समानता

Submitted by अतरंगी on 4 August, 2016 - 01:54

We do not discriminate any individual on the basis of nationality, language, religion, race , creed, gender, sexual orientation, ethnic origin etc.

एका प्रतिथयश कंपनीच्या वेबसाईट वरील वाक्य... वाचायला अगदी छान वाटलं. पण जरा विचार केला तर वाटतं की हे एका समूहापुरते प्रत्यक्षात आणणे कदाचित शक्य होईल, पण संपूर्ण मानवजातीसाठी हे कधीतरी शक्य होऊ शकेल का?

मला तर कायम वाटतं की आपण समानतेच्या निव्वळ गप्पा मारतो. समाजात संपूर्ण समानता असू शकतच नाही. या ना त्या प्रकारे सामान्य माणूस कायम असमानता पाळत आलेला आहे आणि आजही पाळतो आहे. एक ५ ते १० टक्के (काही थोर सामाजिक कार्यकर्ते आणि पापभिरू सामान्य लोक) सोडले तर समाजात प्रत्येक जण एका किंवा अनेक प्रकारे दुसऱ्याशी भेदभाव करतोच.

जात, धर्म, वंश, लिंग, सत्ता (पद), सांपत्तिक स्थिती, नागरिकत्व, जेष्ठत्व एक ना अनेक प्रकार ज्या द्वारे असमानता पाळली जाते. सगळीकडे दिसते, कित्येकदा खुपते. लोकांना यातल्या एखाद्या किंवा अनेक गोष्टीचा अभिमान, गर्व  असतो तो कित्येकवेळा ते प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे दाखवतात सुद्धा....

समाजाविषयी बोलताना मी स्वतः तरी पूर्णपणे निरपेक्ष आहे का ? नक्कीच नाही. जसं जसं वाचनाने (यात मायबोलीवरील जात, धर्म, स्त्री पुरुष समानता विषयक बीबी पण आहेत) थोडी फार समज येत गेली तसं तसं मी माझ्याकडून होणारे भेदभाव कमी करत गेलो पण आजही माणूस म्हणून मी पूर्णपणे समोरच्याशी कोणताही भेदभाव न करता वागू शकतो का? माझ्या डोक्यातून सगळे न्यूनगंड, अहंगंड पूर्ण पणे गेले आहेत का ? काही काही भेदभाव तर इतके सवयीचे झाले आहेत कि तो भेदभाव आहे हे पण कोणीतरी जाणीव करून दिल्याशिवाय लक्षात येत नाही. कधी कधी लक्षात आले तरी ते तसेच रेटतो कारण ते माझ्या फायद्याचे असतात! 

मला पण कित्येकदा या ना त्या प्रकारे भेदभाव सहन करावा लागतोच. त्यावेळेस मात्र मी आधी मनात cost-benefit analysis करून पाहतो आणि मग ठरवतो कि या विषयी बोलावे कि नाही.

राग, लोभ, द्वेष, मोह, माया, ईर्ष्या, स्वार्थ या सर्वांचा परिपाक म्हणजे असमानता आणि भेदभाव. पण हे सगळे मनुष्याचे स्थायीभाव आहेत जे कधीही नष्ट होणारच नाहीत.

असमानता, त्यामुळे होणारे अन्याय, डालवले जाणारे हक्क कदाचित आपण कधीच नष्ट करू शकणार नाही पण त्याची दाहकता कमी नक्कीच करू शकतो.

स्वपरिक्षण करून कोण कोणते भेदभाव प्रत्यक्ष/ अप्रत्यक्ष आपण पाळतो? आपल्या आजूबाजूला सहजतेने दिसणारे आणि केले जाणारे भेदभाव कमी कसे करता येतील? आपल्यासोबत झालेले/ होणारे भेदभाव, ते भेदभाव न स्विकारता भांडून मिळवलेले हक्क याविषयी उघडपणे इतरांशी बोलायला हवे.

यातून लोकांना निदान इतरांना काय खुपते ते तरी कळेल कदाचित एखाद दुसऱ्या कोणाला तरी आपल्याकडून/ आपल्यासमोर होणारा भेदभाव कळून तो कदाचित सुधारता येईल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऋन्मेष, तुम्ही तुमच्या बॉस, ऑफिस बॉयशी वागण्याच्या पद्धतीचे उदाहरण देऊन जे सांगितलेय, तेच मला म्हणायचेय. we are on the same page. तुम्ही ते छान मांडलंय.

काही काम खालची मानली जातात आणि ती करणार्‍यांना तुच्छतेची/ असमानतेची वागणुक मिळते, हे खरे आहे.
काही उघडपणे करतात तर काही त्या लोकांची नोंद न घेता.
नोंद न घेणे, ते या बद्दलच मला म्हणायचे होते.
जसे की ऑफिसात येत असताना, मध्ये इतर ज्युनियर सिनियर समोर येईल त्यांना विश केले जाते, पण समोरुन सफाई कामगार येत असेल तर त्याच्या कडे बघुन न बघितल्यासारखे करणे.

आणि कित्येक ठिकाणी तर उघडपणे तुच्छतेची वागणुक मिळते, खास करुन लेबर कॉन्ट्रक्टर कडुन आलेल्या कामगारांना.

अनेक ठिकाणी वेटर्सना तुच्छतेने वागवल्याचे सर्रास दिसून येते.

मानव बरेच लोक असं वागतात. आपल्याकडे भारतात हे सर्रास होतं.समोरून येणारी व्यक्ती कोण आहे यावर अभिवादन करायचे कि नाही हे ठरवणे हा वागणुकीतला भेदभाव आहे खरं.

बाकी मुद्दे नुसताच वकिली आवेशाने मांडलेले असल्याने त्याला पास.
>>>
हो, मला वकीली आवेशात चर्चा करायला आवडते. मी वादविवादप्रिय माणूस आहे. कोणते मुद्दे पास करायचे किंवा कोणत्या मुद्द्याला प्रतिवाद करायचा हा अधिकार तुम्हाला आहेच. पण वकीली आवेश हा वाईट प्रकार नसतो हो. चांगली माणसे असतात ती सुद्धा Happy

समानता म्हणजे निव्वळ प्रत्येकाला एका छताखाली बसवणे नाही. तर प्रत्येकाला त्याच्या कम्फर्ट झोनमध्ये वागवणे हे जास्त महत्वाचे आहे. जर तुम्ही एखाद्या उच्चपदस्थ ऑफिसरला आणि त्याच्या हाताखालच्या ज्युनिअर कर्मचार्‍याला एकाच टेबलवर एकच पदार्थ खाऊ घातला तर बॉस कदाचित मनात कसलेही किल्मिष न ठेवता मिटक्या मारत खाईनही. पण तो वर्कर मात्र संकोचाने अर्धपोटी राहू शकतो, किंवा खाल्ले तरी कसल्याश्या दडपणामुळे त्याच्यासाठी ते प्रसन्न वातावरणातले भोजन नसेल.
म्हणजे तुम्हाला अश्या समान फॅसिलिटी देण्याच्या आधीही कंपनीत असे वातावरण आणावे लागेल की कोणी कोणाला बॉस समजणार नाही कि कोणी कोणाला ज्युनिअर समजणार नाही. आणि हे देखील अर्थातच उत्पादकतेवर परीणाम न होता जमवावे लागेल. अन्यथा या समान फॅसिलिटीला काही अर्थच उरणार नाही, त्या सर्वांनाच त्रासदायक ठरतील.

अजून एक म्हणजे समजा कंपनी सर्वांना समान सोयीसुविधा देत आहे. समान अन्न देत आहे. ज्याची ग्रेड किंबहुना पगार कमी आहे त्यालाही उच्चपदस्थांसारखी रॉयल ट्रीटमेंट देत आहे. तर कदाचित त्याच्या मनात येऊ शकते की मला याची गरज नाही, त्यापेक्षा साधीशीच वागणूक द्या आणि बदल्यात माझा पगार वाढवा. अर्थात तो हे कधी बोलून दाखवणार नाही कारण तशी इच्छा धरताच जे मिळतेय ते देखील बंद होईल आणि पगारही काही वाढणार नाही ही भिती.

उदाहरणार्थ, समजा मी पिझ्झाहट मधून मस्त रुपये ३५० चा पिझ्झा घेतला आणि रस्त्याने खात खात जाऊ लागलो. मध्ये मला रस्त्यात एक भिकारी दिसला. माझ्या मनात आले, यालाही आपल्यासारखेच समान खाता यायला हवे. मी त्यालाही एक ३५० रुपयांचा पिझ्झा घेऊन दिला तर तो भिकारी नक्कीच आनंदीत होईल.
पण जर मी त्याला पर्याय दिला, तुला ३५० रुपयांचा पिझ्झा देऊ की १००-१०० रुपयांच्या तीन पावभाजी घेऊन देऊ, तर तो नक्कीच दुसरा पर्याय निवडेल, ज्यात त्याचे संपुर्ण कुटुंब जेवू शकेन. माझे पन्नास रुपये सुद्धा वाचतील ती गोष्ट वेगळी. हा, आता जरा असमानता जोपासल्याचा बदनामीचा शिक्का माथ्यावर पडेल, पण ते ठिक आहे Wink

मॉरल ऑफ द मुद्दा - समानता म्हणजे सर्वांनाच सारखे असे नसून ज्याची जी गरज त्याला ते मिळतेय का बघणे हे जास्त महत्वाचे नाही का..

मुद्दे नुसताच वकिली आवेशाने मांडलेले असल्याने त्याला पास.
>>>
हो, मला वकीली आवेशात चर्चा करायला आवडते. मी वादविवादप्रिय माणूस आहे. कोणते मुद्दे पास करायचे किंवा कोणत्या मुद्द्याला प्रतिवाद करायचा हा अधिकार तुम्हाला आहेच. पण वकीली आवेश हा वाईट प्रकार नसतो हो. चांगली माणसे असतात ती सुद्धा स्मित>>>

वाक्य कोणत्या अर्थाने लिहिले आहे ते आधी समजून घ्यावे. समजत नसेल तर विचारावे. दोन्ही करता येत नसेल तर उगाच कीबोर्ड दिला आहे म्हणून भलताच अर्थ काढून भलतेच काहीही टाईप करू नये.

ओके Happy

बाकी मुद्दे मांडलेस ते नुसता जर तर या भाषेत आहे. असे कधीही झाले नाही. कोणत्याही कंपनीत चांगलं जेवण मिळालं म्हणून वर्कर खाताना संकोचून अर्धपोटी राहत नाहीत. किंवा आम्हाला जेवण कमी प्रतीचे देऊन ते पैसे पगारात वाढावा असे म्हणत नाहीत.

समानता म्हणजे सर्वांनाच सारखे असे नसून ज्याची जी गरज त्याला ते मिळतेय का बघणे हे जास्त महत्वाचे नाही का..>>>>
हे वाक्य या संदर्भात बरोबर नसले तरी महत्वाचे आहे.
बाकी उद्या सविस्तर बोलू.

कंपनीने, सगळ्यांना, सो कॉल्ड महागडे जेवण द्यावे टू थ्री कोर्स वगैरे असे कुणाचे म्हणणे असेल तर, तुझा मुद्दा १००% योग्य आहे ऋन्मेष.

पण असमानता जी दिसून येते तिथे सर्व ठिकाणी वरील प्रश्न नसतात. कामगारांच्या व्यवस्था खरंच कनिष्ठ प्रतीच्या असतात, जेवण सुद्धा. त्यांच्या शारिरीक श्रमानुसार त्यांना आहार दिला जातो, हे खरे नाही.
रोजच्या स्पेशल लंचचा पण कंटाळा येतो. आज साधे जेवण हवे, चला कामगारांच्या कँटिनमध्ये जेवण घेउ असे एखाद्या सिनियरला वाटायला हवे. निदान तेवढी तरी त्या कँटिनची क्वालिटी असावी ना.

कामगारांच्या कॅंटिनमध्ये जाऊन जेवण्याची मनेजमेंटची तयारी असावी, तेवढी त्याची क्वालिटी असावी.

सगळ्यांना एक कॅंटिन, एक आहार (यात बेसीक क्वालिटी अपेक्षीत आहे) अशा मुद्याचे मी समर्थन करतोय ते यासाठी.

कोणत्याही कंपनीत चांगलं जेवण मिळालं म्हणून वर्कर खाताना संकोचून अर्धपोटी राहत नाहीत.
>>
अंह, थोडी सुधारणा. चांगलं जेवण म्हणून नाही, तर बॉसबरोबर जेवायला बसवल्यास.
तसेच गरजेच्या नसलेल्या रॉयल फॅसिलिटी न देता ते पैसे पगारात वाढवा असे वर्कर का म्हणणार नाहीत याचे कारणही दिले आहे. तेलही गेले अन तूपही गेले ही भिती.
बरेचदा कंपनी समानता वगैरे लफड्यात न पडता आपल्या कंपनीचे रेप्युटेशन म्हणून बरंच काही करत असते, त्यांच्या पॉलिसीसुद्धा त्यानुसारच बनत असतात.

किंवा आम्हाला जेवण कमी प्रतीचे देऊन >>> इथे गैरसमज नसावा. कमी प्रतीचे असे मला कुठेही म्हणायचे नाहीये. किंबहुना कोणतीही कंपनी जेलसारखे दालरोटी देणारच नाही, किंबहुना त्यापेक्षा काहीच देणार नाही. शेवटी त्यांनाही रेप्युटेशन जपायचे असतेच. मी फक्त स्पेशल ट्रीटमेंटबद्दल म्हटले आहे.

अर्थात, तरीही कुठे जेवण निकृष्ट दर्जाचे असेल, एखाद्या कामगार गटाला हलके लेखण्याच्याच हेतूने असेल, सुट्ट्यांचे वा शिस्तीचे नियम ठराविक गटालाच जाचक असतील, कुठल्याही प्रकारचे पार्शिअल वागणे असेल, तर त्याला विरोध आहेच. किंबहुना माझ्या अल्पश्या कारकिर्दीत, अगदी शाळा कॉलेजातही जिथे जिथे मला हे आढळले तिथे विरोध केलाच, नव्हे त्यासाठी मी प्रसिद्ध आहे Happy

@ मानव, हो नक्कीच Happy

महिंद्रामध्ये तर रोजच नॉनव्हेज असायचे, नंतर बंद झाले. आता बीअर आणि नॉनव्हेज असा आहार घेणारे व्हीपी बसलेले असले, त्यांच्याबरोबर एखादा कस्टमर असला आणि तिथेच येऊन वर्कर्सही बसले आणि बीअर मागू लागले तर काय होईल?

उदाहरण घ्यायचे झाले तर वरिल घेउ शकतो.
खरंच काय होईल?
वर्कर लोक बिअर पिली की आउट होतात, गोंधळ घालतात, तीच बिअर ऑफिसर्सनी पिली की ते व्यवस्थीत वागतात असा पूर्वग्रह इथे मला जाणवतो.
अमुक काम करणारी व्यक्ती अमुक तर्‍हेनेच वागेल हा विचार असमानताच रुजवतो ना?

>>>पूर्वग्रह <<<

खरे तर माझ्या विधानाचे स्पष्टीकरणही मी दिलेले आहे की सांस्कृतीक पार्श्वभूमी वेगवेगळी असते.

समजा लहानपणापासून असे बघण्यात असले की वडील आईला मारतात, शिव्या देतात, आजूबाजूचे कोणी पिऊन आले की ते एकदम उद्दामपणे वागते, शिवीगाळ करते, तर संस्कार तसे होणार ना? ह्यात कोणाचा (आणि मुख्य म्हणजे कोणत्याही जातीचा वगैरे) अजिबात दोष नाहीच, पण सभोवतालाचा प्रभाव पडतोच ना? हेच अगदी वरिष्ठांनी पाहिलेले असेल तर तेही तसेच वागतील, पण ती शक्यता बरीच कमी असते. सांस्कृतीक पार्श्वभूमी अधिक चांगली असल्यामुळे मग शिक्षणही अधिक घेतले जाऊ शकते व नोकर्‍याही अधिक वरच्या पदावरच्या मिळतात. जे आहे ते नाकारून कसे चालेल?

अनेक कारखान्यांमध्ये एक्स्प्लोझिव्ह वातावरण असू शकते काही वेळा! मॅनेजमेन्टशी भांडण उकरून काढायला काही वर्कर्स उतावीळ असू शकतात. ऋन्मेष म्हणतात तेच म्हणतो की ह्यात कोणत्याही पदावरील व्यक्तीचा काहीही अपमान वगैरे नाही, पण अश्या सिच्युएशन्स अ‍ॅव्हॉईड व्हाव्यात, इतकेच काय, तर एरवीसुद्धा वरिष्ठ व कनिष्ठ ह्यांना मिळणार्‍या सेवासुविधांमध्ये क्लीअर डिमार्केशन असावे हे सुरक्षितता, व्यावसायिक कारणे वगैरे दृष्टींनी आवश्यक असते.

बेफिकीरजी
कदाचित तुमचे उदाहरण चुकले, अथवा माझा त्याचा लावलेला अर्थ चुकला असे आपण मानु शकतो.
हेतु बद्दल शंका नसावी.

पण इतर देशात - इथे युरोपात मला म्हणायचे आहे - मात्र असे घडु शकते. त्याच कँटिन मध्ये, मॅनेजमेंट किंवा वर्कर कोणी सुद्धा बिअर मागवु शकते, सोबत कस्टमर्सपण असु शकतात. महत्वाचे असतील तर त्याच कँटिन मध्ये ते लोक एक टेबल बुक करु शकतात.

जर तिथे होऊ शकते तर इथे का नाही?

हा संस्कृतीचा फरक आहे, तर आपण अशी विषमता कशी सोडवायची?
संस्कृतीत चांगला बदल कसा आणायचा, जेणे करुन आपण अधिक समानतेकडे वळु?

अंतर राखणे ही तात्पुरती सोय असु शकते.
ही दरी तोडण्यास पुढे काय करावे?

>>>हा संस्कृतीचा फरक आहे, तर आपण अशी विषमता कशी सोडवायची?
संस्कृतीत चांगला बदल कसा आणायचा, जेणे करुन आपण अधिक समानतेकडे वळु?<<<

म्हणूनच बाणखेलेंच्या लेखाचे उदाहरण दिले होते. सर्वांना (इर्रिस्पेक्टिव्ह ऑफ लोकेशन, फायनान्शिअल स्टेटस वगैरे) समानच दर्जाचे शिक्षण मिळावे हे!

संस्कार मात्र पालकांची स्वतंत्र जबाबदारी आहे. मारहाण, शिवीगाळ, कौटुंबिक हिंसा, अश्या गोष्टी टाळणे वगैरे! ही फक्त काही लगेच आठवलेली उदाहरणे आहेत, ह्याशिवाय अनंत गोष्टी असतील.

हो, पण काम करणारा कामगार हा पालक झालेला असतो.
त्यालाच आपण त्याच्या पूर्व संस्कृतीमुळे दुजाभाव दाखवला तर तो त्याच्या पाल्यांना समानता कशी शिकवणार?

आपण आपल्या मुलांना चांगले शिकवण्यासाठी जगाकडून आपल्याला उत्तम व सर्वत्र समानतेची वागणूक मिळावी लागते हे गृहीतक मला पटत नाही.

एक्झॅक्टली!
याच कारणामुळे, कामगाराला त्याच्या पालकांकडून चुकीचे संस्कारच मिळाले असतील असे आपण कसे गृहीत धरु शकतो?

एकाच स्वरुपाचे/एकच खाणे देण्यास काहीच हरकत नाही.अगदी बॉस बद्दल बोलायला मोकळेपणा मिळत नाही असं वाटलं तर वेगवेगळे स्लॉट ठेवावे.मुळात खाणे सबसिडाइझ्ड रेट मध्ये विकत घ्यायला लावावे.त्यात मग कॅटॅगरीचा प्रश्न येत नाही.बॉस ला मिसळ आवडली तर तो मिसळ घेईल.वर्कर एखाद्या आनंदाच्या दिवशी सेलिब्रेट करायला आईसक्रिम घेईल.
अवांतरः प्रायव्हसी मिळत नाही ही डायरेक्टर लोकांचीही कुचंबणा होत असावी.३ वर्षापूर्वी आमचे २ डायरेक्टर आणि एक व्हाईस प्रेसिडेंट कँटिन च्या मागच्या दाराने जाऊन खरकटी भांडी घासणार्‍या बाईंच्या काही अंतरावर उभं राहून काहीतरी गंभीर खुसपूस करत उभे होते तेव्हा दया आली. Happy इतक्या क्याबिनी असून बिचार्‍यांना मनाजोगता एकांत लाभू नये म्हणजे काय? Happy

प्रसंग पाहिले आहेत मान्य आहे. (इथे टक्केवारीत कामगार वस्तीत असे प्रसंग जास्त असावेत असे तुम्हाला म्हणायचेय असे गृहीत धरतो )

पण त्यावर तशा प्रकारचा दुजाभाव सुरु ठेवुन, 'आधी तुम्ही एक प्रकारची पातळी गाठा मग आम्ही तुम्हास समानता देउ' हा योग्य उपाय आहे की, 'समानता सुरु केलीय आता फक्त एक पातळी गाठण्याचा प्रश्न उरलाय, जो काळाच्या ओघात होणारच' हा योग्य उपाय आहे?

बेफिकीर यांच्या ह्या वाक्याशी सहमत, " म्हणूनच बाणखेलेंच्या लेखाचे उदाहरण दिले होते. सर्वांना (इर्रिस्पेक्टिव्ह ऑफ लोकेशन, फायनान्शिअल स्टेटस वगैरे) समानच दर्जाचे शिक्षण मिळावे हे! " मी हि हेच बोललो होतो किंबहुना भरपूर देश जे सामाजिक दृष्ट्या प्रगत आहेत ते एकाच भागात राहणाऱ्या लोकांना सामान शिक्षण, वाहतूक आणि आरोग्य व्यवस्था देतात जेणेकरून त्यांच्यात बालपणापासून समानतेचे संस्कार मिळतात. एकाच शाळेतून पुढे गेलेली दोन।मुलांपैकी एक बॉस झालं आणि दुसरा वर्कर तरी त्यांच्या मनात किल्मिश नसेल. मी जे लिहितोय ते फक्त पुस्तकी ज्ञान नाही तर मी हे प्रतक्ष्यात अनुभवतो आहे. शेवटी सदृढ मनाच्या समाजाताच समानता नांदू शकेल.

>>>>पण त्यावर तशा प्रकारचा दुजाभाव सुरु ठेवुन, 'आधी तुम्ही एक प्रकारची पातळी गाठा मग आम्ही तुम्हास समानता देउ' हा योग्य उपाय आहे की, 'समानता सुरु केलीय आता फक्त एक पातळी गाठण्याचा प्रश्न उरलाय, जो काळाच्या ओघात होणारच' हा योग्य उपाय आहे?<<<<

जे कमी घातक आहे ते केलं जाईल, केलं जातं आणि केलं जावं! (घातक कश्यासाठी, तर ह्या उदाहरणाबाबत, व्यवसायासाठी)! त्यामुळे, तुम्ही अधिक शिक्षण घ्या, अधिक मोठे पद मिळवा, हे करताना आपोआप तुम्हाला मेहनत घ्यावी लागल्यामुळे आणि आजूबाजूला अधिक संयमी संस्कृती आढळल्यामुळे तुमच्यात बदल होण्याची शक्यता आहे. शिवाय, पदानुसार सेवासुविधा नंतर मिळतीलच! ही दिशा योग्य मानली जाते. आधीच या, उपाध्यक्षाशेजारी बसून गप्पा मारत जेवा, त्यांना व्यवसायाबद्दलचे नाजूक प्रश्न जाहीरपणे विचारून अडचणीत आणा, माझे प्रमोशन का अडकले हे सर्वांदेखत विचारा हा मार्ग त्यागला जातो.

अर्थात, तुम्ही तुम्हाला हव्या त्या विषयाकडे चर्चा वळवत आहात आणि मी जमेल तसे लिहीत आहे, पण ही मते म्हणजे माझी 'फक्त' मते नव्हेत. ह्याशिवायही असलेली अनेक कारणे मी आधीच्या प्रतिसादांमध्ये नोंदवली आहेत, ती सगळी मते एकदम लक्षात घेऊन चर्चा घडणे सुसंगत ठरेल असे वाटते.

'मला हव्या त्या विषयाकडे' म्हणजे काय हे मला कळले नाही.

माझा मुद्धा हाच आहे की इतर देशात घडु शकते तर आपल्याकडे का नाही?
आपण त्यात कु़ठे कमी पडतोय?

आपण ठराविक साचा सोडून, वेगळे करावे असे मला सुचवायचे आहे.

>>>>मला हव्या त्या विषयाकडे' म्हणजे काय हे मला कळले नाही.<<<<

म्हणजे, फक्त सांस्कृतीक फरक ह्या एकाच कारणासाठी वर्कर्सना जेवायची वेगळी सोय का करण्यात येते ह्या विषयाकडे! त्याची 'इतरही' कारणे आहेत ह्याचा विचार तुमच्या गेल्या तीन, चार प्रतिसादांमध्ये झाल्यासारखे वाटले नाही.

>>>>आपण ठराविक साचा सोडून, वेगळे करावे असे मला सुचवायचे आहे.<<<<

आपण सुचवत आहात तो उपाय मला व्याधीऐवजी लक्षणावर उपाय केल्यासारखा वाटत आहे. समानता आणायची असेल तर कंपनीतील भोजनव्यवस्थेत आणणे हा पहिला उपाय ठरू शकत नाही असे माझे म्हणणे आहे. पहिला उपाय लहानपणापासून दिले जाणारे संस्कार आणि शिक्षण ह्यात समानता आणणे हा आहे असे माझे मत आहे. संस्कारांमध्ये 'ढोबळ' प्रमाणातील समानता अभिप्रेत आहे, प्रत्येकावर अगदी तस्सेच संस्कार होणार नाहीत हे मान्यच आहे.

बेफिकीरजी गेल्या तीन चार पोस्ट्स मध्ये आपण एकाच मुद्द्यावर बोलत आहोत, असे मला वाटले आणि त्या नुसार प्रतिसाद दिला.
इतर कारणांबद्दलपण मी माझे मत मांडेलेले आहे, जसे की प्रादेशीक, शाकाहार, मांसाहार वगैरे.

शेवटल्या पोस्टमध्ये मी सुचवलेल्या उपायाबद्दल दुमत असु शकते ही मला कल्पना आहे.

अतरंगी, लेख वाचला प्रतिसाद नाही वाचल्या छान लिहिले आहे तुम्ही
तुम्ही म्हणताय तसे झाले तर भारत हा हिंदूस्तान न राहता जपान अमेरिका होईल पण तसे होणे नाही कारण इथल्या लोकांच्या डोक्यात वर्णव्यवस्था खोलवर रुजली आहे त्याचे प्रतिबिंब सगळी कडे उमटणारच श्रेष्ठत्वाच्या अहंकारा पुढे सगळ्या गोष्टी गौन ठरतात.

बॉसबरोबर जेवायला बसवल्यास.>>>>>
असेही काही होत नाही. आपण ज्या इंडस्ट्रीज विषयी बोलत आहोत तिथे जवळ जवळ १००० ते २००० स्क्वे. फूट चे हॉल असतात जेवायला. दोन चार फुटाचे एखाद दुसरे टेबल असे नसते. आणि जरी असेल तरी त्यावर स्टाफ आणि वर्करला दोन वेगवेगळ्या प्रतीचे जेवण देणे किंवा कमी जास्त प्रतीच्या सोयीसुविधा देणे हा पर्याय नाही. असो.

उगीचच हायपोथॅटिकल बोलून तर्क वितर्क करून वाद घालणे आणि समोरच्याचे मुद्दे खोडून काढणे या उद्देशाने लिहू नका. त्याने मी समोरच्याचा मुद्दा खोडून काढला हे क्षणिक समाधान मिळेल पण त्यामुळे स्वतःला एक दोन क्षण भारी वाटणे हे सोडून त्याचा काही उपयोग नाही.

एखादी खटकणारी गोष्ट चुकीची आहे का? असेल तर का? ती कशी बदलावी या अनुषंगाने बोलावे. जमल्यास पहा.

बेफि यांचा बिअर आणि गैरवागणुकीच्या मुद्द्याचा अर्थ चुकीचा लावला जातोय का?
त्यांना असे म्हणायचे नाही की ते बरोबर आहे, त्यांना असेही म्हणायचे नाही की वर्कर आणि स्टाफ ला वेगवेगळे जेवण द्यावे.
ते असे म्हणत आहेत की कदाचित मॅनेजमेन्ट असा विचार करत असेल, डायनिंग वेगवेगळे ठेवण्यामागे तो विचार असू शकेल.

तो विचार चुकीचाच आहे.

एक पुरुष सहकारी स्त्री सहकारीला त्रास देऊ शकतो म्हणून स्त्रियांना वेगळीकडे जेवायला बसवणे, सर्व स्त्रियांना सेपरेट ऑफिस देणे वगैरे पर्याय नसतात. पुरुषांना त्यांचा आदर करायला शिकवणे आणि जे योग्य प्रकारे वागत नाहीत त्यांच्यावर कारवाई करणे हा पर्याय असतो.

एखादा गैरवर्तणुक करू शकेल या शक्यतेपायी सर्वांशी भेदभाव करणे किंवा एखादी दृश्य/अदृश्य भिंत तयार करणे हे चूकच.

समानता म्हणजे सर्वांनाच सारखे असे नसून ज्याची जी गरज त्याला ते मिळतेय का बघणे हे जास्त महत्वाचे नाही का..>>>>

ऋन्मेषचा हा मुद्दा पण विचारात घेण्यासारखा आहे. त्यात कोणाला ज्याची जास्त गरज आहे त्यांना त्या सोयीसुविधा उपलब्ध करून देणे ही एक विचारसरणी आहे. म्हणजे समजा उद्या कंपनीने ठरवलं की वर्कर्सला जास्त गरज कशाची आहे? तर जास्त प्रथिनयुक्त आहाराची मग त्यांना उगीचच एसी हॉल, चकचकीत खुर्च्या असले काही देण्यापेक्षा आपण तेच पैसे त्यांना जास्त चांगला आहार देण्यासाठी वापरू. स्टाफला घरून डबा आणू दे पण त्यांना चकचकीत, डेकोरेटेड रूम, एसी, न्यूज बघण्यासाठी टीव्ही, वायफाय अशा सुविधा देऊ.

यात ज्याला ज्याची जास्त गरज ते दिले जाईल दोघांवर केला जाणारा खर्च रेशिओ प्रपोर्शनने सारखा असेल.

हि समानता होईल का

Pages