मुलींना स्वयंपाक करायला शिकवलेच नाही तर ...

Submitted by ऋन्मेऽऽष फोटो अ... on 29 December, 2016 - 10:55

मुलगी शिकली, प्रगती झाली. पण स्त्रियांना चूल आणि मूल सुटले आहे का कधी. तुम्ही फुल टाईम गृहीणी असाल तर प्रश्नच नाही, पण नोकरीला असाल तर तरी आपल्या आणि आपल्या नवर्‍याच्या वाटणीचे घरकाम तुम्हाला करावेच लागते. पण हल्ली विभक्त कुटुंबात नोकरी सांभाळून सारेच घरकाम जमणे शक्य नसते. तेवढा वेळच नसतो.
मग भांडी घासायला बाई ठेवली जाते. पण तिला घासायला भांडी काढून देणे आणि घासून झाल्यावर ती तिथेच रचून जात असेल तर जागच्याजागी ठेवायचे काम आपल्यालाच करावे लागते.
मग कचरा साफ करायला देखील बाई ठेवली जाते. पण तिच्यावर लक्ष आपल्यालाच ठेवावे लागते. टोपलीतल्या जमलेल्या कचर्‍याची आपल्यालाच विल्हेवाट लावावी लागते.
मग कपडे धुवायला वॉशिंगमशीन घेतली जाते. पण ती वापरावी आपल्यालाच लागते. कोणते कपडे कधी धुवायचेत वगैरे हिशोब आपल्यालाच ठेवावे लागतात.
मग असे एकेका कामात शॉर्टकट घेतले जातात., पण स्वयंपाक मात्र आपल्याला चुकत नाही.
फार तर पोळ्या करायला बाई ठेवली जाते किंवा मग आमच्या ह्यांना बाईच्या हातच्या चपात्या आवडत नाही असे नाईलाजाचे कौतुक करत त्या देखील आपल्यालाच कराव्या लागतात.
काही नवरे करतात मदत, पण ती मदतच असते. कामाचा एक ठराविक भाग. तो देखील रोजच्या रोज करतील याची खात्री नाही. खायला मात्र रोजच लागते. आणि जे काही थोडेबहुत करतील ते उपकार केल्यासारखे बोलून दाखवतील.
खरं सांगा, किती घरात सकाळी सहाचा अलार्म वाजल्यावर पहिली उठणारी व्यक्ती ही बायकोच असते. जवळपास सर्वच घरात. मग ती तासाभरात तिची तयारी करते. त्यानंतर सातचा अलार्म वाजल्यावर नवर्‍याला उठवते. तो सात ते आठ आपली तयारी करतो, तेव्हा ही आदर्श गृहीणी दोघांचा डब्बा आणि साहजिकच सकाळचे दोघांचे चहापाणी करण्यात बिजी असते. अगदी त्याला चहा बनवता येत असला तरी सकाळी मुद्दाम लवकर उठून दोघांसाठी चहा बनवून घेणारा नवरा फारसा ऐकण्यात येत नाही. त्यातही माझा नवरा हॉस्टेलवर राहणारा असल्याने त्याला कांदा चिरता येतो, मॅगी बनवता येते असे काहीबाही कौतुक असते बायकांना. एखादा नवरा असतोही फर्मास चिकन बिर्याणी बनवणारा. पण कधीतरी काहीतरी बनवून वाहवा, कौतुक मिळवणे आणि रोजचा भाजीपोळीचा थॅंकलेस जॉब करणे यात जमीन अस्मानाचा फरक आहे.

थॅंक गॉड, हे सारे अनुभव माझे नाहीत, तर माझ्या विवाहीत मैत्रीणींचे आहेत. माझे लग्न अजून झाले नाही आणि लग्नानंतरही हे सारे करायचा विचार नाही. कारण मुळातच मला स्वयंपाकच करता येत नाही. आईला तशी थोडी चिंता आहे की या पोरीचे अश्याने लग्न कसे जमायचे. पण ती माझ्या टेक्निकल नॉलेज आणि नॉन ट्रेडिशनल कौश्ल्याबाबत अनभिद्न्य असल्याने तिची शंका रास्त आहे. त्या जीवावर मी माझे अगोदरच जमवले / जुळवले आहे. पण लग्नाआधी आपण सारी कामे वाटून करूया असे म्हणणारा प्रियकर जेव्हा नवरा बनतो तेव्हा फार तर लग्नाचा खर्च अर्धा वाटून घेण्यापलीकडे त्याची मजल जात नाही. स्वयंपाकाची अपेक्षा तो आपल्याकडूनच करतो. कधी उशीरा घरी आलात तर चल आज बाहेरून ऑर्डर करूया हा सोपा पर्याय निवडतो. पण रोज बाहेर खाणे खिश्याला आणि तब्येतीला परवडणारे नसल्याने मग चरफडत का होईना आपल्यालाच सकाळ संध्याकाळ स्वयंपाकघराचा उंबरठा ओलांडावा लागतो. मूल झाल्यावर तर मग मूलासाठी घरचेच बनवावे लागते आणि एक आई म्हणून मग तो सारा भार आपल्यालाच वाहावा लागतो. मूल आणि मग मूलासाठी चूल. मूलाचे बाबा त्याला फक्त तेव्हाच सांभाळतात जेव्हा आपण स्वयंपाकघरात असतो. त्यामुळे स्त्रियांना हे हक्काचे स्वयंपाकघर आधी सुटले पाहिजे किंवा त्यांनी सोडवून घेतले पाहिजे असे मला वाटते.
तर मग आता या सर्वातून सुटका करून घ्यायला जर आपण पाककला शिकलोच नाही तर...
कदाचित आपण सार्‍याजणी आता शिकून मोकळ्या झालो असू,
पण येणार्‍या पिढीतील आपल्या मुलींना स्वयंपाक करायला शिकवलेच नाही तर.....
काय अडेल त्यांचे?
खरेच काही अडेल का? ....
मुलग्यांचे काही अडते का?
विचार करा .....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काही जणांनी बहुधा माझ्या लेखाचा वा शीर्षकाचा सरळ अर्थ घेतला आहे वाटते.
मुलींनी देखील स्वयंपाक या प्रकारावर बहिष्कार टाकला तर.... याचा अर्थ खरेच तसेच कराच असे सुचवायचे नाहीये. फक्त जाणीव करून द्यायची होती.
मातृभूमी - Matrubhoomi: A Nation Without Women हा चित्रपट बघा, संदर्भासाठी उपयोगी
https://www.youtube.com/watch?v=8_Tsg05ZxrA
धन्यवाद Happy

काय अडेल त्यांचे? >>> ऋन्म्याला विचारा
खरेच काही अडेल का? .... >>> ऋन्म्यालाच विचारा
मुलग्यांचे काही अडते का? >>> हे पण ऋन्म्यालाच विचारा
>>>>
एकेक प्रतिसाद आता वाचतेय. जर त्याने या विषयावर काही लिहिले नसेल तर नक्की विचारते. (ज्याची शक्यता कमीच आहे :))

काही ढेकळं अडत नाही.
>>>>>>>>>
मला वाटते माझ्या लास्ट दोनचार प्रश्नार्थक ओळींनी हा घोळ घातलाय.
मुलींनी स्वयंपाक केला नाही तर मुलांचे काय अडेल का? ... असे म्हणायचे नव्हते.
कित्येक मुलांना स्वयंपाक येत नाही, किंवा घरून शिकवला जात नाही. तर त्यांचे काही अडते का? ..... असे विचारायचे होते Happy

बरेच जणांनी तो पहिला अर्थ घेतला असेल तर लेखातल्या त्या दोन ओळी बदलायला हव्यात.

रस्त्यावरचे चहावाले, मिसळपाववाले, इडलीवाले, हॉटेलवाले सगळे पुरुषच असतात ना?
>>>>
मी लेखातही म्हटलेय, व्यवसाय वा हौस म्हणून पुरुषांना स्वयंपाक हा निषिद्ध नसतोच. फक्त घरात स्वत:साठी वा कुटुंबासाठी करतात का हाच प्रश्न आहे. किंबहुना, नाही तर का नाही हा प्रश्न आहे Happy

मुलिंना शिकवून काय करायचंय, या बुरसटलेल्या दृष्टीकोनासोबतच, शिकून काय करायचंय? असा विचार करणार्‍या मुलीही कमी नाहीत हे नोंदवलेच पाहिजे.
>>>>
तुम्ही म्हणजे समाजाने त्या मुलींसमोर काय पर्याय उपलब्ध ठेवले आहेत त्यावर त्यांची विचारसरणी कशी होते हे अवलंबून आहे ना?
अमुकतमुक विचारसरणी ही जन्मजात नाही मिळत. ती आपण ज्या वातावरणात राहतो आणि वाढतो त्यानुसार डेवलप होत जाते.

पद्म | 29 December, 2016 - 12:51
स्त्री आणि पुरुष दोघांचं एक युनिक सायकोफिजिकल नेचर असतं.
>>>>
हा आपला या लॉजिकवर आधारीत प्रतिसाद फार मजेशीर वाटला.
समजा जर लग्न संस्थाच अस्तित्वात नसती तर एकट्यादुकट्या पुरुषांनी आपली रोजची पोटाची खळगी भरायला काय केले असते?

इथले कितीतरी लोक किचन छान छान बनवून घेतात आणि मग (ते खराब होऊ नये म्हणून?!) त्यात काही बनवत नाहीत, चकाचक ठेवतात हाहा>>> Lol

अर्चनाजी, आपल्याला बॉयफ्रेंड नाही का?
असल्यास त्याचे यावर काय म्हणणे हे पण सांगा.
>>>>
मानवजी, लेखात विषयाच्या अनुषंगाने लिहिले आहे. त्याचे काही म्हणणे नाही. सध्या तरी. म्हणजे तो आपण काम वाटून किंवा आपापले करू असे म्हणतोय. पण लग्नानंतर बदल घडल्यास यात त्याचाच दोष की आजूबाजुच्या वातावरणाचा, समाजातील चुकीच्या प्रवाहांचा हा एक संशोधनाचा विषय राहील.

ज्याला कोणाला जगण्यासाठी शिजवलेलं अन्न लागतं त्याप्रत्येक जीवाला अन्न शिजवता आलं पाहीजेच...
>>>>
हे वाक्य छान आहे रीया Happy
आणि शिजवता येत नसेल तर कच्चे खाता आले पाहिजे.

बाहेरच्यापेक्षा घरीच निरनिराळे पदार्थ करणं आणि खाणं हे उलट हल्ली उच्चभ्रू समजलं जात.
>>>>>
साती, उच्चभ्रू लोकं बरेच बदल सहज स्विकारतात. बदलत्या काळासोबत स्वत:ला पुढे नेतात. पेहेरावांनीच नाही तर विचारांनी देखील मॉडर्न असतात.
पण आपल्याकडे मात्र त्यांनी मुलांची नाव काय ठेवली आणि किती अफेअर्स केले या गॉसिपिंगध्येच जास्त रस असतो. जे त्यांच्याकडून उचलण्यासारखे असते ते आपण नाही उचलणार.
मागे कुठेतरी ऐकलेले, नक्की कुठे कुठल्या संदर्भात ते आठवत नाही. एकाला विचारले गेलेले की तुमच्या बॉलीवूडमध्ये समलैंगिक आकर्षण असणारे व्यक्ती फार असतात ना? तर ऊत्तर आलेले की असेच नाही, अशी लोकं सगळीकडे त्याच प्रमाणात असतात. फक्त आमच्या फिल्म ईंडस्ट्रीचे लोक अ‍ॅक्सेप्टींग असतात. त्यामुळे एखादा न लाजता आपले समलैंगिक असणे डिक्लेअर करूनही आमच्यात ताठ मानेने वावरू शकतो. म्हणून कोणी लपवत नाही.
हे विषयावर अवांतरही ठरेल. पण तसेही मागच्या काही प्रतिसादात गे विवाहांबद्दल चर्चा झालेली. तर एवढ अवांतर चालत असावे ईथे.

पण लेख आणि त्याहूनही वाईट गोष्ट म्हणजे त्यातला पराकोटीचा नकारार्थी विचार नाहीच पटला.
>>>>>
हर्पेन, आजचा माझा पहिला प्रतिसाद वाचा. लेखाचा सरळ अर्थ घेऊ नका.
पुढे आपण जे लिहिलेत त्याच्याशी सहमत. स्वयंपाककला नक्कीच एका पिढीतून पुढच्या पिढीत जायला हवी. अन्यथा पारंपारीक पदार्थ लुप्त होतील. आणि हा आपल्या संस्कृतीला बसलेला फार मोठा फटका असेल.

स्वयपाक हा मुलींवर लादलेला असतो.. शतशः मान्य.

पण पुरुषप्रधान संस्कृती व मिळकतीची जबाबदारी हीही पुरुषांवर लादलेलीच असते.. बायका ( मुली) लग्न करताना आपल्यापेक्षा जास्त पगाराचा नवरा बघतात .. म्हणजे त्याने नोकरी करुन मिळवून आणावे, प्रसंगी दीड ड्युटी , दोन ड्युटी , नाइट ़करावी , सुट्ट्य्या सोडाव्यात , प्रमोशन नुसार ट्रान्सफरला तयार रहावे, वेळ पडली तर अ‍ॅब्रॉड जावे... मी तुझ्यामागून येईन्च... बहुतांश मुलींची लग्नाबददल हीच कल्पना असते ना?

पण घर बघताना मात्र नंतर नवरा बायकोच्या सोयीसाठी पहातो.. म्हणजे बायकोची नोकरी जिथे असेल तिथे घर असावे , जेणेकरुन ती लवकर येईल व स्वयपाकही करेल ... मग भले पुरुष चार तास प्रवासात लोकलमध्ये घालवेल ....

बायका हा विचार उलट करु शकतील का? म्हणजे लग्न करताना माझी नोकरी हे प्राधान्य , नवरा कमावता - न कमावता काही असला तरी चालेल ... घर बांधायचे आहे ? नवर्‍याच्या ऑफिस जवळ घेऊ या .. मी जाईन लोकलने लोंबकळत चार तास ... नवर्‍याने घरी येऊन स्वयपाक करावा.. मुली अशा अपेक्षा करुन संसार करतील का?

शेतकर्‍याच्या मुलीनी बापाची शेती करावी ... नवरे घरात भाकर्‍या भाजायला ठेवावेत ...

नोकरदार मुलीनी आधी होम लोन भरुन घरं बुक करावीत , मग त्यात स्वयपाकाला नवरे बसवावेत

अशा अपेक्षा ठेऊन मुलीनी लग्ने करायची सुरुवात करावी .. आपोआपच आम्हीच का भाकर्‍या भाजायच्या ? त्यांचे ' हे पोट दुखणे' कमी होऊन जाईल.

-----------------

काय आहे गाडीत दोन सीट आहेत ... एक ड्रायव्हरची अन एक कंडक्टरची ... आता मुली लग्न करतानाच नवरा ड्रायव्हर असणार हे मान्य करुन करतात , पण लग्न झाल्यावर मात्र तोच का गाडी हाकतो अन मीच का मागे तिकिट फाडत बसू हा साक्षात्कार त्याना होतो ..

मग धड हेही नाही, अन धड तेही नाही...

---------------

डॉमिन्ण्ट स्त्रीयानी स्त्रीसत्ताक पद्धत आणून पॅसीव्ह पुरुष स्वयपाक घरात बसवून ठेवावेत .. पुरुष आनंदाने तयार होतील

...

अर्चना
तुम्ही तुमच्या लेखाचा मथळा आणि शेवटच्या ओळी वक्रोक्तीने म्हणून योजल्या असतील पण मधे बाकी सगळे लिहिलेले सरळ अर्थाचे असल्याने (असेल कदाचित) पण मला तरी त्यातून नकारात्मक भावनाच जाणवली.

घरकामास हातभार लावण्या संदर्भात आपल्या पुढच्या पिढीस तयार करायचे असेल तर सध्याचे स्वैपाक न बनवता येणारे पुरुष कुचकामाचे ठरतात. अशा परिस्थितीत सध्याच्या माता आपल्या मुलांना कशा प्रकारे तयार करत आहेत असा सकारात्मक प्रश्न विचाराल तर सद्यपरिस्थितीवर सर्वबाजूस हितकर ( इंग्रजीतले विन विन) असा तोडगा काढता येऊ शकेल.

माझ्या मते अजूनही लेखात ह्या अनुषंगाने बदल केले असता, चर्चेचा रोख सकारात्मक होण्यास मदत होईल आणि चांगली चर्चा घडू शकेल.

अन्यथा पर्जन्यमेघास्त्रावर उपाय म्हणून पर्जन्यमेघास्त्र सोडल्यास (म्हणजे ढगावर ढग आपटत बसल्याने) काही साध्य व्ह्यायचे नाही.

तसेच माझ्या प्रतिसदातल्या
"स्वतःच्या घरात कुठल्याही प्रकारचे (संडास साफ करण्यापासून) कसलेही काम, पहिल्यांदा करता आले पाहिजे (स्वावलंबन) आणि मग पुढची पायरी म्हणजे ते करायला लाज वाटण्याजोगे काहीही नाही हे आपण समाज म्हणून आपल्या पुढच्या पिढीला शिकवायला कमी पडत आहोत का? "
ह्यावर आपले काय म्हणणे आहे. का हा वेगळ्याच धाग्याचा विषय आहे? तसं असेल तर ऋन्मेष सर धाव घ्या !

मला स्वयम्पाक करणे अजिबात आवडत नाही .तरीही उणीपुरी ३७ वर्षे मी तो करते आहे-लग्न झाल्यापासून आणि नोकरी सांभाळून -इतर असन्ख्य स्त्रियान्प्रमाणे.
आता काळ खूप बदलला आहे. त्यानुसार स्वच्छ पौष्टिक व चवदार जेवण पुरवणार्या सोयी असणे हा याला खरा उपाय आहे असे मल वाटते. शिवाय त्याचा उपयोग करून घेण्याची मानसिकता तयार होणे हे त्याहून महत्त्वाचे आहे. स्वयम्पाकाची मनापासून आवड असणार्या व्यक्तिही खूप आहेत. त्या हे करू शकतील. आज खूप ठिकाणी तयार जेवण मिळतेच. पण यात वाढ व्हायला हवी आणि ते रोज विकत घेणे हा कमीपणा आणि घरी जेवण बनवणारी स्त्री अधिक गुणी हा विचार बदलायला हवा.

आज एक भाचा आला होता, जास्त वेळ नव्हता तरी त्याला व्यवस्थित चहा करायला शिकवलं.
आम्ही सहाजण होतो घरात तेव्हा.
कोणाला कसा हवा?, किती हवा?, साखर हवी की नको, कुणाला आधी पाणी प्यायचे असल्यास त्याची सोय वगैरे असे समजावले.
आधी जरा नाराजी दर्शवत होता, पण केले त्याने सगळे.
चहा पण मस्त झाला होता, आणि मग तो पण खूष झाला.

जाताना खुषीत गाणं गुणगुणत गेला:

किसे कितनी चीनी चाहिये
चेक अप कर लिया..
घरवालोंके लिये चाय
मैने छे कप कर लिया..

अरेरे ! म्हणजे स्त्री मुक्तीच्या ढोल बडवणार्‍या हिंदु स्त्रीया फक्त धागे काढत बसल्या

अन बुरखावाल्या बोहरा स्त्रीयानी कम्युनिटी किचन सुरु करुन मार्ग शोधला.

रोज बाहेरुन घेतले तर खर्च किमान दुप्पटीने वाढतो------ करणावळ / लेबर चार्जेस भरले /नाही द्यावे लागले मुळे. आजकाल बघा सोन्याची किंमत आणि मजुरी अलमोस्ट सारखीच असते.

अरारा..काय मिळतं हो असले धागे काढून?--- +१

बॉलिवूडला किंग म्हणजे शाहरुख खान हरहुन्नरी कलाकार आहे याबद्दल कोणाचंच दुमत नसेल. त्याचा अभिनय, आवाज, व्यक्तिमत्व हे सर्वांनाच प्रभावित करणारे असते. अथक परिश्रमातून त्याने या सिनेसृष्टीत आपले नाव कमावले आणि आपला चाहता वर्ग तयार केला. एक अष्टपैलू व्यक्तीमत्त्व म्हणून त्याने नाव कमावले. पण, तुम्हाला हे माहितीये का तो एक उत्तम अभिनेता तर आहेच पण त्याला जेवण बनवायलाही तितकेच आवडते. स्वतःचे जेवणातले ज्ञान अधिक चांगले करण्यासाठी त्याने त्याच्या ‘मन्नत’ या घरी एक नवे किचन उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

http://www.loksatta.com/manoranjan-news/shah-rukh-khan-new-kitchen-manna...

मी येथील चर्चा पूर्ण वाचलेली नाही पण माझ्या मते ज्यांना भूक लागते त्यांना स्वयंपाक बनविता आलाच पाहिजे मग तो पुरूष असो अथवा स्त्री!!

बायका हा विचार उलट करु शकतील का? म्हणजे लग्न करताना माझी नोकरी हे प्राधान्य , नवरा कमावता - न कमावता काही असला तरी चालेल ... घर बांधायचे आहे ? नवर्‍याच्या ऑफिस जवळ घेऊ या .. मी जाईन लोकलने लोंबकळत चार तास ... नवर्‍याने घरी येऊन स्वयपाक करावा.. मुली अशा अपेक्षा करुन संसार करतील का?
‌‌‌‌‌_____________
अनिलसर कुठल्या जमान्यात वावरत आहात. ज्या मुली स्वत:च्या पायावर उभ्या आहेत त्यांना स्वातंत्र्य हवे आहे. नवरा कमी कमावणारा असला तरी चालेल. फक्त चार पैसे जास्त कमावतोय म्हणून हक्क गाजवणारा नको.

शेतकर्‍याच्या मुलीनी बापाची शेती करावी ... नवरे घरात भाकर्‍या भाजायला ठेवावेत ...
____________
अंगमेहनतीची कामे पुरुषांनाच करता येतात हा अहंकार तर नाही ना डोकावत आहे यातून Happy
यावर उत्तर म्हणजे अश्या कामासाठी एखादा पुरुष नोकर ठेवता येणे शक्य असते Happy
असो, ईथे चर्चा जेव्हा दोघेही कमावते असतात तेव्हाही स्त्रियांनीच का स्वयंपाक करावा यासाठी चालू आहे. मी हाऊसवाईफ असते तर ती माझी निवडलेली भुमिका आहे आणि मी ती आनंदाने निभावली असती.

डॉमिन्ण्ट स्त्रीयानी स्त्रीसत्ताक पद्धत आणून पॅसीव्ह पुरुष स्वयपाक घरात बसवून ठेवावेत .. पुरुष आनंदाने तयार होतील
_____________
कोणा तरी एका कडे सत्ता हवीच का?
आणि पुरुष का आनंदाने तयार होतील? आणि हे सर्वांच्यावतीने आपण कसे म्हणू शकता?

हर्पेन, तुम्ही माझ्या लेखाचा शब्दश: अर्थच घेण्याचा हट्ट का धरत आहात? तुम्हीही तेच बोलत आहात जे मला म्हणायचे आहे. पण सरळ भाषेत लिहिले की ते सकारात्मक झाले, आणि थोडा चिमटा काढत लिहिले म्हणून ते नकारात्मक झाले असे नाही होत.

मुली स्वत:च्या पायावर उभ्या आहेत त्यांना स्वातंत्र्य हवे आहे. नवरा कमी कमावणारा असला तरी चालेल.

कसले स्वातंत्र्य हवे आहे ?

आपल्यापेक्षा कमी पगारवाला / नोकरीच न करणारा नवरा किती बायकाना चालेल ?

शेतकर्‍याच्या मुलीनी बापाची शेती करावी ... नवरे घरात भाकर्‍या भाजायला ठेवावेत ...
____________

मी हे उपरोधिकपणाने लिहिलेले नाही .... बायकानी खरेच असे करून दाखवावे.

Pages