तांदुळजा मूगडाळ परतून भाजी

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 18 January, 2016 - 07:57
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

तांदुळजा पालेभाजीची १ जुडी / गड्डी, निवडून.

फोडणी साहित्य : तेल, मोहरी, हिंग, हळद, लसणीच्या ४-५ पाकळ्या / लसूण पेस्ट, १-२ सुक्या लाल मिरच्या

भिजवलेली मूगडाळ : पाव ते अर्धी वाटी

मीठ चवीनुसार.

क्रमवार पाककृती: 

तांदुळजा किंवा तांदळजा पालेभाजी काल प्रथमच आणली. बहिणी, मैत्रिणींना भाजीची कृती विचारली असता नेहमीच्या परतून करायच्या पालेभाज्यांसारखीच सोपी कृती असल्याचे लक्षात आले.

तांदुळजाच्या पाल्यातील पाने व कोवळी देठे निवडून घ्या.

IMG_20160118_173839.jpg

कढईत फोडणीसाठी तेल गरम करून त्यात मोहरी घालून ती तडतडली की क्रमाने हिंग, हळद, लाल सुक्या मिरच्या, लसूण पाकळ्या / लसूण पेस्ट घालून थोडे परता. भिजवलेली मूगडाळ घालून एखादे मिनिट परता. निवडलेली व स्वच्छ धुतलेली तांदुळजा भाजी घालून आता ती खमंग परतून घ्या. तीन-चार मिनिटांतच भाजी शिजते. तरी आपापल्या आवडीनुसार भाजी कमी-जास्त शिजवू शकता. चवीनुसार मीठ घाला व थोडे परतून गॅस बंद करा. रुचकर, पथ्यकर, पचायला हलकी अशी तांदुळजा पालेभाजी तयार आहे!

IMG_20160118_174040.jpg

ज्वारीची भाकरी किंवा पोळीबरोबर खायला ही भाजी छान आहे.

वाढणी/प्रमाण: 
पालेभाजीच्या एका जुडीत दोन माणसांपुरती भाजी तयार होते.
अधिक टिपा: 

१. ही भाजी मूगडाळ न घालता फोडणीत लसूण, हिरवी मिरची, कांदा व भिजवलेली हरभरा डाळ किंवा मसूर डाळ घालूनही करतात.

२. या पाल्याची बेसनपीठ लावून पळीवाढी भाजीही करतात. फोडणीत लसूण, तिखट घालून त्यावर पाला परतून त्यात बेसन पाण्यात कालवून घालायचे व भाजी शिजवायची. वरून परत लाल सुक्या मिरच्या व लसणाची फोडणी. तसेच हरभरा डाळीचा भरडा घालूनही ही भाजी करतात. मात्र सगळीकडे फोडणीत लसूण, लाल तिखट किंवा सुकी लाल मिरची / हिरवी मिरची हे सामायिक घटक आहेत. गूळ आपल्या आवडीनुसार घालू शकता. (मी घातलेला नाही.)

३. चवळई किंवा चवळी पालेभाजीसारखीच जरी ही भाजी दिसत असली तरी दोन्ही भाज्यांच्या रंगरूपात व चवीत मला तरी थोडे वेगळेपण जाणवले.

माहितीचा स्रोत: 
बहीण, वहिनी, मैत्रीण
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेशदा ... Lol

श्री .... Proud मेथी, पालक, पातीचा कांदा कसे दिसतात ते ही सांगून टाकाच.

आज आमच्याकडे तांदुळजा केलेली आहे. Happy आधी हा बीबी वाचला असताना पालेभाजीचे पण फोटू काढले असते.

हिरवा माठ, तांदूळजा, चाकवत, अंबाडी, करडई या सर्व वेगवेगळ्या पालेभाज्या. करण्याची पद्धत थोडीफार सारखीच.

आज आमच्याकडे तांदुळजा केलेली आहे. >> मग आता तुम्ही त्या भाजीला तामीळ मधे काय म्हणातात हे सांगा.
तिथुन नवा रुळ पकडेल धागा. Light 1

भाजीवाल्याने आज छातीठोकपणे सांगितले : तांदुळजा, राजगिरा, हिरवा माठ, लाल माठ, चवळई, पोकळा या सर्व वेगवेगळ्या पालेभाज्या आहेत. आज त्याच्याकडे चाकवत, मेथी, कांदापात, पालक व शेपू असल्यामुळे फोटो काढायला चान्स नव्हता. मुकाट्याने चाकवताची जुडी घेऊन घरी परत आले.

तांदुळजा खास आवडीचा.
शेतात बायका खुरपणी करत असताना त्यांना जेवणाची वेळ झाली म्हणून सांगायला गेले की परत येता येता तांदुळजा सापडतो का ते पाहायचे मी. एक ठोंब सापडला की त्याच्या आजुबाजूला ५-६ तरी सापडतातच. लेगेच दुपारच्या जेवणाला आई भाजी करून द्यायची.
आई तेलावर लसणाची फोडणी देवून भाजी टाकत. जरा परतून मिठ टाकले की एक वाफ काढायची की झाली भाजी. अशी फक्त मिठातली भाजी पण चवदार लागते.

नलिनी, बहुतेक तो अगदीच ताज्या भाजीमुळे आलेला चवदारपणा असावा. अर्थात कुठलीही भाजी शेतातून कढईत अन लगेच पानात असेल तर अफाट चव येईल! Happy

बरं माझेही प्रश्न विचारून घेऊ का हातासरशी?

राजगिरा म्हणजे अ‍ॅमॅरांथ हे कळले. होल फुड्समध्ये असते ते. तोच आपला उपासाचा राजगिरा का? अन ही राजगिरा पालेभाजी आहे तिचा अन उपासाच्या राजगिराचा पपसं काय?

अकु.. फोटो नक्की काढ. ए कोणीतरी डेटाबेस तयार करा. राजगिरा, तांदुळजा,माठ, चवळी, चाकवत, ते अजुन एक आंबटचुका का काय असतो तो.. हा पालेभाज्यंचा. तिकडे जवस, अळशी वगैरे घोळ तर मायबोलीफेमस आहेच. फरसबी फॅमिली पण कन्फुजिंग आहे.

बस्कु, हो तोच उपासाला चालणारा राजगिरा. त्याचे मोठे झालेले तुरे काढून त्यातून आपला उपासाचा राजगिरा मिळतो. नवरात्रात राजगिर्‍याची पालेभाजी उपवासालाही चालते.

इथे नीट दिसतंय बघ,

तांदुळजा म्हणतो आम्ही. मस्त भाजी आहे. पार्ले, ठाणे इथे रेग्युलरली मिळते. चवीला चवळीपेक्षा चांगली लागते. हिरवा-लाल माठ, पोकळा, करडई, घोळही पार्ल्याला कायम मिळतो. राजगिरा मात्र शोधावा लागतो.

बहिणीच्या कृपेने काल पोकळा मिळाला (वाईतला, पुण्यातला नाही :डोमा:), हे काही फोटो

ही देठाच्या आतली पोकळ बाजु

pokal pokla deth (Large).JPG

ही जुडी

pokla judi 2 (Large).JPG

पाने जवळुन -

pokla judi 1 (Large).JPG

बहुतेक आता लाल माठ आणि पोकळामधे कन्फ्युजन होणार नाही Happy

मस्त आहे ! फक्त या भाजीला तांदुळजीरा म्हणतात. आणि ही भाजी बाळांतीनीला दररोज देतात !

फोटो मस्त, शब्दाली!
बस्कू, खरंच असा डेटाबेस हवा आहे. रानभाज्या, पालेभाज्या या दोन्ही प्रकारांचा! कदाचित ऑलरेडी असेलही उपलब्ध, फक्त आपल्याला माहीत नसेल.

प्लीज एक धागा काढाना वेगळा. त्यात भाज्यांचे फोटो चिकटवले तर बरे पडेल.
काल बियाणे काढून बघितले तर अमरंथ नावाखाली दोन प्रकारच्या बिया मिळाल्या. एक काळ्या आणि एक पांढर्‍या. यातल्या काळ्या बियांच्या झाडाला लाल तुरे आले होते तर पांढर्‍या बियांच्या झाडाला हिरवट-पांढरे. काळ्या बिया मित्राने दिल्या, पांढर्‍या मी सीड्स ऑफ इंडीयाकडून मागवल्या होत्या. मी त्या दोन्हीला एकच राजगिरा-तांदुळजा समजत होते. Happy

स्वाती, if i remember well राजगिरे काळेही असतात. तुरे लालेलाल अथवा एकदम गडद गुलाबी असतात. काहीवेळा तर आख्खे रोपच नखशिखांत लाल-गुलाबी असते.

Pages