सरतेशेवटी (भाग दोन)

Submitted by चैतन्य रासकर on 24 December, 2016 - 00:48

सरतेशेवटी (भाग एक): http://www.maayboli.com/node/61163

सरतेशेवटी (भाग दोन):

"दरवाजा उघडा होता म्हणून आत आलो, डोअरबेल वाजवली होती....." तो बोलायला सुरुवात करणार तेवढ्यात, डॉक्टर त्याच्यावर खेकसले "कोण तुम्ही?"

"सर, मी गिरीश"

तो तरुण म्हणाला, यावर कोणी काहीच बोलले नाही, सगळेजण स्तब्ध झाले, शांतता पसरली, सगळेजण त्या तरुणाकडे रोखून बघू लागले, बाहेर पाऊस वाढतच होता.

त्याने पुढे बोलायला सुरुवात केली "मागच्या आठवड्यात आपण बीचवर भेटलो होतो"

डॉक्टर त्याच्याकडे रोखून बघू लागले, संपादक खडबडुन जागे झाले, संजय त्याच्याकडे बघत "गिरीश म्हणजे..." एवढेच काय तो पुटपुटला.

गिरीश डॉक्टरांकडे बघत म्हणाला "सर आपण बीचवर भेटलो होतो, मी तुम्हाला लगेच ओळखले, मी तुमचा मोठा फॅन..."

"कसं आहे, आता वेळ नाहीये, तू नंतर.." डॉक्टर गिरीशला सरळ हाकलत होते.
"एक मिनिट.." संपादकाने डॉक्टरांकडे बघितले, डॉक्टर काही म्हणाले नाहीत, त्यांनी खाली बघून सुस्कारा सोडला.

संपादकाला हे सर्व धक्कादायक होते, डॉक्टर रिक्तमांच्या कथेतील मुख्य पात्राचे, कथेच्या नायकाचे नाव गिरीश होते, या नावाचा तरुण, असा अचानक खोलीमध्ये येतो, कसे काय? काय गौडबंगाल आहे? हा निव्वळ योगायोग आहे का? आणखी काही? संपादकाला हे सर्व जाणून घ्यायचं होते.

"या बसा..घ्या ती खुर्ची" संपादक गिरीशला म्हणाले.

गिरीशने निमूटपणे एक खुर्ची काढली, तो त्या तिघांच्या बाजूला जाऊन बसला, गिरीशच्या उजव्या हाताला रिक्तम बसले होते, डाव्या हाताला संजय, संजय अजूनही वेड्यासारखा गिरीशकडे बघत होता, गिरीशने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. संपादक गिरीशकडे, एखादा पोलीस चोराकडे बघतो तसे एकटक बघत होते.

"डॉक्टर, तुम्ही याला कधी भेटला होतात?" संपादकाने विचारले.

डॉक्टर रिक्तम गिरीशकडे रोखून बघू लागले, आपल्या मेंदूला ताण देऊ लागले, वयोमानामुळे स्मृती आधीच क्षीण झाली होती, त्यामुळे मागच्या आठवड्याचं काय, काल घडलेली घटना आठवणं अवघड होत, डॉक्टर विचार करू लागले, मग याचे नाव गिरीश कसे? हा समुद्रकिनारीच कसा काय भेटला? मला का आठवत नाहीये? याने सांगितलेली कथा आपण लिहितोय का? का आपण याच्यावर कथा लिहितोय??

"मला आठवत नाहीये, आपण कसे भेटलो?" डॉक्टरांनी गिरीशला विचारले.

गिरीश अजूनच घाबरला, डॉक्टर असे काही विचारतील असा त्याने विचार केला नव्हता.
"सर..अ..तुम्ही सकाळी मॉर्निंग वॉकला आला होतात, समुद्रकिनारी..आणि तुम्ही..." गिरीश अडखळत बोलत होता.
"तू काय करत होता तेव्हा?" डॉक्टर त्याला थांबवत म्हणाले, अजूनही त्यांचा स्वर उंच होता.

"मी नेहमीसारखा व्यायाम करत.." गिरीश बोलण्याचा प्रयत्न करणार, तितक्यात डॉक्टर म्हणाले "कधी?"

"मागच्या आठवड्यात, बहुतेक सतरा-अठरा तारखेला" गिरीश विचार करून, डोळे बारीक करून म्हणाला.

"तू एकदाच भेटलास?" आता संपादकाने विचारले.

गिरीशने 'हो' म्हणून मान डोलावली, "मी तिकडे रोज जातो, सकाळी, व्यायाम करायला, पण त्यानंतर डॉक्टर, परत भेटले नाहीत"

आपल्याला हे लोक एवढे प्रश्न काय विचारत आहेत? हा प्रश्न गिरीशला पडला होता.

संपादकाने डॉक्टरांकडे बघितले, फक्त डॉक्टरच याचा खुलासा देऊ शकत होते, पण स्वतः डॉक्टर हतबल होते,

त्यांनी खूप वेळा आठवण्याचा प्रयत्न केला, पण तरीही गिरीशला भेटल्याचे त्यांना आठवत नव्हते.

पण मग याला आपले घर कसे माहित?
"तुला हा पत्ता कोणी दिला?" डॉक्टरांनी गिरीशला विचारले.

गिरीशने थोडक्यात, अडखळत, कसे तरी, तिघांना सांगण्याचा प्रयत्न केला, तो म्हणाला की, डॉक्टर रिक्तम सकाळी मॉर्निंग वॉकसाठी समुद्रकिनारी आले होते, गिरीश त्यांचा मोठा चाहता होता, गिरीशने त्यांना बघताक्षणी ओळखले, गिरीशला रिक्तमांबरोबर काही वेळ बोलता आले, बोलत असताना ते कुठे राहतात हे डॉक्टरांनी स्वतः त्याला सांगितले.

हे ऐकून, डॉक्टर रिक्तमांनी गिरीशकडे बघत, नकारार्थी मान हलवली, त्यांच्यासाठी गिरीशवर विश्वास ठेवणे अवघड होते, त्यांची स्मृती दगा देत होती, त्यांचे डोक ठणकायला लागले होते.

"इथे येण्याचे काही 'खासस्स' कारण?" संजयने उद्धटपणे गिरीशला विचारले.

"सर, म्हणाले होते की, ते मला कथा लिहिण्यासाठी मदत करतील, म्हणून आलो होतो" पण आता मात्र परत कधी येणार नाही, गिरीश मनातल्या मनात म्हणाला, या घरातल्या पाहुणचाराने तो त्रस्त झाला होता.

गिरीशला थंडी वाजत होती, तो शहारला, खोलीतले दिवे चालू नव्हते, संजयच्या ते लक्षात आले, त्याने पटकन उठून खोलीतले दिवे चालू केले. त्या ट्यूबलाईटच्या प्रकाशात गिरीशला सगळ्यांचे चेहरे नीट पाहता आले, सगळेजण भूत बघितल्यासारखे गिरीशकडे बघत होते, पण गिरीशलाच सगळ्यांची भीती वाटत होती, एकदम काय बोलावे ते गिरीशला कळेना, तो अवघडला होता, असे अचानक येऊन चूक केली असे त्याला वाटले.

संपादक सुद्धा विचारांच्या गोंधळात हरवले होते, हा गिरीश नेमका कोण आहे? डॉक्टरांचा फॅन आहे? डॉक्टरांना भेटला होता का? त्या दिवशी हा तर आत्महत्या करत नव्हता? डॉक्टरांची कथा याच्यावर तर नाही ना? का डॉक्टर आत्महत्या करत होते आणि गिरीशने त्यांना वाचवले?

संपादकाने गिरीशला बरीच माहिती विचारली, नाव, गाव, नोकरी कुठे करता हे सगळे विचारले, गिरीशने सगळे सांगितले, रिक्तम आणि संजय यांनी सगळे शांतपणे ऐकून घेतले, गिरीश बावीस वर्षाचा, नुकताच पदवी मिळालेला तरुण होता, त्याच्या वडिलांचे शुज, चप्पलांचे छोटे दुकान होते, तो या दुकानात वडिलांना मदत करत असे. दुकानात वेळ जावा म्हणून, त्याने वाचायला सुरुवात केली होती, डॉक्टरांच्या सगळ्या कथा, कादंबऱ्या वाचून काढल्या होत्या, त्याच्या शब्दात सांगायचं झाल तर, तो डॉक्टरांच्या लिखाणाचा "डाय हार्ड" फॅन होता.

हि सगळी चौकशी, संजय आणि डॉक्टर रिक्तमांनी शांतपणे ऐकली, त्यांनाही गिरीश बद्द्दल कुतूहल होते. प्रश्न सुरु राहिले, गिरीश उत्तर देत राहिला. गिरीशने सुद्धा डॉक्टर रिक्तमांसारखे लिहिण्याची आपली इच्छा सांगितली, "मला कथालेखनासाठी मार्गदर्शन मिळेल का?" अशी विनंती केली.

डॉक्टरांनी या विनंतीला काही उत्तर दिले नाही, पण त्यांना कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात, थोडा का होईना, खूप दिवसांनी आनंद झाला होता, आपले लेखन कोणीतरी इतक्या आपुलकीने वाचतंय, हा आनंद काही औरच होता, आपल्यामुळे एकाच्या मनात लिखाणाची ओढ निर्माण झाली आहे, यामुळे त्यांच्या आनंदात, आत्मविश्वासात भर पडली होती, पण त्यांनी चेहऱ्यावर तसे काही दिसू दिले नाही, चेहरा निर्विकार ठेवला.

संपादकाला जाणून घ्यायचं होते की हा गिरीश काय लिहितोय त्यांनी लगेच त्याला विचारले "तू काही लिहिल आहेस का?"

गिरीशने रिक्तम सरांकडे बघितले, ते काही म्हणाले नाहीत, अजूनही त्यांची नजर गिरीशवर स्थिर होती, गिरीश पुरता भांबावून गेला होता.

"मी एक कथा लिहित होतो" गिरीश एवढेच बोलू शकला, गिरीशला आपण कोणीतरी एक गुन्हेगार आहोत आणि आता आपली चौकशी होतेय असे वाटले, पण जर आपल्याला मार्गदर्शन हवे असेल तर आपली कथा सांगणे गरजेचे आहे हे त्याच्या लक्षात आले.

"पण मला या कथेचा शेवट कसा करावा हे कळत नाहीये" गिरीशने मोठ्या आशेने डॉक्टरांकडे बघितले, संपादक थोडे हसले, त्यांनी डॉक्टर रिक्तमांकडे बघितले, संजयला सुद्धा अपेक्षा होती की डॉक्टर काहीतरी बोलतील, पण डॉक्टर काहीतरी गहण विचारात मग्न होते.

"....म्हणजे सत्यकथा आहे, एकदम ट्रू स्टोरी, माझा थोरल्या काकांवर" गिरीश सांगू लागला, "आमचे थोरले काका, मला अजून फोन करतात"

एवढे बोलून गिरीश थांबला, त्याने डॉक्टरांकडे बघितले, डॉक्टरांनी साहजिकच काही प्रतिक्रिया दिली नाही,

संपादक खुर्चीतून पुढे सरकले, संजय कुत्सित हसला.

"माझे थोरले काका तीन वर्षापूर्वी वारले, पण ते अजूनही मला फोन करतात"

गिरीश एवढे बोलून परत थांबला, पण त्याचे हे बोलणे कोणाला काही झेपले नाही, कोणी काहीच प्रतिक्रिया दिली नाही, बाहेर पाऊस आता कमी झाला होता.

क्रमशः

-चैतन्य रासकर
chaitanyaras@gmail.com

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Besht.

@पद्म, @नानबा, @निर्झरा, @कावेरि, @जाई. @anilchembur,@तृष्णा, @अदिति

धन्यवाद Happy

अंतिम तिसरा भाग लिहितो आहे, लवकरच अपलोड करेन.