चोरी अथवा घरफोडी- प्रसंगावधान आणि ऊपाययोजना

Submitted by श्रीमत् on 4 December, 2015 - 02:13

प्रसंग पहिला, स्थळ, नवीन पनवेल, सुखापुर.

काल सकाळी व्हॉटस अ‍ॅप वर बायकोला तिच्या मैत्रिणीचे मेसेजेस आले त्यात तिने आम्हाला उद्देशुन सतर्क राहायला सांगितल, विषय होता तिच्या घरी झालेल्या घरफोडी बद्दल. तब्बल सतरा तोळं सोनं आणि काही रक्क्म घर फोडुन चोरांनी पळ काढला होता.

त्यानंतर तिला केलेल्या कॉल मधुन सविस्तर कळालेला व्रुत्त्तांत असा. "घरात ते तिघेच रहातात. ति, तिचा नवरा आणि त्यांची लेक. त्या मैत्रीणीचा वाढदिवस असल्यामुळे ते सहकुटुंब लोणावळ्याला फिरायला गेले असताना हा प्रकार घडला.

खबर ऐकताच मी सर्वप्रथम बायकोला हा प्रश्न विचारला "कि एवढ सोन कोणी घरात ठेवत का?" त्यावर तिने सांगितल की "मी पण हाच प्रश्न सर्वप्रथम तिला विचारला होता." त्यावर अस कळालं की याच आठवड्यात तिच्या दिराच लग्न असल्यामुळे त्यांनी ते दागिने बॅंकेतुन घरी आणले होते. सोसायटीच्या वॉचमनला विचारल असता त्याने झोप लागली होती अस सांगितल. वर "त्यांनी माझ्या जिवाच काही बर वाईट केल तर?" असा प्रतिप्रश्न सोसायटी मेंबर्स आणि पोलिसांना केला. पोलिस पंचनामा करुन गेल्यानंतर त्यांच्या शेजारच्या बाईने तिला सांगितल की "काल रात्री दोन ते अडीच च्या सुमारास तुमच्या घरातुन तोडफोडीचे आवाज येत होते पण घाबरुन आम्ही गप्प बसलो." वर तुम्ही पोलिसां समोर का नाही बोललात यावर तिने आम्हाला फार भिती वाटत होती अस सांगितल.

सविस्तर पोलीस कंप्लेंट वैगरे देऊन सुद्धा दोनच दिवसांनी त्यांच्याच बाजुच्या बिल्डिंग मध्ये सेम प्रकार घडला.

प्रसंग दुसरा, स्थळ, बोरीवली,
कालचा घडलेला प्रसंग ताजा असतानाच ऑफिस मधल्या मित्राच्या बिल्डिंग मध्ये एकाच रात्रीत तिन घरफोड्या झाल्या. सर्वात विषेश वरील सर्व प्रसंगात घरातील सर्व व्यक्ती काही ना काही कारणास्तव घराबाहेर गेल्या होत्या.

आता काही विचार करण्यासारखे मुद्दे.

१) मी सतर्कता म्हणुन आमच्या सोसायटीत काही लोकांना फोन करुन हा प्रकार कळवल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया अशी होती. "तशी आपली बिल्डिंग रोड साईडला असल्यामुळे आपल्याला एवढी भिती नाहीये."
२) सर्व सोसायटीत वॉचमन असुन सद्धा सर्रास असे प्रकार घडतायत.
३) गेले काही दिवस चड्डी बनियान गॅंग सक्रिय झाल्याच टी.व्ही. वर पाहिलय.
४) हे लोक टोळीने अथवा हत्यारबंद अवस्थेत असल्यामळे स्वताच्या जीवाला घाबरुन लोक घरात राहणे पसंद करतात.
५) आपला मेहनतीचा पैसा कोणीतरी असा अचानक लुबाडुन नेऊन सुद्धा आपण फिर्यादी पलीकडे काहीच करु शकत नाही.
६) असे प्रकार घडत असतानाही रात्रीचे गस्त घालणारे पोलीस कुठे असतात? अथवा १०० नंबर वर फोन केल्यास तात्काळ मदत येते का?
७) सोसायटी अधिनियमात कंपलसरी सी.सी. टीव्ही बसवण्या बाबत काही तरतुद आहे का?
८) एखाद्या आमदार, खासदार, सरपंच अथवा स्थानिक नेत्याच्या घरावर कधी दरोडा पडल्याच कधी ऐकल नाहीये.
९) दागिन्याचा अथवा मौल्यवान चीजवस्तु अथवा कागदपत्रांचा विमा उतरवल्यास कितपत परतावा मिळु शकतो.
१०) अशा वातावरणात घर बंद ठेऊन बाहेरगावी, फिरायला जायचं असल्यास काय खबरदारी घ्यावी?

एक जनरल ऑब्झर्वेशन आहे. कित्येक लोकांना अशा प्रसंगी कसं वागल पाहीजे अथवा काय उपाय योजना केल्या पाहिजेत हेच मुळात माहित नसतं काही लोक माझ्या घरावर तर प्रसंग नाही आलाय ना म्हणुन गप्प बसतात.

एक मायबोलीकर म्हणुन माझी सर्वांना विनंती आहे. "आपण यावर काय उपाय योजना करु शकतो अथवा प्रसंगावधान राखुन अशा प्रकारांना कसा आळा घालु शकतो याबाबत शक्य ते मार्गदर्शन करावे."
कारण सर्व सुरक्षा मंत्र्या-संत्र्यांच्या मागे असताना तुमच्या आणि माझ्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येतो. कारण उद्या कदाचित ही वेळ आपल्या वरही येऊ शकते.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धागा आवडला!

खूप काही करण्यासारखे आहे.

सर्वप्रथम शेजार्‍यांशी चांगले संबंध प्रस्थापित करा. आजच्या धकाकीच्या युगातसुद्धा हे शक्य आहे. चोर्‍या त्याच घरात होतात; जिथे लोकसंपर्क कमी असतो किंवा जवळ जवळ नसतोच नसतो.

मायबोली हा पब्लिक मंच आहे त्यामुळे या धाग्यावर डिटेलवार लिहीताना जरा भीती वाटेल.
मला हे काही सुचतेय
१. चोर्‍या लक्ष ठेवून परिस्थिती बघून होतात, सो 'भुते' जमू नये वाटत असेल तर घरात शीते न ठेवणे महत्वाचे.
२. कॅश घरात नाही, पण अगदीच अडचण आल्यास जवळ च्या ए टी एम मधून काढता येईल याची तयारी.
३. दागिने घरी: एकदम स्ट्रिक्ट नो-नो. (आम्ही यावेळी लक्ष्मीपूजनाला पण ऑफिसची अपॉईंट्मेंट लेटर्स आणि किल्ल्या इ.च ठेवल्या होत्या. त्यासाठी गोष्टी काढून घरी आणल्या नाहीत.)
याउप्पर ही सर्व सावधगिरी बाळगूनही कोणावरही वेळ येऊ शकते. वेळ आल्यास चोरांनी भौतिक वस्तूच व्याव्यात आणि म्हातारी कोतारी माणसे,लहान मुले इ.इ. सुरक्षीत ठेवावीत ही प्रार्थना.
४. आयुष्यातला प्रत्येक क्षण लगेचच्या लगेच चेक इन करुन फेसबुकावर मांडणे: एकदम नोनो. तुम्हाला तुमच्या परदेश वारी इ.इ. बद्दल फ्लाँट करायचं असेल तर सगळं नीट परत आल्यावर एका आठवड्याने वगैरे.

चांगला धागा. सध्या रायगड जिल्ह्यात रोज किमान तीन घरफोडी/दुकानफोडीच्या बातम्या वाचायला मिळतात. इमारतीमधल्या प्रत्येक फ्लॅटमध्ये एक अलार्म सिस्टीम बसवता येईल का? म्हणजे ते एक बटन दाबले की मोठा भोंगा वाजू लागेल. लेखातल्या उदाहरणात शेजाऱ्यांना जरी भीती वाटत असली तरी ते त्यांच्या घरातलं अलार्म बटन दाबून आवाजाने इतरांना जागे करू शकले असते. सगळ्या इमारतीत नाही पण एका मजल्यावर अशी सिस्टीम बसवता येऊ शकेल.
शेजाऱ्यांशी चांगले संबंध >> +१११

"झाकली मुठ सव्वालाखाची" ही म्हण दोनही अर्थाने वापरता येते.
मुठीत चार आणे असले तरी सव्वालाख आहेत असा बर्ताव करता यायला लागतो, पण मुठित खरोखर काही क्रोर असतील, तरी सव्वालाखच आहेत असा भ्रमही निर्माण करता यायला हवा.
अर्थात, तुमच्या श्रीमंतीचे प्रदर्शन, वस्तु/पेहराव्/वाहने/डेकोरेशन-फर्निचर वगैरे कशामार्फतही करु नये. जे जेवढे गरजेचे आहे तितके करायचे असे सूत्र असेल, तर तसे प्रदर्शन होतही नाही.
घरातील जुन्या/चालू/भविष्यकालिन घटनांबद्दल या कानाचे त्या कानाला कळणार नाही याची खबरदारी घ्यावी.
साधारणतः बायकांना (काही वेळेस पुरुषांनाहि) नको तितके बोलुन नको तितकी माहिती उघड करण्याची सवय असते. (अहो दूर कशाला, मागे मलाही कुणीतरी प्रश्न विचारला होता की, लिम्ब्या माबोवर तू तुझे इतके खाजगी कसे काय लिहू शकतोस? त्यामुळे अडचणित तर येणार नाहीस ना? कन्सर्न बरोबर होता)
तर विषय आसा की साध्या गप्पांमधे, मित्रांबरोबर, भिशीच्या बायकात, भाजीवालीबरोबर, दुधवालापेपरवाला वगैरेंना अपण आपले प्लॅन सांगतो, मोठय कौतुकाने सांगतो की आमच्या ना अमक्या तमक्या नण्देची कार्टी तिचे लग्न ठरलय, अन आम्ही जाणार आहोत... वगैरे वगैरे... या बातम्या बरोब्बर पाझरत नेमक्या लोकांना कळतात, व गेम होते. इतकेच काय तर फेसबुकवरही कौतुकाने "लोकेशन" दाखविण्याच्या निमित्ताने पोस्ट येत असतात की अमका तमका अमक्या तमक्या विमानतळावर आहे वगैरे. ज्यांना ते शक्य आहे त्यांची बाब निराळी, पण ज्यांची स्वतःच्या मागे कुटुंबियांचि संरक्षणाची व्यवस्थाच नसेल, त्यांनी अशा बाबी जगजाहिर का कराव्यात? कोण तुमच्या शतृत्वावर उठलेले असेल काय सांगता येणारे?
तेव्हा सदैव सावध चित्त असावे हेच खरे.

अथवा १०० नंबर वर फोन केल्यास तात्काळ मदत येते का?

येत असावी. पोलिसखाते खुप दक्ष आहे. माझ्या शेजारच्या घरात एका स्त्रीला मारहाण होत असताना मी पोलिस स्टेशनला फोन केला, १० मिनिटांत पोलिस आले. माझा नंबर त्यांच्याकडे होता, पण त्यानंतर मला कधीही पोलिसांकडुन काहीही त्रास झाला नाही.

वरिल घटनेत शेजा-यांना आपल्या घरात बसुन गुपचुप फोन करायला काय प्रोब्लेम होता क़ळले नाही. एवढे घाबरुन चालत नाही. शेजारुन आवाज येत असताना तर अजिबातच नाही.

दागिने बॅकेत ठेवायचे सल्ले सगळे देतात, पण इथल्या तिन बँकांमध्ये विचारल्यावर घरात दागिने ठेवणे जास्त स्वस्त वाटले. खुप जास्त रकमेच्या एफडी ठेवायला सांगितले होते आणि वर वेगळा चार्ज सुद्धा. काहिण्चे लॉकरच नव्हते, त्यामुळॅ प्रश्नच मिटलेला. तसेही मुदलात एवढे दागिनेच नाहियेत की ते लॉकर मध्ये ठेवाय्ची वेळ येईल. Happy

पहारेकरी रात्री झोपत असेल आणि वर त्याला जिवाची भिती वाटत असेल तर असला पहारेकरी ठेवताना दहादा विचार केलेला बरा. बहुतेक चो-या योग्य माहिती मिळाल्यावर केलेल्या असतात असे नंतरचा घटनाक्रम पाहताना लक्शात येते.

सोसायट्यांमध्ये सिसी टिवी बसवणे कंपलसरी नसावे, पण बसवलेले चांगले. मागे ऐरोलीला मुलगी पळवण्याची केस झाली तेव्हा यावरुन बराच गदारोळ झालेला. पोलिसांनी सोसायटीला दोष दिला टिवी बसवला नाही म्हणुन. स्थानिक नगरसेवकाने आपण सोसायटीला यासाठी पैसे दिलेले म्हटले आणि मग सगळ्यांनी मिळुन सोसायटीच्या पदाधिका-यांवर ते पैसे ख्जाल्ल्याचा ठपका ठेवला.

लिंबु, तुम्ही म्हणता तोही मुद्दा महत्वाचा आहे. ब-याच वेळा चोरांना अशीच माहिती मिळते.

लिंटीं आणी साधना +१
सार्वजनिक ठिकाणी मोबाइलवर पण मोठ्यामोठ्ययाने बोलणे, आपले घरगुती प्लॅन्स डिस्कस करणे टाळावे.

हा धागा पण एका ग्रुप चा करता येईल का सार्वजनिक ऐवजी?
व्हॉटेव्हर अप्लाइज टु फेसबुक, अल्सो अप्लाइज टु मायबोली.

घराच्या मुख्य दरवाजाला Intruder Alaram लावुन घ्यावा. आपण घरी नसताना जर कोणी घरात शिरले तर लगेच अलार्म सुरु होतो. तसेच Panic Alarm असलेला चांगला. वॉचमनला काही संशय आला तर त्याने लगेच सुरु करावा.

इमारतीमधे प्रवेश करतो तिथे चांगले गेट लावुन घ्यावे व वॉचमनला आत बसायला सांगावे.

सध्या पहारेकरी हे निवृत्त वयस्कर असेही असतात. त्यांनाही जीवाची भिती असतेच. त्यामुळॅ त्यांना दोष देण्यात तितकासा अर्थ नाही. CCTV System मधे चेहरा झाकुन आलेले चोर ओळखता येत नाहीत. पण अशी system असणे केव्हाही फायद्याचेच. सोसायटीला परवडत नसेल तर आजु-बाजुच्या सोसायट्यांनी मिळुन कॅमेरे बसवावेत जेणेकरुन काहीतरी फुटेज हाती लागेल.

(वरील मुद्दे विस्कळीतपणे मांडले आहेत, समजुन घ्या)

भ्रमर
(वरील मुद्दे विस्कळीतपणे मांडले आहेत, समजुन घ्या) +१११

सकाळी डोक्यातुन हा विषय जातच नव्हता, म्हणुन जमेल तस आगतिकपणे मांडलय, सर्वांन पर्यंत पोहचावं हीच अपेक्षा आहे.

कोणी मायबोलीकर पनवेल मध्ये राहात असल्यास भेटुन या विषयावर अधिक विस्त्रुतपणे विचार करायला मिळेल.

आणि नवी मुंबई काय किंवा मुंबई काय, घरफोड्यांचा मौसम सुरु होईलच आता. थंडीत ३ ते ४ दरम्यान घरे फोडली जातात, कारण दारं-खिडक्या लावुन सगळे झोपतात. थंडीत झोपही छान लागते, त्यामुळे अजुबाजुच्या घरात आवाज आलेला कळत नाही.

या धाग्यामुळे काहिजण तरी सजग होतील.

थंडीच्या काळात चो-या रात्री दोन ते साडेतीन या दरम्यान होतात कारण या काळात कुत्री सुद्धा झोपलेली असतात. दक्षता मासिकाच्या एका अंकात घअरफोडीच्या एका केसमधे पोलीस अधिका-याने दिलेलं मत आहे.

बहुसंख्य घरफोड्या या पाळत ठेऊनच केल्या जातात असे मानायला खुप वाव आहे.
अचानक पणे वाढलेला फेरीवाल्यांचा वावर जसे की भंगारवाले, गाद्या करुन देणारे, इडली विकणारे वगैरे दिसु लागले की धोक्याची घंटा खणखणली पाहिजे. पण फ्लॅट सिस्टीम काय की बंगले सिस्टीम काय, दोन्हीकडे घरातले बहुतेक सर्वजण दिवसभर काम/शिक्षनास बाहेर पडत असल्याने लक्ष तरि कोण ठेवणार?
सिक्युरिटि बाबत वर भ्रमाने म्हणलय तशीच परिस्थिती असते. फार विसंबुन रहाता येत नाही, किंवा भरगच्च मोबदला देण्याची तयारि हवी, जी सहसा लहान सोसायटींची नसते. बगंलेपद्धतीत तर आव जाव गल्ली तुम्हारी असे अस्ते.
माझ्या इथली परिस्थिती अशी आहे की अंगणात काहीही राहिले तरी चोरीला जातय.
चुलीवर ठेवलेले पातेले गेले तर तेलाचा डबा फाडुन ठेवला, तो ही गेला, एकदा सगळी भांडी गेली घासायला बाहेर ठेवलेली, एकदा एकजात सगळ्या बुटचप्पल गेल्या.... Proud
फक्त चोरदरोडेखोरांनाही अक्कल असावी, की लिम्ब्याच्या घरात असल्या किरकोळ गोष्टींव्यतिरिक्त चोरण्यासारखे काहीही मिलणार नाहि, अन त्यातुन आगाऊपणा केलाच, तर हग्या मार मात्र मिळेल याची खात्री, त्यामुळे भुरटे प्रकार करण्याव्यतिरिक्त जास्त काही अजुन झाले नाहि. शिवाय शेजार्‍यापाजार्‍यांकडे अक्राळविक्राळ कुत्रीही आहेत.

हो, कुत्रीही त्यावेळेत झोपतात.
शेवटी काहीही व कुणालाही गृहित धरु नये, हेच खरे. कोनत्याही वेळेस काहीही वाट्याला येऊ शकेल, त्याची मानसिक शारिरीक तजवीज केलेली हवीच हवी.

१०० नंबरवर अवश्य फोन करा. नक्की प्रतिसाद मिळतो. ( आमच्या घरातून एका लहान मुलाने फोन केला होता. तरीही पोलिसांनी परत फोन करून चौकशी केली. )
सोसायटीत कामाला येणार्‍या सगळ्या माणसांचे पत्ते, संपर्क व फोटो सोसायटीच्या ऑफिसात असू द्या. बिल्डींगच्या मुख्य दाराला केवळ आतून लावायची कडी असू द्या आणि रात्री ते बंद राहील याची दक्षता घ्या. आणि मुख्य म्हणजे शेजार्‍यांशी चांगले संबंध ठेवा.

वॉचमनला रात्री कुलुप लावून मेन गेट बंद करायला लावा, आणि तो रात्री झोपत नाही ना, याची रहिवाश्यांनी अधून मधून खात्री करून घ्या. असे वॉचमनही शक्यतो एखाद्या नावाजलेल्या कंपनी कडून घ्या आणि त्याच्याबद्दल त्यांची काय जबाबदारी आहे ते करारात लिहून घ्या.

( मी परदेशी झालेल्या एका चोरी प्रकरणी, सर्व किंमत सुरक्षा कंपनीकडून वसूल केली होती. )

आणि विम्याचाही अवश्य विचार करा !

आणि मुख्य म्हणजे शेजार्‍यांशी चांगले संबंध ठेवा. >>> +१

लिंबुजी,
तुम्ही स्वतःच मांडलेले उपाय निरस्त देखील केलेत. आता राहीलं काय ?
माझ्या मते चोराने आपली माहीती काढण्याऐवजी आपणच त्याची माहीती काढावी. अधून मधून चड्डी बनियन या वेषात रात्री भटकावे. यामुळे चोर फसून आपल्याला त्यांच्या प्लानची कल्पना देतील आणि आपल्याला आगाऊच कळेल की आपल्याकडे चोरी होणार आहे कि नाही !

दिनेश दा,
१०० नंबरवर अवश्य फोन करा. नक्की प्रतिसाद मिळतो. ( आमच्या घरातून एका लहान मुलाने फोन केला होता. तरीही पोलिसांनी परत फोन करून चौकशी केली.) + १००

बहुतांश वेळा चांगल्या एजण्सी मार्फत वॉचमन ठेवने, अथवा सी.सी. टी.व्ही इन्स्टॉल करणे लहान सोसायट्यांना परवडत नाही परंतु वर भ्रमर यांनी नमुद केल्याप्रमाणे बाजुच्या सोसायटीजना विश्वासात घेऊन यावर मात केली जाऊ शकते. अर्थात अ‍ॅप्रोच महत्वाचा.

kapoche

अधून मधून चड्डी बनियन या वेषात रात्री भटकावे. यामुळे चोर फसून आपल्याला त्यांच्या प्लानची कल्पना देतील आणि आपल्याला आगाऊच कळेल की आपल्याकडे चोरी होणार आहे कि नाही ! Lol Lol Lol

उगाच अतिधाडस नको, चड्डी बनियान काढुन घेतील ते वेगळ, वर मार ही मिळेल....गैरसमज होऊन प्रसाद म्हणुन
Biggrin Biggrin Biggrin

सी.सी. टी.व्ही इन्स्टॉल करणे लहान सोसायट्यांना परवडत नाही >> यावर आणखी एक उपाय म्हणजे महिना भाडेतत्वावर CCTV System लावुन घेणे, यात फक्त केबल आणि installation charges सोसायटीला द्यावे लागतात. कॅमेरा, डिव्हीआर वगैरेचे पैसे दर महिन्याला द्यायचे. Zicom ही कंपनी भाडेतत्वावर CCTV लावुन देते.

चांगला धागा आणि चांगले प्रतिसाद!

चोरी होऊ शकणार्‍या गोष्टी, जसे सोने, रोख रक्कम, ह्या अगदी नीट पाहायला गेले तर किरकोळ बाबी आहेत. घरातल्यांवर हल्ला न होणे हे अधिक महत्त्वाचे वाटते. घरी कोणी नसलेच (जसे वरच्या प्रसंगांमध्ये आहे) तर ठीकच पण असले तर काय होते हे मोठ्या काकांच्या घरी झालेल्या उदाहरणातून माहीत आहे. प्रथम स्वतःची सुरक्षितता प्राधान्याची आहे. सोने घरी 'न' ठेवण्यापेक्षा थोडेफार सोने घरी ठेवणे केव्हाही लाभदायक. सोने मिळालेच नाही म्हणून चिडून घरातल्यांना मारणारे काहीजण असतात. तसेच रोख रकमेचेही आहे. ऐपतीनुसार थोडी रोख रक्कम, जिचा लोभ होऊ शकेल इतकी, घरात असावीच. 'शेजार्‍यांशी संबंध' हा मुद्दा महत्त्वाचा आहे पण फ्लॅट सिस्टीमने हे नाते नष्ट करण्याचा विडा उचललेला आहे. आम्ही हटकून इतपत जवळचे संबंध ठेवतो की अगदी दिवसभर त्या मजल्यावरील सगळ्यांची दारे उघडी राहतील. 'आम्ही' म्हणजे फक्त आम्ही नव्हे तर त्या मजल्यावरील सगळेच. असेच सर्व इमारतीतही आहेच.

कन्फ्युजिंग माहिती प्रसारीत करत राहणे हेही महत्त्वाचे आहे. ह्या ना त्या कारणाने आपल्या दारावर अनेक लोक येत असतात. जे दारावर येत नाहीत असेही काही रोजचे लोक असू शकतात, जसे सोसायटीचा वॉचमन, हाऊसकीपिंगवाला वगैरे! गॅस पाईपलाईन, पेपर, दूध, मोलकरणी, लाँड्रीवाला, विविध अ‍ॅप्लायन्सेसचा मेन्टेनन्स ठेवणारे इत्यादी अनेक लोक येत असतात. बाहेर जाण्याच्या व परतीच्या नेमक्या तारखा शक्यतो कोणालाही तपशीलवार सांगू नयेत. वेळाही सांगू नयेत. 'आज दूध नको, तीन तारखेपर्यंत पेपर नको' अश्या पाट्या दारावर लिहिण्यापेक्षा संबंधितांना फोन करून सांगावे. फोनचे रेकॉर्डही राहते आणि ज्याला फोन केला जातो त्यालाही हे जाणवते की आपल्याला फोनवरून सांगण्यात आलेले आहे, पाटीमार्फत नाही. त्यामुळे तोही जपून असतो. (येथे, हे सगळे चोर असू शकतात असे म्हणायचे नाही, पण ते तीच माहिती इतरत्र सांगताना जपून राहतात). घरात येणार्‍या लोकांना आपल्या गमनागमनाची वेगवेगळी वेळ व तारीख सांगणे व प्रत्यक्ष वेळ येताच फोन करणे हे बरे पडेल. बिल्डरने दिलेल्या दाराबाहेर किंवा आत स्वतःचे एक लोखंडी दार करून घ्यावे. 'तुम्ही सीसी टीव्हीच्या नजरेत आहात' अशी नुसती पाटी लावली तरी फरक पडू शकतो.

एवढे करूनही हे प्रकार होऊ शकतात. पण सोने परत मिळाल्याचे एक उदाहरण माझ्या जवळच्या नातेवाईकांमध्ये आहे. मात्र पोलिस हे सोने परत देतात तेव्हा सोन्याचा गोळा देतात, मूळ दागिनेच मिळतील असे नाही. तो गोळासुद्धा लगेच मिळत नाही तर न्यायालयाचे खेटे मारावे लागतात. पण निदान तो 'आपला आहे' हे शासनाने कोणत्यातरी पातळीला मान्य केलेले असते हेही कमी नाही. पण अनेकदा सोने परत मिळत नाही. अश्यावेळी 'आपण वाचलो, सोने गेले' हीच भावना बरी पडते.

अवांतर - सोन्याची गुंतवणूकीच्या दृष्टीने केलेली खरेदी सोडली तर बाकी दागिन्यांची खरेदी हा मूर्खपणा आहे असे माझे मत आहे. इव्हन, इन्व्हेस्टमेन्ट म्हणून घेतलेले सोनेही बायका नेमक्या वेळी विकण्यास तयार होत नाहीत कारण त्यांचा त्यात जीव अडकलेला असतो. आपल्या संकल्पना स्वच्छ असायला हव्यात. गुंतवणुकीसाठी घेतलेले सोने बँकच्या लॉकरमध्ये ठेवावे आणि किरकोळ दागिने घरात ठेवावेत हे 'त्यातल्यात्यात' बरे!

चु भु द्या घ्या

-'बेफिकीर'!

बेफि, सोन्याच्या बाबतीत त्या गोळ्याचा काही भाग.. कमिशन म्हणून द्यावा लागतो. ( कुणाला ते सांगत नाही, अंदाज सहज करू शकाल. )

दागिन्यांच्या पावत्या जरूर जपून ठेवाव्यात. आणि त्या दागिन्यांसोबत ठेवू नयेत.
लिहिणे सोपे आहे, तरी लिहितोय. दुर्दैवाने हल्ला झालाच तर शक्यतो जे काहि मागतोय ते देऊन टाका. आपली शारिरीक क्षमता प्रतिकार करायची असतेच असे नाही आणि आपण त्यासाठी तयारही नसतो, उलट ती व्यक्ती मात्र प्रतिहल्ला झाल्यास काय करायचे, याची तयारी करुनच आलेली असते. खुपदा असे हल्ले, ती व्यक्ती घाबरल्यामूळे होतात. शक्य असल्यास त्याचा चेहरा, कपडे, भाषा, चप्पल याकडे बारीक लक्ष द्यावे. पुढे ओळख पटवण्यासाठी हे सगळे उपयोगी पडते.

पुणे पोलिसांनी ब-याच वर्षांमागे काय खबरदारी घ्यावी याच्या सुचना केल्या होत्या. जालावर सापडतील कि नाही कल्पना नाही. आठवतील तशा याच पोस्टमधे अपडेट करीन.

१. बाहेरगावी जाताना जवळच्या पोलीस स्टेशन /चौकीला कल्पना देणे.
२. सोसायटीने सुरक्षारक्षक ठेवलेला असल्यास त्याच्याकडे पोलिसांकडून देण्यात येणारा बिल्ला आहे का हे तपासून घेणे. नसल्यास त्याचे पोलीस व्हेरिफिकेशन करणे आवश्यक. त्याची छायाचित्रे , बोटांचे ठसे हे पोलीस स्टेशनला असले पाहीजे. (त्या वेळी आधार कार्ड संकल्पना नव्हती).
३. घरकामासाठीच्या सेवेकरांकडून गोड बोलून फॉर्म भरून घ्यावा व पोलीस स्टेशनला जमा करावा. त्यासोबत आवश्यक कागदपत्रे असावीत. जसे की कायम राहण्याचा पत्ता. जवळचे नातेवाईक. त्यांचे फोन क्रमांक इ.
४. व्हिडीओ डोअर बेल संगणकाला जोडून ज्यांना शक्य आहे त्यांनी रेकॉर्डिंग करावं. (त्या वेळी सीसीटीव्ही नव्हते)/ प्रचलित नव्हते)
५. सोसायटीत प्रत्येक घर शक्यतो इंटरकॉम सर्विसने जोडलेले असावे.
६. इमर्जन्सीसाठी प्रत्येक सोसायटी पोलीस स्टेशनला जोडली जाईल. एक बटण दाबले की पोलीस चौकीत अलार्म वाजेल ( ही यंत्रणा अद्याप सुरू असल्याचे ऐकीवात नाही. पण पाठपुरावा केल्यास चांगला उपाय आहे ).
७. कुत्रा हा काहींना त्रासदायक वाटेल. पण अशा प्रसंगात त्याचा उपयोग होतो.
८. सण , समारंभानिमित्त घरात रोकड, सोनंनाणं, दागिने, कपडेलत्ता इ. असताना घर बंद करून जाऊ नये. किंवा कुणा बेभरवशाच्या इसमाच्या हवाली करूनही कुठे मौजमजा करण्यास जाऊ नये. आपली जोखीम आपण नीट सांभाळावी.
९. आपण घरात असता दरोड्याचा प्रयत्न झाल्यास काय करावे याच्या सूचना पोलीस स्टेशनकडून मिळतील याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. ( याबद्दल कल्पना नाही. महत्वाचं म्हणजे प्रतिकार करणे किंवा प्रसंगावधान बाळगणे हे व्यक्तीसापेक्ष आहे).
१०. दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीसां,नी भाडेकरूंची नोंदणी अनिवार्य केली होती (पोलीस स्टेशनला कल्पना दिलेली नसल्यास चेअरमन व सेक्रेटरी यांना अटक करण्याचा अधिकार पोलिसांना मिळाला होता).

त्यावेळी ज्या ज्या सोसायट्यांनी आत भाडेकरू व आत येनारे व्यावसायिक यांची माहीती पोलीस स्टेशनला दिली त्या सोसायटीत चो-या जवळजवळ थांबल्या.

....आठवल्यास इथे अपडेट देईन.

माझ्या मते चोराने आपली माहीती काढण्याऐवजी आपणच त्याची माहीती काढावी. अधून मधून चड्डी बनियन या वेषात रात्री भटकावे. यामुळे चोर फसून आपल्याला त्यांच्या प्लानची कल्पना देतील आणि आपल्याला आगाऊच कळेल की आपल्याकडे चोरी होणार आहे कि नाही !>>>>>अरे देवा!:हहगलो: खरच हसून डोळ्यात पाणी आले.:हाहा:

>>>दागिन्यांच्या पावत्या जरूर जपून ठेवाव्यात. आणि त्या दागिन्यांसोबत ठेवू नयेत.
लिहिणे सोपे आहे, तरी लिहितोय. दुर्दैवाने हल्ला झालाच तर शक्यतो जे काहि मागतोय ते देऊन टाका. आपली शारिरीक क्षमता प्रतिकार करायची असतेच असे नाही आणि आपण त्यासाठी तयारही नसतो, उलट ती व्यक्ती मात्र प्रतिहल्ला झाल्यास काय करायचे, याची तयारी करुनच आलेली असते. खुपदा असे हल्ले, ती व्यक्ती घाबरल्यामूळे होतात<<<

+१

>>>शक्य असल्यास त्याचा चेहरा, कपडे, भाषा, चप्पल याकडे बारीक लक्ष द्यावे. पुढे ओळख पटवण्यासाठी हे सगळे उपयोगी पडते.<<<

दिनेश,

'हे आपल्याबाबतीत होईल' असे वाटतच नसल्याने मुळात माणसे त्या मनस्थितीत नसतात आणि तो त्यांचा दोषही म्हणता येणार नाही. Sad खरा प्रॉब्लेम (भारतामध्येतरी) हा आहे की पोलिस प्रामाणिक असतील आणि आपली मदत करतील अशी पोलिसांची प्रतिमा अज्जिबातच तयार होऊ शकलेली नाही आहे. भारतामधील बेसिक घोळ हाच आहे.

Happy

>>>बेफि, सोन्याच्या बाबतीत त्या गोळ्याचा काही भाग.. कमिशन म्हणून द्यावा लागतो. ( कुणाला ते सांगत नाही, अंदाज सहज करू शकाल. )<<<

होय, खरे आहे तुमचे! Sad

सर्वप्रथम भक्कम सेफ्टी डोअर घराला बसवून घ्या. जर सोसायटी सीसीटीव्ही बसवून घेत नसेल तर तुम्ही तो सेफ्टी डोअर समोर बसवून घ्या.
घरातील चीजवस्तूचा विमा काढून घ्या. जर सोनं बॅकेच्या लॉकरमध्ये असेल तरी त्याचा विमा काढा. बॅकेकडे त्याचा विमा नसतो.
सामानाची लोकल होम डिल्वहरी शक्यतो टाळा.

Pages