तांदुळजा मूगडाळ परतून भाजी

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 18 January, 2016 - 07:57
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

तांदुळजा पालेभाजीची १ जुडी / गड्डी, निवडून.

फोडणी साहित्य : तेल, मोहरी, हिंग, हळद, लसणीच्या ४-५ पाकळ्या / लसूण पेस्ट, १-२ सुक्या लाल मिरच्या

भिजवलेली मूगडाळ : पाव ते अर्धी वाटी

मीठ चवीनुसार.

क्रमवार पाककृती: 

तांदुळजा किंवा तांदळजा पालेभाजी काल प्रथमच आणली. बहिणी, मैत्रिणींना भाजीची कृती विचारली असता नेहमीच्या परतून करायच्या पालेभाज्यांसारखीच सोपी कृती असल्याचे लक्षात आले.

तांदुळजाच्या पाल्यातील पाने व कोवळी देठे निवडून घ्या.

IMG_20160118_173839.jpg

कढईत फोडणीसाठी तेल गरम करून त्यात मोहरी घालून ती तडतडली की क्रमाने हिंग, हळद, लाल सुक्या मिरच्या, लसूण पाकळ्या / लसूण पेस्ट घालून थोडे परता. भिजवलेली मूगडाळ घालून एखादे मिनिट परता. निवडलेली व स्वच्छ धुतलेली तांदुळजा भाजी घालून आता ती खमंग परतून घ्या. तीन-चार मिनिटांतच भाजी शिजते. तरी आपापल्या आवडीनुसार भाजी कमी-जास्त शिजवू शकता. चवीनुसार मीठ घाला व थोडे परतून गॅस बंद करा. रुचकर, पथ्यकर, पचायला हलकी अशी तांदुळजा पालेभाजी तयार आहे!

IMG_20160118_174040.jpg

ज्वारीची भाकरी किंवा पोळीबरोबर खायला ही भाजी छान आहे.

वाढणी/प्रमाण: 
पालेभाजीच्या एका जुडीत दोन माणसांपुरती भाजी तयार होते.
अधिक टिपा: 

१. ही भाजी मूगडाळ न घालता फोडणीत लसूण, हिरवी मिरची, कांदा व भिजवलेली हरभरा डाळ किंवा मसूर डाळ घालूनही करतात.

२. या पाल्याची बेसनपीठ लावून पळीवाढी भाजीही करतात. फोडणीत लसूण, तिखट घालून त्यावर पाला परतून त्यात बेसन पाण्यात कालवून घालायचे व भाजी शिजवायची. वरून परत लाल सुक्या मिरच्या व लसणाची फोडणी. तसेच हरभरा डाळीचा भरडा घालूनही ही भाजी करतात. मात्र सगळीकडे फोडणीत लसूण, लाल तिखट किंवा सुकी लाल मिरची / हिरवी मिरची हे सामायिक घटक आहेत. गूळ आपल्या आवडीनुसार घालू शकता. (मी घातलेला नाही.)

३. चवळई किंवा चवळी पालेभाजीसारखीच जरी ही भाजी दिसत असली तरी दोन्ही भाज्यांच्या रंगरूपात व चवीत मला तरी थोडे वेगळेपण जाणवले.

माहितीचा स्रोत: 
बहीण, वहिनी, मैत्रीण
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हां मग रेड लीव्ज असेल तर मी ती करते बर्‍याचदा. मी कांदा, लसूण आणि हिरवी मिरची घालून करते ही भाजी. मुगाची डाळ घालून नाही पाहिली कधी.

सायो, आमच्या इकडे तांदुळजा/तांदुळजो असंच लिहीलेलं पाहिलं आहे.

तांदुळजा, लाल माठ आणि राजगिरा या सगळ्या वेगवेगळ्या भाज्या आहेत. पुणे ग्रामीणमधे राहात असल्याने आम्हाला सहज उपल्ब्ध व्हायच्या या भाज्या. कोणीतरी देठाच्या भाजीचा पण फोटो आणि पाकृ टाका.

तांदुळजा, हिरवा माट, चवळी, लाल माट(पोकळा) ह्या सर्व भिन्न भाज्या आहेत.

तांदुळजा पचायला अत्यंत हलकी अशी भाजी परंतू अंगची चव फार खास नाही.

तांदुळजा, लाल माठ, पोकळा, हिरवा माठ, राजगिरा, चवळी, आंबट चुका, अंबाडी, चाकवत (आणि हो, पालक, मेथी आणि अळू सुद्धा!!!) हे सगळं वेगळं आहे! Proud
आणि आमच्या घराखालच्या बाजारात हे वेगळं मिळतं. (एकदा हिरवा माठ = राजगिरा असा वाद भाजी घेणार्‍या दोघींत चालू होता त्यामुळे ते जरा क्न्फ्युजिंग असू शकतं. मी त्या जुड्या नीट बघितल्या की सांगेन.)

मलाही चवळी वाटली. तांदुळजा नाही आणली/केली कधी. किंवा चवळी समजुन आणलीही असेल कधी.

ह्या भाजीतली मुगडाळ ३-४ मिनिटात शिजली का? जरी भिजवलेली असली तरी शिजायला जरा जास्त वेळ लागेल ना डाळीला भाजीपेक्षा.

रायगड, खरंच टाकते. संध्याकाळी शेतातल्या ताज्या खुडलेल्या भाज्या येतात. जरा सवडीने टाकते. Happy
काल मोहरी आणि करडई होती बाजारात. करडईने कहर पित्त झालं एकदा म्हणून बॅन केली मी.

प्रज्ञा९, करडई पित्तकारक असते का? मी नेहमी करते, प‌ण आजवर तसा त्रास नाही जाणवला.

मीही आता भाजी मार्केटात गेले की पालेभाज्यांचे फोटू काढणार व नावासहित डकवणार! खूपच गोंधळ होतो नाहीतर. इथे हातगाड्यांवर पालेभाज्यांच्या मोठ्या थप्प्या लागलेल्या असतात. त्यातून आपल्याला हवी तशी, हव्या त्या आकाराची, रसरशीत व त्यातल्या त्यात कोवळ्या पानांची पालेभाजीची गड्डी शेजारच्या गड्ड्यांना धक्का न लावता अलगद काढून घेणे म्हणजे महाकर्मकठीण काम! Lol

मूगडाळ नीट भिजवली असेल (मी किमान १० - १५ मिनिटे भिजवते) तर फोडणीतच चटकन शिजते. बाकीची भाजीसोबत शिजते. अजिबात टचटचीत लागत नाही.

फोटो मस्त आहे भाजीचा.. स्पेशली दुसरा फोटो.
पहिल्या फोटोतली भाजी मला पण चवळी वाटतेय Proud

करडई जाम पित्तकारक असते Sad मी तर त्याच कारणाने कित्ती दिवसात केली/ खाल्ली नाहीये.

मंजूडी Sad मीही जरा जपूनच करेन मग! मला मेथी, शेपूने पित्त होतं. असो. कदाचित एरवी करडईसोबत इतर दोन भाज्या, वरण, कोशिंबीर, ताक यांसारखे पदार्थ असतात जेवणात, त्यामुळे तितका त्रास जाणवला नसेल. पण भाकरीसोबत करडई परतून, कच्चा कांदा यासारखा मेनू विलक्षण रुचकर लागतो.

चवळी Proud :घोर प्रश्नांचे काहूऽऽर मनात माजल्याने ग्रस्त व संत्रस्त झालेली बाहुली:

Lol

हां येस्स पूनम.

सॉरी अकु! मला चवळी नाही, हिरवा माठच म्हणायचे होते. वरती चवळी वाचल्यावर सगळा घोळ झाला.

माझ्या माहितीप्रमाणे,

तांदुळजा **, पोकळी, माठ आणि राजगिरा वेगवेगळ्या भाज्या आहेत.

तांदुळजा, पोकळी, माठ : यांची खास बिया पेरून लागवड केली जात नाही, तर त्या अशाच नैसर्गिकरित्या उगवतात. उंची जेमतेम वितभर असेल.

राजगिर्‍याची लागवड केली जाते. चांगल्या वाढलेल्या रोपात याच्या तुर्‍याचीच उंची फुटभर असते. खाली खोडाची उंची कमीतकमी दीडफूट तरी.

माझे ठोकताळे साधारण असे.:
तांदुळजा छोटी पाने. बुटकी रोपे. जून झाल्यावर हीच्या रोपाला अगदी लहानसे बारीक पांढरट/पोपटी तुरे असतात.
माठ पसरट पाने.
पोकळी लालसर पाने.
चवळी म्हणजे लागवड करून वाढवलेली तांदुळजा असते की काय माहीत नाही.

** तांदुळजाला आमच्याकडे 'तांदळीची भाजी' असे म्हणतात.

राजगिर्‍याचा तुरा:
rajgira_1.JPGrajgira_close.JPG

तांदुळजा मी कांद्याबरोबर परतलेलाच, लसुणयुक्त खाल्लाय लहान्पणापासून. Happy असाही करून पाहेन.
गुजरातेत ही भाजी सहज मिळते, शेपू बराच कमी मिळतो. लाल-हिरवा कोणताही माठ (भाजीचा) मिळत नाही. तसेही मराठवाड्यातही पोकळा,ला.हि. माठ पाहिल्याचे आठवत नाही भाजीबाजारात.
करडई तर आम्ही स्वतः खुडून आणायचे फिरून येताना घरी. याचा घोळाणा मस्त होतो.

राजगिरा, तांदुळजा वगैरेचा उलगडा केल्याबद्दल धन्यवाद.
दिनेशदा अ‍ॅग्रोवनच्या लिंकसाठी धन्यवाद.

बापरे, काय कन्फ्युजन आहे. Uhoh

मी हिरवा माठ, लाल माठ या नावानं भाज्या आणल्यात. तांदुळजा हे नाव फक्त ऐकलंय. घरात राजगिरा आहे तो पेरून बघू काय कशा प्रकारची भाजी उगवते ते?

Pages