समानता

Submitted by अतरंगी on 4 August, 2016 - 01:54

We do not discriminate any individual on the basis of nationality, language, religion, race , creed, gender, sexual orientation, ethnic origin etc.

एका प्रतिथयश कंपनीच्या वेबसाईट वरील वाक्य... वाचायला अगदी छान वाटलं. पण जरा विचार केला तर वाटतं की हे एका समूहापुरते प्रत्यक्षात आणणे कदाचित शक्य होईल, पण संपूर्ण मानवजातीसाठी हे कधीतरी शक्य होऊ शकेल का?

मला तर कायम वाटतं की आपण समानतेच्या निव्वळ गप्पा मारतो. समाजात संपूर्ण समानता असू शकतच नाही. या ना त्या प्रकारे सामान्य माणूस कायम असमानता पाळत आलेला आहे आणि आजही पाळतो आहे. एक ५ ते १० टक्के (काही थोर सामाजिक कार्यकर्ते आणि पापभिरू सामान्य लोक) सोडले तर समाजात प्रत्येक जण एका किंवा अनेक प्रकारे दुसऱ्याशी भेदभाव करतोच.

जात, धर्म, वंश, लिंग, सत्ता (पद), सांपत्तिक स्थिती, नागरिकत्व, जेष्ठत्व एक ना अनेक प्रकार ज्या द्वारे असमानता पाळली जाते. सगळीकडे दिसते, कित्येकदा खुपते. लोकांना यातल्या एखाद्या किंवा अनेक गोष्टीचा अभिमान, गर्व  असतो तो कित्येकवेळा ते प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे दाखवतात सुद्धा....

समाजाविषयी बोलताना मी स्वतः तरी पूर्णपणे निरपेक्ष आहे का ? नक्कीच नाही. जसं जसं वाचनाने (यात मायबोलीवरील जात, धर्म, स्त्री पुरुष समानता विषयक बीबी पण आहेत) थोडी फार समज येत गेली तसं तसं मी माझ्याकडून होणारे भेदभाव कमी करत गेलो पण आजही माणूस म्हणून मी पूर्णपणे समोरच्याशी कोणताही भेदभाव न करता वागू शकतो का? माझ्या डोक्यातून सगळे न्यूनगंड, अहंगंड पूर्ण पणे गेले आहेत का ? काही काही भेदभाव तर इतके सवयीचे झाले आहेत कि तो भेदभाव आहे हे पण कोणीतरी जाणीव करून दिल्याशिवाय लक्षात येत नाही. कधी कधी लक्षात आले तरी ते तसेच रेटतो कारण ते माझ्या फायद्याचे असतात! 

मला पण कित्येकदा या ना त्या प्रकारे भेदभाव सहन करावा लागतोच. त्यावेळेस मात्र मी आधी मनात cost-benefit analysis करून पाहतो आणि मग ठरवतो कि या विषयी बोलावे कि नाही.

राग, लोभ, द्वेष, मोह, माया, ईर्ष्या, स्वार्थ या सर्वांचा परिपाक म्हणजे असमानता आणि भेदभाव. पण हे सगळे मनुष्याचे स्थायीभाव आहेत जे कधीही नष्ट होणारच नाहीत.

असमानता, त्यामुळे होणारे अन्याय, डालवले जाणारे हक्क कदाचित आपण कधीच नष्ट करू शकणार नाही पण त्याची दाहकता कमी नक्कीच करू शकतो.

स्वपरिक्षण करून कोण कोणते भेदभाव प्रत्यक्ष/ अप्रत्यक्ष आपण पाळतो? आपल्या आजूबाजूला सहजतेने दिसणारे आणि केले जाणारे भेदभाव कमी कसे करता येतील? आपल्यासोबत झालेले/ होणारे भेदभाव, ते भेदभाव न स्विकारता भांडून मिळवलेले हक्क याविषयी उघडपणे इतरांशी बोलायला हवे.

यातून लोकांना निदान इतरांना काय खुपते ते तरी कळेल कदाचित एखाद दुसऱ्या कोणाला तरी आपल्याकडून/ आपल्यासमोर होणारा भेदभाव कळून तो कदाचित सुधारता येईल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगले लिहिले आहे. विचारप्रवर्तक विषय...

माझी ह्या विषयावरची विचार प्रक्रिया चालूच आहे पण सध्यातरी माझे विचार असे आहेत.

'समानता' ही कन्सेप्ट ओव्हर्रेटेड आहे. माझा समानते वर किंवा समानता असायलाच हवी यावर विश्वास नाही. असमानता ही निसर्गतः आपल्यात आहे.

मात्र त्याच बरोबर माझा 'भूतां परस्परे जडो मैत्र जीवांचे' वर नक्कीच विश्वास आहे आणि 'भूतां परस्परे जडो मैत्र जीवांचे' करता मला समानतेची गरज भासत नाही.

मानवी भावभावना आणि त्यायोगे आपण जगतो ते जीवन, हे गुंतागुंतीचे आणि व्यामिश्र असते. त्यात अनेकविध छटा असतात. सदासर्वकाळ संपुर्णतः सदाचारी संसारी मनुष्य सापडणे दुरापास्तच.

धर्म पंथ जात लिंग या बाबतीत मी उच्च-नीचता मानत नाही. पण आर्थिक स्थिती, पद, कौशल्य ह्या बाबतीत आपल्यापेक्षा उच्चपातळीवर असलेल्यांबद्दल असुया बाळगू नये आणि निम्न पातळीवर असलेल्यांबद्दल तुच्छता. तसेच आपण कुणापेक्षा निम्न पातळीवर आहोत म्हणून न्युनगंड बाळगू नये आणि कुणापेक्षा उच्चपातळीवर आहोत म्हणून गर्व करू नये. दोहोंकडूनही शिकण्याजोगे असे काहीतरी असतेच ते शिकावे जरूर.

आपण ज्या पातळीवर असतो तिथे असण्यामागे आपलेच चॉईसेस, आपलाच हात असतो. पातळी उंचावायची धडपड करावी पण जे आहे त्याकडे पाहून त्याचा आनंद घ्यायलाही शिकावे. आपले नियंत्रण आजूबाजूच्या परिस्थितीवर किती प्रमाणावर असू शकते (circle of influence) याला मर्यादा आहेत. त्यापलिकडे जाऊन (एका वयात असे वाटते जरूर पण) आपण जग बदलू शकत नाही.

बदल ही सतत घडत असणारी प्रक्रिया आहे. पण कितीही क्रांतीकारी बदल घडले तरी एकाच वेळी सर्वांना समान करणारे बदल घडणे / घडवणे असंभवच. समजा उद्या सर्वच ठिकाणी अशी समानता निर्माण झाली तर जग किती निरस होईल.

त्यामुळे 'संपूर्ण मानवजातीसाठी' समानता कधीतरी शक्य होऊ शकेल का? ह्याचे उत्तर मला 'नाही' असेच मिळते आहे आणि 'तेच ठीक' असेही वाटते.

हर्पेन ह्यांच्याशी सहमत! असेच लिहावेसे वाटत होते.

असमानता मुळातच आहे व ती नैसर्गीक आहे. मानवनिर्मीत असमानता टाळता येईल व ती टाळण्याचे प्रयत्न ऑफिशियली सुरू असतातच. आपल्यापुरते अशी मानवनिर्मीत असमानता टाळणे हे ज्याचे त्याचे काम! पण नैसर्गीक असमानता टाळता येणार नाही. नैसर्गीक असमानता ही शारीरिक भिन्नता, सुबत्तेतील फरक, बौद्धिक फरक वगैरे अश्या स्वरुपांची असावी. अश्या असमानतेमुळे उद्भवणारे प्रश्न हेसुद्धा बाह्य प्रयत्नांनी सोडवता येतील, पण ही विशिष्ट असमानता नाहीशी करता येणार नाही असे वाटते.

समाजमधे संपूर्ण समानता असू शकत नाही.

समस्या अशी आहे की आपण त्या असमानतेचा वापर भेदभाव करून स्वतःच्या फायद्या साठी करतो. यातून एका  घटकाला फायदा मिळतो आणि दुसऱ्याचे शोषण केले जाते. हे शोषण आर्थिक, सामाजिक , मानसिक, शाररिक, वेगवेगळ्या प्रकाराने होते.

समाजातील जे दुर्बळ, अल्पसंख्यांक, प्रस्थापित विचारधारे पेक्षा वेगळे लोक आहेत त्यांना आपण ज्या सन्मानाने वागवायला हवे तसे वागवत नाही. त्यांना कायम दुय्यम वागणूक दिली जाते.

मला असमानतेचा वापर करून केल्या जाणाऱ्या भेदभाव, शोषण आणि ते कसे कमी करत नेता येईल या विषयी बोलायचे आहे. खरे तर वैयक्तिक अनुभवांबद्दल. आपल्या रोजच्या आयुष्याबद्दल.

संपूर्ण समाज एका रात्रीत बदलला नाही, आणि बदलणार पण नाही. ही कायम चालत राहणारी प्रक्रिया आहे. आपण त्यात अजून कसा हातभार लावू शकतो ? आपण कुठे असे बदल पहिले आहेत? कुठे ते गरजेचे आहेत ?

आर्थिक/ व्यावसायिक भेदभावाचे एक उदाहरण:-

मी माझ्या करियर च्या सुरुवातीला एका प्रतिथयश कंपनी मध्ये कामाला होतो. तिथे वर्कर युनियन होती, वर्कर्स ला कॉलनी, नियमित पगारवाढ सगळे होते. असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांपेक्षा खूपच चांगली अवस्था होती.

पण मला कायम खटकणाऱ्या गोष्टी:-

१. कामगारांना जेवण्यासाठी प्लांट च्या प्रवेशद्वाराजवळ बेंच टाकले होते. स्टाफ साठी जेवायला मात्र वातानुकूलित खोली होती.
२. कित्येक कंपन्यांमध्ये (जिथे जेवणाची सोय कंपनी कडून आहे तिथे) कामगार आणि स्टाफ यांची मेस वेगवेगळी असते.
३. आमच्या कंपनी मध्ये वर्कर्स कॉलनी आणि स्टाफ कॉलनी वेगवेगळी होती. तिथे असणाऱ्या सोयीसुविधांमध्ये खूप अंतर होते.
3. एक स्टाफ मेम्बर आणि एक वर्कर जर कंपनीच्या ऑफिशियल टूर वर असतील तर दोघांना मिळणारा जेवायचा भत्ता वेगवेगळा असतो.

मला या आणि इतर अशा अनेक गोष्टी खटकतात.

हा भेदभाव वाटतो आणि तो नसावा असेही प्रामाणिक पणे वाटते. हा भेदभाव कोणाच्या दृष्टीने किरकोळ असेल पण मला तो खटकतो.

शिक्षणामुळे असमानता आहे मान्य. जो ज्या स्किलचे काम करेल त्याला त्याप्रमाणे मोबदला मिळेल हे पण मान्य. पण जेवण, इतर सोयीसुविधा यात फरक का? स्टाफ कॉलनीत भले मोठे प्ले ग्राउंड, स्विमिंग पूल, जिम आणि वर्कर कॉलनी मध्ये फक्त चाळींच्या मध्ये एक मोकळी सोडलेली जागा....
वर्कर जर जास्त पैसे भरून स्टाफ कॉलनी मध्ये राहायला जाऊ इच्छित असेल तर तसे करता येत नाही.

दोन माणसांना अशी वेगवेगळी ट्रीटमेंट का? जेवण, खेळ, व्यायाम यामध्ये तो माणूस स्टाफ आहे की वर्कर काय फरक पडतो?

मी इतर अशा अनेक कंपन्या पहिल्या आहेत की जिथे एक जनरल मॅनेजर आणि वर्कर दोघे एकाच वेळी एकाच ठिकाणी एकाच मेस मध्ये जेवतात.

अतरंगी, चांगला विषय आहे. हर्पेनचेही पटले. सध्या वाचनमोडात आहे कारण लिहीण्याइतके कोणतेच विचार अजून पक्के झालेले नाहीत. स्वत:शीच उलटसुलट चर्चा चालू असते मनात या सगळ्याबद्दल

>>>>२. कित्येक कंपन्यांमध्ये (जिथे जेवणाची सोय कंपनी कडून आहे तिथे) कामगार आणि स्टाफ यांची मेस वेगवेगळी असते.<<<<

कंपनीला व्यावसायिकतेच्या दृष्टिकोनातूनही बघावे लागते. अनेकदा कस्टमर व्हिजिटला येतात व जेवायलाही असतात. कस्टमर्सना वर्कर्सबरोबर बसवलेले आवडेल की नाही ह्यावर कंपनीचे काहीच नियंत्रण नसते. कस्टमर्सनीही समानतेने वागावे ही अपेक्षा कंपनी एक व्यावसायिक कंपनी म्हणून ठेवू शकत नाही. तो पर्सनल चॉईस असतो. असे अनेकदा पाहिलेले आहे की शॉप फ्लोअरवर कस्टमरला काही दाखवायला नेले तर काही आगाऊ वर्कर्स उगीच येऊन कस्टमरला बोअर तरी करायचे किंवा काहीतरी नको ते ऐकवायचे. आता ह्या वर्कर्सना जर ट्रेनिंगच नसेल की कस्टमरशी कसे वागावे तर ते एका पंगतीला बसल्यावर विचित्र वागले तर काय घ्या?

तुम्हाला (व मलाही, पण व्यावसायिक कारणे सोडून) ही गोष्ट खटकणे हा वैयक्तीक विचारांचा भाग आहे. व्यावसायिक दृष्टीने तसे करता येणार नाही.

इतकेच काय, व्हीपी अ‍ॅन्ड अबोव्हसाठी आणखी निराळा विभाग असतो तोही अश्याच कारणास्तव!

पूर्वीच्या रस्टन आणि आताच्या ग्रीव्ह्जमध्ये फार पूर्वी व्हीपी आणि वरील अधिकार्‍यांना लंचबरोबर बीअरही मिळायची. लंचमध्ये नॉनव्हेज प्रोव्हाईड करणार्‍या तर कित्येक कंपन्या होत्या, आहेतही. महिंद्रामध्ये तर रोजच नॉनव्हेज असायचे, नंतर बंद झाले. आता बीअर आणि नॉनव्हेज असा आहार घेणारे व्हीपी बसलेले असले, त्यांच्याबरोबर एखादा कस्टमर असला आणि तिथेच येऊन वर्कर्सही बसले आणि बीअर मागू लागले तर काय होईल?

संस्कारांमधील फरक ही एक मोठी असमानता आहे. त्याशिवाय, एकाच देशातील सर्व मुलांना समान शिक्षण न मिळू शकणे हीसुद्धा! बाणखेलेंनी एका लेखात फार सुरेख लिहिले आहे की गावाकडील मुलांना जे शिक्षण मिळते ते फार तर त्यांना सुमार नोकर्‍या मिळवण्यास सहाय्यकारक ठरू शकेल. उत्तम नोकर्‍या मिळवण्यास योग्य असे शिक्षण समाजातील विशिष्टच थरांना मिळू शकते. ही खंत त्यांनी विस्तृतपणे मांडली होती. ह्याचा संबंध जातीपातीशी नव्हे तर आर्थिक परिस्थिती आणि शासकीय इच्छाशक्तीशी आहे.

ह्या दोन (सांस्कारीक व शैक्षणिक) असमानतांमुळे प्रचंड भेदभाव होण्यास पोषक वातावरण तयार होते.

जर वर्कर असे वागू लागले तर त्यांना तसे वागू नये असे शिकवावे. पण जेवण आणि मेस एकच असावी.

माझा लहान भाऊ, मुलगा जेवताना बडबड करत असेल आणि टेबल मॅनर्स पाळत नसेल तर मी त्याला वेगळा जेवायला बसवेन कि त्याला कसे वागायचे ते शिकवेन?

माझाच अजून एक अनुभव...

मी चेन्नई मध्ये एका कंपनीत इंस्पेक्शन साठी गेलो होतो. अमेरिकन कंपनीचा भारतातला प्लांट होता.

माझ्या सोबत जेवायला कंपनीचा क्वालिटी मॅनेजर आणि प्रोडक्शनचा जीएम होता. दोघांनी वर्कर्स सोबत रांगेत जेवण घेतले, जेवल्यावर स्वतःचे ताट धुवून रॅक मध्ये ठेवले. मला पण तेच करण्यास सांगितले गेले. मी तिथे त्यांच्या एका महत्त्वाच्या आणि मोठ्या क्लाएंट कडून गेलो होतो.

समानता अशीच रुजवयाची असते ना ?

वर्कर आणि लहान मूल ह्यात फरक आहे. आपण पार वरच्या साहेबाच्या पंगतीला बसू शकतो हे पाहिल्यावर काही वर्कर्स आगाऊपणा करू शकतात हे मी पाहिलेले आहे. त्याशिवाय दुसरे म्हणजे, अनेक वरिष्ठांना जेवायच्या वेळेस काही महत्वाचे बोलायला वेळ मिळत असतो, तो वेळ वर्कर्स आजूबाजूला असले तर मिळणार नाही.

तुमचे चेन्नईचे जसे उदाहरण आहे तशी उदाहरणे अनेक कंपन्यांमध्ये असतात व ते चांगलेच आहे. पण पुन्हा प्रश्न तोच येतो. एखादा वर्कर सटकला आणि वाटेल तसे बोलला तर काय? वर्कर्स जसे खूप कष्टाळू, चांगले असतात तसेच खूप कामचुकार व एवढ्यातेवढ्यावरून अंगावर धावणारेही असू शकतात. मिडल मॅनेजमेन्टपासून पुढे हा प्रश्न कमी किंवा निल होत जातो ह्याचे कारण मुळात त्यांची सांस्कृतीक पार्श्वभूमीच वेगळी असते. हाच मुद्दा वरच्या प्रतिसादात लिहिला होता.

एक माणूस असा वागू शकेल म्हणून सगळ्यांनाच वेगळं वागवायचं का ? एखादा माणूस जर असा वागला तर त्याच्यावर प्रोफेशनल मिसकंडक्ट नुसार कारवाई व्हावी.

मला या कारणासाठी मेस किंवा डायनिंग वेगळे करणे नाही पटत.

तेवढेच कारण नाही.

१. वरिष्ठ पदावरील व्यक्तींना महत्वाची पण अनौपचारीक चर्चा करण्यास वेळ मिळणे
२. वरिष्ठ पदावरील व्यक्तींना त्यांच्या पदानुसार अधिक सुविधायुक्त वातावरण देऊ करणे
३. ग्राहक किंवा इतर महत्वाच्या व्हिजिटर्सचे कंपनीबाबत चांगले मत होणे
४. आहारावर होणारा खर्च कमी करणे
५. अती उच्च पदावरील व्यक्तींना सोयीचे वातावरण देऊ करणे

युनियनचे प्रश्न, इतर असंख्य वादोत्पादक घडामोडी सुरू असतात. कशावरूनही कोणाचाही भडका उडू शकतो. व्यक्तीशः मलाही असेच वाटते की सर्वांना एकत्र जेवायला बसवावे. पण ही वरील कारणे पूर्णपणे व्यावसायिक कारणे आहेत. त्यात भेदभाव करायचा म्हणून केला जात नसून व्यवसायासाठी तसे केले जात असते.

हे मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांबाबत झाले. आय टी सारख्या ठिकाणी तुम्ही म्हणता ते करणे सहज शक्य होईलही.

कित्येक कंपन्यांमध्ये (जिथे जेवणाची सोय कंपनी कडून आहे तिथे) कामगार आणि स्टाफ यांची मेस वेगवेगळी असते. >> in our company, I guess workers get food @ subsidies cost + food is more spicy (tasty as per some employees :D)
Still anyone can eat anywhere.. at least I have seen anyone eating anywhere..
IT company.

आयटी कंपन्यात वेगळी मेस ही कंसेप्ट नाही.आम्ही जिथे खातो तिथेच हाऊसकिपींग चा स्टाफ्,सिक्युरिटी,सी इ ओ, डायरेक्टर हेही खातात.फक्त विदेशी गेस्ट आल्यास त्यांना बुफे मधून पाणी आणि तिखट भरपूर घातलेली पावभाजी/सोयाबीन भाजी घेण्याचा प्रसंग बघावा लागू नये म्हणून बरेच गोड केलेले पंजाबी खाणे स्टाफहस्ते वाढण्यासाठी त्यांना वेगळ्या खोलीत जेवायला बसवतात.
आमची कंपनी एम्प्लॉयी चा फॅमिली डे करते तसाच सपोर्ट स्टाफ चा पण करते.
मी लहान असताना एक महिना एका मॅन्युफॅक्चरिंग कंपनीत होते.तिथे वर्कर्स्+सुपर्वायजर्स मेस, आणि ऑफिसर्स मेस हे वेगळे होते.
वेगळी व्यवस्था असणे हे काही कारणांमुळे असेल, व्यवस्था चांगली असावी आणि कोणाला कमी लेखले जाऊ नये हे महत्वाचे.

मी हेवी इंजिनिअरिंग, तेल आणि वायू क्षेत्रात काम केले आहे. माझे अनुभव त्याच क्षेत्रातील आहेत. आयटी कंपन्यांमध्ये बरी परिस्थिती असावी.

कित्येक ऑटोमोबाईल कंपन्या आणि मास प्रोडक्शन कंपन्यांमध्ये पण कंपनी मेस एकच असते. स्टाफ आणि कामगार अशी वेगवेगळी नसते. ती वेगळी असू नये असे माझे मत आहे.
आणि जरी ती वेगवेगळी असली तरी सर्व सोयी सुविधा आणि दिले जाणारे जेवण हे तेच असावे.

स्टाफ साठी वेगळ्या सोयीसुविधा आणि कामगारांसाठी वेगळ्या असे नसावे. कामगारांना कमी दर्जाचे जेवण, सोयीसुविधा दिल्या जाऊ नयेत.

अतरंगी - मी माझ्या व्यावसायिक वाटचालीची सुरुवात डिप्लोमा म्हणजे पदविका श्रेणीचा अभ्यासक्रम संपवून केली.
माझा विषय स्थापत्य. आमच्या क्षेत्रात पुर्णतः अशिक्षित खोदकाम करणारे वगैरे / दहावी नापास (अनस्किल्ड) सुतार, गवंडी यांना सहायक म्हणून /आय टी आय (सेमीस्किल्ड/स्किल्ड) गवंडी सुतार फिटर वगैरे / डिप्लोमा होल्डर -ज्युनियर इंजिनियर / डिग्री होल्डर / मास्टर्स अशा निर्निराळ्या शैक्षणिक बॅगराऊंडची माणसं कामे करत होती. मुलभूत शिक्षण काहीही असले तरी अनुभवानुसार ग्रेड मधे फरक पडत होता व त्यानुसार ग्रेड वाढली जाऊ शकत होती. आमच्या कंपनीमधे देखिल ग्रेडनुसार अशा प्रकारची वेगेवेगळ्या फॅसिलिटीज मिळण्याची पद्धत होती.
जेवण एकच होते तसे असावे हे ही बरोबरच पण जेवणाची जागा आणि इतर सुखसोयी ज्याला पर्क्स म्हणतात त्या वेगवेगळ्या असणे ह्याला शिक्षण घ्यायला लागलेले परिश्रम / वेळ / बौद्धिक कुवत ह्याच्याशी थेट संबंध होता जो मला योग्यच वाटतो.

माझ्या स्वतःकरता, वरच्या श्रेणीत जाण्याकरता घेण्याच्या मेहेनतीसाठी, मिळू शकणार्‍या वाढीव फॅसिलिटीज हे एक मोठेच मोटिव्हेशन होते.

गंमत मोड ऑन
समानता म्हणजे आपापली भूक / आवड कितीही असली तरी ठराविकच जेवण असंही होईल ना ?
मॅनेजर शारिरीक श्रम कमी करत असल्याने त्याचा आहार कमी असण्याची शक्यता असते वयानुसार पथ्यपाणी असू शकते अशावेळी वर्करलाही मॅनेजर खाईल ते आणि तितकेच जेवण द्यायचे काय?
गंमत मोड ऑफ

'वेगवेगळ्या सोयी' हे उदाहरण आणि सापेक्षता बाजूला ठेवून परत एकदा असे म्हणेन की आपले नियंत्रण आजूबाजूच्या परिस्थितीवर किती प्रमाणावर असू शकते (circle of influence) याला मर्यादा आहेत त्यांचा स्वीकार न केला तर मनस्तापा खेरिज काहीच हाती लागत नाही. तेव्हा अशा गोष्टींची नोंद घेऊन (उदा. जेव्हा माझी कंपनी चालू करेन त्यावेळी मी कसा वागेन याची सुनिश्चिती ) तुर्तास पुढे चालावे.

>>>>स्टाफ साठी वेगळ्या सोयीसुविधा आणि कामगारांसाठी वेगळ्या असे नसावे. कामगारांना कमी दर्जाचे जेवण, सोयीसुविधा दिल्या जाऊ नयेत.<<<<

जेवण कमी दर्जाचे नसते, वेगळे असते. कामानुसार आहारपद्धती ह्या तत्त्वावर बेस्ड असते / असू शकते. प्रोटीन्स जास्त वगैरे!

मात्र सोयीसुविधा वेगळ्या ठेवणे व्याव्सायिकदृष्ट्या योग्यच असते. उत्तम सुविधा वर्कर्ससाठीही दिल्या गेल्या तर खर्च वाढेल आणि सामान्य सुविधा वरिष्ठांनाही दिल्या गेल्या तर प्रतिमा खालावेल. समतोल साधला जातो.

मीही हेवी इंजिनिअरिंग, ऑटो आणि केमिकल प्लँटमध्ये काम केलेले आहे. प्रत्येक ठिकाणी मेस व कॅन्टीन वेगळे होते. पण एकच मेस असणार्‍याही कंपन्या मला माहीत आहेत. त्याबाबतीत तुमच्याशी सहमत आहे की अनेक कंपन्यांमध्ये असे असते.

>>>>ती वेगळी असू नये असे माझे मत आहे.<<<< हो, व्यक्तीशः मलाही असेच वाटते पण पुन्हा तेच, की व्यावसायिक कारणास्तव ते वेगळे असू शकते

स्वत:शीच उलटसुलट चर्चा चालू असते>>>>>

कविन, हि चर्चाच या धाग्यानिमित्त करायची आहे.

तुम्ही मनातले विचार मांडले त्यातून मला एखादा पटू शकेल. कदाचित आधी तो खटकला नसेल पण तुम्ही मांडलेले मत मला विचार करण्यास प्रवृत्त करेल. कदाचित एखादी गोष्ट मला आधी माहित नसेल ती उमगेल. समानतेकडे अजून एक पाऊल पुढे जाण्यास मदत होईल.

समाजातले भेदभाव नष्ट करणे ही कायम चालत आलेली प्रक्रिया आहे. एकाने मांडलेला विचार दुसऱ्याला त्याची चूक दाखवून देतो, विचार रुजवतो आणि मग त्याचे कृतीत रूपांतर होते.

शिक्षण घ्यायला लागलेले परिश्रम / वेळ / बौद्धिक कुवत ह्याच्याशी थेट संबंध होता जो मला योग्यच वाटतो.>>>>>

त्यासाठी स्टाफ आणि वर्करला वेगळा पगार मिळतो. ज्यात खूप फरक असतो.
जेवण आणि जेवणाची जागा सर्वांसाठी सारखीच असावी. तो पण माणूसच आहे.

जेवण कमी दर्जाचे नसते, वेगळे असते. कामानुसार आहारपद्धती ह्या तत्त्वावर बेस्ड असते / असू शकते. प्रोटीन्स जास्त वगैरे!>>>>>>

नाही, ते जेवणंच मुळात कमी दर्जाचे असते. वर्कर्सला पर्याय नसतो म्हणून खातात. त्यांना आणा बघू एकदा स्टाफ डायनिंग मध्ये आणि नंतर विचारा नेहमी कुठे जेवायला आवडेल ते.

उत्तम सुविधा वर्कर्ससाठीही दिल्या गेल्या तर खर्च वाढेल>>>>>
बाकी कंपन्यांचे माहित नाही पण माझ्या सेक्टर मध्ये मॅन पॉवरची टोटल कॉस्ट हि ३ ते १० टक्के असते. बाकी सगळी रॉ मटेरियल, प्रोसेसिंग, मशिनरी, कंस्युमेबल्स याची असते. ज्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचा टर्न ओव्हर २०० ते ५०० कोटी असतो त्या कंपनीला कामगारांच्या जेवणाचा आणि योग्य सोयी सुविधांचा भार सोसता येत नाही?

तेल आणि वायू क्षेत्रात एक एक प्लांट बिलियन्स ऑफ डॉलर्सचा असतो. त्याच्या ४ ते ५ टक्के ह्यूमन रिसोर्स वर खर्च होतो. यात त्यांचा रिक्रुटमेंट, व्हिसा, राहणे, खाणे, पगार, विमा, येण्या जाण्याचा खर्च सगळे अंतर्भूत असते. सर्वाना समान जेवण्याच्या आणि राहण्याच्या सुविधा दिल्या तर अर्धा ते एक टक्क्याचा फरक पडेल फार तर.

सामान्य सुविधा वरिष्ठांनाही दिल्या गेल्या तर प्रतिमा खालावेल>>>>>

I don't believe u wrote this. Strongly disagree.

तुम्ही आधी दोन गोष्टी लक्षात घ्याल का?

१. मलाही तुमच्यासारखेच वाटते की जेवण व सुविधा समान असव्यात

२. पण कंपन्या व्यावसायिकतेवर चालतात

आता तिसरी गोष्टः

एक रुपया वाचवता येत असेल तरी तो वाचवण्याचा आटापिटा कंपन्या करत असतात.

अंतरंगी सहमत आहे.
बेफिकीरजी जिथे कामगार आणि ऑफिसर्सची मेस वेगळी आहे तिथे शारिरीक कष्टानुसार आहार व्यवस्था केलीय असे दिसत नाहीत.

जिथे कामगार आणि ऑफिसर्ससाठी वेगळ्या मेस आहेत, तिथे अंतरंगी म्हणतात त्याप्रमाणे एकच मेस केली तर सुरवातीला समस्या होऊ शकतील. पण बदल टप्प्या टप्प्या ने केला तर कदाचित समस्या कमी उद्भवतील, उदा: वर्कर्स आणि ज्युनियर ऑफिसर्स याची आधी एक मेस केली, मग कालांतराने त्यात सिनियर ऑफिसर्स आले, मग मॅनेजमेंट. एकदा रुळले की त्या समस्या रहाणार नाहीत.

जर संख्येमुळे एकच मेस शक्य नसेल, एकापेक्षा अधिक असल्यास त्यात कामगार ऑफिसर भेदभाव न करता, कोणाला कुठली सोयीची त्याप्रमाणे विभागणी करता येईल.

जिथे काम करणाऱ्या लोकांची संख्या जास्त असते तिथे जेवणाच्या वेळा वेगवेगळ्या करता येतात, केल्या जातात.
माझ्या कंपनी मध्ये डायनिंग ११ ते २ चालू असते. एकाच वेळी गर्दी होऊ नये म्हणून प्रत्येक डिव्हिजनला वेळ ठरवून दिली आहे. त्या डिव्हिजनचे लोक त्या अर्ध्या तासात जेवायला जातात. पण अगदी आयडी कार्ड बघून कोणी लक्ष ठेवत नाही कोण कधी आले आणि कधी गेले. तुम्ही कामात असाल आणि दुसऱ्या वेळेत जेवायला गेलात तर कोणी काही बोलत नाही.

बेफि, ओके Happy

कंपन्या हे करून पैसे वाचवायला बघतात हेच मला पटत नाही. इतक्या मोठ्या कंपन्या चालवताना जे खर्च होतात त्याच्या दृष्टीने हा खर्च अगदी कमी आहे. माझ्या आधीच्या प्रतिसादामध्ये मी तेच लिहिले होते. हा खर्च नगण्य असून त्यांना उचलायचा नसतो. त्यामागे मॅनेजमेन्टचा वर्कर आणि स्टाफ हा भेदभाव आहे. Exploitation आहे.

मी_अनु,

आमची कंपनी एम्प्लॉयी चा फॅमिली डे करते तसाच सपोर्ट स्टाफ चा पण करते.>>>>>

हा फॅमिली डे सर्वांचा एकत्र असतो ना? सपोर्ट स्टाफ चा तुमच्या सोबतच असतो का ?

मला माझ्या एका युरोपिअन कंपनीताला किस्सा आठवला. छोटा उपक्रम पण मस्त

कंपनीचे जे मॅगझीन निघायचे त्यात प्रत्येक आवृत्ती मध्ये अगदी पहिल्या पानावर सपोर्ट स्टाफ (सिक्युरिटी, क्लिनिंग, किचन) स्टाफ मधील कोणातरी एकाचा फॅमिली फोटो, त्याची मुलं मुली किती, काय करतात, त्यांचे गुण, छंद याविषयी माहिती असायची. मी आवर्जून वाचायचो, ती व्यक्ती परिचयाची असेल तर जाऊन चार शब्द कौतुक पण करून यायचो. त्यांना खूप छान वाटायचे.

प्रत्येक जण आपली माहिती आलेला अंक जपून ठेवायचा, घरी दारी, येता जाता सर्वाना दाखवायचा.

हो, वेगळ्या वेळा हा ऑप्शनसुद्धा आहे.
या व्यतिरिक्त बर्‍याच ठिकाणी वेगळ्या मेस सुद्धा असतात, मोठ्या कंपन्यांत, संख्या आणि अंतर या कारणास्तव.

एक रुपया वाचवता येत असेल तरी तो वाचवण्याचा आटापिटा कंपन्या करत असतात.>>>

हो पण यात असा भेदभाव आधीपासून आहे, तो का बदलावा असं कारण असावं असं वाटतं.
जर एक एक रुपयाच वाचवायचा तर मग ऑफिसर्सच्या जेवणाचीपण क्वालिटी कामगारांच्या जेवणासारखी करा असं नाही होत.

अतरंगी,
नाही फॅमिली डे मात्र वेगवेगळा करतात.तसा एकत्र केला तरी आमची काही हरकत नाही, पण एम्प्लॉयी/बायका/एच आर पर्‍या यांची अशा इव्हेंट ला शॉर्ट वन पीस घालून मिरवण्याची सोय आरामशीर आणि सुरक्षित रित्या पूर्ण करायला वेगळे करत असावेत.
त्या फॅमिली डे ला आमंत्रण नसले तरी फोटो पाहिले आहेत.व्यवस्था/सजावट जवळ जवळ सारखी होती.
खरं तर मॅन्युफॅक्चरिंग मध्ये पण मेस एकत्र असायला काहीच हरकत नाही.२-३ वेगवेगळे भाग असावे बसायचे, पण 'हा अमक्यासाठी' अशा स्वरुपात नसून फक्त बसण्याची वेगळी व्यवस्था असे असावे.
मी जिथे होते त्याच्या पिंपरी विभागात सर्वाना एक मेस आणि चिंचवड विभागात वेगवेगळ्या असे काहीतरी होते.

फॅमिली डे सुध्दा एकत्रच व्हायला हवा खरं तर. त्या कंपनीतल्या लोकांनी शोधलेला वेगळ्या फॅमिली डे चा पर्याय योग्य वाटत नाही.

हर्पेन, अतरंगी आणी बेफिकीरः तिघांच्या प्रतिक्रिया छान आहेत.

वैविध्य / विविधता हे नैसर्गिक तत्व आहे. त्यावरून वागणुकीत भेदभाव करणं हे मानवनिर्मीत आणी माणसाच्या सहजप्रवृत्तीला अनुसरून आहे (म्हणून ते योग्य आहे असा अर्थ नाही). सुसंकृतपणाचं लक्षण म्हणजे हा भेदभाव न करता माणसाशी माणसाने माणसासारखे वागणे. शिक्षणाचा ह्याच्याशी संबध नसला तरी शिक्षणातून हा प्रवास होणं अपेक्षित आहे. अमेरिकेत आणी भारतात राहिल्यामुळे तिथली तुलना स्वाभाविकपणे मनात येते. Hierarchical वागणं, मी भारतात जास्त पाहिलय.

इंटरेस्टिंग धागा. प्रतिक्रियाही आवडल्या.

ही चळत मोठ्या कंपन्यांमधे, फॅक्टरीज मधे नेहमी पाहिलेली आहे.

सरकारी पातळीवरही असा भेदभाव चालतो असे दिसते. मधेच जयंत नारळीकरांचा एक अनुभव वाचला होता. त्यात कोणत्यातरी आंतरराष्ट्रीय परिषदेला जाणार्‍या शास्त्रज्ञांना एक ट्रॅव्हल क्लास व त्यांच्याबरोबर जाणार्‍या सरकारी अधिकार्‍यांना वेगळा (जास्त उच्च) असे काहीतरी होते.

Pages