा ज्यांचे वाचन माझ्यासारखे (म्हणजे आवडी-निवडीबाबतीत) त्यांनी शिफारस केलेल्या, सुचवलेल्या लेखकांची.
मी ज्या ज्या मराठी ग्रंथालयात सभासद होतो ती तुलनेने छोटी ग्रंथालये होती. फारतर एखादा मजला, १५-२० कपाटे इतपत पसारा. तेव्हा मराठी पुस्तके ग्रंथालयात जाऊन, अनेक पुस्तके चाळत चाळत घेतली जात. अर्थात ती निवड करताना विशिष्ट लेखक, प्रकाशन वा पुस्तकाचा विषय या चाळण्यातून होत असे. उदा. कव्हरवर भडक रंगात साडीचा पदर दहा फूट मागे लोळवत खिडकीतून बाहेर दूरवर जाणार्‍या वाटेकडे डोळे लावून बसलेल्या बाईचे चित्र असलेली 'शिशीर', 'उन्हाची सावली', 'अंतरीची पाउले', 'मौनव्रती' वगैरे नावाची १००पानी पुस्तके ही बाजूल सारली जात. काही बहुप्रसवी लेखक (सुशि, गुरुनाथ नाइक, बाबा कदम वगैरे) बाजूल सारले जात. काही लेखक जसे श्री ना पेंडसे आपोआप उचलले जात असत. नॉन फिक्शन वाचताना बरेचदा एका पुस्तकातून दुसर्‍याचा पत्ता लागे. उदा. व्यंकटेश माडगुळकरांच्या पुस्तकात ऑल क्वायेट ऑन वेस्टर्न फ्रंटचा पत्ता लागला.
इंग्रजी पुस्तकांची नावे/लेखक ओळख पण अश्या मराठी पुस्तकांतून झाली. पुढे कॉलेजात हॉस्टेलवर समविचारी/वाचणार्‍या मुलांकडे कोएट्झी, अरुंधती रॉय, नायपॉल या अश्या अनेक लेखकांची एखादी एखादी पुस्तके वाचली गेली व एकातून दुसरे करत अनेक लेखक हाताशी लागत गेले. हैद्राबादच्या ब्रिटिश कौन्सिलचाही पसारा छोटाच होता. तिथे अशीच चाळत चाळत पुस्तके घेतली जात.

आता मात्र इथे अमेरिकेतल्या तुलनेने प्रचंड मोठ्या पब्लिक लायब्रीत पुस्तके चाळत निवडणे माझ्याबाबतीत संपले आहे. रेडिओ ऐकताना, मासिके-वर्तमानपत्रे वाचताना पुस्तकांची संदर्भ येतात व ते आकर्षक वाटले तर लगेच लायब्रीच्या अकाऊंटमध्ये विश लिस्टमध्ये टाकतो. सहज दिसले व उचलले असे जवळपास आता होत नाही. काही विशिष्ट विषयांसंदर्भातली पुस्तके (उदा. विज्ञान, गणित, धावणे इत्यादी) कधी कधी चाळता चाळता उचलतो . पन ९०% पुस्तके ही आधीच यादीत टाकलेली असतात.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>इंटरनेट यायच्या आधी व नंतर तुमच्या पुस्तक निवडण्याच्या पद्धतीत फरक पडला का?<<

हो, एस्पेशली सोशल नेटवर्किंगमुळे (ट्विटर, लिंक्डइन इ.). नावाजलेल्या लोकांनी वाचलेली, रेकमेंड केलेली पुस्तके वाचायचा प्रयत्न असतो...

@ वरदा, अनेक पुस्तके वाचायला आवडतील पण ती वाचायला वेळ कधी मिळेल ही शंकाच आहे. उदा: >>> असं लिहून पुढे आपण जी यादी दिली आहे, ती पाहूनच मी अवाक् झालोय. यादी वाचूनच जाणवते की आपले वाचन किती अफाट असेल. छान! Happy

इथे प्रतिसाद लिहिणारे इतरसुद्धा पट्टीचे वाचक दिसताहेत.

मला नेमकं उलट म्हणायचं आहे, सचिन काळे. त्या यादीतलं मी काहीच वाचलेलं नाहीये फारसं. माझं वाचन अफाट नाहीये. सर्वसाधारण वाचनप्रेमी जितपत वाचतात तेवढंच आहे.

मस्त धागा !

मला तरी असे वाटते की मी काही पुस्तकांची निवड वगैरे करत नाही. जे मिळेल ते वाचतो. (चांगली चांगली ) पुस्तकेच मला शोधत येतात. Happy

बाकी आवडलेल्या पुस्तकाच्या लेखकाची दुसरी पुस्तके, माबो, गुडरीड, वाचन कट्टा वगैरे शिफारसींमुळे पुस्तके निवडणे याला मम

@वरदा, अमिताभ घोषचे पुस्तक यादीत टाकले. माहिती नव्हते त्याबद्दल. त्या समित साहनीच्या पुस्तकाच्या शोधात किती वर्षे आहे, ते अजून कुठेही मिळाले नाही. हे सगळे आवडते असले तरी थेरॉ माझा आवडता प्रवासवर्णनकार Happy (मारा आता).
विक्रम सेठचे एक्वल म्युझिक मला आवडते म्हटल्यावर तू माझी निर्भत्सना (:दिवा:) ऑलरेडी केली होतीस Happy

समित सहानीचं पुस्तक मीही वाचलं नाहीये अजून.. आवर्जून जाऊन शोधलंही नाहीये. मला डाल्रिंपल चं फ्रॉम जनाडू आवडलं (तो तसाही माझा आवडता लेखक आहे)
इक्वल म्युझिक वर आपण बोललो आहोत? मला वाटत नाहीये तसं.... आणि इक्वल म्युझिक विषयी माझं बरंवाईट काहीच मत नाहीये. सूटेबल बॉय बद्दल आहे Wink निर्भर्त्सना? Uhoh अजून तेवढं जमायचंय करायला मला आयुष्यात हां...

मस्त धागा. इंग्रजी वाचन क्लासिक , काही विनोदी , नॉन फिक्शन इतकेच आहे म्हणून मराठीबद्दल जास्त
१. विषय आणि क्वचित लेखक अशीच चाळणी लावते
२. आत्मचरित्र - आवडता प्रकार - नाटकाविषयी आवड असल्याने नट , लेखक जास्त करून - मधुकर तोरडमल - तिसरी घंटा, बहुरूपी - चिंतामणराव कोल्हटकर आवडलय , खूप अपेक्षेने झिम्मा - विजया मेहता वाचले - mixed feelings
३. बुकगंगा वर शोधते , काही पाने वाचून अंदाज येतो. काही छान पुस्तके सापडली - लेटेस्ट वाचलेली उदा सोन्याच्या धुराचे ठसके, लॉक ग्रिफिन
४. मायबोली व इतरत्र पुस्तकप्रेमी लोक काय म्हणताहेत ते शोधते
५. दुर्गा भागवत , श्री ना पेंडसे , पु ल , शांता शेळके, , चि वि जोशी, प्रकाश नारायण संत - याचे काहीही आवर्जून - काही इतर \ one ऑफ कादंबऱ्या जसे निशाणी डावा अंगठा , भैरप्पांच्या काही अनुवादित , अरविंद गोखले \व्यंकटेश माडगूळकर कथा खूप आवडल्या आहेत म्हणून क्वचित लेखक माहित नसला तरी वाचते , कधी काही चांगले सापडते
६. गिरीश कुबेर, अवचट , अच्युत गोडबोले - non fiction ठीक ठीकच , पण इंग्रजी वाचू न शकणाऱ्या लोकांसाठी वेगवेगळ्या विषयांची पुस्तके मराठीतून लिहिल्याबद्दल फारच great
७. इतिहास वगैरे फारच आवडत असला तरी ना स इनामदार , शिवाजी सावंत, रणजित देसाई वगैरे मंडळी अजिबात आवडत नाहीत . त्या पेक्षा त्या मानाने अर्वाचीन इतिहासातील मंडळींबद्दल वाचायला आवडते - समग्र र धों कर्वे - बहुतेक अनंत देशमुख, बखरी वगैरे
८. काही पुस्तके comfort food सारखी कायम ठेवते - कधीही वाचायला लागू शकतात उदा स्मृतीचित्रे , लव्हाळी - श्री ना पेंडसे, लंपन series , काही पु ल, काही चि वि , काही कवितासंग्रह ( पण !)
९. गेले काही वर्ष ऑरलँडो मध्ये मराठी लायब्ररी चालवत आहे - इथे तरी बहुतांशी लोकांना फक्त अध्यात्म गूढ अनुभव ( उदा. नर्मदे हर हर ), धार्मिक , अमेरीकेतील व भारतातील सुखवस्तू लोकांच्या ( लग्न वगैरे ) अक्षरशः: पाडलेल्या कथा ( म्हणजे सिरीयल ची गंगोत्री) , नाहीतर आवाज , शतायुषी वगैरे जास्त आवडतात असा अनुभव आहे
१०. अमुक चांगले आणि तमुक वाईट असे काही नाही, प्रत्येकाची आवड, वय, वेळ, पूर्वसंस्कार हे भेद भाव असणारच व त्यात बदलही होणारच

मास्तरांनी अजून लिहिलं नाही इथे ते बरंच आहे.
वरदाने लिहिलेलं पाहून अजूनच जेलस बाहुली . आता अजून लिहू नकोस काही Light 1

गुुड रीड्स
रेडिओ वरील कार्य्क्रमातून झालेली ओळख.
एका लेखकाचं एक आवड्लं की दुसरी
अ‍ॅमेझॉन वरुन एक घेतलं की तो रेकमेंड करतो त्यातली आवडली तर.
एक़ कुठला विषय आवडला की त्यावर शोधून
सिटीच्या लायब्ररीत वेळ असला की नुसती चाळत काही सापडलं तर.

विषयनुसार आणि लेखक कोण आहे त्यावर( बहुधा हे खूपच कॉमन आहे)

मैत्रीतून एकाने/एकीने सांगितले तर चाळते आणि पसंत पडले तरच घेते. तसेही मला पुस्तकांच्या दुकानात फिरायला, पुस्तके चाळायला आवडतात पण घरी जागेच्या अभावी कमी केलेय विकत घेणे. ह्यावर्षी घर लावले तेव्हा ठरवले होते की पुस्तक घ्यायचय नाही एकही

पण टवणे सर, हे सर्व माहीती गोळा करून काय करणार तुम्ही? हेतु काय?

वाट्टेल ते, तुम्ही मराठी लायब्ररी चालवत आहात असे लिहिले आहे. त्यासाठी तुम्ही स्वतःला जी पुस्तके आवडतात तीच विकत घेउन लोकांसाठी उपलब्ध करता की लोकांना जे आवडते/हवे आहे (उदा. नर्मदे हर हर) ती पुस्तके मुद्दामून आणता?

पण टवणे सर, हे सर्व माहीती गोळा करून काय करणार तुम्ही? हेतु काय?
>>
जर एखादी कल्पना आवडली तर ती अंमलात आणण्याचा प्रयत्न करेन. इतरांनाही असे काही करता येईल.
बाकी काहीच नाही, तर तेव्हडाच टाइमपास

छान धागा व प्रतिसाद!
मराठीपुरतं लिहायचं तर -
१. वाचणार्या मित्रमंडळींकडून कौतुक ऐकून , बॉरो करून.
२. लेखकाचे नाव बघून. उदा- अच्युत गोडबोलेंचं एक पुस्तक(मुसाफिर) आवडल्यावर आता त्यांची बोर्डरूमपासून लाईमलाईटपर्यंत बरीचशी विकत घेतली आहेत. ते माझे सध्याचे सर्वात आवडते मराठी लेखक आहेत.
३. अक्षरधारा, रसिक साहित्य , क्रॉसवर्ड मध्ये पुस्तकं बघून. पण तरी इथेही माहीत असलेल्या लेखकांची पुस्तकंच उचलली जातात. अलीकडे तुंबाडचे खोत(श्री ना पेंडसे), सुनीताबाई (मंगला गोडबोले) टाटायन (गिरीश कुबेर) अशी विकत घेऊन वाचली. अर्थातच ही सर्व पुस्तकं आवडली. याशिवाय रुचिरा वगैरे पाककलेच्या मराठी पुस्तकांचं सतत वाढतं कलेक्शन माझ्याकडे आहे. पुलं,शिरीष कणेकर, मंगला गोडबोले, अच्युत गोडबोले ही नावं बघून नेहमीच पुस्तक घेतलं जातं.
४. मीडिया मध्ये ऐकून. हे फार कमी वेळा कारण आपल्याकडे पुस्तकांचं प्रमोशन, मार्केटिंग केलं जातच नाही. विजया मेहतांचा निखिल वागळेंनी ग्रेट भेट मध्ये इंटरव्ह्यू घेतला होता तेव्हा त्यात त्यांचं(म्हणजे बाईंचं) आत्मचरित्र येतं आहे असा उल्लेख होता. मला ती मुलाखत इतकी आवडली होती की मी झिम्मा रिलीज झाल्यावर लगेच घेतलं. मला खूप आवडलं. मी इतरांना प्रती घेऊन गिफ़्टही केल्या.
तसंच मीना प्रभूंची सर्व प्रवासवर्णन पुस्तकं एका सेटमध्ये मिळतील अशी ऑफर होती तेव्हा ती घेतली. पूर्ण कलेक्शन तुलनेने खूपच स्वस्तात मिळालं. अशा इनोव्हेटिव्ह ऑफर्सचं कौतुक वाटतं, प्रकाशक व वाचक दोघांसाठी विन-विन डील होऊन जातं.

इंग्लिश वाचन हे पारच कंट्रोल बाहेर गेलेलं व्यसन असल्यामुळे त्याबद्दल लिहित नाही!

भारी धागा!
मी सवडीने लिहिते.
धाग्याला हजारोंच्या संख्येने उपस्थिती लाभू दे.

अवांतर : इंटरनेटपूर्वकाळात पुस्तकांची निवड करण्याबाबत - निरंजन घाटेंचं 'वाचत सुटलो त्याची गोष्ट' हे पुस्तक आवर्जून वाचा. अफाट विश-लिस्ट तयार होईल.

छान धागा आणि छान प्रतिसाद येत आहेत.
एकेकाळी पृष्टसंख्या आणि किंमत यांचा ताळमेळ लावत पुस्तक घ्यायचे की नाही हे ठरवणारया मला माझी लाज वाटू लागलीय Happy

गुडरीडचे फेसबुक पेज लाइक केले आहे. तिथे दर शुक्रवारी भारतीय संध्याकाळी What will you be reading this weekend? अशी पोस्ट येते. त्यात ज्या कमेन्टला जास्त लाईक आहेत ती पुस्तकं वाचते.

पूर्वी पुलंची पुस्तके खूप वाचायचो आणि खूप वेळाही. पण इथे आल्यावर शंतनु बेडेकर या लेखकाकडून त्या पुस्तकात काहीच दम नसल्याचे कळल्यापासून त्यांना शिवत सुद्धा नाही. आता फक्त आंतरराष्ट्रीय अक्लेम्ड पुस्तकेच वाचतो ऑन्लाइन मागवून

फार पूर्वी पुणे कँपातले मणीज बंद पडले, आता मुंबईचे फोर्ट भागातील Strand Book Stall बंद पडले आणि एक पर्व संपले. कालाय तस्मै नमः

मस्त धागा आणि छान प्रतिसाद.>> +१
वाचनाची आवड असणारे कुटुंबीय आहेत, त्यामुळे त्यांनी सुचवलेली पुस्तकं वाचली जातात.
अक्षरधारासारख्या दुकानात गेल्यावर पुस्तकं चाळून बघून आवडलेली पुस्तकं घेतली जातात.
एखादा लेखक किंवा एखादा विषय आवडला की त्या लेखकाची किंवा त्या विषयावरची पुस्तकं जास्त घेतली जातात.
इंटरनेटवर रिव्ह्यू वाचून मी अजून कुठलं पुस्तक घेतलं किंवा वाचलं नाही. अपवाद मायबोलीचा. इथे पुस्तक परिचय वाचून अनेक पुस्तकं विश लिस्टमध्ये आली आहेत.

नॉन फिक्शन वाचताना बरेचदा एका पुस्तकातून दुसर्‍याचा पत्ता लागे. >>
खरे आहे. अशी बरीच पुस्तके वाचली गेलीत. विशेतः कर्ट वोनेगट, जिएंनी फारच मोठी यादी पुरवली आहे. एकदम ठसठशीत आठवणारे उदाहरण म्हणजे वपुंच्या एका पुस्तकात रारंगढांगचा उल्लेख वाचून पुस्तक घेतले होते. खूप आवडले होते. त्याचे अजूनही वाचन होते बरेच वेळा.
इंग्रजी चित्रपट, पुस्तकांची ओढ तशी जिएंनी लावली म्हणणं अतिशयोक्ति होणार नाही.

मला बरीच पुस्तके मराठी आंजामुळे विशेषतः ऐसीमुळे कळली. हिंदू, इंडियन एक्स्प्रेसमधले रिव्ह्युज सुद्धा कधी कधी भन्नाट सुचवणी करतात. फेबुवर होतो तेव्हा वाचनधर्मी मित्रांकडून मस्त पुस्तके कळली. विशेषतः श्रीनांची लव्हाळी, रथचक्र, कलंदर आणि साधूंची मुखवटा, आनंद विंगकरांची अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट ही या वर्षात वाचलेली पुस्तके फेबुमुळे कळालेली.

आई,तिच्या शाळेतील लायब्ररीतील पुस्तके, जोडीला आमची दुसरी लायब्ररी होती.तेथे मुसळे म्हणून लायब्ररियन/मालक होते.त्यांनी सुचवलेली पुस्तके,कॉलेजमधे विजया राजाध्यक्ष,गणोरकर,अंबियेमॅममुळे बरीच पुस्तकं कळली.मुसळेंनी आनंदाने दिली.किती कळले माहित नाही.पण वाचताना मस्त वाटायचे.

@फिल्मी, जीएंनी सुचवलेली इंग्रजी पुस्तके काहितरी वेगळीच होती. म्हणजे जीएंच्या लिखाणाच्या शैलीला फटकून एकदम. जीएंना अद्भुताचे आकर्षण होते, थोडाफार विश्वासही होता असे वाटते त्यांची पत्रे वाचून.

वडील शिक्षक असल्याने माझ्या लहानपणी ते निवडून पुस्तके आणित ती वाचली. त्यात चांदोबा, किशोर सारखे दिवाळी अंक वगैरे असे. वेताळ सारखी कॉमिक्स असत. बाळबोध लिहिलेली चरित्रे असत. नंतर सहावी सातवीला मराठीच्या पुस्तकात प्रत्येक धड्याच्या खाली 'विद्यार्थ्यांनी काय वाचावे' त्या पुस्तकांची यादी असे. ती पुस्तके मिळवूनव वाचायला सुरवात झाली. गावातील ग्रामपंचायतीचे ग्रंथालय त्यामानाने बरेच समृध्द होते कारण ग्रंथपाल उत्तम वाचक होता. त्याने अनेक लेखकांची पुस्तकातून ओळख करुन दिली. वयाच्या त्या त्या टप्प्यात वेगवेगळ्या लेखकांनी वेड लावले. व्यंकटेश माडगुळकर, पेंडसे, पुलं, गोनिदा, रणजित देसाई (माझा गाव या पुस्तकाने वेड लावले होते) शांताबाई शेळके, मधू मंगेश कर्णिक, अरुण साधू अशी प्रचंड मोठी यादी आहे. गौरी देशपांडे वाचून तर चकित व्हायला झाले होते. इंग्रजी साहित्य मात्र वाचनात आले नाही, येत नाही. साहित्याचा आस्वाद घेता येईल एवढे प्रभुत्व त्या भाषेवर नसने हेही कारण असेल कदाचीत.
एक काळ असा होता की वाचल्याशिवाय झोप येत नसे. अगदी पाचवी सहावीचे मराठीचे पुस्तकही चाले, पण हवेच. आता मात्र वाचन कमी केलेय. संतसाहित्य वाचनात आहे फक्त. तेही ठरावीक.
गेल्या २५ वर्षात जमवलेली पुस्तके एक दिवस टेंपोत भरली आणि गावी पाठवली. एक छोटे वाचनालय सुरु केलेय मुलांसाठी.

>>गुडरीडचे फेसबुक पेज लाइक केले आहे. तिथे दर शुक्रवारी भारतीय संध्याकाळी What will you be reading this weekend? अशी पोस्ट येते. त्यात ज्या कमेन्टला जास्त लाईक आहेत ती पुस्तकं वाचते.>>
वाह! तुझे वाचन अफाट आहे.
_____
मी सहसा नॉन फिक्शनच वाचते - मानसशास्त्र, ज्योतिष, बुद्धिझम आणि कविता हे आवडीचे विषय असतात. कविता कमी झालेल्या आहेत व वाचन तर नगण्यच झाले आहे. खरं तर वाईट वाटते पण कामातून वेळ मिळत नाही. वीकेंडला वाचनात मन लागत नाही. का माहीत नाही.

मला ऑडीबल वर दोन पुस्तके घ्यायची आहेत.

१. जागतिक इतिहास.
जगातल्या सर्व खंडांबद्दल , प्रदेश, तिथली लोकं,संस्कृती, साम्राज्य वगैरे थोडक्यात ओळख पाहिजे आहे. इतिहासाच्या पुस्तकासारखी असली तरी चालेल. त्यातले जे भाग आवडतील त्यावर नंतर अजून वाचता येईल.
ऑडीबलवर थोडक्यात लिहिलेला (आणि वाचलेला) जगाचा इतिहास अशी 4-5 पुस्तके आहेत. Goodreads वर फीडबॅक वाचूनही मला काही ठरवता येत नाहीये की कुठलं पुस्तक घ्यावं.
2-3 पुस्तकं विकत घ्यायची नाहीत, कारण एकच ऐकून , त्यातल्या विशेष वाटणाऱ्या घटनांबद्दल वगैरे माहिती काढण्यात बराच वेळ जाईल.
इथे कोणी सुचवले तर बरे पडेल. नाही तर मला अक्कड बक्कड करून कुठलेही एखादे निवडावे लागेल.

२. मेंदू आणि भावना बद्दल माहिती
मेडिकल क्षेत्रात नसलेल्या व्यक्तीला कळेल असं आणि "छद्म विज्ञान नसलेलं" पुस्तक शोधत आहे.
म्हणजे तत्त्ववादी किंवा तुम्ही तुमचे शिल्पकार वगैरे पुस्तके नकोत. आणि "सिक्रेट" सारखे नको. (सिक्रेट पुस्तकाला कमी लेखण्याचा हेतू नाही)
सायकॉलॉजी, भावना, मेंदू, केमिकल वगैरेबद्दल माहिती, psychiatrist च्या औषधामुळे, कौन्सिलिंगमुळे मेंदूवर कसा
परिणाम होत जातो वगैरे थोडक्यात शास्त्रीय माहिती - शास्त्रज्ञानी शोधलेली, स्वीकारलेली पाहिजे.
यातही जो भाग आवडेल त्यात नंतर अजून खोलात वाचता येईल.

हे अवांतर वाचन आहे आणि डोळ्याला आराम मिळावा म्हणून ऑडिओ बूक शोधत आहे.
हा धागा ऑडिओ पुस्तकांसाठी योग्य नसेल तर ही पोस्ट काढून टाकेन.

Pages