सहिष्णू धागा

Submitted by प्रकु on 8 January, 2016 - 16:14

मित्रहो,

शिवशक्ती संगमच्या निमित्ताने काढलेल्या धाग्यावर अतिशय सुंदर आणि संयत शब्दात चर्चा झाली. अनेक प्रश्न तेथे उपस्थित करण्यात आले आणि त्याला सगळ्यांनी मिळून आपापल्या परीने उत्तरे दिली.
मुख्य कौतुक म्हणजे कोणीही विखारी प्रतिसाद न देता एक एक गोष्ट समजून घेतली.

या निमित्ताने विचारांची/माहितीची जी देवाणघेवाण झाली ती अप्रतिम होती. मायबोली सारख्या संकेतस्थळाचा याहून सुंदर उपयोग तो काय असू शकतो.

तोच धागा पकडून कैपोचे यांनी सुचवल्याप्रमाणे हा नवीन धागा येथे काढत आहे. याचा उद्देश मी खाली स्पष्ट करतो.

तत्पूर्वी एक स्वानुभव मला सांगावासा वाटतो.
मी सावरकरांचा निस्सीम भक्त होतो आणि आहे. त्यांच्याबद्दल आणि त्यांनी स्वतः लिहिलेले बरेच लिखाण मी वाचले. स्वातंत्र्य संग्रमातल्या इतर अनेक महापुरुषांबद्दल पुढे वाचनात आले.
यामधून एक विचारधारा निर्माण होत गेली ज्यामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळातल्या जहाल मतवादी विचारांशी जास्त जवळीक होती.
याच बरोबर अजून एक विचारधारा नकळतपणे डेव्हलप होत गेली ज्यात मवाळ गट, गांधीजी यांच्याबद्दल तिरस्कार होता.

यातला 'तिरस्कार' हा शब्द महत्वाचा आहे. हा तिरस्कार उगाच आपला मनात येऊन बसलेला होता.

यावर घरात अनेकदा वडिलांशी वादविवाद करताना ते मला गांधीजींचे महात्म्य सांगण्याचा प्रयत्न करत. लाखो लोक त्यांच्या मागे गेले यात नक्कीच फार मोठा अर्थ आहे असे ते सांगत.
त्यावेळी मला ते फारसे पटत नसे.

पुढे जशी जशी प्रगल्भता वाढत गेली तसतसे मी एका थर्ड आय ने जगाकडे पाहू लागलो. ज्यामुळे मला हे लक्षात यायला लागले कि प्रत्येक माणूस हा त्या त्या वेळेला त्याच्या झालेल्या जडणघडणी प्रमाणे विचार करतो आणि निर्णय घेतो. अर्थात, त्याच्या जागी तो बरोबरच असतो.

सावरकर असो वं गांधीजी, कोणीहि मुद्दाम हून चला आता आपण भारत देशाला खड्ड्यात घालू म्हणून काम केले आहे का.? अर्थातच नाही. दोघांनी कार्य तर भारताच्या उन्नतीसाठीच केले. त्यांची कार्यपद्धती वेगळी होती. इतकेच..

मग आपल्या मनात 'तिरस्कार' असण्याचे कारण ते काय.?

यामध्ये असहमती असू शकते. मतभेद असू शकतात. पण तिरस्कार हा एक बिनगरचेचा घटक आहे.

तिरस्कार अज्ञानातून येतो. आणि मतभेद अभ्यासातून येतात.

या विचारातून मग मी गांधीजींचे चरित्र वाचण्याचे ठरवले. लकीली याच दरम्यान एकदा काकांच्या घरी गेलेलो असताना त्यांच्याकडे मला गांधीजींचे आत्मचरित्र मिळाले. मी ते त्यांच्याकडून घेऊन वाचायला सुरुवात केली.
लवकरच माझे गांधीजींबद्दल असलेले मत पूर्णपणे बदलले.
त्यांच्या काही गोष्टी मला पटल्या, काही नाही पटल्या. पण मनातला गांधीजींबद्दलचा आदर मात्र खूप वाढला. त्यांच व्यक्तिमत्व परिपूर्ण होतं. असं व्यक्तिमत्व जगात पुन्हा होणे नाही या मताला मी आलो.

मनातील पूर्वग्रह बाजूला ठेऊन त्यांच्या चष्म्यातून जग पाहताना खूप छान वाटले. (अजूनही माझे वाचन सुरु आहे. खंड पडलाय जरा, पण लवकरच पूर्ण होईल.)

अशा प्रकारे माझ्या मनातून तिरस्कार हद्दपार झाल्यावर मला एक मानसिक शांतता मिळाली. कोणीही काहिही बोलले तरी राग येईनासा झाला. मन शांत झाले. मी समोरच्याला माफ करायला शिकलो.

अस समोरच्याला एकदा अनकंडीशनली पूर्णपणे माफ करून टाकले कि आपल्या मनातली negativity जाते, याचा मी अनुभव घेतला. माफ करणे हे समोरच्या करता नव्हे तर आपल्या स्वतः करता गरजेचे असते असे मला लक्षात आले.

असो. तर या धाग्यावर हा अनुभव सांगण्याचे प्रयोजन असे कि आपण येथे परस्परविरोधी विचार असलेले लोक एकत्र येऊन, शांतपणे चर्चा करून समोरची बाजू समजून घेऊ. समोरच्याचे मत जसे आहे तसे का आहे त्यामागचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. जेणेकरून आपल्या मनातील तिरस्कार दूर होईल. एकमेकांकडून माहित नसलेल्या गोष्टी कळतील. जाणीवा वाढतील. सहिष्णुता वाढेल. आभ्यास वाढेल. आपल्या पैकी बहुतेकांनी कोणत्या तरी एकाच बाजूचा पण सखोल आभ्यास केलेला असेल. त्याचा एकमेकांना फायदा होईल.

दोन्ही बाजूंची सहमती बऱ्याच बाबतीत शक्य नाही हे तर आपल्याला माहितच आहे. हे गृहीत धरूनच आपण बोलूया. तिरस्कार नाहीसा होत गेला तरी या धाग्याचा उद्देश सफल होईल.
आपण एकमेकांशी असहमत असू, पण तरी एका बाजूने असू Happy

या धाग्यावर सावरकर, गांधी, आंबेडकर, कॉंग्रेस, भाजप, हिंदू, मुसलमान, इसाई कोणताही विषय वर्ज्य नाही.
फक्त हा धागा नावाप्रमाणे सहिष्णू राहू द्यावा. (या दोन वाक्यांवरून हा प्रयोग फारच धाडसी वाटतोय मला)
असो. वरून देव बघत आहे. जो आयडी असहिष्णुता दाखवेल त्याचा मृत्यू अटळ आहे.
कोणीही असहिष्णूता दाखवल्यास त्याला कृपया कोणतेही उत्तर देऊ नका. शांतता राखा.

याच उपक्रमाचाच एक भाग म्हणून आपण जमेल तसे आपापल्या आवडत्या नेत्यावर लेख लिहूया. म्हणजे माहितीची देवाण घेवाण होईल आणि विषय निघतील ..

विषय: 
Group content visibility: 
Private - accessible only to group members

I won't feel alienated. 'Others' might. Generically that seems to be the case to me.

i am talking about policies of an organization. AND condemning it. what is the point of bringing in anecdotal evidence of behavior of individual members of that organization, who may not have any say in the policy making?? >>>

या धाग्यावर संघाबद्दल जनरल चर्चा सुरू आहे, त्या ओघात ते लिहीले होते (माझी मूळ पोस्ट). तुमच्या कोणत्याही पोस्टचे ते उत्तर नव्हते. संघातील लोक जातीयवादी आहेत अशी काही वाक्ये वाचली, तेव्हा मी त्याविरूद्ध जाणारे माझे अनुभव लिहीले एवढेच. 'मला माहीत असलेले बहुतेक संघातील लोक इतर समाजापेक्षा जातीयवादी नाहीत' यापेक्षा कसलाही वेगळा अर्थ त्यात नव्हता. तो तुम्ही चिकटवला व त्याला विरोध करत बसलात - भास्कराचार्य यांनी म्हंटलेला स्ट्रॉमॅन हाच असावा.

What he is saying is that the tendency to brand 'every' person related to sangh as 'evil' or 'bad' is not correct, specially when there is no evidence that the bad:good ratio is any significantly different than any other large collection of human beings coming together under some party or agenda. This is my interpretation of his assertions. >>> ऑल्मोस्ट, पण थोडे वेगळे, भास्कराचार्य. मी ते हीरा यांच्या वाक्याबद्दल लिहीले होते. आणि त्यांनी ही "every" म्हंटलेले नव्हते. त्यामुळे सगळे वाईट आहेत असे ध्वनित केलेले नाही. पण त्यांनी जे लिहीले होते ते अगदी जनरल वाक्य होते, जे कोणाही संस्थेला लागू पडते.

पुन्हा दीमा यांच्या प्रश्नाबाबतः मी लिहीलेली व तुम्हीच पेस्ट केलेली दोन वाक्ये परत देत आहे खाली
१. पण ते संघटनेबद्दल. त्यातले लोक जे परिचयातले आहेत ते "नॉर्मलच" आहेत. ते स्वतः काही करत नसले तर उगाचच त्यांना कशाला दूषणे द्यायची?

२,. कोठे मांडली आहे मी ती थिअरी? माझे संघातल्या लोकांबद्दल निरीक्षण आहे ते लिहीले. अ‍ॅनेक्डोटल आहे, असेही लिहीले. त्यावरून हे बाकीचे मत कसे ठरवलेत तुम्ही?

>>>> आता यातून मी संघ या संस्थेबद्दल काही म्हणत आहे हा निष्कर्ष तुम्ही कसा काढलात हे मी कसे सांगणार. जे लोक स्वतः वाईट नाहीत त्यांना कशाला दूषणे द्यायची असे म्हंटले म्हणजे यात संघ या संस्थेबाबत कॉमेण्ट कोठे दिसली तुम्हाला?

संघ हा मुळातच त्याच्या मूलभूत विचारांसाठी वाईट आहे.

कोणते हे मूलभूत विचार?

उदाहरण क्र. १.

"हिंदूं"चे संघटन.
हिदुत्व ही "लाईफस्टाईल" असल्याच्या कितीही बाता मारल्या, तरी हिंदू म्हणजे काय, ते सगळ्यांना ठाऊक आहे. एकदम सिंपल उत्तर, इ. २री च्या मुलांना समजेल असे = 'देवळात जातात ते हिंदू'. अन इ. हागरीबिगरीच्या लोकांसाठी, शाळेच्या दाखल्यात अन इतर सर्कारी कागदांवर जे धर्माच्या रकान्यात 'हिंदू' लिहितात ते.

ओके. गुड.

कशासाठी हे असे संघटन करणे गरजेचे आहे? धर्माच्या बेसिसवर का?? राष्ट्रभक्त ना तुम्ही? मग भारतीयांचे संघटन का नको? हिंदूच का??

जर रोजच्या जगण्यात ९९% वेळा, उदा. जॉब, प्रवास, जेवण, झोप, व्यायाम इ. इ. इ. करताना हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन किंवा इतरही धर्माची गरज वा संबंध वा उपयोगच नसेल, तर धर्माच्या बेसिसवर संघटन करण्याची गरज काय?

मी इथे मोहन भागवतांचा एक व्हिडियो दिला होता त्यात ते म्हणत होते की आता संघात सर्व धर्मांचे लोक आहेत..मुस्लिमही आहेत.
तरीपण आपण असं धरुन चालू की ती 'फक्त हिंदूंची' संघटना आहे. ओके. तर या अशा 'फक्त अमुक' यांच्या अनेक राजकीय संघटना/पक्ष आहेत..B is subset of A..where A is the total Indian population...यात बी कोणीही असेल अमुक एक जात, किंवा उत्तर भारतीय महासंघ, किंवा आणखी कसला तरी महासंघ किंवा दक्षिणेकडील भाषाभिमानी पक्ष किंवा हार्दिक पटेल किंवा ३७० वाले काश्मिरी किंवा अकाली दल किंवा ओवेसी किंवा..यादी न संपणारी आहे. तर मग या सर्वांनाच विरोध आहे का? हे सर्व पण वाईट आहेत का?

कापोचे, जातीयवाद कशातून येतो वाली सगळी पोस्ट आवडली.

मला अ‍ॅड करायला तुम्ही काही ठेवलं नाहीये त्याच्यात...सगळ्या पोस्टलाच +१

धन्यवाद सनव

जातीयवाद म्हणजे काय हे ज्याला चटके बसतात त्याला लवकर समजेल तितकं ज्याला ते बसत नाहीत त्याला समजणार नाही. आरक्षण हा जातीयवादाचा उपाय नसून जातीयवादामुळे जे चटके बसतात त्याचे निवारण करण्यासाठी प्रतिनिधित्व असावे म्हणून केलेली तजवीज आहे. व्यवस्थेत त्या त्या समाजाचे प्रतिनिधी असावेत या व्यवस्थेमुळे जातीयवाद नाहीसा होईल असा दावा कुणी करत नाही. पण या व्यवस्थेने जातीयवाद वाढतो अशी नवी थिअरी मांडणे हे जातीयवादातून येणारे लबाड दावे होत.

शाळेत दाखल्यावर जात येते त्यामुळे जातीयवाद निर्माण झाला की जातीयवादामुळे ही परिस्थिती ओढवली हे समजू लागले की विवेक काम देऊ लागलाय हे समजावे. एकदा विवेक काम देऊ लागला की समाजाचे भान आले असे म्हणता येईल. जर अनेक लोक असे अविवेकी दावे करत असतील तर त्यांचे ब्रेनवॉश झालेले आहे असे समजावे. अशा प्रकारचे ब्रेनवॉश झालेले लोक जर एकाच संघटनेचे असतील आणि त्या संघटनेचे अधिकृत हेतू कोणते अनधिकृत कोणते याचा पत्ता लागत नसेल तर ज्यांना चटके बसलेत त्यांनी सावध राहण्यात काहीही गैर नाही.

उतरंडीची सामाजिक व्यवस्था फेकून देण्यासाठी प्रयत्न केल्याचे स्वातंत्र्योत्तर काळात कधी दिसलेले नाही. अजूनही त्या दिशेने पावलं पडल्याचे जाणवत नाही. असे असताना आम्ही बदललो असे केवळ म्हटल्याने बदल झाला असे मानले पाहीजे अशी अपेक्षा ठेवणे हास्यास्पद आहे. आहे त्या व्यवस्थेत समरस होऊन जा हे म्हणणे बदलांना विरोध करण्याचेच आहे. इतिहासात रमू नका असे म्हणताना एकीकडे मुस्लिमांचा इतिहास साग्रसंगीत शिकवला जात असेल, त्यांचे अन्याय अत्याचार सांगत प्रतिक्रियेने "जागृती" केली जात असेल, तर दुस-या समूहाला इतिहास सोडून द्या असे सांगणे कशासाठी ?

जर मुस्लिमांचा बदला घ्यायचा असेल तर ज्यांच्यावर त्याहीपेक्षा भयानक अत्याचार झाले त्यांनी बदला का घेऊ नये यावर उत्तर आहे का ?

संघ अशाच प्रकारे प्रश्नांना कधीही उत्तर देत नाही. त्यांच्याकडे इश्यु बेस्ड बरंच काही असतं. पण ऑब्जेक्ट बेस्ड प्रश्नांना उत्तरे संघात मिळत नाही. इश्यु बेस्ड प्रश्नांमधेही सिलेक्टीव्ह प्रश्नांवर भरभरून बोलले जाते, पण अडचणीच्या इश्युज वर मौन पाळले जाते. संघ काम करत राहतो, उत्तरे देण्यासाठी वेळ नाही ही पळवाट आहे. टू वे डायलॉग संघाला शक्य नाही.

वेळोवेळी अनेकांनी संदर्भासहीत संघाला विचारलेल्या प्रश्नांची अशाच पद्धतीने बोळवण झालेली आहे. काही वर्षांनी प्रश्नांचा विसर पडल्यानंतर असे प्रश्नच विचारले जाऊ नयेत म्हणून एक थिअरी येते. संघाने हिंदू राष्ट्राचे स्वप्न पाहीले, त्या हिंदू राष्ट्रात यायला लोक तयार नाहीत, त्यामुळे ठिकठिकाणी वेगवेगळ्या जातींना आपल्यात ओढण्यासाठी त्या त्या जातीची आराध्य दैवते, महापुरूष यांना पूजायला संघाने सुरूवात केली आहे. तो डावपेचांचा भाग आहे. त्यामुळे बाबासाहेब किंवा अन्य लोकांवर त्यांची श्रद्धा बसली हे मान्य का केले जावे ?

बाबासाहेबांचे विचार मान्य नाहीत पण ते पूजनीय हा काय प्रकार आहे ? काँग्रेसने हेच केलं त्यामुळे त्यांना यश मिलाले हे मॉडेल संघापुढे आहे. संघाने पूर्वीचा कडवेपणा सोडल्यासारखे दाखवत नवे धोरण स्विकारलेले आहे. एकदा निरनिराळे समूह जोडले गेले आणि हळूहळू त्या त्या समूहाला त्या त्या महापुरूषांच्या विचारांचा विसर पडला की मग वापरून फेकून द्यायला कितीसा वेळ लागणार आहे ?

संघात जाणा-या प्रत्येकाला या डावपेचांची कल्पना असेलच असे नाही. काही तर भाबडेपणे बदललो असे म्हणत असतील.

सनव, तुम्ही म्हणताय तसं संघ मुस्लिम , ख्रिस्ती लोकांपर्यंतही पोचू पाहत असल्याच्या बातम्या येताहेत.
पण त्याच वेळी "भारत हे हिंदू राष्ट्र आहे" Hindutva is a cultural and civilisational ideology and everybody living in India should consider himself a Hindu असंही ते म्हणाल्याच्या बातम्या दिवसाआड येत असतात.
"Hindu samskriti or Bharatiya Samskriti, we have this as our identity. Bharat is not just a name of some part or piece of land. The land keeps increasing or decresing based on how it is being treated. The nature of the society is its 'samskriti'.

भारत हे हिंदू राष्ट्र आहे, मग ही एक धार्मिक नाही तर सांस्कृतिक संकल्पना आहे, हे असलं सग़ळं गोल गोल ते बोलतात याचा अर्थ नक्की काय आहे?

भारतात राहणार्‍या सगळ्यांनी हिंदू या एका आयडेंटीत गुंडाळायला ते किती आतूर आहेत. पण तेच हिंदू धर्मात असलेल्या असंख्य जातींनी स्वतःला विसरून आपली फक्त हिंदू म्हणून ओळख द्यावी असं ते म्हणालेत का?

मला तरी या सगळ्याचा अर्थ भारत हे एक हिंदू राष्ट्र आहे आणि अन्य धर्मीयांनी इथे दुय्यम नागरिक म्हणून राहावं असाच लागतो.

सांस्कृतिक संघटन, सांस्कृतिक ओळख हीच मुळी घोळात घेणारी संकल्पना आहे.
एका बाजूला आपली संस्कृती सर्वसमावेशक आहे म्हणायचं असेल तर सर्व प्रकारचा आहार, वेषभूषा, केशभूषा, भाषा, बोली यांचा त्यात समावेश आपसूक व्हायला हवा.( संघाला, ज्याला गंगा जमनी तहजीब मानलं जातं ते स्वीकार्य आहे का?) इतकंच नाही तर इंग्रजी अंमलात जे बदल घडून आलेत तेही स्वीकारायला हवेत.
"संस्कृती ही प्रवाही असते" हे वाक्य वरच्या वाक्यांसारखे गोलगोल वाटत नाही. पण संघाला अभिप्रेत असलेली संस्कृती प्रवाही नाही तर डबक्यासारखी वाटते.

दुसरं आमची संस्कृती ही सर्वश्रेष्ठ आहे हेही अनेकदा बोललं जातं. हे असं कधीतरी कुठेतरी कोणीतरी बोललेलं. आठवतंय का?

आता बाकीच्या अशा आयडेन्टीटी जपणार्‍या संघटनांबद्दल : विशिष्ट समूहाचं म्हणून हित जपण्यासाठी, त्यांचे मुद्दे मांडण्यासाठी अशा संस्था असणारच. पण त्यांनी आपली मते , उद्दिष्टे दुसर्‍यांवर लादायला नकोत.
तसंच काळाच्या आणि प्रगतीच्या ओघात अशा संघटनांची गरज आणि महत्त्व कमी व्हायला हवं, तसं ते न होता वाढत हातंय, हे दुर्दैवी आहे. म्हणूनच या सगळ्या ओळखींवर स्वतःची भारतीय अशी ओळख सांगायला शिकवणार्‍या त्या एका माणसाचं महात्मापण आज जास्तच जाणवतं.

भरत मयेकर, आपली पोस्ट आवडली. कापोचे यांच्याही आवडल्या, आणि फार एंड यांच्या प्रतिसादांतील संयमीपणासाठी प्रतिसाद आवडले.
संघ ही एक काडर-बेज़्ड संघटना आहे. आदेशानुसारी आहे. तेव्हा संघाचे जे जाहीर विचार असतात त्या प्रमाणेच स्वयंसेवकांचे असतील अशी साहजीकच एखाद्याची कल्पना होऊ शकेल. माझी तरी झाली. अश्या शिस्तशीर संघटनेमध्ये वैयक्तिक पातळीवर कित्येकांचे असे विरोधी आचरण असावे आणि ते तसे असण्यास संघटनेची हरकत नसावी किंबहुना त्याकडे काणाडोळा व्हावा हे दुटप्पीपणाचे लक्षण वाटते. बोले तैसा चाले अशी माणसे एकूणातच कमी असतात हे फार एंड यांचे म्हणणे आम समाजासाठी बरोबरच आहे. पण संघाच्या शिस्तीचा, एक विचार-एक हृदय वगैरे एकात्मकतेचा इतका काही बोलबाला आहे की हा विरोधाभास ठळकपणे जाणवतो. इतर पक्षांची बांधणी सैलसर आहे, त्यांच्यांत काही एक समान कार्यक्रम असतो फक्त. बाकी तुमचे तुम्ही मोकळे असता. अर्थात नैतिक वर्तनाची अपेक्षा असते, पण फक्त अपेक्षा. आणि एक राष्ट्र-एक आत्मा असेही काही एकजिनसीपणाचे त्यांचे ध्येय नसते. तेव्हा वर वर आणि जाहीरपणे एक धोरण मांडायचे पण प्रत्यक्षात वेगळ्याच गोष्टी राबवून घ्यायच्या असे काही संघाच्या बाबतीत असू शकेल का?
धर्मसुधारणा ही संघाला प्रायॉरिटी वाटत नाही अशी समजूत बाकीच्यांची होण्याचे एक कारण सोशल मीडियामध्ये पसरणार्‍या प्रतिगामी पोस्ट्सना आवर घातला न जाणे, किंबहुना त्यांच्या कर्त्यांना मोकाट सोडून उत्तेजन देणे हे आहे. नागाला दूध न पाजणे, आंब्याच्या टहाळ्या, आपट्याची पाने, वडाच्या फांद्या यांची तोड न करणे यासंबंधीच्या पोस्ट्स् ना आक्रमक विखारी विरोध करणे या गोष्टी काय दर्शवतात? दलितांना, गांधींना, आरक्षणाला विखारी विरोध, कितीतरी उदाहरणे देता येण्यासारखी आहेत. संघाने एक आदेश दिला तर हे सर्व बंद होईल. ही अगदी किरकोळ गोष्ट आहे पण ती संघाच्या भव्यदिव्य अजेंड्यामध्ये बसत नाही बहुतेक.

नुकतिच बातमी वाचण्यात आली.

एका तरुणाने तिन तरुणींचा प्राण वाचवतांना प्राण गमावले.
तरुणी या मुस्लिम होत्या अन तरुण हिंदु.
त्या प्रंसगी त्याने हा विचार सुद्धा केला नाही. फक्त मदतीसाठी धावला.

म्हणजेच वेळ आली की माणुस ना जात पाहतो न धर्म.हे सगळे जाती पातीत भांडणे लावण्याचे काम काही असंतुष्टांचे असते, लोक त्याला वळी पडतात.
जगा अन जगु द्या.
आपले निधर्म प्रेम, माणुसकी बद्दल प्रेम क्रुतीतुन दाखवा. न की याला त्याला दोष देवुन.

संघाला जाणून घ्यायचे असेल तर संघात या असे आवाहन वारंवार का केले जाते हे गेल्या तीन चार दिवसात लक्षात आले.

संघ देशाचा पैसा घेत नाही , म्हणून तिरंगा व राष्ट्रगीत ची सक्ती करता येत नाही, ( मदरसावर मात्र करता येते ) , असे युक्तिवाद करणार्यायांचे आता कसे होणार ?

unnamed_0.png

Pages