मानवीय!!

Submitted by कृष्णा on 10 February, 2016 - 01:44

हा मानवीय धागा!

आपण समाजात वावरत असता बरेच मानवतेचे अनुभव येतात ते एकमेकांशी शेअर व्हावे हा उद्देश्य!

सुरवातीलाच माझा एक किस्सा सांगतो!

साधारण १९९१ च्या सुमाराची गोष्ट... मी ऱोह्याला होतो तेंव्हा ऐन उन्हाळ्यात मे महिण्यात काही कामानिमित्त मी आणि माझा मित्र बाईकवरुन अलिबागला गेलो होतो! काम आवरुन साधारण दु. १२ च्या सुमारास परत निघालो. रामराज मार्गे सधारण २५-३० किमी आल्यावर रोह्यापासुन १०-१५ किमी अलिकडे बाईक अचानक बंद पडली!!
अर्धा तास किक मारुन थकलो पण सुरु व्हायचे नांव नाही पेट्रोल प्लग सगळे ओके!! शेवटी बर्‍याच वेळाने एक बस आली तिच्यात मित्राला रोह्याला जाऊन मेकॅनिक घेऊन ये म्हटले! तो गेला मी आपला एका वडाच्या डेरेदार झाडाखाली बाईक जवळ बसुन राहिलो. दुपारची वेळ रणरणते ऊन रस्त्यावर चिट्पाखरु नाही. दमल्याने आणि उन्हाने घश्याला कोरड पडलेली जवळ पाणी नाही समोर साधारण शे दोनशे पवलावर काही घरे होती तिथे गेलो पाणी विचारले प्यायला कुणी देईना ३-४ घरात जाउन आलो सगळे म्हणे पाणी नाहीए.... तसाच धापा टाकत झाडाखाली आलो.... उजव्या बाजुला १०० पावलावर अथांग खाडी पण प्यायला पाण्याचा थेंब नाही.... शेवटी विचार केला २ घोट खाडी तर खाडी पिऊयात २ घोट. तिथे जाऊन ओंजळीत घेतले तर काळे कभिन्न पाणी!! तसाच माघारी आलो....
तहानेने व्याकुळ म्हणजे काय हे पहिल्यांदा अनुभवत होतो.... रोह्याच्या रस्त्याकडे पहात....

तेवढ्यात डाव्याबाजुने एक स्त्री डोक्यावर पाण्याचा हंडाघेऊन वर आलेली दिसली हाताशी एक पोर.. दोघेही असल्या उन्हात अनवाणी ती जवळ आली तसे ताई पाणी मिळेल का प्यायला घोट्भर म्हणून विनवणी केली... तिने अगदी हसतमुखाने हंडा डोक्यावरचा खाली घेतला विशेष म्हणजे हंड्यावर एक ग्लास पण होता! ग्लास काठोकाठ भरुन तिने दिला प्यायला घटाघटा अधाश्या सारखे ते प्यायले.... खरोखर त्या क्षणी ते अमृत होते माझ्यासाठी... मी ग्लास परत देऊ लागलो तसे अजुन्हवे का म्हणून ती पुन्हा देऊ लागली... त्या माऊलीने उरापोटी आणलेल्या त्या हंड्यातुन आपण एक ग्लास घेतला हेच खुप हा विचार आला तत्क्षणी... त्या माऊलीच्या चेह-यावरचे समाधान माझ्या दहापट होते हे जाणवले... खिश्यात हात घालून हातालालागेल ती नोट काढून तिच्या मुलाच्या हातात ठेवली... मला ते पैसे कश्याला देताय म्हणून म्हणू लागली... विशेष म्हणजे मला पाणी दिल्यावर ती माऊली आल्या रस्त्याने पुन्हा गेली डाव्याबाजुचा रस्ता उतरुन......

आता हा अनुभव ह्याला दैवी म्हणा मानवी म्हणा वा मानवातल्या देवाचा म्हणा....
त्या २-३ तासातले अनुभव आयुष्यभर न विसरण्यासारखे आणि खुप काही शिकवुन गेले तेंव्हा..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कृष्णा तुमचा अनुभव फारच छान वाटला Happy
असाच काहीसा अनुभव माझ्या आणि माझ्या नवर्याच्या बाबतीत घडला होता,
तो म्हणजे आम्ही एकदा ७-८ वर्षा पूर्वी दादरच्या सिद्धीविनायकाला चालत जायचं ठरवलं होत.
आम्ही भांडूप ते दादर चालत प्रवास केला तसे बरेच लोक करतात ते हि अनवाणी,
वाटेत तरी माटुंगा पर्यंत आल्यावर माझ्या नवर्याचा पाय चालून चालून दुखू लागला,
सिद्धिविनायकाला गणेश चतुर्थी असल्यामुळे खूप गर्दी असणार होती म्हणजे दर्शन देखील लौकर मिळणार न्हवत,आणि नवर्याला तर खूप त्रास होत होता आम्ही तसेच हळू हळू मंदिरा पर्यंत पोहोचलो. मंदिरा पर्यंत पोहोचे पर्यंत नवरा अक्षरशः लंगडत चालत होता. तिकडची गर्दी पाहून तर रडायला यायला लागल आणि अचानक तिथल्याच एका सेवेकर्याने आम्हाला पाहील आणि तो माणूस आम्हाला सोबत घेऊन थेट गाभार्यापर्यंत घेऊन गेला. आम्ही त्याचे आभार मानले . दर्शन घेताना नवर्याच्या डोळ्यातून पाणी येत होत.. हे मी काद्धीच विसणार नाही ..

बेस्ट धागा ! उच्च माणुसकीचे आलेले अनुभव इथे लिहायला आवडेल.
बाकी सकाळ पासुन एकच प्रतिसाद या धाग्याला? आपल्या सगळ्यांना कितीतरी माणुसकीचे अनुभव आलेले असतात, ते कोणीच शेअर केले नाहीएत. आश्चर्य आहे. 'अमानवीय' मात्र भरभरुन वहात असतो, ते सुद्धा ऐकीव किंवा काल्पनिक किश्श्यांवर ...... ह्म्म्म.

आत्ता काही दिवसांपुर्वी ऑफिसमधून येत होते आणि रस्त्यात गाडीतलं पेट्रोलच संपलं. मी नेहमी गाडी सुरू केल्या केल्या आधी पेट्रोलचा काटा बघतेच पण त्या दिवशी डोक्यात इतके विचार चालू होते की लक्शातच नाही आलं आणि घरापासून् आणि पेट्रोलपंपापासून पण साधारण ४ किलोमिटर अलीकडे गाडी बंद पडली Sad
काहीच दुसरा मार्ग नव्हता त्यामुळे गाडी ढकलायला लागले. रस्त्यात एका माणसाने गाडी थांबवली आणि म्हणाला की चल बस गाडी वर आपण पेट्रोल घेऊन येऊ. मी जरा घाबरले आणि म्हणलं नको थॅंक्स तसा तो ओके म्हणुन निघून गेला. मग वाटलं अरे बिचारा चांगला होता आणि खरच मदत करू इच्छित होता. पुन्हा काही उपाय नव्हता. गाडी ढकलायला लागले. साधारण ३ किलोमिटर गाडी ढकलल्यावर मात्र पारच हिंमत संपली आणि मग मी गाडी बाजुला लावून थांबले जरा वेळ इतक्यात तिथे एक मुलगा आला आणि विचारलं पेट्रोल संपलंय का? आणि एक मिनिट थांब म्हणुन स्वताची गाडी बाजुला लावली. भर रस्त्यात इकडे तिकडे फिरून त्याने एक रिकामी (दारुची) बाटली शोधून काढली. त्याच्या गाडीतून पेट्रोल काढून माझ्या गाडीत टाकलं आणि म्हणाला, 'पंपापर्यंतच जाईल. माझ्या गाडीत थोडंच पेट्रोल होतं म्हणुन जास्त देता आलं नाही..... सावकाश जा'. आणि मग निघून् गेला.
मला खुप छान वाटलं.god bless him Happy

प्रिती, रिया, तुमचे अनुभव छानच! Happy

अगदी निरपेक्ष विचाराने ही मदत होते आपल्याला आणि नकळत माणुसकी वरचा विश्वास दृढ होतो! Happy

मानव, नक्की लिहा! Happy

बाकी सकाळ पासुन एकच प्रतिसाद या धाग्याला? आपल्या सगळ्यांना कितीतरी माणुसकीचे अनुभव आलेले असतात, ते कोणीच शेअर केले नाहीएत. आश्चर्य आहे.>>>>

मनि, अगदी!! पण येतील अजुन. बघ रियाचा आलाय! Happy

अगदी छोटयात छोटा अनुभव आपल्याला खुप काही देऊन जातो शिकवून जातो!

सुंदर विषय आहे. पहिला अनुभव कथन तर अप्रतिम. कडाक्याच्या उन्हात अति तहानेने शरीरातील पाणी कमी होऊन जीवावर बेतू शकते. त्यामुळे आपणास भेटलेली ती माऊली देवाहून कमी नव्हती यात वादच नाही. लिखाण पण अतिशय परिणामकारक. इतके कि वाचल्यानंतर मी दोन घोट पाणी प्यायलो (खरेच! मस्करी नाही). शेअर केल्याबद्दल धन्यवाद.

खूप वर्षांपूर्वी माझ्या एका मित्राने सांगितलेला अनुभव इथे देत आहे त्याच्याच शब्दात:

मी एकदा कोल्हापुरात रेल्वे फाटक क्रॉस करत होतो (त्या वेळी ब्रिज नव्हता. लोक लोखंडी बार खालून वाकून जात व रूळ क्रॉस करत). कसल्यातरी टेन्शन मध्ये असल्याने मी स्वत:च्याच विचारात मग्न होतो. माझे आजूबाजूला ध्यान नव्हते. रात्रीची वेळ होती. आजूबाजूला कोणी माणूस काणूस नव्हते. आडव्या लावलेल्या बार खालून जाऊन एकटाच रूळ क्रॉस करत होतो. तितक्यात रेल्वेच्या शिट्टीचा खच्चून आवाज झाला. कानठळ्या बसल्या. तिथे दोन तीन रूळ होते. प्रचंड वेगाने एक्स्प्रेस येताना दिसली. पण नक्की कोणत्या रुळावरून गाडी येत आहे कळेना. माझा श्वास गोठला. गात्रातले त्राण नष्ट झाले. काळ जवळ आला ह्या भयाण जाणीवेमुळे डोक्यापासून पायापर्यंत वीज चमकावी असे झाले. बधीर होऊन काहीच न सुचल्याने मी तसाच रुळाच्या अगदी जवळ थिजल्या सारखा उभा राहिलो.

इतक्यात कुठूनसा एक उंचापुरा, धिप्पाड म्हातारा तरातरा चालत माझ्या मागून आला. आणि एका झेपेत माझी बकोटी पकडून काही कळायच्या आत त्याने मला रुळावरून बाजूला ढकलले. मी जवळजवळ कोलमडून पडलोच आणि त्यानंतर क्षणार्धातच ती अवाढव्य एक्स्प्रेस धाडधाड धाडधाड करत त्या रुळावरून निघून गेली. मला दरदरून घाम फुटला होता. घशाला कोरड पडली होती. जाम भेदरून गेलो होतो. फाटकावरच्या दिव्याच्या प्रकाशात मी पाहिले. डोईला पांढरा फेटा, पिळदार मिशा, अंगात बाराबंदी आणि खाली धोतर असलेला असा तो म्हातारा. धन्यवाद म्हणायला पण संधी मिळाली नाही. म्हणणार तरी केंव्हा? मी स्वत:च भानावर यायला मला काही मिनिटे लागली. तेवढ्यात आला तसा काठी टेकत तो तारतार तारतार निघून पण गेला. कोण होता. कुठून आला. कुठे गेला. काही कळले नाही. सगळ्या घटना काही क्षणात घडल्या.

त्या आजोबांना भेटायची रुखरुख मनाला लागून राहिली होती. त्यानंतर मी अनेकदा तिथून गेलो. काही वेळा तर मुद्दाम वेळ काढून त्याच वेळी रात्रीचा तिथे गेलो. पण ते आजोबा पुन्हा कधीच दिसले नाहीत. तिथल्या आसपासच्या फळ भाजी विक्रेत्यांकडे पण मी अनेकदा फुटकळ चौकशी केली. अर्थात त्यातून काहीच गवसले नाही.

ध्यानीमनी नसताना आलेल्या जिवावरच्या संकटातून मला वाचवायला अकस्मात तिथे आलेला तो म्हातारा म्हणजे माझ्यासाठी देवच म्हणायला हवा.

अतुल, खुपच थरारक अनुभव! अशी मदत करणारी माणसे मदत करताना कसलाही विचार वा अपेक्षा ठेवित नसतात... अगदी निरपेक्ष.. Happy

धन्यवाद वर्षू... Happy

कृष्णा, पॉझिटिविटी वाढवणारा धागा आहे!! >>> म्हणुनच मला अगदी आवडला. इथे सगळ्यांनी भरभरुन आपले अनुभव लिहायला हवेत. नुसते मिरॅकल्स नाहीत तर जाता येता आलेले छोटे छोटे माणुसकीचे अनुभव...... जे आपल्याला स्वतःला आले असतील, फेबु वर किंवा न्युज मधे वाचले असतील. अशा गोष्टी वाचुन माणसांवरचा विश्वास वाढत जातो.

इथे आता रेग्युलरने वाचेन आणि माझा अनुभव लिहेन वेळ झाल्यावर.

चांगलेच अनुभव लिहायचे ना? / का?>>>

अर्थात चांगलेच!! कारण मानवीय वा माणुसकी ही चांगलाच अनुभव देते! आणि चांगली शिकवण पण!

चांगलेच लिहिलेले चांगले कारण वाईट अनुभव लिहायचे म्हणेल तर जनता अगदी १००००००० पोस्टी टाकेल.>>>>

रिया, अगदी अगदी!! Happy

सुरेख अनुभव आहेत एकेकाचे.
हे माझेही काही शब्दः
२००९ च्या जानेवारी महिन्यात आई, बाबा, व मी वसंतपंचमीच्या उत्सवानिमित्त नारेश्वर(गुजराथ) इथे नर्मदातटी गेलो होतो.जातांना रेल्वेचे रिझर्वेशन सुरतपर्यंत असल्याने प्रवास आरामात झाला. सुरतच्या पुढे पालेजहुन नारेश्वरला २० किमी जावे लागते. रस्ता अक्षरशः खडकाळ. थंडीचे दिवस असल्याने सामान बरेच होते. येतांनाचे रिझर्वेशन सुरतहून होते. पण शेवटपर्यंत कन्फर्म झाले नाही. तरी दुसर्या दिवशी माझी ड्युटी असल्याने जागा मिळेल तशी आणि तिथे बसू असा ठरवून निघालो. प्लेटफ़ोर्म वर सुरतची आत्या, आतेभाऊ सगळे जण सोडवायला आले. संध्याकाळी ७ ची ट्रेन. अजमेर बंगलोर एक्स्प्रेस. प्रवाशांनी खचाखच भरलेली ट्रेन. दारात सामानासहित आई-बाबांना बसवून मी कुठे टेकायला तरी जागा मिळते का हे बघत फिरत होते. बरेचशे डबे इंटरकनेक्टेड असल्याने ३-४ डब्यात गर्दीतून वाट काढत तीनदा चक्कर मारली. राजस्थानी अवाढव्य फेटे घातलेले लोक, त्यांच्या घुङ्घट घेतलेल्या बायका, मुले अशी बहुतांशी फॅमिली मेम्बर्स ने भरलेली गाडी. शेवटी हताश होऊन मी एका ठिकाणी उभे राहिले. तर एक मध्यमवयीन गृहस्थ विचारू लागला. तुम्हाला जागा हवीये का?
मी हो म्हणाले आणि आई बाबांना दारात बसवून आले हे ही सांगितले. मग तो म्हणाला की त्याची सून पलिकडे एका बर्थवर बसली आहे. तिला मी इकडे बोलावतो. तुम्ही तिच्या जागेवर बसा". अगदी हायसे वाटले… चला निदान बसायला तरी जागा मिळाली. खालचाच बर्थ होता. आम्ही तिघेही एकाच बर्थवर बसलो. रात्री झोपण्याची वेळ झाली तसे त्याची एक नात नातू ही आपला बर्थ सोडुन त्यांच्यात सामील झाले. तो ही बर्थ आम्हाला मिळाला. रात्री टीसी येइल असे वाटले होते...पण तो ही आला नाही.
पहाटे ४-४:३० ला पुणे स्टेशन वर उतरलो. तर त्या गृहस्थाची फॅमिली पण उतरली. त्यांचे शतश: आभार मानले.
आख्खी रात्र इतक्या सामानासहित टॉयलेटचा वास सहन करत काढावी लागली असती. आईला दम्याचा त्रास होता.

एकदम पॉझिटीव्ह अनुभव आहेत सगळ्यांचे.

२०१४ च्या मायबोली गणेशोत्सवात 'नांदतो देव हा' या नावाचा एक उपक्रम होता. त्यात असेच माणसाच्या रुपात वावरणार्‍या देवाचे अर्थात माणूसकीचे, निरपेक्षपणे केलेल्या मदतीचे अनेक अनुभव लिहीले होते मंडळींनी. हे वाचत असताना तो धागा आठवला.

मस्तच अनुभव आणि धागा पन छानच..
काय पण दैवदुर्विलास आहे.. वाईट अनुभव म्हटल असत तर सटासट आठवले असते.. चांगले म्हटक्यावर डोक्याला जरा ताण द्यावा लागतो..
मीसुद्धा लिहणार येथे नक्की..
आत्तापर्यंत आलेले सर्वच अनुभव मस्त Happy

छान विषय! माझ्या बाबतीत घडलेली मानवीय घटना आशी आहे.
स्थळ सँन फ्रान्सिस्को ईंडीयन कौन्सुलेट. माझा पासपोर्ट संपयला आला होता. नवीन करण्याची तयारी सुरु केली होती ईतक्यात अचानक वडील वारल्याचा फोन आला. आम्ही दोघी बहिणी अमेरिकेत असतो त्यामुळे आईपाशी जाणे गरजेचे होते. कोणतीही विमान कंपनी तिकिट द्यायला तयार नाही कारण पासपोर्टची मुदत. अखेर सँन फ्रान्सिस्को ईंडीयन कौन्सुलेटला गेले.तिथे जे प्रमुख होते त्यांना परिस्थिती समजावून सांगितली. त्यांनी लाईन मधुन बाहेर येण्यास सांगितले. त्यांनी सांगितले कि तुमचे पासपोर्ट रिन्युवल्चे अ‍ॅप्लिकेशन ऑनलाईन भरा ईथेच माझ्यासमोर. मग दुपरी १२ वाजता त्यांची ऑनलाईन सिस्टीम डेटा पुल करते त्यामध्ये माझे अ‍ॅप्लिकेशन आले. ते तिथल्या तिथे घेउन त्या माणसाने मला १:१५ वाजता माझा नुकताच छापलेला नवीन पासपोर्ट मला दिला. जो घेऊन मी ईमिरेटचे टिकिट खरेदी करुन भारतात पोहोचले. त्या देव माणसाचे लाखो ऊपकार आहेत माझ्यावर.

छान धागा कृष्णाजी. Happy

चांगले अनुभव आठवायला अन लिहायला सुरूवात करते.

(१) अमदाबादचे रिक्षावाले - ९०% पेक्षा जास्त इतर शहरातल्या रिक्षावाल्यांपेक्षा अतिशय चांगले. इतर शहरे म्हणजे - पुणे, सातारा, हिंगोली, परभणी, औरंगाबाद, इ.इ. अनेक महाराष्ट्रातील लहान्मोठी गावे.

(२) दुकानदार - लहान मोठे - उर्मट नसलेले, भरपूर माल दाखवणारे - घेवो की न घेवो.. Happy

वरचे दोन्ही माझे वैयक्तिक अनुभव आहेत. माझ्या तोकड्या बुध्दीने काढलेले निष्कर्ष आहेत. त्यामुळे यावर कोणी काही लिहीले तरी मी मौन बाळगीन. Happy

अनघा सहमत, मला पण चांगला अनुभव आहे अहमदाबादच्या रिक्षावाल्यांचा.
दुकानदारांबद्दल मात्र माहिती नाही, तो आपला प्रांत नाही. तरी वाईट अनुभव आला असता तर लक्षात राहिला या आख्यायिकेनुसार, दुकानदारांचा वाईट अनुभव आला नाही हे निश्चित.

आत्ताच एक माबोकराचा पण चांगला अनुभव आला. Happy नाहीतर कोणी काही म्हटल की धो धो धुतात करमणूक म्हणून. म्हणून असे डिसक्लेमर टाकावे लागत आहेत हल्ली..

Pages