माझी जंगल भटकंती !!!

Submitted by ygurjar on 3 November, 2016 - 13:43

सतत वाचन आणि जंगलातल्या भेटींमुळे पक्षीनिरीक्षणात थोडाफार तरबेज झालो आणि महाराष्ट्र वन खात्यासाठी भिमाशंकर येथे प्रथम वन्य गणनेसाठी त्यांना मदत केली. त्याच वर्षी ताडोबा येथेसुद्धा वाघांची गणना होणार होती त्यासाठी त्यांना मदत करण्यासाठी आम्ही गेलो. त्या वेळी महाराष्ट्रात मेळघाट हे एकमेव व्याघ्र प्रकल्प होता आणि ताडोबाचे व्याघ्र प्रकल्प होण्यासाठी त्याचे नाव सुचवले गेले होते. यासाठी अतिशय कसून वाघांची गणना करायची होती. यावेळी आम्ही चालत चालत ताडोबाच्या जंगलात वाघांच्या ठशांचा मागोवा घेत होतो. कित्येक किलोमीटर वणवण केल्यावरसुद्धा त्याचा काही ठावठिकाणा लागत नव्हता. एवढ्यात रस्त्यात भेटलेल्या एका गावकऱ्याने सांगीतले की जवळच विहीरीत वाघाचे दोन बछडे पडले आहेत. आम्ही चक्क धावत धावत त्या जागी पोहोचलो. जंगलातील एका बिन कठड्याच्या विहीरीवजा खडड्यात ते दोन बछडे पडले होते. विहीरीत पाणी कमी होते आणो त्याच्या एका बाजूस खडक आणि कपारीत ते बच्चे बसून सौम्य गुरगुर करत होते. वन रक्षकाच्या मते ते ४/५ महिन्यांचे असावेत असा अंदाज होता आणि त्यांचा आकार साधारणत: कुत्र्याएवढा होता. हळूहळू अजुन काही लोक आणि इतर वन रक्षक जमा झाले. विहिरीच्या आत उतरून त्यांना काढावे असे सर्वानुमते ठरले. कोणी तरी एवढ्या बाजूचा एक लांब, जाड बांबू कापून आणला आणि त्यातल्या एका पिल्लाला बाजूला सरकवायचा प्रयत्न केला. ते पिल्लू हळूच गुरगुरले, त्याने आमच्याकडे बघुन दात विचकले आणि एक डावली त्या बांबूला मारली. तो ओलाकंच, ३/४ इंचाचा बांबू अक्षरश: पिचला. आता अर्थातच "आत" उतरून त्यांना बाहेर काढण्याची हिंमत कोण्याच्यात उरली नव्हती. हळूहळू उन्हे वर चढू लागली आणि वाघाच्या बछड्यांना त्याचा त्रास होऊ लागला आणि ते अजुन आत आत कपारीत शीरू लागली. त्यांना बाहेर काढण्याच्या हरएक प्रयत्नांना ते दाद देत नव्हते. शेवटी कुठून तरी दोरीची एक जाळी पैदा केली आणि ती विहिरीत आत सोडून पुढच्या बाजूने बांबूने ढोसून त्यांना त्या जाळीत ढकलायचा प्रयत्न केला. असा ५/६ वेळा प्रयत्न केल्यावर एकदा एक पिल्लू कसेबसे त्या जाळीत शिरले आणि त्याला आम्ही हलकेच वर ओढू लागलो. पण त्याचे वजन काही आम्हाला आणि त्या जाळीला पेलले नाही आणि ते पिल्लू खाडकन पाण्यात पडले. यामुळे दुसरे पिल्लू जाम घाबरले आणि एकदम आत जाउन बसले. ते पहिले पिल्लू मात्र मोठ्या शर्थीने बाहेर काढण्यात आम्ही यशस्वी झालो आणि मग आम्ही त्याला एका पिंजऱ्यात सुरक्षीत ठेवले. ते दुसरे घाबरलेले पिल्लू मात्र जाम बाहेर यायला बघत नव्हते. परत परत प्रयत्न करत अखेर दुपारी चारच्या सुमारस ते पिल्लू पण बाहेर काढण्यात आम्हा सर्वांना यश आले. आत प्रश्न होता त्या पिल्लांना कसे संभाळायचा ? मग संध्याकाळी त्यांना ठेवलेल्या पिंजऱ्याचे दरवाजे तसेच ऊघडे ठेऊन त्यांची आई त्यांना नेते का असे बघायचे ठरले. दुसऱ्या दिवशी आनंदाची गोष्ट म्हणजे त्या रात्रीच त्यांच्या आईने त्यांना तिकडून सुरक्षीत ठिकाणी नेले. वाघाची आणि माझी ही पहिलीच भेट अशी अचानक पण चित्तथरारक होती. मात्र त्यावेळी माझाकडे कॅमेरा नव्हता ही खंत मला अजूनही लागून राहीली आहे. त्यानंतरही मी ताडोबाच्या जंगलात अनेक वेळा गेलो पण त्यातीथे मला नंतर एकदाही वाघ दिसला नाही.
175.jpg
यानंतर असाच एकदा पावसाळ्यात येऊरच्या जंगलात फिरत असताना झाडावर एक भलेमोठे फुलपाखरू दिसले. आधी मला ते खोटे आणि प्लॅस्टीकचे वाटले कारण त्याचा आकार चक्क एक फुटाएवढा मोठा होता. थोडे अधिक जवळ जाउन बारकाईने बघीतले तेव्हा जाणवले की ते एक फुलपाकहरू नसून ती दोन फुलपाखरांची मिलन जोडी होती आणि हळूहळू हलतही होती. डोळ्यावर विश्वास बसत नव्हता पण जे बघत होतो ते नक्कीच सत्य होते. आम्ही हळूच त्या जोडीला सॅकमधून घरी आणले आणि एका मोठ्या काचेच्या रिकाम्या फिश टॅंकमधे ठेवले. आता ते फुलपाखरू कुठले आहे ते ओळखण्यासाठी माझी धडपड सुरू झाली. त्यावेळी भारतीय फुलपाखरांवर पुस्तके उपलब्ध नव्हती आणि इंटरनेटचाही प्रसार आपल्याकडे झाला नव्हता. बऱ्याच शोधाअंती बी.एन.एच.एस चे श्री. आयझॅक किहीमकर यांचे तज्ञ म्हणून नाव कळले आणि त्यांना फोन केला. फोनवरच्या त्या माझ्या फुलपाखराच्या वर्णनावरूनच ते प्रचंड उत्साहीत झाले आणि त्यांनी सांगीतले की ते फुलपाखरू नसून ऍटलास मॉथ हा पतंग आहे आणि तो जगातला सर्वात मोठा पतंग म्हणून गणला जातो. याशीवाय मुंबईमधे बऱ्याच वर्षांच्या काळानंतर तो परत दिसला आहे. त्वरीत स्वत: आयझॅक किहीमकर आणि त्यांचे मित्र सुधीर सप्रे माझ्याकडे आले आणि त्यांनी छायाचित्रे घेतली. मधल्या काळात नर पतंग मरून गेला आणि मादी पतंगाने गुलबट रंगाची ज्वारीच्या दाण्याएवढी १०० एक अंडी घातली. या पतंगांना तोंडाचे अवयवच नसतात आणि प्रौढ अवस्थे मधे फक्त जोडीदार मिळवून मिलन घडल्यावत पुढचा वंश वाढवणे हे एकच काम त्यांना असते. त्यामुळे नर ७/८ दिवसात मरतात तर मादी पुढे अंडी घालून लगेच मरते. या काळात अळी असतानी त्यांनी खाल्लेले अन्न त्यांच्या शरीरार चरबीच्या स्वरूपात साठवलेले असते त्यावर त्यांची गुजराण होते. या प्रकारानंतर माझा फुलपाखरांचा अभ्यास सुरू झाला. पक्षीनिरीक्षणाबरोबर हा अजुनच एक वेगळा आनंद होता. अगदी आपल्या घराच्या आसपास, बागांमधे अनेक जातींची, रंगीबेरंगी फुलपाखरे दिसतात पण आपल्याला त्यांच्याबद्द्ल काहीच माहिती नसते. ही ईवलीशी फुलपाखरे हजारो किलोमीटर स्थलांतर करतात, काही विषारी फुलपाखरे असतात आणि त्यांची नक्कल करणारी बिनविषारी फुलपाखरेसुद्धा असतात हे सर्व काही नविन होते. अर्थात भारतीय जातींवर पुस्तके नसल्यामुळे अनेक परदेशी पुस्तकांवरूनच माहिती मिळवली आणि ज्या जाती त्यांच्याकडी आणि आपल्याकडेसुद्धा दिसतात त्यांची थोडीफार ओळख झाली. याच प्रयत्नातून, अभ्यासातून फुलपाखरांवर "छान किती दिसते" हे १९९४ मधे पुस्तक लिहीले. बहुतेक ते मराठीत फुलपाखरांवर खास असलेले पहिलेच पुस्तक असावे. त्याच प्रमाणे आज इंटरनेटच्या जगात, ब्लॉग संस्कृतीत माझा मराठीमधला फुलपाखरांचा ब्लॉग हा जगातला एकमेव आहे.
002.JPG001.jpg
या अभ्यासाबरोबरच मधल्या काळात बरीच काटकसर करून निकॉनचा फिल्म कॅमेरा आणि लेन्स विकत घेतली होती आणो छायाचित्रं सुरू केले होते. जंगलांना भेटी देण्याचे सत्र तर सुरूच होते. अनुभव घेत घेत शीकत होतो पण बऱ्याचवेळेस लेन्सेसची आणि इतर सामानाची कमतरता सतत जाणवत असायची. यानंतर महाराष्ट्राच्या बाहेर प्रथमच राजस्थानच्या प्रसिद्ध व्याघ्र प्रकल्प रणथंभोरला ला भेट द्यायची संधी मिळाली. अतिशय वेगळे पण सुंदर जंगल !! हो राजस्थान, वाळवंट जरी मनात आले तरी रणथंभोरला व्यवस्थीत जंगल आहे. जरी आपल्या मनातल्या घनदाट, हिरव्यागार जंगालासारखे ते नसेल पण "खास" आहे एवढे तर नक्कीच. मोठी मोठी माळराने, प्रचंड मोठे पदम, मिलक सारखे तलाव, त्याच्या आजूबाजूला बागडणारी चितळे, सांबर हरणे खरोखरच मनोहारी दृष्य असायचे. पण जंगलचा राजा मात्र "मिसींग" होता. माझ्या छोट्या लेन्स ने का होइना पण त्याचे छायाचित्र काही जाम मिळत नव्हते. त्याला शोधण्यासाठी जंगलात अनेक फेऱ्या मारल्या पण काही केल्या त्याचे दर्शन काही झाले नाही. एकदा दुपारी असाच बसलो असताना गाडीचा ड्रायव्हर म्हणाला "चल बस गाडीत एक राऊंड मारून येउ". इतर पर्यटक गाडीत आधीच बसल्यामुळे मला माझा कॅमेरा काही खोलीतून बरोबर घेता आला नाही. नाही तरी "काय दिसणार ?" असा विचार करून पुढे त्याच्या बरोबर मिनीबस (कॅंटर) मधे बसलो. बराच वेळ फिरल्यावर एका तलावाच्या काठी आमची बस थांबली आणि समोरून चक्क एक मोठा वाघ पाण्यातून पाणि पिउन परत आमच्या दिशेनेच येत होता. चालत चालत तो अगदी दहा फुटांपर्यंत जवळ आला. अतिशय संथ आणि शांतपणे तो चालत होता. समोर एवढी भलीमोठी गाडी लोकांंसकट उभी आहे याचे जरासुद्धा सोयरसुतक त्याला नव्हते. तो त्याच्याच मस्तीत चालत आला आणि एकदम अचानक डावीकडे वळला आणि पलिकडे दाट झाडीमागे निघून गेला. इतके दिवस मी ज्याच्यामागे वणवण भटकलो तो वाघ असा अचानकपणे माझ्यासमोर आला आणि माझ्याकडे कॅमेरा बरोबर नसल्यामुळे मला काहीही करता आले नाही. मनात चरफडतच आम्ही परत फिरलो अर्थात वाघ इतक्या जवळून बघितल्याचे समाधान होतेच पण आयुष्यभराची आठवण छायाचित्राच्या स्वरूपात मात्र नव्हती.
177.jpg

यानंतर आमची फेरी आम्ही दक्षिणेतील बंदीपुर, मदुमलाईच्या जंगलात ठरवली. दक्षिणेतील जंगले ही आपल्यापेक्षा अधिक घनदाट, हिरवीगार आणि आम्ही तीथे प्रथमच जाणार म्हणून खुप उत्सुक होतो. मात्र रणथंभोर, कान्हा, बांधवगड, जीम कॉर्बेट सारख्या जंगलांमधे उघड्या जीपमधून फिरल्यावर जेंव्हा बंदीपुरला बंद मीनीबस मधून फिरताना मन निराश झाले. बाहेर जंगल अतिशय सुंदर होते, प्राणी दिसत होते पण खिडक्यांमधून अथवा सोबतच्या इतर "जनरल टूरीस्ट" बरोबर छायाचित्रण जमणे केवळ अशक्य होते. दोन दिवस असेच बळेबळेच जंगलात फिरलो आणि शेवटी वन अधिकाऱ्याला जाउन भेटून परिस्थीती सांगातली. त्यानेसुद्धा आम्हाला आश्वासन दिले की पुढच्या आठवड्यात हत्तींची गणना होती त्यामधे सहभागी होण्यासाठी त्याने आम्हाला विनंती केली. अर्थातच यामुळे आम्हाला त्या जंगलात पायी फिरायला मिळणार होते. आम्ही लगेचच होकार दिला आणि पुढे मदुमलाईला निघालो. मदुमलाईचे जंगल ऊटीच्या हमरस्तावर आहे त्यामुळे तीथे इतर पर्यटकांची भयंकर गर्दी होती. बसचे तिकीट काढायला तासभर रांग लावायची आणि पुढे मग जेमतेम ४५ मिनीटांची जंगल राउंड घ्यायची असा काहीसा विचीत्र प्रकार होता. अर्थातच आम्हाला हा प्रकार पटण्यासारखा आणि जमण्यासारखासुद्धा नव्हता म्हणून चक्क आम्ही अर्ध्या दिवसातच परत म्हैसुरला परतलो आणि जवळच्या रंगनथिट्टू पक्षीअभयारण्याला भेट दिली. अतिशय छोट्या पण छान अश्या या पक्षी अभयारण्यामधे आपल्याला बोटीने फिरावे लागते आणि नदीच्या कडेला दोन्ही बाजूला असलेल्या झाडांवर असंख्य जातीचे पक्षी आपल्या सहज दिसू शकतात. संध्याकाळी एक फेरी मारल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आम्ही परत त्या ठीकाणी गेलो. यामुळे आम्हाला पक्ष्यांची सकाळची लगबग, त्यांचे खाणे टिपता येणार होते. छायाचित्रणासाठी प्रकाशसुद्धा योग्य असा मिळाला असता. सकाळी नदी अतिशय संथ होती. आजूबाजूला पक्षी बघत, त्यांची छायाचित्रे घेत आम्ही पुढे निघालो. एवढ्यात आमच्या नावाड्याने दुरवर बोट दाखवून सांगीतले की "ते बघा, आता मगर शीकार करणार". एक बगळ्याचे पिल्लू झाडावरून खाली पाण्यात पडले होते. आमच्या बाजूने एक भली मोठी मगर अतिशय वेगाने त्या दिशेने निघाली. तीचा एवढा प्रचंड वेग हा आश्चर्यचकीत करण्यासारखा होता. आम्ही सगळे श्वास रोखून, कॅमेरे सरसावून त्या बगळ्याच्या पिल्लावर लक्ष केंद्रीत केले. मात्र मगर त्या पिल्लापासून २० / २५ फुटांवर असताना एकदम पाण्याखाली गेली. आम्हाला काय झाले हे कळलेच नाही. एवढ्यात पाण्यात आवाज आला , तीने ते अंतर पाण्याकालून पार केले होते आणि एका क्षणात फक्त डोके वर काढून त्या पिल्लाला तीने पाण्याखाली नेले. अर्थातच हे एवढे क्षणार्धात झाले की कोणालाच काही कळले नाही आणि आम्ही एकही छायाचित्र घेऊ शकलो नाही. ५/७ सेकंद असेच गेले आणि ती मगर आमच्या बोटीच्या अगदी जवळ परत त्या पिल्लाला तोंडात धरून आली. माझ्या कॅमेराव ६०० एम.एम. ची मोठी झूम लेन्स लावल्यामुळे माझ्या फ्रेममध्ये फक्त तीचा डोळा, जबडा आणि बगळ्याचा एक पाय येत होता. बाकीचे मीत्र मात्र धडाधड छायाचित्रे घेत होते. बोटीत असल्यामुळे धावपळ करून मला लेन्सही बदलता येत नव्हती. एवढे थरारक नाट्य डोळ्यासमोर घडले पण माझ्या दुर्देवाने मला काही त्याची छायाचित्रे मिळाली नाहीत.

29.JPG
यानंतर आम्ही परत उलत बंदीपुरला हत्तींची गणना करायला निघालो. जंगलात पाणवठे जास्त असल्यामुळे आम्हाला एकेकट्याला एका पाणवठ्यावर जाउन दिवसभर बसायचे होते आणि त्या पाण्यावर येणाऱ्या प्राण्यांची खास करून हत्तींची गणना करायची होती. सोबत त्यांचा वन रक्षक जोडीला होता पण त्याचा आमच्यासाठी काहीच फायदा नव्हता कारण तो काय बोलतो आहे ते आम्हाला कळत नव्हते आणि आम्ही काय विचारतो आहे ते त्याला उमगत नव्हते. सगळाच खाणाखुणांचा मामला होता. मला एक छान बांबुनी वेढलेल्या पाणवठ्यावर जागा मिळाली होती. मी आपला माझी नोंदवही आणि कॅमेरा घेउन सज्ज होतो. मात्र परत एकदा नशिबाने दगा दिला. दिवसभरात एकही हत्ती त्या पाणवठ्यावर फिरकला नाही. दुपारी एक चुकार सांबर येउन दुडकत निघून गेले. संध्याकाळी परत जायची वेळ आली आणि आम्हाला घेण्याकरता बस आली. उठलो तेंव्हा मला एक धामणीची मिलन जोडी दिसली. साधारणत: दोन फुट जमीनीपेक्षा उंच त्यांनी एकमेकांना विळखे घातले होते. त्यांचे छायाचित्र घेणार एवढ्यान प्रचंड जोरात मोठे मोठे थेंब असलेला पाउस आला आणि मला झक मारून बस मधे बसावे लागले. वन्य छायाचित्रणात तुमच्या उत्तम कॅमेराच्या सामानाबरोबर चांगले नशिबसुद्धा लागते हे मला त्या जंगलभेटीत पुर्णपणे उमगले. संध्याकाळी कॅंपवर परतल्यावर कळले की कोणी १५ हत्ती बघीतले तर कोणी ४०. हे ऐकल्यावर मात्र माझ्या मदतीस नशीब त्यादिवशी नव्हते हे नक्की झाले. दिवसभरात मी केलेली फुलपाखरांची यादी जेव्हा मी वन संरक्षाकांना दिली तेंव्हा मात्र ते खुष झाले कारण तोपर्यंत त्यांच्याकडे फुलपाखरांची काहीच माहीती आणि नोंद नव्हती.
179.JPG

कान्हा हे मध्यप्रदेशातील जंगल वाघांसाठी प्रसीद्ध आहे. उत्तम व्यवस्थापनेसाठी आणि प्राण्यांच्या उत्तम संख्येसाठीसुद्धा हे जंगल जगभरातल्या छायाचित्रकारांमधे प्रसीद्ध आहे. याच एक कारणासाठी मी आजवर या जंगलाला अनेक भेटी दिल्या आहेत. पहिल्याच भेटीत आम्हाला इथे वीरू नावाचा निष्णात ड्रायव्हर मिळाला आणि त्याचे आणि आमचे सुत बरोबर जुळले. तो बहुतेक प्रवाश्यांची मने वाचण्यात हुषार असावा. त्याने पहिल्याच राऊंड मधे ओळखले के आम्ही फक्त "वाघ वाघ" करत गाडी पळवायला सांगणाऱ्यातले नाही आहोत. आम्हाला काय आणि कसे हवे आहे ते त्याला उमगले होते. मोठ्या मोट्या वन्य प्राण्यांबरोबरच अगदी छोट्या सुतार पक्ष्यामधेही अम्हाला रस आहे हे त्याच्या चटकन ध्यानात आले म्हणूनच एखादा पक्षी किंवा प्राणी दिसला की त्याची गाडी अलगद थांबत होती. त्या प्राण्याच्या किंवा पक्ष्याच्या अगदी जवळपास अशा काही कोनात तो गाडी उभी करत होता की आम्हाला छायाचित्रण अगदी सहज करता येत होते. यानंतर आमचा "टायगर शो" मधे नंबर लागला. वीरूने नंतर गाडी चालवता चालवता वाटेत त्याबद्दल माहिती सांगीतली. भल्या पहाटे तीन चार माहूत आपल्या हत्तींवरून वाघाचा माग काढतात व नंतर वायरलेसवरून इन्फर्मेशन सेंटर वर वाघ दिसल्याची बातमी आणि ठिकाण कळवतात. या सेंटरवर गाडीला क्रमांक मिळतो त्यानुसार ते गाडी तीथपर्यंत घेउन जातात. वाघ रस्त्यापासून बराच आत असेल तर पुढे आत हत्तीवर बसवून पर्यटकांना तो वाघ दाखवतात. आता तो वाघ पहाण्याची आमची उत्कंठा पाराकोटीला पोहोचली होती. आम्ही कॅमेराला टेलीफोटो लेन्सेस लावून सज्ज झालो. वाघ आत दाट जंगलात असल्यामुळे हत्तीवरून डुलत डुलत आत गेलो. काटेरी झाडांपसून, बांबूपासून आम्हाला वाचवत वाचवत आम्ही वाघ कुठे दिसतो का ते शोधत होतो. एवढ्यात हत्ती थांबला, आम्ही दुरवर नजर लावली, कॅमेरे सरसावले पण वाघ काही दिसेना. आमची अगतिकता आणि अज्ञान बघून माहूत हसला आणि म्हणाला "अहो तिकडे लांब काय बघताय ? खाली पायाखाली बघा !!" आम्ही नजर खाली वळवली तर खाली १०/१२ फुटांवर एक वाघीण बसली होती. इथेही पुन्हा गोची झाली. कॅमेराला लांब पल्ल्याच्या लेन्सेस लावल्यामुळे वाघीणीच्या तोंडाचा काही भाग किंवा पाठीचा, शेपटीचा भाग कॅमेरात मावत होते. आम्ही त्या वाघीणीला फक्त नीट मनसोक्त पाहून घेतले, पण त्यात खरी काही मजा नव्हती. दोन तीन ह्त्तींनी तीला रोखून धरले होते. वाघ "दिसला" एवढेच समाधान त्यात होते.
176.jpg161.JPG

मात्र हरएक टायगर शो मधे असेच होत असते असे नाही हा माझा स्वत:चा आजवरचा अनुभव आहे. यानंतरच्या वर्षी असाच एक टायगर शो मधे वाघ बघितला. हा वाघ म्हणजे १४ महिन्यांचा बच्चा होता. बच्चा जरी म्हटले तरी त्याची वाढ पुर्ण झाली होती आणि प्रौढ वाघापेक्षा काही वेगळा तो दिसत नव्हता. एका भल्यामोठ्या दगडी शीळेवर तो वीराजमान झाला होता. माझा हत्ती हा वयाने छोटा असल्यामुळे तो उंचीचे बराच लहान होता. यामुळेच तो वाघ चक्क माझ्या "आय लेव्हल"ला होता आणि समोरून अगदी मनसोक्त त्याचे छायाचित्रे घेता येत होती. सर्वात कहर म्हणजे या वर्षीच्या मे महिन्यातील माझ्या जंगल सफारीतील टायगर शोमधे झाली. आम्हाला खबर मिळाली की चार वाघ एकत्र बसले आहेत म्हणून आम्ही त्वरेने आमचा नंबर घ्यायला गेलो. मात्र ही खबर बऱ्याच जणांना आधीच मिळाली असल्यामुळे त्यांनी आधीच नंबर घेतले होते आणि आमच्यी गाडीचा बराच नंतरचा क्रमांक होता. आम्ही थोडे नाराज झालो आणि टायगर शो होण्याच्या ठिकाणी निघालो. मधेच रस्त्यात एका जीपवाल्याने खबर दिली की एक वाघ उठून खाली दरीत निघून गेला. आम्ही अजूनच खट्टू झालो. त्या जागेवर आम्ही पोहोचतच होतो एवढ्यात हल्लागुल्ला झाला, दुसरा वाघसुद्धा उठला आणि चालायला लागला. एक हत्ती पर्यटकांना ते वाघ दाखवून परत येत होता तो आमच्याच गाडीच्या जवळ आला आणि त्याने त्याचे पर्यटक उतरवले. तो हत्ती रिकामाच होता आणि त्याला त्या वाघाच्या मागे मागे जायचे होते नाहीतर तो परत झाडीत नाहीसा झाला असता. मी माहूताला विनंती केली की "मी बरोबर येउ का ?" त्याने मान हलवताच मी पटकन बाजूच्या छोट्या मुलीचा हात धरून. कॅमेरा सावरून वर चढलो. हत्ती लहान असल्यामुळे आम्ही दोघेच त्याच्या हौद्यात बसलो होतो. आता आमच्या पुढेच एक वाघीण रस्त्यात चालत होती. एवढ्यात रस्त्याच्या डावीकडून अजुन एक वाघ रस्त्यावर उतरला. आता आमच्या डावीकडून एक वाघ चालला होता आणि एक उजवीकडून. असेच थोडे अंतर गेल्यावर वाघ रस्ता सोडून माळरानावर उतरले. एवढ्यात मागे हत्तीने आवाज केला आणि आम्ही मागे बघीतले तर तिसरा वाघ आमच्याच हत्तीच्या मागे मागे चालला होता. हा प्रसंग खरोखरच रोमांचकारक होता. माझ्या हत्तीच्या चक्क तीनही बाजूस तीन वाघ चालले होते आणि आम्ही मधे चालत होतो. थोड्याच वेळात ते तीन्ही वाघ एकत्र आले. यात एक आई आनि तीची १८ महिन्यांची पुर्ण वाढलेली दोन नर, मादी पिल्ले होती. आता माझ्या कॅमेराला वाव मिळाला आणि त्याने त्या तीनही वाघांची एकत्र छायाचित्रे टिपायला सुरवात केली. असेच बरेच अंतर गेल्यावर एका पाणवठ्यावर तीनही वाघ पाण्यात उतरले, पाणी प्यायले आणि त्यांनी डुंबायला सुरवात केली. आमचे मन आणि कॅमेराचे मेमेरी कार्डसुद्धा भरले होते आणि त्या आठवणी मनात आठवतच आम्ही परत फिरलो.

170.jpg
मागे असाच कान्हाला श्रवणतालकडे येताना आम्ही "अलार्म कॉल" ऐकला. याचा अर्थ नक्कीच जवळपास कोणतातरी मोठा शिकारी प्राणी असणार. त्यामुळी वीरूने आवाजाच्या दिशेने गाडी पळवली. त्या दिशेने पुढे गेल्यावर आम्हाला एक भिषण दृष्य दिसले. चार जंगली कुत्र्यांनी एका चितळाच्या बछड्याला धरले होते. ते पिल्लू जीव खाउन धावत होते. पण तेवढ्यात एका कुत्र्याने त्याच्यावर झडप घातली. पाठोपाठ इतर तीनही कुत्रे त्याच्यावर तुटून पडले. थोड्याच वेळात त्यांची तोंडे रक्ताने भरून गेली. गिधाडांना ही खबर सेकंदातच लागली. ती हळूहळू तरळत बाजूच्या झाडावर स्थिरावली. आमच्या मागुन येउन एक कोल्हाही चकरा मारायला लागला. बहुदा त्यालाही या शिकारीतला वाटा हवा असावा. अवघ्या तीन चार मीनीटतच त्या बछड्याचा फडशा पाडून ती जंगली कुत्री हळूहळू गायब झाली. घडलेला हा प्रसंग फारच झपाट्याने आणि रस्त्यापासून खुप आत झाल्यमुळे आम्हाला त्याचे फारसे छायाचित्रण करता आले नाही. पण गेल्यावर्षीसुद्धा एका सकाळेव जंगल अतिशय सुनसाना आणि सांत होते. आम्ही परत श्रवणताललाच चाललो होतो. बघतो तर रस्त्याच्या अगदी कडेला दोन रानकुत्र्यांनी चितळाचा एक भला मोठा नर नुकताच मारला होता. एकाचे त्याच्या नरडीचा घोट घेतला होता. दुसरा तेवढ्यात गायब झाला. पहिल्या कुत्र्याने अधाशीपणे त्याचे लचके तोडायला सुरवात केली. एवढ्यत जापेच्या मागे मला हालचाल जाणवली म्हणून बघितले तर त्या दुसऱ्या गायब झालेल्य कुत्र्याने त्याचे आख्खे कुटूंब त्याच्या बरोबर आणले होते. त्यात ५/६ माद्या होत्या आणि ६/७ तरूण पिल्ले होती. क्षणार्धात सगळे त्या शिकारीवर तुटून पडले. प्रौढ कुत्र्यांनी चक्क मधून हरणाचे दोन भाग केले. लहान हिस्सा घेउन लहान कुत्रे बाजूला जाउन खायला लागली. लहाने पिल्ल एका ठिकाणी खात होती तर प्रौढ एका ठिकाणी खात होते. एकमेकांवर गुरकावत ते मांसाचे लचके तोडत होते. मधेच काही जण श्रवणताल मधे जाउन पाणी पिउन परत मांसावर तुटून पडले. थोड्याच वेळात त्या तीथे फक्त त्या हरणाचे डोके, शिंगे आणि काही हाडे एवढेच बाकी राहीले. अक्षरश: १५ ते १७ मीनीटात त्यांनी ७०/७५ कीलोच्या हरणाचा फडशा पाडला होता. माझ्याबरोबर एक छायाचित्रकार होते त्यांना हे सगळे दृष्य अतिशय भेसूर आणि क्रृर वाटले आणि म्हणून त्यांनी काही त्याची छायाचित्रे काढली नाहीत. अर्थात जंगलातला हा नैसर्गिक शिकारीचा नेहेमीचा प्रकार होता पण आम्हाला मात्र आमच्या नशिबानेच तो अनुभवायला मिळाला होता.
165.jpg

काही वर्षांपुर्वी भारतातल्या माझ्यासारख्या फुलपाखरे वेड्यांनी एकत्र येउन "बटरफ्ल्याय इंडीया" हा याहूचा ई-ग्रुप सुरू केला. देशाच्या वेगवेगळ्या भागात रहाणाऱ्यांनी एकत्र येऊन त्यांनी केलेले काम, जमवलेली माहिती, केलेला अभ्यास, काढलेली छायाचित्रे यांची एकमेकांत देवाणघेवाण करायची हाच या ई-ग्रुपचा मुळ उद्देश होता. अशीच माहितीची देवाणघेवाण करताना दोन वर्षे सरून गेली आणि इतके दिवस जे आम्ही फक्त ई-मेलवर भेटत होतो ते प्रत्यक्ष भेटण्याची कल्पना पुढे आली. अशाच एका "बटरफ्लाय मीट"ला अरालमच्या जंगलात जायचा योग आला. केरळमधील सर्वात उत्तरेला असणारे हे लहान जंगल १९८४ मधे अभयारण्य म्हणून घोषीत झाले. केरळमधले जंगल असल्यामुळे अर्थातच ते हिरवेगार आणि घनदाट होते. दक्षिणेमधील जंगलात पायी फिरायचा हा माझा पहिलाच अनुभव होता. दुपारी उशीरा पोहोचलो तरी पण आम्ही जंगलात एक धावती भेट दिली. पण दाट जंगलामुळे आणि एकंदरच अंधार लवकर पडल्यामुळे थोड्याच वेळात आम्ही परत फिरलो. माझे लक्ष अचानक माझ्या पायाकडे गेले आणि मोठाच धक्का बसला. माझा डावा पाय संपुर्ण रक्तबंबाळ झाला होता. भळाभळा रक्त वाहत होते, दक्षिणेतील घनदाट जंगालातील कुप्रसीद्ध "जळू"ने तीचे काम केले होते. काळजीपुर्वक इतर ठिकाणी तपासल्यावर अजुन ३/४ जळवा काढून टाकल्या. पण पुढे त्या जखमेतून दीड तासतरी रक्त वाहत होते. आता या जंगलात कसे फिरायचे आणि मन विचलीत न होता मनसोक्त छायाचित्रे कशी काढायची हा मोठाच प्रश्न होता. सकाळी आम्ही रहात होतो त्या जागेसमोरच कोणीतरी आम्हाला अतिशय दुर्मिळ आणि पटकन न दिसणाऱ्या सिलोन फ्रॉगमाउथ या पक्ष्यांची जोडी दाखवली. ती जोडी एवढ्या जवळ आणि शांत बसली होती की त्यांचे छायाचित्रण सहज आणि मनाजोगते करता आले. त्यानंतर आम्ही "मीन मुट्टी" या सदाहरित जंगलाच्या भागात गेलो. मीन मुट्टी याचा अर्थ माश्यांना उलट जायला वाव नसलेला पाण्याचा प्रवाह. हा एक मोठा झकास धबधबा होता. याच्या वाटेचरच आम्हाला दुर्मिळ "लायन टेल्ड मॅकाक" या माकडांचा मोठा कळप दिसला. पण जंगल अतिशय दाट असल्यामुळे आणि त्यांना आमची चाहूल लागल्यावर ती पटापट पुढच्या झाडांवर उड्या मारत निघून गेली. त्या वाटेवरच आम्हाला "कोचीन केन टर्टल" हे दुर्मिळ कासन दिसले. या कासवाच्या जातीची प्रथमच या जंगलात आम्ही नोंद केली होती. बटरफ्लाय मीट संपता संपता कोणीतरी शेजारच्या गावातून एक पकडलेला अजगर जंगलात सोडण्यासाठी आणला. त्या अजगराने एक मोठी मांजर गिळली होती आणि त्याचे पोट एखाद्या फुटबॉलप्रमाणे तट्ट फुगले होते. त्याला सोडण्याकरता आम्ही परत थोडेसे आत जंगलात गेलो. तिथून परत येताना एका झाडाच्या खोडावर मला भलाथोरला ८ इंची "यलो थाय टारांटूला" कोळी दिसला. परत त्याला बघायला आणि छायाचित्रे काढायला सगळ्यांची झुंबड उडाली.
018.JPG

यानंतरची बटरफ्लाय मीट ही जयरामपुरला, अरुणाचलप्रदेश येथे होती. हा प्रदेश म्हणजे भारताचा एकदम दुसरे टोक आणि तीथेली जंगले, माणसे, परिसर हा आपल्यापेक्षा एकदम वेगळा आहे. आपल्या भारतात फुलपाखरांच्या एकंदर १५०० जाती सापडतात आणि त्यातील मुंबईमधे फक्त १५० जाती सापडतात. पण ह्या छोट्याशा भौगोलीक प्रदेशामधे जवळपास १०००च्या आसपास फुलपाखरे सापडतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण आम्हाला बटरफ्लाय मीट चे ५ दिवस आणि पुढे आम्ही नाम्दाफा, काझीरंगाला ३/४ दिवस गेलो त्या ९/१० दिवसामधे आम्हाला १७८ जाती फुलपाखरांच्या दिसल्या. त्यातील १२५ जाती ह्या आमच्याकरता एकदम नवीन होत्या आणि आम्ही त्या प्रथमच पहात होतो. त्यामुळे अश्या वैविध्यपुर्ण परिसरामधे तिथल्या फुलपाखरांचे दर्शन आणि छायाचित्रण खरोखरच एक आनंदाची बाब होती. जीथे नजर टाकू तीथे नवीन नवीन जातीची फुलपाखरे दिसत होती. ह्या बटरफ्लाय मीटचे पाच दिवस संपवून आम्ही पुढे स्वतंत्र नाम्दाफाच्या जंगलात जायला निघालो. रात्री "म्याओ" इथे मुक्काम करून सकाळी नाम्दाफाच्या जंगलात जायला जीपने निघालो पण रस्त्यात नदीला पाणी फार होते त्यात आमची जीप अडकली. त्यातून कसेबसे बाहेर पडलो आणि थोड्याच अंतरावर चिखलात आमची गाडी फसली. इथेच दुपार झाल्यामुळे पुढे जाउन त्याच दिवशी परत येणे आम्हाला शक्य नव्हते. एवढ्या लांबवर आलो, समोर नाम्दफाचे घनदाट अरण्य दिसत आहे पण आत जात येत नाही यासाठी प्रचंड वाईट वाटले पण निसर्गाच्या इच्छेपुढे जाउ शकत नव्हतो. मन खट्टू होऊन आम्ही परत निघालो. एवढ्यात मला त्या नदीच्या एका काठावर फुलपाखरांचा एक मोठा थवा "चिखल पान" करताना दिसला. जवळपास १००हून अधिक फुलपाखरे एकत्र चिखलपान करत होती. त्यात अतिशय सुंदर दिसणाऱ्या १०/१२ जाती होत्या. ज्या जातीचे एकेक फुलपाखरू दिसण्याकरता आम्ही दिवस दिवस आतापीता करत होतो ती सगळी सगळी एकत्र आणि तीसुद्धा मोठ्या संख्येने एकत्र दिसली. आमची सगळी मरगळ निघून गेली आणि आम्ही व आमचे कॅमेरे कामाला लागले. त्याठिकाणी ३/४ तास कसे गेले ते कळलेच नाही. यानंतरचा आमचा मुक्काम काझीरंगाच्या अभयारण्यात होता. ते जंगल जरी पावसामुळे पर्यटकांसाठी बंद होते तरी आम्ही खास फुलपाखरांच्या अभ्यासाकरता मुंबईहून आलो आहोत म्हणून आम्हाला "स्पेशल परमिशन" दिली होती. अट अर्थातच त्यांना त्यांच्य जंगलातील फुलपाखरांची यादी देण्याची होती. भारतीय एक शींगे गेंडा दिसायचे हे एकमेव जंगल आहे. इथले जंगल पण एकदम वेगळे आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला विस्तीर्ण आणि ऊंच गवत असलेली मोठी मोठी कुरणे आहेत आणि त्यातच आम्हाला बाराशिंगा, हरणे दिसत होती. एका वॉचटॉवरवरून आम्हाला दुरवर हत्ती आणि गेंडेसुद्धा दिसले. पण ते फार दूर अंतरावर असल्यामुळे त्यांची छायाचित्रे मिळाली नाहीत. तीथून थोडे पुढे गेल्यावर आम्हाला एक रानम्हशींचा कळप दिसला. अजून पुढे थोडेच अंतर गेल्यावर मला एक गेंड्यांची मिलनजोडी दिसली. आधी गेंडाच जवळून दिसणे दुर्मीळ त्यात त्यांचे मिलन बघायला मिळणे ही मोठीच नशीबाची बाब होती. चक्क मला त्यांचे १/२ "रेकॉर्ड शॉट" सुद्ध मिळाले. काझीरंगाला एकाच दिवसात, एकाच राऊंडमधे एवढे सगळे दिसणे म्हणजे खरोखरच आमचे नशीब बलवत्तर होते. या खुशीतच आम्ही मुंबईला परत फिरलो पण त्याआधी तिथल्या वन संरक्षकांना तिथल्या फुलपाखरांची यादी द्यायला मात्र विसरलो नाही.
15.JPG

दरवेळेला मोठ्या जंगलातच असे थरारक अनुभव येतात असे काही नाही. माझ्या दर रवीवारच्य फेऱ्या कायम येऊर, नागला, कर्नाळा, फणसाड इथे होत असतात. या लहान लहान जंगलात पण दरवेळेस हमखास न चुकता काहीना काही छान दिसतच रहाते आणि अनेक अविस्मरणीय अनुभवसुद्धा येतात. ज्या फुलपाखरांची आम्ही तासनतास वाट बघतो ती फुलपाखरे चक्क माझ्या कॅमेरावर, हातावरच येउन अनेकदा बसली आहेत. कित्येक वेळा सापांची, विंचवांची अचानक गाठ पडली आहे. ह्या छोट्या छोट्या जंगालातील ह्या सुक्ष्म बारीक किटकांच्याच माझ्या छायाचित्रांना आतापर्यंत देशात, परदेशात जास्त प्रसीद्धी मिळाली आहे. यासाठी मी भारताचे प्रतीनीधीत्व केले आहे याचा मला सार्थ अभिमानसुद्धा आहे. दरवेळेस लहान किंवा मोठ्या जंगलात जाताना डोक्यात एखाद्या छायाचित्राची "फ्रेम" अगदी पक्की तयार असते पण दरवेळेस ते छायाचित्र मिळतेच असे नाही. आता वाघीण अगदी लहान बछड्यांबरोबर बघणे याची मे गेली १०/१२ वर्षे वाट बघतोय पण हा योग अजुन काही आला नाही. मजेची बाब अशी की माझ्याच बरोबरच्या एका स्नेह्यांना असेच एक वाघीण आणि तीची ३ लहान लहान पिल्ले असे अगदी त्यांच्या जीपच्या अगदी समोरच दिसले पण ते त्या वाघांना बघण्यात एवढे गुंगून गेले की त्यांनी एकही छायाचित्र घेतले नाही. आपल्याकडचा बिबळ्या मी इतक्या वेळेस दिवसा आणि रात्री एकेकटा, जोडीने बघीतला आहे पण आज माझ्याकडे त्त्याचे एकही छायाचित्र नावालासुद्धा नाही. अर्थात माझ्या पुढच्या प्रत्येक जंगलभेटीचा तो एक मुख्य "अजेंडा" कायम असतो आणि त्या ओढीनेच मी कायम जंगलात जात रहातो.
182.JPG186.JPG187.jpg
माझ्या अधिक छायाचित्रांकरता http://www.yuwarajgurjar.com/ ला जरूर भेट द्या आणि तुमचे अभिप्राय कळवा.

युवराज गुर्जर.
http://www.yuwarajgurjar.com/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूपच छान लेख आहे. आवडला.
तुमच्या ईच्छा लवकर पूर्ण होवो आणि आम्हाला अशीच छान छान चित्रे पहायला मिळो Happy

अप्रतिम लेखन व प्रकाशचित्रे. जे अनुभव तुम्ही लिहीले आहेत त्याची प्रकाशचित्रे (जेव्हा मिळालीत तेव्हाची) त्यापुढे असतील तर लेखाला आणखी मजा येईल.

वन्य छायाचित्रणात तुमच्या उत्तम कॅमेराच्या सामानाबरोबर चांगले नशिबसुद्धा लागते >> +१०१

याकरता चिकाटी मात्र सोडता कामा नये. तुम्हाला वाघीण व तिचे बछडे मिळतील तेव्हा मीपण सोबत असेल अशी इच्छा करतो. (अजेंडा) Happy शुभेच्छा!! _/\_

कृपया फोटोवर बॉटरमार्क टाकाल का?

सगळे फोटो सुरेख आहेत आणि लिखाणही अतिशय मनापासुन केलेय. गंमत आली वाचताना. खुप आवडले.

पतंग सॅकमधुन आणला हे वाचताना जरा काळजी वाटली, पतंग किण्वा फुलपाखरु या किटकांचे पंख इतके नाजुक असतात की हातही लावायला भिती वाटते, न जाणो फाटतिल, चुरगळतील म्हणुन. तुम्ही सॅकमधुन कसे आणले देव जाणे. रच्याकने, त्या अंड्यांमधुन नंतर संक्रमीत होत पतंग निघाले का ?

Yes around 100+ caterpillars hatched from the eggs and then handed over to Mr. Isaac Kehikar of BNHS.

वाह.. वाचतच राहावासा वाटणारा लेख.. फोटो बघतच राहावेसे वाटणारे..किती किती किस्से असतील ना तुमच्या पोतडीत.. येऊद्या सगळे इकडे.. Happy

अगोदरही प्रदर्शनांत तुमचे फोटो पाहिले आहेत. आता येऊरमध्ये पाटणेपाडाकडून जाण्यास बंदी केली आहे ना?
पतंगांची जोडी दिसली ती घरी आणली - इथे "तुम्ही असे करू नका" हे वाक्य लिहा.

वॉव... गुजर सर... इथे पाहून भलताच खुष झालोय... तुमच्या फोटोंचा एक चाहता.. मस्त अनुभव... तुमचे फुलपाखरुंचे फोटोज तर... थक्क

Pages