बासुंदी फोटोसह

Submitted by निल्सन on 22 March, 2016 - 08:50
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३ तास
लागणारे जिन्नस: 

फुल्ल क्रिम दुध - २ लिटर (मी टोन्ड गोकुळ किंवा म्हशीचे दुध वापरते)
साखर - १ वाटी / चवीनुसार
सुका मेवा - काजु, बदाम (थोडे भरड वाटुन), चारोळी, मनुके.

क्रमवार पाककृती: 

देवकी यांनी विचारल्यामुळे बासुंदीची पाकृ देत आहे.

बासुंदीची पाककृती अगदी सोपी आहे फक्त दोनच स्टेप पण वेळ मात्र खुप लागतो, घाईगडबडीचे हे काम नाही. एका बाजुचा गॅस २-३ तासांसाठी बिझी, त्यामुळे जर जास्त स्वयंपाक असेल तर मी आदल्या रात्रीच बासुंदी बनवुन ठेवते. दुसर्या दिवशी बासुंदी अजुन घट्ट होते.

तर, एका जाड बुडाच्या पातेल्यात्/टोपात दुध तापवत ठेवावे. भांडे थोडे मोठेच असु द्या म्हणजे दुधाला उकळायला चांगली जागा मिळेल.
पहिली उकळी येईपर्यंत गॅसची आच मोठी असु दे नंतर मात्र पुर्णवेळ मंद आचेवर दुध तापवत ठेवायचे आहे.
दर १०-१५ मिनीटांनी दुध मोठ्या पळीने / चमच्याने हलवत रहावे व पातेल्याला चिकटलेली साय काढुन परत दुधात एकत्र करत रहा.
दुध पातेल्याला खाली लागु नये तसेच ओतु जाऊ नये म्हणुन आई बशी, प्लेट किंवा वाटी दुधात टाकुन ठेवायची पण मी मात्र ज्या चमच्याचे दुध फिरवते तोच चमचा पातेल्यात उभा ठेवते. (तरीही या चमचा, बशीवर अवलंबुन न राहता दुध अधुनमधुन फिरवत रहावे नाहीतर दुध पातेल्याला लागतोच Happy )

दुधाचे प्रमाण निम्म्यावर आले की दुधाला गुलाबी छटा येण्यास सुरवात होते. अजुन थोडे आटले की त्यात साखर आणि सुका मेवा घालुन साखर विरघळेपर्यंत ढवळत रहा.

या स्टेपनंतर २० ते २५ मिनिटांत मस्त घट्टसर , गुलाबी बासुंदी तयार होते. Happy

२ लिटर दुधाची साधारण पाऊण लिटर बासुंदी तयार होते. (घट्टपणा आपापल्या इच्छेनुसार. आमच्याकडे आम्ही बासुंदी पीत नाही तर चमच्याने खातो Wink )

शनिवारी रात्री लेकीने बासुंदीची मागणी केली तेव्हा बनविली होती. रात्री ९.३० ला २ लिटर दुध तापत ठेवले तेव्हा रात्री १२.३० ला बासुंदी तयार झाली. दरम्यान स्वयंपाक बनवुन, जेवुन झाले, घरातील सगळे झोपले पण Proud
त्यातच थोडा मावा घालुन कुल्फीच्या साच्यात तयार मिश्रण ओतले, रविवारी दुपारी मस्त गारेगार मावा कुल्फीपण खायला मिळाली Happy

काल केली बासुंदी तिचे हे फोटो.

IMG-20160409-WA0007.jpgIMG-20160409-WA0005-1-1.jpgIMG-20160409-WA0008-1-1.jpg

वाढणी/प्रमाण: 
एक वाटी प्रत्येकी पकडली तर ६ जणांना पुरेल.
अधिक टिपा: 

एकच पण महत्वाची टीप.
दुध सतत ढवळत रहा जर करपले तर काही केले तरी दुधाचा करपलेला वास, चव जात नाही.

माहितीचा स्रोत: 
शेजारच्या मामी
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तं रेसिपी. पण फोटोशिवाय मजा नाही. आमच्याकडे आम्ही दूध उकळवायचं काम मंडळींकडे सोपवलेलं असतंय.

मस्त. आणि असे काही लिहिलेय कि वाटावे आताच करायला घ्यावी.
. इव्हॅपोरेटेड मिल्कचा टीन मिळाला तर हे काम आणखी सोप्पे होते. हे आटवलेले दूधच असते.

मस्त पाकृ. मला ही घरीच केलेली बासुंदी आवडते. मी रोज पोळ्यांची कणीक पितळी परातीत भिजवते त्यामुळे ती परात अगदी सोन्यासारखी चकचकीत आहे. मी बासुंदी त्या परातीत आटवते. गॅस मोठा ठेवते. आणि इतर स्वयंपाक करता करता ती ढवळत ही रहाते . गोकूळच्या होल दुधाची करते मी.. वेलची जायफ ळ केशर घालते स्वादासाठी आणि वरुन अर्धवट खरंगटलेल्या चारोळ्या . अहाहा!!! गारेगार खायला मजा येते.

स्वस्ति, बासुंदी आटताना दुधातील लॅक्टोज साखरेचे कॅरमलायझेशन होत असते त्यामुळे तिला गुलाबी रंग येतो. गॅस मोठा ठेऊन हे काम केले तर जास्त येतो गुलाबी रंग पण ढवळत ही रहावे लागते कारण नाहीतर खालुन लागते.

पारंपारीक रेसिपी मस्त .. Happy

मनीमोहोर, परात चांगली जाड बुडाची आहे का?

स्वस्ति, मला असं वाटतंय की दुधात जी नैसर्गिक साखर असते ती कॅरॅमलाइज व्हायला लागते अगदी मंद म्हणून तो मोहक गुलाबी रंग येतो? Happy मोठ्या आचेवर बासुंदी आटवली तर caramelization फास्ट होऊन ब्राऊन रंग येतो ..

मै, परातीमुळे आटणे प्रॉसेस फास्ट होत असणार ..

फोटो ? Happy

बासुंदी, रसमलाई असले प्रकार बघायला आवडतात, देखणे असतात. पण गोड खाणारा नसल्याने एक दोन चमच्यातच आऊट होतो ..

मै, पसरट पॅनमध्ये दूध उकळत ठेवलं तर पटापट आटते. रेसिपी छान पण बासुंदीतल्या सायीमुळे मला आवडत नाही. घशाला गाळणं बसवल्यास आवडू लागेल. Wink

हो परात चांगली जाडजूड आहे, मिडीअम साईज आहे जूनी आहे पण रोजच्या वापरातील असल्याने चकचकीत आहे अगदी सोन्यासारखी.

पसरट भांड्यात दूध जलद आटते. आणि सुंदर गुलाबी रंग येतो बासुंदीला . रुचिरा मध्ये सुदधा बासुंदी परातीत करा असेच लिहीले आहे. पण स्टीलच्या परातीत केली तर लागू शकेल खालुन एखाद वेळेस.

बासुंदी फक्त करायलाच आवडते. प्यायला त्यामध्ये असलेल्या सायीमुळे फारशी आवडत नाही.

काय काय आठवणी आहेत याबरोबर!
घरच्या लग्नकार्यात शक्यतो हा आटवाआटवीचा कार्यक्रम एकदा तरी होतोच.

मोठ्ठी कढई स्वच्छ धुवून त्याच्या बेस ला चिकण माती भिजवून लेप देऊन ती तयार करायची. ती जर अगदीच कोरडी झालेली असेल तर थोडे पाणी घालून मग त्यात दूध ओतायचं आणि आचार्‍याच्या मोठ्या शेगडीवर ती कढई ठेवून आटवायला सुरूवात करायची. बरोबर घरातला गोतावळा जिवलग आणि मनसोक्त गप्पा. पार रात्री बारा साडेबारा वाजून जाईपरेंत. मग ती बासुंदी प्यायची गरमागरम! भारी कार्यक्रम असतो हा.

त्यात मग जर ती कोजागिरीची रात्र असेल तर खायची पण चंगळच. पातळ पोह्यांचा कच्चा चिवडा, भुईमुगाच्या शेंगा भाजून/उकडून बरोबर मीठ, भाजलेली मिरची, गूळ; कधी भेळ असलं काहीतरी खायला आणि त्यात आळीपाळीनी दूध फिरवायच्या पाळ्या. रात्री दुधात चंद्राचं बिंब दिसलं की ते दूध प्यायला घ्यायचं. कोजागिरीचं दूध म्हणतात खरं पण ती ऑलमोस्ट बासुंदी अस्तेच Wink

ममो, बरोबर आहे. माझी आई पितळी परातीत दूध आटवून खवा आणि त्याचे पेढे करते.. कुठल्याही बाजारू पेढ्यांपेक्षा सुंदर चव येते..
मला बासुंदीपेक्षा अगदी तयार होत आलेला सेमी लिक्विड खवा खायला आवडतो Happy

मस्त रेसिपी. वेळखाऊ प्रकरण आहे, त्यामुळे फारशी केली जात नाही. पण आवडते मात्र खूप.

सायो, साय गायब करण्यासाठी तयार बासुंदी चारोळ्या, काजू बदाम वगैरे नट्स घालायच्या आधी ब्लेंडरमधून फिरवून काढायची. छान स्मूथ होते.

मस्त पाकृ निल्सन. बासुंदी हा जबरी प्रकार आहे. पाडव्याला तर हमखास केली जाते.
दुधावर काय, गालावर काय किंवा एकंदरीत आयुष्यातही गुलाबी रंग येण्यासाठी धीर धरावाच लागतो. त्यानंतर जी काय बहार येते ती येतेच! Happy

हे काय भलतंच ? बुक बाईंडरच्या चुकीमुळे मालती कारवारकरांच्या पुस्तकात मध्येच काकोडकरांच्या कादंब्रीचे पान चिकटल्यासारखे वाटतेय.

>> अडथळ्यांची

बस्के Happy

मला पुर्वी न फेटलेलं श्रीखंड आवडायचं ज्याला मी गुठळ्या असलेलं श्रीखंड म्हणायचे ..

मला बासुंदी कशी ही आवडते .. पण निगुतीने मेहेनत घेऊन केली तर खरंतर आटताना सायच जमायला नको ना दुधावर? Happy

मला भरपूर साय असलेली अडथळ्याची घट्ट बासुंदी भयंकर आवडते!!ंंं << मलापण. बासुंदी खाल्ल्यानंतर पंधरा मिनिटांत जर डोळे आपोआप मिटायला लागले नाहीत तर बासुंदी फेल. Proud

>>>बासुंदी खाल्ल्यानंतर पंधरा मिनिटांत जर डोळे आपोआप मिटायला लागले नाहीत तर बासुंदी फेल. फिदीफिदी
एका कडे हेव्ही व्हिपींग क्रीम मध्ये कंडेस्न्ड मिल्क बरोबर फळे टाकलेले फ्रूट सॅलड खालया वर ५ मिनीटात डोळे गपागप मिटायला लागले. Happy

रेसिपी छान पण बासुंदीतल्या सायीमुळे मला आवडत नाही. घशाला गाळणं बसवल्यास आवडू लागेल >> +१ Happy
फारच आग्रह झाला तर मी नि मामा दोघेही बासुंदी गाळुन घेतो मग पितो Proud

आशुडी.. Happy

ट्रेनमध्ये बसून हा बाफ वाचून अगदीच दुधाची तहान भागवायची म्हणून मी ऑफिसला येताना मसाला दूध पिऊन आले.
मलाही बासुंदी जबराट आवडते. आमचे बाबा भयंकर हौशीने हे काम करतात. हे एकच पक्वान्न असं आहे की ज्यात कमीत कमी कष्ट आहेत, त्यामुळे गणपतीत गौरी जेवणाच्या दिवशी आई मोस्टली बासुंदीच करते. मला थंडगार बासुंदीच आवडते. गरम बासुंदी अजिबात आवडत नाही. ती टू मच गोड लागते. आमच्याकडे बासुंदीसाठी साखरेचं प्रमाण एका लिटरला पाऊण वाटी साखर असं ठरलेलं आहे. थंडगार झाल्यावर त्यातली गोडी जऽरा कमी होते.

मालती कारवारकरांच्या पुस्तकात मध्येच काकोडकरांच्या कादंब्रीचे पान >> Lol

माझीहि बासुन्दी सुन्दर होते, आम्हि बासुन्दी करताना दुध करपु नये म्हणुन आटवताना कढइ मध्ये बशी /डीश थेवतो.बशी /डीश बुडाशी गेल्याने दुध करपत नाही.
बासुन्दीची एक वाइट आठवण आहे, एकदा दुध उरले म्हणुन बासुन्दी केली आणी खाताना फोन आला की माझ्या बाबाना ब्रैन हेमरेज झाले आहे, तब्येत सिरियस आहे. सगळी बासुन्दी मग शेजारी दीली. त्यानन्तर आज तागायत बासुन्दी केली नाही.

बासुंदी आवडतेच आवडते
सगळ्यांना . काहीना खायला आवडते तर काहीना प्यायला आवडते एवढाच फरक .

अगदी 'आई खूप दिवसात बासुंदी नाही खाल्ली कर ना 'अशी फर्माईश कधीही येवू शकते इतकी आवडते .
बासुंदी बरोबर पुरी must.
आणि बटाटा उकडून भाजी .

blender वरून बघावा ह्या वेळी.
पण भरपूर साय असलेली अडथळ्याची घट्ट बासुंदी आवडणारी लोक असल्यामुळे कधी विचार केला नव्हता

अरे वाह! एवढे प्रतिसाद, थांकु थांकु हां Happy

ममो, परातीची आयडीया मस्त.

वेलची, चारोळी घालते मीपण बासुंदीत. एकतर माझे सर्व जिन्नस अंदाजानेच असतात त्यात पहिल्यांदाच लिहत होती ना त्यामुळे गडबडायला झाले Lol

आमच्या शेजराच्या मामी आणि आई बासुंदीत थोडेसे सुके खोबरेपण घालतात किसुन, घट्टपणा येण्यासाठी पण मला नाही आवडत मधेमधे खोबरे आलेले त्यामुळे मी खोबरे बाद केले.

आमच्यासाठी बासुंदी म्हणजे घट्टसायीचीच. एकदा एका मिठाईच्या दुकानातुन बासुंदी पार्सल आणलेली तर नवरा बोलतो अरे हा तर मसाला दुध आपण कोजागिरीला करतो तो Proud

बासुन्दीची एक वाइट आठवण आहे >>> माझी पण. एकदा गणपतीत आईने ५ लिटरची बासुंदी बनवायला ठेवली होती. निम्मी आटली असेल तेव्हा गावाहुन फोन आला की आईच्या मावस भावाने २२-२३ वर्षाचा असेल विष पिऊन आत्महत्या केली. तेव्हापासुन १५-१६ वर्षे आईने बासुंदी बनवलीच नव्हती.

Pages