मानवीय!!

Submitted by कृष्णा on 10 February, 2016 - 01:44

हा मानवीय धागा!

आपण समाजात वावरत असता बरेच मानवतेचे अनुभव येतात ते एकमेकांशी शेअर व्हावे हा उद्देश्य!

सुरवातीलाच माझा एक किस्सा सांगतो!

साधारण १९९१ च्या सुमाराची गोष्ट... मी ऱोह्याला होतो तेंव्हा ऐन उन्हाळ्यात मे महिण्यात काही कामानिमित्त मी आणि माझा मित्र बाईकवरुन अलिबागला गेलो होतो! काम आवरुन साधारण दु. १२ च्या सुमारास परत निघालो. रामराज मार्गे सधारण २५-३० किमी आल्यावर रोह्यापासुन १०-१५ किमी अलिकडे बाईक अचानक बंद पडली!!
अर्धा तास किक मारुन थकलो पण सुरु व्हायचे नांव नाही पेट्रोल प्लग सगळे ओके!! शेवटी बर्‍याच वेळाने एक बस आली तिच्यात मित्राला रोह्याला जाऊन मेकॅनिक घेऊन ये म्हटले! तो गेला मी आपला एका वडाच्या डेरेदार झाडाखाली बाईक जवळ बसुन राहिलो. दुपारची वेळ रणरणते ऊन रस्त्यावर चिट्पाखरु नाही. दमल्याने आणि उन्हाने घश्याला कोरड पडलेली जवळ पाणी नाही समोर साधारण शे दोनशे पवलावर काही घरे होती तिथे गेलो पाणी विचारले प्यायला कुणी देईना ३-४ घरात जाउन आलो सगळे म्हणे पाणी नाहीए.... तसाच धापा टाकत झाडाखाली आलो.... उजव्या बाजुला १०० पावलावर अथांग खाडी पण प्यायला पाण्याचा थेंब नाही.... शेवटी विचार केला २ घोट खाडी तर खाडी पिऊयात २ घोट. तिथे जाऊन ओंजळीत घेतले तर काळे कभिन्न पाणी!! तसाच माघारी आलो....
तहानेने व्याकुळ म्हणजे काय हे पहिल्यांदा अनुभवत होतो.... रोह्याच्या रस्त्याकडे पहात....

तेवढ्यात डाव्याबाजुने एक स्त्री डोक्यावर पाण्याचा हंडाघेऊन वर आलेली दिसली हाताशी एक पोर.. दोघेही असल्या उन्हात अनवाणी ती जवळ आली तसे ताई पाणी मिळेल का प्यायला घोट्भर म्हणून विनवणी केली... तिने अगदी हसतमुखाने हंडा डोक्यावरचा खाली घेतला विशेष म्हणजे हंड्यावर एक ग्लास पण होता! ग्लास काठोकाठ भरुन तिने दिला प्यायला घटाघटा अधाश्या सारखे ते प्यायले.... खरोखर त्या क्षणी ते अमृत होते माझ्यासाठी... मी ग्लास परत देऊ लागलो तसे अजुन्हवे का म्हणून ती पुन्हा देऊ लागली... त्या माऊलीने उरापोटी आणलेल्या त्या हंड्यातुन आपण एक ग्लास घेतला हेच खुप हा विचार आला तत्क्षणी... त्या माऊलीच्या चेह-यावरचे समाधान माझ्या दहापट होते हे जाणवले... खिश्यात हात घालून हातालालागेल ती नोट काढून तिच्या मुलाच्या हातात ठेवली... मला ते पैसे कश्याला देताय म्हणून म्हणू लागली... विशेष म्हणजे मला पाणी दिल्यावर ती माऊली आल्या रस्त्याने पुन्हा गेली डाव्याबाजुचा रस्ता उतरुन......

आता हा अनुभव ह्याला दैवी म्हणा मानवी म्हणा वा मानवातल्या देवाचा म्हणा....
त्या २-३ तासातले अनुभव आयुष्यभर न विसरण्यासारखे आणि खुप काही शिकवुन गेले तेंव्हा..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

१९९९ ची गोष्ट. मी माझा क्लास संपवुन सायकलवर घरी येत होते.पुना हॉस्पिटलच्या ब्रिजवरुन येताना सायकलवरुन पडले आणि बरच लागलं होतं मला.मागुन येणार्‍या एका काकुंनी पटकन गाडी थांबवली आणि त्यांच्या मोबाइल वरुन माझ्या घरी फोन करुन कळवलं मी पडल्याचं. फक्त कळवुन त्या निघुन न जाता माझे वडिल आणि भाऊ मला घ्यायला येईपर्यंत त्या माझ्यासोबत थांबल्या होत्या. त्यावेळी मोबाइल अत्ता सारखे कॉमन नव्हते आणि कॉल रेट पण स्वस्त नव्हते. पण त्या काकुंनी त्याचा विचार न करता मला मदत केली.
खरंच त्या काकुंचे खुप खुप अभार... Happy

वर्षुला अनुमोदन. चर्चा खरच डोळे पाणावले तुझा अनूभव वाचताना. मला देव माणसाच्या रुपात अनेकदा भेटलाय, त्यामुळे सन्ध्याकाळी जमल्यास माझे अनूभव लिहीन.

माझा किस्सा रियासारखाच. फक्त वेळ वेगळी. मध्यरात्री १२.३० / १२.४५. कॉलेजचे दिवस होते. त्यामुळे टु व्हिलर, मध्यरात्र् आणि छोटंसं पार्टीवेअर असं अगदीच ऑब्जेक्शनेबल आणि शिव्याखाऊ कॉम्बीनेशन होतं. पार्टीमधे कोणाच्या तरी ऑफेन्सीव कमेंट मुळे रागावुन मी कोणाला सांगता आणि कंपनीची वाट न बघताच कोरेगाव पार्क ते डहाणुकर कॉलनी अशी एकटीच निघाले. तेव्हा कर्वे रोड अगदीच सुनसान असायचा आणि तो रुटपण इतका आतासारखा डेन्स नव्हता.

मी डेक्कन चौकात पोचल्यावर एक गचका खावुन कायनेटिक बंद पडली आणि माझे श्वासपण जवळ जवळ बंद पडले. तेव्हा मोबाइल फोन नव्हते आणि मी एकटीच रहायचे त्यामुळे घरी फोन करायची सोय नव्हती. अर्थात करणार तरी कुठुन. काही मिनिटांनी दोन मुले बाइकवरुन भरधाव क्रॉस झाली आणि यु टर्न घेवुन परत आली तेव्हा तर मी ऑलमोस्ट किंकाळ्या मारायच्या अवस्थेत पोचले होते. त्यांनी येवुन चौकशी केली, बाइक चालु करायचा प्रयत्न केला, पण गाडी ढिम्म. त्यांनी ट्रिपल्स जावु आणि आम्ही सोडतो असं ऑफर केल्यावर मी ठाम नकार दिला. शेवटी एकजण डेक्कनला थांबला, दुसरा बाइकवर घरी सोडायला आला आणि मग परत मित्राला आणायला डेक्कनला गेला असावा. तेव्हा मला फक्त सेफ पोचायची घाई होती. बाकी काहीच माहित नाही.

मी इतक्या शॉकमधे होते कि त्यांची नावं विचारायला विसरले. नंबर घेणं, पत्ता विचारणं त्या वयात सुचणं अवघडच. पण मला बिल्डिंगच्या दारात सोडल्यावर त्याने कार्ड दिलं होतं आणि दुसर्या दिवशी कॉल करायला सांगितला होता. त्याला माझ्या बाबाने काही दिवसांनी कॉल केला. कोणत्या Ad कंपनीचा नवानवा मालक होता. 'Silhouette' असं काही नाव होतं. आता एवढया वर्षांनी आठवणी मधुन पुर्ण विसरलेले ते दोघं कृष्णाच्या धाग्यामुळे अचानक आठवले.

Thanks to those great souls ! I am forever thankful to them.

मनालीला बाईक्स भाड्याने मिळतात. आम्ही एक यामाहा भाड्याने घेतली होती. त्यावरुनच आम्ही (मी आणि माझी पत्नी) सगळे फिरलो.
आणि त्यावरुनच रोहतंगपासला गेलो.
घाटात खुप संदर देखावे. अनेक ठिकाणी थांबून मनमुराद आस्वाद लुटत आम्ही वर पोचलो, तेव्हा दुपार झाली होती.
घोड्यावर बसुन स्नोवर जाणारे आम्ही शेवटल्या काही लोकांपैकीच होतो. तिथे स्नो बूट, आणि जॅकेट देतात घालायला.
एकतर बाईक चालवल्याने वार्‍यामुळे जरा गारठलो होतो. तशात मला दिलेला डावा स्नो बूट पुढे फाटला होता. (तो कसाबसा शिवला असेल मी घातल्यावर जरा वेळाने उसवला असावा). आधी हे लक्षात नाही आले, लक्षात आले तेव्हा अर्धे अंतर पुढे गेलो होतो. पुढे स्नोवर उतरल्यावर पाउल गारठू लागले. पण उत्साहाच्या भरात लक्ष दिले नाही, वाटले परत घोड्यावर बसलो की जाईल गारठा. पण परतीला लागेस्तोवर पाऊल चांगलेच गारठले. मी पायाची बोटे जमतील तसे हलवत ठेवण्याचा प्रयत्न करत होतो, पण हळुहळु ते ही अवघड वाटत होते.

परतल्यावर, तिथे तंबु असतात, नुडल्स, चहा कॉफी इत्यादि मिळते तिथे.
आता सगळे बंद होण्याची वेळ आली होती. स्नो बूट उतरवुन माझे बुट न घालता हातातच घेउन मी लगेच एका तंबुत गेलो, नुडल्स आणि चहाची ऑर्डर दिली. उजव्या पायात बुट घातला आणि चूलीपुढे जाऊन समोर डावा पाय धरला. बायकोने खुर्ची आणुन दिली आणि मी त्यात बसलो डावा पाय शेकत.

पण माझे गारठलेले पाऊल ठीक होईना. आता पायाला मुंग्या आल्या. मला तो वर धरता येईना. तो पर्यंत नुडल्स आले.
आता हा माणुसपण तंबु बंद करणार, लौकर खाली उतरले तर बरे असे वाटु लागले.
पण तो पर्यंत जीप आणि कारने आलेले सगळे निघुन गेले होते आणि पर्यटकांपैकी आम्ही दोघेच उरलो होतो. बाईकवरच परत जाणे आता भाग होते.

आमच्या बोलण्यावरुन, चेहर्‍यावरुन तंबुवाल्याने ताडले की गडबड आहे. "कुछ चिंता मत करो" म्हणाला.
त्याने हाका मारल्या, दोन पोरं आली, माझा पाय, पाऊल चोळत चुली समोर धरु लागली. त्या तंबुवाल्याने पाणी गरम केलं (बराच वेळ लागतो त्या थंडीत) आणि एका घमेल्यात टाकुन माझा पाय त्यात टाकला.
अजून पाणी तापत ठेवलं. गरम पाण्यात शेकत शेकत, तीन घमेल्या झाल्यावर मा्झ्या पावलात हळुहळु जीव आला. मध्ये त्याने दोनदा चहा करुन दिला.
मी पूर्ण ठीक आहे याची खात्री करुनच त्याने आपला तंबु बंद करायला घेतला.
एवढं सगळं झाल्यावर त्याने फक्त नूडल्स आणि चहाचे पैसे घेतले. आम्ही देऊ केले तरी जास्तीचे पैसे ना त्याने घेतले, ना त्या पोरांनी बक्षीशी घेतली.

तिथले इतर असे काही विकणारे सगळे आपली दुकानं बंद करुन आता क्रिकेट खेळत होते.
आम्हाला क्रिकेट खेळायला बोलावले. थोडावेळ खेळुन त्यांचे आभार मानून आम्ही घाट उतरायला सुरवात केली.

अरे वा.. खूप छान वाटलं वाचून.. आजकाल च्या जगात माणसाचाच माणसावरचा विश्वास उडत चाललेलाय , यावेळी असे अनुभव जीवात जीव आणणारे आहेत!!

@मनिमाऊ,

मध्यरात्री १२.३० / १२.४५, छोटंसं पार्टीवेअर, टु व्हिलर, कोरेगाव पार्क ते डहाणुकर , त्यात एकट्या - कहर आहात _/\_ . माफ करा ताई पण पुढे कोणी "मी केलेला वेडेपणा" असा धागा काढला तर तुमचा हा अनुभव तिथे टाका.

धन्यवाद सगळ्यांना.
अजून अनुभव आहेत, लिहिनच.

त्यातिल अजून एक:
एकदा मुंबई विमानतळावर टॅक्सी करताना माझे पाकीट तिथे काउंटरवर राहिले.
त्यात माझे व्हिजिटिंग कार्ड होते, पण जुने, त्यातिल मोबाईल नंबर जुना होता. एका टॅक्सिवाल्याला माझे पाकीट दिसले. त्याने उघडुन माझे व्हिजिटींग कार्ड पाहिले. माझ्या मोबाईलला फोन केला, तेव्हा तो नंबर दुसर्‍या कुणाचा आहे हे कळले. मग त्याने माझ्या नावावरुन मी कुठल्या क्रमांकाची टॅक्सी केली ते पाहुन त्याच्या ड्राव्हरच्या मोबाईलला फोन लावला. तो पर्यंत मी सायनला पोचलो होतो. आणि मला पत्ताही नव्हता की मी पाकिट विसरलो आहे. कॅश, क्रेडिट कार्ड्स, ATM कार्ड सगळे त्यातच होते. मग परत विमानतळावर गेलो. पाकीट मिळाले. सर्व पैशांसकट. त्या टॅक्सीवाल्याला अनेक धन्यवाद दिले, शंभर रुपये बक्षीशी दिली.

तेव्हा पासून पाकिटात अद्ययावत व्हिजिटिंग कार्ड ठेवतोच, पण काही कॅश आणि क्रेडीट ATM कार्ड्स पाकीट आणि हॅंडबॅगेत विभागूनही ठेवतो.

छान अनुभव सर्वांचेच

अनघा, रिक्शावाले पुण्यात तर १०० त एखादा दुसरा चांगला भेटतो..

अमृता, छान किस्सा! आहेत असे लोक अजुनही!

मनिमाऊ, नशिबवान आहेस चांगला माणूस भेटला म्हणून.. पण असा वेडेपणा खरेच नको करायला...

मानव, खूप छान अनुभव!!

अमि, तुझाही अनुभव मानव सारखाच खुपाच छान!

असेच अनुभव जगात माणुसकी आहे ह्याचे प्र्त्यन्तर देत असतात... Happy

जिन्क्स & कृष्णा, अगदी खरं. शुद्ध वेडेपणा होता. टीनएजमधल्या गधेगिरीची हाइट होती ती.
आता जेव्हा मुलं त्या वयात आली तेव्हा कळतं आहे कि आई-बाबांना टीनाएज मधल्या मुलांचं इतकं टेन्शन का असतं.

पंचवीस वर्षे होत आली या गोष्टीला. पण विसरण्यासारखी गोष्ट नाही ती.
मुंबईत नविन होतो, नोकरीच्या शोधात आलेलो. आणि तिथला पहिलाच पावसाळा अनुभवणार होतो.
इंटरव्ह्युसाठी नाशिकला एकदा गेलो तोपर्यंत मुंबईत पाउस नव्हता. अथवा झाला असेल कधी तुरळक तर लक्षात न रहाण्यासारखा. पहाटे उठुन गेलो एका कापडी शबनम पिशवीमध्ये सर्टिफिकेट्सचे फोल्डर घेउन.

परतताना कसार्‍या पर्यंत शेअर टॅक्सी करुन लोकल ट्रेन पकडली. मध्येच केव्हातरी पाऊस सुरु झाला. वाढतच गेला. कल्याण नंतर ट्रेन लेट होत गेली. ठाण्याला बराच वेळ थांबली पण निघाली.
पुढचा प्रवास हळु थांबत चालला होता. विक्रोळीला पण खुप वेळ थांबली पण तिथुनही निघाली. पण घाटकोपरच्या आधीच जी थांबली ती निघेच ना. पुढे एक मोठ्या नाल्यावरील पुल होता. पाणी रुळांच्या वरुन वहात होते. उजव्या बाजुला उंचसा माथा आणि तिथुन पाणी डावीकडे जोराने घुसत होते. डावीकडे झोपड्या होत्या. त्यात पाणी घुसले होते. पाणी वाढले तसे झोपडीतल्या लोकांनी आपल्या पोरांना छतावर बसवले. तर मोठी मुलं तशातही खेळत होती. कमरे पर्यंत झोपडीत पाणी गेले होते. त्या लोकांची मला दया येत होती आणि कौतुकही वाटत होते की त्यांना याची सवय दिसतेय.

गाडी आता हलणार नाही असे दिसताच काही लोक खाली उड्यामारुन ट्रॅकवरुन चालत घाटकोपर स्टेशनकडे जाऊ लागले. फार लांब नव्हते ते. पण जसे ते नाल्याजवळ गेले तसे झोपडीतले एक दोन लोक ओरडुन पुढे गेले आणि नाल्यावरुन ट्रॅकवरुन नक्की कुठुन जायचे ते सांगितले.
अंधार व्ह्यायच्या आत उतरुन निघुन जावे असे म्हणत बरेच लोक जाऊ लागले. माझ्या कापडी शबनम पिशवीत ओरिजिनल सर्टिफिकेट्स, भिजली असती त्यामुळे मी जाऊ शकत नव्हतो. हळु हळु ज्यांना उडी मारणे शक्य आहे ते सगळेच जाऊ लागले. आता डब्यात फक्त वयस्क, उडी न मारता येणारे लोक शिल्लक होते, तरुण माझ्या सारखे एक दोघेच..
झोपडपट्टीच्या लोकांच्या लक्षात आले की वयस्क लोक / स्त्रीया गाडीतून उतरु शकत नाहीत, की पुलाच्या ट्रॅकवरुन चालु शकणार नाहीत. आणि पूर्ण अंधार व्हायच्या आत जायला हवे.
तर ते झोपडपट्टीतले लोक ज्यांच्या घरात कमरे पर्यंत पाणी शिरले होते, ज्यांची बायका पोरे छतावर भिजत बसली होती, त्या लोकांनी स्टुल आणले आणि वयस्क लोकांना आणि स्त्रियांना गाडीतून उतरण्यास मदत करु लागले, त्यांना हात धरुन नाल्यावरील ट्रॅक पार करुन देउ लागले!
हे बघुन मी तर पूर्ण हेलावून गेलो. विचार आला आपल्या घरात असं कमरे पर्यंत पाणी शिरलं असतं तर काय केलं असतं? इथे खरंच माणुसकीचा अफलातून अनुभव येत होता. मी आणि इतर जण सुद्धा आता गाडीच्या आतून वयस्कांना उतरायला मदत करु लागलो.
सगळा डबा रिकामा झाल्यावर मला म्हणाले चल उतर तू आता. मी माझी अडचण सांगितली की माझे ओरिजिनल सर्टिफिकेट्स आहेत, भिजतील.
मग त्यांनी दोन पॉलिथिनच्या पिशव्या आणुन दिल्या त्या मी झटकून, उलट्या करुन रुमालाने पुसून कोरड्या केल्या आणि त्यात सर्टिफिकेट्सचे फोल्डर, पैसे सुरक्षितपणे ठेवुन मी गाडीतून उडी मारली तेव्हा अंधार झालाच होता आणि मी शेवटलाच होतो.
त्या लोकांचे आभार कसे मानावे कळत नव्हतं. जमेल तसे मानून आणि मनातून अनेक दुवा देत निघालो आणि घाटकोपर स्टेशन गाठलं. तिथुन बेस्टच्या बसेस सुरुच होत्या.

हा अनुभव मला खुप काही शिकवून गेला. उगाच आपल्याकडे हे नाही, ते झालं म्हणुन दु:ख करत बसायचं नाही, वेळ पडेल तेव्हा दुसर्‍यांना मदत करायला हिचकिचायचं नाही, आणि कोणी गरीब / झोपडपट्टीवाले वगैरे आहेत म्हणुन कधी कोणाला कमी लेखायचं नाही.

मानव, खरोखर खुपच छान अनुभव! असे अनुभव केवळ वेळवर माणसातला माणूस कसा जागा होतो ह्याचे प्र्त्यंतर आणून देणारा! मुंबईत तर अतीवृष्टीच्या काळात बरेच जण असे एकमेकांसाठी धावून जाताना दिसतात!

वेळ पडेल तेव्हा दुसर्‍यांना मदत करायला हिचकिचायचं नाही, आणि कोणी गरीब / झोपडपट्टीवाले वगैरे आहेत म्हणुन कधी कोणाला कमी लेखायचं नाही.>>>> + १०० अगदी खरं.
बाकीच्यांचे अनुभव ही छान.

>>>>>>>हा अनुभव मला खुप काही शिकवून गेला. उगाच आपल्याकडे हे नाही, ते झालं म्हणुन दु:ख करत बसायचं नाही, वेळ पडेल तेव्हा दुसर्‍यांना मदत करायला हिचकिचायचं नाही, आणि कोणी गरीब / झोपडपट्टीवाले वगैरे आहेत म्हणुन कधी कोणाला कमी लेखायचं नाही.>>>>>> अगदी >>>>
तुमचा हा अनुभव मी whats app वर शेयर केला तर चालेल का.

नमस्कार….हा मला आलेला अनुभव.

माझ्या घरची परिस्थिती फार हलाखीची होती. वडील आमच्या लहानपणीच वारले. आमची ४ भावंडांची जबाबदारी फक्त आईवर. मदत करणार कोणीच नाही. अश्यातच माझ्या लहान बहिणीची तब्येत बिघडायला सुरुवात झाली. वोमेट्स, अशक्तपणा आणि पोटदुखीने हैराण झाली होती ती. त्यावेळी ती ईयत्ता ६वीत शिकत होती. तिची अवस्था बघवत नव्हती आणि आई पण लाचार असल्याकारणाने मोठ्या डॉ. कडे तिला घेऊन जाऊ शकत नव्हती. सगळे डॉ. करून झाले. पण गुण येत नव्हता. आम्ही तिला बघून गुपचूप अश्रू काढायचो.

मग एके दिवशी ती तिला आमच्या डॉ. ने अपेंडिक्सच ओपरेशन कराव लागेल अस सांगितलं. आई खूप घाबरली. काय करायचं? पैसे कुठून आणायचे? काहीच मार्ग सुचत नव्हता. तिला अस घाबरलेल बघून डॉ. नि कारण विचारलं. आईने त्यांना सगळी सत्य परिस्थिती सांगितली. त्या डॉ. कसलाही विचार न करता स्वत: आईला पैसे देऊ केले आणि सांगितलं ऑपरेशनची तयारी करा आणि काही मदत लागली तर कळवा.

त्याच डॉ. च्या रेफ़ेरन्स ने एका चांगल्या हॉस्पिटल मधे तीच ओपरेशन झालं आणि ती ठणठणित बरी झाली.
असा हा डॉ. आमच्या मदतीला धाउन आला. आज तीच बहिण एका प्रतिष्ठीत lab मध्ये काम करते आणि कर्मधर्म सैयोगाने त्याच डॉ. च चेकअप करते. (ते डॉ. ७०+ वयाचे आहेत आज. पण तरीही क्लिनिक चालवतात जास्त फीज न घेता)

Pages