चिकाच्या वड्या ( आणि खरवस) (फोटोसहित)

Submitted by मानुषी on 29 December, 2015 - 13:31

चिकाच्या वड्या (आणि खरवस)
आता वड्या आणि खरवस ही एकच पाककृती असू शकते असं कुणाला वाटू शकतं. पण तसं नाही. वड्या वेगळ्या आणि खरवस वेगळा. हो म्हणजे खरवसाच्या वड्या असूच शकतात. पण (चिकाच्या) वड्या म्हणजे खरवस नव्हे.
असो.......नमनाला घडाभर तेल!
गायीचा चीकः (ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी, ज्यांना माहिती आहे त्यांनी इकडे काणाडोळा करावा)
गाय व्यायल्यानंतर जे पहिलं दूध निघतं त्याला चीक म्हणतात.
छोट्या गावांमधे...... गाय व्यायल्यानंतर चीक घरोघर परिचितांमधे वाटण्याची पद्धत आहे. तसा आम्हालाही काल साधारणपणे १ लीटर चीक मिळाला. तर पहिला विचार........अरे बाप रे! आता या इतक्या चिकाचं करायचं काय?
म्हणजे वयानुसार आता ती पूर्वीची खच्चून खाण्याची कपॅसिटी नाही ना राहिली!
अगदी पूर्वी ...म्हणजे मुलं लहान होती आणि घरातच होती तेव्हा छंद म्हणून आम्ही थोडीफार शेती सुद्धा करत असू. तेव्हा शेतावर एक गाय ठेवली होती. तेव्हा मुलं भरपूर दूध प्यायली. फ्रीज दही, दूध, लोण्याने भरलेला असायचा!
आणि दुधाचं काय नाही केलं ते विचारा!
श्रीखंड, बासुंदी, पनीर............... आता नको नको वाटतात ते विचार! आज नुसती पदार्थांची नावं घेतली तरी पोट भरल्याचं फीलिंग येतं!
तर खूपच विषयांतर झालंय! पण इथे लिहिल्याशिवाय राहावलं नाही. कारण नुसती वड्यांची रेसिपी लिहिणं म्हणजे काही विशेष नाही ना!
तर हा चीक जेव्हा घरी येतो तेव्हा हा चीक गाय व्यायल्यानंतर कितव्या दिवशीचा आहे हे जाणून घेणं ही उत्तम खरवस करण्याची पहिली पायरी आहे.
कारण जर पहिल्या दिवशीचा चीक असेल तर तो खूपच दाट असतो. आणि खरवस करताना चीक आणि दूध यांचं प्रमाण जेवढ्यास तेवढं ठेवावं लागतं. तर खरवस मऊ होतो. जर दूध कमी पडल तर रबरासारखा होतो.

असो.............तर आधी चिकाच्या वड्यांची रेसिपी पाहू:
साहित्यः चीक, साखर, ड्राय फ्रूट्स चुरा(थंडीच्या सीझनमधे माझ्या फ्रीजमधे बर्‍याच वेळा काजू बदाम आक्रोड याची भरड असते),. ताटाला लावायला थोडं तूप. वेलदोडा पूड
कृती: छोट्या कुकरच्या एका भांड्यात मावेल एवढा चीक भांड्यात घालून कुकरला भातासारखा शिजवून घेणे.
म्हणजे १ शिट्टी झाल्यावर ३/४ मिनिटांनी गॅस बंद करणे. प्रेशर गेल्यावर चिकाचे भांडे बाहेर काढून तेही थंड झाल्यावर सुरीने हा शिजलेला चीक अलगद सोडवून घ्यावा.



हा शिजलेला चीक अगदी रबरासारखा असेल. कारण यात आपण दूध घातलेले नाही.
मग हा गोळा खिसणीवर खिसावा.

नंतर कढईत जेवढा खीस असेल त्याच्यापेक्षा थोडी जास्त साखर घेऊन नारळाच्या वड्यांप्रमाणे हे मिश्रण शिजवावे.


बुडबुडे यायला लागले व मिश्रण थोडे आळायला लागले की यात थोडा ड्राय फ़्रूट्सचा चुरा घालावा.
साधारण पाव वाटी. वड्या खुटखुटीत होण्यासाठी गॅस बंद करताना या मिश्रणात दोन चमचे पिठी साखर घालावी.
वेलदोडा पावडरही घालावी.

तूप लावून ठेवलेल्या ताटात हे मिश्रण ओतावे.



थोडं थंड झाल्यावर वड्या पाडाव्यात.

खरवसः
साहित्यः दूध, चीक, केशर, गूळ, वेलदोडा.
जेवढा चीक असेल तेवढेच दूध घालून गूळ केशर वेलदोडा पावडर घालून कुकरमधून शिट्ट्या काढून शिजवणे.
खरवस थंड झाल्यावर वड्या पाडाव्यात.

हा शिजवलेला तयार खरवस


या खरवसाच्या मऊ लुसलुशीत वड्या.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फोटो अन कृती ए वन Happy

लहानपणी दोन्ही भ्रपूर खाल्लय. गवळ्याच्या घरी दिवाळीच्या सुमारास चीक मिळायचाच. रतीबाचे दुध लेट झाला तो तर आणायला सुद्धा आम्ही गेलो आहोत. लेकराला मात्र वड्या खरवस काहीच देऊ शकत नाही..

आहाहाहाहाहा! तोंपासु! काय फोटो आलेत!

खरवस अतिशय आवडता. मध्ये अमाप खाल्ला. आताशी चीक मिळालाच नाहीये Sad हमखास उत्तम (इन्स्टंट नव्हे!!) खरवस मिळणारं पुण्यातलं 'जनसेवा' बंद झालं आणि खरवसाची उपासमारच व्हायला लागली आहे!

ख र व स....................(लाळेरे लावलेला बाहुला)

अशा धाग्यांना बंदी करावी अशी लाडीक तक्रार करावी अ‍ॅडमीनकडे. Happy

आमची आई या वड्या करण्यासाठी जेव्हा चीक शिजवतो तेव्हा त्यात थोडे ( १/ ४ ) साधे दुध टाकते. त्यामुळे वडि चिवट ( रबरी ) लागत नाही.

बाकी फोटो लाळगाळु अगदी. आणि डब्यातुन अख्खा बाहेर काढण्याची कल्पना आवडली. मी डब्यात वड्या पाडुन बाहेर काढते, पण बर्‍याच वेळा नीट येत नाहीत. पुढच्या वेळि असे पुर्ण काढुन मग वड्या पाडेल Happy

मानुषी काकू, फोटो एकदम तोंपासु. आहेत. चिकाच्या वड्या नक्की ट्राय करेन. वेगळी रेसिपी आणि ह्या वड्या बाहेर खूप दिवस राहत असतील का?
अंजू, मला सुद्धा गुळाचा खरवस आवडतो जिर, नारळाच दूध घालून. यम्मी लागतो. Happy

या वड्या करण्यासाठी जेव्हा चीक शिजवतो तेव्हा त्यात थोडे ( १/ ४ ) साधे दुध टाकते.. >> असेच करतो आम्हीपण. चीकाचे दुध उष्ण व घट्ट असते. दुध घातले की थोडी उष्णता व घट्ट्पणा कमी होतो.

का हो असले फोटो टाकता!

खरवस अमाप खाल्लाय लहानपणी. आता कधी खाईन देव जाणे. मोठ्या कुकरचे तिन्ही डबे भरून केलेला खरवस २ दिवसांत खलास व्हायचा. पातळ खरवस फारसा आवडीने खाल्ला नाही.

अहाहा. खरवसाचे फोटो पाहुन तृप्त झाले Happy
त्याची जाळी , केशराचे स्मज्ड ठिपके अन काली ते गोड पाणी! तोंपासू.
फार फार दिवस झाले खाउन.

फोटो भारीच!

बालपण ते कॉलेजला जाईस्तोवर साधारण दर एक - दोन महिन्याला खरवस खायला मिळायचा. घरी नेहमीच ७ - ८ गायी आणि १ - २ म्हशी असायच्या. शिवाय वस्तीवर सगळ्यांकडेच गायी. पहिले पाच सहा दिवस दूध फाटते तोवर डेअरीला देता येत नाही त्यामुळे हे दूध (दुसर्‍या दिवसापासून ह्याला आम्ही कोवळे दूध म्हणतो) शेजारी पाजारी दिले जायचे. अजूनही दिले जाते.
पाचव्या दिवसानंतर सकाळी सकाळी गायी म्हशीचे दूध काढले की ते एका छोट्या पातेल्यात घेवून (साखर, गूळ न घालताच) तापवून पाहतात. फाटले (फुटले म्हणतात आमच्याकडे) नाही तर मग हे दूध डेअरीला जायला सुरवात होते.

आमच्याकडे पहिले दोन दिवस साखर घालून आणि मग गूळ घालून खरवस केला जातो. मला गूळ घालून केलेला खरवस जास्त आवडतो.
आताही जेव्हा जेव्हा श्रीरामपूरला असते तेव्हा एकदा तरी खरवस खायला मिळतोच.

ह्या निमित्ताने अशीच एक आठवण.
आमची एक पारडी पहिलारू (पहिल्यांदा गाभण) होती तेव्हा जनावरांचा चारापाणी हे माझ्याकडे होते. आजी मला नेहमी सांगायची की ह्या पारडीला आंघोळ घालताना तिची कास धुवायची. पहिलारू गायी - म्हशींना, त्यांच्या कासेला आपल्या हाताचा स्पर्श होण्याची सवय लावावी लागते.
जेव्हा ह्या बाईसाहेबांनी एका गोंडस पारडीला जन्म दिला तेव्हा पारडीचे दूध पिऊन झाल्यावर भाऊ दूध काढायला बसला तर हिने नाचून नाचून थैमान घातला. बाल्हा (पायाला दावे बांधतात) घालून पाहीला, दोन - तीन जणांनी प्रयत्न करून पाहिला पण हिचा आपला नाच सुरूच. मग तिला माझी सवय असल्याने हि कामगिरी माझ्यावर आली. माझी सवय असल्याने जरा नाच कमी झाला पण बादली किंवा पातेले हातात घेतले की बाईसाहेब लगेच बिथरायच्या. पहिले तीन दिवस अक्षरशः जमीनीवर दुध काढले. (कसला खरवस अन कसला काय?) एक तर पहिलारू, आणि त्यात म्हैस त्यामुळे सडातून दूध काढणे खूप कठीण जायचे. बोटांना वात यायचा. पहिले आठ दिवस मी एकटीने, पुढील दहा - पंधरा दिवसांनी भाऊ आणि मी दोघे मिळून आणि मग भावाने एकट्याने दूध काढायला सुरवात झाली. Happy

आहाहा.. खरवस.. हा माझा जगात आवडीचा पदार्थ.. माझ्या आज्जीची तर स्पेशालिटी होती

माझे एक अंधेरीचा काका, त्यांचा शेजार्‍यांच्या खूप सार्‍या म्हशी होत्या. अर्थात ते फ्लॅटमध्ये राहायचे, आणि म्हशी तेथील गोठ्यात.. तर ते वरचेवर मस्त ताजा ताजा चीक आणून द्यायचे.. मग आमच्याकडे खरवस पार्टी.. अर्थात त्यांच्याकडून विकतच घ्यायचो, फुकट नाही.. पण तसा चांगल्या प्रतीचा फसवणूक न होता चीक मिळणेही सहजसोपे नसते..

पण एवढ्या वर्षात चिकाच्या वड्या मात्र आमच्याकडे कधी केल्या नाहीत, मला माहीतही नाहीत.

र्थात त्यांच्याकडून विकतच घ्यायचो, फुकट नाही.. >>> अरे बापरे. आमच्याकडे गवळी कच्चे दुध कधीच विकायचे नाहीत. त्याच्या कासंडीत गाई\म्हशीला धान्य घालून द्यायचे असते. बाळंतिणीला खाऊ. Happy

नही हीहीहीहीहीहीहीहीही (इथे तोंडातली लाळ गळुन गळुन डिहाय्ड्रेशन ने कोलमडुन पडलेली/ला बाहुली/बाहुला कल्पावा)

अरे बापरे. आमच्याकडे गवळी कच्चे दुध कधीच विकायचे नाहीत. त्याच्या कासंडीत गाई\म्हशीला धान्य घालून द्यायचे असते. बाळंतिणीला खाऊ.
>>>
अनघा मग खरवस कशाचा बनवायचे?
अर्थात फ्री वाटायचे म्हणत असाल तर गावात शक्य आहे, मुंबईत विकल्या जातात अश्या गोष्टी. किंबहुना तोच तर व्यवसाय होता त्यांचा. आणि फुकट दिला तरी त्याची फ्रिक्वेन्सी कमी असते. विकत घ्यायचो जेणेकरून वरचेवर मिळत राहील, हक्काने मागू शकू.

आहाहा! काय मस्त दिसतायत दोन्ही पदार्थ.

किती नशिबवान आहात तुम्ही लोक यार, तुम्हाला चीक घरी आणुन दिला जातो. मला फुकट नको पण विकतही कधी रियल चीक मिळाला नाही Sad एकदा घेतलेला एका भैयाकडुन पण तो बंडल निघालेला :रागः
अत्यंत आवडता पदार्थ खरवस पण कधीच असा घरी बनविलेला नाही मिळाला खायला Sad

चिकाच्या वड्यापण मस्त लागतील असे वाटतयं, कुठे मिळतील? खुप इच्छा झाली आहे खाण्याची Happy

मानुषीताई,
थोडं थोडं माझ्या नावाने काढा नाहीतर पोटात दुखलं तर मी जबाबदार नाही हं Wink Proud

फुकट दिला तरी त्याची फ्रिक्वेन्सी कमी असते. विकत घ्यायचो जेणेकरून वरचेवर मिळत राहील, हक्काने मागू शकू. > हो हे आहे. आळीपाळीने ज्यांना हवे त्या रतिबदारांना देत असणार. Happy

खराखुरा खरवस बघूनही जमाना लोटला. हल्ली बर्‍याच ठिकाणी खरवस मिळतो पण ते खरवसाच्या नावाखाली दुसरेच काही तरी असते. ती पडणारी जाळी आणि तो किंचीत रबरीनेस ह्यांचा मागमूसही नसतो. अनेकदा तर तो प्रकार पिठुळही लगतो.

पण खरवस इतका आवडतो की त्याच्या आठवणीने व्याकुळ होऊन आता मिळणारा नकली पदार्थ खाल्लाच जातो Sad

अग्गं बाबौ....
काय मजेमजेशीर प्रतिसाद आहेत. पण खरंच इतके प्रतिसाद बघून पोट भरलं!
उद्या सविस्तर लिहीन सर्वांना!

मानुषी, हे फोटो बघून "लागी करेजवा कटार" असं फीलिंग आले.

वड्या माहितच नव्हत्या. खरवस मात्र फार आवडता आहे. तो देखील गुळाचा.

वरच्या फोटोतील खरवसाची जाळी, केशराचा रंग जाम तोंपासु.

जबरी फोटो !!!

डोंबिवलीला एक बाई यायच्या विकायला, दोन हातात दोन पिशव्या आणि भरपूर डबे. आम्हाला दरवेळी वाटायचं आईने २-४ डबे तरी घ्यावे.>>>> अमित हो आमच्या घरी पण यायच्या त्या बाई. त्यांच्या एक पिशवीत केशर आणि दुसरीत वेलची फ्लेवरचे डबे असायचे.

Pages