आगंतुक (कथा)

Submitted by चैतन्य रासकर on 31 October, 2016 - 13:57

"घरात कोणीतरी असल्याचा भास होतो" बाबा माझ्या मागच्या भिंतीकडे बघत म्हणाले.

"कसला भास?" मी विचारले.

"घरात कोणीतरी रात्रीच्या वेळेस येते" बाबांची नजर अजूनही भिंतीवर स्थिर होती.

"मला कळाले नाही" मी बाबांकडे रोखून बघत म्हणालो.

आम्ही दोघे आमच्या जुन्या घरात बसलो होतो, बाबा एकटे राहत असत. मी बऱ्याच दिवसांनी घरी आलो होतो, आमच्या कौलारू घरात, तीन खोल्या होत्या, बाबा एका खोलीत झोपत असत आणि बाकीच्या दोन खोल्या बंद असत, त्यामुळे त्या दोन खोल्यांमध्ये कोणी जात नसे. घरच्या पुढे छोटे अंगण होते, आई असताना आईने एक बाग सजवली होती, त्यापुढे लोखंडाचे दार होते, पण बाबांना या वयात, घरभर फिरणे ही शक्य होत नव्हते.

बाबांनी सावकाश त्यांच्या समोरच्या खोलीकडे बघितले.

"मी झोपल्यावर, माझ्या समोरच्या खोलीत, कोणीतरी असल्याचा भास होतो, पावलांचा आवाज होतो"

"आई आल्याचा भास होतो का?" मी शांतपणे विचारले.

माझ्या आईचे निधन होऊन दहा वर्षे झाली होती, आईचे आकस्मित निधन बाबांच्या अगदी जिव्हारी लागले, त्या नंतर ते अंथरुणालाच खिळले, पण आजही पंच्याहत्तर वर्षाचे माझे वडील तिच्याबद्दल आवडीने बोलत असत.
बाबांचे डोळे चमकले, हलके हसले ही "काय माहीत कदाचित असेल ही" बाबा म्हणाले.

पण मग आई, अशी अचानक, दहा वर्षाने, का येत असेल? प्रश्न माझ्या मनात जागा झाला.

वयोमानामुळे बाबांना ऐकू येत नसे, चष्म्याचा नंबर ही बदलायला हवा होता, या वयात असे भास होणे साहजिक.. एकदम एक मध्यम वयाचा माणूस, दार उघडून आत आला, त्याचे लक्ष माझ्याकडे गेले, मला बाबांच्या जवळ बसलेला बघून तो दचकला, चेहरा ओळखीचा होता , पण पटकन नाव आठवले नाही.

"अरे गजानन ये ये, आज कोण आलाय बघ" बाबा त्याला बघून म्हणाले.

अरे हा तर गजानन काका, माझी टयूब पेटली, मी ही त्यांना बऱ्याच वर्षांनी बघत होतो. या घरात बाबा एकटे राहत होते, मी शहरात होतो, गजानन काका बाबांचे सगळे करत असत, अगदी स्वतःच्या वडीलांसारखे, रोज जेवण घेऊन येत असत, डॉक्टरकडे घेऊन जात असत. ते आमच्या घराजवळच त्यांच्या कुटुंबासोबत राहत असत. पण मला माहित नव्हते की ते अजूनही घरी येतात. आज ही त्यांनी नेहमी सारखा बाबांसाठी जेवणाचा डबा आणला होता.

"दादा अरे तू कधी आलास, तुझ्यासाठी डबा आणला असता ना" गजानन काका चपला काढत म्हणाले.

"हे काय आताच आलो, कसे आहात?" मी विचारले.

"बरे चालू आहे" गजानन काका पटकन स्वयंपाक घरात गेले, ताटात जेवण काढून त्यांनी ताट बाबांना दिले, बाबा ताट घेऊन आपल्या खोलीत गेले.

"मी तुला डबा आणून देतो" गजानन काका माझ्या समोर बसत म्हणाले.
"राहूदे हो काका"

"अरे तुझा फोन कधी लागतच नाही, खूप वेळा प्रयत्न केला, मागच्या आठवड्यापासून बाबांच्या फोन वरून सुद्धा फोन केला होता" काकांनी विचारले.
"हो, मी कामा निम्मित दुसऱ्या शहरात होतो, प्रवास, धावपळ चालू होती, त्यामुळे फोन ही बंद होता" मी म्हणालो.

"तुला बातमी कळली का?" गजानन ने पटकन विचारले.
"कुठली?" मी विचारले.

"दिनेश दादा..." गजानन काकाने नजर वर आकाशकडे वळवली.
मला त्यांच्या इशाऱ्याचा अर्थ समाजाला. "काय, कोण म्हणाले?" मी रागात विचारले.

"मला एवढेच कळले, बाबांना यामधले काही माहित नाही, गावात लोक बोलत होती" गजानन काका म्हणाले.

"आपल्या घराबद्दल गावातले लोक पहिल्यापासूनच बोलतात, हे काय नवीन नाही" मी वैतागून म्हणालो.
"मी त्याला मागच्या आठवड्यातच भेटलो होतो, दिनेश मजेत आहे, जाड झालाय, त्याचा पोरगा ही फार हुशार आहे" मी एका दमात बोलून गेलो.

दिनेश माझा लहान भाऊ होता, बाबांची आणि त्याची लहानपणापासून भांडणे होत असत, मी नेहमी दुर्लक्ष करत असे, पण एकोणीस-वीस वर्षाचा असताना, अभ्यास करत नाही, घरी पैसे चोरतो म्हणून, बाबांनी त्याला घराबाहेर काढले, मी तेव्हा विरोध केला नाही पण आईला फार वाईट वाटले. नंतर दिनेशला नोकरी ही मिळाली नाही, पैसे संपले, आईच्या मायेने मग तो चोरून घरात रहायला लागला, अगदी मध्यरात्री बाबा झोपल्या नंतर घरी येत असे, जेवत असे आणि पहाटे बाबा उठायच्या आत, घरातून बाहेर पडत असे. त्याचे असे वागणे मला आवडले नाही, पण आईकडे बघून मी गप्प बसत असे.

मी गजानन काकांना बाबांच्या भासाबद्दल सांगितले.

"मला ही भास झाला" गजानन काका मान हलवून, होकार देत म्हणाले.
"कसे काय?" मला फार आश्चर्य वाटले.
"एकदा बाबा मला म्हटले की, रात्रीचा इथेच झोपत जा, माझी तयारी नव्हती, पण बाबांच्या शेजारच्या खोलीत मी एकदा झोपलो होतो" गजानन काका म्हणाले.

"मग काय झाले?" माझी उत्सुकता वाढली.

"पावलांचा आवाज झाला, समोरच्या खोलीत कोणीतरी गेले, पण माझे काय धाडस झाले नाही" गजानन काका दोन्ही हात हलवत म्हटले.
"तुम्ही बघायला हवे होते" मी निराश होऊन म्हटले.

"बहुतेक दिनेश ही असेल" गजानन काका ने अलगद एक अंदाज केला.
"दिन्या इकडे येणे शक्य नाही, तो आई गेल्या नंतर परत कधीच आला नाही" मी म्हणालो.

थोडा वेळ कोणी काही बोलले नाही, मी गजाननकडे बघत म्हणालो, "माझा भुतावर विश्वास आहे"
"माझा ही" मला लगेच प्रतिक्रिया मिळाली.

पण आम्हा दोघांनाही माहीत नव्हते, आता पुढे काय करू शकतो, मला या घरात रहायची भीती वाटत होती.

"नारळ ठेवायचा का?" गजानन ने विचारले.

"आज लगेच नको ठेवायला, आज रात्री मी बघतो काय प्रकार आहे ते" मी म्हणालो.
गजाननची निराशा झाली, पण मला लगेच कोणत्या निष्कर्षावर पोहचायचे नव्हते.

गजानन म्हणाले, "असे अचानक कसे येणे झाले?, म्हणजे बरे झाले तुम्ही आलात, बाबा ही तुमची आठवण काढत असतात, दिनेश दादानं बद्दल काही जास्त बोलत नाहीत, पण तुमच्याबद्दल बरेच बोलतात"
तू असा एकटा, अचानक, इतक्या वर्षांनी कसा आलास? गजाननला असे सरळ विचारायचे होते, पण ते काही त्यांना जमले नाही. बाबा माझ्याबद्दल बरा विचार करतात, हे ऐकून बरे वाटले.
"खूप दिवस आलो नव्हतो, म्हणून आलो, चार-पाच दिवस सुट्टी आहे" मी थोडा हसत म्हणालो.

"चला गावात फिरून येऊ" गजाननला अजून गप्पा माराच्या होत्या.
"नाही काका, मागच्या आठवड्यात खूप धावपळ झाली, अता घरीच आराम करतो"

गजाननला काय बोलावे ते सुचले नाही, मी पटकन विषय बदलत बोललो, "टीव्ही चालू आहे का?, न्युज बघायच्या होत्या"

गजानन ने मान डोलावूनच उत्तर दिले, आमच्या बोलण्याचे विषय संपले होते, मला जास्त बोलण्यात रस नव्हता, गजानन ने माझ्यासाठी परत एक जेवणाचा डबा आणून दिला, त्यांनी दिलेले जेवण जेवत, मी टीव्ही बघितला, रटाळ न्युज होत्या, काही नवीन घडत नव्हते, तेच ते करपशन, दरोडा, चोरी, खून, खटला. आज बऱ्याच दिवसानंतर घरातले जेवण जेवायला मिळाले.

जेवण झाल्यावर, मी बाबांच्या खोलीत गेलो, पण बाबांनी खोलीचे दार आतून लावून घेतले होते. कदाचित, कोणीतरी दार उघडून आता येईल, अशी भीती त्यांना वाटत असणार. मी त्यांच्या समोरच्या खोलीत गेलो, त्या खोलीत एक कॉट, एक खुर्ची आणि खाली जमिनीवर एक कळकट गादी टाकली होती. खोलीतले दिवे ही चालू नव्हते, मी खोलीतली एकमेव खिडकी उघडली, गज काढले तर एक माणूस सहज आत येईन एवढी जागा होती. गज गंजले होते, तकलादू झाले होते.

"एखादा भटका, बेघर माणूस तर येत नसेल ना?" माझ्या मनात शंका आली, रात्री येत असेल, इथेच झोपत असेल आणि मग पहाटे निघून जात असेल. ही शक्यता होती. असे असेल तर त्याला सहज घराबाहेर काढता येईल, पण भुताची संगत नको!!

रात्रीला सुरवात झाली होती, माझ्यातला थकवा ही वाढला होता. मी बाबांच्या शेजारच्या खोलीत जाऊन पडलो, खूप दमलो होतो पण या भुताच्या भीतीने झोप ही पळून गेली होती. कोण बरे येत असेल? मी डोक्याला ताण देत विचार केला.

आई का येईल अशी अचानक? दिन्या इकडे येणे शक्य नाही. मग अजून कोण?

कोणीतरी बाबांचा जुना मित्र? मी बाबांचे सगळे मित्र आठवण्याचा प्रयत्न केला, बाबांचा जुना मित्र, तो येत असेल पण मग बाबा त्याच्याबद्दल विसरले असतील. त्यांच्या या मित्राबद्दल गजानन काकालाही सांगायचे विसरले असतील. बाबांना या वयात, सकाळी बोललेले, संध्याकाळी ही आठवत नसे. वयाचा परिणाम होता, हे साहजिकच होते.

माझे डोके दुखायला लागले, मला काही सुचत नव्हते, गजानन काकांना ही भास कसा होतोय?

हा डाव गजाननचा तर नाही?

हा विचार माझ्या मनात विजेसारखा आला, मी स्थब्ध झालो, ते असे का करतील? करू शकतात, या घरासाठी, या घराला चांगली किंमत मिळू शकते, त्यांना चांगले ठाऊक होते की, दिन्या इकडे येणार नाही आणि मी ही आज बऱ्याच वर्षांनी आलो आहे, त्यामुळेच त्यांना माझ्या अशा अचानक येण्याचे आश्चर्य वाटले. अशा गोष्टींनी बाबांच्या मनात भीती तयार करणे आणि मग घर स्वतःच्या नावावर करून घेणे हा, त्यांचा डाव असू शकतो.

पण मग बाबा खरेच त्याच्या नावावर घर करतील? कारण बाबांची त्यांच्या मुलांनी कधी काळजी घेतली नाही?

प्रश्ना मागून प्रश्न तयार होत होते, एकही उत्तर मिळत नव्हते. मी कितीतरी वेळ असा बिछान्यावर पडलो होतो, रात्रीचे किती वाजले होते ते ही कळत नव्हते, बाहेरच्या सुन्न शांततेमध्ये मनातला गोंधळ अजून जाणवत होता, घश्याला कोरड... कोणीतरी आलाय?

मला आवाज आला, आवाज आहे का? भास? कसे ओळखायचे? परत आवाज होईल का..काय करू..

माझ्या दरवाज्याच्या मागे कोणीतरी होते, माझ्या खोलीचा दरवाजा आतून बंद होता पण त्या मागे कोणीतरी उभे होत, त्या दरवाजामधून मला ते एकटक बघत होते, ते दरवाजा तोडून आत येईल आणि मला पकडेल, मला मारून....

कोणीतरी माझ्या खोलीचे दार ढकलतेय का? मला जाणवले, माझा आवंढा आतमध्येच गुदमरला, डोळे उघडण्याचे ही धाडस होत नव्हते, काय करू..

दाराचा आवाज..हो..नक्की दाराचा आवज होता..कोणीतरी समोरच्या खोलीचे दार उघडले, आत गेले.

हो! त्या खोलीत कोणीतरी आहे, मला इथे बसल्या जाणवतेय, कोण असेल? का आल असेल? असे रोज का...

मी थिजून तसाच पडलो होतो, पायातले त्राण गेले होते, तळहातांना घाम आला होता, मी जितक्या होईल तितक्या हलके बिछान्यावरून उठलो, पावलांचा आवाज न करता दाराकडे गेलो, दाराची कडी सावकाश काढली पण त्याचा आवाज झाला, हात थरथरले, श्वास अडकला, ते मला पकडतील, मी मरेन, मी मरेन...

मला गुंगी आली, मी कडी तशीच हातात घेऊन माझा तोल सावरला, स्वतःला सावरले, दीर्घ श्वास घेऊन मी दार उघडले...

माझी नजर समोरच्या खोलीच्या दाराकडे गेली, त्या खोलीचे दार सताड उघडे होते.

मला अंधारात काही दिसले नाही, मी दबकत थोडा पुढे गेलो, खोलीच्या दारापाशी आलो, मी आतमध्ये बघितले, खोली मधल्या कॉटवर दोघे मोठे पुरुष बसले होते. एक हसऱ्या चेहऱ्याने माझ्याकडे बघत होता आणि दुसरा त्याच्या मोबाईलमध्ये काहीतरी करत होता.

ज्याच्या चेहऱ्यावर स्मितहास्य होते, त्याने मानेनेच मला आत बोलावले, खुर्चीकडे हात करून बसायला सांगितले आणि सावकाश म्हणाला,

"अरे ये ना, घाबरतोस काय?"

मी सावकाश आत गेलो, खुर्चीत अवघडून बसलो, ते दोघे बलदंड पुरुष, खांद्याला खांदा लावून, त्या एवढ्याश्या कॉट वर बसले होते. पहिल्याच्या चेहऱ्यावरचे हास्य अजूनही कमी झाले नव्हते, तो मला न्याहळत होता आणि दुसरा अजूनही मोबाईलमध्ये गेम खेळण्यात मग्न होता, त्याने माझ्याकडे अजून पाहिले नव्हते.

मी धीर करून विचारले, "आत कसे आलात?" त्याने त्याच्या मागच्या खिडकीकडे इशारा केला.

"रोज या ढोल्याला खिडकीतून आणावे लागत होते" पहिला माणूस दुसऱ्याकडे बघत म्हणाला. मोबाईलवर गेम खेळणारा इसम खी-खी करत हसला.

"रोज?" मी एवढेच विचारू शकलो.

"मग काय, आम्हाला काय माहित तू कधी येणार, कधीतरी येशील असा अंदाज होता. तू यार आम्हाला खूप फिरवलेस" पहिला इसम खोट्या रागात बोलला. "रोज इकडे येत होतो, चोरासारखे, याच खोलीत झोपत होतो"
"चोरून?" मी विचारले.

"आमचा तुझ्या बापावर आणि गजानन वर ही विश्वास नव्हता, तुझ्या बापाला सांगितले असते तर त्याने तुला कळवले असते, गजाननने ही तेच केले असते आणि मग तू इथे कधी आला नसता" त्याने पद्धतशीर पणे मला सांगितले.

"दिनेश बद्दल तुझ्या बापाला माहित होते का?" त्याने मला प्रश्न केला.

"नाही, गजाननला माहित होते, कोणी केले ते त्याला माहित नव्हते" माझ्या भीतीची जागा निराशेने घेतली.

"तू केलेल्या कांड नंतर, सगळे पुरावे तुझ्या विरोधात होते आणि मग तू पळून गेलास, भूमिगत झालास, गेले दोन आठवडे आम्ही तुला शोधत होतो, या घराचा पत्ता कळाला, गावात चौकशी केल्यावर, आम्हाला कळाले की फक्त तुझा बाप या घरात राहतोय, आम्ही येऊन हे घर बघितले आणि या ढोल्याने ही आयडिया सुचवली. आमचा अंदाज होताच की तू कधीतरी इथे येणार."

"आणि मग दिवसा?" मी परत विचारले.

"दिवस भर एक जण घरावर पाळत ठेवण्यासाठी होता, आज तू त्याला ही चुकवलेस" या इसमाला माझ्या प्रश्नांचा कंटाळा आला होता.

मला सगळा प्रकार कळला, माझे भांडे फुटल होते.

"चल रे जाऊ" पहिला इसम अगदी मित्रासारखा मला म्हणाला.

"कुठे?" मी विचारले.
"पोलीस चौकीत आणि कुठे?"

"साहेब, उद्या सकाळी जाऊ ना, मी फार दमलोय" मी रडवलेल्या स्वरात म्हणालो. "तुम्ही इथे झोपा, मी पण इथे खाली जमिनीवर झोपतो"

पहिल्या इसमाने नाही म्हणत मान हलवली, दुसरा इसम, मोबाईलवर गेम खेळत, माझ्याकडे न बघत म्हणाला,

"इथे झोपलो तर दिनेश सारखा, डोक्यात दगड घालून आमचा खून करशील"

आगंतुकाच्या या शब्दाने मला ते खिडकीचे गज, तुरुंगाच्या गजासारखे दिसू लागले.

चैतन्य रासकर
chaitanyaras@gmail.com

Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ashu patil, @anilchembur, @फेरफटका, @ऋन्मेऽऽष, @जाई. @स्वस्ति

धन्यवाद Happy

@Digya, @Shweta nandurkar धन्यवाद Happy

@मते, माझ्या मते, कारण नेहमीचे असू शकते, भाऊबंदकी, पैसा, घर, जमीन जुमला वगैरे Happy

@अश्वत्थ, @सुनिता

धन्यवाद Happy

@मीरा

दोन आठवाड्यापूर्वी, ते म्हणतात ना, "गेले दोन आठवडे आम्ही तुला शोधत होतो" Happy