दही/ताकातली चाकवताची पळीवाढी भाजी

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 20 February, 2016 - 11:15
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

चाकवताची मध्यम आकाराची जुडी - १.
बेसन / हरभराडाळीचे पीठ / मूगडाळ पीठ - २ ते ३ टेबलस्पून
दही - ३ ते ४ टेबलस्पून
मीठ - चवीनुसार
साखर - दोन चिमटी
हळद व तिखट - रंग येण्यापुरते
अर्धी मूठ शेंगदाणे भिजवून (ऐच्छिक)
२-३ चमचे हरभरा डाळ भिजवून (ऐच्छिक)

फोडणीसाठी

साजूक तूप - २ टेबलस्पून
जिरे
हिंग
हिरवी मिरची उभी चिरून - १.

क्रमवार पाककृती: 

चाकवताची चांगली पाने निवडून, स्वच्छ धुवून कुकरला किंवा बाहेर पातेल्यात पाणी घेऊन नरम उकडून घ्यावीत. भिजवलेले शेंगदाणे व हरभरा डाळ घालणार असाल तर तेही शिजवून घ्यावेत. शिजलेला पाला गार झाला की निथळून त्यात अनुक्रमे बेसन आणि दही घालून मिक्सरला एकजीव बारीक करून घ्यावा. मिक्सरला बारीक करणे नको असेल तर रवीने एकजीव घुसळून घ्यावा. गुठळ्या राहता कामा नयेत. शिजलेले शेंगदाणे, हरभरा डाळही घालावी.
हे मिश्रण गॅसवर जाड बुडाच्या कढईत किंवा पातेल्यात गरम करायला ठेवावे. हवे तितके पाणी घालून आपल्याला हवे तसे सरसरीत करून घ्यावे. बेसन शिजल्यावर भाजीला दाटपणा येतो. त्या अंदाजाने पाणी घालावे. चवीनुसार मीठ, दोन चिमटी साखर, रंगापुरती किंचित हळद व तिखट घालून भाजीला एक उकळी आणावी. खळाखळा अजिबात उकळायचे नाही.

फोडणीसाठी लोखंडी पळी गॅसवर तापत ठेवावी. त्यात साजूक तूप घालून ते जरा तापले की लगेच जिरे, ते तडतडल्यावर हिंग व मिरची घालून गॅस बंद करावा. फोडणी जरा गार झाली की भाजीखालचा गॅस बंद करून त्यात पळी फोडणीसकट अलगद बुडवावी. चुर्र आवाज झाला पाहिजे. फोडणी पळीने भाजीत नीट मिसळावी. भाजी उकळल्यावर गॅस बंद करून भाजीवर झाकण ठेवावे व भाजी जरा मुरू द्यावी.

takatla chakwat1.jpg

गरमागरम किंवा गार भाजी पोळी / भाकरी / भात / ब्रेडसोबत खावी.

वाढणी/प्रमाण: 
खाल तसे. तरी चाकवताच्या एका जुडीत ४ माणसांपुरती भाजी होते.
अधिक टिपा: 

~ भाजी अधिक खमंग करायची असेल तर भाजीच्या मिश्रणात एखादी लसणाची पाकळी ठेचून घालावी.

~ काहीजण फोडणीत हिरवी मिरची घालण्याऐवजी भाजीत थोडा हिरव्या मिरचीचा ठेचा घालतात. तोही चांगला लागतो.

~ दही जितके आंबट तितकी भाजी झकास लागते म्हणे! अर्थात मी फार आंबट दही कधीच वापरलेले नाही.

~ आंबट दह्याऐवजी आंबट ताक वापरू शकता. परंतु मग ते मिक्सरमधून न काढता चाकवत व बेसनाच्या कुस्करलेल्या, घुसळलेल्या व एक चटका दिलेल्या मिश्रणात थोडे थोडे घालत जायचे व भाजीचे मिश्रण रवीने घोटत जायचे. मिश्रण आपल्याला हवे तितके सरसरीत झाल्यावर ताक घालणे बंद करायचे. आंबट ताक संपवायचा हा एक नामी उपाय आहे. ताक घातलेली भाजी फार उकळली गेली तर चव जातेच!

~ साजूक तुपाऐवजी फोडणीसाठी तेल + तूप किंवा तेल वापरू शकता. पण चवीत खूप फरक पडतो.

~ फोडणी ही चळचळीतच पाहिजे. तिथे कंजुषी दाखवलीत तर भाजीची चव खुलत नाही.

माहितीचा स्रोत: 
पारंपारिक
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त. आम्ही पालकाची ताकातली करतो. मिक्सरला वगैरे फिरवत नाही. तशीच डावाने जरा घोटून दह्यात मिक्स करायची.

मिक्सरला फिरवली की त्याचा पोत बदलतो. चिरताना बारीक चिरून घ्यायची आणि डाळीचं पीठ भूरभूरवून टाकलं, डावानं व्यवस्थित घोटून घेतली की एकजीव व्ह्यायला मदत होते. आमच्याकडे थोडं दाण्याचं कूट घालतात. वरून लसूण, लाल मिरचीची फोडणी.

आजच चाकवताची कढी केली. म्हणजे याच भाजीला आम्ही चाकवताची कढी म्हणतो. बारीक चिरलेला चाकवत कढईत थेट घालून शिजवायचा, शिजताना किंचितच मीठ, २ थेंब तेल आणि किंचितच हळद घालायची. शिजून भाजी गळते, मग अंगचं पाणी आटतं. या वेळी बेसन घालून घोटायची. मग फेटलेलं दही किंवा ताक (ताक असेल तर बेसन लावून घुसळून) घालायचं. छान शिजू द्यायचं बेसन. मग तेलात (हो, कढी असली तरी मी तेल घेते Wink )मोहरी, जिरं. जर्रा जास्ती हिंग, हळद (आधी घातली हे लक्षात ठेवून), लसूण ठेचून, आणि लाल मिरच्या अशी फोडणी द्यायची. अगदी भाजीच्या काळजात चर्र झालं पाहिजे फोडणी बसल्यावर Proud

मी ताकातल्या भाज्या विशेष खाल्ल्या नाहीत आणि सध्या ताक चालत पण नाही. चाकवत इथे मिळतो का तेही माहित नाही. मग मी का पाहातेय ही रेसिपी Wink अगं मागे तू पाकृच्य धाग्यावर याबद्द्ल म्हणाली होती तेव्हा नाव लक्षात राहिलं होतं. घरच्या ज्ये.ना. मूगडाळ पीठ घालून पथ्याची करायला सांगेन Happy

>>चुर्र आवाज झाला पाहिजे.

मस्त Happy

आहाहा...

चाकवत म्हणजे माझा वीक पॉइंट.... अशी भाजी आम्ही पालकची पण करतो. मला अति... अति.... अतिषय आवडते....

तोंपासु

अंजली, सायो, मीही अगोदर शिजलेला चाकवत / पालक हातानेच किंवा रवीने घोटायचे. पण ज्येनांना मिक्सरला बारीक केलेली मऊसूत पोताची भाजीच आवडते आहे सध्या! म्हणून मग मिक्सरचा खटाटोप. दाणेकूट मीही घालते. कारण शेंगदाणे व हरभरा डाळ यांची 'अडगळ' नकोशी होते त्यांना.

प्र९, आहा! << अगदी भाजीच्या काळजात चर्र झालं पाहिजे फोडणी बसल्यावर >> मस्त वाटलं वर्णन वाचूनच. तेलाच्या फोडणीबद्दल चाकवत तुला माफ करेलच! Proud

माझे मुंबईचे डॉक्टर ( अगोदरचे पुण्यातले शनिवार पेठेतले अस्सल रहिवासी) कायम या चाकवताच्या भाजीची तोंड फाटेस्तोवर स्तुती करत असतात. मला या भाजीबद्दल खूप असं ममत्व नव्हतं अजिबात. पण त्यांच्या तोंडून दरवेळी ताकातल्या चाकवताचा उल्लेख ऐकून (आणि 'पुण्यात ही भाजी किती सहज मिळते आणि तरी तू ती फार खात नाहीस म्हणजे कमालच्च आहे!' हे ऐकून ) मला आजकाल जरा जास्तच जिव्हाळा वाटतो चाकवताविषयी! Lol

सर्वांचे आभार. Happy

अरुंधती, मागे तु पाकृवर दिली होतीस, म्हणुन ही भाजी तेव्हा करुन झाली होती. घरात सगळ्यांना फारच आवडली पण होती. आता छानपैकी पुर्ण रेसिपी दिलीस, ती वाचुन आज परत चाकवत आणला आहे. १-२ दिवसात परत करेन. यावेळेस दाणे आणि डाळ भिजवुन टाकणार आहे.

Mastach! (slurp slurp)

Mee ashach paddhteene palakache pa bha karate. Mixer madhun bareek karat nahee.

भिजवलेले डाळ-दाणे घातलेली चाकवताची ताकातली भाजी.

chakawat bhaji.jpg

चिरलेला चाकवत शिजवून डावेने मस्त घोटून घेतला आणि मग पुढचे सोपस्कार केले. यम्मी झाली आहे भाजी!

काल प्रवासात रस्त्याकडेला ही भाजी मिळाली. शेतकऱ्याकडून नाव फक्त माहीत करून घेतलं, माबोबर रेसिपी मिळेल अशी खात्री होतीच.

आजच्या डीनरला गरम भात आणि पातळ भाजी नक्की. Happy