मानवीय!!

Submitted by कृष्णा on 10 February, 2016 - 01:44

हा मानवीय धागा!

आपण समाजात वावरत असता बरेच मानवतेचे अनुभव येतात ते एकमेकांशी शेअर व्हावे हा उद्देश्य!

सुरवातीलाच माझा एक किस्सा सांगतो!

साधारण १९९१ च्या सुमाराची गोष्ट... मी ऱोह्याला होतो तेंव्हा ऐन उन्हाळ्यात मे महिण्यात काही कामानिमित्त मी आणि माझा मित्र बाईकवरुन अलिबागला गेलो होतो! काम आवरुन साधारण दु. १२ च्या सुमारास परत निघालो. रामराज मार्गे सधारण २५-३० किमी आल्यावर रोह्यापासुन १०-१५ किमी अलिकडे बाईक अचानक बंद पडली!!
अर्धा तास किक मारुन थकलो पण सुरु व्हायचे नांव नाही पेट्रोल प्लग सगळे ओके!! शेवटी बर्‍याच वेळाने एक बस आली तिच्यात मित्राला रोह्याला जाऊन मेकॅनिक घेऊन ये म्हटले! तो गेला मी आपला एका वडाच्या डेरेदार झाडाखाली बाईक जवळ बसुन राहिलो. दुपारची वेळ रणरणते ऊन रस्त्यावर चिट्पाखरु नाही. दमल्याने आणि उन्हाने घश्याला कोरड पडलेली जवळ पाणी नाही समोर साधारण शे दोनशे पवलावर काही घरे होती तिथे गेलो पाणी विचारले प्यायला कुणी देईना ३-४ घरात जाउन आलो सगळे म्हणे पाणी नाहीए.... तसाच धापा टाकत झाडाखाली आलो.... उजव्या बाजुला १०० पावलावर अथांग खाडी पण प्यायला पाण्याचा थेंब नाही.... शेवटी विचार केला २ घोट खाडी तर खाडी पिऊयात २ घोट. तिथे जाऊन ओंजळीत घेतले तर काळे कभिन्न पाणी!! तसाच माघारी आलो....
तहानेने व्याकुळ म्हणजे काय हे पहिल्यांदा अनुभवत होतो.... रोह्याच्या रस्त्याकडे पहात....

तेवढ्यात डाव्याबाजुने एक स्त्री डोक्यावर पाण्याचा हंडाघेऊन वर आलेली दिसली हाताशी एक पोर.. दोघेही असल्या उन्हात अनवाणी ती जवळ आली तसे ताई पाणी मिळेल का प्यायला घोट्भर म्हणून विनवणी केली... तिने अगदी हसतमुखाने हंडा डोक्यावरचा खाली घेतला विशेष म्हणजे हंड्यावर एक ग्लास पण होता! ग्लास काठोकाठ भरुन तिने दिला प्यायला घटाघटा अधाश्या सारखे ते प्यायले.... खरोखर त्या क्षणी ते अमृत होते माझ्यासाठी... मी ग्लास परत देऊ लागलो तसे अजुन्हवे का म्हणून ती पुन्हा देऊ लागली... त्या माऊलीने उरापोटी आणलेल्या त्या हंड्यातुन आपण एक ग्लास घेतला हेच खुप हा विचार आला तत्क्षणी... त्या माऊलीच्या चेह-यावरचे समाधान माझ्या दहापट होते हे जाणवले... खिश्यात हात घालून हातालालागेल ती नोट काढून तिच्या मुलाच्या हातात ठेवली... मला ते पैसे कश्याला देताय म्हणून म्हणू लागली... विशेष म्हणजे मला पाणी दिल्यावर ती माऊली आल्या रस्त्याने पुन्हा गेली डाव्याबाजुचा रस्ता उतरुन......

आता हा अनुभव ह्याला दैवी म्हणा मानवी म्हणा वा मानवातल्या देवाचा म्हणा....
त्या २-३ तासातले अनुभव आयुष्यभर न विसरण्यासारखे आणि खुप काही शिकवुन गेले तेंव्हा..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्याला माणुसकीचा अनुभव म्हणा वा काहीही पण आमच्या ग्रामिण भागातला हा सर्व साधारण अनुभव!

१९८५ -८६ च्या सुमारास आम्ही अकोले ते शिर्डी साधारण ८० किमी सायकल प्रवासाची योजना आखलेली..
सकाळी ६ लाच अकोल्याहुन शिर्डी कडे प्रस्थान केले आम्ही ६ जण मित्र मस्त रमत गमत सायकल वर निघालो.
संगमनेर च्या पुढे बारा एकच्या सुमारास भुकावलो मग बरोबर घेतलेले डबे सोडून जेवण केले. सोबत पाण्याच्या बाटल्या होत्याच घरुन घेतलेल्या. मस्त जेवण पाणी पिऊन थोडावेळ आराम करुन ऊन कलताच तळेगांव ओलांडून पुढे प्रवास सुरु केला. ४ च्या सुमारास सर्व तहानलेले पण सोबतचे पाणी संपलेले. मग एक शेत दिसले तसे माळरानच समोर एक सपर बाजुला गाईचा गोठा २ देशी गायी २वासरे बाजुला शेतात बाजरीच्या सुड्या समोर रचून ठेवलेल्या. सपराच्या ओट्यावर येऊन दार वाजवले एक आजी बाई आल्या बाहेर. पाण्याची विचारणा केली. आजी बाईने लगबगीने आत जाऊन घोंगडे आणले ओट्यावर पसरुन बसायला सांगितले. बाजूला कडुनिंबाचे एक आंब्याचे एक अशी झाडे होती मस्त गार वारा, सावली सर्वजन छान विसावलो. आजींनी एक छोटी केळी भरुन आणलेली सो्बत ग्लास. पाणी पिऊन होत नाही तोच आजी छान वाफ़ाळलेला चहा घेऊन आल्या. आम्ही आश्चर्य चकीत होऊन आजींना विचारले अहो आजी हे कश्याला तर म्हणे “असु द्या पोरानो तु्म्ही एवढ्या लांबणं आलात शिर्डीला चाललात दमला असाल. घोट घोट च्या प्या अन निघा. पुना कश्याला येताय तुम्या ह्या म्हातारी कडं?” आमची मनं अक्षरश: भरुन आलेली ते ऐकुन. मग चहा पिऊन पाण्याच्या बाटल्य अभरुन घेतल्या आणि आजींच्या पाया पडूनच निघालो पुढच्या प्रवासाला.....

मस्त Happy

औंध मधे गायकवाड नगर जवळ एक गिरणी आहे. त्या गिरणी वर एक मुलगा काम करतो. अतिशय सालस, प्रामाणिक आणि लोकांना मदत करायला कायम तयार.

आई एकदा दळण आणायला गेली होती तिथली फारशी निसरडी असल्याने पडली. अ एक हात फ्रॅक्चर झाला. सोबत नेमका मोबाईल पण नव्हता. तो मुलगा स्वता सगळी कामे सोडून कोणाची तरी गाडी घेऊन आईला घरापर्यंत सोडून गेला.

मागे त्याला एक iPhone सापडला. पण मालकाशी संपर्क होईपर्यंत त्या फोन ची बॅटरी पूर्ण उतरली. या पठ्ठ्याने स्वताच्या पैशाने iPhone चा चार्जेर आणून फोन चार्ज केला.

त्याचे अनेक असे किस्से कानावर येत असतात कायम.

कृष्णा , छान अनुभव!!
अतरंगी, खरंच चांगला आहे मुलगा.

कधी मधी पेपर मधे ही असंच कुणा कुणाबद्दल छापून येतं नं कि ऑटो वाल्याने किमती सामान, पैसे परत केले वगैरे वगैरे, तेंव्हा खूप रीलीव्ह्ड वाटतं कि अजून आहेत असे लोकं समाजात.

खरंतर सर्वांशी मिळून मिसळून राहणं, आपुलकीने, सहानुभुतीने वागणं ,एकमेकांना मदत करणं हे सर्व वागणं नॉर्मल असायलं हवं, पण असलं वागणं रेअर झाल्यामुळे कुणी असं वागलं तर आपल्याला आश्चर्य, आनंद, रिलिव्ह्ड वगैरे वाटतं ..
या धाग्या वरच्या किश्श्यां मुळे ,'माणुसकी' च्या नाकावर धरलेलं सूत अजून हलतंय हे पाहून फार फार बरं वाटतं.

काही महिन्यापूर्वीचाच पुण्यातील अनुभव आहे. कुठलासा दवाखाना शोधत भर दुपारी एका उपनगरात फिरत होतो. वरून ऊन रणरणत होते. गाडीचा एसी फुल्ल स्पीडने सुरु होता तरी उन्हाची धग जाणवत होती. मागच्या सीटवर सहा वर्षाचा मुलगा एसीच्या गारव्यामुळे झोपून गेला होता. दवाखाना शोधायच्या नादात मी चुकून पुढे आलो. तेंव्हा लक्षात आले आता यू टर्न घेण्याशिवाय पर्याय नव्हता. उपनगरातील रस्ता व दुपारची वेळ असल्याने रहदारी मध्यम स्वरुपाची होती. रस्त्याला दुभाजक नव्हता. म्हणून मागच्या चौकातील सिग्नल लागल्याने रहदारी थोडी कमी झाल्याचा अंदाज घेऊन स्टीअरिंग फुल्ल वळवले आणि आता पलीकडच्या लेन मध्ये जाणार, इतक्यात इंजिन खाड्ड्कन बंद पडले. झाले! वरून ऊन आणि रस्त्याच्या बरोब्बर मध्यभागी आडवी होऊन गाडी बंद पडली होती. गाडी सुरु करायचा खटाटोप करत होतो. पण यश येत नव्हते. इंडिकेटर पाहून कळले बॅटरी डाऊन होती. सर्विसला फोन केला. ते म्हणाले काही वेळ थांबून पुन्हा प्रयत्न करा, सुरु होईल. आता दहा-पंधरा मिनिटे थांबण्याशिवाय पर्याय नव्हता. पण रस्त्याच्या मध्यभागी ज्या अवस्थेत गाडी होती तसे इतका वेळ थांबणे पण अशक्य होते. छोट्या गाड्या आजूबाजूने वाट काढत जात होत्या. पण एकदा सिग्नल सुटला कि माझी काही खैर नव्हती.

आणि तसेच झाले. काहीच वेळात टोळधाड यावी तशा एकेक एकेक गाड्या मागून पुढून येऊ लागल्या. मध्येच कार आडवी पाहून कर्कश होर्न वाजवून मला इशारे देणे सुरु झाले. खाली उतरून मी पण "गाडी बंद पडली आहे" हे हाताच्या खुणेनेच सांगू लागलो. चांगलाच घाम फुटला होता. उन्हामुळे तर अजूनच जास्त. चिरंजीव मात्र अजूनही डाराडूर झोपलेलेच होते. त्यामुळे गाडी सोडून बाजूला कोठे जाताही येत नव्हते. म्हणून मी असहाय अवस्थेत तिथेच केविलवाण्या नजरेने कोणी मदतीला येतोय का हे पाहत उन्हात उभा होतो. फक्त गाडी थोडी ढकलून रस्त्यापलीकडे सावलीत उभी करणे इतकिच काय ती मदत मला हवी होती.

कार, बाईकवाले आणि इतर वाहनचालक येत होते आणि कपाळाला आठ्या घालून माझ्या कडे बघून कशीबशी वाट काढत निघून जात होते. त्यात डॉक्टर, इंजिनीयर व सगळे पांढरपेशे खूप होते. पण बंद पडलेली गाडी ढकलायला म्हणून थांबणार तरी कोण? व का? त्यांच्या ठिकाणी असतो तर मी थांबलो असतो का? असे काहीबाही प्रश्न उगीचच मनात येऊन गेले. थोड्या वेळाने वाहतूक पोलिसांची गाडी आली. आणि माझ्या अंगावर काटा आला. कारण हे लोक मदत करायचे तर दूरच, उलट दंड म्हणून माझ्याकडून पैसे मात्र उकळले असते. पण सुदैवाने तसे काही झाले नाही. माझ्याकडे आणि गाडीकडे एक जळजळीत कटाक्ष टाकून काहीही न करता "साहेब" आले तसे एका बाजूने वाट काढत निघून गेले. मी सुस्कारा सोडला.

एकेक वाहने येत होती कशीबशी बाजूने निघून जात होत्ती. आपल्यामुळे लोकांना अडचण होते आहे आणि ते मनातून आपल्याला शिव्या घालत आहेत हि जाणीव फार अस्वस्थ करणारी असते. त्यामुळे ती काही मिनिटे काही युगासारखी वाटली.

आणि थोड्याच वेळात अंगात फाटके कपडे असलेले दोन अशिक्षित तरूण आले. मजुरीची कामे करत असावेत. बिहार उत्तर प्रदेश मधून आलेले. मघाशी येताना रस्त्याकडेला हातगाडीवर बसलेले त्यांना पाहिल्याचे आठवले.

"साब कुछ मदद चाहिये क्या?" त्यातल्या एकाने विचारले.

मला देव भेटावा तसा आनंद झाला. काकुळतीला येऊन त्यांना फक्त गाडी ढकलायची विनंती केली. मी गाडीत बसलो. ते ढकलू लागले. गाडी रस्त्याच्या पलीकडे पूर्ण बाजूला सावलीत आणली. आणि माझा जीव भांड्यात पडला. त्यांचे आभार कसे मानावेत कळेना.

"हम आपको बहोत देर वहासे देख रहे थे. लगा गाडी को कुछ तकलीफ है. इसलिये आ गये", ते म्हणाले.

मला कशा शब्दात आभार मानावेत ते कळेना. खिशात हात घालून ज्या येतील त्या नोटा काढल्या. त्यांनी नकार दिला. पण मी आग्रह केला. म्हणालो वेळेला केलेली मदत हि पैशात मोजता येत नाही याची मला कल्पना आहे. पण नाही म्हणू नका. मला वाईट वाटेल. अखेर ते पैसे स्वीकारून ते निघून गेले. नंतर गाडी सुरु झाली. मी निघून आलो.

काळाच्या ओघात बाकी सगळा तपशील एकवेळ विसरून जाईल. पण अशी वेळेला केलेली मदत व ती करणारे ते "मानवीय" आपण कधीही विसरू शकत नाही हेच खरे.

अतुल पाटील, छान किस्सा सांगितलात मनातल्या विचारांसकट Happy

अशा कितीतरी घटना आपण बघतो, पुढे जातो.
आणि आपल्यावर वेळ येते तेव्हा आपल्याला अशा वरवर छोट्याश्या वाटणार्‍या पण अमुल्य मदतीची किंमत कळते

आपल्यामुळे लोकांना अडचण होते आहे आणि ते मनातून आपल्याला शिव्या घालत आहेत हि जाणीव फार अस्वस्थ करणारी असते.>> +१ अगदी,अगदी.
माझ्याकडे आणि गाडीकडे एक जळजळीत कटाक्ष टाकून काहीही न करता "साहेब" आले तसे एका बाजूने वाट काढत निघून गेले.>>:अओ:
बाकी हा अनुभव खरेच विसरता न येणारा...

मलाही एक आठवण शेअर करावीशी वाटतेय.

काही दिवसांपूर्वी माझ्याकडे १-२ दिवसांसाठी आईवडील आले होते म्हणून त्यांना लेण्याद्री जवळच असल्याने तेथे घेऊन जाण्याचे ठरवले. माझ्याकडे गाडी नसल्यामुळे बसनेच जायचा निर्णय झाला. मग मंचरहून जुन्नर आणि तेथून ते म्हणाले की इथून तुम्हाला लेण्याद्री फाट्यापर्यंत बस मिळेल, तिथून पायी जा...
आम्ही लेण्याद्री फाट्यावर उतरलो तितक्यात तेथून एक गाडी लेण्याद्रीकडे जात होती. माझ्या वडिलांनी सहजच हात केला आणि गाडी थांबली. जवळ गेलो तर आत एक जोडपे होते, आम्ही तिघंही मागच्या सीटवर बसलो. सहसा कोणाला दोघात तिसरा हवा नसतो तरीही त्यांनी मदत केली. लेण्याद्रीला पोचल्यावर कळाले की ते पुण्याचे आहेत आणि येथून पुण्यालाच जाणार आहेत. मी त्यांना विचारणारच होतो की, आम्हाला परतीच्या वाटेत मंचरला सोडणार का? पण माझ्या वडिलांनी मला थांबवले, म्हणाले कशाला त्यांचा एकांत घालवायचा?
आम्ही दर्शन घेऊन परत आलो आणि पायीच फाट्याकडे जायला लागलो तितक्यात तीच गाडी मागून आली आणि आमच्या समोर उभी राहिली. आम्ही काहीच न बोलता मध्ये बसलो. बोलताना त्यांना सांगितलं की आम्ही मंचरला जात आहोत. ते आम्हाला जुन्नर बसस्टँड पर्यंत घेऊन आले, आणि त्या काकांनी विचारले, "काही कामानिमित्त तुम्हाला इथे थांबायचे आहे का?"
मी म्हटलो, "काही काम तर नाही, पण इथेच सोडा पुढे जायला आरामात बस मिळेल इथून"
हे ऐकून ते काहीच बोलले नाहीत आणि गाडी सरळ चालवत राहिले. आम्हाला कळले की हे आता आपल्याला मंचरलाच सोडणार. आणि थेट त्यांनी आम्हाला मंचरला आणून सोडले. ते काका मितभाषी असल्याने ते कोण आणि काय करतात काहीच संभाषण झाले नाही. फक्त इतकेच कळाले की ते पुण्यात कासारवाडी स्टेशनच्या मागे राहतात आणि त्यांचं गाव ओतूर का काहीतरी आहे..........
आम्ही तिथे उतरलो आणि फक्त थँक यू म्हणू शकलो. मी त्यांच्या गाडीचा नंबरपण नाही पाहिला नाहीतर इथे नक्की लिहिला असता.

she means कोटी कोटी प्रणाम!>>>>बरोबर !!
हसून हसून पोट दुखेल हो माझं (कोते कोते)
सगळी गडबडच झाली,धन्यवाद चुकी दाखवल्याबद्दल..

अतुल पाटील जी आपणास रुळावर वाचवणारी व्यक्ती आपले किंवा आपल्या आईवडिलांचे सद्गुरू किंवा इष्टदैवत असणार. १०० टक्के.

मलाही असे देव माणसानचे खुप अनुभव आलेत... एकदा दुपारी हाफ डे घेउन निघाली त्या दिवशी माझा बड्डे होता आणि बस मधे बसल्यावर कळल की सुट्टे नाहीत तेव्हा १००० ची नोट होती आणि कन्डक्टर घ्यायला तयार नाही. मी सगळि कडे बघितले कोणी ओळखिचे दिसेना अगदी उतरण्याच्या बेतात होती तेवढ्यात एक मजुर होता त्याने २० ची नोट दिली कपड्यावरुन तो रस्त्यावर काम करणारा मजुर वाटत होता. मी ती नोट घेतली. मला काय बोलु कळेना पण तेवढ्यात मी ब्यागेतुन डेरी मिल्क काढुन त्याला दिली. त्या दिवशी बड्डे असल्या कारणाने मी ती सगळ्याना द्यायला घेतली होती त्यातली एक उरली होती ...

Pages