अंबाड्याचे लोणचे

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 21 July, 2016 - 04:02
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ किलो अंबाडे
पाव किलो जाडे मिठ (नसेल तर घरचे बारीक चालेल)
१०० ग्रॅम राईची डाळ
१ चमचा मेथी
१ छोटा चमचा हिंग
४ चमचे हळद
८ चमचे लाल तिखट
तेल पाव किलो (गरज लागल्यास जास्तही लागू शकत).

क्रमवार पाककृती: 

अंबाडे म्हणजे लहानपणीचा रानमेवा. लहान असताना अंबाडे म्हणजे आंबट कैरीसारखे तिखट मिठ लावून खाण्याचा एक टाईमपास खाऊ. ह्याचे मोठे झाड असते. जेव्हा अंबाड्याचा सिझन नसतो तेव्हा आम्ही लहानपणी ह्या झाडाचे देठ व कोवळी पाने खायचो. त्यालाही आंबाड्याचा वास व आंबटपणा असायचा. आंबाडे खाताना एक विशिष्ट गंध जाणवतो अंबाड्याचा. हे पिकले की बाठा तयार होऊन पिवळे होतात. गर मऊ होतो व थोडी गोडच चव व अंबाड्याचा विशिष्ट वास एकत्र झाल्याने खायला मजा येते. कच्चे अंबाडे मिठात मुरवूनही खातात. मिठाच्या पाण्यात अंबाडे टाकून ठेवायचे व साठवणूक करुन हवे तेव्हा खायचे. अंबाड्याची चटणी, रायते केले जाते. जुन-जुलै दरम्यान लोणच्यासाठी तयार होतात. शक्यतो बाठा धरण्यापूर्वीच लोणचे घालायला घ्यायचे. म्हणजे गरही जास्त मिळतो आणि कापायलाही सोपे पडतात.

आता आपण रेसिपी पाहू.

अंबाडे स्वच्छ धुवून त्याच्या उभ्या चार फोडी कराव्या.

मिठ भाजून घ्यायचे, थोड्या तेलावर मेथी परतायची. मिठ व मेथी एकत्रच मिक्सरमधे बारीक करून घ्या.
आता मोहरीचा गर, हिंग, हळद्, लाल तिखट, व बारीक केलेले मेथीसकट मिठ एकत्र करून घ्या.

हे मिश्रण अंबाड्यांच्या फोडींवर मिसळून घ्या.

कढईत तेल चांगले कडकडीत तापवून मग थंड करुन ह्या मिश्रणावर ओतुन एकजीव करा.
झाले लोणचे तयार. आठ दिवसांनी खायला काढा.

वाढणी/प्रमाण: 
३-४ महिने.संपवण्यावर आहे.
अधिक टिपा: 

बरणीत भरल्यावर तेल फोडींच्या वरती राहील असे पहा म्हणजे खराब होणार नाही. जर तेल कमी पडत असेल तर अजून गरम करून थंड करून घाला.

लहान मुलांना हे लोणच जास्त आवडत.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी पहिल्यांंदाच पाहतेय अंबाडे, नाव वाचून आधी अंबाडीची बोंडं आहेत की काय असंच वाटलं, नया है यह मेरे लिए।
तोंपासू बरं का! Happy

मी पहिल्यांंदाच पाहतेय अंबाडे, नाव वाचून आधी अंबाडीची बोंडं आहेत की काय असंच वाटलं + १ मलाहि असच वाटल

.

मला वाटले अंबाडीच्या भाजीचे लोणचे आहे. माझे अत्यंत आवडते. साऊथकडे घोंगुरा पिकल म्हणतात.

हे पण भारी दिसतय. Happy

मला वाटले अंबाडीच्या भाजीचे लोणचे आहे. माझे अत्यंत आवडते. साऊथकडे घोंगुरा पिकल म्हणतात. >>>

मलाही तेच वाटले इथे आणलय मी जोश्यांचे घोंगुरा लोणचे.. Happy

भारी दिसतयँ लोणचे!! Happy

या अंबाड्याचे मोठे झाड असते. गोवा, कारवार कडे जास्त खातात. गोव्यात गोकुळाष्टमीला याचे रायते करतात.
त्यानंतर मात्र ते खात नाहीत. याची एक गोड जातही असते. मी स्वतः खाल्ली आहे ती, पण ती बाजारात दिसली नाही कधी.

लोणचे खूप छान दिसतंय.
मलाही लहानपण आठवले. माझ्या आजीकडे मिठाच्या पाण्यात घातलेल्या आंबाड्यांची बरणी असायची.

सगळ्यांचे धन्यवाद.
अंबाड्याचे थोडक्यात वर्णन मी वर दिलेले आहे. कोणतेही नविन भाजी किंवा फळ घेताना खात्रीपूर्वक घ्या ही नम्र विनंती.
अंबाडे आंबट असतात.

मला पटकन अंबाड़ी म्हणजे सुकी मच्छी मधली वाटली अन जागु ताईंचे नाव बघुन खात्रीच् पटली..म्हणून इतके दिवस open केला नव्हता हा लेख.
बाकी लोणच् खुपच छान दिसतय..आंबाडे पहिल्यांदाच पाहिले

आंबाडा हा एक मोठा वृक्ष असतो. खूपसा आंब्यासारखा दिसणारा. पानेसुद्धा साधारण आंब्याच्या पानांसारखी असतात. फळे तर आंब्याचीच प्रिमिटिव आवृत्ती. हे साम्य बघून वाटते की या दोन प्रजातींमध्ये रक्ताचे नातेसंबंध असावेत. दमणगंगेपासून कारवार-कासारगोडपर्यंतच्या कोंकणपट्टीत हे झाड खूप आढळते. त्यामुळे या भागात याची फळे म्हणजे आंबाडे वेगवेगळ्या प्रकारे जेवणात वापरले जातात. चटणी, रायती,लोणची, कढी, सुकी भाजी असे अनेक प्रकार करतात. शिवाय इतर भाज्यांत आंबटपणासाठी चिंच/आमसोलांऐवजी वापरले जातात.
ऋषिपंचमीच्या भाजीत म्हणजे कंदमुळात (ह्या भाजीला बरेच लोक कंदमूळच म्हणतात कारण ती पूर्वींचे ऋषिमुनीं खात असत त्या प्रमाणे कंदमुळांचीच केलेली असावी अशी अपेक्षा असे.) हे आंबाडे आवर्जून घालण्याची पद्धत आहे.

फोटो आणि रेसिपी दोन्ही मस्तच. तोंपासु.

मीपण अंबाडे पहील्यांदाच बघतेय. सासुबाईंच्या तोंडून नाव ऐकलंय पण बघितलं नाही कधी.

हिरा छान माहीती, नेहेमीप्रमाणे.

हिरा वेगळी आणि छान माहीती मिळाली धन्यवाद.

दा कुठे झाड दिसले की नक्की टाकते फोटो.

आदीती Lol

सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.

अंबाडे हे नाव कोंकणी आहे. बाठा म्हणजे आठळी, कोय. जर्दाळु मधे जशी आठळी असते साधारण तशीच आठळी अंबाड्यांमधे असते.

थायलंड मधे हे फळ विपुल प्रमाणात मिळते. मी हे फळ सिंगापुरमधेचं आधी पाहिले. तेंव्हा मला बाळकैरीसारखे वाटले पण चवीला वेगळे होते. पिकलेले फळ दिसायला फारच सुरेख असते. पारदर्शी असते. उन्हाच्या दिशेने धरले तर आतले मगज दिसते इतके पातळ साल असते पिकलेल्या अंबाड्याचे.

माझ्याकडे एक चित्र आहे ते इथे देतो. ह्याची पाने हिरा म्हणतो आंब्याच्या पानासारखी दिसतात पण मला तरी कडूनिंबाच्या पानासारखी वाटली.

ambade.gif

आंबाडे, मी पहिल्यांदाच पाहिलेत.. झक्कास पा. कृ. फटो तर तो.पा.सु.
बहिण असते मुंबईला तीला सांगते तुझी रेसिपी, आंबाडे तीथे मिळतील कदाचीत...

जागू मी गेल्या आठवड्यात शेवळ विकत घेतली त्या बाईकडे हे अंबाडे होते. मला आधी ती काकडं वाटली, तेव्हा ती म्हणाली की हे अंबाडे आहेत. आधी तुझा लेख आला असता तर नक्की विकत घेतले असते. शेवळ सुद्धा तुझ्यामुळेच खायला शिकले. Happy उद्या दादर ला मिळाल्यास बघते.

हर्ट, आपण दिलेल्या फोटोतले फळ जागूने सांगितल्याप्रमाणेच, आंबाड्यासारखे दिसत असले तरी पाने वेगळी आहेत. आंबाड्यांच्या पानांची रचना ऑल्टर्नेट म्हणजे एका नोडला एकच पान असे आलटून पालटून असते. पानांचा रंगही जरासा गडद असतो. आपल्या फोटोतली पाने डीकसेट दिसताहेत. शिवाय काम्पाउंड असण्याचीही शक्यता दिसतेय. म्हणजे कडुलिंबासारखी. आंबाड्याची जून फळे चवीला आंबट असतात.

हर्ट, माझा पण गोंधळ उडाला. खरेच फळे बरोबर पण पाने वेगळी असे झालेय. आणि तू ते पारदर्शक फळाचे वर्णन करतो आहेस ते बहुतेक बिमली असावे, कारण आंबाडा जून झाला कि आतल्या रेषा इतक्या कडक होतात कि तो कापताही येत नाही.

मी बिमली म्हणतोय ती मलाय जेवणात वापरतात, पण ती रायआवळ्यासारखी खोडालाच लागते.

Pages