माझं काय चुकलं?

Submitted by लालू on 5 March, 2009 - 12:13

माजं काय चुकलं...?

येकदा आमच्या धन्याच्या मनात काय आलं
म्हनले आय करती तसं करशील का पिठलं?

मी म्हनलं त्यात काय, पिठलं काय अवघड हाय?
बिगीबिगी जाऊन भांडं चुलीवर ठेवलं

टाकला कांदा, मिर्च्या, लसूण, मूठभर जिरं
आन मग वरुनशान डावभर त्याल घातलं

पाणी आणि बेसनाचं पीठ केलं भज्यावानी
धूर व्हायला लागला तसं भांड्यात वतलं

उकळलं रटारटा, भाकरी केली पटापटा
चटणी, कांद्यासंगं मग पानात वाढलं

जेऊनशान उठल्यावर म्हन्त्यात कसं मला
पिठलं करनार व्हतीस न्हवं, त्याचं काय झालं!? Sad

असा वाया गेला बगा माजा समदा खटाटोप
सांगा आता तुमीच यात माजं काय चुकलं?
सांगा माजं काय चुकलं..

****************

पाककृतींसंबंधी माहिती विचारण्यासाठी हा धागा उघडला आहे. कधी कधी साधारण साहित्य, रेसिपी माहित असते पण तंत्र न जमल्यामुळे, अंदाज चुकल्यामुळे पाककृती बिघडते. किंवा जमत नाही आणि नक्की काय चुकते आहे तेच समजत नाही. असे सगळे प्रश्न इथे विचारावेत. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऐन वेळी पटकन चिमूटभर बेकिंग पावडर टाकून>>>>

तुम्ही जी पाकृ वापरलीत त्यात काय लिहिले हे माहीत नाही पण कुठल्याही केकच्या रेसिपीत बेकिंग पावडर चिमूटभर अजिबात नसते आणि ती आयत्या वेळी टाकायची तर अजिबातच नसते.

केक करताना कोरडे पदार्थ (कणिक, मैदा बे पा, बे सो वगैरे) एकत्र चाळून घ्यायचे म्हणजे नीट मिक्स होतात. बे पा पूर्ण मिश्रणात समप्रमाणात पसरणे अपेक्षित असते.

ओले पदार्थ आधी एकत्र करून त्यात कोरडे मिक्स करायचे. आणि बेदाणे वगैरे सगळे शोभेचे जिन्नस कोरड्या पदार्थात घालायचे. त्यामुळे ते पिठाने चांगले माखले जातात आणि बेक होताना हट्टी मुलांसारखे फतकल मारून तळाला बसत नाहीत. Happy Happy

अजून एक - कितीही घाईत केक करत असाल तरीही सगळेच जिन्नस फ्रिजमधून काढून बाहेर रूम टेम्पला येऊ द्यावे. आयत्या वेळी फ्रीज उघडून जिन्नस काढून केकमध्ये ढकलला असे केले की केक रुसतो.

जे सगळं 'नाही करायचं' म्हणून वरच्या पोस्ट मध्ये सांगितलंय ते सगळं केलंय ☺️☺️
पुढच्या ख्रिस्तमस ला चांगला वाला केक करेन.

कोबीचे धिरडे करत असताना तव्यावर टाकले की छान पसरले जात होते पण परतून /पालटून टाकताना तुटत होते. एकच धिरडे अखंड निघाले.. एरवी असं कधी होत नाही माझ्याकडून.. तवा सेट झाला की 3ऱ्या धिरड्यापासून सरसर निघतात.. पण ह्यावेळेस सारा मामला टुकडो मे बीखर गया.. माझं काय चुकलं?

https://www.maayboli.com/node/67644
ही रेसिपी follow केली

कणकेच्या जागी दुसरे कुठले पीठ तर वापरले गेले नाही ना? गव्हाचे पीठ चिकट असते त्यामुळे धिरडी तुटायला नकोत खरेतर....

खात्री आहे, गव्हाचेच पीठ होते, बदल एवढाच की मी एरवी धिरड्यासाठी पीठ चाळून घेत नाही, ह्यावेळेस गिरणीवाल्याने जाड दळले आहे म्हणून चाळून घेतले

पीठ घट्ट हवे.तवा सणसणीत तापलेला हवा.तवा नॉन स्टिक नसेल तर त्यावर तेलाचा लेयर.पीठ टाकून लगेच फ्राईंग पॅन चे झाकण ठेवल्यास धिरड्याचा खालचा आणि वरचा लेयर एकत्र शिजून सर्व एकसंध काढता येईल.

हा आजचा केक.आता ड्रीम गर्ल बघत सर्वाना एक एक चमचा देणार आहे.चव मस्त आहे हो.
IMG_20191225_190521.jpg

पीठ टाकून लगेच फ्राईंग पॅन चे झाकण ठेवल्यास धिरड्याचा खालचा आणि वरचा लेयर एकत्र शिजून सर्व एकसंध काढता येईल.------- he try करून पाहीन next time
पीठ घट्ट होते(ह्याबाबत आता शंका येऊ लागली आहे), तवा तापलेला ,नि non stick होता

शिल्लक राहिलेल्या केकच्या तुकड्यांपासून डेझर्ट वगैरे रेसिपीज वाचल्या आहेत. नेटवर शोधा, मिळतील. उंच ग्लासात एकावर एक केक + आईस्क्रिमचे थर टाकून वर ड्रायफ्रूईट्स किंवा खरी फळे/कापलेली स्ट्रॉबेरी वगैरे मसाल्याने सजवल्यास मूळ केक बिघडला होता हे कोणा दुसऱ्याला कळणार तर नाहीच पण तुम्हालाही आठवणार नाही.

केक बिघडला तरी चव छान आहे आणि शिजला आहे मग झाल तर! साधनाने सान्गितल्यासारख इमप्रुव्ह करुन खाता येइलच.
मला जरासुद्धा बेकिन्ग हॅन्ड नाही, म्हणजे कीतीही तोलुन मापुन घेतल तरी फ्रॉम स्क्रॅच पासुन वाले केक वैगरे गन्डतातच तेव्हापासुन मी विकतच आणते केक, किवा अगदिच वाटल तर विकतचे ब्राउनी मिक्स /केक मिक्स आणून हौस भागवुन घेते.
पफ पेस्ट्रिचे प्रयोग, कुक्या- बिक्या चिल्लर पदार्थ जमातात.

कोबी जाड चिरला गेला का? किवा कोबी निब्बर असेल तरी होवु शकते, मी कोबीचे पराठे,धिरडे करताना जरा जाड किसणिने किसुन घेते म्हणजे सहज एकजिव होतो पिठात.. भाजी, मन्चुरियन्,हक्का नुडल साठी उन्भा चिरुन घ्यायचा म्हणजे पाणी सुटत नाही.

अनू, इतकं अवघड नसतं ते. एकदोन प्रयत्नांत जमेल. आता युट्युबवर बघून बरीच सोय झाली आहे शिकायची पण तरीही काही अडचण असेल तर मेल फोन किंवा भेटून नक्की सांगेन. मी आवड म्हणून बेकींग करते आणि मजा येते करायला आणि शिकायला.

आज lockdown मधे पाणी पुरी चा बेत केलेला पण सगळा बेत फिसकटला ..पुर्‍या मऊ झाल्या आणि फुगल्या नाहीत..:((

मी बारीक रवा ४ मोठे चमचे ,कणिक १ मोठा चमचा, थोडा खायचा सोडा,मिठ ..पीठ घट्ट भिजवुन घेतल आणि १५ मिनीट ठेवुन मग पुर्‍या तळल्या.. ह्या सगळ्यात काय चुकल?

एक तर जाड रवा घ्यायला हवा होता. आणि उकळते पाणी.
शिवाय पाणीपुरी कुरकुरीत व्हायला हवी तर प्रमाण परफेक्ट लागतं.
१ कप जाड रवा + 4 टेबलस्पून मैदा चांगले मिसळून त्यात अर्धा कप उकळते पाणी घालून पाच मिनिटे चांगले मळायचे. पीठ 20 मिनिटे झाकून ठेवून पुऱ्या लाटायच्या. या साहित्यात 5 सेमी व्यासाच्या ८० ते ९० पुऱ्या व्हायला हव्यात. लाटलेल्या पुऱ्या १०- १२ मिनिटात एक बाजूने थोड्या सुकतात, तेव्हा त्या तळायच्या. (तळताना ओली बाजू तेलाकडे करून तेलात सोडायच्या)
याप्रमाणे करून पाहा. 100% पुऱ्या फुगतात. कुरकुरीत होतात, कुरकुरीत राहातात आणि हवाबंद डब्यात छान राहातात.

लाटलेल्या पुऱ्या १०- १२ मिनिटात एक बाजूने थोड्या सुकतात, तेव्हा त्या तळायच्या. (तळताना ओली बाजू तेलाकडे करून तेलात सोडायच्या)
<<

धिस इज द रिअल प्रो टिप.

पुर्‍या मऊ झाल्या आणि फुगल्या नाहीत..:((
<<
खट्टू होऊ नका.

त्याची एस्बीडीपी उर्फ शेव-बटाटा-दही-पुरी करा. वैशाली स्पेशल. छान लागते.

१-२ पुर्‍या डबल फ्राय करून पहा थोड्या कुरकुरीत होताहेत का. थोड्या मायक्रोवेव्हमधे ही ठेवून पहा थोडा वेळ. फुगणार नाहीत पण क्रंच येईल.

खट्टू होऊ नका.

त्याची एस्बीडीपी उर्फ शेव-बटाटा-दही-पुरी करा. वैशाली स्पेशल. छान लागते. ~~ +१२३४५मनात हेच आलं वाचून.
धिस इज द रिअल प्रो टिप. ~~ +१२३४५

मटाकिचि उसल फार तिखट झालि आहे , तिला सुधारता कसे येइल? मि एरवि कान्दा लसुन मसाला वापरत नाहि तो वापरला होता

उसळ पातळ करून कच्चे जाड पोहे तळाशी घालून त्यावर फरसाण घालून मिसळी सारखे खाता येईल.पोहे तिखटपणा कमी करतात.अगदी हे घालूनही लागत असेल तिखट तर ओलं खोबरं वरून, शिवाय थोडं दही.
(इकडे पाठवून द्या हे पहिलं वाक्य आलं होतं पण आता लॉक डाऊन मध्ये काही अर्थ नाही ☺️)

>>> मटाकिचि उसल फार तिखट झालि आहे , तिला सुधारता कसे येइल?

बिघडली असं म्हणूच नका. मिसळीसाठी म्हणून मुद्दाम तिखट केली असं सांगा. Proud
मी_अनूंच्या कॉम्बिनेशनमध्ये उकडलेले बटाटेही अ‍ॅड करा - सौम्य होईल.

मटकीचीच भाजी अतितिखट(म्हणजे आम्ही घरी खुप म्हणजे खुपच तिखट खातो एरव्ही पण त्यापेक्षाही जास्त) झालेली, तेव्हा शेंगादाण्याचे कुट घालून पुन्हा शिजवलेली.

एक स्वानुभव - माझ्या हातून कायम मीठ जास्त पडतं. हल्ली मी घरात प्लेन मॅश्ड पोटॅटो मिक्स ठेवते Happy हे म्हणजे नुसते ड्राय पोटॅटो फ्लेक्स असतात. भाजीत तेल, तिखट , मीठ असं जास्त झालं की मी ते पोटॅटो फ्लेक्स घालते थोडे. बेमालूमपणे जास्त झालेलं तिखट मीठ अ‍ॅडजस्ट करता येतं !

शेव किंवा फरसाण घालून द्या वर लिंबू कांदा - मस्त मिसळ आहे असे सांगा !!

थोडी मटकी मिक्सर मधून काढून टाकली तर रस थोडा ताट होऊन कमी तिखट होईल.

थोडा कांदा उभा पातळ चिरून कॅरेमलाइझ करून घ्या. बासमती तांदूळ + अख्खे गरम मसाले + थोडे तूप घालून अर्धवट शिजवून घ्या. मग मटकी, कॅरमलाइझ कांदा आणि वरती हा शिजवलेला भात , परत थोडे काजू + कांदा लेयर करून घट्ट झाकण लावून वाफ काढा सणसणीत. कोल्हापुरी व्हेज बिर्याणी म्हणून वाढा

Pages