‘प्रसारमाध्यमांत सर्व भाषांचा बळी जातोय, ही विचारशक्तीला मारक गोष्ट आहे’ - मुलाखत - श्री. दिलीप पाडगांवकर / श्री. आनंद आगाशे

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago

ज्येष्ठ पत्रकार आणि विचारवंत श्री. दिलीप पाडगांवकर यांचं परवा पुण्यात निधन झालं. पॅरिसमध्ये उच्चशिक्षण घेतल्यानंतर वयाच्या चोविसाव्या वर्षी ‘टाईम्स ऑफ इंडिया’नं त्यांची तेथील प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केली होती. १९७८ ते १९८६ या काळात त्यांनी 'युनेस्को'त बँकॉक आणि पॅरिस इथे काम केलं. पुढे १९८८ साली 'टाईम्स ऑफ इंडिया'च्या संपादकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. सहा वर्षं ते या पदावर होते. पुढे या ना त्या स्वरूपात त्यांचा 'टाईम्स'शी असलेला संबंध कायम राहिला. डॉ. मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात सरकारनं काश्मीरमध्ये शांतता नांदावी, यासाठी नेमलेल्या समितीचे ते अध्यक्ष होते. २००२ साली फ्रान्स सरकारनं त्यांना फ्रान्सच्या सर्वोच्च नागरी सन्मानानं गौरवलं होतं.

२०१४ साली 'साधना'च्या दिवाळी अंकासाठी ज्येष्ठ संपादक श्री. आनंद आगाशे यांनी श्री. दिलीप पाडगांवकर यांची दीर्घ मुलाखत घेतली होती.

ती मुलाखत इथे पुनर्मुद्रित केली आहे.

Dileep_Padgaonkar.jpg

राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरांवर स्वतःचा ठसा उमटविणार्‍या स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्रातल्या व्यक्तींमध्ये डॉ. दिलीप पाडगांवकर यांचं स्थान मोठं आहे. गेली ४०-४५ वर्षं शब्दशः विश्‍वभ्रमण केलेले, वयाची सत्तरी पार केलेले पाडगांवकर आता त्यांच्या जन्मगावी, पुण्यात स्थिरावले आहेत. पण म्हणजे काही ते निवृत्त झालेले नाहीत...
काही मोजक्या सार्वजनिक कार्यक्रमांना ते जातात. पत्नी लतिकासह सांस्कृतिक मैफिलींमध्येही त्यांचं अधूनमधून दर्शन होतं. रघुनाथ माशेलकर, विजय केळकर इत्यादी मंडळींच्या साथीनं ‘पुणे इंटरनॅशनल सेंटर’ या अलीकडेच स्थापन केलेल्या वैचारिक व्यासपीठाच्या कामात ते व्यग्र असतात. ‘सिंबायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी’च्या आर. के. लक्ष्मण अध्यासनाचे ते प्रमुख आहेत. दूरचित्रवाणी वाहिन्यांवर रात्रीच्या चर्चांमध्ये त्यांचा कधीकधी सहभाग असतो. आणि मुख्य म्हणजे ‘टाईम्स ऑफ इंडिया’मध्ये नियमितपणे लिखाण करत असताना सल्लागार संपादक या नात्यानं त्यांचा त्या शक्तिशाली माध्यम-समूहाबरोबरचा सक्रीय संबंध अजूनही कायम आहे. थोडक्यात काय, तर पाडगांवकर आजही खूप कार्यमग्न असतात. त्यामुळेच ते ताजेतवाने दिसतात, काळाबरोबर राहतात, निराशामुक्त असतात.

पाडगावकरांबरोबरच्या या गप्पांचं / मुलाखतीचं शब्दांकन करण्यापूर्वी त्यांच्याबरोबरच्या व्यक्तिगत संबंधांचा संक्षिप्त उल्लेख करणं अप्रस्तुत ठरणार नाही. इतकंच नाही, तर या मुलाखतीपलीकडे जाणार्‍या त्यांच्या काही पैलूंवर त्यामुळे प्रकाश पडेल, असं वाटतं. गेल्या पंचवीस वर्षांत मला व्यक्तिशः पाडगांवकर पाच वेगवेगळ्या 'भूमिकां'त भेटत गेले. निरनिराळ्या कारणांनी त्यांची ती पाचही रूपं मला लक्षणीय वाटली.

भूमिका क्र. १ - ते 'टाईम्स ऑफ इंडिया'चे मुख्य संपादक होते, तेव्हा मी 'इंडियन एक्सप्रेस' या प्रतिस्पर्धी वृत्तपत्राचा विशेष प्रतिनिधी म्हणून दिल्लीमध्ये काम करत होतो. एका विशिष्ट राजकीय घडामोडीत 'टाईम्स'च्या एका बड्या बातमीदारानं नेमका काय 'उद्योग' केला, यावरून दिल्लीतल्या राजकीय व पत्रकारिता यां क्षेत्रांत वादंग माजले होते. 'एक्सप्रेस'मध्ये त्यासंबंधातील बातमी देण्यासाठी मला पाडगावकरांचं म्हणणं हवं होतं. पण जंग जंग पछाडल्यावरही ते शेवटपर्यंत उपलब्ध झाले नाहीत. मी थोडा नाराज झालो होतो, पण त्यानंतर काही दिवसांतच 'टाईम्स'च्या या वजनदार बातमीदाराच्या अधिकारांवर वरिष्ठांकडून निर्बंध घालण्यात आल्याचं समजलं आणि माझी नाराजी दूर झाली. आपण काम करतो त्या संस्थेचं नाव सांभाळत असतानाच, गैरप्रकार करणार्‍या एखाद्या सहकार्‍यावर शांतपणे कारवाई कशी करता येते, ते लक्षात आलं. पुढे पत्रकारितेच्या क्षेत्रात विविध जबाबदार्‍या पार पाडताना तो अनुभव खूप उपयोगी ठरला.

भूमिका क्र. २ - वरील घटनेनंतर काही महिन्यांतच मी 'टाईम्स ऑफ इंडिया'चा विशेष प्रतिनिधी म्हणून पुण्यात काम करू लागलो आणि पाडगांवकर माझे 'सुपर बॉस' झाले. वर्षभरात पुण्याचा संपादकीय प्रमुख (ब्युरो चीफ) हे पद स्वीकारण्याबाबत विचारणा झाली, तेव्हा त्या पदाबरोबर येणार्‍या व्यवस्थापकीय जबाबदार्‍यांमध्ये मला रस नसल्यामुळे मी नकार दिला. तरीही पाडगावकरांनी दबाव कायम ठेवला आणि अखेर मी ते पद स्वीकारलं. सहकार्‍यांपैकी 'होतकरूं'ना हेरून त्यांना भविष्यकालीन जबाबदार्‍यांसाठी घडविण्याच्या त्यांच्या धोरणाचा तो भाग होता. संस्थेचं दीर्घकालीन भरण-पोषण करताना कसकसा विचार करायचा असतो, याचा तो वस्तुपाठ होता.

भूमिका क्र. ३ - पुढे बर्‍याच वर्षांनंतर 'सकाळ' माध्यम-समूहाचा संचालक-संपादक म्हणून मी काम करताना पाडगावकरांच्या 'एशिया पॅसिफिक कम्यूनिकेशन्स असोसिएटस् (अ‍ॅप्का)' या संस्थेशी खूप जवळून संबंध आला. समोर आलेल्या कोणत्याही विषयाचा समग्रपणे विचार कसा करावा, हे त्यावेळी त्यांच्याकडून शिकायला मिळालं. विशेषतः 'इंडिया अँड ग्लोबल अफेअर्स' नावाच्या एका आगळ्या नियतकालिकाची संपादकीय बांधणी त्यांनी किती ताकदीनं केली होती, ते कायम लक्षात राहिलं.

भूमिका क्र. ४ - दोन वर्षांपूर्वी पुण्यात आल्यापासून 'सिंबायोसिस'मध्ये माध्यम-प्रशिक्षण घेणार्‍या विद्यार्थी-विद्यार्थिनींचे पाडगांवकर मार्गदर्शक-गुरू बनले. पूर्वी नसलेलं पण आता हाती आलेलं 'माहिती-अधिकारा'चं (आरटीआय) अमोघ अस्त्र कसं वापरायचं, ते या भावी पत्रकारांना शिकविण्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केलं आहे. बदलत्या माध्यमविश्‍वाचा अंदाज घेऊन पत्रकारांनी कसं सज्ज व्हायला हवं, याचा नेमका वेध त्यांनी घेतला असल्याचीच ती साक्ष आहे.

भूमिका क्र. ५ - खासगीतील पाडगांवकर हे कमालीचे अनौपचारिक आणि अगत्यशील आहेत. बाह्य जगात त्यांची त्या त्या वेळची औपचारिक 'भूमिका' कोणतीही असो, त्यांची ही खासगीतील वैशिष्ट्यं मात्र अपरिवर्तनीय राहिली आहेत. प्रगाढ वाचन, प्रचंड अनुभव, तुफान भटकंती, अफाट जनसंपर्क आणि विलक्षण स्मरणशक्ती या पंचसूत्रीच्या बळावर खासगी बैठकींमध्ये पाडगांवकर अनेकविध किश्श्यांची अशी काही बरसात करतात, की विचारू नका. काही 'ऑन रेकॉर्ड', काही 'ऑफ द रेकॉर्ड'. म्हणून तर त्यांची मुलाखत घेताना मजा येते.

***

आनंद आगाशे - 'टाईम्स ऑफ इंडिया'चे (माजी) मुख्य संपादक ही तुमची सर्वांत प्रमुख ओळख असली तरी त्याच्या कितीतरी पलीकडे जाणार्‍या अनेकविध गोष्टी तुम्ही तुमच्या गेल्या पन्नास वर्षांच्या वाटचालीमध्ये केल्या. त्यामागे काही नियोजन किंवा धोरण होतं का? आज मागे वळून पाहताना त्या सगळ्यामागची संगती तुम्ही कशी लावता?

दिलीप पाडगांवकर
- नियोजन वगैरे काही नव्हतं. असलंच तर फक्त पत्रकारितेच्या क्षेत्रात जाण्यापुरतं होतं. हां, पण एक गोष्ट होती. ओढा अगदी पहिल्यापासून बहुविधतेकडे (कॉस्मॉपॉलिटन समाजाकडे / संस्कृतीकडे) राहिला. त्यामुळे माझं संपूर्ण करिअर जरी पत्रकारितेभोवती फिरत राहिलं, तरी त्या अनुषंगानं वाटेत आलेल्या इतर अनेक गोष्टीही मी करत गेलो.

वयाच्या विसाव्या वर्षी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजातून पोलिटिकल सायन्समधील आणि जर्मन भाषेतील 'बी. ए.' पदवी घेतल्यावर फादर दलरी यांच्या सांगण्यानुसार मी थेट पॅरिसला गेलो आणि एकीकडे नोकरी करत असतानाच 'फ्रेंच इन्स्टिट्यूट ऑफ सिनेमॅटोग्राफी'मधून डिप्लोमा घेतला. त्यानंतर पॅरिसमधेच मानव्यशास्त्रात 'डॉक्टरेट'ही पूर्ण केली.

आनंद आगाशे - पण तुम्हांला फ्रेंच भाषा कुठे येत होती?

दिलीप पाडगांवकर - नव्हती येत ना! तरीही गेलो. त्यामुळे गेल्या गेल्या आधी 'आलियान्स फ्रान्सेस'मध्ये फ्रेंच भाषा शिकायला सुरुवात केली. फादर दलरींच्या शिफारशीमुळे पॅरिसमधे एका वसतिगृहात 'वॉर्डन'ची नोकरी करत माझे खर्च भागवत होतो. तिथेही काही वेळा गंमतच व्हायची. त्या वसतिगृहातली मुलं माझ्यापेक्षा जेमतेम दोनेक वर्षांनी लहान होती. त्यांच्यावर नियंत्रण ठेवायचं कसं? मग मी एक शक्कल लढवायचो. मुलं फार दंगा करायला लागली की मी अस्सल मराठीत त्यांच्यावर भरपूर आरडाओरडा करायचो. ती एकदम गांगरून जाऊन काही काळ तरी गप्प व्हायची. असं एकूण चाललं होतं...

तिथे असतानाच १९६८मध्ये 'टाईम्स ऑफ इंडिया'चा पॅरिसमधला प्रतिनिधी म्हणून काम सुरू केलं. त्यानंतर चार-पाच वर्षांनी भारतात परतलो, आधी मुंबईत आणि मग दिल्लीत 'टाईम्स'चा साहाय्यक संपादक म्हणून काम केलं, पण १९७८मध्ये पत्रकारिता सोडून 'युनेस्को'मध्ये गेलो.

आनंद आगाशे - तुमची पत्रकारितेतली सुरुवात तर खूप लवकर आणि खूप चांगली झाली होती. मग ही 'युनेस्को'ची नोकरी का घेतली?

दिलीप पाडगांवकर - मी म्हटलं ना, माझा ओढा पहिल्यापासूनच बहुविधतेकडे होता. त्यात बहुविध अनुभव घेणं आलंच. 'युनेस्को'च्या बँकॉकमधल्या कार्यालयात मी सुरुवातीला 'एशिया पॅसिफिक इन्फर्मेशन ऑफिसर' म्हणून काम केलं आणि त्यानंतर पदोन्नतीवर त्यांच्या पॅरिसच्या कार्यालयात उपसंचालक म्हणून गेलो. मग तिथे संचालकही झालो. 'युनेस्को'बरोबरच्या एकूण आठ वर्षांच्या त्या काळात मी जगभर खूप फिरलो, खूप लोकांना भेटलो, खूप देश-समाजांच्या संपर्कात आलो. पण पत्रकारितेचं मूळ वेड काही स्वस्थ बसू देईना. त्यामुळे पॅरिसमध्ये संचालकपदावर असतानाच १९८६मध्ये 'टाईम्स'चं बोलावणं आल्यावर मी कार्यकारी संपादक म्हणून भारतात पुन्हा आलो, आणि त्यानंतर दोन वर्षांत 'टाइम्स'चा मुख्य संपादक झालो.

आनंद आगाशे - पण तोही अर्धविरामच ठरला...

दिलीप पाडगांवकर - हो. साधारण पाच-सहा वर्षांत माझं मानसिक असमाधान वाढायला लागलं आणि १९९४मध्ये डॅरिल डि'मॉन्टे, अरविंद दास आणि बादशहा सेन या माझ्या 'टाईम्स'मधल्या सहकार्‍यांना बरोबर घेऊन 'एशिया पॅसिफिक कम्यूनिकेशन्स असोसिएटस्' (अ‍ॅप्का) या बहुमाध्यम (मल्टिमेडिया) कंपनीची स्थापना केली. त्या कंपनीचा मी २००९पर्यंत अध्यक्ष होतो. आमच्या कंपनीनं मॉरिशस आणि नेपाळ या देशांमध्ये वृत्तपत्रं सुरू केली, चालवली आणि दूरचित्रवाणीसाठी अनेक कार्यक्रमही तयार केले.

मग शारजामधल्या 'गल्फ टुडे' या वृत्तपत्राचा संपादक म्हणून थोडे दिवस मी काम पाहिलं आणि पुन्हा एकदा 'टाईम्स' परिवारात त्यांचा कार्यकारी व्यवस्थापकीय संपादक म्हणून परतलो. दरम्यान राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचा सदस्य होतोच, शिवाय मनमोहनसिंग सरकारनं जम्मू-काश्मिरच्या प्रश्‍नावर नेमलेल्या मध्यस्थ-गटाचा अध्यक्ष म्हणूनही मी काम केलं.

आनंद आगाशे - आणि आज, या घटकेला?

दिलीप पाडगांवकर - ‘टाईम्स’चा सल्लागार-संपादक, आर. के. लक्ष्मण अध्यासनात प्रमुख आणि ‘द वर्ल्ड पोस्ट’ या ऑनलाईन प्रकाशनाच्या संपादकीय मंडळाचा सदस्य, असं काय काय सध्या माझं सुरू आहे.

आनंद आगाशे - हे सगळं नुसतं ऐकतानासुद्धा एखाद्याला धाप लागू शकेल...

दिलीप पाडगांवकर - दर पाच-सहा वर्षं झाली की मी एक भलं मोठं वळण घेतलं, असं मागे वळून पाहताना आज माझ्याही लक्षात येतं. हे सगळं एकीकडे खूप आनंददायी होतं खरं, दुसरीकडे प्रत्येक वळणाशी नव्यानं जुळवून घेणं कष्टप्रदही होतं. हे करू शकलो. याचं पूर्ण श्रेय लतिकाला जातं.

आनंद आगाशे - बहुविधतेकडचा हा तुमचा ओढा कशातून निर्माण झाला असं तुम्हाला वाटतं? ही आंतरिक ओढ पक्की होण्याच्या प्रक्रियेतले टप्पे सांगता येतील?

दिलीप पाडगांवकर - सुरुवात खरोखरीच अगदी बालपणात झाली, आणि त्यानंतरच्या काही वर्षांत अनेक महत्त्वाच्या घडामोडी अशा झाल्या की त्यामुळे माझा पिंडच बनून गेला. माझा जन्म पुण्यातला. १ मे, १९४४चा. ब्रिटिश साम्राज्याच्या संधीकालात जन्मल्यामुळे त्या साम्राज्याच्या बर्‍या आणि वाईट अशा दोन्हीचे अनुभव आणि आठवणी माझ्यापाशी जमा झाल्या. मी लहान असताना माझ्या आईवडिलांनी आमचा सोमवार पेठेतला फ्लॅट सोडला आणि आम्ही कॅम्पातल्या देवळाजवळ एका छोट्या खोलीत राहायला गेलो. ती वस्ती गरीब होती. जवळजवळ पंधरा कुटुंबांना मिळून एकच सामायिक स्वच्छतागृह वगैरे. आमच्या कुटुंबासाठी एकूणच तो काळ खूप कठीण होता. पण आमचा शेजार कमालीचा संमिश्र होता. बहुसंख्य दलित-नवबौद्ध होते. जोडीला पारशी, सिंधी, मुस्लिम, ख्रिश्‍चन वगैरे. संमिश्र समाजात वावरण्याची बीजं बहुदा तेव्हाच रोवली गेली.

माझ्या आईवडिलांनी तेव्हा आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यांनी मला ‘सेंट व्हिन्सेंट’ शाळेत घातलं. ती शाळा ‘जेझुइटस्’ चालवत असत. आमच्या तिथल्या एका ‘फादर’ना उत्तम मराठी येत असे. त्यांनी मला मराठी भाषेची गोडी लावली. त्या शाळेतले माझे इंग्रजीचे शिक्षक ऑक्सफर्ड विद्यापीठातून शिकून आलेले होते. एक दिवस त्यांनी मला डॉम मोराएस (इंग्रजी भाषेत उत्कृष्ट कविता लिहिणारे भारतीय; ते स्वतःही ऑक्सफर्ड विद्यापीठाचे विद्यार्थी होते आणि त्यांचे वडील फ्रँक मोराएस हे ‘टाईम्स ऑफ इंडिया’चे संपादक होते) यांचा ‘अ बिगिनिंग’ हा पारितोषिक-विजेता कवितासंग्रह वाचायला दिला. मी रात्री दोन वाजेपर्यंत त्यातली ओळन् ओळ लिहून काढली आणि त्या सगळ्या कविता मग तोंडपाठ केल्या. त्या शाळेतली बरीचशी मुलं अगदी सर्वसाधारण कुटुंबातली होती. कोणाचे वडील शिंपी होते, कोणाचे मेकॅनिक, कोणाचे इलेक्ट्रिशयन वगैरे. वंचित आणि संमिश्र समाजाशी अशी अगदी लहानपणीच घसट झाल्यामुळे पुढच्या काळात माझी बहुविधतेशी अगदी स्वाभाविकपणे नाळ जुळली.

शालेय शिक्षण संपल्यावर माझ्या वडिलांनी एक अत्यंत चांगला निर्णय घेतला, तो म्हणजे मला फर्ग्युसन कॉलेजात घालण्याचा. ते स्वतः ‘फर्ग्युसन’चे माजी विद्यार्थी होते हेही एक कारण त्यामागे असेल. पण ‘फर्ग्युसन’मध्ये जाण्याचा मला स्वतःला सर्वांत मोठा फायदा झाला, तो म्हणजे मला प्रिन्सिपॉल स. वा. कोगेकर यांच्यासारखे शिक्षक लाभले. राज्यशास्त्र हा त्यांचा विषय. गोपाळ कृष्ण गोखले, न्यायमूर्ती रानडे, गोपाळ गणेश आगरकर यांच्यासारख्या महाराष्ट्रातल्या आधुनिक उदारमतवादी परंपरेतला कोगेकर हा बहुदा अखेरचा दुवा होता. कोगेकरांनी अगदी सुरुवातीला मला अनेक पुस्तकं वाचायला प्रवृत्त केलं, त्यातलं एक होतं हॅरोल्ड लास्कीचं ‘अ ग्रामर ऑफ पॉलिटिक्स’. त्यांचा माझ्यावर एकूणच खूप प्रभाव पडला. पण खरंतर ते मला एकदा कॉलेजातून काढून टाकण्याच्या बेतात होते...

आनंद आगाशे - थेट बडतर्फ! का? काय झालं?

दिलीप पाडगांवकर - कारण मी शिक्षण अर्धवट असतानाच राजकारणात जायचा विचार करत होतो! पण झालं असं की, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे पुण्यातल्या एका कम्युनिस्ट नेत्याच्या घरी आले असताना कम्युनिस्ट पक्षाचं काम करण्यासाठीचा माझा अर्ज घेऊन मी त्यांना भेटलो. त्यांनी माझं सगळं ऐकून घेतलं. माझ्यासाठी स्वतः चहा केला आणि मला देऊन मग म्हणाले, ‘छान. तुझा विचार चांगला आहे. पण तू अजून लहान आहेस. तू असं कर, इथलं पदवीचं शिक्षण पूर्ण करून तू इंग्लंडला जा. तिथे राज्यशास्त्र, अर्थशास्त्र या विषयांचा अभ्यास कर. बॅरिस्टर हो. आणि मग परत येऊन ‘कम्युनिस्ट पार्टी’चं काम सुरू कर.’ त्यांनी जणू माझ्यासाठी एक ‘रोडमॅप’च तयार करून दिला होता! पण त्यांनी आणखी एक केलं. मला प्रख्यात गणिती आणि मार्क्सवादी इतिहासतज्ज्ञ डी. डी. कोसंबी यांना भेटायला पाठवलं. मी काय काय वाचलं आहे याची खातरजमा करून घेतल्यावर कोसंबींनी मी वाचायलाच हवी अशा पुस्तकांची मोठी यादीच मला लिहून दिली. मी त्याप्रमाणे खरोखरीच वाचन केलं, पण त्यांच्या हस्ताक्षरातला तो कागद मात्र पुढे केव्हातरी हरवला याचं वाईट वाटतं.

कॉलेजात ग. प्र. प्रधान मला इंग्रजी शिकवायला एक वर्ष होते. माझा पत्रकारितेतला रस लक्षात घेऊन (त्याकडे आपण थोड्या वेळानं येऊ) त्यांनी मला ‘साधना’च्या कार्यालयात होतकरू पत्रकारांसाठीच्या एका कार्यशाळेच्या आयोजनासाठी पाठवलं. यदुनाथ थत्तेही तिथे होते. त्याच काळात एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे, अच्युतराव पटवर्धन यांची भाषणंही ऐकायला मिळाली, पण माझ्यावर तेव्हा सगळ्यांत जास्त वैचारिक प्रभाव पडला रावसाहेब पटवर्धनांचा. जगभरातल्या उत्तमोत्तम पुस्तकांचा खजिनाच त्यांच्याकडे होता आणि त्याचाही मला खूप फायदा झाला... तेव्हा माझं सुरुवातीच्या काळातलं एकूण वैचारिक भरणपोषण या प्रकारे झालं.

आनंद आगाशे - पत्रकारितेत आपल्याला रस आहे असं तुम्हांला केव्हा वाटायला लागलं. कॉलेजात शिकताना?

दिलीप पाडगांवकर - त्याच्याही खूप आधी. शाळेमध्ये तिसरीत असताना आमच्या शिक्षकांनी नेहमीप्रमाणे सगळ्या मुलांना प्रश्‍न विचारला, ‘तुम्हाला पुढे कोण व्हायचंय?‘ बाकावर माझ्याशेजारी बसलेल्या मुलानं सांगितलं, ‘मला वैमानिक व्हायचंय.’ तो खरोखरीच पुढे वैमानिक झाला. त्याचं नाव सुरेश कलमाडी. मीही पत्रकार झालो, आणि पत्रकारच राहिलो.

आनंद आगाशे - पण पत्रकारितेतला रस मुळात कशामुळे निर्माण झाला?

दिलीप पाडगांवकर - कॅम्पात घरातून शाळेत जाताना वाटेत काही रद्दीची दुकानं लागायची. अनेक श्रीमंती पारशी, ख्रिश्‍चन घरांतली ‘टाईम’, ‘न्यूजवीक’सारखी मासिकं तिथं असायची. ती मी चाळायचो. मुळात मला लोकांशी संवाद साधायला आवडायचाच. वाचायला, लिहायलाही आवडायचं. मग ही परदेशी मासिकं वगैरे वाचल्यावर मी ठरवलं, आपण पुढे पत्रकार व्हायचं, आणि त्यातही एखाद्या वर्तमानपत्राचा परदेशातला प्रतिनिधीच (‘फॉरिन कॉरस्पाँडंट’) व्हायचं. त्यावेळी ‘टाईम्स ऑफ इंडिया’मध्ये मॉस्को, हाँगकाँग इथून काही भारतीय नावांनिशी प्रसिद्ध झालेली बातमीपत्रं मला आठवतात. त्याचाही हातभार माझ्या ‘निर्णया’ला लागला असावा. पण सगळ्यांत मोठ्ठं कारण होतं ‘रोमन हॉलिडे’ हा चित्रपट! त्यातला नायक (ग्रेगरी पेक) हा रोममध्ये काम करणारा एक अमेरिकन पत्रकार असतो आणि राजकन्या असलेली त्यातली नायिका (ऑड्री हेपबर्न) त्याच्या प्रेमात पडते. ‘फॉरिन कॉरस्पाँडंट’ होण्याचा माझा निर्णय तो चित्रपट पाहिल्यानंतर वज्रनिर्धार बनला. ऑड्री हेपबर्नसारखी दिसणार्‍या मुलीशी लग्न करायचंही मी तेव्हाच ठरवून टाकलं. आणि सुदैवानं मला दोन्ही गोष्टींत यश आलं.

आनंद आगाशे - ‘फर्ग्युसन’मध्ये असताना तुमचा पत्रकारितेतला रस ग. प्र. प्रधानांच्या लक्षात आला होता असं तुम्ही आधी म्हणालात. तो कसा काय?

दिलीप पाडगांवकर - झालं असं की, मी ‘फर्ग्युसन’मध्ये असताना ‘सेंट व्हिन्सेंट’मधल्या माझ्या शिक्षकांनी मला बोलावून घेऊन सांगितलं की, अतुर संगतानी नावाचे एक व्यावसायिक पुण्यात एक इंग्रजी दैनिक सुरू करणार आहेत आणि एबल डेव्हिड हे त्या दैनिकामधे संपादक असणार आहेत. मी बातमीदारपदासाठी तिथे अर्ज करावा, असं त्यांनी सुचविलं आणि त्याप्रमाणे मी अर्ज करून तिथे (म्हणजे ‘पूना हेराल्ड’मध्ये) महिना ५० रुपये पगारावर काम करायला सुरुवातही केली.

आनंद आगाशे - ती नोकरी काही तुम्ही फार दिवस केली नाही...

दिलीप पाडगांवकर - नाही, तिथे काही फार दिवस टिकलो नाही. काम करायला मला आवडत होतं, पण काही दिवसांतच निवडणुका जाहीर झाल्या. त्या वृत्तपत्राच्या मालकाचा कल तेव्हाच्या काँग्रेस उमेदवाराकडे होता आणि माझा स्वतःचा ‘पाठिंबा’ मात्र शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवाराला होता! एकूणच या मुद्द्यावर काही जमण्यासारखं नव्हतं आणि त्यामुळे ती नोकरी आटोपली. अर्थात एका अर्थानं ते बरंच झालं. पत्रकारितेतली ती पहिली नोकरी अशी अकाली गेल्यामुळेच तर मी पुढे पॅरिसला गेलो आणि त्यानंतरची वाटचाल करू शकलो.

आनंद आगाशे - तुमच्या बोलण्या-लिहिण्यात पॅरिसचा उल्लेख खूप वेळा आणि खूप जिव्हाळ्यानं येतो...

दिलीप पाडगांवकर - त्याला कारण आहे. एकतर भारताबाहेर मी पाऊल ठेवलेला फ्रान्स हा पहिला देश. दुसरं म्हणजे मी सलग आठ वर्षं चक्क पॅरिससारख्या ठिकाणी होतो. जगातल्या मोठ्या सांस्कृतिक केंद्रांपैकी ते एक. भाषा, साहित्य, कला, शिल्पशास्त्र, चित्रपट, संगीत अशा कितीतरी क्षेत्रांशी माझी तिथे जी जवळीक निर्माण झाली त्यानं मी खूप समृद्ध झालो. अवघ्या दोन वर्षांत मी तिथे किमान दोन हजार चित्रपट पाहिले असतील. त्याशिवाय ‘फॉरिन कॉरस्पाँडंट’ होण्याचं माझं स्वप्न तिथेच साकार झालं आणि ‘टाईम्स ऑफ इंडिया’बरोबरचा माझ्या आजतागायत सुरू असलेला ऋणानुबंधही तिथेच सुरू झाला.

आनंद आगाशे - हां. ते कसं काय जमून आलं?

दिलीप पाडगांवकर - काही गोष्टी खरोखरच जुळून येतात. काय झालं की, माझं चित्रपटांबद्दलचं एकूण वेड पाहिल्यानंतर माझ्या वडिलांनी एक दिवस तंबी दिली, ‘ते सिनेमा वगैरे सगळं ठीक आहे. पण तुझा ‘पीएचडी‘चा प्रबंध तिथे पूर्ण केला नाहीस तर इकडे परत येऊ नकोस.’ माझं ‘पीएचडी’चं काम थांबलं होतं अशातला भाग नव्हता. मी प्रबंध पूर्ण केला. पण त्याच सुमाराला, म्हणजे १९६८च्या मे महिन्यात पॅरिसमध्ये एक मोठं विद्यार्थी-आंदोलन उभं राहिलं. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रांतल्या प्रस्थापित रुढी, परंपरा आणि समज नाकारणारं ते क्रांतिकारी आंदोलन चांगलंच तापलं होतं. प्रबंध सादर केल्यानंतरची माझी मुलाखत (‘व्हायव्हा’) आत सुरू असतानाच बाहेर विद्यार्थ्यांच्या क्रांतिकारी घोषणाही चालू होत्या. माझी मुलाखत पार पडली, ‘डॉक्टरेट’ही मिळाली. पण त्यापाठोपाठ विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरचं एक बातमीपत्रही लिहून मी ‘टाईम्स ऑफ इंडिया’ला भारतात पाठवून दिलं. काही दिवसांतच संपादक शामलाल यांच्या सहीचं पत्र मला मिळालं - ‘तुमचं बातमीपत्र मिळाल्यावर आम्ही ते लगेचच प्रसिद्ध केलं. तुम्हाला पाहिजेत तेवढी आणखी बातमीपत्रं पाठवत चला.’ अशा प्रकारे माझा ‘टाईम्स’बरोबरचा संबंध सुरू झाला.

आनंद आगाशे - पण ती काही पूर्णवेळची नोकरी नव्हती...

दिलीप पाडगांवकर - नाही, पण त्या कामाचं रूपांतर काही काळानं पूर्णवेळ नोकरीमध्ये झालं. मी १९६८मध्ये भारतात परतलो, लग्न केलं, आणि शामलालना भेटून ‘मला पुन्हा पॅरिसला जायचं आहे’ असं त्यांना सांगितलं. महिना वीस पौंडाच्या मानधनावर मी सहा महिने पॅरिसमध्ये काम करावं आणि काम समाधानकारक वाटलं तर मला तिथे रीतसर पूर्णवेळ नेमण्यात येईल, असं ठरलं. त्याप्रमाणे मी केलं आणि सहा महिन्यांच्या अखेरीला ‘टाईम्स’चा पॅरिसमधला पूर्णवेळ ‘फॉरिन कॉरस्पाँडंट’ झालो!

आनंद आगाशे - ‘टाईम्स’मध्येच तुमचं जवळपास सगळं करीअर झालं. सुरुवातीच्या काळातला तुमचा तिथला अनुभव कसा होता?

दिलीप पाडगांवकर - मी १९७२मध्ये भारतात परतलो आणि ‘टाईम्स’चा साहाय्यक संपादक म्हणून मुंबईत रुजू झालो. काही काळातच शामलाल मला दिल्लीला घेऊन गेले. गिरीलाल जैन तेव्हा तिथे निवासी संपादक होते. मी शामलाल यांच्याकडून बरंच काही शिकलो. ते ऋण कधीच फिटणार नाही. ते विद्वान तर होतेच, पण त्याचा त्यांनी कधी बडेजाव केला नाही. अतिशय सुंदर लिहीत असत आणि विशेष म्हणजे प्रसिद्धीपासून ते एकूणच फटकून राहत. त्यांचा आणि माझा विशेष ऋणानुबंध होता. माझ्या वडिलांइतकंच, किंबहुना काही वेळा त्यांच्याहूनही जास्त, मी शामलालना मानत असे.

आनंद आगाशे - त्या प्रारंभीच्या काळातल्या तुमच्या काही गाजलेल्या बातम्या, लिखाण आठवतं?

दिलीप पाडगांवकर
- महाराष्ट्रात १९७२मध्ये मोठा दुष्काळ पडला. पॅरिसहून परतल्यावर त्यामुळे लगेगच मी दुष्काळ ‘कव्हर’ करण्यासाठी महाराष्ट्रामधे फिरलो. शंकरराव मोहिते पाटील यांनी त्या ऐन दुष्काळात त्यांच्या मुलाचं लग्न अकलुजला प्रचंड थाटामाटात केलं. ‘टाईम्स’मध्ये त्याचं साद्यंत, सचित्र वार्तांकन मी केल्यावर देशभरात गदारोळ झाला. मोहिते पाटलांना त्यानंतर बरीच स्पष्टीकरणं द्यावी लागली होती. तेव्हा महाराष्ट्रात दलित साहित्याला पहिल्यांदाच मोठा भर आला होता. डॅरिल डिमॉन्टे या माझ्या सहकार्‍याबरोबर मग मी ‘टाईम्स’ची रविवारची अख्खी पुरवणीच मराठी दलित साहित्यावर केली होती. दिलीप चित्रे, अरुण कोलटकर, शांता गोखले वगैरेंनी तेव्हा आम्हांला त्यासाठी बरीच मदत केली. त्या पुरवणीमुळे मराठी साहित्यातल्या त्या नव्या प्रवाहाची देशस्तरावर प्रथमच मोठी दखल घेतली गेली. वेठबिगारीची मोठी समस्या त्या काळात देशभरात अनेक ठिकाणी होती. ठिकठिकाणी प्रत्यक्ष जाऊन त्या समस्येवरही एक मोठी वृत्तमालिका तेव्हा केल्याचं आठवतंय.

आनंद आगाशे - इंदिरा गांधींनी १९७५मध्ये देशावर आणीबाणी लादली तेव्हाही तुम्ही ‘टाईम्स’मध्ये होता. सेन्सॉरशिपमुळे वृत्तपत्रांवर बरेच निर्बंध तेव्हा घातले गेले. तुमचा त्यावेळचा अनुभव काय होता?

दिलीप पाडगांवकर - आणीबाणी जाहीर झाली आणि काही मिनिटांतच टेलिप्रिंटरवरून ती बातमी ‘टाईम्स’च्या कार्यालयात येऊन थडकली. शामलाल यांनी तातडीनं संपादकीय विभागाची बैठक बोलावली. आणीबाणी आणि सेन्सॉरशिप यांचा सामना कसा करायचा, यावर त्या बैठकीत बराच खल झाला. ‘इंडियन एक्सप्रेस’ आणि ‘स्टेट्‌स्‌मन’ यांसारख्या वृत्तपत्रांनी आणिबाणीला थेट विरोध करण्याची भूमिका घेतली, तर खुशवंतसिंग संपादक होते त्या ‘हिंदुस्तान टाइम्स’नं आणीबाणीला पाठिंबा देण्याचं धोरण स्वीकारलं. ‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या आमच्या बैठकीत खूप विचारांती आम्ही असं ठरवलं की, आणीबाणीला थेट विरोध करण्यानं वर्तमानपत्र बंद पडेल आणि शेकडो कर्मचार्‍यांच्या रोजी-रोटीचा प्रश्‍न उभा राहील. त्यामुळे थेट विरोध न करता आणीबाणीसंदर्भात एकेका सुट्या-सुट्या मुद्द्यावर आपण भूमिका घेत जावे. ‘तुला काय करायला आवडेल’, असं शामलालनी मला विचारलं. त्यावर, ‘मला अर्जेंटिनाच्या राजकारणावर लक्ष केंद्रित करून इव्हा पेराँ हिच्या हालचालींबद्दल लिहायला आवडेल’, असं मी सांगितलं! ते उत्तर सगळ्यांनाच खूप चमत्कारिक वाटलं, पण मी काही कारणानंच तसं म्हणालो होतो. इव्हा पेराँ ही अर्जेंटिनाचे १९४०च्या दशकातले अध्यक्ष जुऑ पेराँ यांची पत्नी. ती स्वतःही खूप धडाडीची होती आणि तेव्हाच्या अर्जेंटिनाच्या राजकीय, सामाजिक वर्तुळात तिचा वावर अन् दबदबा मोठा होता. ‘टाईम्स’मध्ये इव्हा पेराँच्या कर्तृत्वाबद्दल आणि अर्जेंटिनातल्या तत्कालीन परिस्थितीबद्दल दररोज लेख लिहिण्याचा मी सपाटा लावला. त्याचा अन्वयार्थ लक्षात यायला सरकारला वेळ लागला नाही. ‘सेन्सॉर’चं काम करणारे अधिकारी अखेर संपादक शामलालना एक दिवस म्हणाले, ‘तुमच्या त्या दिलीप पाडगांवकरला ती लेखमाला थांबवायला सांगा. दररोज ‘टाईम्स’ उघडल्यावर पंतप्रधानांच्या (इंदिराजींच्या) नजरेला इव्हा पेराँ पडते आणि त्यांच्या भुवया उंचावतात!

आनंद आगाशे - ‘टाईम्स’चे मुख्य संपादक असताना १९९४ मध्ये तुम्ही बाहेर पडलात आणि ‘अ‍ॅप्का’ची स्थापना केलीत. ते पाऊल का उचलले?

दिलीप पाडगांवकर - मी आणि माझे सहकारी (बादशहा सेन, अरविंद दास, डॅरिल डि'माँटे) माध्यमांच्या एकूण कारभाराला तेव्हा इतके वैतागलो होतो की, आपण स्वतःचीच एक माध्यम संस्था सुरू करावी, असं आम्हाला वाटलं. मी आधी म्हटल्याप्रमाणे आम्ही बरीच कामं केलीसुद्धा, पण आमच्यापैंकी कोणालाच धंदा चालविण्याचा अनुभव नव्हता. त्यामुळे ‘अ‍ॅप्का’ला पुष्कळ चढउतार पाहावे लागते. गेल्या पाच वर्षांपासून मात्र माझा ‘अ‍ॅप्का’मधला दैनंदिन सहभाग पूर्ण थांबला आहे.

आनंद आगाशे - तुम्ही ‘टाईम्स’च्या आत-बाहेर खूपदा गेलात. पण १९८८ ते १९९४ या काळात तुम्ही तिथे मुख्य संपादक होतात. नेमका तो काळ भारतातील माध्यमांना एका पूर्णपणे वेगळ्या वळणावर नेऊन ठेवणारा होता. १९९०- ९१च्या नंतर भारतीय अर्थव्यवस्थेचं उदारीकरण / जागतिकीकरण सुरू झालं आणि वृत्तपत्रांचा / माध्यमांचा एकूण पोत बदलायला सुरूवात झाली. ‘मार्केट लीडर’ असलेल्या ‘टाईम्स’नं त्या बदलांचं एका अर्थानं नेतृत्त्व केलं. ते सगळे बदल घडवून आणताना ‘टाईम्स’मध्ये तेव्हा नेमकी काय चर्चा होत होती? तुमचा ‘इन्सायडर्स व्ह्यू’ काय होता?

दिलीप पाडगांवकर - त्या सर्व बदलांचं श्रेय ‘बेनेट कोलमन’चे (‘टाईम्स’ची मालक-संस्था) उपाध्यक्ष समीर जैन या एकाच व्यक्तीला जातं. माध्यम-व्यवसायाची त्यांच्या इतकी सखोल जाण असणारा आणि भविष्याचा वेध घेत पूर्णपणे ‘हटके’ विचार करणारा दुसरा (मालक) प्रकाशक जगाच्या पाठीवर मी पाहिला नाही. माध्यमांचं क्षेत्र खुलं होतंय, अधिकाअधिक स्पर्धात्मक होतंय, आणि वाचकांच्या, प्रेक्षकांच्या अभिरूचीचा परिघसुद्धा विस्तारतोय, हे समीर जैन यांनी बाकी कोणाच्याही आधी जाणलं, आणि त्यानुसार ‘टाईम्स’ प्रकाशनांमध्ये धडाक्यात बदल करायला सुरूवात केली. त्याबद्दल त्यांच्यावर टीकेची झोड उठली, तरीही ती पचवून त्यांनी ते बदल रेटून नेले. पुढे इतर वृत्तपत्रांनीही तोच मार्ग अवंलबला.

आनंद आगाशे - पण त्या काळात ‘टाईम्स’चं वरिष्ठ व्यवस्थापन आणि वरिष्ठ संपादकीय नेतृत्त्व यांच्यातल्या चर्चेचं स्वरूप काय होतं?

दिलीप पाडगांवकर - त्या सगळ्या चर्चा अगदी ‘अंतर्गत’ स्वरूपाच्या आणि गुंतागुंतीच्या होत्या, पण त्यातला निष्कर्ष सांगतो. माध्यम-क्षेत्रातली स्पर्धा वाढत राहणार आहे, त्यामुळे ‘टाईम्स’ हा ‘ब्रॅंड’ म्हणून शक्य तितका बलवान करणं अत्यावश्यक मानून सर्व शक्ती त्या प्रयत्नांमागे लावण्यात आली. दुसरं म्हणजे जहिरातीचं उत्पन्न हरप्रकारे वाढविण्याचं धोरण स्वीकारण्यात आलं. पूर्वी दैनिकाच्या विक्रीचं उत्पन्न आणि अंकातल्या जहिरातीचं उत्पन्न, यांमध्ये खूप मोठा फरक नसे. पण समीर जैन यांनी हे जाणलं की, कोणत्याही बाजारपेठेत सर्वाधिक खपाच्या दैनिकाचं जाहिरातीचं उत्पन्न क्रमांक दोनच्या दैनिकाच्या जाहिरात उत्पन्नाच्या (त्याचा खप क्र. एकपेक्षा थोडासाच कमी असला तरी) अनेक पटींनी जास्त असतं. त्यामुळे आंतरराष्ट्रीय माध्यम-सम्राट रूपर्ट मर्डॉक यानं तिकडे लंडनमध्ये दैनिकांचं ‘किंमत युद्ध’ सुरू करण्याच्या कितीतरी आधी ‘टाईम्स’नं अकांची विक्री-किंमत स्पर्धकांपेक्षा कमी केली. त्यामुळे ‘टाईम्स’चा खप स्पर्धकांच्या तुलनेत काही पटींनी वाढला आणि परिमाणत: जहिरातीचं उत्पन्न झपाट्यानं फुगलं.

आनंद आगाशे - ‘पेपर टायगर्स’ नावाचं एका विदेशी पत्रकारानं भारतीय वृत्तपत्रांवर आणि वृत्तपत्र मालकांवर लिहिलेलं पुस्तक आठवतंय. त्यामध्ये ‘टाईम्स’च्या वरिष्ठ संपादकांबरोबरच्या समीर जैन यांच्या एका बैठकीचा उल्लेख आहे. आपण कोलकात्यामध्ये ‘टाईम्स’ची आवृत्ती सुरु करायची नाही, असं जैन यांनी ठामपणे त्या बैठकीत सांगितलं. पण पुढे ‘टाईम्स’ची कोलकत्ता आवृत्ती सुरू झाली...

दिलीप पाडगांवकर
- बरोबर आहे. त्यावेळी इतर अनेक वृत्तपत्र संस्था ठिकठिकाणी त्यांच्या आवृत्त्या धडाधड सुरू करत होत्या. पण कोलकात्याचं जहिरातीचं मार्केट तेव्हा पुरेसं विकसित झालेलं नव्हतं. म्हणूनच समीर जैन तिथे तेव्हा आवृत्ती सुरू न करण्यावर ठाम होते. कालांतरानं जेव्हा कोलकात्याच्या ‘जाहिरात मार्केट’चा अपेक्षित विकास झाला तेव्हाच ‘टाईम्स’नं तिथे आवृत्ती सुरू केली. पुणे आवृत्तीच्या बाबतीतही अशाच प्रकारे निर्णय झाला. समीर जैन हे पूर्णतः बाजारपेठ काय संकेत देते त्यानुसार व्यवसाय चालवणारे (‘मार्केट ड्रिव्हन’) वृत्तपत्र मालक / प्रकाशक आहेत...

आनंद आगाशे
- ‘टाईम्स’चा मुख्य संपादक हे एक फारच मोठं सत्ताकेंद्र होतं. तुम्ही त्या पदावर सहा वर्षं होतात. तो अनुभव कसा होता?

दिलीप पाडगांवकर
- मी मुख्य संपादक होतो, तेव्हा वृत्तपत्रांची संख्या खूपच कमी होती. दूरचित्रवाणीचं क्षेत्रही अविकसित होतं. त्यामुळे ‘टाईम्स’सारख्या वृत्तपत्रांचं वजन खरोखरीच मोठं होतं. मात्र देशाच्या राजधानीत इतक्या मोठ्या पदावर असताना काही पथ्थं पाळणं आवश्यक असतं. ती मी कसोशीनं पाळली. इंदिरा गांधींसह नंतरच्या सर्व पंतप्रधानांशी आणि अन्य मोठ्या राजकीय नेत्यांशी माझ्या भेटीगाठी होत असत. (जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल यांच्या मुलाखती घ्यायलाही मला आवडलं असतं. पण मी पत्राकारितेत येण्यापूर्वीच ते निर्वतले होते.) इंदिराजी बांगलादेश युद्धाच्या वेळी (१९७१मध्ये) पॅरिसला आल्या असताना तर मी त्यांचा दुभाषा होतो. त्यामुळे त्यांचा माझा खास परिचय होता. पण इंदिरा, राजीव यांच्या किंवा इतरही कोणत्याच पुढार्‍याच्या मी ‘फार’ जवळ गेलो नाही. माझं नाव कोणाबरोबरच जोडलं जाऊ दिलं नाही.

नरसिंहराव यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीबद्दल मला विशेष कौतुक आहे. त्यांच्या कर्तृत्त्वाच्या मानानं त्यांना श्रेय मिळालं नाही. ही वॉज द मोस्ट अंडररेटेड प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया! अत्यंत अवघड काळात त्यांनी अतिशय मोठे निर्णय बेडरपणे घेतले. आम्ही दोघं ’फर्ग्युसन’चे माजी विद्यार्थी, आणि शिवाय त्यांना मराठी येत असे. त्यामुळे अनेकदा ते माझ्याशी मराठीमध्येच बोलायचे.

स्वतःची विश्‍वासार्हता स्वतःलाच जपायला लागते. ‘टाईम्स’सारख्या सर्वांत मोठ्या आणि शक्तिशाली वृत्तपत्राचा मुख्य संपादक असूनही मी ‘माया’ जमविली नाही, याचं मला समाधान आहे. माझं हे राहतं घर सोडलं तर माझी काही मोठी प्रॉपर्टी नाही.

आनंद आगाशे
- हे खरोखरीच विशेष आहे. अन्यथा माध्यमांमधल्या अनेक मोठमोठ्या नावांच्या याबाबतीतल्या सुरस आणि चमत्कारिक कथा कानावर येत असतात.

दिलीप पाडगांवकर - चिक्कार उदाहरणं आहेत तशा प्रकारची. दिल्लीतल्या लहानसहान वृत्तपत्रांच्याही काही संपादकांच्या, पत्रकारांच्या केवढाल्या इस्टेटी आहेत! मेहरौलीसारख्या ठिकाणी फार्महाऊसेस वगैरे. मी एकदा ‘एडिटर्स गिल्ड’च्या एका बैठकीत हा विषय उपस्थित केला. ‘आपण बाकी कित्येक गोष्टींबद्दल लिहीत असतो, तर मग आपण पत्रकारांच्या मालमतांचंही ‘ऑडिट’ का करून घेऊ नये.’ असा प्रश्‍न मी केला. पण दुर्देवानं माझी ती सूचना तत्क्षणी हाणून पाडली गेली. अगदी कुलदीप नायर, एम जे अकबर, निहाल सिंग यांसाख्यांचाही त्या सूचनेला विरोध होता.

आनंद आगाशे - खुद्द ‘टाईम्स’मध्ये मुख्य संपादक म्हणून काम करताना काही दबावाचे, नाजूक प्रसंग आलेच असतील...

दिलीप पाडगांवकर - आले ना! असे प्रसंग कोणालाच चुकत नाहीत हे तुलासुद्धा माहीत आहे. एकदा रात्री उशिरा मला सुचेता दलालचा मुंबईहून फोन आला की, हर्षद मेहताच्या गैरव्यवहाराबद्दल एक मोठी बातमी तिच्या हाती लागली आहे. वृत्तसंपादकानं तिला आधी माझ्याशी बोलून माझी परवानगी घ्यायला सांगितलं होतं. तिनं लिहिलेली बातमी पूर्ण वाचून दाखविली आणि मी तिला छापायला तत्काळ परवानगी दिली. वृत्तसंपादक पुन्हा फोनवर आले. ही बातमी किती ‘स्फोटक’ आहे ते त्यांनी निदर्शनास आणलं. त्यांचंही बरोबर होतं. ती बातमी प्रसिद्ध होऊ नये यासाठी राजकीय आणि अन्य दबाव मोठ्या प्रमाणात होतेच. पण ‘संपादकांच्या परवानगीने ही बातमी प्रसिद्ध करत आहोत’ असं ‘लॉगबुक’मध्ये स्पष्टपणे लिहून दुसर्‍या दिवशी बातमी छापायला मी वृत्तसंपादकांना सांगितलं. बातमी प्रकाशित झाल्यावर देशभर गदारोळ झाला, पण व्यवस्थापन आमच्या बाजूनंच उभं राहिलं.

उत्तरप्रदेशातल्या एका कुख्यात गुंड राजकारण्यानं ‘टाईम्स’च्या बातमीदाराला आणि मलाही एकदा धमक्या दिल्या तेव्हा तत्कालीन गृहमंत्री शंकरराव चव्हाण आणि गृहसचिव माधव गोडबोले यांच्याकडे आम्ही तक्रार नोंदविल्यावर आम्हांला पोलीस संरक्षण दिलं गेलं होतं. सबिना सैगल (सैकिया) (ही पुढे २६/११च्या दहशतवादी हल्ल्यामध्ये मुंबईच्या ‘ताज’ हॉटेलात मारली गेली) ही खाद्यपदार्थ, हॉटेल वगैरे विषयांवर ‘टाईम्स’मध्ये लिहीत असे. एकदा तिनं एका पुरवणीत पहिल्या पानावर ‘चिकन’च्या पदार्थांच्या रंगीत फोटोंसह लेख लिहिला, तेव्हा बेनेट कोलमनचे अध्यक्ष अशोक जैन प्रचंड संतापले होते. नेमक्या त्याच दिवशी संध्याकाळी शाकाहाराचा पुरस्कार करणार्‍या कार्यक्रमाचे ते अध्यक्ष असणार होते आणि असा सामिष फोटो प्रसिद्ध झाल्यामुळे त्यांची अडचण झाली होती. त्यांची तीव्र नापंसती ऐकून घेतल्यावर मी सबिनाशी बोललो आणि असा प्रकार पुढे होणार नाही याची खबरदारी घेतली.

असं काही ना काही अधून मधून घडत असे, पण ते स्वाभाविकच म्हणायला हवं.

आनंद आगाशे - वर्तमानपत्रांच्या पारंपरिक कार्यपद्धतीतून तयार होणार्‍या मुजकराबरोबरच गेल्या काही वर्षांपासून ‘सिटीझन जरनॅलिस्ट्स’ या संकल्पनेच्या आणि त्यांच्याकडून येणार्‍या मजकुराचा उदय झाला आहे. लिखित मजकूर, छायाचित्रं, व्यंग्यचित्रं असं त्यांच्याकडून येणारं बरंच काही सध्या वर्तमानपत्रं, दूरचित्रवाणी वाहिन्या आणि इंटरनेट यांवर पाहायला मिळतं. तुमच्या दृष्टीनं या ‘सिटिझन जरनॅलिझम’चं सामर्थ्य आणि मर्यादा काय आहेत?

दिलीप पाडगांवकर
- ‘सिटीझन डॉक्टर्स’, ‘सिटीझन लॉयर्स’, किंवा ‘सिटिझन इंजिनीअर्स’ जसे असू शकत नाहीत तसेच ‘सिटिझन जरनॅलिस्टस्’ही असू शकत नाहीत. याचं कारण इतर कोणत्याही व्यावसायिकांच्या प्रमाणेच व्यावसायिक पत्रकारांनासुद्धा काही विशिष्ट प्रकारची कौशल्यं प्रशिक्षणातून आत्मसात करावी लागतात. पण सध्या याबाबतीत जे घडतंय त्याचं मी स्वागतच करतो. वेगवेगळ्या समाजघटकांना अभिव्यक्त व्हावंसं वाटतंय आणि तंत्रज्ञानामुळे ते शक्य होतंय. त्यामुळे माहिती आणि मतप्रदर्शन यांचे प्रवाह पूर्वीप्रमाणे एकमार्गी न राहता बहुमार्गी झाले आहेत. याची दुसरी बाजू म्हणजे या परस्परसंवाद-प्रक्रियेत, विशेषतः इंटरनेटवर, भडक, चिथावणीखोर आणि बेजबाबदार मजकूरही वाहताना दिसतो. ते काही असलं तरी या खुलेपणाचं मी स्वागतच करतो.

नरेंद्र मोदी यांना हे नेमकं काय घडतंय हे कळलं आणि बाकी कोणाहीपेक्षा त्यांनी अधिक पद्धतशीरपणे या प्रक्रियेत हस्तक्षेप करून सगळयांवर बाजी मारली. पारंपरिक प्रसारमाध्यमांकडून आपल्याला न्याय मिळणार नाही, असं वाटल्यामुळे त्यांनी प्रस्थापित वृत्तपत्रांना आणि दूरचित्रवाहिन्यांना चक्क ‘वळसा’ घातला आणि ‘फेसबुक’, ट्विटर, रेडिओ यांचा प्रभावी वापर करत थेट जनतेशी संवाद साधला. मोठ्या वृत्तपत्रांची आणि दूरचित्रवाहिन्यांचीचीही त्यांनी दखल घेतली, पण ती खूप नंतर.

आनंद आगाशे - प्रसारमाध्यमं आणि पत्रकारिता या दोहोंमध्ये आपण इथे फरक करायला पाहिजे, असं मला वाटतं. माध्यमांमध्ये विविध समाजघटकांचा हस्तक्षेप सध्या होत असला, तरी समाजाचा ‘आरसा’ बनणं आणि समाजहितासाठी ‘ जागल्याची ’ भूमिका बजावणं, ही पत्रकारितेची दोन मोठी कामं शिल्लक राहतातच.

दिलीप पाडगांवकर - ते मान्यच आहे. ‘आरसा’ बनण्याच्या संपूर्ण प्रक्रियेचं आता लोकशाहीकरण होतंय. म्हणूनच पत्रकारांनी आता हे लक्षात घेतलं पाहिजे की, माहितीच्या / बातमीच्या स्रोतांची संख्या आता पूर्वीप्रमाणे मर्यादित राहिलेली नाही. असे स्रोत कुठेही आणि कितीही असू शकतात. ‘व्हिसल्- ब्लोअर्स’ आणि माहिती अधिकाराचा वापर करणारे लोक, ही त्यातलीच काही उदाहरणं. ही सगळी प्रक्रिया समजावून घेऊन व्यावसायिक पत्रकारांना अशा अनेकविध स्रोतांच्या हातात हात घालत आपलं काम करायला शिकावं लागेल.

आनंद आगाशे
- माध्यमांमध्ये अलीकडे विशिष्ट व्यक्ती, पक्ष किंवा संस्था-संघटना यांचे हितसंबंध जपणार्‍या ‘एम्बेडेड् जरनॅलिस्टस्’ची संख्या बरीच वाढली आहे. अशा मडळींना ओळखायचं कसं? वाचक- प्रेक्षकांना तर असा फरक करता येणं खूपच अवघड होऊन बसलं आहे...

दिलीप पाडगांवकर - आपल्याकडे कारगिल युद्धाच्या वेळी सरकारनं काही पत्रकारांना युद्धभूमीवर वार्तांकनासाठी नेलं होतं. त्यानंतर २६ /११च्या मुंबईतल्या ‘ताज’ आणि ‘ओबेरॉय- ट्रायडंट’वरच्या दहशतवादी हल्ल्याच्या वार्तांकनासाठी दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या पत्रकारांसाठी सरकारनं व्यवस्था केली होती. सरकारनं केलेल्या या दोन्ही घोडचुका होत्या. ‘लाईव्ह’ प्रक्षेपण शत्रू पाहत होता आणि तरीही बिनदिक्कतपणे सगळं सुरू होतं!

एरवीसुद्धा काही कॉर्पोरेट कंपन्या, स्वयंसेवी संस्था, राजकीय पक्ष किंवा नेते यांच्या बाजूनं किंवा विरोधात काम करणार्‍या पत्रकारांची संख्या काही कमी नाही. कोणत्याही पत्रकाराचं काम किंवा लिखाण सातत्यानं काही काळ पाहिलं की तो ‘एम्बेडेड जरनॅलिस्ट’ आहे की नाही हे लक्षात येतं. पत्रकारांमध्ये वार्ताहर आणि विश्‍लेषक असे दोन्ही प्रकार असतात आणि दोन्हींमध्ये असे प्रकार घडू शकतात. ‘एम्बेडेड जरनॅलिस्ट्स’मध्ये विशिष्ट विचारसरणीचा पुरस्कार किंवा तिरस्कार करणार्‍यांच्या बरोबरच स्वतःचा आर्थिक किंवा अन्य स्वार्थ साधणारेसुद्धा भरपूर असतात. याहीपलीकडे जाणारे, म्हणजे विशिष्ट संस्था, पक्ष किंवा व्यक्ती यांचे ‘सल्लागार’ म्हणून वावरणारे पत्रकार. निरा राडिया प्रकरणामध्ये पत्रकारितेतली कितीतरी मोठमोठी नावं अशा प्रकारे उघड झाली. तो सगळाच प्रकार दुर्देवी होता.

आनंद आगाशे - ‘पेडन्यूज’नं सध्या पत्रकारितेत चांगलंच बस्तान बसवलं आहे. या सगळ्यांचं मूळ कुठेतरी ‘टाईम्स’नं पूर्वी सुरू केलेल्या ‘मिडियानेट’शी जाऊन भिडतं, असं नाही तुम्हांला वाटत?

दिलीप पाडगांवकर - या बाबतीत एक गोष्ट मला अगदी निःसंदिग्धपणे सांगायला हवी. कोणत्याही व्यक्तीच्या किंवा संस्थेच्या बाजूने किंवा विरोधात पैसे किंवा अन्य कशाचा मोबदला घेऊन ‘बातमी’ छापणं हे पूर्णपणे चुकीचं आणि निषेधार्ह आहे. ‘मिडियानेट’च्या प्रारंभकाळातही मी माझं हेच मत सतत मांडत होतो आणि आजही मी ते पुन्हा सांगतोय. पण ‘पेड न्यूज’चा प्रकार आणखी गुंतागुंतीचा आहे. अनेक ठिकाणी केवळ बातम्याच नाही, तर संपादकीय मतप्रदर्शन करणार्‍या जागेतही हे प्रकार घडतात. यात नैतिक-अनैतिकतेचा मुद्दातर आहेच, पण हे अंतिमतः त्या वृत्तसंस्थांसाठी आत्मघातकीही आहे. अमूक एक वृत्तपत्र, वाहिनी किंवा पत्रकार ‘पेड न्यूज’चा अवलंब करतो, असं एकदा का लोकांना समजलं की, तो डाग कायमचा त्या सगळ्यांवर बसतो. याप्रकारे विश्‍वासार्हता गमावल्यानं अखेर त्यांचं व्यावसायिकदृष्ट्यासुद्धा नुकसान होतं.

मात्र ‘टाईम्स’बद्दल आणखीही एक मोठी गोष्ट सांगावीशी वाटते. मार्केंटिंग असो की संपादकीय विभाग, ‘टाईम्स’ समूह नेहमीच नवनव्या कल्पनांच्या अंमलबजावणीत अग्रेसर राहिला. त्यामुळेच तो कायम सगळ्यांच्या पुढे राहिला. आता ‘टाईम्स’ काय नवं धोरण अवलंबणार आहे ते सांगतो. ‘टाईम्स’च्या वरिष्ठ व्यवस्थापनाचं मार्केटिंग’वर संपूर्ण नियंत्रण राहीलच, पण विविध आवृत्त्यांच्या संपादक विभागांना मात्र त्या त्या ठिकाणच्या स्थानिक गरजा लक्षात घेत आपापले उपक्रम आखण्या- राबवण्याला मुभा दिली जाईल. ही एका अर्थानं ‘संघराज्यात्मक’ व्यवस्था असेल! असं पूर्वी कधी घडलं नव्हतं...

आनंद आगाशे - वृत्तपत्रं, दूरचित्रवाणी, रेडिओ, मोबाईल अशा सगळ्या माध्यमांचा एकत्र नांदण्याचा हा काळ आहे. या सहअस्तित्वाची पुढच्या दहा-वीस वर्षांतली दिशा कशी राहील असं तुम्हांला वाटतं?

दिलीप पाडगांवकर - दहा-वीस वर्षाचं माहीत नाही. पण येत्या दोन-पाच वर्षांत मात्र वाचकांची ओढ छापील माध्यमाकडून इंटरनेट, मोबाईल यांकडे झपाट्याने वाढेल. माध्यमं अधिक संवादी होतील, हे आपण बोललोच. ती गोष्ट स्वागतार्ह असली तरी मला एका गोष्टीची मात्र खूप चिंता वाटते. ती म्हणजे भाषेची होत असलेली पुरती मोडतोड! फक्त ‘एसएमएस’ किंवा ट्विटवर / इंटरनेटवरच नव्हे, तर अगदी पारंपरिक प्रसारमाध्यमांतल्यासुद्धा सर्वच भाषांना ग्रहण लागलंय. ही काळजी करायला लावणारी बाब आहे. माणसाच्या विचार करण्याच्या आणि विचार व्यक्त करण्याच्या मूलभूत क्षमतेवर या मोडतोड झालेल्या भाषेचा दुष्परिणाम होतोय. एकूण मानवी समाजाच्याच दृष्टीनं ही गोष्ट बरी नाही. म्हणून केवळ भाषेतचं सौंदर्य जपण्याच्या दृष्टीनं नव्हे, तर मानवाच्या विचार करण्याच्या क्षमतेची जपणूक करण्याच्या दृष्टीनंसुद्धा याकडे पाहायला हवं, असं मला प्रकर्षानं वाटतं.

***

चौकटी

चौकट १

पॅरिसमध्ये असताना उत्तर आफ्रिकेतल्या मोरोक्को या देशात जायची संधी मला मिळाली. तिथे गेल्यावर मला कोणी भेटायला बोलावलं आहे, असा निरोप मिळाला आणि आणखी बराच प्रवास करून तिथल्या पर्वतराजींमध्ये एका काहीशा दुर्गम ठिकाणी मी पोचलो. पांढराशुभ्र अंगभर वेष परिधान केलेला धिप्पाड शरीरयष्टीचा एक माणूस तिथे पाठमोरा उभा होता. ‘आलास? फार वेळ लावलास!’ असं म्हणत तो माझ्याकडे वळला. मोरोक्कोसारख्या ठिकाणी इतक्या दुर्गम भागात अस्खलित मराठी शब्द! मी चक्रावलोच. त्या गृहस्थांचं नाव होतं करमरकर. ते मूळचे नागपूरचे. जगभर भटकंती केलेले, एका रशियन बॅले नर्तिकेच्या प्रेमात पडून विवाह केलेले आणि आता ‘साधू’ झालेले. अशा प्रकारच्या विश्‍वसंचारी व्यक्तींचं मला नेहमीच आकर्षण वाटत आलं आहे. भारतात जन्म घेऊनही वैश्‍विक अनुभव घेत ज्यांनी आपलं विचारविश्‍व रुंदावलं आणि स्वतःच्या कामालाही तसंच परिमाण दिलं, अशा महात्मा गांधी, सावरकर, विवेकानंद, एम. एन. रॉय, यासारख्यांचं मला कायम अप्रूप वाटलं, याचं कारण हेच.

चौकट २

कोस्टारीकाचा एक तरुण माझ्या पॅरिसच्या मुक्कामात माझा मित्र बनला. कोस्टारीकातल्या एका विशिष्ट आदिवासी जमातीतला तो होता. त्याच्यासोबत मध्य अमेरिकेतल्या त्या देशात मला जायला मिळालं. भलामोठा प्रवास करून आम्ही त्या आदिवासी जमातीच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोचलो. टोळीप्रमुखानं माझं भरघोस स्वागत केलं. तो त्याच्या भाषेत बोलत होता आणि माझा मित्र मला अनुवाद करून सांगत होता. गोरे किंवा काळे पाहुणे त्यांच्याकडे नेहमीच येत. पण प्रथमच माझ्यासारखा गव्हाळ वर्णाचा पाहुणा आल्यामुळे ते विशेष खूष होते. इथपर्यंत सगळं ठीक होतं. पण अचानक त्या टोळीप्रमुखानं माझ्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून चक्क त्याच्या तिथे उपस्थित असलेल्या त्याच्या धाकट्या मुलीचा हात माझ्या हातात लग्नासाठी देऊ केला! मी पुरता गडबडलो. मित्र कानात पुटपुटला, ‘स्वीकार कर.’ ‘वेडा आहेस का?’ मी म्हणालो. ‘मी सांगतो ते ऐक. स्वीकार कर,’ तो पुन्हा म्हणाला. मग मात्र ‘मला मान्य आहे’ असं मी सांगून टाकलं. मी त्यांची भेट स्वीकारल्याबद्दल परत एकदा टोळीप्रमुखानं माझे तोंडभर आभार मानले. ‘आता तुम्ही दोघं तुम्हांला पाहिजे तो निर्णय घेऊ शकता,’ असं तो म्हणाला. तत्क्षणी त्याच्या त्या मुलीनं तिथून धूम ठोकली आणि मीही काढता पाय घेतला.

चौकट ३

"टाईम्स ऑफ इंडिया’चं मुख्य संपादकपद हे देशातलं दुसर्‍या क्रमांकाचं महत्त्वाचं पद (सेकंड मोस्ट इंपॉर्टंट जॉब इन द कंट्री) आहे," असं वाक्य मी म्हटल्याचं फार पूर्वी कुठेतरी प्रसिद्ध झालं आणि तो अनेकांच्या टीकेचा विषय बनला. वस्तुतः ते वाक्य माझ्या आधीचे संपादक गिरीलाल जैन यांचं होतं. अनेक बैठकांमध्ये ते त्याचा उच्चार करत असत. पुढे मी मुख्य संपादक झाल्यावर एका इंग्रजी नियतकालिकानं माझी मुलाखत घेतली आणि गिरीलाल जैन यांचं मी उद्धृत केलेलं ते वाक्य ‘माझं’ म्हणून त्या मुलाखतीत घातलं. त्यामुळे ते मला चिकटलं. गंमत म्हणजे बाहेर त्यावरून कितीही टीका झाली तरी समीर जैन यांना मात्र खूप आनंद झाला. ‘आपल्या मार्केटिंगच्या दृष्टीनं याच्याइतकं दुसरं भन्नाट वाक्य असूच शकत नाही’ असं ते उद्गारले!

चौकट ४

विख्यात पत्रकार विनोद मेहता यांनी त्यांच्या आत्मचरित्रात माझ्यावर टीका केली आहे. पण टीका करत असताना त्यांनी जो प्रसंग सांगितला, त्याबद्दल वस्तुस्थिती स्पष्ट करायला हवी. मी ‘टाईम्स’चा मुख्य संपादक असताना मेहता ‘बेनेट कोलमन’च्या ‘द इंडिपेंडंट’ या दैनिकाचे संपादक होते. कै. यशवंतराव चव्हाण हे परकीय हस्तक असल्याचा ‘गौप्यस्फोट’ करणारी एक बातमी ‘इंडिपेंडंट’मध्ये प्रसिद्ध होताच साहजिकच गदारोळ झाला, मुंबईतलं वातावरण तापलं. बातमी निराधार होती आणि चिडलेला जमाव निषेध व्यक्त करण्यासाठी कुठल्याही थराला जाण्याचा धोका होता. केवळ मी आणि ‘महाराष्ट्र टाइम्स’चे तत्कालीन संपादक गोविंद तळवलकर यांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे तो प्रसंग टळला. त्यामुळे मेहता यांना आमच्या हस्तक्षेपाचा कितीही राग आला असला तरी आमच्या कृतीमुळे संस्थेचं मोठं नुकसान तेव्हा टळलं, हे नक्की.

***

पूर्वप्रसिद्धी - 'साधना' (दिवाळी - २०१४)

***

ही मुलाखत मायबोली.कॉमवर पुनर्मुद्रित करण्यास परवानगी दिल्याबद्दल श्री. आनंद आगाशे (मेनका प्रकाशन) व श्री. विनोद शिरसाठ (साधना प्रकाशन) यांचे मनःपूर्वक आभार.

***

श्री. दिलीप पाडगांवकर यांचं छायाचित्र - प्रताधिकारमुक्त

***
प्रकार: 

मस्तं. अगदी वाचनीय मुलाखत.
इथे दिल्याबद्दल धन्यवाद चिनूक्स.

श्री दिलीप पाडगावकरांना श्रद्धांजली.

नितांत सुंदर मुलाखत, शब्दांकन, विचार मांडणी चौकटी सगळंच आवडलं
अनेकानेक धन्यवाद चिनुक्स !

सुंदर मुलाखत! इथे पुनःप्रकाशित केल्याबद्दल धन्यवाद चिनूक्स!

छान लेख/मुलाखत व माहिती , इथे दिल्याबद्दल धन्यवाद.

>>> प्रसारमाध्यमांत सर्व भाषांचा बळी जातोय, ही विचारशक्तीला मारक गोष्ट आहे <<<
>>>ती गोष्ट स्वागतार्ह असली तरी मला एका गोष्टीची मात्र खूप चिंता वाटते. ती म्हणजे भाषेची होत असलेली पुरती मोडतोड! फक्त ‘एसएमएस’ किंवा ट्विटवर / इंटरनेटवरच नव्हे, तर अगदी पारंपरिक प्रसारमाध्यमांतल्यासुद्धा सर्वच भाषांना ग्रहण लागलंय. ही काळजी करायला लावणारी बाब आहे. माणसाच्या विचार करण्याच्या आणि विचार व्यक्त करण्याच्या मूलभूत क्षमतेवर या मोडतोड झालेल्या भाषेचा दुष्परिणाम होतोय. एकूण मानवी समाजाच्याच दृष्टीनं ही गोष्ट बरी नाही. म्हणून केवळ भाषेतचं सौंदर्य जपण्याच्या दृष्टीनं नव्हे, तर मानवाच्या विचार करण्याच्या क्षमतेची जपणूक करण्याच्या दृष्टीनंसुद्धा याकडे पाहायला हवं, असं मला प्रकर्षानं वाटतं. <<<<<<

बायदिवे, धाग्याच्या शीर्षकावरुन व आतिल वाक्यावरुन मात्र एक सुचतय /आठवलयं, ते असे की मराठी भाषेच्या सर्वाधिक मोडतोडीची सुरुवात कुणी केली असेल तर टाईम्स गृपच्या महाराष्ट्र टाईम्सनेच, अन वर मखलाशी करीत की आम्हि "युवा पिढीची/जनसामान्यांची " चालु व त्यांना समजेल अशी भाषा वापरतो आहोत.... (शिवाय परकीय भाषांमधिल शब्दांमुळे आपली भाषा समृद्ध होत जाते असा आत्यंतिक फसवा व घातक युक्तिवाद करायला तथाकथित विचारवंत्/बुद्धिवंतांची रांग उभी आहेच्च)
अन हे करताना मटाच्या वृत्तांकनातील मराठी भाषा इतकी इंग्रजाळलेली झालीये की मी जर तो वाचला तर माझी शिल्लक येत आहे नाही ती सर्व मराठी भाषा बिघडेल. !

अशा (भेसळयुक्त) भाषेद्वारे विचार करण्याच्या व व्यक्त होण्याच्या क्षमतेवरच विपरित परिणाम होतोय जो मानवजातिला चांगला नाही या मुद्याशी सहमत.

याला उपाय भाषाशुद्धिचा, स्वभाषेतील शब्द वापरण्याचा आग्रह वगैरे..... अहो पण हे कसे शक्य आहे?
इथे माबोवरही रोमन लिपीत्/रोमन वा परकीय भाषेत लिहिण्याचा उद्धटपणा केवळ "भावना पोहोचताहेत ना, मग झाले" या सबबीखाली अनेकवेळा केला जातो, त्यातुन भाषाशुद्धि म्हणले की "सावरकर' हे नाव येणारच, अन तिथेच तर माशी शिंकते ना.... Wink सावरकर नावाची धास्ती घेतलेल्यांकडून भाषाशुद्धिबाबत प्रयत्न होणे बाजुलाच राहुदे, त्या प्रयत्नास खीळ घालण्याचेच काम होणार यात मला तरी शंका नाही.

अगदी पारंपरिक प्रसारमाध्यमांतल्यासुद्धा सर्वच भाषांना ग्रहण लागलंय. ही काळजी करायला लावणारी बाब आहे.
पण याबाबत दुसरे मत असे की इतर भाषांमधील शब्द आपल्या भाषेत आल्याने आपली भाषा समृद्ध होते. तसेहि फार पूर्वी पासून आपल्या मराठीत फारशी अरेबिक इ. शब्द रूढ झालेले आहेतच.
सध्या भारतात, विशेषतः मुंबई, पुण्यात, इंग्रजी व हिंदी भाषा इतक्या मोठ्या प्रमाणावर मराठीत घुसडल्या जातात की काही दिवसांनी तीच मराठी भाषा होईल, जसे फारसी, अरेबिक व इंग्रजी शब्द चपखलपणे भाषेत घुसले तसे.

हे भाषा शुद्धीबद्दल एक वेगळे मत,

ही विचारशक्तीला मारक गोष्ट आहे’ -

हे कसे ते मला कळले नाही. मी भारतात असताना विचार मराठीतून करत असे, नि कधी कधी तेच विचार हिंदी किंवा इंग्रजीतून मांडत असे. माझ्या विचारांची लायकी मी मराठी बोललो की इंग्रजी यावर ठरत नसे.

तेच अमेरिकेत आल्यावर, विशेषतः कामासंबंधी विचार इंग्रजीतून होऊ लागले. कामात प्राविण्य मिळवले, मी दिलेले उत्तर लोक मान्य करू लागले तेंव्हा एरवी माझ्या इंग्रजी उच्चारांची वा अ‍ॅक्सेंटची चेष्टा करणारे लोक पण माझे विचार मान्य करू लागले.

तेंव्हा विचारशक्ती भाषेवर अवलंबून नसून विचारांच्या अर्थपूर्णतेवर अवलंबून आहे.

लिंबूटिंबू, ही खात्री आहे की संस्कृतचे बरेच वाचन करून तुमच्या मनात चांगले चांगले विचार येतात, ते मराठीतूनच ना? संस्कृतमधून नाही. तुम्ही ते मराठीतूनच मांडता.
इथे अनेक लोक आपले वेद, गीता हे सर्व जुने पुराणे व टाकाऊ आहेअसे समजतात म्हणून तुमचे मत चुकीचे म्हणतात, पण तुम्ही तेच मत इंग्रजी, हिंदीतून मांडले, अगदी संस्कृतमधून मांडले तरी हे लोक त्याला किंमत देणारच नाहीत. याचा अर्थ तुमची विचारशक्ति कमी झाली असे नाही.

विचारांकडे, त्यांच्या अर्थाकडे लक्ष देण्यापेक्षा भाषेकडे जास्त लक्ष देणार्‍या लोकांसाठी हे विचार नाहीतच.

सुंदर मुलाखत. धन्यवाद चिनुक्स.

भाषाशुद्धीबद्दल इतकेच म्हणू शकतो की - मराठीमध्ये इतर भाषेतील शब्द येणे हे नैसर्गिक आहे, पण मराठीचे जे व्याकरण आहे आणि त्या शब्दांचे जे शुद्धलेखन आहे ते बरोबर हवे. तेच जर बरोबर नसेल तर मात्र ती भाषा अशुद्ध वाटेल. आजकाल बर्‍याच वर्तमानपत्रांच्या इ-आवृत्यांमध्ये मुद्रीत शोधन न करता काहीही टाईप करून बातम्या प्रसिद्ध केल्या जातात ते टाळायला हवे.

लेखाला हे शीर्षक का दिलं असेल याचा प्रश्न पडला. अख्या मुलाखतीत एकाही प्रश्न प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या भाषेवर न विचारता शेवटच्या उत्तरात श्री. पाडगावकरांनी त्या मुद्द्याला ओझरता स्पर्श केला म्हणून इतकं निगेटिव्ह आणि टाळ्याखाऊ शीर्षक दिलं जाऊ नये असं वाटलं.

श्री. दिलीप पाडगांवकर याचं नाव वाचून खूप अपेक्षेने मुलाखत वाचायला घेतली होती. मुलाखत घेणाराही त्याच क्षेत्रातला असल्याने अपेक्षा आणखी वाढवून ठेवल्या. ते करायला नको होत्या असं वाटलं. अनेकदा मंगला खाडिलकर किंवा सुधीर गाडगीळ तर मुलाखत घेत नाहीयेत ना असं वाटण्या इतपत टिपिकल आणि खमंग प्रश्न वाटले. मुलाखत अर्थात दिवाळी अंकासाठी असल्याने टार्गेट ओडीयंसला आवडण्याच्या दृष्टीने प्रश्न निवडले असावेत.
मुलाखत चांगली आहे पण निराशा झाली.
इथे दिल्याबद्दल धन्यवाद.

खूपच सुंदर मुलाखत, अतिशय ग्रेट माणूस! त्यांचा पत्रकारितेचा प्रवास फारच रोचक आहे..

यातले काही किस्से तुफान विनोदी एक कोस्टारीकन मित्राच्या गावचा मुलगी दिल्याचा आणि दुसरा:

आनंद आगाशे - पण तुम्हांला फ्रेंच भाषा कुठे येत होती?

दिलीप पाडगांवकर - नव्हती येत ना! तरीही गेलो. त्यामुळे गेल्या गेल्या आधी 'आलियान्स फ्रान्सेस'मध्ये फ्रेंच भाषा शिकायला सुरुवात केली. फादर दलरींच्या शिफारशीमुळे पॅरिसमधे एका वसतिगृहात 'वॉर्डन'ची नोकरी करत माझे खर्च भागवत होतो. तिथेही काही वेळा गंमतच व्हायची. त्या वसतिगृहातली मुलं माझ्यापेक्षा जेमतेम दोनेक वर्षांनी लहान होती. त्यांच्यावर नियंत्रण ठेवायचं कसं? मग मी एक शक्कल लढवायचो. मुलं फार दंगा करायला लागली की मी अस्सल मराठीत त्यांच्यावर भरपूर आरडाओरडा करायचो. ती एकदम गांगरून जाऊन काही काळ तरी गप्प व्हायची. असं एकूण चाललं होतं.

एका असामान्य व्यक्तीची नीट ओळख करून दिल्याबद्दल आभार, चिनुक्स! ही खरी श्रद्धांजली त्यांना.. Happy

>>>>ही विचारशक्तीला मारक गोष्ट आहे’ - हे कसे ते मला कळले नाही. <<<<<
>>>> याचा अर्थ तुमची विचारशक्ति कमी झाली असे नाही. <<<<

शब्दांचे अर्थाबाबतीत विचारशक्ति नव्हे, तर "विचार व्यक्त करण्याची क्षमता" (आत्ता देखिल) कमी होते आहे.
साधे उदाहरण घ्या, फेसबुक्/वॉट्सअ‍ॅप वर बघा, कॉन्ग्रॅट्स अन अभिनंदन या दोन शब्दांव्यतिरिक्तही अन्य कोणते शब्द इंग्रजी/मराठी मधे आहेत व्यक्त होण्यास हेच दिसत नाहीत.
म्हणजे कसे की आमच्या "विजय" या मित्राने ३०० किमी ब्रेव्हेट १३:५० तासात (२०० किमीच्या वेळेत) पूर्ण केली, तर यच्चयावत जन्ता कॉन्ग्रॅट्स अन अभिनंदन हे दोनच शब्द वापरते, त्यातही "अभिनंदन" क्वचित.
आता मला सांगा, की हे ३०० किमी पुर्ण केले, घाम गाळून, मेहनतीने, आधीचा सराव करुन, तर ती काय "फुक्कट मिळालेली गोष्ट आहे का बक्षिस आहे" म्हणून अभिनंदन करावे? ते त्याच्या मेहनतीचे फळ आहे, तर मेहनतीला "अभिनंदन" ??? हा फंडा माझ्या लक्षात येत नाही.... मी त्याला भले शाब्बास म्हणून आलो.. कारण त्याने केलेल्या मेहनतीला, कठोर परिश्रमांना व त्यातुन मिळवलेल्या यशाला दाद द्यायची, तर केवळ "अभिनंदन" हा शब्द कसा पुरा पडेल? (ते काय त्याचे लग्न लागले होते की काय? Wink )
[याठिकाणी मलाही कबुल करावे लागेल की मला जे व्यक्त करायचे आहे ते अजुनही नेमक्या शब्दात सांगता येत नाहीये - अन इथेच विचारशक्ति खुंटते असे जाणवते कारण भाषेचा/शब्दांचा/अर्थाचा अभ्यास्/व्यासंग नाहीच, वर भर म्हणून परकीय भाषेतील शब्द गैर वा मर्यादीत अर्थाने वापरले जाणे - लग्नाचि वरात असो वा विसर्जन मिरवणूक वा दारुपार्टीनंतरचा दंगा, सामान्य पब्लिक ज्या एकसुरी पद्धतीने हातवारे करीत, बहुधा आभाळात दोन्ही हात उंचावुन पतंग ओढल्याप्रमाणे काहीतरी कृती अंगविक्षेप करीत वगैरे "नाचत असते"... त्या सारखेच एकसुरी पद्धतीने विचारही व्यक्त करते असे माझे मत - किंबहुना, शब्दच माहित नसल्यास, मनात उद्भवलेला विचारास्/भावनेस काय शब्दरुपात व्यक्त करावे हे कळेनासे झाल्याने शेवट "विचारशक्ति खुंटण्यात" झाला तर नवल नाही -- किंबहुना, अनाकलनीय अंगविक्षेप हे देखिल विचारशक्ति खुंटल्याचे/वा विचार योग्य शब्दात व्यक्त न करता येण्याचे लक्षण मानता येईल Proud ]

शब्दयोजनेबाबत विचारशक्ति खुंटू शकते ती इथे.... एकतर विचारशक्ति खुंटलेली असते म्हणून नेमके शब्द सुचत नाहीत वा परकीय भाषेच्या प्रभावाने स्वतःची शब्दसंख्याच स्वतःहून मर्यादित केली असल्याने नेमके शब्द माहितच नसतात/आठवत नाहीत. ही विचारशक्तिला आलेल्या "लकव्याचीच" लक्षणे आहेत. (अन्यथा किमान त्या परकीय भाषेतील नेमके शब्द तरी वापरले गेले असते निव्वळ कॉन्ग्रॅट्स ऐवजी जसे की ब्रेव्हो, वा अन्य...)
असे माझे मत.

अवांतर: लिंबू, तुमची पोस्ट वाचताना 'कॉन्ग्रॅट्स' हे दर वेळी कॉन्गी वाचलं जातंय आणि त्याच्या पुढे आपसूक नजर ब्रिगेडी नक्षली, बुप्रा शोधायला लागत्येय. Happy Light 1

जेंव्हा इंग्रजीचा सराव होण्यासाठी, बोली- लेखी इंग्रजीवर प्रभुत्व मिळवण्यासाठी शिक्षक / पालक टाइम्स समूहातील प्रकाशने आवर्जून वाचायला लावत असत त्या काळातले संपादक म्हणून मी अगदी उत्सुकतेने वाचायला घेतली मुलाखत. त्या दॄष्टीने निराशाच झाली.

आणीबाणीच्या वेळचे संपादकीय / प्रकाशकांचे धोरण, फ्रेंच भाषेतून पी एच डी - प्रबधांचा विषय, टाइम्स मधे व इतर ही इंग्रजी प्रकाशनांमधे ढासळते व्याकरण, खालावलेला भाषेचा दर्जा, अशा मुद्द्यांवर जास्त वाचायला आवडले असते

मेधाशी सहमत! कदाचित शीर्षकामुळे ज्या अपेक्षा निर्माण झाल्या होत्या त्यामुळेही हे घडले असावे.
इथे ही मुलाखत दिल्याबद्दल आभार.

शीर्षक आणि कंटेन्टचा काहीही संबंध नसणे, हे वृत्तपत्रीय विश्वात नेहमीच घडतांना दिसते, विशेषतः मुलाखत प्रकारच्या बाबतीत. हीच गोष्ट चिनुक्सला अधोरेखित करायची असावी का या निमित्ताने? Proud

रच्याकने, मुलाखत इतकी मोठी होती, की ती संपेपर्यंत शीर्षक विसरले गेले होते, प्रतिक्रिया वाचल्या नसत्या, तर लक्षातही आले नसते.

लिंबूटिंबू, तुम्ही दिलेल्या उदाहरणात विचार व्यक्त करण्याची क्षमता या पेक्षा भाषेचे अज्ञान हीच अडचण आहे असे मला वाटते. कॉन्ग्रॅट्स काय किंवा अभिनंदन काय भाषा कुठलीहि वापरली तरी तुमच्या मते ते चुकीचेच ना? कारण लोकांना कळत नाही कुठला शब्द कुठे वापरावा.

खरे तर माझ्या कुठल्याहि भाषेचा अभ्यास फारसा नाही तरी आजकाल हिंदी, मराठी प्रोग्रॅम्स बघवत नाहीत - एक तर अर्धे अधिक इंग्रजी भाषेत न तेहि अत्यंत चुकीचे शब्द वापरलेले! इकडच्या अनेक इंग्रजी वर्तमानपत्रात, सनसनाटी निर्माण करण्यासाठी वाट्टेल ते शब्द वापरून एखादी फुसकी बातमी देतात!

मला वाटते आता फक्त फिजिक्स, केमिस्ट्रि अशी पुस्तके वाचावीत. तिथे कुणि उगाचच व्हेलॉसिटी नि स्पीड मधे गल्लत करणार नाहीत, किंवा व्हेक्टर्स ची बेरीज स्केलर समजून करणार नाहीत.

>>>. तुम्ही दिलेल्या उदाहरणात विचार व्यक्त करण्याची क्षमता या पेक्षा भाषेचे अज्ञान हीच अडचण आहे असे मला वाटते <<< मी या मुद्याची अपेक्षाच करीत होतो, त्यावर विचारही करीत होतो.
विचार स्फुरणे व व्यक्त होताना भाषेमार्फत व्यक्त होणे इतपत सोपा घटनाक्रम घडत नाही, किम्बहुना, आधी अंडे की आधी कोंबडी या न्यायाने, विचार स्फुरण्याकरता, कानावर सतत काही "भाषा" पडणे, अन ती अर्थवाहीरित्या समजुन घेऊन तिचा आधार घेऊन, नव्याने विचार करित स्वतःचे विचार मांडणे अशी ही आईच्या गर्भात असल्यापासुनची जडणघडण असते असे मानण्यास जागा आहे.
कोणा मोगल बादशहाने (अकबर? की औरंगजेब?) एक प्रयोग केला होता, त्यात त्याने काही बालकांना पुर्णपणे एकटे स्वतंत्र ठेवले होते, त्यांना केवळ अन्नपाणी पुरवले जायचे पण अन्य मनुष्यांचा कसलाहि शारिरीक, वाचिक, भावनिक, दृष्य सम्पर्क येऊ दिला नव्हता.... शेवटी ती बालके "जनावर सदृष" बनली.
याचाच अर्थ, मनुष्य जन्मापासुनच नव्हे तर गर्भावस्थेपासुनच बाह्य सृष्टीतुन ज्ञान घेऊ पहातो, त्याचा संदर्भ/संक्षेप लावु पहातो, त्यात आईवडील्/इतरांनी उच्चारलेली भाषा व त्याच वेळेस शारिरीक अविर्भावातुन व्यक्त केलेल्या भावना यांचि सांगड घालत शिकत जातो. जन्मतः राग लोभ द्वेष मत्सर दु:ख आनंद इत्यादिक विविध भावभावना "कळलेल्या/समजलेल्या" असतातच असे म्हणणे धाडसाचे ठरेल, व हे समजुन मग व्यक्त होण्या करता "भाषा" हेच मनुष्याचे सर्वाधिक वापरले जाणारे साधन आहे, जे अन्य पशूंपेक्षा माणसास "मानव" म्हणून वेगळे पण देते.

अर्थातच, जर भाषा /शब्द व त्या वर आधारित विविध भावभावनांचे प्रकटीकरण शिकले गेलेच नसेल, त्यात भेसळ /अपुर्णता असेल, तर व्यक्तिची विचार शक्ति केवळ शारिरीक पंचेंद्रियाम्पर्यंतच (व शारिरीक ११ वेग ज्यात मलमूत्रादीविसर्जन, शिंक, खोकला इत्यादिक असतील) मर्यादीत राहील.
भाषेचे परिपूर्ण ज्ञान माणसास, पंचेंद्रियांच्या जाणिवांच्या कक्षेपलिकडे घेउन जाते, व तिथेच, जर भाषा नीट येत नसेल, तर "विचारशक्ति" खुटेल वा केवळ पंचेंद्रियाम्च्या (शारिरीक जाणिवांचा/वेगांच्या) मर्यादेत बंदिस्त होईल असे म्हणता येते.
म्ह्यणूनच मी वरील लेखातिल विधानाशी सहमत आहे.

अन हे पटत नसेल, तर फार दूर जाऊ नका, तुमचि भाषा समजत नाही, अशा समुहात जाऊन तुमचे विचार सांगु पहा....... तेव्हा जी अडचण भासेल, तीच अडचण, येत असलेल्या अपुर्‍या भाषेमार्फतही जाणवेल. अर्थातच अपुरी/चुकीची भाषा येत असेल, तर व्यक्त होण्यासच नव्हे, तर विचार करण्यावरही मर्यादा पडतीलच पडतील असे मला तरि वाटते.

श्री. दिलीप पाडगांवकर यांची ही मुलाखत मुख्यत्वे त्यांच्या जडणघडणीविषयी आणि पत्रकारितेतल्या प्रवेशाविषयी आहे. ही मुलाखत दिवाळी अंकात प्रकाशित झाली होती. तिथे शब्दमर्यादेमुळे विषयविस्तारास बाधा येते. अंदाजे ५४०० शब्दांची ही मुलाखत आहे. दिवाळी अंकाची शब्दमर्यादा ध्यानात घेता यापेक्षा अधिक विस्तार असू शकत नाही.

पाडगांवकरांच्या मुलाखतींची एक मालिका 'साधना' मासिकातून वर्षं-दोन वर्षं चालवावी आणि मग त्या मुलाखतींचं पुस्तक करावं, अशी 'साधना'चे संपादक असलेल्या श्री. विनोद शिरसाठ यांची इच्छा होती. श्री. आनंद आगाशे या सर्व मुलाखती घेणार होते. त्याप्रमाणे पहिली मुलाखत 'साधना'च्या दिवाळी अंकात प्रकाशित झाली. या मुलाखतीतले शेवटचे काही प्रश्न हे पुढच्या भागाची प्रस्तावना असणार होते. मात्र पाडगांवकरांच्या व्यग्रतेमुळे मुलाखतींची मालिका 'साधना'त प्रकाशित होऊ शकली नाही. पाडगांवकर, पुणे इन्टरनॅशनल सेंटर आणि आगाशे - मेनका प्रकाशन यांनी एकत्र येऊन टिळकांवरची दोन पुस्तकं मात्र या वर्षी प्रकाशित केली.

पाडगांवकरांची पहिली मुलाखत प्रकाशित होऊन दोन वर्षं झाली होती. आतातरी या मुलाखती नियमितपणे छापून याव्यात (अर्थातच संक्षिप्त स्वरूपात) आणि मग त्या मुलाखतींचं विस्तारित रूपात पुस्तक प्रकाशित व्हावं, या हेतूनं आनंद आगाश्यांनी सप्टेंबर महिन्यात पाडगांवकरांची दीर्घ मुलाखत घेतली. काश्मीर प्रश्न आणि पाडगांवकरांची भूमिका हा या मुलाखतीचा विषय होता. ही मुलाखत यंदाच्या 'माहेर'च्या दिवाळी अंकात प्रकाशित केली आहे.

पत्रकारिता, राजकारण, समाजकारण, प्रसारमाध्यमं, चित्रपट, खाद्यसंस्कृती, पुस्तकं अशा असंख्य विषयांवर पुढच्या मुलाखती असणार होत्या. पाडगांवकरांच्या निधनामुळे हा प्रकल्प अपूर्णच राहिला आहे.

मुलाखत आज वाचली. विस्तृत मुलाखत आहे. महान व्यक्तीची जडणघडणही महानच! दिलीप पाडगावकर माझे आत्तेभाऊ असल्यामुळे दोन आठवणी लिहाव्याश्या वाटत आहेत.

राजीव गांधी पंतप्रधान असताना अनेकदा सकाळी सात वाजता दिलीप पाडगांवकरांना फोन करत असत.

माझी काकू गेली (बहुधा १ मे १९९३) त्याच दिवशी ना ग गोरेही गेले होते. पुण्यातील वैकुंठावर तेव्हा बहुधा एकच विद्युतदाहिनी होती. ना ग गोरे ह्यांचे पार्थिव शहरातील अनेक ठिकाणी नेऊन मग वैकुंठावर आणण्यात येणार होते. त्यामुळे इतर कोणत्याही पार्थिवासाठी विद्युतदाहिनी उपलब्ध केलेली नव्हती. चितेवर अग्नी द्यायचा झाल्यास खूप वेळ लागतो. तेव्हा दिलीप पाडगांवकर पुण्यात होते व वैकुंठावर आलेही होते. त्यांनी कमिशनरना फोन करून माझ्या काकूच्या पार्थिवासाठी विद्युतदाहिनी उपलब्ध व्हावी अशी विनंती केली. मात्र ती विनंती मान्य झाली नव्हती.

दिलीप ह्यांचे तीर्थरूपही अत्यंत हुषार व उच्चपदस्थ होते. त्यांनी (वसंतराव पाडगांवकर) देहदान केले. गेल्या दोन तीन वर्षातच ते व आत्याही निवर्तले.

दिलीप पाडगांवकरांच्या सोमवार पेठेतील घरात त्यांची आजी व तिची बहिणही राहत असल्यामुळे जागा अपुरी पडत असे व त्यामुळे ते कॅंप येथे राहायला गेले. दिलीप पाडगांवकरांच्या वैचारीक जडणघडणीमागे हे वळण सर्वात पहिले व महत्वाचे होते.

माझ्या वडिलांनी आयुष्यभर सगळ्यांसाठी खस्ता काढल्या आणि स्वतः दुर्लक्षित राहिले. पाडगांवकर कुटुंबीय व विशेषत: आत्या आणि दिलीपसाठी त्यांनी केलेल्या गोष्टींची यादी मोठी आहे. पण त्या गोष्टी १९४८ ते १९५२ मधील आहेत. दिलीप पाडगांवकर त्यानंतर इतके महान झाले की हे असे काही लिहिणे हेही स्वतःची प्रसिद्धी करून घेणे ठरेल ह्याची जाणीव असूनही लिहिले.

लिंबू, नुकताच प्रदर्शित झालेला अराय वल नावाचा सिनेमा बघ. तो भाषेच्या वापरावरच आहे.