हवाई बेटांवरच्या सुरस गोष्टी - १० : अंतिम भाग - नव्या जगाची चाहूल

Submitted by maitreyee on 8 August, 2016 - 00:50

भाग -१>>
भाग -२>>
भाग -३>>
भाग -४>>
भाग -५>>
भाग -६>>
भाग -७>>
भाग -८>>
भाग -९>>
भाग -१०>>

नव्या जगाची चाहूल

कॅप्टन कुक हा ब्रिटिश दर्यावर्दी होताच, पण नकाशे बनवण्याचं त्याचं कसबही वाखाणण्यासारखं होतं. पॅसिफिक मध्ये दक्षिणेला ताहिती, न्यूझीलंड पर्यन्त मोहिमा करून त्याने युरोपियनांसाठी समुद्री मार्ग आणि नकाशे बनवले.
cook3.jpg

त्याच्याकडे "डिस्कवरी" आणि "रिझोल्यूशन" ही शाही आरमारातली दोन आधुनिक आणि भलीमोठी जहाजं होती.
ताहितीवरून परत उत्तरेला जात असताना जनेवारी १७७८ मधे हवाई बेटांचे त्याला आणि त्याच्या खलाशांना दर्शन झाले. ही बेटं तोवर कोणत्याच नकाशात नव्हती. जगापासून लपलेलीच होती म्हणा.
या बेटांवर अन्नसाठी घेण्यासाठी आणि भविष्यातील वसाहतीची शक्यता बघण्यासाठी कुक ने जहाजे बंदरात वळवली.
तोवर बेटावरच्या रहिवाश्यांनी इतकी मोठी वेगवान जहाजं, लोखंडी वस्तू, शस्त्रे, तोफ, बंदुका वगैरे पाहिलेलेच नव्हते.
त्यात हे विचित्र कपडे घातलेले, गौरवर्णीय लोक नेमके लोनो च्या उत्सवादरम्यात येऊन पोहोचलेले! त्यांनी या लोकांना देवच मानले आणि त्यांचे जंगी स्वागत केले.
कामेहामेआ तेव्हा विशीतला नवतरूण होता. अलिइ कलानीओपुने आलेल्या "देवांना " काही कमी पडू नये याची काळजी घेतली. आपल्या लोकांकरवी त्याच्या बोटींवर अन्न, मांस, फळे पोहोचती केली.कामेहामेहाला त्याच्या दिमतीला दिले. कुकच्या माणसांनी मात्र स्थानिक लोकांना आवळा देऊन कोहळा काढण्याचा उद्योग आरंभला. साध्या लहान लोखंडी खिळ्यांच्या बदल्यात कापड,लाकूड, अन्न, सुंदर स्त्रिया, काय हवे ते त्या खलाश्यांना मिळत होते!
कामेहामेआ त्यांच्या शस्त्रास्त्रं, मोठ्या नावा हे बघून थक्क झाला तरी ते त्याला देव आहेत हे काही पटत नव्हते. मात्र या लोकांशी मैत्री करणे फायद्याचे आहे हे त्याने जाणले. कॅ. कुकबरोबर त्याने चांगली ओळख करून घेतली.
महिना दोन महिना पाहुणचार झोडून आणि पुरेसा अन्नसाठा करून घेऊन कुक ची जहाजे कॅनडा आणि अलास्काच्या मोहिमेवर निघाली.

एक वर्षानंतर कॅप्टन कुक पुन्हा हवाईला आला. उत्तरेकडून दक्षिण पॅसिफिक मधे जाताना अन्नसाठा , लाकूडफाटा भरायला त्याला ही बेटे सोयीची वाटली होती. आता पुन्हा आल्यावर हवाईयन लोकांना नाही म्हटले तरी जरा प्रश्न पडला, हे देव पुन्हा कसे आले? गेल्यावेळच्या अदरातिथ्याने संतुष्ट झाले नाहीत का? तरीही पुन्हा त्यांनी कुक आणि सहकार्‍यांचे स्वागत केले. पण तिथून निघताना यावेळी कुक च्या दुर्दैवाने त्यांची जहाजे वादळात सापडली आणि त्यांच्या दुरुस्तीकरता त्याला पुन्हा एकदा हवाईला परतावे लागले. यावेळी त्याच्या सहकार्‍यांपैकी एक जण आजारी होऊन हवाईला पोहोचताच मरण पावला. हवाईयन लोकांच्या दृष्टीने ही मोठी घटना होती! हे लोक दैवी पुरुष वगैरे काही नसून साधे मर्त्य मानव असल्याचा त्यांना साक्षात्कार झाला! हे कुक च्या दृष्टीने घातक ठरले.
आता स्थानिक आणि खलाश्यांमधे खटके उडू लागले. एकदा तर त्यांच्या जहाजावरची एक नाव स्थानिक लोकांनी पळवून नेली! कुक संतप्त झाला. त्याने कलानीओपुला चर्चेच्या निमित्ताने बोलावून घेऊन स्वतःच्या जहाजावर बंदी बनवण्याचा प्रयत्न केला! पर्यायाने त्याने कामेहामेहाशीच थेट वाकडे घेतले !!
कामेहामेआ लगोलग त्याचे सर्वात तयारीचे तरणे गडी घेऊन बोटीवर हल्ला करण्यासाठी आला. वास्तविक बोटीवर कुकच्या लोकांकडे आधुनिक शस्त्रे होती आणि कामेहामेआ आणि सहकार्‍यांकडे मागास शस्त्रे! पण कलानीओपु आणी कुक अजून बोटीवर पोहोचले नसल्याने कुक या लोकांच्या आयता तावडीत सापडला. कुकला घेरण्यात आलेले पहाताच बोटीवरून कोणीतरी बंदुकीची गोळी झाडली आणि एक स्थानिक त्यात जखमी झाला! परिस्थिती हाताबाहेर जाईल हे लक्षात येऊन कुक हात वर करून गोळ्या झाडू नका असे सांगायचा प्रयत्न करत असतानाच एका भाल्याने त्याचा वेध घेतला!
स्थानिक लोकांशी वाकड्यात शिरल्याने इतक्या मोठ्या दर्यावर्दी कॅ. कुकचा हवाईमध्ये हकनाक मृत्यू झाला.

cook.jpgcook2.jpg

कामेहामेआ आणि सहकारी कलानीओपु ला यशस्वीरित्या सोडवून घेऊन गेले.

कलानीओपु आता म्हातारा झाला होता. त्याने मरण्यापूर्वी त्याचे राज्य कामेहामेआ आणि आपला मुलगा किवालो यांच्यात वाटून दिले. पण कलानीओपुच्या मृत्यूनंतर दोघा भावांचे पटले नाही. किवालोला सगळे राज्य आपल्याला मिळावे असे वाटे, त्या वैमनस्यातून त्याने कामेहामेआविरुद्ध कारवाया, हल्ले करायला सुरुवात केली. शेवटी एका निर्णायक लढाईत कामेहामेआकडून तो मारला गेला. अर्थातच आता कामेहामेआ सर्व राज्याचा राजा बनला. त्याने आजू बाजूच्या अलिइंना एकत्र आणायचा प्रयत्न केला. लढून किंवा सामोपचाराने, कधी एखाद्या अलिइच्या मुलीशी लग्न करण्याचे मान्य करून या काळात मोठ्या प्रमाणावर राज्यविस्तार केला. सर्व हवाई बेटे एकछत्री अंमलाखाली आणण्याचे त्याचे स्वप्न होते. छोट्या छोट्या अलिइंनी सतत एकमेकासोबत लढाया करून हकनाक माणसे मारण्यापेक्षा एक राजा, एक कायदा स्वीकारून शांततेने दीर्घकाळ जगावे असे त्याचे मत होते.

कॅ. कुकच्या प्रकरणातून त्याने एक धडा घेतला होता तो म्हणजे आपल्या बेटांच्या बाहेर मोठे जग आहे आणि ते आपल्यापेक्षा बरेच जास्त प्रगत आहे. कॅ. कुकच्या पाठोपाठ बाकीचे जगही मागोमाग आपल्याला शोधत येणार हे त्याने जाणले. हवाईच्या मागासलेल्या जगात राहिला असला तरी कामेहामेआ बुद्धीमान होता आणि त्याच्याकडे दूरदृष्टीही होती. त्याने आपल्या बेटाचे महत्त्व ओळखले. त्याने त्याचा व्यापारी उपयोग करण्याचे ठरवले. येणार्‍या जहाजांना अन्नसाठा आणी इतर सुविधा देण्याच्या मोबदल्यात घसघशीत महसूल घेणे सुरु केले. तसेच बेटावरील मौल्यवान चंदनाची लाकडे वगैरे वस्तूंच्या बदल्यात मोठ्या प्रमाणावर बोटी, शस्त्रास्त्रे यांची खरेदी केली. काही व्यापारी , दर्यावर्दी यांच्याशी त्याचे मैत्रीचे संबंध निर्माण झाले. त्यांच्या आणि नव्या शस्त्रास्त्रांच्या मदतीने त्याने हवाईची इतर बेटेही हळूहळू जिंकून घेतली.

शक्य तिथे कामेहामेआने विरोधी अलिइंशी सामोपचाराने बोलणी करून युद्धे टाळण्याचा प्रयत्न केला. त्या बेटांवरील त्या काळच्या रानटी हिंसक प्रथांच्या पार्श्वभूमीवर आणि कोणतेही युद्ध जिंकण्याइतके प्रचंड संहारक सामर्थ्य अंगी असूनही हा शांतीचा मार्ग वापरणार्‍या कामेहामेआला त्यामुळेच एक सहृदय राज्यकर्ता मानले जाते.
kamahameha1.jpg

सन १८१० मधे कामेहामेआ हवाईचा सार्वभौम राजा बनला.
त्याने हवाईची जुनी कापु पद्धत पुढे चालू ठेवली तरी त्यात काळानुसार बदलही केले. त्याचे एक उदाहरण म्हणजे "मामालाहो कानावाई" म्हणजे "तुटलेल्या वल्ह्याचा कायदा " .
एका लढाईत कामेहामेआचा पाय दोन खडकांच्या फटीत अडकल्यामुळे त्याला हलता येईना. विरुद्ध टोळीतल्या एकाने संधी साधून एक लाकडी वल्हे त्याच्या डोक्यात हाणले, इतक्या जोरात की ते तुटले! आता पुन्हा तो वार करणार इतक्यात त्या विरोधी टोळीच्याच दुसर्‍या माणसाने पहिल्याला म्हटले, "जाऊ दे सोड त्याला, त्याला प्रतिकार पण करता येत नसताना मारण्यात काय पुरुषार्थ!" ते ऐकून कामेहामेआ भारावला. त्याचा जीव वाचलाच पण या प्रसंगानंतर त्याने हा "तुटलेल्या वल्ह्याचा " कायदाच केला. ज्यायोगे जखमी, स्त्रिया, वृद्ध , निरपराध प्रवासी किंवा एकूणच ज्याला स्वसंरक्षण करता येत नाही त्याला संरक्षण दिले जावे.
तेव्हाच्या कापुपायी केवळ अलिइवर आपली सावली पडली म्हणून जीव गमवावा लागणार्‍या सामान्यांसाठी हा मोठा दिलासा होता!

प्रथमच हवाईला एक पराक्रमी पण सहृदय असा राजा मिळाला, ज्याने आपल्या भूमीचे आणि सामान्य हवाईयन लोकांचे हित पाहिले.
कामेहामेआने आपल्या राज्य उभारणीच्या काळात युरोपियन आणि अमेरिकन प्रवाश्यांचे सहाय्य घेतले. त्यांच्याकडून आधुनिक युद्धकलेची माहिती घेतली. पण स्वतः जिवंत असेपर्यंत त्यांना वरचढ होऊ दिले नाही. बंदरात थांबण्याच्या प्रत्येक दिवसाचा त्यांच्याकडून मजबूत महसूल वसूल करून एक प्रकारे हवाईचे नियंत्रण कोणाच्या ताब्यात आहे याचा धडाही दिला.
kamehameha2.jpg
(शेवटच्या काळातले एक चित्र)

कामेहामेआने शेवटी आजारी पडल्यावरसुद्धा इतरांचे हित पाहिले. त्याने त्याच्या वारसांना सांगून ठेवले - नेहमी राजाच्या मृत्यूनंतर केला जाणारा नरबळीचा विधी मी मेल्यानंतर करू नका!
सन १८१९ मधे कामेहामेआचा मृत्यू झाला.

**********************************************

हवाईचे खर्‍या अर्थाने आधुनिक जगात विलिनीकरण

कामेहामेकाच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नीन आणि वारसांनी काही वर्षे राज्यकारभार केला. कामेहामेआ तिसरा याच्या कारकीर्दीत हवाईमधे अमेरिकन सहकार्याने मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड करण्यात आली. उसाच्या नकदी पिकातून येणार्‍या पैशाने हवाईचे अर्थव्यवस्था आणि जीवनच बदलून गेले! त्याचबरोबर अमेरिकेतून मोठे मोठे बागायतदार या ऊस व्यापारात सहभाग घेऊ लागले. त्यांच्या पैशाच्या प्रभावाने त्यांनी इथल्या राज्यकारभारातही हळूहळू लक्ष घालायला सुरुवात केली. आपल्या हिताचे कायदे आणि नियम करण्यासाठी त्यांनी राजावर दबाव आणला. या बागायतदारांनी १८४०-१८५० दरम्यान इथे मोठ्या प्रमाणावर जमिनी आपल्या मालकीच्या करून घेतल्या.
हळूहळू त्यांच्यामागून अमेरिकी मिशनरी आणि धर्मप्रसारकांचेही इथे आगमन झाले. त्यांनीही बर्‍याच जमीनींवर कब्जा केला. जागोजगी चर्चेस उभी राहिली.

ही फक्त सुरुवात होती. हवाई बेटांचे भौगोलिक स्थान बघता अमेरिकेचा लष्करीतळाच्या दृष्टीने या बेटांवर डोळा होताच.
हवाईचे सगळेच राज्यकर्ते तेवढे हुषार नव्हते म्हणा किंवा हे होणे अपरिहार्य होते असेही म्हणता येईल... पण परिणामी अमेरिकेने पद्धतशीररित्या या बेटांचा ताबा घेतला आणि १९५९ मधे अधिकृतरित्या हवाई हे अमेरिकेचे ५०वे राज्य बनले.

***********************************************

आता हवाई ही पूर्वीसारखी मागास बेटे नाहीत. आता हा जगभरातील पर्यटकांचा स्वर्ग आहे. इथे सर्व तर्हेच्या सुखसोयी , मोठमोठ्या सुपरमार्केट चेन्स, मॉल्स, जगभरातील उपाहारगृहे , विविध प्रकारच्या जलक्रिडेच्या सोयी आहेत.
इथला मुख्य व्यवसाय आता पर्यटन हाच आहे. जगभरातून असंख्य प्रकारचे लोक आता इथले रहिवासी झालेत.
५०% हून जास्त लोकांनी ख्रिस्ती धर्म स्विकारला अहे, काही ज्यू, जेहोवाज विटनेस, बौद्ध , मुस्लीम देखिल लक्षणीय आहेत.
काही अल्प प्रमाणावर लोक अजूनही पारंपारिक निसर्गपूजा करतात अशी नोंद आहे. पण जनगणनेत धर्म या रकान्यात "इतर" असा पर्याय लिहिण्याइतके ते नगण्य आहेत म्हणे!
माझ्या लहानश्या मुक्कामात माझी काही कुणा स्थानिक हवाईयन माणसांशी ओळख झाली नाही त्यामुळे त्यांना त्यांच्या इतिहासाबद्दल, संस्कृतीबद्दल आणि आताच्या अमेरिकीकरणाबद्दल काय वाटते हे मला खरोखर माहित नाही . जगाच्या मागे पडलेल्या एका भूमीची अशी भरभराट होणे हे अपरिहार्य आणि त्यांच्या प्रगतीच्या दृष्टीने उत्तम आहेच, पण त्यात कुठेतरी त्यांनी त्यांची मूळ ओळख हरवली याची हळहळ वाटते खरी!

--समाप्त.

संदर्भः
https://www.nps.gov/puhe/learn/historyculture/kamehameha.htm
http://www.hawaiihistory.org/index.cfm?fuseaction=ig.page&PageID=398
http://www.hawaiihistory.org/index.cfm?fuseaction=ig.page&PageID=266
http://www.biography.com/people/james-cook-21210409

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त झाली ही मालिका.

एका जगाच्यामागे पडलेल्या भूमीची अशी भरभराट होणे हे अपरिहार्य आणि त्यांच्या प्रगतीच्या दृष्तीने उत्तम आहेच, पण त्यात कुठेतरी त्यांनी त्यांची मूळ ओळख हरवली असं वाटून हळहळ वाटते खरी! >>> हे बहुतेक सर्वच जगात घडले आहे.

त्यांच्या मूळ धर्माचे काही नाव आहे का?

ओह!
इतक्या लवकर समाप्त का झाली?

खूपच छान रंगली होती ही मालिका.
आणि सगळ्या दंतकथांच्या यादीत ही खरीखुरी कथा मात्र 'मानाचा शीरपेच' ठरलीय.

या मालिकेबद्दल आणि हवाई बेटांच्या इतक्या सुंदर ओळखीबद्दल धन्यवाद मैत्रेयी!

शेवटच्या दोन भागात बराच मोठा इतिहास आणि स्थित्यंतरे कव्हर केल्यामुळे हे दोन भाग जरा लांबलचक वाटू शकतील. पण कॅ. कुक आणि कामेहामेआ द ग्रेट आणि हवाईमध्ये झालेले जलद बदल हे लिहायचेच होते. पुरेश्या वाचनाअभावी बरेच बारकावे माझ्याकडून सुटलेही असू शकतात.
बाकी मी ज्या स्थळांना भेटी दिल्या त्यांच्याशी निगडित कथा मी लिहिल्या आहेत. अजून शोधल्या तर अजून खूप हवाईयन दंतकथा वाचायला मिळतील नेटवर.
संपूर्ण मालिकेला दिलेल्या प्रतिसादांबद्दल सर्वांना अनेक धन्यवाद!

मस्त! आधीच्या कथांमुळे एक वेगळे विश्व डोळ्यासमोर उभे राहिले होते, ह्या कथेमुळे एकदम वास्तवात आल्यासारखे वाटले. लेखमालेचा फ्लो मस्त होता Happy

खूप मस्त झाली हि मालिका. हि मालिका इथे लिहिली गेली नसती तर मी हवाई बेटांचा हा इतिहास कधीही मुद्दामून वाचला नसता. मुळात असा इतिहास आहे हे माहित नव्हते. खूप गम्मत आली सगळ्या गोष्टी वाचताना. कधी कधी वाटले की हे सगळे खरेही असेल. अगदी 100 टक्के नसेलही पण मूळ गोष्ट साधी सरळ असेल आणि त्यावर परिकथेचा रम्य मुलामा चढत गेला असेल. ती बहिणींची गोष्ट तर मला पूर्णतया खरी वाटते.

हा शेवटचा भाग सगळ्यात सगळ्यात सुंदर. आजच्या जगात घेऊन येतो पण अगदी अलगत आणि फॅक्चुअल. गतकाळाच्या आठवणी आणि आजचं वास्तव कशातच न गुंतता ऑब्झ्र्वर्रच्या नजरेने लिहिल्याने फारच भावला.
मजा आली सगळी सिरीज वाचायला.
धन्यवाद. Happy

खूपच छान मालिका! काही गोष्टी तर इतक्या गोड होत्या! आणि शेवट तर खूपच मस्त!

मैत्रेयी, हे तू लिहिलं नसतंस तर मुद्दाम माहिती काढायचा खटाटोप केला नसता. उत्सुकतेने वाचलं सगळं. लहानपणी परिकथा फारशा नाही वाचल्या, पण आता या परिकथा वाचताना खूप गुंतून, हरवून जायला झालं होतं अनेकदा.
त्यामुळे नुसती माहिती नव्हे, मला हे असं हरवून जायची गंमतही कळली. खूप मनापासून धन्यवाद! Happy

मैत्रेयी,
अतिशय सुरस आणि रम्य लेखमाला...
या मालिकेबद्दल आणि हवाई बेटांच्या इतक्या सुंदर ओळखीबद्दल धन्यवाद !!!!

खूपच छान झाली आहे मालिका
मुद्दामहून हवाई चा इतिहास जाणून नसता घेतला

प्रतिसाद खूप नन्तर देतो आहे त्याबद्दल क्षमस्व

आज ही लेखमाला पुन्हा वाचली. अप्रतिम!!!!
अशीच माओरी लोकांविषयी एखादी मालिका आली तर सोने पे सुहागा!!

मस्त लेखमाला आहे.

रगतीच्या दृष्टीने उत्तम आहेच, पण त्यात कुठेतरी त्यांनी त्यांची मूळ ओळख हरवली याची हळहळ वाटते खरी!>>>> +१.