समानता

Submitted by अतरंगी on 4 August, 2016 - 01:54

We do not discriminate any individual on the basis of nationality, language, religion, race , creed, gender, sexual orientation, ethnic origin etc.

एका प्रतिथयश कंपनीच्या वेबसाईट वरील वाक्य... वाचायला अगदी छान वाटलं. पण जरा विचार केला तर वाटतं की हे एका समूहापुरते प्रत्यक्षात आणणे कदाचित शक्य होईल, पण संपूर्ण मानवजातीसाठी हे कधीतरी शक्य होऊ शकेल का?

मला तर कायम वाटतं की आपण समानतेच्या निव्वळ गप्पा मारतो. समाजात संपूर्ण समानता असू शकतच नाही. या ना त्या प्रकारे सामान्य माणूस कायम असमानता पाळत आलेला आहे आणि आजही पाळतो आहे. एक ५ ते १० टक्के (काही थोर सामाजिक कार्यकर्ते आणि पापभिरू सामान्य लोक) सोडले तर समाजात प्रत्येक जण एका किंवा अनेक प्रकारे दुसऱ्याशी भेदभाव करतोच.

जात, धर्म, वंश, लिंग, सत्ता (पद), सांपत्तिक स्थिती, नागरिकत्व, जेष्ठत्व एक ना अनेक प्रकार ज्या द्वारे असमानता पाळली जाते. सगळीकडे दिसते, कित्येकदा खुपते. लोकांना यातल्या एखाद्या किंवा अनेक गोष्टीचा अभिमान, गर्व  असतो तो कित्येकवेळा ते प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे दाखवतात सुद्धा....

समाजाविषयी बोलताना मी स्वतः तरी पूर्णपणे निरपेक्ष आहे का ? नक्कीच नाही. जसं जसं वाचनाने (यात मायबोलीवरील जात, धर्म, स्त्री पुरुष समानता विषयक बीबी पण आहेत) थोडी फार समज येत गेली तसं तसं मी माझ्याकडून होणारे भेदभाव कमी करत गेलो पण आजही माणूस म्हणून मी पूर्णपणे समोरच्याशी कोणताही भेदभाव न करता वागू शकतो का? माझ्या डोक्यातून सगळे न्यूनगंड, अहंगंड पूर्ण पणे गेले आहेत का ? काही काही भेदभाव तर इतके सवयीचे झाले आहेत कि तो भेदभाव आहे हे पण कोणीतरी जाणीव करून दिल्याशिवाय लक्षात येत नाही. कधी कधी लक्षात आले तरी ते तसेच रेटतो कारण ते माझ्या फायद्याचे असतात! 

मला पण कित्येकदा या ना त्या प्रकारे भेदभाव सहन करावा लागतोच. त्यावेळेस मात्र मी आधी मनात cost-benefit analysis करून पाहतो आणि मग ठरवतो कि या विषयी बोलावे कि नाही.

राग, लोभ, द्वेष, मोह, माया, ईर्ष्या, स्वार्थ या सर्वांचा परिपाक म्हणजे असमानता आणि भेदभाव. पण हे सगळे मनुष्याचे स्थायीभाव आहेत जे कधीही नष्ट होणारच नाहीत.

असमानता, त्यामुळे होणारे अन्याय, डालवले जाणारे हक्क कदाचित आपण कधीच नष्ट करू शकणार नाही पण त्याची दाहकता कमी नक्कीच करू शकतो.

स्वपरिक्षण करून कोण कोणते भेदभाव प्रत्यक्ष/ अप्रत्यक्ष आपण पाळतो? आपल्या आजूबाजूला सहजतेने दिसणारे आणि केले जाणारे भेदभाव कमी कसे करता येतील? आपल्यासोबत झालेले/ होणारे भेदभाव, ते भेदभाव न स्विकारता भांडून मिळवलेले हक्क याविषयी उघडपणे इतरांशी बोलायला हवे.

यातून लोकांना निदान इतरांना काय खुपते ते तरी कळेल कदाचित एखाद दुसऱ्या कोणाला तरी आपल्याकडून/ आपल्यासमोर होणारा भेदभाव कळून तो कदाचित सुधारता येईल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फक्त जेवणाबद्दल लिहायचे तर, आमच्या पण कंपनीचे भलेमोठे कँटीन आहे. भरपुर बाकडे टाकली आहेत. जेवायला ६-७ स्टाल्सवर अन्न विकतात, स्वस्त असते. ज्यांना जे हवे ते घेतात व पैसे देतात. तसे केले तर समान/असमान प्रश्नच येत नाही. कोणीही हवे ते घ्या, पैसे द्या व कुठेही कोणाही बरोबर बसुन खा.

Pages