५० सुक्ष्मकथा: मेँदुला खुराक पुरवणारा कथांचा एक भन्नाट प्रकार

Submitted by अॅस्ट्रोनाट विनय on 31 January, 2017 - 02:30

सुक्ष्मकथा म्हणजे अतिशय छोट्या कथा. इंग्रजीमध्ये हा प्रकार ten words story, twenty words story, nanofiction वगैरे नावांनी मिरवतो. मराठीमध्ये एवढ्या छोट्या कथा लिहण्याचा प्रयत्न फार क्वचित झाला आहे.

पारंपारिक कथेचा जो ढाचा असतो (सुरुवात, गाभा, शेवट) त्यापेक्षा या कथांचं स्वरूप वेगळं असतं. वरवर पाहता ती कथा वाटणार नाही. ते एखादं वाक्य असेल, बातमी असेल, संभाषणामधला एक तुकडा असेल किंवा अजून काही. पण त्या मोजक्या शब्दांमध्ये एक किंवा त्यापेक्षा जास्त कथा दडलेल्या असतात. आपण थोडा विचार केल्यास शब्दांमागे दडलेल्या कथा समोर येऊ लागतात. शिवाय सुक्ष्मकथांमध्ये अनेक लघु किंवा दिर्घ कथांना जन्म देण्याची क्षमता असते. खालील उदाहरणांवरून मला काय म्हणायचंय ते अधिक स्पष्ट होईल.

उदा I) "मोदीजी, तुम्ही या सुभाषला विमान दुर्घटनेची भीती दाखवताय??!”

- सुभाषचंद्र बोसांचा विमान दुर्घटनेत मृत्यू झाला होता हे आपल्याला माहीत आहे (किंवा तसा समज आहे) मोदी त्यांना भेटून तो अपघात टाळण्याचा प्रयत्न करत आहेत असं दिसतं. याचा अर्थ टाईम मशीनचा शोध लागला असेल आणि मोदी भूतकाळात गेले असतील अशी कथा समोर येते. पण शक्यता एवढ्यावरच संपत नाहीत.
चला अजून खोलवर विचार करू - जर टाईम मशीनचा शोध लागलाच तर सहाजिकच त्याचा वापर भूतकाळ किंवा भविष्यात फेरफार करण्यासाठी केला जाणार नाही, कमीत कमी सरकार तरी तसं करू देणार नाही अन्यथा मानवजातीचा विनाश संभवतो. असं असूनही मोदी हा नियम मोडायला का निघालेत? अन त्यांनी सुभाषचंद्र बोसांनाच का निवडल? की त्यांच्याशी बोलणारा मोदींचा तोतया आहे?? प्रत्येक शक्यतेवर एक कथा बनू शकेल.(वाचकांच्या मेँदुला अन कल्पनाशक्तीला खुराक.)
अशा पद्धतीची एखादी सुक्ष्मकथा दिल्यास दहा लेखक त्यावर दहा वेगवेगळ्या प्रकारच्या लघु किंवा दिर्घ कथा लिहू शकतील!!

उदा २: एकाच कथेतून वेगवेगळ्या वाचकांना वेगवेगळे अर्थसुद्धा लागू शकतात. जसं की ही सुक्ष्मकथा पहा:

मार्केट सर्वेक्षण: सफेद साड्यांचा खप वाढला, बांगड्यांचा घटला

- का बरं असं झालं असेल? कुणी म्हणेल अशाप्रकारची फॅशन आलीये म्हणून पांढऱ्या साड्या नेसून बिना बांगड्यांचं फिरताहेत(अशी विचित्र फॅशन का आली याचं उत्तर शोधताना बऱ्याच विनोदी शक्यता डोक्यात येतील). कुणाला असा अर्थ लागेल की सीमेवर युद्ध सुरु आहे अन त्यात आपले हजारो सैनिक मारले जाताहेत म्हणून विधवा बायकांची संख्या वाढली (युद्ध का सुरु झालं हा गहन प्रश्न अनेक कथांना जन्म द्यायला पुरेसा आहे) कुणाला अजून वेगळा अर्थ लागेल.

अशा पद्धतीने प्रत्येक सुक्ष्मकथा आपल्याला एक छोटीशी कथा सांगून जाते अन अधिक विचार केल्यास अनेक कथांच्या शक्यता देऊन जाते. एक मात्र खरं की कथा जेवढी छोटी तेवढी लिहायला कठीण.

माझ्या अल्पमतीप्रमाणे मी १५ शब्द ते अर्धा शब्द आणि शब्दविरहित सुक्ष्मकथा लिहण्याचा प्रयत्न केलाय. आपण प्रत्येक पायरीवर थोडं थांबून विचार करावा…कथा नक्की भेटतील
(टिप: कथा शब्दसंख्येच्या उतरत्या क्रमाने मांडल्या आहेत.)
------------------------------
१) डेली सोप पाहता पाहता ती गायब झाली. हजार भाग संपल्याशिवाय आता ती बाहेर येत नाही

२) “आता टाईम मशीन कधीच बनवल्या जाणार नाही” खास हे वाक्य ऐकायला तो भविष्यातून आला होता

३) “भूतं नसतात रे भावा" मी कसंबसं त्याला समजावलं अन झाडावर झोपायला निघून गेलो

४) तुझ्या ड्रिंकमध्ये मी विष मिसळलं होतं............................
शीट, चुकून मीच पिलं की काय??!!

५) पार्टीत नाचताना त्याला मी शूट केलं. आठवण आली की बघते कधीकधी

६) हुश्श, मारलं एकदाचं त्या भूताला...अरे, मी दिसंत का नाहीये??!!

७) मी बाबांवर खूप प्रेम करते. कालच त्यांच्यासाठी नवीन फ्रीझर आणलाय

८) देवांच्या परीक्षेतील प्रश्न-
2300000000 : दुसरं महायुद्ध : 2220000000 :: ? : तिसरं महायुद्ध : 0

९) रोबोट खोटं बोलतात अन माणसं खरं.
मी रोबोट आहे

१०) हळदीचा बिझनेस एवढा वाढलाय की...काल अश्वत्थामा आला होता

११) एक बातमी: शक्तिमान ब्रम्हचारी, गीता विश्वासचं तमराज किलविशसोबत लग्न

१२) DRDO चा गर्भसंस्कार प्रयोग फसला, नाळ तोडून बाळाची आत्महत्या

१३) मी पिसारा फुलवला तेव्हा माझा बॉस तळवे चाटत होता.

१४) "मोदीजी, तुम्ही या सुभाषला विमान दुर्घटनेची भीती दाखवताय??!"

१५) आजची ताजा खबर: राष्ट्रीय संग्रहालयातून हजारची नोट गायब

१६) मी बेवडा नाहीये काही... ये चकणा दे रे

१७) मार्केट सर्वेक्षण: सफेद साड्यांचा खप वाढला, बांगड्यांचा घटला

१८) चार तास फुटबॉल खेळलो. दमले बाबा... डोळे

१९) पंतप्रधानांचं क्लोनसोबत लग्न, रोबोट बाळ दत्तक घेणार

२०) ३०१७: सर्वोत्कृष्ट पर्यटनस्थळ पुरस्कार: सल्फर व्हॅली, शनी

२१) बाळा, ही पृथ्वी; आपले पूर्वज इथे रहायचे

२२) मी माझ्यासोबत रस्त्याने जातांना आम्हाला मी भेटलो
( वेगवेगळ्या समांतर विश्वातले तिघेजण एकत्र आले अशी कल्पना आहे.)

२३) झाडांनी ऑक्सिजन बनवणं बंद केलंय...अरे वाS

२४) बातमी: समलिंगी यंत्रमानव विवाह कायदा संमत

२५) नापिकी, मेलेलं ढोर, गळ्यातलं चऱ्हाट, झाड

२६) आज ईद....बघा पृथ्वी उगवलीये का

२७) एलीयन्सची विजयी घोषणा: हर हर महादेव

२८) IPL सीजन ५१७ विजेते: मंगळ रेडबुल्स

२९) कब्रस्थान, शॉपिंग कॉंप्लेक्स...बिचारी भूतं

३०) स्वप्न, मी उडतोय...धपाकS...अॅम्बुलन्स

३१) सर, कालच मेलोय, अॅडमिशन मिळेल?

३२) शीट, जोकर सुटला...सॉरी शक्तिमान

३३) २१३५: यंत्रमानवांचा मोर्चा : आरक्षण आरक्षण

३४) एक म्हातारी लहानपणीच मेली

३५) हा दिनेश, माझ्या मित्राची बायको

३६) मी... पृथ्वीवरचा शेवटचा एलीयन

३७) मला लिहता येत नाही

३८) "श्राद्धाचा नैवद्य कुणी खाल्ला!!!"

३९) मुलगी झाली, थँक गॉड

४०) प्रेम, लग्न...ओह शीट

४१) थांब शेरलॉक, रिचार्ज मारतो

४२) वीरमरण, सती, अनाथ पोर

४३) शाळा सुटली...Logout

४४) आक्रमण, दगा, कत्तल

४५) जन्म, मृत्यू, लग्न

४६) चौथं महायुद्ध

४७) भास?

४८) माजXX ??

४९) ?

५०) !
-------------------------------------------------------
आपल्याला काय अर्थ लागले जरूर सांगावं
------------------------------------------------------

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अजून तिन सुक्ष्मकथा (English असल्याने आणि एकच अर्प्रथछटा असल्याने प्रतिसादात टाकतोय)

1. At 2 a.m. she woke me up & asked for water. I live alone.

2. "My mother believes in ghosts" I told to stranger in a park. " How funny" he barked & disappeared

3. "I saw a ghost, his face was burning" my wife cried. For her satisfaction, I locked the door & turn around- her face started burning

ह्म्म्म छान आहे कल्पना, पण तुमच्या गोष्टींमधे भुते खुप जास्त आहेत असे दिसते. म्हणजे जास्त करून भुतांशी संबंधित आहेत.

एक अल्पसा प्रयत्न, सांगा कसा वाटतो,
काल तो त्याच्या आईवडिलांच्या लग्नाला उपस्थित होता.
दिलेल्या शापावर काय उ:शाप द्यावा तेच कळत नाहीये.

माझी देशात अन साक्षात इंग्लंडातही लफडी होती, तुला तर गुजराती बेनही संभाळता नाही रे आली !! आणि माझी बरोबरी करतोस ?

कथा नाविन्यपूर्ण वाटल्या खर्‍या.. पण भूत, टाईम मशीन अश्या ठराविक वर्तुळातून बाहेर पडल्या तर चांगल्या, असे वाटतेय.

असाच एक धागा वाचनात आला होता.

( थोडा बॅकग्राऊंड - इंग्रजी लेखक हेमिंग्वेने हाताळलेला साहित्यप्रकार. अत्यंत कमी शब्दांमध्ये कविता आणि नाट्यमयता यांच्या मिश्रणातून एक संपुर्ण कथानक उभे राहाते )

http://www.maayboli.com/node/39992

सुरुवातीच्या काही फार आवडल्या.. नंतरच्या तुलनेत.. रपारप वाचत गेल्याने असे झाले असावे का?
बाकी ओवर ऑल भारी..
पण तुम्ही या कथानकांना फुलवा आणि मोठ्याच कथा करा, आम्हालाही वाचायला जास्त मिळेल.. आणि अ‍ॅक्चुअली स्पिकींग अगदीच काही भिडणारे अपवाद वगळता या कथाप्रकारात मजा नाही

>> अगदीच काही भिडणारे अपवाद वगळता या कथाप्रकारात मजा नाही

सहमत. एकेकाळी अशीच चारोळ्यांची पण लाट आली होती.

३५) हा दिनेश, माझ्या मित्राची बायको>> हे वाचून अशी ही बनवाबनवी आठवली. "हा पार्वती, माझा बायको"

कथा चांगल्या आहेत. पण ऋ शी सहमत आहे.

दिनेशजी, ज्या कथांमध्ये टाइम मशीन आणि भूतं दिसत आहेत त्यांना वेगळी कलाटणीसुद्धा देता येऊ शकते. मी वरील पन्नास कथांमधे भुताची अन टाईम मशीनची एकही कथा नाही हे सिद्ध करू शकतो Happy

ऋ चं म्हणणं अर्थात बरोबर आहे. हा कथाप्रकार लघुकथांची जागा घेऊ शकत नाही किंवा तेवढी मजा देऊ शकत नाही. कारण प्रत्येक लिखाणप्रकाराच्या आपल्या काही मर्यादा असतात.
पण वाचकांची हवापालट म्हणून आणि लेखकांच्या प्रतिभेला थोडा व्यायाम म्हणून चांगलं आहे.
भारतीय साहित्यातला उपेक्षित कथाप्रकार आहे

अतुल, चारोळ्या हा प्रकार पद्यात्मक आहे आणि सुक्ष्मकथा गद्यात्मक. चारोळीत एकच अर्थ अभिप्रेत असतो तर सुक्ष्मकथेत अनेक. एखाद्या साहित्यप्रकाराची प्रकाराची लाट आली तरच त्या लिहल्या जाव्यात हे योग्य नाही. कुठलाही उपेक्षित साहित्यप्रकार असेल तर तो अधूनमधून लिहला गेला पाहिजे. लेखक लिहतील तरच वाचक वाचतील.
चारोळ्या ह्या लाटेसारख्या येऊन लोप पावल्या नसून त्या कमी प्रमाणात का होईना नेहमीच लिहल्या जातात (आनंदाची गोष्ट)

@ऋ
सुक्ष्मकथा जेवढी छोटी होत जाते तेवढा आवाका मोठा होत जातो आणि वाचायला बोअर होत जाते. वरील कथा शब्दसंख्येच्या उतरत्या क्रमाने मांडलेल्या असल्याने आवडीचा क्रम उतरता असणे नैसर्गिक आहे.

शब्दसंख्येच्या उतरत्या क्रमाने मांडलेल्या असल्याने....... >> शक्य आहे Happy
किंवा मला कमीत कमी शब्दांच्या कथा कश्या लिहिता याची उत्सुकता जास्त असल्याने त्याकडून अपेक्षाही जास्त असतील .. किंवा कमी शब्दाच्या कथा लिहिणे तुलनेत कठीण असल्याने तुम्हाला त्या तुलनेत तितक्या सफाईदार जमल्याही नसतील. . किंवा त्या छोट्या असल्याने माझ्याकडून ईतक्या वेगाने वाचल्या गेल्या असाव्यात की एकमेकांत मिसळल्या असाव्यात. जसे प्रतिध्वनी उमटायला पुरेसा वेळ न मिळाल्याने आवाज घुमतो आणि गोंधळ उडतो तसे... .. माझ्या प्रतिसादांतही कित्येक शक्यता असतात बघा Happy

@ सस्मित, Rofl

अजून एक सुचलं!

'थांब टकल्या, भांग पाडतो'

Rofl

थांब शेरलॉक रिचार्ज मारतो
- यातून काय अर्थ बाहेर पडेल याचा विचार वाचकांनी करावा असं अभिप्रेत होतं. जितकं जास्त जास्त कै च्या कै असेल तितक्या कथेच्या शक्यता जास्त. फक्त प्रत्येक कथा वास्तव बनवायची असा विचार करू नये.
वरील वाक्याच्या संदर्भात माझ्या डोक्यात काय कथा आहे ते थोडक्यात सांगतो-
शेरलॉक होम्स आणि Watson एकदा इंग्लंडच्या राणीच्या आदेशावरुन एका मिशनवर भारतात आलेले असतात. पण इकडे त्यांच्यावर प्राणघातकी संकट येतात. महाराष्ट्रात त्यावेळी तर्कटे नावाचे शरीररचना शास्त्रज्ञ असतात. त्यांच संशोधन गुप्त असतं पण शेरलॉक त्यांना शोधतो आणि मदत मागतो. तर्कटेंनी cryogenic sleep नावाचं तंत्र शोढलेलं असतं ज्याच्या सहाय्याने मनुष्याला बरीच वर्ष गाढ निद्रेत झोपवता येऊ शकतं
( हे तंत्र आजच्या sci fi movies मध्ये दिसतं उदा: star wars च्या latest भागात benedict शेकडो वर्षांच्या cryogenic sleep मधून जागा होतो. शास्त्रीय माहिती wikipedia वर उपलब्ध आहे .)
तर्कटें काही वर्षांसाठी झोपवतो पण प्रयोग जरा फसतो आणि शेरलॉक watson चक्क नव्वद वर्षांनी आजच्या आधुनिक महाराष्ट्रात जागे होतात.
इथून पुढे कथानक घडत जातं ते दोघे मराठी शिकतात, मोबाईल वापरतात आणि असंच एकदा recharge संपलेलं असताना watson वरील वाक्य ऊच्चारतो

ही ती कथा. तुम्हाला अजून वेगळ्यासुद्धा सूचू शकतील.

अशाप्रकारे वरील प्रत्येक सुक्ष्मकथेवर चांगल्या कथा बनू शकतात.

By the way, थांब टकल्या भांग पाडतो या वाक्यावर एक विनोदी, एक sci fi, एक fantasy अशा तिन कथा सध्या माझ्या डोक्यात आहेत.
सुक्ष्मकथा जितकी weired, लघुकथाच्या शक्यता तितक्या जास्त Happy

ऋन्मेषजी, तुम्ही मांडलेल्या शक्यता बरोबर आहेत. काही कथांमधे कमतरता राहिल्या असण्याची शक्यता आहे. काही सुधारणा सुचल्या तर जरूर सांगाव्या.

सहज एक गंमत म्हणून विचारतोय, खालील तिन सुक्ष्मकथांवरुन आपल्याला काय कथानक सुचतात -
शाळा सुटली...logout
चौथं महायुद्ध
माजXX ?? (अर्धा शब्द)

'सन्दर्भासहित स्पष्टीकरण करा....!!' अशा विभागात ह्या सुक्ष्म कथा येतात....!!! १०वी बोर्डाच्या मराठी पेपर मध्ये हमखास येणारा प्रश्न....!!! Happy

Pages