५० सुक्ष्मकथा: मेँदुला खुराक पुरवणारा कथांचा एक भन्नाट प्रकार

Submitted by अॅस्ट्रोनाट विनय on 31 January, 2017 - 02:30

सुक्ष्मकथा म्हणजे अतिशय छोट्या कथा. इंग्रजीमध्ये हा प्रकार ten words story, twenty words story, nanofiction वगैरे नावांनी मिरवतो. मराठीमध्ये एवढ्या छोट्या कथा लिहण्याचा प्रयत्न फार क्वचित झाला आहे.

पारंपारिक कथेचा जो ढाचा असतो (सुरुवात, गाभा, शेवट) त्यापेक्षा या कथांचं स्वरूप वेगळं असतं. वरवर पाहता ती कथा वाटणार नाही. ते एखादं वाक्य असेल, बातमी असेल, संभाषणामधला एक तुकडा असेल किंवा अजून काही. पण त्या मोजक्या शब्दांमध्ये एक किंवा त्यापेक्षा जास्त कथा दडलेल्या असतात. आपण थोडा विचार केल्यास शब्दांमागे दडलेल्या कथा समोर येऊ लागतात. शिवाय सुक्ष्मकथांमध्ये अनेक लघु किंवा दिर्घ कथांना जन्म देण्याची क्षमता असते. खालील उदाहरणांवरून मला काय म्हणायचंय ते अधिक स्पष्ट होईल.

उदा I) "मोदीजी, तुम्ही या सुभाषला विमान दुर्घटनेची भीती दाखवताय??!”

- सुभाषचंद्र बोसांचा विमान दुर्घटनेत मृत्यू झाला होता हे आपल्याला माहीत आहे (किंवा तसा समज आहे) मोदी त्यांना भेटून तो अपघात टाळण्याचा प्रयत्न करत आहेत असं दिसतं. याचा अर्थ टाईम मशीनचा शोध लागला असेल आणि मोदी भूतकाळात गेले असतील अशी कथा समोर येते. पण शक्यता एवढ्यावरच संपत नाहीत.
चला अजून खोलवर विचार करू - जर टाईम मशीनचा शोध लागलाच तर सहाजिकच त्याचा वापर भूतकाळ किंवा भविष्यात फेरफार करण्यासाठी केला जाणार नाही, कमीत कमी सरकार तरी तसं करू देणार नाही अन्यथा मानवजातीचा विनाश संभवतो. असं असूनही मोदी हा नियम मोडायला का निघालेत? अन त्यांनी सुभाषचंद्र बोसांनाच का निवडल? की त्यांच्याशी बोलणारा मोदींचा तोतया आहे?? प्रत्येक शक्यतेवर एक कथा बनू शकेल.(वाचकांच्या मेँदुला अन कल्पनाशक्तीला खुराक.)
अशा पद्धतीची एखादी सुक्ष्मकथा दिल्यास दहा लेखक त्यावर दहा वेगवेगळ्या प्रकारच्या लघु किंवा दिर्घ कथा लिहू शकतील!!

उदा २: एकाच कथेतून वेगवेगळ्या वाचकांना वेगवेगळे अर्थसुद्धा लागू शकतात. जसं की ही सुक्ष्मकथा पहा:

मार्केट सर्वेक्षण: सफेद साड्यांचा खप वाढला, बांगड्यांचा घटला

- का बरं असं झालं असेल? कुणी म्हणेल अशाप्रकारची फॅशन आलीये म्हणून पांढऱ्या साड्या नेसून बिना बांगड्यांचं फिरताहेत(अशी विचित्र फॅशन का आली याचं उत्तर शोधताना बऱ्याच विनोदी शक्यता डोक्यात येतील). कुणाला असा अर्थ लागेल की सीमेवर युद्ध सुरु आहे अन त्यात आपले हजारो सैनिक मारले जाताहेत म्हणून विधवा बायकांची संख्या वाढली (युद्ध का सुरु झालं हा गहन प्रश्न अनेक कथांना जन्म द्यायला पुरेसा आहे) कुणाला अजून वेगळा अर्थ लागेल.

अशा पद्धतीने प्रत्येक सुक्ष्मकथा आपल्याला एक छोटीशी कथा सांगून जाते अन अधिक विचार केल्यास अनेक कथांच्या शक्यता देऊन जाते. एक मात्र खरं की कथा जेवढी छोटी तेवढी लिहायला कठीण.

माझ्या अल्पमतीप्रमाणे मी १५ शब्द ते अर्धा शब्द आणि शब्दविरहित सुक्ष्मकथा लिहण्याचा प्रयत्न केलाय. आपण प्रत्येक पायरीवर थोडं थांबून विचार करावा…कथा नक्की भेटतील
(टिप: कथा शब्दसंख्येच्या उतरत्या क्रमाने मांडल्या आहेत.)
------------------------------
१) डेली सोप पाहता पाहता ती गायब झाली. हजार भाग संपल्याशिवाय आता ती बाहेर येत नाही

२) “आता टाईम मशीन कधीच बनवल्या जाणार नाही” खास हे वाक्य ऐकायला तो भविष्यातून आला होता

३) “भूतं नसतात रे भावा" मी कसंबसं त्याला समजावलं अन झाडावर झोपायला निघून गेलो

४) तुझ्या ड्रिंकमध्ये मी विष मिसळलं होतं............................
शीट, चुकून मीच पिलं की काय??!!

५) पार्टीत नाचताना त्याला मी शूट केलं. आठवण आली की बघते कधीकधी

६) हुश्श, मारलं एकदाचं त्या भूताला...अरे, मी दिसंत का नाहीये??!!

७) मी बाबांवर खूप प्रेम करते. कालच त्यांच्यासाठी नवीन फ्रीझर आणलाय

८) देवांच्या परीक्षेतील प्रश्न-
2300000000 : दुसरं महायुद्ध : 2220000000 :: ? : तिसरं महायुद्ध : 0

९) रोबोट खोटं बोलतात अन माणसं खरं.
मी रोबोट आहे

१०) हळदीचा बिझनेस एवढा वाढलाय की...काल अश्वत्थामा आला होता

११) एक बातमी: शक्तिमान ब्रम्हचारी, गीता विश्वासचं तमराज किलविशसोबत लग्न

१२) DRDO चा गर्भसंस्कार प्रयोग फसला, नाळ तोडून बाळाची आत्महत्या

१३) मी पिसारा फुलवला तेव्हा माझा बॉस तळवे चाटत होता.

१४) "मोदीजी, तुम्ही या सुभाषला विमान दुर्घटनेची भीती दाखवताय??!"

१५) आजची ताजा खबर: राष्ट्रीय संग्रहालयातून हजारची नोट गायब

१६) मी बेवडा नाहीये काही... ये चकणा दे रे

१७) मार्केट सर्वेक्षण: सफेद साड्यांचा खप वाढला, बांगड्यांचा घटला

१८) चार तास फुटबॉल खेळलो. दमले बाबा... डोळे

१९) पंतप्रधानांचं क्लोनसोबत लग्न, रोबोट बाळ दत्तक घेणार

२०) ३०१७: सर्वोत्कृष्ट पर्यटनस्थळ पुरस्कार: सल्फर व्हॅली, शनी

२१) बाळा, ही पृथ्वी; आपले पूर्वज इथे रहायचे

२२) मी माझ्यासोबत रस्त्याने जातांना आम्हाला मी भेटलो
( वेगवेगळ्या समांतर विश्वातले तिघेजण एकत्र आले अशी कल्पना आहे.)

२३) झाडांनी ऑक्सिजन बनवणं बंद केलंय...अरे वाS

२४) बातमी: समलिंगी यंत्रमानव विवाह कायदा संमत

२५) नापिकी, मेलेलं ढोर, गळ्यातलं चऱ्हाट, झाड

२६) आज ईद....बघा पृथ्वी उगवलीये का

२७) एलीयन्सची विजयी घोषणा: हर हर महादेव

२८) IPL सीजन ५१७ विजेते: मंगळ रेडबुल्स

२९) कब्रस्थान, शॉपिंग कॉंप्लेक्स...बिचारी भूतं

३०) स्वप्न, मी उडतोय...धपाकS...अॅम्बुलन्स

३१) सर, कालच मेलोय, अॅडमिशन मिळेल?

३२) शीट, जोकर सुटला...सॉरी शक्तिमान

३३) २१३५: यंत्रमानवांचा मोर्चा : आरक्षण आरक्षण

३४) एक म्हातारी लहानपणीच मेली

३५) हा दिनेश, माझ्या मित्राची बायको

३६) मी... पृथ्वीवरचा शेवटचा एलीयन

३७) मला लिहता येत नाही

३८) "श्राद्धाचा नैवद्य कुणी खाल्ला!!!"

३९) मुलगी झाली, थँक गॉड

४०) प्रेम, लग्न...ओह शीट

४१) थांब शेरलॉक, रिचार्ज मारतो

४२) वीरमरण, सती, अनाथ पोर

४३) शाळा सुटली...Logout

४४) आक्रमण, दगा, कत्तल

४५) जन्म, मृत्यू, लग्न

४६) चौथं महायुद्ध

४७) भास?

४८) माजXX ??

४९) ?

५०) !
-------------------------------------------------------
आपल्याला काय अर्थ लागले जरूर सांगावं
------------------------------------------------------

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शेरलॉक होम्स आणि Watson एकदा इंग्लंडच्या राणीच्या आदेशावरुन एका मिशनवर भारतात आलेले असतात. पण इकडे त्यांच्यावर प्राणघातकी संकट येतात. महाराष्ट्रात त्यावेळी तर्कटे नावाचे शरीररचना शास्त्रज्ञ असतात. त्यांच संशोधन गुप्त असतं पण शेरलॉक त्यांना शोधतो आणि मदत मागतो. तर्कटेंनी cryogenic sleep नावाचं तंत्र शोढलेलं असतं ज्याच्या सहाय्याने मनुष्याला बरीच वर्ष गाढ निद्रेत झोपवता येऊ शकतं

????? हे कस सुचु शकेल फक्त ४ लिनेस वरुन?

त्यांना वाचकांना कसे सुचेल असे म्हणायचे आहे.

आणि ते बरोबर आहे, जर वाचकांना सुचले नाही तर फायदा काय? किंवा वाचकांना जे सुचले ते तितके ईंंटरेस्टींग नसले तर वाचक आनंदाला मुकले. त्यातल्या त्यात एकच समाधान, वाचकांचा कमीत कमी वेळ फुकट गेला.

हे मत फक्त त्या शेरलॉक कथेबद्दल आणि त्याच्या स्पष्टीकरणाबद्दल आहे.

वाचकांना अधिक अींटरेस्टिंग सुचू शकते ते काहीच सुचणार नाही यामधिल सर्व शक्यता आहेत.

आपल्याला काय अर्थ लागले ते सांगा असे लेखकाने विचारले आहे.
अेक अेक कथा अेक अेक वेगळा धागा काढुन रंगवण्या अीतपतचा वाव आहे.

अर्थात अशा कथा प्रकारात लक्ष घालावे की नाही, प्रकार आवडतो की नाही अी. वैयक्तीक बाबी आहेत.

मानव आणि ऋन्मेश यांना अनुमोदन.

काही सुक्ष्मकथा पाडगावकरांच्या कवितेसारख्या सर्व वाचकांना कळणाऱ्या आणि आनंद देणाऱ्या तर काही ग्रेस सरांच्या कवितांसारख्या- मोजक्याच लोकांना कळणाऱ्या पण अर्थाचे अनेक पदर असणाऱ्या.

मला वाटतं की सुक्ष्मकथा लिहताना त्या कोणत्या platform वर लिहल्या जाणार आहेत याचाही विचार लेखकाने करावा. मायबोली वर लेखकसुद्धा आहेत म्हणून मी "थांब शेरलॉक..." ही आणि अजून अशा काही कठीण शक्यतासुद्धा टाकल्या. कल्पनाशक्तीला व्यायाम मिळण्यासाठी.

आपल्या वाचकांना spoon feeding ची सवय लागलेली आहे. त्याची तीव्रता काही प्रमाणात कमी व्हायला या प्रकाराची मदत होऊ शकते.

अर्थात लघुकथेप्रमाणे अढळ स्थान प्राप्त करण्याची क्षमता या प्रकारात आहे की नाही याबद्दल मी साशंक आहे पण एक चेंज म्हणून अधूनमधून वाचायला वाचकांनाही आवडू शकेल. एकाच वाक्याचे कुणाला कोणाला काय अर्थ लागतात हे जाणून घेणंही फार मजेदार ठरेल. Happy

माझ्या मते चांगली सुक्ष्मकथा ती जी वाचल्यावर वाचकांची पहिली reaction म्हणजे धक्का. ( आयला हे कसं झालं बुवा)
उदा: मी पिसारा फुलवला तेव्हा माझा बॉस तळवे चाटत होता.

दुसरं वैशिष्ट्य म्हणजे जितक्या अर्थाच्या शक्यता जास्त तितकी ती कथा उत्तम.
उदा: i) मावळयांची विजयी घोषणा: हर हर महादेव
ii) यवनांची विजयी घोषणा: हर हर महादेव
iii) एलीयन्सची विजयी घोषणा: हर हर महादेव

वरीलपैकी तिसऱ्या वाक्यातून सर्वात जास्त शक्यता बाहेर पडतात आणि धक्काही जास्त बसतो म्हणून ती वरीलपैकी सर्वात उत्तम सुक्ष्मकथा ठरावी. क्र. i) उत्तम ठरू शकत नाही.अशा सरळसरळ अर्थ व्यक्त करणाऱ्या वाक्यांना सुक्ष्मकथा म्हणू नये असं मला वाटतं, कारण अन्यथा प्रत्येक वाक्याला सूक्ष्मकथा म्हणावं लागेल.
याबाबतीत आपले मतं कृपया मांडावेत.

@मानसकन्या
क्र..१ उत्तम सुक्ष्मकथा आहे.
ह्यापुढे आपण राधा कृष्णासारखे बनून राहू
असं असता मग मात्र हे एक साधं वाक्य बनले असतं ( आपण राधा कृष्णासारखे राहू असा अजिबात धक्का न देणारा.आणि एकच अर्थ व्यक्त करणारं साध वाक्य)
आपणही.......
खालील प्रश्नांची उत्तरं शोधत असतांना बऱ्याच कथा सापडतील -
i) आपणही ? म्हणजे अजून कितीजण असं करत आहेत? फॅशन आली की काय??
ii) राधा कृष्ण बनून राहू
ती प्रत्यक्ष राधा आणि तो प्रत्यक्ष कृष्ण बनणार की काय? भरपूर शक्यताना स्कोप
iii) राधा आणि कृष्ण पुराणातलेच की अजून कोणी?

तुमच्या दुसऱ्या वाक्याला सुक्ष्मकथा म्हणता येईल की नाही याबाबत शंका आहे ( वरील पोस्टमध्ये मांडलेल्या मुद्द्यांधारे)

तसेच अजुन एक म्हणजे राधा आणि कृष्ण कधी एकत्र राहिले नव्हते, त्यामुळे प्रेम असुनही वेगवेगळे राहू असाही एक अर्थ असू शकतो.

मागे BBC ने आंतरजालावर १५ (की २० नक्की आठवत नाही) शब्दांत आपलं अख्खं जिवन मांडायची एक स्पर्धा आयोजित केली होती.
अगदी मोजक्या शब्दांत एक मोठा कालपट मांडण्याची संकल्पनाघेऊन अशाप्रकारच्या स्पर्धा इंग्रजी साहित्यक्षेत्रात अधूनमधून आयोजित केल्या जातात.
क्र. २५, ३०, ४२,४४, ४५ यापासून प्रेरणा घेऊन लिहलेल्या आहेत

आणि बुद्ध हसला
(या नावाचा एक धडा होता बहुतेक बालभारतीच्या पुस्तकात)

या नावाची एक सुंदर विज्ञानकथाही वाचण्यात आली होती.
पोखरण चाचणीचा हा कोडवर्ड होता असा दावा काही लोक करतात.

अच्छा है अच्छा हैl
माबो वरील लेखकांनी लिहलेल्या उत्तम सुक्ष्मकथांचा एक इ संग्रहच काढावा असं वाटायला लागलंय आता तर Happy

मित्रांनो माजXX या अर्ध्या शब्दाच्या कथेतून तुम्हाला काय अर्थ लागले?
अजून अशी काही उदाहरणे सुचत आहेत का?

मला वाटते काहीतरी बेसिकात लोच्या आहे.

सूक्ष्म कथेतून एकाच वाक्यात पण नेमका अर्थ व्यक्त होणे अपेक्षित आहे... उदा... नवजात शिशूचे जोड - विकणे आहेत, कधीच न वापरलेले ....

इथे अर्थ अगदी अगदी स्पष्ट आणि नेमका आहे.

एका अर्धवट वाक्यात मागेपुढे काहीतरी कथा ज्याने त्याने फुलवावी , असे वाटत असेल तर ती सूक्ष्मकथा नाही, कल्पनाविस्तार होईल

@anilchembur: अगदी सहमत. एकाच वाक्यात सर्व काही (किंवा बहुतांश) सांगून जायला हवे. कि वाचणाऱ्याने तेच वाक्य पुन्हा पुन्हा वाचायला हवे. जसे कि, वरती एका प्रतिक्रियेमध्ये लिंक दिली आहे त्यातून:

>> भाडं, लाईटबिल, किराणा, पेट्रोल, बँकेचा हप्ता.

बस्स. संपली पगाराची कहाणी Happy

सहमत अनिल.
हा प्रकार, कल्पना विस्तार आहे, सूक्ष्मकथा नव्हे.

@ अनिलजी

For sale, baby shoes never worn
अशा प्रकारच्या कथा उत्तम आहेत यात शंका नाही. पण आजकाल Sorry, we do not sale one shoe किंवा dream?? याप्रकारच्या कल्पनाविस्ताराला वाव असणाऱ्या आणि विविध शक्यता निर्माण करणाऱ्या कथासुद्धा इंग्रजी साहित्यांत येत आहेत. नवीन ट्रेंड म्हणा हवं तर.

तिकडे (वरवर अर्धवट वाटणाऱ्या) सुक्ष्मकथांवर भरपूर चर्चा होतात. वाचक आणि लेखक प्रत्येकाला काय अर्थ लागले, काय कथा सुचल्या ते सांगतात. कल्पनांना उधान आलेलं असतं नुसतं. (मी स्वतः याचा अनुभव घेतलाय)
कदाचित काहीतरी नवनवीन करत राहण्याची वृत्ती आणि परिपक्व वाचक यामुळे तिकडे हे चालत असावं.

अर्थात मराठीत अशा कल्पनाविस्ताराच्या अंगाने जाणाऱ्या कथा कितपत रुचतील याबाबत मला शंका आहेच म्हणून मी दोन्ही कल्पनाविस्तार आणि संपुर्ण अशा दोन्ही प्रकारच्या कथा मांडल्या होत्या. (मराठी वाचकांचा कल पहावा हा उद्देश्य.)

मराठी सुक्ष्मकथांना तुम्ही मांडला तो निकष लावता येऊ शकेल.
हा नियम ग्राह्य धरल्यास-

नापिकी, मेलेलं ढोर,

गळ्यातलं चऱ्हाट, झाड

आक्रमण, दगा, कत्तल

स्वप्न, मी उडतोय, धपाक, अॅम्बुलन्स

आणि १, २, ६, ७, ११, १३, १५, १९ इत्यादी क्रमांकाना सुक्ष्मकथा म्हणता येईल.
--------
कृपया आपली मतं द्यावीत म्हणजे मराठी सुक्ष्मकथांचे निकष ठरवता येतील आणि पुढच्या लिखाणात लेखकांना ते मार्गदर्शक ठरतील.

Pages