तांदुळजा मूगडाळ परतून भाजी

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 18 January, 2016 - 07:57
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

तांदुळजा पालेभाजीची १ जुडी / गड्डी, निवडून.

फोडणी साहित्य : तेल, मोहरी, हिंग, हळद, लसणीच्या ४-५ पाकळ्या / लसूण पेस्ट, १-२ सुक्या लाल मिरच्या

भिजवलेली मूगडाळ : पाव ते अर्धी वाटी

मीठ चवीनुसार.

क्रमवार पाककृती: 

तांदुळजा किंवा तांदळजा पालेभाजी काल प्रथमच आणली. बहिणी, मैत्रिणींना भाजीची कृती विचारली असता नेहमीच्या परतून करायच्या पालेभाज्यांसारखीच सोपी कृती असल्याचे लक्षात आले.

तांदुळजाच्या पाल्यातील पाने व कोवळी देठे निवडून घ्या.

IMG_20160118_173839.jpg

कढईत फोडणीसाठी तेल गरम करून त्यात मोहरी घालून ती तडतडली की क्रमाने हिंग, हळद, लाल सुक्या मिरच्या, लसूण पाकळ्या / लसूण पेस्ट घालून थोडे परता. भिजवलेली मूगडाळ घालून एखादे मिनिट परता. निवडलेली व स्वच्छ धुतलेली तांदुळजा भाजी घालून आता ती खमंग परतून घ्या. तीन-चार मिनिटांतच भाजी शिजते. तरी आपापल्या आवडीनुसार भाजी कमी-जास्त शिजवू शकता. चवीनुसार मीठ घाला व थोडे परतून गॅस बंद करा. रुचकर, पथ्यकर, पचायला हलकी अशी तांदुळजा पालेभाजी तयार आहे!

IMG_20160118_174040.jpg

ज्वारीची भाकरी किंवा पोळीबरोबर खायला ही भाजी छान आहे.

वाढणी/प्रमाण: 
पालेभाजीच्या एका जुडीत दोन माणसांपुरती भाजी तयार होते.
अधिक टिपा: 

१. ही भाजी मूगडाळ न घालता फोडणीत लसूण, हिरवी मिरची, कांदा व भिजवलेली हरभरा डाळ किंवा मसूर डाळ घालूनही करतात.

२. या पाल्याची बेसनपीठ लावून पळीवाढी भाजीही करतात. फोडणीत लसूण, तिखट घालून त्यावर पाला परतून त्यात बेसन पाण्यात कालवून घालायचे व भाजी शिजवायची. वरून परत लाल सुक्या मिरच्या व लसणाची फोडणी. तसेच हरभरा डाळीचा भरडा घालूनही ही भाजी करतात. मात्र सगळीकडे फोडणीत लसूण, लाल तिखट किंवा सुकी लाल मिरची / हिरवी मिरची हे सामायिक घटक आहेत. गूळ आपल्या आवडीनुसार घालू शकता. (मी घातलेला नाही.)

३. चवळई किंवा चवळी पालेभाजीसारखीच जरी ही भाजी दिसत असली तरी दोन्ही भाज्यांच्या रंगरूपात व चवीत मला तरी थोडे वेगळेपण जाणवले.

माहितीचा स्रोत: 
बहीण, वहिनी, मैत्रीण
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त!

आमच्याकडे नेहेमी होणारी भाजी. आई नेहेमी कांदा + लाल सुकी मिरचीच्या फोडणीवर परतून करते. आता मी करतांना अशीही करून पाहीन.

एक नबर चवदार भाजी, भाजिला अन्गची चव असल्याने फार काही खटाटोप न करताही चवदार लाग्ते अर्थात लसून-मिर्ची मस्ट आहेच!
याला इन्गजित काय म्हणतात? इथे फार्मस मार्केट मधे येतात काही वेगळ्या पालेभाज्या पण ओळखु येत नाही.

शास्त्रीय नाव - Amaranthus roxbur gianus, कुळ - Amaranthaceae अशी माहिती नेटवर मिळाली.
@ प्राजक्ता.

वर्षूनील, योकु, हो, चविष्ट भाजी आहे. करून पाहा व सांगा! Happy

तांदुळजा फार चवदार भाजी आहे, पण मुंबईत तरी बाजारात मिळत नाही. पुण्याला मिळते का ?
तशी हि भाजी कुठेही उअगवते, ओळखता मात्र आली पाहिजे. मी पुर्वी आमच्या घराच्या आजूबाजूलाच शोधून काढायचो, पण आता सगळीकडे काँक्रिट केल्याने ती दिसतच नाही.

अकु, तू टिपांत लिहिल्या प्रमाणे ही भाजी वेगवेगळ्या प्रकारे केलेली आहे आईनी. त्या सगळ्यात जास्त आवडणारा प्रकार मी जो वर लिहिलाय तोच. गूळ इज नो नो Wink

शेपूची अशीच करतो ना मूग डाळ घालून? ही कधी ऐकली नाही भाजी, पण इकडे दुकानात असली पानं बघितल्या सारखं वाटतंय एशियन सेक्शन मध्ये.

हीच राजगिरा का ? ( किंवा मी तरी राजगिरा समजून खाते बहुतेक Wink ) आमच्याइथले हिंदी भाजीवाले काय म्हणतात ते आठवतच नाहीये. बर्‍याच दिवसांत आणली नाही.
फोटोत दिसतेय ती भाजी चवीला खरंच रुचकर असते.

तांदुळजा फार चवदार भाजी आहे, पण मुंबईत तरी बाजारात मिळत नाही ? अगदी.. त्यामुळेच मला लग्ना अगोदर ही भाजी माहितच नव्हती.मिळत असेल तरी माहित नाही. (लग्नानंतर )नाशिकला मात्र मस्त ताजी,छान तांदूळका मिळते.पहिल्यांदा खाल्ली तेव्हापासूनच आवडली.खूप चवदार आहे.
आमची पध्दत.. निवडलेली पाने स्वच्छ धूवून, एका कढईत पाणी घेउन, त्यात भाजी टाकून ३ ते ४ मिनीटं उकळून घ्यावी.नंतर भाजी निथळून ,पाणी पिळून काढून टाकावं. जिरे,हिरवी मिरची+लसूण पेस्ट ,बारिक चिरलेला कांदा इ.परतून मग भाजी आणि मीठ टाकून परतावे. भाजी तयार. भाकरी आणि पोळी सोबत खूप छान लागते.

मी इथे जवस-अळशी सदृश्य चर्चा सुरु केली बहुतेक Wink
फोटोत दिसतेय ती भाजी मी बर्‍याचदा केलीय गेल्या दोन वर्षांत. मुंबईत कधीच पाहिली नव्हती. पुण्यातच प्रथम दिसली. पण त्याला भाजीवाला आणि आमच्या कामवाल्या मावशी काय म्हणायच्या ते नीट आठवत नाहीये. तांदुळजा नक्कीच म्हणत नाहीत ते एवढे खरे.

* अकु, पुढच्यावेळेस जरा दोनतीन फोटो टाक. परत पाहिल्यावर वाटतंय की मी खाते ती राजगिराच पण ती ह्या भाजीपेक्षा वेगळी आहे Proud
असो. शेतकरी बाजारात मिळाली कधी तर नक्की करेन.

तांदुळजाच्या भाजीला रवाळ लोंब्या असतात त्या चित्रातल्या भाजीला दिसत नाही. त्यात फायबर फार असत.

आमच्याकडे अकोल्यात तांदुळजा मी लहानपणापासून पाहिलेली आहे. ह्या भाज्या निवडण्याचे काम माझी आई न कंटाळता आवडीने करते. त्यामुळे घरी पालेभाज्या येतच येत.

छान आहे रेसेपी.

नाही राजगिरा पालेभाजी वेगळी. त्याची पाने बरीच मोठी असतात. देठ पण मांसल असतात.
तादुळजाची पाने पातळ, त्रिकोणी व साधारण ३ सेमी लांबीची असतात. राजगिर्‍याची ५ ते १२ सेमी असू शकतात.

तांदुळजाला किरमीजी रंगाचे तूरे येतात. ओसाड जमिनीवर पाण्याचा अभाव असेल तर झाडे खुरटलेली असतात, पण अशी भाजीच जास्त चवदार लागते. पाणी मिळाल्यास रोपे तरारतात पण चव कमी होते.

पुर्वी हिची लागवड करत नसत. आपोआप उगवलेलीच खुडत असत. माडगूळकरांच्या एका कथेत या भाजीचा ( तसेच हरभर्‍यावरच्या आंबेचा ) अतिकरुण उल्लेख आहे.

ओह! मी इतके दिवस तांदुळजालाच राजगिरा समजत होते. गेल्यावर्षी किरमीजी रंगाचे तुरे येणारी आणि हिरवे पांढरे येणारी अशा दोन प्रकारची भाजी लावली होती.

माझा व बहिणीचा यावर बराच काथ्याकूट (किंवा प्रेमळ वाद!) करून झाला आहे. तिचे मत हे की ही भाजी म्हणजेच चवळई / चवळी पालेभाजी. परंतु मी बाजारातून चवळई नेहमी आणते व ती भाजी व तांदुळजा यांच्यात नक्कीच फरक जाणवला. या सर्व भाज्यांचे कुळ (स्पेशीज्) एकच असावे - माठ, राजगिरा, चवळई, तांदुळजा वगैरे. पण चव, रंग, रूप, पोत यांच्यात फरक आहे. गुणधर्मांतही असणारच!
मला ही भाजी पुण्यात फुले मंडईत मिळाली. परंतु कल्याणीनगर व कर्वेनगर परिसरांत राहाणाऱ्या बहिणी, वहिन्यांनी सांगितले की त्यांच्या येथेही मिळते ही पालेभाजी. ठाणे व दादर परिसरातही ही भाजी मिळत असल्याचे दुसऱ्या वहिनीने सांगितले.

योकु, अरे वा! एवढ्या वेगवेगळ्या पध्दती आहेत ही पालेभाजी करायच्या हेच मुळात मला माहिती नव्हते! समस्त आप्त स्त्रियांच्या कृपेने ज्ञानात पडलेली भर आहे ही! Lol

राजगिरा आणि तांदुळजा वेगवेगळ्या आहेत. तांदुळजा पहिल्यांदा इथेच इंडियन स्टोअर मधे पाहिला. गुजराथी जेवणात एकदम कॉमन आहे. पातळभाजी, कोरडी भाजी - कशीही छान होते. भाकरीबरोबर मस्त लागते.

अशीच दिसणारी ( किंवा हीच ) भाजी आमचा भाजीवाला ' हिरव्या माठाची भाजी ' म्हणून विकत असे.

हीच व्हरायटी फक्त थोडी मोठी आणि लाल पानं असली की ' लाल माठाची भाजी'.

अकुच्या वरील रेसिपीनी शेपूची भाजी केली आहे. आता तांदुळजा/राजगिरा/माठ असा पण करुन बघेन.

मी तेच लिहायला आले! - हा हिरवा माठ म्हणून ओळखतो आम्ही.
'पोकळा'सुद्धा म्हटलेलं ऐकलंय.

मस्त दिसतेय भाजी.

रच्याकने आता आईला विचारल तर चवळीची भाजी अस ऊत्तर आल Biggrin ह्या भा़जीच श्रावण घेवड्यासारख होणार बहुतेक Wink

टीना अन योकु तांदूळज्या/तांदूळजिर्याच्या भाजीले आपल्या इकळे हिरव्या माठाची भाजी म्हणतेत! मार्केट मधे भेटते ना माठ म्हणले का देते भाजीवाला तुलसीवानी पानं रायतेत! फ़क्त भप्पल मोठे पानं!

अकु,

उत्तम भाजीची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद!! आमची म्हातारी तव्यावरच भाजती भाजी ही नुसता लसुन हिरव्या मिर्चीचा खरड़ा घालुन भाकरी थापुन झाल्यावर

भाजी रेसिपी छान दोन्ही प्रकारे.

हीला बहुतेक हिरवा माठ म्हणतात आमच्याकडे. चवळीपण थोडी ह्याच प्रकारे असते. आता नीट बघेन आणि तांदुळजा नावाने विचारेन.

मी शक्यतो लाल माठ आणते. त्यामुळे ह्या भाज्या घेतल्या नाहीत कधी.

मस्त फोटो आहे अकु.
अमेरिकेतल्या बायांनो, इथे तांदुळजाला काय म्हणतात? हिरवी लाल पानंवाली भाजी हीच का?

नाही, पोही म्हणजे मायाळू. हिच्यापेक्षा मोठी, गोल आणि जाड पानं असतात. शिजल्यावर काहीशी बुळबुळीत होतात.
हा हिरवा माठ - इथे रेड लीव्ज म्हणून असते इन्डियन ग्रोसरीत. रेड म्हणतात पण तो लाल माठ नसतो.

Pages