५० सुक्ष्मकथा: मेँदुला खुराक पुरवणारा कथांचा एक भन्नाट प्रकार

Submitted by अॅस्ट्रोनाट विनय on 31 January, 2017 - 02:30

सुक्ष्मकथा म्हणजे अतिशय छोट्या कथा. इंग्रजीमध्ये हा प्रकार ten words story, twenty words story, nanofiction वगैरे नावांनी मिरवतो. मराठीमध्ये एवढ्या छोट्या कथा लिहण्याचा प्रयत्न फार क्वचित झाला आहे.

पारंपारिक कथेचा जो ढाचा असतो (सुरुवात, गाभा, शेवट) त्यापेक्षा या कथांचं स्वरूप वेगळं असतं. वरवर पाहता ती कथा वाटणार नाही. ते एखादं वाक्य असेल, बातमी असेल, संभाषणामधला एक तुकडा असेल किंवा अजून काही. पण त्या मोजक्या शब्दांमध्ये एक किंवा त्यापेक्षा जास्त कथा दडलेल्या असतात. आपण थोडा विचार केल्यास शब्दांमागे दडलेल्या कथा समोर येऊ लागतात. शिवाय सुक्ष्मकथांमध्ये अनेक लघु किंवा दिर्घ कथांना जन्म देण्याची क्षमता असते. खालील उदाहरणांवरून मला काय म्हणायचंय ते अधिक स्पष्ट होईल.

उदा I) "मोदीजी, तुम्ही या सुभाषला विमान दुर्घटनेची भीती दाखवताय??!”

- सुभाषचंद्र बोसांचा विमान दुर्घटनेत मृत्यू झाला होता हे आपल्याला माहीत आहे (किंवा तसा समज आहे) मोदी त्यांना भेटून तो अपघात टाळण्याचा प्रयत्न करत आहेत असं दिसतं. याचा अर्थ टाईम मशीनचा शोध लागला असेल आणि मोदी भूतकाळात गेले असतील अशी कथा समोर येते. पण शक्यता एवढ्यावरच संपत नाहीत.
चला अजून खोलवर विचार करू - जर टाईम मशीनचा शोध लागलाच तर सहाजिकच त्याचा वापर भूतकाळ किंवा भविष्यात फेरफार करण्यासाठी केला जाणार नाही, कमीत कमी सरकार तरी तसं करू देणार नाही अन्यथा मानवजातीचा विनाश संभवतो. असं असूनही मोदी हा नियम मोडायला का निघालेत? अन त्यांनी सुभाषचंद्र बोसांनाच का निवडल? की त्यांच्याशी बोलणारा मोदींचा तोतया आहे?? प्रत्येक शक्यतेवर एक कथा बनू शकेल.(वाचकांच्या मेँदुला अन कल्पनाशक्तीला खुराक.)
अशा पद्धतीची एखादी सुक्ष्मकथा दिल्यास दहा लेखक त्यावर दहा वेगवेगळ्या प्रकारच्या लघु किंवा दिर्घ कथा लिहू शकतील!!

उदा २: एकाच कथेतून वेगवेगळ्या वाचकांना वेगवेगळे अर्थसुद्धा लागू शकतात. जसं की ही सुक्ष्मकथा पहा:

मार्केट सर्वेक्षण: सफेद साड्यांचा खप वाढला, बांगड्यांचा घटला

- का बरं असं झालं असेल? कुणी म्हणेल अशाप्रकारची फॅशन आलीये म्हणून पांढऱ्या साड्या नेसून बिना बांगड्यांचं फिरताहेत(अशी विचित्र फॅशन का आली याचं उत्तर शोधताना बऱ्याच विनोदी शक्यता डोक्यात येतील). कुणाला असा अर्थ लागेल की सीमेवर युद्ध सुरु आहे अन त्यात आपले हजारो सैनिक मारले जाताहेत म्हणून विधवा बायकांची संख्या वाढली (युद्ध का सुरु झालं हा गहन प्रश्न अनेक कथांना जन्म द्यायला पुरेसा आहे) कुणाला अजून वेगळा अर्थ लागेल.

अशा पद्धतीने प्रत्येक सुक्ष्मकथा आपल्याला एक छोटीशी कथा सांगून जाते अन अधिक विचार केल्यास अनेक कथांच्या शक्यता देऊन जाते. एक मात्र खरं की कथा जेवढी छोटी तेवढी लिहायला कठीण.

माझ्या अल्पमतीप्रमाणे मी १५ शब्द ते अर्धा शब्द आणि शब्दविरहित सुक्ष्मकथा लिहण्याचा प्रयत्न केलाय. आपण प्रत्येक पायरीवर थोडं थांबून विचार करावा…कथा नक्की भेटतील
(टिप: कथा शब्दसंख्येच्या उतरत्या क्रमाने मांडल्या आहेत.)
------------------------------
१) डेली सोप पाहता पाहता ती गायब झाली. हजार भाग संपल्याशिवाय आता ती बाहेर येत नाही

२) “आता टाईम मशीन कधीच बनवल्या जाणार नाही” खास हे वाक्य ऐकायला तो भविष्यातून आला होता

३) “भूतं नसतात रे भावा" मी कसंबसं त्याला समजावलं अन झाडावर झोपायला निघून गेलो

४) तुझ्या ड्रिंकमध्ये मी विष मिसळलं होतं............................
शीट, चुकून मीच पिलं की काय??!!

५) पार्टीत नाचताना त्याला मी शूट केलं. आठवण आली की बघते कधीकधी

६) हुश्श, मारलं एकदाचं त्या भूताला...अरे, मी दिसंत का नाहीये??!!

७) मी बाबांवर खूप प्रेम करते. कालच त्यांच्यासाठी नवीन फ्रीझर आणलाय

८) देवांच्या परीक्षेतील प्रश्न-
2300000000 : दुसरं महायुद्ध : 2220000000 :: ? : तिसरं महायुद्ध : 0

९) रोबोट खोटं बोलतात अन माणसं खरं.
मी रोबोट आहे

१०) हळदीचा बिझनेस एवढा वाढलाय की...काल अश्वत्थामा आला होता

११) एक बातमी: शक्तिमान ब्रम्हचारी, गीता विश्वासचं तमराज किलविशसोबत लग्न

१२) DRDO चा गर्भसंस्कार प्रयोग फसला, नाळ तोडून बाळाची आत्महत्या

१३) मी पिसारा फुलवला तेव्हा माझा बॉस तळवे चाटत होता.

१४) "मोदीजी, तुम्ही या सुभाषला विमान दुर्घटनेची भीती दाखवताय??!"

१५) आजची ताजा खबर: राष्ट्रीय संग्रहालयातून हजारची नोट गायब

१६) मी बेवडा नाहीये काही... ये चकणा दे रे

१७) मार्केट सर्वेक्षण: सफेद साड्यांचा खप वाढला, बांगड्यांचा घटला

१८) चार तास फुटबॉल खेळलो. दमले बाबा... डोळे

१९) पंतप्रधानांचं क्लोनसोबत लग्न, रोबोट बाळ दत्तक घेणार

२०) ३०१७: सर्वोत्कृष्ट पर्यटनस्थळ पुरस्कार: सल्फर व्हॅली, शनी

२१) बाळा, ही पृथ्वी; आपले पूर्वज इथे रहायचे

२२) मी माझ्यासोबत रस्त्याने जातांना आम्हाला मी भेटलो
( वेगवेगळ्या समांतर विश्वातले तिघेजण एकत्र आले अशी कल्पना आहे.)

२३) झाडांनी ऑक्सिजन बनवणं बंद केलंय...अरे वाS

२४) बातमी: समलिंगी यंत्रमानव विवाह कायदा संमत

२५) नापिकी, मेलेलं ढोर, गळ्यातलं चऱ्हाट, झाड

२६) आज ईद....बघा पृथ्वी उगवलीये का

२७) एलीयन्सची विजयी घोषणा: हर हर महादेव

२८) IPL सीजन ५१७ विजेते: मंगळ रेडबुल्स

२९) कब्रस्थान, शॉपिंग कॉंप्लेक्स...बिचारी भूतं

३०) स्वप्न, मी उडतोय...धपाकS...अॅम्बुलन्स

३१) सर, कालच मेलोय, अॅडमिशन मिळेल?

३२) शीट, जोकर सुटला...सॉरी शक्तिमान

३३) २१३५: यंत्रमानवांचा मोर्चा : आरक्षण आरक्षण

३४) एक म्हातारी लहानपणीच मेली

३५) हा दिनेश, माझ्या मित्राची बायको

३६) मी... पृथ्वीवरचा शेवटचा एलीयन

३७) मला लिहता येत नाही

३८) "श्राद्धाचा नैवद्य कुणी खाल्ला!!!"

३९) मुलगी झाली, थँक गॉड

४०) प्रेम, लग्न...ओह शीट

४१) थांब शेरलॉक, रिचार्ज मारतो

४२) वीरमरण, सती, अनाथ पोर

४३) शाळा सुटली...Logout

४४) आक्रमण, दगा, कत्तल

४५) जन्म, मृत्यू, लग्न

४६) चौथं महायुद्ध

४७) भास?

४८) माजXX ??

४९) ?

५०) !
-------------------------------------------------------
आपल्याला काय अर्थ लागले जरूर सांगावं
------------------------------------------------------

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अजून एक शक्यता ,
आपण व्हर्च्युअल क्लासरूम बद्दल बोलतोय,
शाळा सुटली कि त्यां साईट वरून लॉग आउट व्हायचे,

शाळा सुटली.. आता गर्ल/ बॉय फ्रेंडला प्रत्यक्ष बागेतच भेटायचं .. मग चॅट कशाला? म्हणून फेसबुकावरुन लॉग आउट

शाळा सुटली...logout

तो फोनवर चॅट करण्यात मग्न होता. तेवढ्यात शाळा सुटली. त्याने लगेच लॉग आऊट केले, बसकडे गेला आणि केबिन मध्ये चढुन बसचे इंजिन सुरु केले आणि क्लिनरला म्हणाला "ए चल लॉग आऊट कर रे आणि दार उघड, पोरं येतीलच एवढ्यात."

.

Biggrin

खूप छान! नारायण धारपांनी अशाच प्रकारे विज्ञानकथांची व्याख्या त्यांच्या 'टोळधाड' पुस्तकात दिली आहे. त्यात एक सुंदर वाक्य त्यांनी दिले आहे ते म्हणजे "पृथ्वीवरचा शेवटचा माणूस एका बंद खोलीत बसला होता तेवढ्यात कुणीतरी दार ठोठावले..." , या अशा वाक्यांवरून आपले मन तर्कांचं-कल्पकतेचं अगणित असं लांब जाळं तयार करू शकते.

सुक्ष्म कथेमुळे अनेक प्रकार च्या नवनवीन कथा लिखाणाला दिशा मिळू शकेल... त्यामुळे अशा प्रकारच्या कथा वेळोवेळी गंमत म्हणून का होईना प्रकाशित व्हायला हव्यात....

Pages