चिकाच्या वड्या ( आणि खरवस) (फोटोसहित)

Submitted by मानुषी on 29 December, 2015 - 13:31

चिकाच्या वड्या (आणि खरवस)
आता वड्या आणि खरवस ही एकच पाककृती असू शकते असं कुणाला वाटू शकतं. पण तसं नाही. वड्या वेगळ्या आणि खरवस वेगळा. हो म्हणजे खरवसाच्या वड्या असूच शकतात. पण (चिकाच्या) वड्या म्हणजे खरवस नव्हे.
असो.......नमनाला घडाभर तेल!
गायीचा चीकः (ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी, ज्यांना माहिती आहे त्यांनी इकडे काणाडोळा करावा)
गाय व्यायल्यानंतर जे पहिलं दूध निघतं त्याला चीक म्हणतात.
छोट्या गावांमधे...... गाय व्यायल्यानंतर चीक घरोघर परिचितांमधे वाटण्याची पद्धत आहे. तसा आम्हालाही काल साधारणपणे १ लीटर चीक मिळाला. तर पहिला विचार........अरे बाप रे! आता या इतक्या चिकाचं करायचं काय?
म्हणजे वयानुसार आता ती पूर्वीची खच्चून खाण्याची कपॅसिटी नाही ना राहिली!
अगदी पूर्वी ...म्हणजे मुलं लहान होती आणि घरातच होती तेव्हा छंद म्हणून आम्ही थोडीफार शेती सुद्धा करत असू. तेव्हा शेतावर एक गाय ठेवली होती. तेव्हा मुलं भरपूर दूध प्यायली. फ्रीज दही, दूध, लोण्याने भरलेला असायचा!
आणि दुधाचं काय नाही केलं ते विचारा!
श्रीखंड, बासुंदी, पनीर............... आता नको नको वाटतात ते विचार! आज नुसती पदार्थांची नावं घेतली तरी पोट भरल्याचं फीलिंग येतं!
तर खूपच विषयांतर झालंय! पण इथे लिहिल्याशिवाय राहावलं नाही. कारण नुसती वड्यांची रेसिपी लिहिणं म्हणजे काही विशेष नाही ना!
तर हा चीक जेव्हा घरी येतो तेव्हा हा चीक गाय व्यायल्यानंतर कितव्या दिवशीचा आहे हे जाणून घेणं ही उत्तम खरवस करण्याची पहिली पायरी आहे.
कारण जर पहिल्या दिवशीचा चीक असेल तर तो खूपच दाट असतो. आणि खरवस करताना चीक आणि दूध यांचं प्रमाण जेवढ्यास तेवढं ठेवावं लागतं. तर खरवस मऊ होतो. जर दूध कमी पडल तर रबरासारखा होतो.

असो.............तर आधी चिकाच्या वड्यांची रेसिपी पाहू:
साहित्यः चीक, साखर, ड्राय फ्रूट्स चुरा(थंडीच्या सीझनमधे माझ्या फ्रीजमधे बर्‍याच वेळा काजू बदाम आक्रोड याची भरड असते),. ताटाला लावायला थोडं तूप. वेलदोडा पूड
कृती: छोट्या कुकरच्या एका भांड्यात मावेल एवढा चीक भांड्यात घालून कुकरला भातासारखा शिजवून घेणे.
म्हणजे १ शिट्टी झाल्यावर ३/४ मिनिटांनी गॅस बंद करणे. प्रेशर गेल्यावर चिकाचे भांडे बाहेर काढून तेही थंड झाल्यावर सुरीने हा शिजलेला चीक अलगद सोडवून घ्यावा.



हा शिजलेला चीक अगदी रबरासारखा असेल. कारण यात आपण दूध घातलेले नाही.
मग हा गोळा खिसणीवर खिसावा.

नंतर कढईत जेवढा खीस असेल त्याच्यापेक्षा थोडी जास्त साखर घेऊन नारळाच्या वड्यांप्रमाणे हे मिश्रण शिजवावे.


बुडबुडे यायला लागले व मिश्रण थोडे आळायला लागले की यात थोडा ड्राय फ़्रूट्सचा चुरा घालावा.
साधारण पाव वाटी. वड्या खुटखुटीत होण्यासाठी गॅस बंद करताना या मिश्रणात दोन चमचे पिठी साखर घालावी.
वेलदोडा पावडरही घालावी.

तूप लावून ठेवलेल्या ताटात हे मिश्रण ओतावे.



थोडं थंड झाल्यावर वड्या पाडाव्यात.

खरवसः
साहित्यः दूध, चीक, केशर, गूळ, वेलदोडा.
जेवढा चीक असेल तेवढेच दूध घालून गूळ केशर वेलदोडा पावडर घालून कुकरमधून शिट्ट्या काढून शिजवणे.
खरवस थंड झाल्यावर वड्या पाडाव्यात.

हा शिजवलेला तयार खरवस


या खरवसाच्या मऊ लुसलुशीत वड्या.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दोन्ही मस्तच, कलरफुल दिसतायेत.

मी मात्र खरवसच करेन हा Wink (श्रीरामपूरला खुपदा केलाय, दुधवाला चिक आणून द्यायचा), सोपा प्रकार.

श्रीरामपुरला आमच्या घरमालकांकडे मात्र खरवसालाच वड्या म्हणायचे आणि साखरेचा करायचे, मी गुळ घालून केला तो त्यांना जास्त आवडला मात्र.

फोटो खूप सुंदर!

ह्या निमित्तानं, गवळ्यानं चीक आणला की गाईसाठी गहू पाठवायची पध्दत आठवली.

मानुषी, अशक्य फोटो आहेत. वेलची- केशर असलेली जाळीदार वडी आणि संपली की खाली दिसणारं गोड पाणी. कित्येक वर्षात खाल्ला नाहीये. डोंबिवलीला एक बाई यायच्या विकायला, दोन हातात दोन पिशव्या आणि भरपूर डबे. आम्हाला दरवेळी वाटायचं आईने २-४ डबे तरी घ्यावे.

आय एम रीयली वेरी जेलस!:

काय नशीब आहे हो तुमचे..... Happy
घरच्या गाईच्या चीकाचे हे दोन्ही प्रकार खावून य वर्षे झाली.

आता ईंस्टंट खरवस खातो. Wink
आता गाय पण नाही आणि आय (आजी) पण नाही. Sad

ते खरवसाचे दोन तीन तुकडे मी उभ्या उभ्या कोंबेन.

आणि वडीचे चार एका मागोमाग....

वड्या भारी दिसतायत. ड्रायफ्रूट घालून शिजताना बघून मला एकदम दुधीहलव्याची आठवण झाली. (चीक मिळणार नाही तेव्हा पनीर वापरलं तर चालेल का? असा प्रश्न इथे येईल का?) Wink

आई ग्गं.. कसले कातिल फोटो आहेत सगळे.. मानु लक्की यू आर

मला तो पहिल्या फोटोतला आवडतो.. बेसिक वर्जन!! शेवटी केंव्हा खाल्ला होता बरं.. आठवतंही नाहीये आता..

मानुषी सर्वात आधी खूप खूप धन्यवाद तुला.:स्मित: माझी आई सेम अशाच वड्या करते. पण कशा करायच्या हे प्रत्येक वेळा विचारायचे राहुनच जाते. आज तू लिहील्याने हा प्रश्न सुटला. अप्रतीम स्वर्गीय चव लागते ह्या वड्यान्ची. कढईत घोटताना जरा हातावर गरम चीक उडतो, कारण साखरही विरघळत असते त्यात. पण वड्या पाडल्यानन्तर एक मिनीट पण न थाम्बता मी या खात होते. कढईतली उरलेली खरपुड खरवडुन खाण्यात मजा येते. परत एकदा धन्यवाद. आणी एक गोड गोड उम्मा!

श्शी!! हे वजन कमी करायचे लचांड मागे नसते तर ....... जाऊदे..... न झेपणारी स्वप्ने पाहु नयेत..... फोटो पहिले तरी आमची वजनं वाढतात.... लहान पणी हा येवढा खरवस आम्ही २-३ चुलत भावंडांनी एका वेळेस संपवला असता.... कल्याणला आजी नेहेमी सुट्टीत करायचीच. तिचे खास लोक होते जे तिला अव्यहत पणे हा नंबरी चीक पुरवत असत. गेले ते दिन गेले..........

तुमचा जाहिर णिषेध!!!!! णिषेध!!!! फोटो एकदम खतरा !!!!

सगळ्या इंस्टंट खरवसांना त्यांची जागा दाखवणारा थुत्तरफोड फोटो आहे शेवटचा Lol अत्यंत तोंपासु !

चिकाच्या वड्यांची रेसिपी वेगळीच आहे. मस्तच लागत असणार.

अहाहाहाहाहाहाहाहाहा!! काय भारी फोटो आहेत!!!
तोंडाला जब्बरदस्त पाणी सुटलंय.

आमची आजी चौथ्या पाचव्या दिवशीच्या पातळ चिकाचा 'नासकवणी' नामक एक प्रकार करते. तोही स्वर्गीय सुंदर लागतो. एक वाटी खाल्ला तरी पोट गपगार होऊन जातं. बाकी काही जेवणखाण नकोच.

अन्याय आहे हो बाई.......................:( Sad

शेवटचा फोटो पाहुन मेलेच मी. चिकाच्या वड्या कधी खाल्ल्या नाहीत पण खरवस...... गावी घरात खरवस केला की तो केळीच्या पानात गुंडाळून शेजारी वाटण्याची पद्धत असावी बहुतेक. मी खुपदा खाल्लाय असा केळीत गुंडाळून घरी आल्लेला... Happy

जबरी फोटो. एकदम तोंपासु.

चिकाच्या वड्या नविनच. कधी ऐकल्या किंवा खाल्ल्या नहित. किती अभागी मी Sad Wink

मस्त!

खरवस टिकवण्यासाठी किंवा कालांतराने दुसर्‍या गावी पाठवण्यासाठी आमच्याकडे असा साखरेतला किस करून (वड्या न पाडता आणि वजा ड्रायफ्रूट्स) वाळवून ठेवतो.

आमची आजी चौथ्या पाचव्या दिवशीच्या पातळ चिकाचा 'नासकवणी' नामक एक प्रकार करते. तोही स्वर्गीय सुंदर लागतो. <<<< हो मंजू Happy आम्हीपण त्याला नासकवणी किंवा पातळ खरवस म्हणतो.

सुंदर.. चीकाचा खरवस खाऊनच काय बघूनही युगे लोटली.

या वड्या डब्यात भरून त्यात गावठी गुलाबाची फुले ठेवायची आई. त्याने मस्त वास लागतो.
आमच्या शेजारच्या बाई खरवस करताना थोडे शहाजिरे घालायच्या, त्यानी पण छान वास लागतो.

एक नंबर फोटो! नुकताच घरी केलेला खरवस खाल्ला.. चीकाच्या वड्या कधी खाल्ल्या नाहीत आता पुढच्या वेळी आईला वड्या करायला सांगीन.

Pages