५० सुक्ष्मकथा: मेँदुला खुराक पुरवणारा कथांचा एक भन्नाट प्रकार

Submitted by अॅस्ट्रोनाट विनय on 31 January, 2017 - 02:30

सुक्ष्मकथा म्हणजे अतिशय छोट्या कथा. इंग्रजीमध्ये हा प्रकार ten words story, twenty words story, nanofiction वगैरे नावांनी मिरवतो. मराठीमध्ये एवढ्या छोट्या कथा लिहण्याचा प्रयत्न फार क्वचित झाला आहे.

पारंपारिक कथेचा जो ढाचा असतो (सुरुवात, गाभा, शेवट) त्यापेक्षा या कथांचं स्वरूप वेगळं असतं. वरवर पाहता ती कथा वाटणार नाही. ते एखादं वाक्य असेल, बातमी असेल, संभाषणामधला एक तुकडा असेल किंवा अजून काही. पण त्या मोजक्या शब्दांमध्ये एक किंवा त्यापेक्षा जास्त कथा दडलेल्या असतात. आपण थोडा विचार केल्यास शब्दांमागे दडलेल्या कथा समोर येऊ लागतात. शिवाय सुक्ष्मकथांमध्ये अनेक लघु किंवा दिर्घ कथांना जन्म देण्याची क्षमता असते. खालील उदाहरणांवरून मला काय म्हणायचंय ते अधिक स्पष्ट होईल.

उदा I) "मोदीजी, तुम्ही या सुभाषला विमान दुर्घटनेची भीती दाखवताय??!”

- सुभाषचंद्र बोसांचा विमान दुर्घटनेत मृत्यू झाला होता हे आपल्याला माहीत आहे (किंवा तसा समज आहे) मोदी त्यांना भेटून तो अपघात टाळण्याचा प्रयत्न करत आहेत असं दिसतं. याचा अर्थ टाईम मशीनचा शोध लागला असेल आणि मोदी भूतकाळात गेले असतील अशी कथा समोर येते. पण शक्यता एवढ्यावरच संपत नाहीत.
चला अजून खोलवर विचार करू - जर टाईम मशीनचा शोध लागलाच तर सहाजिकच त्याचा वापर भूतकाळ किंवा भविष्यात फेरफार करण्यासाठी केला जाणार नाही, कमीत कमी सरकार तरी तसं करू देणार नाही अन्यथा मानवजातीचा विनाश संभवतो. असं असूनही मोदी हा नियम मोडायला का निघालेत? अन त्यांनी सुभाषचंद्र बोसांनाच का निवडल? की त्यांच्याशी बोलणारा मोदींचा तोतया आहे?? प्रत्येक शक्यतेवर एक कथा बनू शकेल.(वाचकांच्या मेँदुला अन कल्पनाशक्तीला खुराक.)
अशा पद्धतीची एखादी सुक्ष्मकथा दिल्यास दहा लेखक त्यावर दहा वेगवेगळ्या प्रकारच्या लघु किंवा दिर्घ कथा लिहू शकतील!!

उदा २: एकाच कथेतून वेगवेगळ्या वाचकांना वेगवेगळे अर्थसुद्धा लागू शकतात. जसं की ही सुक्ष्मकथा पहा:

मार्केट सर्वेक्षण: सफेद साड्यांचा खप वाढला, बांगड्यांचा घटला

- का बरं असं झालं असेल? कुणी म्हणेल अशाप्रकारची फॅशन आलीये म्हणून पांढऱ्या साड्या नेसून बिना बांगड्यांचं फिरताहेत(अशी विचित्र फॅशन का आली याचं उत्तर शोधताना बऱ्याच विनोदी शक्यता डोक्यात येतील). कुणाला असा अर्थ लागेल की सीमेवर युद्ध सुरु आहे अन त्यात आपले हजारो सैनिक मारले जाताहेत म्हणून विधवा बायकांची संख्या वाढली (युद्ध का सुरु झालं हा गहन प्रश्न अनेक कथांना जन्म द्यायला पुरेसा आहे) कुणाला अजून वेगळा अर्थ लागेल.

अशा पद्धतीने प्रत्येक सुक्ष्मकथा आपल्याला एक छोटीशी कथा सांगून जाते अन अधिक विचार केल्यास अनेक कथांच्या शक्यता देऊन जाते. एक मात्र खरं की कथा जेवढी छोटी तेवढी लिहायला कठीण.

माझ्या अल्पमतीप्रमाणे मी १५ शब्द ते अर्धा शब्द आणि शब्दविरहित सुक्ष्मकथा लिहण्याचा प्रयत्न केलाय. आपण प्रत्येक पायरीवर थोडं थांबून विचार करावा…कथा नक्की भेटतील
(टिप: कथा शब्दसंख्येच्या उतरत्या क्रमाने मांडल्या आहेत.)
------------------------------
१) डेली सोप पाहता पाहता ती गायब झाली. हजार भाग संपल्याशिवाय आता ती बाहेर येत नाही

२) “आता टाईम मशीन कधीच बनवल्या जाणार नाही” खास हे वाक्य ऐकायला तो भविष्यातून आला होता

३) “भूतं नसतात रे भावा" मी कसंबसं त्याला समजावलं अन झाडावर झोपायला निघून गेलो

४) तुझ्या ड्रिंकमध्ये मी विष मिसळलं होतं............................
शीट, चुकून मीच पिलं की काय??!!

५) पार्टीत नाचताना त्याला मी शूट केलं. आठवण आली की बघते कधीकधी

६) हुश्श, मारलं एकदाचं त्या भूताला...अरे, मी दिसंत का नाहीये??!!

७) मी बाबांवर खूप प्रेम करते. कालच त्यांच्यासाठी नवीन फ्रीझर आणलाय

८) देवांच्या परीक्षेतील प्रश्न-
2300000000 : दुसरं महायुद्ध : 2220000000 :: ? : तिसरं महायुद्ध : 0

९) रोबोट खोटं बोलतात अन माणसं खरं.
मी रोबोट आहे

१०) हळदीचा बिझनेस एवढा वाढलाय की...काल अश्वत्थामा आला होता

११) एक बातमी: शक्तिमान ब्रम्हचारी, गीता विश्वासचं तमराज किलविशसोबत लग्न

१२) DRDO चा गर्भसंस्कार प्रयोग फसला, नाळ तोडून बाळाची आत्महत्या

१३) मी पिसारा फुलवला तेव्हा माझा बॉस तळवे चाटत होता.

१४) "मोदीजी, तुम्ही या सुभाषला विमान दुर्घटनेची भीती दाखवताय??!"

१५) आजची ताजा खबर: राष्ट्रीय संग्रहालयातून हजारची नोट गायब

१६) मी बेवडा नाहीये काही... ये चकणा दे रे

१७) मार्केट सर्वेक्षण: सफेद साड्यांचा खप वाढला, बांगड्यांचा घटला

१८) चार तास फुटबॉल खेळलो. दमले बाबा... डोळे

१९) पंतप्रधानांचं क्लोनसोबत लग्न, रोबोट बाळ दत्तक घेणार

२०) ३०१७: सर्वोत्कृष्ट पर्यटनस्थळ पुरस्कार: सल्फर व्हॅली, शनी

२१) बाळा, ही पृथ्वी; आपले पूर्वज इथे रहायचे

२२) मी माझ्यासोबत रस्त्याने जातांना आम्हाला मी भेटलो
( वेगवेगळ्या समांतर विश्वातले तिघेजण एकत्र आले अशी कल्पना आहे.)

२३) झाडांनी ऑक्सिजन बनवणं बंद केलंय...अरे वाS

२४) बातमी: समलिंगी यंत्रमानव विवाह कायदा संमत

२५) नापिकी, मेलेलं ढोर, गळ्यातलं चऱ्हाट, झाड

२६) आज ईद....बघा पृथ्वी उगवलीये का

२७) एलीयन्सची विजयी घोषणा: हर हर महादेव

२८) IPL सीजन ५१७ विजेते: मंगळ रेडबुल्स

२९) कब्रस्थान, शॉपिंग कॉंप्लेक्स...बिचारी भूतं

३०) स्वप्न, मी उडतोय...धपाकS...अॅम्बुलन्स

३१) सर, कालच मेलोय, अॅडमिशन मिळेल?

३२) शीट, जोकर सुटला...सॉरी शक्तिमान

३३) २१३५: यंत्रमानवांचा मोर्चा : आरक्षण आरक्षण

३४) एक म्हातारी लहानपणीच मेली

३५) हा दिनेश, माझ्या मित्राची बायको

३६) मी... पृथ्वीवरचा शेवटचा एलीयन

३७) मला लिहता येत नाही

३८) "श्राद्धाचा नैवद्य कुणी खाल्ला!!!"

३९) मुलगी झाली, थँक गॉड

४०) प्रेम, लग्न...ओह शीट

४१) थांब शेरलॉक, रिचार्ज मारतो

४२) वीरमरण, सती, अनाथ पोर

४३) शाळा सुटली...Logout

४४) आक्रमण, दगा, कत्तल

४५) जन्म, मृत्यू, लग्न

४६) चौथं महायुद्ध

४७) भास?

४८) माजXX ??

४९) ?

५०) !
-------------------------------------------------------
आपल्याला काय अर्थ लागले जरूर सांगावं
------------------------------------------------------

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बघा यावर काय सुचते ते.
खरं तर याला परिस्थीतीजन्य कोडे (Situation Puzzle) म्हणता येईल.
उत्तरे अनेक असू शकतील. लेखकाच्या मनात नक्की काय कथा आहे हे ओळखण्यास इतरांनी असे प्रश्न विचारावे की ज्यांचे उत्तर लेखक "हो" अथवा "नाही" असे देऊ शकेल. किंवा "असंबद्ध" असा शेरा देईल.
त्यावरुन इतरांनी कथा ओळखायची.

ह्या सूक्ष्म प्रेमकथा एकदा फॉर्वर्ड झल्या होत्या. ह्या इतक्या आवडल्या की नेहमीप्रमाणे डेलीट न करता चक्क साठवल्या. स्वैर भाषांतर ....

१) "जर त्याला कळले तर?" हा क्षणभन्गुर विचार मनात येताच तिचा पटकन डोळा लागला.
"जर तिला कळले तर?" ह्या गंभीर विचारांनी रात्रभर तो तळमळत राहिला.

२) त्याला वाटले ती फोन करेन आणि तिला वाटले तो
फोन कधी खणाणलाच नाही

३) तुझा boyfriend कुठाय? "आमची long distance relationship आहे"
तो स्वर्गातून सुखावला. तिचा sense of humor जुन शाबूत होता.

४) "आपण दोघे किती वेगळे आहोत" सगळ्याच सुंदर कविता यमकात बसतातचअसे नाही

५) मी ऑनलाइन होते, तो पण होता. आणि आमचा ईगो सुद्धा.

६) फोन बाजूला ठेऊन आम्ही तासन् तास बोललो. Battery dead झाल्या पण आमचे नाते जीवित झाले.

७) मी रात्रीचे आकाश आणि तू धुव तारा. सदा एकत्र पण कधीच नाही एकजीव.

८) ग्रंथालयाच्या शांततेत नजरेला नजर भिडली. दोन पुस्तके बंद झाली पण एका कहाणीने जन्म घेतला.

९) तुझयाबद्दल काय वाटते ते परत एकदा लिहून काढले, ड्राफ्ट फोल्डर मधे एआक मेसेज अजुन वाढला.

१०) "जा तुझी स्वप्ने पुरी कर, Stanford तुझी वाट बघयत" airport वर हसून त्याला शेवटची मिठी मारत ती म्हणाली. तिचे सुजलेले डोळे वेगळीच व्यथा मांडत होते.

क्या बात, चांगल्या आहेत कथा. अजून येऊ द्या. सगळ्या उत्तम कथांचा संग्रह करून वेगळा धाग्यात टाकता येऊ शकेल.

मानवजी situational puzzle ची कल्पना उत्तम आहे. काढा एक धागा. आपण हाये भाग घ्यायला

माझ्या डोक्यात अजून एक कल्पना आहे. भरपूर शक्यता निर्माण करणारी एक सुक्ष्मकथा/वाक्य निवडायचं आणि त्यावर प्रत्येक लेखकाने शंभर/दोनशे शब्दांच्या आतली एक कथा लिहायची. एक तर स्पर्धा म्हणून वाचकांनी क्रमांक काढायचे किंवा एका धाग्यात त्याचं संकलन करायचं

माझ्या डोक्यात अजून एक कल्पना आहे. भरपूर शक्यता निर्माण करणारी एक सुक्ष्मकथा/वाक्य निवडायचं आणि त्यावर प्रत्येक लेखकाने शंभर/दोनशे शब्दांच्या आतली एक कथा लिहायची. एक तर स्पर्धा म्हणून वाचकांनी क्रमांक काढायचे किंवा एका धाग्यात त्याचं संकलन करायचं
-->
चन्ग्लि आय्दिया आए... करयला पहिजे

>>>माझ्या डोक्यात अजून एक कल्पना आहे. भरपूर शक्यता निर्माण करणारी एक सुक्ष्मकथा/वाक्य निवडायचं आणि त्यावर प्रत्येक लेखकाने शंभर/दोनशे शब्दांच्या आतली एक कथा लिहायची. एक तर स्पर्धा म्हणून वाचकांनी क्रमांक काढायचे किंवा एका धाग्यात त्याचं संकलन करायचं---

आवडली कल्पना.

वीजेचे दिवे जरा मंदावले आणि तो कपाळा हात मारुन आक्रोश करु लागला.>>>

यातील कथा.. त्या वकिलाच्या मित्राला मृत्युदंडाची शिक्षा झाली होती. दुसरा नावाजलेला वकील त्यावर स्थगीती मिळवण्याच्या आटोकाट प्रयत्नात होता. त्याला मृत्यूदंडासाठी नेण्यात आले होते इलेक्ट्रीक चेअरने. आशा उरली नव्हती तरी तो जेलर ऑफिसमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत वाट पहात होता आणि स्थगिती मिळाल्याचा फोन आला. ज्याने ऑफिसरने तो घेतला त्याने त्याला तसे सांगितले आणि दोघेही तातडीने इलेक्ट्रोक्युशन रुम कडे धावत निघाले. मध्ये पॅसेज होता ज्यात अंधार असल्याने दिवे लागले होते. अचानक दिवे मंदावले म्हणजे इलेक्ट्रोक्युशन बटन दाबल्या गेलेय, म्हणजे आता उशीर झालाय, हे कळताच तो आक्रोश करु लागला.
(हे सत्य घटनेवर आधारीत आहे, मृत्युदंडाची पद्धत बदलली आहे.)

पण अर्थात हे वाचकांना कसे सूचणार? त्यासाठी situation puzzle पद्धत, ज्यात वर सांगितल्या प्रमाणे प्रश्न विचारुन ते सोडवल्या जाते.

पण अर्थात हे वाचकांना कसे सूचणार?
=> लेखकांना तर सुचेल नं? कथा लेखकांनी लिहायच्या, वाचकांनी वाचनानंद लुटायचा. आणि आपण सर्वच वाचकांना underestimate करायला नको. काही वाचकांना लेखकांपेक्षाही जास्त चांगलं सूचू शकेल. कदाचित शब्दांत मांडता येणार नाही इतकंच.

त्या वकिलाच्या मित्राला मृत्युदंडाची शिक्षा झाली होती. दुसरा नावाजलेला वकील त्यावर स्थगीती मिळवण्याच्या आटोकाट प्रयत्नात होता.
=> छान सुचलंय. अजून काही शब्द घालून कथेच्या अंगाने फुलवता येईल.
हा आणि अशाप्रकारच्या अजून काही कथांचं संकलन करायला वेगळा धागा काढायचा का?
( याच सुक्ष्मकथेवर मलापण काहीतरी सुचतंय)

मानवजी, situation puzzle ची कल्पनासुद्धा चांगली आहे. तुम्ही त्यावर वेगळा धागा काढा हा आग्रह मी तुम्हाला आधीच केलेला आहे Happy

ओके.
मामीला विचारायला हवं वेळ आहे का, म्हणजे एकदा असे situation puzzles कसे सोडवतात ते दाखवता येईल.
किंवा अजून कोणी आधी situation puzzles मध्ये भाग घेत असला तर सांगा.

माझी पण एक सुक्ष्म कथा

अॅस्ट्रोनाट विनय कै च्या कै!!!

भारी पोटेन्शीअल करा डेवलप

माझी पण एक सुक्ष्म कथा
अॅस्ट्रोनाट विनय कै च्या कै!!!
भारी पोटेन्शीअल करा डेवलप

=> खी: खी: भारी
स्तुती करताय की खेचताय कळंतंच नाही :))

एक वेगळा प्रकार म्हणून दखल घेण्याजोगा.
चांगला प्रयत्न. पण, एक कप चहाने जरी तरतरी आणली तरी तो पूर्ण जेवणाची जागा घेउ शकत नाही, तसे वाटते.

एक कप चहाने जरी तरतरी आणली तरी तो पूर्ण जेवणाची जागा घेउ शकत नाही, तसे वाटते.
>> सहमत आहे. मी आधी म्हटल्याप्रमाणे लघुकथांएवढं पोटेन्शियल या प्रकारात नाही. फक्त एक दुर्लक्षित कथाप्रकार म्हणून समोर आणला. लेखकांना स्पर्धा म्हणून खेळायला चांगला आहे प्रकार.
आजच्या वेगवान जगात वाचकांना अजिबातच वेळ नसल्यास चालता बोलता वाचायला बरा आहे प्रकार. वर्तमानपत्रात जशी रोज एक चारोळी येते किंवा सुविचार येतो तशीच एक सुक्ष्मकथा छापून आल्यास काय हरकत आहे.

१. माझ्या नव-याची बायको
२. माझ्या बायकोचा नवरा
(झी मराठी वर आधारीत)
३. Tell me why, l can't be there where you are ...
(एका इंग्रजी गाण्यातील line पण सूक्ष्मकथा होईल)

Tell me why, l can't be there where you are ...
>> हम्म गुड. Backstreet boys rocks.
Simple Plan चं Astronaut हे सुप्रसिद्ध गाणं एका सुक्ष्मकथेचं extension करून लिहलंय असं ऐकलंय मी
(Tonight I'm feeling like an astronaut sending SOS in a tiny box)

शाळा सुटली...logout......अस असु शकेल का.......भविष्यात शाळेंमध्ये wifi वगैरे असेल आणि Back benchers आरामात social media sites वर TP करतायत....आता wifi आहे म्हंटल्यावर mobile किंवा tab वापरण्यची परवानगी असणारच त्यावरच अभ्यास करत असणार ... आणि शाळा सुटली म्हणून lgout

शाळा सुटली...logout......अस असु शकेल का.......भविष्यात शाळेंमध्ये wifi वगैरे असेल आणि Back benchers आरामात social media sites वर TP करतायत....आता wifi आहे म्हंटल्यावर mobile किंवा tab वापरण्यची परवानगी असणारच त्यावरच अभ्यास करत असणार ... आणि शाळा सुटली म्हणून lgout

Pages