सख्या रंग तुझा सावळा

Submitted by स्वप्नाली on 26 August, 2016 - 15:34

सख्या रंग तुझा सावळा
श्रावणी बरसे घन-नीळा
जीव आसुसला हरी-दर्शना
पावा वाजव रे कान्हा

केशर उधळीत आला भास्कर
सात अश्वान्च्या रथी स्वार
सोनसळी मोहरली वसुंधरा
कमल पुष्प मुक्त करी भ्रमरा

वाट पाहते यमुनातीरी
कधी येणार श्रीहरी
उन्हं आली डोईवरी
गोपी निघाल्या बाज़ारी

अशी जायची नाही मी घरी
घट झाला जड कटेवरी
करू नको उशीर आतातरी
पावा वाजव रे श्रीहरी

चुगल्या क़री पैन्जण
मौन धरे ना कांकण
जमल्या सख्या गौळण
पूसे, कुठे तुझा साजण

आल्या सावल्या दाटून
आला ग चंद्रमा नभी
थकली असेल वाट पाहून
आई दारातच उभी

निजले ग रान-फूल
घरी परतल्या गाई
सख्या घालीतो चांद-हूल
शोधीते तुला ठाई-ठाई

पाहू नको अंत आता
कानो-कानी होईल वार्ता
कशी सावरू अधीर मना
पावा वाजव रे कान्हा

तुझी बासरी माझी वैरी
विराजते जेव्हा तुझ्या अधरावरी
नकोच आता मुरलीचा नाद
दर्शनातूर प्रिया घालते साद

सख्या रंग तुझा सावळा
पाहून माझा जीव सुखावला
प्रीतीचा मांडला हिशोब साधा
जग म्हणे, वेडी झाली राधा...

-स्वप्नाली
28.08.2016

Group content visibility: 
Public - accessible to all site users