सैराट का बघावा? १० कारणे द्या !

Submitted by ऋन्मेऽऽष on 6 May, 2016 - 16:57

आता पर्यंत सैराटची बरीच परीक्षणे येऊन गेलीत, मी वेगळे काय लिहिणार..

पण ज्यांनी अजून पाहिला नाही त्यांच्यासाठी सैराट का बघावा याची १० कारणे देऊ शकतो.

१) गेले काही दिवस जिकडे तिकडे सैराटचीच चर्चा वाचून मी या चित्रपटाला गेलो होतो. या चर्चांनी अगोदरच वाढलेल्या अपेक्षा देखील सैराट पुर्ण करतो.

२) ‘सैराट-एक लव्हस्टोरी’ शाहरूख, चोप्रा आणि करण जोहार मंडळींच्या तोंडात मारावी अशी जमलीय. प्रेम म्हणजे काही तरी लार्जर दॅन लाईफ भावना आहे अश्या आविर्भावात बनवलेल्या बॉलीवूडी चित्रपटांनी आपले गंडवलेले कन्सेप्ट क्लीअर करत ईतक्या सहजसुंदर आणि नैसर्गिकपणे यात सारे काही घडते की चित्रपटाच्या पहिल्या भागात असंख्य गुदगुल्या मनाला सतत होतच राहतात. या अवस्थेतून मध्यंतरापर्यंत तरी आपण बाहेर पडत नाही.

३) डोळ्यांची पारणे फिटावीत अशी द्रुश्ये एका मराठी चित्रपटात बघायला मिळतात आणि ती देखील आपल्याच मातीतील, गावखेड्यांतील, शेतातील दिसतात. मराठी चित्रपट गेल्या काही काळात तांत्रिकदृष्ट्या झेप घेऊ लागलेत असे म्हटले, तर ही भरारी आहे. हिंदीच्या तोडीस तोडच नाही तर त्याच्याही एक पाऊल पुढे आहे. ते देखील मराठी चित्रपटाच्या बजेटमध्ये हे विशेष. हिंदी ब्लॉकबस्टरचे बजेट दिले तर हा माणूस पडद्याला आग लावेल.

३) तांत्रिक बाबींतले एक प्रेक्षक म्हणून जेवढे कळायला हवे तेवढेच मला समजते. पण ते पक्ष्यांचे थवे, शेतातील वाटा, खोल विहीरीतल्या पाण्यात ढुबुक आवाज होत पडणार्‍या उड्या, आकाशातून मनाचा ठाव घेत फिरणारा कॅमेरा, स्लो मोशनमध्ये केलेले गाण्यांचे अप्रतिम चित्रीकरण आणि अश्या कैक द्रुश्यांत हा चित्रपट थिएटरलाच बघायला आल्याचा निर्णय सार्थ वाटतो.

४) चित्रपटातील झिंगाट गाणी नाचायला लावतात तर पार्श्वसंगीत डोलायला लावते. येड लागलं गाणे तर अक्षरशा याड लावते. सैराटची गाणी चांगली आहेत यात प्रश्नच नाही. पण चित्रपट बघितल्यावर त्यातील भावना आणखी आत आत उतरत जातात. आता पुढचे काही दिवस तरी सतत रीपीट मोडवर लागणार्‍या येड लागलंची झिंग उतरणे कठीणच.

५) कुठेही मोठाले फिल्मी डायलॉग नाहीत. कुठल्या आणाभाका नाही. आपलेच प्रेम अमरप्रेम आहे असे दाखवायचा अट्टाहास नाही. बस्स आपण शाळा कॉलेजात असताना जसे प्रेम करतो, त्या प्रेमात जे घडते, तेच अतिशय सुंदर पद्धतीने दाखवले आहे. चिठ्ठीतून प्रेम व्यक्त करायचा प्रकार धमाल जमला आहे. मला सर्वात जास्त आवडलेला आणि स्वताशीच हसायला लावणारा प्रसंग म्हणजे जेव्हा आर्ची वर्गात बसल्याबसल्या परश्याकडे एकटक बघतच राहते आणि त्याची जी काही अवस्था होते..... बस्स आपले दिवस आठवतात!

६) दोघांनी अभिनय छान केला आहे. किंवा त्यांच्याकडून करवून घेतला आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. संवाद फार सहज आलेले आहेत. पण त्यातही आर्ची किंचित जास्त भाव खाऊन जाते. तिचा रांगडा स्वभाव तिच्या प्रेमातही उतरला आहे.
एका हॉटेलातील प्रसंगात पलीकडच्या टेबलावर बसलेला एक फुटकळ रोमिओ जेव्हा आर्चीकडे अधाश्यासारखा टक लावून बघत असतो, तेव्हा तिने त्याला जी प्रतिक्रिया दिली आहे ते बघून खुदकन हसायला येते. हे असले काही आर्चीच करू शकते असे आपल्याला वाटावे ईतके तिची व्यक्तीरेखा आपल्या डोक्यात भिनते.

७) दोघांची चित्रपटातील वये आणि त्यांचे त्या वयाचेच दिसणे हा या पिक्चरचा प्लस पॉईंट आहे. प्रेम करायची अक्कल नेमकी कोणत्या वयात येते याची कल्पना नाही पण ‘प्रेमासाठी कायपण’ ही भावना अठरा-एकोणीस वर्षाच्या मुलांमध्ये जितकी प्रबळ असते तशी ती मोठ्यांना झेपत नाही.

८) जातीयवाद प्रत्येकालाच कळतो. कोणाला एडमिशन फॉर्मवर कळतो, कोणाला नोकरीच्या अर्जावर कळतो. कोणाला प्रेमात पडल्यावर कळतो, कोणाला लग्नाच्या बाजारात उतरल्यावर कळतो. तर काहींना योग्य वेळ येता घरातूनच बाळकडू दिले जातात. हा जातीयवाद दैनंदिन जीवनाचा भाग असलेले कित्येक जीव आपल्या आसपास वावरत आहेत हे देखील आपल्याला वर्तमानपत्रातल्या बातम्या वाचून का होईना माहीत आहेच. त्यामुळे निव्वळ तो जाणून घेण्यास म्हणून सैराट बघायला जाऊ नका. बस्स मनाची पाटी कोरी करा आणि सैराट बघायला जा.

९) कारण हा चित्रपट आपल्याला स्वप्नासारखा दचकवतो. जसे स्वप्नात जे काही दिसते ते सारे खरेच आहे असे वाटते, तसेच या चित्रपटातील ओळखीच्या वाटणार्‍या भावविश्वात आपण रमतो. आणि मग स्वप्नातल्या सारखाच एक धक्का बसतो. तो देखील खरा खुरा वाटतो. स्वप्नातून जागे झाल्यावर ‘अरे हे स्वप्नच होते’ असे आपण म्हणतो तसेच लाईट लागल्यावर हायसे वाटते. हा पिक्चरच होता हे आपल्यालाच समजावतो. हे आपल्याशी घडणार नाही, आपल्या आसपास असले काही घडत नाही.. हा विचार तेवढा रेंगाळत राहतो.

१०) हा पिक्चर हसवतो, खिदळवतो, गुदगुल्या करतो, पार्श्वसंगीताच्या तालावर डोलायला लावतो, आता पुढे काय ची उत्कंठा ताणून धरतो.. पण कुठेही टेंशन देत नाही, कुठेही रडवत नाही... शेवटाला एक धक्का तेवढा देतो. पण रडवत नाही. बस्स घरी आपल्या सोबत न्यायला एक किडा डोक्यात देतो. त्याच्यासाठी तरी नक्कीच ‘सैराट’ बघा.

- समाप्त

कोणाला ११) वे कारण भेटले तर प्रतिसादात जोडा.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपल्या आसपास असले काही घडत नाही.. >>>>>>

ह्यासारख्या अनेक घटना आपल्या 'आसपास' घडत आहेत.
जमल्यास रोज वर्तमानपत्र वाचत जा.......

रसप च्या धाग्यावर मायबाप ने दिलेली झीन्यूज ची लिंक पण पूर्ण वाच.

http://zeenews.india.com/marathi/news/bloggers-park/sairat-cast-system-a...

सैराट सिनेमाचे एवढे वर्णन व धागे बघुन जाणवले की प्रतिभा जात-पात ची मोहताज नसते किंवा रिजर्वेशन ची पण.

ही प्रतिक्रिया सिनेमाचा विषय काय आहे या विषयी नसुन सिनेमाला भरभरुन मिळणार्‍या प्रतिसादा विषयी आहे.

ऋन्मेष, इंग्रजी लिहायची तुझी आपली एक स्टाईल आहे म्हणतोस तशी मराठी लिहायची पण नविन शोधलीस का रे!
इतक्या दिवसात कधीच तुझं लिखाण वाचताना इरिटेट झालं नव्हतं (सई/स्वप्नेल आणि क्रिकेट्वर लिहिलेलं मी वाचतच नाही)
अगदी तुझं क्नो, हाल्फ पण चालवून घेतलं.
पण आज सईराट लिहून तू अक्षरशः इरिटेट केलयस.

अतरंगी,
ह्यासारख्या अनेक घटना आपल्या 'आसपास' घडत आहेत.
>>
हो. माहीत आहे. म्हणूनच ते तसे लिहीले आहे.

साती, काही गोष्टी मी इरीटेट करायच्या हेतूनेच करतो पण इथे तसे नाहीये.
तळटीपमध्ये कारण दिले आहे.
आणि त्या कारणामागे समजले तर एक छुपा अर्थ आहे

बाकी तो अर्थ नाही समजला तरीही इरीटेट होण्याचे कारण नाही समजले.

अतरंगी,
ह्यासारख्या अनेक घटना आपल्या 'आसपास' घडत आहेत.
>>
हो. माहीत आहे. म्हणूनच ते तसे लिहीले आहे.

साती, काही गोष्टी मी इरीटेट करायच्या हेतूनेच करतो पण इथे तसे नाहीये.
तळटीपमध्ये कारण दिले आहे.
आणि त्या कारणामागे समजले तर एक छुपा अर्थ आहे

बाकी तो अर्थ नाही समजला तरीही इरीटेट होण्याचे कारण नाही समजले.

शक्य झाल्यास ते सईराट बदला..

काम कुणी कराव आणि नाव कुणाच व्हाव असं वाटतय ते...

बाकी काहिही फोड / संधी करा सैराट शब्दाची पण हे नको प्लिज...

लिहिल छान आहे.. पण नकोच ना ते टायटल.. इतक्या सुंदर कलाक्रुती ला नकोच

आनंदी तसेच बहुतांश लोकांना वाटले तर बदलतो नक्की नंतर. पण आता असे लगेच बदलले तर मलाच माझ्या हेतूबद्दल खात्री नाही असे होईल म्हणून तुर्तास लागलीच बदल करत नाही.

ओके लॅपटॉप हाती येताच बदलतो. कारण आतही बदल करावे लागतील.
निदान त्या शीर्षकावरची चर्चा तरी थांबेल.
फक्त त्या नंतर जे वाचतील त्यांची आधी काय शीर्षक होते आणि का होते याबाबतची उत्सुकता पिडायला नको.

छान लिहलंय

एक श्रीमंत मुलगी नकळत्या वयात जेव्हा एका गरिब मुलाबरोबर पळुन जाऊन लग्न करते, तर तिचे काय अवस्था होऊ शकते ह्याचे फार दाहक व वास्तववादि चित्रण केले आहे.

रिंकु चे बॉडी लँग्वेज व तिचा वावर एकदम सहज आहे

डिग्री कॉलेज ची पोरं पी टी करताना दाखवले, हे काही समजले नाही.

<<ज्यांनी अजून पाहिला नाही त्यांच्यासाठी सैराट का बघावा याची १० कारणे देऊ शकतो.>>
------- मी अजुन बघितला नाही पण चित्रपट नक्की बघणार...

रु ते ज्यु कॉलेज चे विद्यार्थी नसुन डिग्री कॉलेज चे दाखवले आहेत

आठव, क्लास मध्ये इंट्रो होताना सगळे स्वतः चे १२वी चे मार्क्स सांगतात ते दृश्य

खूप सुंदर लिहितोस ऋन्मेष!!!

सईराट वाचायला आवडले मला तरी Happy आणि मला सईराटच्या मागच्या अर्थ सातीचा मजकुर वाचून उलगडला Happy

रिंकु जेव्हा त्या नॉन मराठी मैत्रीणीला स्वतःच्या वडीलांविषयी सांगते.. तो सीन खुप खुप खुप आतवर खोलवर भिडला. Sad

Pages