गवार-मंगोडी दहीवाली

Submitted by सारीका on 19 August, 2016 - 05:11
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

७ जुलैला आम्ही सारे खवय्ये कार्यक्रमात ही भाजी बघितली होती तेव्हापासुन ही भाजी करायचे मनात होते, आज योग आला. भाजीची चव आवडली म्हणून मग लगे हात रेसीपी लिहून टाकावी असा विचार केला. मंगोडी म्हणजे मुगाचे वडे किंवा सांडगे, माझ्याकडे मुगाचे सांडगे नव्हते म्हणून मी मटकीचे वापरले, मुगाच्या सांडग्यामुळे भाजी जरा सौम्य लागत असावी कारण मटकीच्या सांडग्यांमुळे भाजीची चव किंचीत उग्र वाटली पण ज्यांना मटकी आवडते त्यांना ही चव देखील आवडेल.
नमनालाच घडाभर तेल ओतून झालेय आता पाककृतीकडे वळते. Proud

साहीत्यः
अर्धा पाव निवडून चिरलेली गवार ( साधारण दिड वाटी भरेल इतकी)
१ वाटी मंगोडी, मुगवडी, मुगाचे सांडगे किंवा मटकीचे सांडगे
१ वाटी ताजे दही
१ १/२ (दिड चमचा) चमचा भाजलेले बेसन
१ इंच आले अगदी बारीक चिरून
२ टे. स्पुन तेल
१/२ चमचा मोहरी
१ चमचा तिखट
पाव चमचा हळद
चिमूटभर हिंग
१/२ चमचा धने पुड
१/२ चमचा भाजलेली जिरेपुड (वेळेवर भाजुन घेतली तर चांगला स्वाद येतो)
१ चमचा साखर
पाव चमचा आमचूर पावडर
चवीनुसार मीठ
भाजी शिजवण्यासाठी पाणी एक ते दिड ग्लास
मूठभर बारीक चिरलेली कोथींबीर

क्रमवार पाककृती: 

एका फ्राइंग पॅनमधे तेल गरम करुन त्यामध्ये मंगोडी( मुगवडी, सांडगे) तळून घ्याव्यात.
एका बाऊलमधे दही हळद आणि बेसन घेऊन ते चांगले फेटून घ्यावे,
तळलेल्या मंगोडी एका बाजुला काढून घ्याव्यात आणि त्या थोड्या कुटुन घ्याव्यात. बारीक पूड नाही करायची जाडे भरडेच (ओबडधोबड, अर्धेबोबडे) ठेवायचे आहे.
उरलेल्या तेलात मोहरी, आले, हिंग, तिखट घालून फोडणी करुन त्यात गवार घालून १ मिनिट परतून त्यात मंगोडी घालून परतावे, त्यात एक ग्लास पाणी घालून १० मिनिट उकळी काढावी. भाजून कुटलेले जिरे आणि धनेपूड घालावी.
पॅन गॅसवरुन बाजूला घेऊन त्यात दही हळद आणि बेसन यांचे फेटलेले मिश्रण घालून चांगले ढवळून पॅन पुन्हा गॅसवर ठेवावा.
मीठ साखर आमचूर पावडर घालावी. गरज वाटल्यास अजुन अर्धा ग्लास पाणी घालून मंद आचेवर अजुन १० ते १२ मिनिटे भाजी शिजू द्यावी.
कोथिंबीर घालून पोळी, भाकरी सोबत सर्व्ह करावी.

वाढणी/प्रमाण: 
आवडीनुसार
अधिक टिपा: 

तशी विशेष काही टीप नाही. तरीही

मुगवडी, सांडगे नसतील तर बेसन गोळे वापरुन करता येईल, किंवा अगदीच बेसन वैगरे नको असेल तर सोया चंक्स वापरुनही ट्राय करायला हरकत नाही.

माहितीचा स्रोत: 
आम्ही सारे खवय्ये कार्यक्रम (झी मराठी)
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा! छान आहे की पाकृ. शेअर केल्याबद्दल थेन्क्यु. ह्या भाज्यांच्या बाबतीत नवीन प्रयोग छान वाटतात.