पौष्टिक वड्या

Submitted by प्रज्ञा९ on 11 January, 2016 - 04:11
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१.५ तास
लागणारे जिन्नस: 

कणीक ३ वाट्या शिगोशीग. नेहमीची घेतली. रवाळ वगैरे नाही.
बेसन पाव वाटी
मूगडाळ पाव वाटी
नाचणीसत्त्व २ चमचे
सुक्या खोबर्‍याचा कीस पाव वाटी
बदाम १०-१२
वेलची पूड स्वादासाठी
मेथीदाणे पाव चमचा
खारीक पूड २ चमचे
तूप - मला पाव किलो लागलं. तुम्ही लागेल तसं घ्या. टीपा बघा.
पीठीसाखर लागेल तशी. बहुधा ३ वाट्या लागेल.

क्रमवार पाककृती: 

झालं काय, की करायला गेले गणपती नि झाला मारूती (किंवा उलट. जे काय असेल ते) अशी ही पाकृ जन्माला आलेली आहे. मला पौष्टिक लाडू करायचे होते. कधी बिघडले नाहीत आजवर. आताही सगळं सामान तेच आहे, पण न जाणे कसा अंदाज चुकल्यामुळे तूप अंमळ जास्त होऊन लाडू वळयावर बसल्याजागी बसले ते उठायला तयार होईनात. म्हणून त्यांना तसंच झोपवून वड्या थापल्या. त्या गार वार्‍यावर ठेवल्यावर चिकटल्या. मग एक हलका चटका देऊन पुन्हा सोडवल्या. त्या सोडवताना वाटलं, जर्रा थांबले असते तर लाडू मस्त वळले गेले असते. असो. तेवढे पेशन्स नव्हते त्यामुळे त्यांना वड्यांच्याच जन्मात ठेवलं. शेवटी खाण्याशी मतलब!

तर,

-थोड्या तुपात मेथ्या गुलाबी रंगावर तळून घ्या. मिक्सरात टाका. त्याच तुपात बदाम भाजून घ्या. मिक्सरात टाका.
-सुक्या खोबर्‍याचा कीस भाजून घ्या. मिक्सरात टाका. खारकेची पूड (मी मुश्किलीने कशाबशा २ काळ्या खारका किसून घेतल्या पूड नव्हती म्हणून. तुम्ही तयार पूड वापरा. हात मोडतो काळी किंवा साधी खारीक किसताना) भाजा. मिक्सरात टाका.
-मुगाची डाळ गुलाबी रंगावर खरपूस करून घ्या. मिक्सरात टाका. हे सगळं करताना लागेल तसं तूप घालून पदार्थ भाजा.
-वेलची पूड तयार नसेल तर १०-१२ वेलच्या सोलून त्याही मिक्सरात टाका. आता सगळं सामान मिक्सरात आलंय याची खात्री झाली की मिक्सर चालू करून ते सगळं बारीक वाटा. अगदी भुगा न होता किंचित भगराळ राहिलं तरी चालेल. त्रास करून घेऊ नका.
-आता कणीक कोरडी भाजायला घ्या. जर्रासा रंग बदलला की अंदाजाने तूप घालत भाजा. मस्त खमंग वास येऊन रंगही आला पाहिजे. मंद आंच महत्त्वाची.
-कणीक परातीत काढा आणि याच पद्धतीने बेसन आणि नाचणीसत्त्व भाजून घ्या. नाचणीसत्त्व जास्त भाजू नका कारण ते मुळात भाजूनच करतात. हलकं गरम केलं तरी पुरे.
-आता सगळी पिठं आणि मिक्सरातलं वाटण, पीठीसाखर घालून एकत्र भरपूर मळा. सावधान!!!! या स्टेजला तूप सुटेल!! मी इथेच फसले बरं! मला मिश्रण जरा कोरडं वाटलं म्हणून मी अगदी १ चमचा तूप गरम करून घातलं नि लाडू बसले! तुमचं तसं नाही झालं तर लाडू वळा, नैतर वड्या थापा!
-जे काही कराल ते एकमेकांना चिकटून ठेवू नका. वड्या किंवा लाडू, एकमेकांना चिकटले तर मोडून नवीन रेस्पी करा नि इथे लिहा.

वाढणी/प्रमाण: 
या प्रमाणात एक परात आणि एक लहान थाळी भरून वड्या झाल्या. लाडू टिचके लहान नसतील तर मध्यम आकाराचे २०-२५ व्हायला हवेत
अधिक टिपा: 

कणीक रवाळ असेल तर तुपाचं प्रमाण बदलू शकेल.
माझी तुपाची फसगत झाली तशी तुमची होऊ नये Wink तूप कमी चालेल बहुधा. मायक्रोवेव्ह व्हर्जनबद्दल मी काही सांगू शकत नाही.
यात तुम्ही काळ्या मनुका, बेदाणे, खजूर तुकडे करून आणि डि़ंक तुपात(किंवा मावेत) फुलवून कुटून घालू शकता. मर्जी अपनी अपनी. पिस्ते-केशराने वरून सजवूही शकता. Proud

फोटो काढलेले नाहियेत. वड्या संपायच्या आत काढला तर चिकटवेन. मागच्या वेळी उत्साहाने परातीतल्या सामानाचे वगैरे काढले नि आमचं दुडदुडबोचकं कॅमेरा घेऊन पळालं. ते तयारीचे नि हे फायनल प्रॉडक्टचे फोटो जमेल तसे टाकेन.

महत्त्वाचं म्हणजे, हे प्रमाण तुमची आवड, पदार्थांची उपलब्धता, वेळ, उत्साह आणि असेल तर पथ्य यावर आरामात बदलू शकता. प्रामाणिकपणे सांगायचं तर मी 'घे की ढकल' या तंत्राने केलंय हे. चुकलंमाकलं समजून घ्या. साखरसुद्धा चव बघत घातलिये. मला चिट्ट गोड नको वाटतं. ३ वाट्या अंदाजाने लिहिलीय, जास्त वाटली तर मापी करा! आणि हो, आमच्या बोचक्याने फराळाला खावं तसं बैठकीवर फतकल मारून ४ वड्या एका वेळी हाणल्यायत त्यामुळे चव मस्त झाली आहे! Proud

माहितीचा स्रोत: 
पारंपारिक
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त रेसिपी..
तुपात तळ्णे बिळणे प्रकरण झेपण्या पलिकडे असल्याने आमचा पास..
बोचक्या करिता ही रेसिपी योग्य ठिकाणी पोचवणेत येइल Wink

छान आहे..
मेथ्या, खारीक वगैरे तळून झाली कि त्यातच कोरडी कणीक भाजायची आणि मग सगळे एकत्र वाटायचे ( कोरडेच ) असे केले कि मेथ्या चांगल्या वाटल्या जातात आणि मिसळतातही. थोडे थोडे तूप घालून एखादा लाडू घट्ट वळून बघायचा. तो वळता आला कि तूप घालणे थांबवायचे. सगळे पिठ एकदम हाताळता येण्यासारखे नसले तर बॅच मधे करायचे.

Happy मस्त पौष्टीक आहेत.
नाचणीसत्त्वऐवजी पनीर चालेल का? Wink

हैला! सीमंतिनी, 'पौष्टिक' वड्या म्हणून मला वाटलं बोगातु चालेल का असं विचारशील Proud

९ताई, खारीक अडकित्त्याने (नसेल तर सुरीने कापून) फोडून घ्यायची, किंचीत भाजायची आणि मिक्सरात पूड करायची. यापुढे किसलीस तर खबरदार! बोटं किसून घ्यायची आहेत का?
पिठीसाखर जेवढ्यास तेवढी लागते, त्यामुळे तू वर लिहिलेल्या प्रमाणात ४ वाट्या तरी नक्कीच लागेल.

क्यालश्यम नको काय? नाचणी काढून टाकली म्हणजे पोषणाचा ब्यालंस जाईल ना! पनीर बरं की क्यालश्यम साठी Wink Happy

पनीर! Lol

मंजूडी, ती काळी खारीक म्हणजे काळ दगड होता. सुरी वाकडी झाली. तिचापण फोटो टाकेन Wink एरवी पूड आणलेली असते कायम. ती संपली. आइ यावेळी एकदम अर्धा किलोचं पॅक मिळत होतं, एवढं घेऊन ते ठेवायला एक डबा गुंतवून ठेवण्यपेक्षा २ खारका किसायचा क्षीण प्रयत्न केला. पुन्हा अजिबात नाही!

खारीक पावडर करणे महाकिचकट काम पडते. मिक्सर वापरला तर हमखास वॉशर जळतो.
आम्ही पूड आणतो, पण ती बहुधा बियांसहित केलेली असते. त्यात गोड्पणा कमी असतो.