पायनॅपल पाय

Submitted by अमितव on 6 January, 2016 - 18:55
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

अननस - १ कप : बारीक तुकडे करून, रसासहित. टीन मधला वापरणार असाल तर बारीक फोडी केलेला रसासहित वापरू शकता.
साखर - १ कप
लिंबुरस - १ टेबल स्पून
कॉर्न स्टार्च - ३ टेबल स्पून
पेस्ट्री शीट्स किंवा पाय क्रस्ट - १ किंवा २ (ओपन करायचा असेल तर १, वरून बंद करायचा असेल तर अजून एक)
दुध : १ टेबल स्पून (२ शीट्स वापरल्या तर वरून ब्रशने लावायला. फेटलेलं अंडही वापरू शकता. गरज आहेच असं नाही)

क्रमवार पाककृती: 

१. फ्रीजर मधून शीट्स काढून ठेवा. मी ताटलीच्या आकाराच्या अल्युमिनियम फॉईलमध्ये मोल्ड केलेले पाय क्रस्ट वापरलेले. सपाट पेस्ट्री शीट्स वापरणार असाल तर त्याचं तापमान किंचिंत वाढलं की ज्या भांड्यात पाय करणार आहात त्याच्या तळाला शीट ठेवून कडेने फोल्ड करून घ्या. जास्तीचा भाग कापून टाका.
२. आवन ४५० डिग्री फॅ ला प्रि हिट करायला ठेवा.
३. फोडी केलेला अननस कढईत घ्या, त्यात साखर घाला आणि गॅस चालू करा.
४. साखर विरघळली की उकळी फुटू द्या.
५. आता लिंबुरस घाला.
६. एकीकडे ढवळत राहून हळूहळू कॉर्न स्टार्च घाला.
७. कॉर्न स्टार्च घातलं की मिश्रण पटकन अळल्यासारखं होईल. एखाद मिनिट गॅसवर ठेवून, गॅस बंद करा.
८. पाच मिनिट थांबून मिश्रण त्या शीट वर ओता.
९. ओपन पाय करणार असाल तर वरून थोडी साखर भुरभुरवून आवन मध्ये ढकला.
१०. वरून बंद करणार असाल तर दुसरी शीट वरून अंथरा, आणि कडा दाबून टाका. दाबताना नक्षी करायची तर करा. त्याने चवीत फरक पडत नाही. वरून काट्याने वाफ जायला भोके पडायला विसरू नका. ग्लेझ यायला ब्रशने दूध/ फेटलेले अंडे लावा.
११. २० एक मिनिटांनी आवन बंद करा.
१२. थंड किंवा थंडगार झाला की खा.

वाढणी/प्रमाण: 
खाल तितका
अधिक टिपा: 

१. तयार पेस्ट्री शीट्स/ पाय क्रस्ट वापरायचे नसतील तर, मैदा आणि फ्रीज मधले बटर वापरून मिसळ मिसळ मिसळून कणिक तिंबून लाटून ही करतात. मला तयार शीट्स मिळाल्या, त्यामुळे वरची पद्धत फक्त व्हिडीओ मध्ये बघितली.
२. वरच्या शीटला चौकोनी भोकं पाडायचं स्टेनसिल मिळतं ते वापरू शकता.
३. वरच्या शीटच्या ९ पट्ट्या कापून वरखाली वरखाली विणल्यासारखी नक्षी जशी बाहेरच्या पायला असते त्याचा व्हिडीओ मिळाला की ते ट्राय करणारे नेक्ष्ट टायमाला.

माहितीचा स्रोत: 
इंटरनेट
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा! मस्त दिसतोय! या पाय वगैरे मंडळींना मी उगीच घाबरते. कधी ट्राय केले नाहीत घरी. आता बघायला पाहिजे करून.

भारी दिसतेय ..
पेस्ट्री वा गोड पदार्थ फारसे आवडत नाहीत, पण हा पाय बरेपैकी खातो.. अर्थात केक शॉपमधीलच, घरी बिरी जमण्यासारखे नाहीये..

सगळ्यांना धन्यावाद.
श्रद्धादिनेश >> मुंबईत मिळतात का कल्पना नाही. नाही मिळाले तर अन सोल्टेड फ्रीजमधील घट्ट बटर आणि मैदा, बटर घट्ट असतानाच एकत्र करून बऱ्यापैकी घट्ट गोळा करायचा. बटर वितळलं वाटत असेल तर परत तो गोळा फ्रीजमध्ये ठेवून थंड झाल्यावर लाटून शीट बनवता येईल.
सीमंतिनी >> हो, व्हिप्ड क्रीम घालून खाणार होतो, पण विसरलो. परत केलं की फोटो टाकीन.
रायगड Lol

हं... हे आत्ता पाहिलं. मुळात अननस खूप आवडतो. पण हे पेस्ट्री शीट्स इ. वापरून एकंदरीतच पाय(अनेकवचन) प्रक्रर्ण कधी केलं नाही.
पण मस्तच लागत असणार.